बापूजींबरोबरचे माझे पुण्यातले दिवस फार मजेचे होते. होऽ हे खरंय की, सेवाग्राममधल्या शांततेची मला सवय झाली होती... त्यामुळं तिथली आठवण व्हायचीच... तरी पुण्यातलं जग सेवाग्रामपेक्षा मोठं होतं. बऱ्याच दिवसांनी वेगवेगळी दुकानं बघणं, बाजारातून रपेट मारता येणं या गोष्टी करता आल्यानं छान वाटलंच. तसे पुण्यात आम्ही बरेच दिवस असणार होतो... त्यामुळं बापूजींनी माझ्या अभ्यासाची सोय व्हावी म्हणून एक शिकवणी लावली होती. एक दिवस शिकवणीहून परत येताना एका दुकानाच्या काचेच्या खिडकीत एक मोठी सुबक पेन्सील विक्रीसाठी ठेवलेली मला दिसली. मी माझ्या हातातल्या थोटक्या पेन्सिलीकडं एकवार पाहिलं नि मला एकदम वाटलं, ती नवी पेन्सील मला मिळायला हवी खरंतर! विचार मनात चमकल्याबरोबर मी माझी लहानशी पेन्सील रस्त्यालगतच्या गवतात भिरकावून दिली.
त्या दिवशीच संध्याकाळी आजोबांबरोबर बसलेलो असताना मी त्यांना नवी पेन्सील मागितली. एखादी पेन्सील मागणं ही काही फार मोठी गोष्ट नाही... पण आजोबांच्या नजरेतून काही सुटेल तर शपथ! ते लगेच म्हणाले, ‘‘अरेऽ सकाळी तुझ्या हातात मी बघितलेली की पेन्सील. चांगली आहे ती!’’
‘‘ती फार लहान झालेली.’’
‘‘मला तर नाही वाटली लहान. बघू बरं...’’ त्यांनी हात पुढे करत पेन्सील मागितली.
‘‘आत्ता नाहीये माझ्याकडे. टाकून दिली मी ती.’’ मी अगदी सहज सांगितलं.
बापूजी माझ्याकडे अविश्वासानं पाहत राहिले, ‘‘काय? टाकून दिलीस? तसं असेल तर जा आणि शोधून आण.’’
मी त्यांना चाचरत सांगितलं, अंधार झालाय. तेव्हा त्यांनी मला बॅटरी दिली... म्हणाले, ‘‘हिची मदत होईल तुला... आणि डोकं शांत ठेवून जर तू येतानाच्या रस्त्यावर नीट पाहिलंस तर मिळेल तुला पेन्सील.’’
बापूजींना उलट उत्तर देता येणं शक्यच नव्हतं. मी अंधारात चालायला लागलो. रस्त्याच्या कडेच्या झाडीत, गटारीत बघत गेलो. इतक्या अंधारात मी काहीतरी महत्त्वाचं शोधत असलो पाहिजे असं वाटून रस्त्यावरच्या एका माणसानं मला विचारल्यावर मी खरंखरं उत्तर दिलं... कितीही नको वाटलं तरी! मात्र मी एक लहानशी पेन्सील शोधतोय हे ऐकल्यावर तो हसत म्हणाला, ‘‘इतक्या अंधारात शोधतोयस म्हणजे पेन्सील सोन्याची असेल... नाही?’’
एका जागेची मला ओळख पटली की, बहुतेक तिथेच मी पेन्सील भिरकावली असणार. तिथल्या गवतात नि घाणीत हात घालत मी बघत राहिलो. अखेर पेन्सील मिळाली. बहुतेक दोनेक तास मी ही बारकुळी पेन्सील शोधण्यात घालवले असावेत. पेन्सील मिळाली... पण कुठलातरी खजिना शोधल्यासारखा उत्साह माझ्यात मुळीच संचारला नाही. मला नकोच होती ती पेन्सील. बापूजींनी बघितल्यावर त्यांनाही पटेल की, इतकी वाचवून वापरावी अशी ही चीजच नाही... अरुणचं बरोबर आहे! तरी बापूजींनी सांगितल्याप्रमाणे मी काम फत्ते केलं होतं... म्हणून मी खूश होतो. पेन्सील घेऊन मी धावत त्यांच्याकडे पोहोचलो.
