खोटं बोलणं आपल्याला दुबळं करत असतं

वरदान रागाचे - भाग 10 

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 10 वा लेख.   
- संपादक

बापूजींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता... मात्र त्यावर नैसर्गिक मार्गानंच औषधोपचार करण्यावर त्यांचा विश्वास होता. मी त्यांच्याजवळ होतो तेव्हाही ते पुण्यातल्या एका डॉक्टरनं सुरू केलेल्या निसर्गोपचार केंद्रामध्ये गेले होते. तिथली हवा मोकळी नि शुद्ध होती. मला आनंद काय... की, त्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो. आपली तब्येत सुधारण्यासाठी म्हणून ते तिथं गेले असले तरी सल्लामसलतीसाठी येणाऱ्या ठरावीक लोकांची रीघ काही थांबली नव्हती.

अशाच एका प्रसन्न सकाळी प्रार्थना नि योग आटोपून वाऱ्याच्या झुळकीची मौज अनुभवत मी पायरीवर बसलो होतो. तिच्यातून फुलांचा गंधही पोहोचत होता. मी तंद्रीत विचार करत राहिलो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर मागून कुणीतरी हात ठेवला. मागं वळून पाहिलं तर काय... नंतर ज्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून सन्मानित करण्यात आलं ते जवाहरलाल नेहरू होते माझ्या खांद्यावर हात ठेवणारे. अर्थात पंतप्रधानपद मिळण्याआधीपासूनच जगभर नेहरूंचा नावलौकिक होता. आपल्या देशातही महात्मा गांधींची अगदी खासगीतली व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. असं समोरासमोर मी त्यांना पहिल्यांदाच पाहत होतो. त्यांच्या अनपेक्षित येण्यामुळं मी दचकलो होतो. आजोबांबरोबर नेहमी फिरण्याची मला सवय होती... पण आता नेहरू मला भेटले होते.

‘‘गुड मॉर्निंग अरुण... ब्रेकफास्ट करशील माझ्यासोबत?’’

‘‘हो... नक्कीऽ’’ असं म्हणत मी उभा राहिलो. संथ पावलं टाकत आम्ही जेवणघराकडे चाललो होतो तेव्हाही नेहरूंचा हात माझ्या खांद्यावरतीहोता.

टेबलावरचा मेन्यू पाहत त्यांनी मला विचारलं, ‘काय खाणार?’ अर्थात आश्रमातल्या मेन्यूमध्ये निवडीला फार वाव नसायचा.

‘‘तुम्ही जे घेणार असाल तेच घेईन मीही.’’ मी गडबडीनं उत्तर दिलं.

‘‘अरे नाही. मी ऑम्लेट खाणार आहे. तू ऑम्लेट खाल्लंस तर तुझ्या आजोबांना आवडणार नाही असं मला वाटतंय.’’ ते विचार करत म्हणाले.
 
आजोबा पूर्ण शाकाहारी होते. अंडी, मासे, मांस हा त्यांच्या अन्नाचा भाग नव्हता. त्यांनी आपल्या मुलानातवंडांनाही शाकाहारी असण्याचा वसा दिलेला असणार अशी खातरी नेहरूंना होती. त्यांची खातरी चुकीची नव्हती... पण त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा मोका मला हातून जाऊ द्यायचा नव्हता... त्यामुळं ते जे खाताहेत तेच खाणं माझ्यासाठी अचानक महत्त्वाचं होऊन बसलं.

‘‘आजोबांना काही वाटणार नाही.’’ मी आत्मविश्वासानं नेहरूंना सांगितलं.

नेहरूंच्या मनात आजोबांविषयी खूप आदर होता. विनाकारण आपण त्यांना दुखवू नये या हेतूनं त्यांनी मला पुन्हा सांगितलं की, हरकत नाही... पण ऑम्लेटची ऑर्डर देण्याआधी तू आजोबांची परवानगी घेशील तर बरं होईल.

मी लगेच धावत आजोबांच्या खोलीकडे पळालो. तिथं आजोबांची चर्चा चालली होती ती... नंतर नेहरूंच्या नेतृत्त्वाखाली उप-पंतप्रधान म्हणून ज्यांनी जबाबदारी पेलली त्या सरदार पटेलांशी. मात्र त्या घडीला भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नापेक्षा ब्रेकफास्टचा प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. 

