1934 ते 1953 या काळातील काश्मीरचा दस्तऐवज

संदीप बामझाई यांच्या 'गिल्डेड केज: इयर्स दॅट मेड अ‍ॅन्ड अनमेड काश्मीर' या पुस्तकाचा परिचय..

लेखकाने पुस्तकासाठी जाणीवपूर्वक 1931 ते 1953 या कालखंडाची निवड केली आहे. कारण खऱ्याअर्थाने याच काळात काश्मीर घडले आणि बिघडले, बिघडवले गेले. याच काळात डोग्रा राजघराण्याच्या राजा हरिसिंग यांच्या दडपशाहीने हैराण झालेल्या जनसामान्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यांचे नेतृत्व कट्टर जीनाविरोधक ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या शेख अब्दुल्लांकडे होते. हा त्यांचा उदय होता. आणि यानंतर त्यांच्या विचारसरणीत कसा बदल घडला हेही आपल्याला हे पुस्तक वाचताना कळते. यामुळेच 1953 मधील त्यांच्या अटकेबरोबरच या पुस्तकाचा शेवट केला आहे.

काश्मीर म्हटले की कोणाचेही कुतूहल जागृत होते. डोळ्यासमोर चित्रपटांत वा माहितीपटांत पाहिलेले तेथील देखावे, नजरेपुढे दिसू लागतात. तेथील हत्याकांडे, अपहरणे अशा अनेक गोष्टी मनात गर्दी करतात. या निसर्गसुंदर प्रदेशात कधीतरी जायलाच हवे असे प्रत्येकाला वाटत असते. पण सध्याच्या परिस्थितीत ते कितपत जमेल, अशी शंकाही मनात येते कारण तेथील परिस्थिती अजूनही नाजूकच आहे, असे वाचायला मिळते. प्रचार कोणताही होत असला, तरी तेथे अद्याप स्थैर्य आणि सुरक्षितता आलेली नाही हे अनेकांच्या सांगण्यात येते. म्हणून तर हे पुस्तक पाहिले की घ्यावेसेच वाटते.

पुस्तकाचे नावच बोलके, कुतुहल जागृत करणारे आहे. संदीप बामझाई यांनी काश्मीरवरील पुस्तकांची त्रिपेडी रचली, त्यातील हे शेवटचे पुस्तक. याआधीची दोन पुस्तके ‘बोनफायर ऑफ काश्मिरियत : डीकन्स्ट्रक्टिंग द अ‍ॅक्सेशन’ आणि ‘प्रिन्सिस्तान: हाऊ नेहरू, पटेल अ‍ॅन्ड माऊंटबॅटन मेड इंडिया’ (कलिंग पारितोषक विजेते). आणि तिसरे म्हणजे प्रस्तुत ‘गिल्डेड केज: इयर्स दॅट मेड अ‍ॅन्ड अनमेड काश्मीर’. सोनेरी पिंजरा : ज्या वर्षांनी काश्मीर घडवले आणि बिघडवले, असे त्याचे भाषांतर करता येईल. खरे तर या नावामुळेच हे पुस्तक वाचण्याची इच्छा होते. कारण काश्मीर हा अद्यापही चर्चेचा विषय आहे. 370 कलम रद्द केल्यापासून तर जास्तच!