‘‘बघितलीत? केवढीशी आहे ही पेन्सील बापूजी!’’
त्यांनी बघितलं आणि पेन्सील आपल्या हातात घेतली. ‘‘ही लहान नाही अरुण. मला विचारशील तर अजून काही आठवडे तरी ही कामाची आहे. बरं झाली तू शोधून आणलीस.’’
त्यांनी पेन्सील त्यांच्या छोट्या टेबलावर ठेवली आणि माझ्याकडं पाहून हसले.
‘‘आता जरा बस माझ्यापाशी. मग मी तुला सांगतो की, मी तुला पेन्सील शोधायला का पाठवलं...’’
मी त्यांच्याजवळ बसलो. त्यांनी प्रेमानं माझ्या खांद्यावर हात टाकला नि म्हणाले, ‘‘कुठलीही गोष्ट वाया घालवणं ही केवळ वाईट सवय नाही... तर विकृतीच आहे. जगाबद्दलची बेफिकिरी आणि निसर्गाविरोधातली हिंसा तुमच्या वाया घालवण्याच्या कृतीतून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असता...’’
आधी मी हिंसेविषयी विचार करायचो तेव्हा तो लोकांना शारीरिक इजा पोहोचवणं या मुद्द्याशी संबंधित असायचा... आजोबा काहीतरी वेगळं सांगतायत असं माझ्या लक्षात आलं. मी कान टवकारून ऐकायला लागलो.
‘‘आपल्याला रोज जगायला ज्या छोट्याछोट्या गोष्टी लागतात, मग अगदी ही पेन्सील का असेना... त्या बनवण्यासाठी केवढ्या माणसांचा, केवढातरी वेळ खर्च पडलेला असतो. फक्त पैसाच खर्च होत नसतो. आपण एखादी गोष्ट फेकतो किंवा वाया घालवतो तेव्हा आपण नैसर्गिक स्रोतही वाया घालवत असतो. आपल्या आरामासाठी, सुखासाठी शेकडो लोकांनी केलेल्या श्रमाचा, बुद्धीचा अपमान होतो अशानं!’’
मी मन लावून ऐकत होतो... तितक्यात बापूजींनी विचारलं, ‘‘रस्त्यानं चालताना तुला गरीब लोक दिसतात?’’
‘‘होऽ बापूजी. दिसतात ना!’’
‘‘त्या गरीब माणसांना तुझ्यासारखी पेन्सील घेणं परवडत नाही अशी स्थिती असताना आपल्यासारखे लोक गरजेला जे-जे हवं ते विकत घेतात नि वाया घालवतात... जगभरातली अशी माणसं गरजेच्या नावाखाली मुबलक वस्तू विकत घेतात आणि जगभरातले नैसर्गिक नि मानवी स्रोत त्यांची गरज भागवतात. मात्र इथं हे लक्षात ठेवायला हवं की, आपण जेव्हा पृथ्वीवरचे नैसर्गिक साधनस्रोत गरजेपेक्षा जास्त वापरत सुटतो तेव्हा दुसऱ्या एका गटासाठी आपण टंचाई तयार करत असतो.’’
‘‘कळतंय मला बापूजी.’’ चुकीची जाणीव झाल्यानं मी थोडा शरमेला होऊन पुटपुटलो.
बापूजींचं बोलून झालंय असं समजून मी उठायला लागलो... पण आजचा धडा संपला नव्हता.
‘‘मी तुझ्याकडं एक कामगिरी सोपवणार आहे. पेन्सीलनिमित्तानं मी तुझ्याशी जे बोललो त्यापेक्षा या कामातून तुला माझं म्हणणं जास्त कळेल नि पटेल.’’ बापूजींच्या डोळ्यांत पुन्हा तीच मिश्कीलपणाची खळी उमटली.