‘‘बापूजी, मी ऑम्लेट खाऊ?’’ मी उत्साहात विचारलं.

त्यांनी अतिशय आश्चर्यानं माझ्याकडं पाहत विचारलं, ‘‘अरेऽ पण तू याआधी कधी अंडं खाल्लं आहेस का?’’

‘‘होऽ दक्षिण अफ्रिकेत असताना खाल्लं आहे.’’ घाईघाईत, किंचितही तमा न बाळगता, अतिशय निर्लज्जपणे मी खोटं बोलून बसलो.

‘‘तसं असेल तर ठीकाय, खा.’’ ते सहजपणानं म्हणाले.

खोटं बोलणं सोपं नसतं. मी नेहरूंजवळ पळत गेलो नि त्यांना सांगितलं, ‘‘मी ऑम्लेट खाल्ल्यानं आजोबांना तसं काही विशेष वाटणार नाहीये. तसं मला म्हणाले ते आत्ता.’’

‘‘होय? आश्चर्यच आहे!’’ असं म्हणत नेहरूंनी ऑम्लेटची ऑर्डर दिली. ब्रेकफास्ट करताना मोठा विजय मिळाल्याची भावना मला सुखवत होती. मला अंडं खायला आवडलं का? तर तसं सांगता येणार नाही... पण एक लहानसं खोटं बोलण्यानं नेहरूंसोबत सन्मानानं ब्रेकफास्ट करायला बसता येण्याचं सुख अनमोल होतं.

या घटनेनंतर काही आठवडे गेले. बिर्ला कुटुंबानं निमंत्रण दिल्यामुळं बापूजी मुंबईला जाणार होते, त्यांच्यासोबत मीही गेलो. बिर्ला कुटुंब भारतातल्या अतिशय श्रीमंत उद्योगपतींपैकी एक. आमची राहायची व्यवस्था राजवाड्यासारख्या त्यांच्या दिमाखदार बंगल्यात होती. आश्रमाची नि त्यांच्या बंगल्याची तुलना करता येणं शक्यच नव्हतं. त्या बंगल्यातला सुखवस्तूपणा, ऐशआराम पाहून माझा विश्वासच बसत नव्हता की, हे सगळं खरंखरं आहे. हिंदी महासागराच्या किनाऱ्याला समांतर असणाऱ्या विस्तीर्ण अशा त्यांच्या बागेत मी पूर्ण दुपारभर फिरत होतो. इतका गुंग झालो होतो की, माझे आईवडील आलेत नि पहिल्या मजल्यावर बापूजींना भेटायला गेलेत हेही मला कळलं नाही. नंतर कळलं की, भेटल्या-भेटल्या बापूजींनी माझ्या आईवडलांना विचारलं की, अरुण घरी अंडी खातो का? त्यांनी अर्थातच ठामपणे नाही असं उत्तर दिलं.

बापूजींसोबतच्या आमच्या प्रवासात माझी एक नातेवाईक आभाही होती. तिनंच मला दिवास्वप्नातून जागं केलं, ‘‘बापूजींनी तुला ताबडतोब खोलीत बोलावलंय. जराही वेळ न दवडता लगेच जा... लक्षात ठेव, तू एका मोठ्या अडचणीत सापडलेला आहेस!’’

‘‘मी काय केलंय?’’ वरवर शांत राहण्याचा आणि गुणी दिसण्याचा माझा प्रयत्न निष्फळ ठरला.

‘‘मला काय ठाऊक!’’ तिनं खांदे उडवत उत्तर दिलं.

मी बंगल्यात शिरलो. बापूजींच्या खोलीत गेलो. बघतो तर काय? माझे आईवडील मान झुकवून बापूजींसमोर बसलेले होते. बापूजींनी मला जवळ बोलावून माझ्या खांद्यावर हात ठेवला नि विचारलं, ‘‘तुला आठवतंऽ आपण पुण्यात असताना तू एकदा मला विचारायला आलेलास की, ऑम्लेट खाऊ का? तू पूर्वी अंडं खाल्लं आहेस असं तू मला सांगितल्यामुळे मी तुला त्या वेळी खायची परवानगी दिली. आत्ता मी तुझ्या आईवडलांना विचारलं तर ते सांगताहेत की, त्यांनी तुला तिथे कधीही अंडी खायला दिलेली नाहीत. आता तूच मला सांग... मी कुणावर विश्वास ठेवू?’’