काश्मीरबाबत खूपच माहिती यात मिळते. तेथे जे काही घडले ते का, कसे घडले, आणि घडविले असल्यास कुणी घडवले हे आपल्याला कळते. मूळचे काश्मिरी असलेले विविध प्रकारच्या माध्यमांचा अनुभव असलेले ज्येष्ठ लेखक-पत्रकार-संपादक संदीप बामझाई यांनी प्रदीर्घ मेहनतीने संशोधन करून सदर पुस्तक लिहिले आहे, ते आपल्या मायभूमीच्या ओढीने. दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे. त्यांचे आजोबा के. एन. बामझाई हे ‘ब्लिट्झ’ या नियतकालिकाचे दिल्ली विभागातील प्रमुख, त्याचप्रमाणे नेहरूंचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) आणि जम्मू-काश्मीरचे पहिले पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांचे स्वीय सचिव आणि पुन्हा दीर्घकाळ काश्मीरसंदर्भात नेहरूंचे ओएसडी होते. कागदपत्रे व नोंदींच्या त्यांच्या संग्रहातील बहुमोल माहिती लेखकाला मिळाली. अर्थातच या पाहायला मिळाल्या. कागदपत्रांतील अनेक महत्त्वपूर्ण नोंदींचा उपयोगही लेखकाने केला आहे.

लेखकाने पुस्तकासाठी जाणीवपूर्वक 1931 ते 1953 या कालखंडाची निवड केली आहे. कारण खऱ्याअर्थाने याच काळात काश्मीर घडले आणि बिघडले, बिघडवले गेले. याच काळात डोग्रा राजघराण्याच्या राजा हरिसिंग यांच्या दडपशाहीने हैराण झालेल्या जनसामान्यांनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यांचे नेतृत्व कट्टर जीनाविरोधक ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या शेख अब्दुल्लांकडे होते. हा त्यांचा उदय होता. आणि यानंतर त्यांच्या विचारसरणीत कसा बदल घडला हेही आपल्याला हे पुस्तक वाचताना कळते. यामुळेच 1953 मधील त्यांच्या अटकेबरोबरच या पुस्तकाचा शेवट केला आहे, असे लेखक म्हणतो.


हेही वाचा : काश्मीरच्या अर्धवट फाईल्स - कलीम अजीम


पुस्तकाच्या सुरुवातीला उपोद्घात (फसलेले बंड) आणि अखेर उपसंहार असून, शेख महम्मद अब्दुल्ला व शेर-इ-काश्मीर, ऑल द किंग्ज मेन द टू डॉमिनिअन्स, द काश्मीर वॉर, आफ्टरमैथ, द फॉरिन हॅन्ड: अमेरिकन्स इन काश्मीर आणि थिंग्ज फॉल अपार्ट: द काश्मीर प्लॅन अशी सात प्रकरणे आणि शेवटी सूची आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तकाला डॉ. करण सिंग यांची प्रस्तावना लाभली आहे. काश्मीरचे तत्कालीन राजे हरिसिंग यांचे डॉ. करण सिंग हे पुत्र. त्याचबरोबर ते काश्मीरचे माजी सद्र-इ-रियासत (1958-65) आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल (1965-67) होते. डॉ. सिंग यांनी त्यांच्या आठवणीतील काही प्रसंग सांगितले आहेत, त्याबरोबरच पुस्तकातील काही मतांशी आपण सहमत नसल्याचेही स्पष्ट केले आहे. आपले वडील हरिसिंग यांच्यासमोर पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे की भारतात हा मोठाच पेच होता कारण कोणत्याही निर्णयामुळे प्रजेचा एक भाग दुखावला जाणार होता. त्यामुळे ते निर्णय घेत नव्हते. दरम्यान त्यांच्या भेटीला जे. बी. कृपलानी येऊन गेले, पण त्यांच्यात काय बोलणी झाली ते करण यांना कळले नाही. मात्र गांधीजी आले तेव्हा त्यांना भेटण्याच्या तीव्र इच्छेने ते चाकाच्या खुर्चीतूनच गेले. गांधीजींनीही “कैसे हो?” असे विचारून त्यांची चौकशी केली, करण सिंग यांना एवढेच कळले की गांधीजींनी हरिसिंग यांना प्रजेची काय इच्छा आहे, हे विचारात घेऊन मगच निर्णय घेण्यास सांगितले.