बापूजींनी मला पेन्सील नि कागद दिला आणि सांगितलं की, तू हिंसेचा वंशवृक्ष तयार करायचा आहेस. ‘फॅमिली ट्री ऑफ व्हायोलन्स’! कुठल्याही कृतीचा अंतःसंबंध माझ्या लक्षात यायला हवा असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्या प्रत्येक कृतीचा संबंध तिच्यामागच्या एका किंवा अनेक कृतींशी निगडित असतो हे लक्षात घेऊन त्यांनी मला या वंशवृक्षाच्या दोन महत्त्वाच्या फांद्या बनवायला सांगितल्या. एक शारीरिक हिंसा आणि दुसरी निष्क्रिय राहण्यातून झालेली हिंसा. माझं वागणं, माझ्या आसपासच्या माणसांचं वागणं यांचं दररोज विश्लेषण करून मूळ वृक्षाच्या फांद्या मला वाढवत न्यायच्या होत्या. जर माझ्या हातून कुणाला मारहाण झाली किंवा मी कुणावर दगड भिरकावला तर शारीरिक हिंसेच्या भागात नोंद करायची होती. हे झालं स्पष्टपणे दिसणारं नि कळणारं. मात्र माझी जगण्याची पद्धत, सवयी यांतून मी कुणाला कशा पद्धतीनं दुखावतोय आणि भेदभाव, अन्याय, अपव्यय, हाव यांतलं काही स्वतःकडून किंवा दुसऱ्यांकडून घडताना मी बघतो तेव्हा मी काय करतो हे सगळं निष्क्रिय राहण्यातून घडणाऱ्या हिंसेच्या भागात नोंदवायचं होतं. ही पॅसिव्ह हिंसा सहसा दुर्लक्षित राहते... त्यामुळं तिच्याकडे मी खास लक्ष द्यावं असं आजोबांचं म्हणणं होतं.
पुढचे काही दिवस मी वंशवृक्षावर मन लावून काम करत राहिलो. माझा तोवर तयार झालेला तक्ता अतिशय अभिमानानं मी बापूजींकडे नेला आणि शारीरिक हिंसेच्या फांदीखाली किती कमी नोंदी आहेत याकडं त्यांचं लक्ष वेधलं. म्हणालो, ‘‘बापूजी, माझा राग अगदी आटोक्यात आलाय आता.’’
त्यांनी होकारदर्शक मान हलवली आणि मग आम्ही ‘पॅसिव्ह हिंसे’च्या फांदीवर लक्ष केंद्रित केलं. ‘‘निष्क्रिय राहण्यातून घडणारी हिंसाच खरंतर जगभरात घडणाऱ्या शारीरिक हिंसेसाठी इंधन पुरवते. जर आपल्याला जगभरातली शारीरिक हिंसा विझवून टाकायची असेल तर मुळात तिला मिळणारा इंधनाचा पुरवठा तोडायला हवा!’’
त्या वेळी पर्यावरणवाद वगैरे संकल्पना फारशा चर्चेत नव्हत्या. माणसं पृथ्वीवरच्या साधनसंपत्तीची कशी धूळधाण करताहेत हाही विषय पटलावर नव्हता. अशा काळात बापूजी माणसांच्या अधाशीपणामुळे नि नैसर्गिक स्रोतांच्या अतिवापरामुळे निर्माण झालेल्या आर्थिक असंतुलनाची चर्चा करत होते. भौतिक सुबत्तेचा वापर बुद्धिनिष्ठ विवेकानं केला तर पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला सुंदर जगता येणं शक्य आहे. दुर्दैवानं भौतिक प्रगतीचा वापर दुसऱ्याचं शोषण करण्यासाठी, दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी केला जातो आणि असमानता नि असंतुलन यांच्यातली दरी दुरुस्त करता येणार नाही इतकी रुंदावते. आजोबांच्या काळात असणारी असमानता ही वाईटच होती... पण आज काय दिसतं? आज जगभरात मिळून असलेल्या संपत्तीचा अर्ध्याहून अधिक हिस्सा एक टक्का श्रीमंत लोकांकडं साठलेला आहे. त्यांचं या जगावर नियंत्रण आहे. या श्रीमंताना जे हवं ते मिळवण्याचा आणि उरलेल्या जगाला आपल्या तालावर नाचवण्याचा परवाना आहे जणू!