माझ्या हृदयाचे ठोके मला जोराजोरात ऐकायला यायला लागले. बापूजींचा माझ्यावर असणारा विश्वास मला ढळू द्यायचा नव्हता... त्यामुळं मी भराभर विचार केला नि कळकळीनं म्हणालो, ‘‘बापूजीऽ आम्ही केक नि पेस्ट्री खातो घरी, त्यांच्यामध्ये अंडी असतात असं मला वाटतं... म्हणजे मी अंडं खाल्लेलं आहे.’’

क्षणभर बापूजींनी माझ्याकडं पाहिलं, बहुधा त्यांना माझा मुद्दा पटला असावा... कारण त्यांना जोरात हसू फुटलं. माझ्या पाठीवर थोपटत ते म्हणाले, ‘‘तू खूप चांगला वकील होशील पोरा. तुझा मुद्दा मी स्वीकारतो. जाऽ पळ खेळायला.’’

सगळ्यांपासून नजर चुकवत मी खोलीबाहेर पळ काढला. तिथं विषय वाढला नाही हे खरंय... पण माझा सत्याशी आमनासामना झाल्याचा चटका सोबत होता. तेव्हापासून इतकी वर्षं मी या घटनेचा विचार करतो आहे. त्या-त्या क्षणी खोटं बोलून टाकण्याचा मार्ग सगळ्यात सोपा वाटतो... पण आपण असं करतो तेव्हा केवळ इतरांशी खोटं बोलत नसतो तर स्वतःशीही खोटं बोलत असतो. सुरुवातीपासून खरंच बोलण्याची निवड केली तर आपण अधिक काही मिळवू शकतो. मी अंडी खाणं ही माझ्यासाठी विशेष गोष्ट नसल्याचा देखावा त्या दिवशी बापूजींसमोर केला. तेच तर मी स्वतःलाही सांगितलं नाऽ की, मी जे केलं त्यात काही विशेष नाही, सहजच घडलं तसं! 

‘मी एक भयंकर माणूस व्हायचा विचार करतो आहे आणि म्हणून खोटं बोलणार आहे.’ असा सहज विचारही आपण क्वचित करतो... म्हणून तर आपण स्वतःची समजूत काढतो की, जे केलं ते खरंतर ओके आहे, ठीक आहे. दुसऱ्यांपासून आपण सत्य लपवतो तसंच स्वतःपासूनही लपवतच राहतो.

खोटं बोलण्यापासून स्वतःचा बचाव करणं खरोखर कठीण गोष्ट आहे... कारण त्यासाठी स्वतःच्या इच्छांची ओळख हवी आणि पुढे त्या बोलूनही दाखवता यायला हव्यात. त्या दिवशी पुण्यात माझ्यामध्ये नि बापूजींमध्ये जे घडलं ते वेगळ्या तऱ्हेनं घडू शकलं असतं. ‘तू अंडी खाल्ली आहेस का आधी कधी?’ असं त्या दिवशी सकाळी बापूजींच्या खोलीत धावत गेल्यावर त्यांनी मला विचारलं... तेव्हा मी जर मान्य केलं असतं की, यापूर्वी खाल्ली नाहीत... पण आता मी खायचं म्हणतोय तर? मी त्यांना हेही सांगू शकलो असतो की, स्वतःचे निर्णय घेण्याइतका मोठा मी आता झालोय नि मीच ठरवेन की, कट्टर शाकाहारी व्हायचं की नाही ते! नेहरूंबरोबर असण्याची भुरळ मला पडली आहे अशी कबुली देऊन मी त्या आकर्षणाची कदाचित त्यांच्याबरोबर चर्चाही करू शकलो असतो.