आरएसएसधार्जिणे स्वामी संत देव हे राजवाड्यात बडे प्रस्थ होते. ते हरिसिंग यांना वारंवार चुकीच्या मार्गावर नेत होते. ते हरिसिंग यांना सांगत की आपका झंडा लाहोर फिर चढेगा, काश्मीर फिर से राज करेगा. स्वतंत्र राहण्यास सांगणाऱ्यांपैकी ते एक होते. मात्र त्यांचा प्रभाव नंतर कमी होत गेला. राजवाड्यात दरबार सुरू असतानाच दिवे गेले आणि अफ्रिदींनी आक्रमण केल्याचे स्पष्ट झाल्याने एकच गोंधळ कसा माजला हे ते सांगतात. आणि जम्मूला जातानाच स्वामी पुन्हा येतात असे सांगून करण सिंग म्हणतात, “अर्थातच त्यांच्या आश्चर्यकारक शक्ती त्यांना सोडून गेल्या होत्या!” जम्मूमध्येही अनेकजण हरिसिंग यांना भेटत. पतियाळाचे महाराज फौजेसह आले होते. ब्रिगेडिअर परांजपे वारंवार भेटत. पंडित नेहरू आले तेव्हा हरिसिंग यांनी त्यांना करण सिंग यांच्या भेटीसाठी त्यांच्या खोलीत आणले होते. सरदार पटेल आले आणि त्यांनी “मी चाकांच्या खुर्चीत का आहे?” असे विचारले आणि कारण समजताच ताबडतोब मला उपचारांसाठी अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याची अंमलबजावणी झाली. आणि वर्षभर ते न्युयॉर्कमध्येच होते. बरे होऊन परत आल्यानंतर सद्र-इ-रियासत असताना, त्यांनी शेख अब्दुल्ला यांना बडतर्फ केले तेव्हा अब्दुल्ला म्हणाले होते, “हा कोण मला बडतर्फ करणार? मीच त्या लहान मुलाला सद्र-इ-रियासत बनवले होते. हे सारे आपल्याला प्रथमच कळते.

उपसंहारामध्ये लेखकाने 1953 नंतरच्या महत्त्वाच्या घटनांची माहिती दिली आहे. त्यात प्रामुख्याने या काळात झालेल्या हत्याकांडांबाबत सांगितले आहे. अपहरणांची वाढती संख्या, अपहरण केलेल्यांच्या सुटकेच्या मोबदल्यात मुक्त करण्यात आलेले अतिरेकी अशी माहिती दिली आहे. त्या घटना आपल्यापैकी अनेकांच्या आठवणीत आहेत. पण त्यांचे मोल मात्र काश्मिरी जनतेला - विशेषतः पंडितांना - चुकवावे लागले. अनेक वर्षानंतर आम्ही आमच्या परीने या साऱ्याला तोंड देत आहोत असे लेखक म्हणतो. कारण तो स्वतःला काश्मिरीच म्हणवतो. तो म्हणतो, “मी काश्मिरीच आहे कारण माझी मुळे येथीलच आहेत”. पंडितांना आपल्याच घरांतून बाहेर पडावे लागल्याचे दुःख आहे. बदलत्या परिस्थितीशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लेखक म्हणतो, “त्यात माझ्या अनेक नातेवाईक आणि परिचितांचा समावेश आहे”.