‘‘आपला अधाशीपणा आणि वाया घालवण्याची सवय यांमुळं गरिबी टिकून राहते. गरिबी कायम ठेवणं ही मानवतेविरोधातली हिंसाच आहे.’’ बापूजींनी प्रत्येक शब्दावर जोर देत मला आणखी लक्ष केंद्रित करायला भाग पाडलं.
कुठलीही गोष्ट, अगदी पेन्सीलचा थोटका तुकडाही वाया घालवण्यास कट्टर विरोध करणाऱ्या बापूजींना आजची ‘वापरा नि फेकून द्या’ संस्कृती समजून घेणं फार फार कठीण गेलं असतं. वाया घालवणं ही कृती आपल्या इतकी अंगवळणी पडलीय की, त्याचे मोठे परिणाम लक्षात येणं अवघड होऊन बसलंय. अमेरिकेत आम्ही विकत घेतो त्या अन्नाचा एक तृतीयांश भाग अक्षरशः कचऱ्यात टाकला जातो. ग्राहकांना विकण्यापूर्वी दुकानांमधून तितकंच अन्नधान्य अयोग्य म्हणून कचऱ्याचा भाग होतं. आणखी एक हादरवणारी गोष्ट म्हणजे अमेरिकेत जवळपास एकशे साठ बिलियन डॉलर्सचं अन्नधान्य दरवर्षी जमिनीत गाडलं जातं, निरुपयोगी म्हणून! - इतकं अन्नधान्य ‘लॅन्डफिल’ म्हणून दफन होतं त्या वेळी जगभरातली करोडो मुलं रात्री उपाशीपोटी झोपलेली असतात. आजोबा नेहमी म्हणायचे, जोपर्यंत पूर्ण जगात एकाही माणसाच्या डोळ्यांत अश्रू शिल्लक आहे तोवर मानवतेला विश्रांती मिळू शकत नाही. प्रत्येक माणसाला त्याच्या भूमीवर सुरक्षित आणि स्थिर वाटतं का या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तरच संपूर्ण मानवजातीला सुरक्षा आणि स्थैर्य लाभलं आहे असं म्हणता येऊ शकतं. गरजेपेक्षा जास्त खरेदी करत सुटणं आणि त्यांतल्या अनेक घटकांचा अपव्यय करणं यावर अंकुश ठेवता आला तर अन्नधान्याच्या निर्यातीवर खर्च होणारे करोडो रुपये नि तेवढा सायास करूनही कचऱ्यात पडणारं अन्न आपल्याला वाचवता येऊ शकतं. ते वाचलं तर खरी गरज असणाऱ्या ठिकाणी पोहोचून माणसांची भूक शांत करू शकेल.
थोटकी पेन्सील शोधून काढण्याचा बापूजींचा आग्रह नि ती मिळाल्यावर त्यांनी मला दिलेली शिकवणूक प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी मला वेळ लागला. कळता झाल्यावर जगभरातल्या असमानतेविषयी अस्वस्थ करणारी दृश्यं मला दिसायला लागली... तेव्हा मला बापूजींची कळकळ जाणवली. आपल्याला वाटतं, व्यक्तिगत स्तरावर मी एखादा छोटासा बदल केल्यानं एवढं काय मोठं होणार आहे? - पण बऱ्याच माणसांनी घेतलेल्या छोट्याछोट्या निर्णयांचा एकत्र परिणाम होत असतो. मी खिशात नेहमी रुमाल ठेवतो. बाहेर गेल्यावर टिश्यू पेपर किंवा टिश्यू टॉवेल वापरणं सहसा टाळतो. या कृतीचा दृश्य स्वरूपात जगावर झालेला परिणाम दिसणार नाही हे खरंय... पण जर सगळ्यांनीच अशी सुरुवात केली तर बदल घडणं कोण रोखू शकणार! एक अभ्यास सांगतो की, अमेरिकेत वापरले जाणारे सगळे ॲल्युमिनिअम कॅन जर प्रक्रिया करून परत वापरात आणले तर चार मिलियन घरांना बळ देऊन आपण सुमारे आठशे मिलियन डॉलर्स दरवर्षी वाचवू शकतो. बिअरचा एक कॅन तुम्ही केरात टाकण्याऐवजी पुनर्वापर प्रक्रियेसाठी देऊ केलात तर केवढीतरी बचत होते! हा अभ्यास मुळातून वाचायला हवा म्हणजे कल्पना येईल. सांगायचा मुद्दा एवढाच की, छोट्या कृती भविष्यातल्या मोठ्या बदलांसाठी बळ पुरवतात.