आपल्यापैकी पुष्कळ लोक आयुष्यावर नियंत्रण न उरल्याच्या नैराश्यापोटी खोटं बोलतात. प्रौढ नि पोक्त माणसांनी ठरवलेले नियम-अटी लहान नि किशोरवयीन मुलामुलींकडून पाळण्याची अपेक्षा केली जाते तेव्हाही हेच घडतं. दहा वर्षांच्या मुलानं कॉम्प्युटरवर किती वेळ बसायचं... या प्रश्नावर पालकांशी झालेली त्या मुलाची चर्चा अलीकडेच कधीतरी मी ऐकली आहे. कोडिंगचं तंत्र त्याला नुकतंच कळलं होतं... त्यामुळं ते वापरून आपला प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठीचा उत्साह त्याच्यामध्ये संचारला होता. मी योगायोगानं तिथं उपस्थित होतो. पालकांचं म्हणणं होतं की, झोपायची वेळ झालीय त्यामुळं आता कॉम्प्युटर बंद करायला हवा. आपण चर्चेत मागं पडतोय हे लक्षात आल्यावर तो मुलगा आता अर्धसत्याच्या दिशेनं वळला आहे हे माझ्या लक्षात आलं. स्वतःचा मुद्दा दामटून पुढे नेण्यासाठी, ‘माझ्या शिक्षकांनी मला रात्रभर जागून प्रकल्प पूर्ण करायला सांगितलाय.’ असं त्यानं सांगितलं. अर्धसत्याच्या किंवा असत्याच्या दिशेनं जाण्याचा आपल्या मुलांचा प्रवास पालकांना टाळता येईल... पण त्यासाठी पालकांनी मुलांच्या इच्छांकडं प्रामाणिकपणानं बघायला हवं. त्यांच्या इच्छांचा मान ठेवायला हवा.

हे झालं मुलांच्या खोटेपणाबद्दलचं... पण पालकांनीही सत्य सांगण्यापेक्षा सोपा मार्ग म्हणून घसरड्या रस्त्यानं असत्याची वाट धरायला नको हेही महत्त्वाचंच. इतक्याशानी कुणाचं नुकसान नाही असा विचार करत पालक छोट्याछोट्या गोष्टींबद्दल खोटं बोलण्याचं उदाहरण घालून देतात... तेव्हा मुलांना कळतं की, हे एक सहज स्वीकारलं जाणारं तंत्र आहे... बस्स!

शक्ती हरपल्यासारखं वाटून कितीतरी मुलं नि मोठी माणसं खोट्याचा आश्रय घेतात. प्रसंगी बाजू सावरली गेल्यामुळं कणखर वाटेल असा त्यांचा समज असतो. खरंतर खोटं बोलणं आपल्याला दुबळं करत असतं. तुम्ही ऑम्लेटसारखंच अडकत जाता खोटारडेपणामध्ये. आपण केलेली सत्यअसत्याची सरमिसळ कुणालाही पकडता आली नाही असं वाटून विजयाची येणारी भावना अतिशय तात्कालिक असते. खोटं बोलण्यातून तुम्ही स्वतःबद्दलच्या तुमच्या जाणिवेला दुय्यम लेखताच... शिवाय तुम्हाला जी शक्ती हवीशी वाटते ती नष्ट करत राहता. एक वेळ अशी येते की, तुमचा खोटा चेहरा जगासमोर दाखवला तरच यश मिळतं या विचारावर तुम्ही विश्वास ठेवायला लागता.

खोटं बोलण्याच्या प्रवाहात वाहून जाताना अनेक लोक गटांगळ्या खातात... पण एक वेळ अशी येते की, ते स्वतःला त्यापासून सोडवतात. आपल्याला कळतं नि पटतं ते सत्य बोलून टाकण्याचा विश्वास त्यांच्यामध्ये जागा होतो.

लहान मुलं क्षणिक प्रेरणेनं बेधडक खोटं बोलून जातात. ते काही प्रमाणात मी समजू शकतो... पण राजकारणातले लोक या जाळ्यात अडकून बेताल खोटेपणा करतात हे पाहून मात्र मला दुःख होतं. आपल्याला जी जागा निर्विवादपणे मिळवायचीच आहे... तिला महत्त्व देण्याचं सोडून पोकळ बडेजावाला ते का भुलतात? असे राजकारणी प्रसंगी निवडून येतात... पण नेतृत्व करण्यात असफल होतात... कारण अंतर्यामी ते दुर्बळ नि असुरक्षित असतात.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी


वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले नऊ भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...
6. वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते
7. सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं! 
8.भौतिक स्थैर्य आणि नैतिकता यांचे संबंध व्यस्त असतात...
9. निम्मं जग कसे दिवस काढत आहे हे पाहाण्याची खिडकी आपल्यापाशी नसते

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ जवाहरलाल नेहरू सत्य Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Jawaharlal Nehru Truth Load More Tags

Add Comment