पर्यावरणाकडे आस्थेनं पाहिलं, लक्ष पुरवलं... तर माणसांना मानसिकदृष्ट्या उल्लसीत वाटतं असंही एक अभ्यास सांगतो. वस्तूंच्या पुनर्वापराची कल्पना लोकप्रिय होऊ लागल्यामुळं अनेक गावाशहरांमध्ये पुनर्वापर प्रक्रियेच्या उपक्रमांची उभारणी होतेय. आपल्यापैकी बरेच लोक वाणसामान आणायला जाताना कापडी पिशवी वापरायला लागलेत, पाण्यासाठीही वापरून फेकून देता येण्याजोग्या बाटल्या वापरण्याऐवजी स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. आजच्या जागतिक अर्थशास्त्राच्या संवेदनशीलतेविषयी बोलायचं तर इंडियानाच्या एखाद्या उपनगरात तुम्ही एखादा निर्णय घेऊन कृती करता तेव्हा त्याचे पडसाद थेट भारतातल्या एखाद्या गरिबात गरीब खेड्यात उमटतात. हवामानबदलाविरोधात लढा देणं, अख्ख्या जगाची भूक भागवता यावी या दृष्टीनं शेतीविषयक अधिक चांगल्या तोडग्यांची मांडणी आणि उपाययोजना करणं यांसारख्या मोठ्या प्रश्नांबाबतही हेच सांगता येतं की, आपण आपल्या खासगी आयुष्यात घेतलेला एक लहानसा चांगला किंवा वाईट निर्णय हा दूरगामी परिणाम घडवून आणत असतो... त्यामुळं जग बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी ही गोष्ट शब्दशः खरी आहे. हे लक्षात आल्यामुळं अनेक लोक आपल्या वापरातले चांगले कपडे ‘लँडफिल’ची भर न करता देणगीरूपानं इतर गरजूंना वापरण्यासाठी देण्याचा पर्याय खुला करतात... त्यामुळंच तर अनवाणी फिरणाऱ्या, भारतातल्या गरीब वस्तीतल्या मुलांच्या अंगावर शिकागो कब्जसारख्या किंवा न्यू इंग्लंड पॅट्रिऑटसारख्या ब्रँडचे लोगो झळकवणारे टीशर्ट सहजपणानं दिसतात.
प्रत्येक माणसामध्ये जग बदलण्यासाठीची शक्ती असते या गोष्टीवर आजोबांचा विश्वास होता. असं असलं तरी आपल्या एखाद्या कृतीनं जग बदलण्यासाठी प्रेरणा मिळत असते या गोष्टीवर सर्वसाधारण माणसांना विश्वास ठेवणं का कठीण जातं हे मला समजू शकतं. वातावरणातलं कार्बनडायॉक्साईडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे यासाठी हवामान बदलाबाबतीत काम करणारे निराशावादी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञही अज्ञान नागरिकांइतकेच जबाबदार आहेत. हवामानबदलाचे निसर्गावर किती घातक परिणाम होणार आहेत किंवा होत आहेत हे पाहण्यासाठी अजून काही काळ उलटण्याची गरज नाही. ते दिसायला लागले आहेतच. आपण सर्वसाधारण नागरिक म्हणून किमान आपल्या जगण्यातून तरी कार्बनचं उत्सर्जन होऊ नये असा निर्णय घेतला तरी आपल्याला सहजपणानं दिसतं की, मोठ्या कंपन्या, एअरलाइन्स, रस्त्यावर धावणाऱ्या कार्स हा कार्बन उत्सर्जनाचा मुख्य स्रोत आहे. मुळात जिथून कार्बन उत्सर्जन जास्तीतजास्त वाढत चाललं आहे त्यावर आळा घातला नाही तर प्रश्न कसा सुटणार? अशा प्रश्नांबाबतीत कैक वर्षांपूर्वी माझ्या पणजीनं उत्तर देऊन ठेवलंय. पणजी म्हणजे बापूजींची आई. कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना तिनं आपल्या मुलाच्या मनात शहाणपणाचं मूलभूत बीज रुजवलं. उपयुक्त नि परिणामकारक विज्ञान म्हणून मान्यता पावलेल्या आणि विकसित झालेल्या प्राचीन भारतीय नि ग्रीक तत्त्वज्ञानाविषयी तिला माहिती होती. आपल्या भोवतालचं जग हे असंख्य लहान-लहान सूक्ष्मातिसूक्ष्म कणांपासून म्हणजे अणूंपासून आकाराला आलंय हे त्यामुळंच तिला मान्य होतं. त्यातून तिनं ‘एका लहानशा अणूत सृष्टीचं प्रतिबिंब असतं’ हे तत्त्व बापूजींना शिकवलं होतं. आपल्या रोजच्या जगण्यातल्या एका लहानशा कृतीतून आपण भविष्यातलं बदललेलं जग पाहू शकतो हे या तत्त्वाच्या आधारे ती बापूंना समजवायची. आपली कृती ही बदलू पाहणाऱ्या जगाचा आरसा असते. आपल्या खासगी छोट्या जगामध्ये जाणीवपूर्वक बदल केले, त्याची काळजी घेतली की बाहेरचं विस्तारलेलं जग अधिक चांगलं होईल हे नक्की!
सुबत्तेनं नि समृद्धीनं कित्येक प्रश्नांचे गुंते सुटतात... मात्र अधाशीपणानं आणि असंवेदनशीलतेमुळं कितीतरी प्रश्न नव्यानं तयार होत राहतात. जगात बदल घडवून आणण्यासाठी, माणसांना प्रेरित करण्यासाठी बापूजींना त्यांचं डेस्क, कागद नि पेन्सील इतका ऐवज पुरायचा. मात्र आज मला दिसतं की, भौतिक संपत्ती गोळा करायचा माणसांचा वेग पराकोटीचा वाढलेला आहे. आपण वेड्यासारखी खरेदी करत सुटतो आणि त्या सगळ्याचं करायचं काय हे आपल्याला ठाऊक नसतं. हे प्रमाण इतकं टोकाचं वाढलेलं आहे की, माणसांना त्यांच्या घरातल्या सामानाची नीट जुळणी करून देण्यासाठी अक्षरशः एका नव्या उद्योगाचा उदय झालेला आहे. याबद्दल लिहिली गेलेली पुस्तकं नि त्यासाठी काम करणारे सल्लागार अशा प्रचंड भरलेल्या घराच्या मालकांना सांगतात की, आधी जादाचं सगळं सामान घराबाहेर काढा, त्याची तुम्हाला बिलकूल गरज नाहीये. या सगळ्या व्यवस्थापनाच्या उद्योगातून मूलभूत प्रश्न वाकुल्या दाखवतोच की, मुळात इतकं सामान खरेदी करायचीच काय गरज असते?
तुम्ही बूट खरेदी करा किंवा सोफा किंवा अगदी हिरा जरी खरेदी केला तरी त्याचा आनंद, कौतुक थोडे दिवस असतं. काही काळानं हे आनंद फिके होतात. आपल्या वापरातल्या रोजच्या वस्तूंचा आपल्याला सराव होतो नि मग आपल्याला नवीन काही घ्यावं वाटतं. असं वाटतं की, या नव्या गोष्टींनी काहीतरी गंमत येईल, नवा जोम मिळेल... पण कितीही आणि काहीही खरेदी केलं तरी आपल्या हृदयातली पोकळी भरून निघत नसते... त्यामुळंच भारंभार खरेदी करून अडगळीची भर करण्यापेक्षा आपण स्वतः निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये जास्त आनंद सामावलेला आहे हे समजून घेणं या घडीला भाग आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेत राहायचो ते घर लाकडी बांधणीचं, नळीचे पत्रे घातलेलं होतं. ऋतूंच्या परिणामानं त्याची झीज होत गेली होती... लाकूड कुजलं होतं, पत्रे गंजले होते. घराच्या पायातही मोठाले खड्डे झाले होते नि चिरा पडल्या होत्या. वडलांनी त्यात भर घालून डागडुजी केली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरायची. थोड्या दिवसांनी परत नवीन ठिकाणी चिरा जायच्या. त्या चिरांमध्ये नि खड्ड्यांमध्ये बारीकसारीक सरपटणाऱ्या प्राण्यापासून मोठाल्या सापांपर्यंत सगळ्यांची घरं असायची. त्यात घरात वीज नव्हती. रात्री उठून लघवीला जायचं म्हणजे भीतीच वाटायची मला.
अशा त्रासात खूप दिवस काढल्यावर अखेरीस माझ्या वडलांनी घर बदलायचा निर्णय घेतला. एक दिवस ते वाळू नि सिमेंट घेऊन घराकडे आले. आपल्या आपण सिमेंटच्या विटा तयार करून घर बांधायची कल्पना त्यांनी सांगितली. आम्ही सगळेच फार खूश झालो. स्वतःच्या नव्या घरासाठी सगळ्यांनी मिळून विटा तयार करायच्या, त्या उन्हात सुकवायच्या नि नीट रचून ठेवायच्या. सगळी तयारी सगळ्यांनी मिळून करायची नि घर बांधायचं ही कल्पनाच किती उत्साहवर्धक होती. पुढे घर तयार होईपर्यंत एक वर्ष उलटलं... मात्र आम्ही या नव्या घरात राहायला गेलो तेव्हा वेगळाच अवर्णनीय आनंद मनात उचंबळून येत होता. मोठा विजय मिळाल्यासारखं वाटत होतं. त्याचदरम्यान एक वाईट घटना घडली. आम्ही हादरलो. आमची आजी, माझ्या वडिलांची आई कस्तूरबा वारली. तिच्या स्मृतीसाठी आमच्या नव्या घराचं नाव वडलांनी ‘कस्तूर भवन’ असं ठेवलं... त्यामुळंच या घराविषयी मला विशेष ममत्व आहे. या घराला आजीचं नाव असणं ही एक जिव्हाळ्याची गोष्ट आहेच... पण आपला घाम आपल्या भावना या घराच्या उभारणीत रुजल्या आहेत यानं फार उभारी वाटली होती.
जगावर प्रभाव पडण्यासाठी भौतिक सुखसुविधांची गरज बापूजींना कधीच वाटली नाही. आम्हा कुटुंबीयांनाही तो मोह नव्हता. एकदा मात्र स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी माझ्याकडून जे झालं ते माझ्यावर कसं उलटलं त्याचा गमतीदार अनुभव सांगायला हवा. ही घटना आजोबांच्या मृत्यूनंतरची.
आजोबा गेल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान नेहरूंनी मला ब्रेकफास्टसाठी स्वतःच्या घरी बोलावलं होतं. बापूजींचं आणि नेहरूंचं नातं वेगळं होतं. नेहरू भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांच्यासोबत होते. त्यांच्याविषयी बापूजींना खूप आदर वाटायचा. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदी नेहरूंची निवड झाल्याचा बापूजींना फार आनंद होता. बापूजींची हत्या झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या देशाला पंतप्रधान या नात्यानं संबोधित करताना नेहरू अतिशय हेलावून बोलले होते. ‘आपल्या आयुष्यातून जणू प्रकाशच निघून गेलाय आणि सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे.’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.
स्वतंत्र देशाच्या पहिल्यावहिल्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यावर नेहरू अतिव्यग्र होणं स्वाभाविक होतं. तरीही बापूजींच्या हत्येनंतर ते आम्हां गांधी कुटुंबीयांशी संवाद ठेवून होते... त्यामुळं ब्रेकफास्टच्या निमित्तानं त्यांच्याशी पुन्हा बोलता येईल याचा मला आनंद झाला. मी पोहोचलो तेव्हा त्यांची कन्या इंदिरा गांधी नि तिचे यजमानही उपस्थित होते. इंदिराचं आणि आमचं आडनाव सारखं असलं तरी ते आमचे केवळ आडनावबंधू. त्यांनी माझं स्वागत केलं.
त्या काळात माझ्याकडं स्वतःची कार नव्हती... त्यामुळं भाड्याच्या टॅक्सीनं नेहरूंच्या घरी पोहोचायचं माझं नियोजन होतं. माझ्या एका काकांनी त्यावर आक्षेप घेतला. पंतप्रधानांच्या घरी असं टॅक्सीनं जाणं त्यांना मंजूर नव्हतं. ते उद्योजक होते. त्यांच्याकडं लिमोझीनसारखी भव्य गाडी होती. त्यांनी चालकासह गाडी माझ्याकडे सोपवली. मी पोहोचलो तेव्हा तिथं इंदिरा आणि तिचे यजमान होते. नेहरू कुठेच दिसले नाहीत. मी विचारलं तेव्हा इंदिरा म्हणाल्या, ‘‘ते खूप भरभर खातात... त्यामुळं सगळ्यांचं खाणं होईपर्यंत त्यांचं संपलेलं असतं. बाकीच्यांचं आटपेपर्यंत वाट बघणं त्यांना आवडत नाही म्हणून ते उशिरा येतात... त्यामुळं सगळ्यांसोबत खाणं संपवता येतं. वेळेची खोटी होत नाही.’’
ब्रेकफास्ट करताना आम्ही बापूजींबद्दल बोललो. त्यानंतर तत्कालीन राजकारणावरही चर्चा झाली. त्या वेळी नेहरू देशासंदर्भात बऱ्याच नव्या गोष्टींवर विचार करत होते. एक सुटसुटीत व्यवहार्य परराष्ट्रीय धोरण कसं असावं यावर त्यांचा ऊहापोह चालू होता. देशपातळीवर काही चांगल्या शिक्षणसंस्था उभारण्याचाही त्यांचा मनसुबा होता. (इंदिरा त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत पुढे पंतप्रधानपदाच्या दोन टर्म्स पार पाडतील याची किंचितही कल्पना त्या वेळी नव्हती.)
खाणं, बोलणं आटोपल्यावर नेहरू आणि मी, दोघंही आपापल्या गाड्यांची वाट बघत घराबाहेर येऊन थांबलो. त्यांची छोटीशी साधी कार पहिल्यांदा आली. तिच्यापाठोपाठ आली भव्य, दिमाखदार अशी माझी लिमोझीन. नेहरू माझ्या आजोबांच्या विचारसरणीशी नि राहणीशी चांगलेच परिचित होते... त्यामुळं लिमोझीन पाहून त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे पाहिलं नि म्हणाले, ‘‘माझी गाडी इतकी छोटी नि साधी आहे... त्यामुळं तुमची दिमाखदार गाडी आत आल्यावर तुम्हाला कानकोंडं तर झालं नाही ना?’’
‘‘अजिबात नाही... कारण असं की, तुमची गाडी तुमची स्वतःची आहे. माझी कितीही दिमाखदार दिसली तरी उसनी आहे.’’ मी उत्तर दिलं.
आम्ही दोघंही खळखळून हसलो. आम्हांला दोघांनाही माहीत होतं, आपल्याकडं किती काय आहे यातून आपली ओळख ठरत नसते. आपलं लहानमोठेपण आपल्या संपत्तीत सामावलेलं नसतं. पंतप्रधानांची गाडी केवढ्या आकाराची आहे यापेक्षा त्यांच्या मनात असलेल्या नव्या कल्पना नि विचार किती भव्य आहेत यावर त्यांचं मोठेपण ठरतं... नाही का? माझ्या काकांची भव्य, देखणी लिमोझीन कितीही दिमाखदार असली तरी त्यानं ‘मी कोण’ हे बदलणार नव्हतं!
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले अकरा भाग:
1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...
6. वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते
7. सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं!
8.भौतिक स्थैर्य आणि नैतिकता यांचे संबंध व्यस्त असतात...
9. निम्मं जग कसे दिवस काढत आहे हे पाहाण्याची खिडकी आपल्यापाशी नसते
10. खोटं बोलणं आपल्याला दुबळं करत असतं
11. खोटेपणाबद्दल पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा सत्याचे परिणाम भोगणं अधिक चांगलं
Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ जवाहरलाल नेहरू अपव्यय नैसर्गिक स्रोत पर्यावरण गरिबी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Wastage Materialism Natural Resources Greed Environment Poverty Load More Tags
Add Comment