जीनांचे काश्मीर पाकिस्तानने ताब्यात घेण्याचे स्वप्न राजा हरिसिंगांचे पंतप्रधान रामचंद्र काक यांनी खुशीने पुरे केले असते, पण ते स्वप्न शेख अब्दुल्ला यांनी कसे उद्ध्वस्त केले, त्यांनीच नेहरूंना लष्कर पाठवून कथित घुसखोर टोळीवाल्यांचे काश्मीर बळकावण्याचे प्रयत्न हाणून पाडायला कसे सांगितले आणि अखेर अब्दुल्ला स्वतःच जम्मूशिवाय स्वतंत्र काश्मीरच्या स्वप्नात अडकले या सगळ्यावर हे पुस्तक वाचताना प्रकाश पडतो. त्यांनी नेहरूंच्या विशाल भारताला विरोध केल्याने त्यांच्या जागी त्यांचे उपपंतप्रधान, नेहरूंचे काश्मीरमधील डोळे आणि कान असलेले बक्षी गुलाम अहमद यांची नियुक्ती कशी केली गेली हे सारे उलगडत जाते. अब्दुल्ला यांनी आपली स्वतंत्र काश्मीरची भूमिका अमेरिकेपुढेही मांडली होती, कारण अमेरिकेच्या डावपेचांत काश्मीरच्या स्थानमाहात्म्यामुळे खूपच महत्त्व आले असते. अमेरिकन राजदूताच्या पत्नीला ते ही कल्पना सांगत होते, पण आपले हे बोलणे बक्षी गुलाम ऐकत असतील आणि ती लगोलग नेहरूपर्यंत पोहोचेल याची त्यांना कल्पना नव्हती. ही आणि अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती या पुस्तकातून मिळते.

या बरोबरच डी. एन. कचरू (जवाहरलाल नेहरू यांचे तत्कालीन स्वीय सचिव) यांच्या अनेक महत्त्वाच्या नोंदी लेखकाने दिल्या आहेत. काश्मीर प्रश्नातील गुंतागुंत त्यातून कळतेच. पण त्याचबरोबर हे ही कळते की, पाकिस्तानी फौजा आणि टोळीवाले यांना पुरते नामोहरम केले गेले असताना, महत्त्वाचे मार्ग भारतीय लष्कराने ताब्यात घेतल्याने, या आक्रमकांची रसद पूर्णपणे तोडली गेलेली असतानाही भारतीय सैन्यात काहीसा गोंधळ होता. आपल्या फौजांची विजयी चाल सुरू ठेवायची आणि गिलगिट बल्टिस्तान ताब्यात घेऊन जम्मू-काश्मीर पूर्णपणे मुक्त करायचे, याबाबत दिल्लीत सत्तारूढ गोटात वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नव्हता. त्यातच माऊंटबॅटन यांच्या आग्रही सल्ल्यामुळे हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेण्याचा निर्णय नेहरूंनी घेतल्याने त्यात भरच पडली होती. आणि त्याच वेळी लष्करामध्ये आयएनएच्या सैनिकांना पूर्णपणे सामावून घ्यायचे की नाही याबाबत लष्करात दुमत होते. करिअप्पा यांना ते नको होते पण नेहरू आणि थिमय्या यांना मात्र तसे करणे आवश्यक वाटत होते. कारण तसे केले नाही तर त्या फौजेचे जे जवान पूर्व पंजाबमध्ये लढत होते ते नाउमेद होतील असे थिमय्या यांना वाटत होते. पण याच मतभेदामुळे फौजांना जम्मूचा आणि उत्तर काश्मीरचा काही भाग परत घेण्याच्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण झाली असेही कचरू यांनी म्हटले होते.


हेही वाचा : काश्मीर - भारताचे लाजीरवाणे सत्य - रामचंद्र गुहा


यातील सर्वात महत्त्वाचे आणि मोठे प्रकरण ‘काश्मीर वॉर’ हे आहे. वायव्य सरहद्द प्रांताचे राज्यपाल सर जॉर्ज कनिंगहॅम यांनी अफगाण टोळीवाल्यांची पठाणिस्ताची मागणी रेटू नये यासाठी त्यांना काश्मीरकडे वळवण्याचा डाव रचला. त्यासाठी पाकिस्तान सैन्याने सारी रसद पुरवली. एकीकडे लियाकत अलींनी शेख अब्दुल्लांना बोलण्यांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि त्याकाळात पाक सैन्याधिकाऱ्यांनी आक्रमणाची तयारी जोरात करायची, अशी योजना होती. आपण याबाबतच्या धोक्याची कल्पना अफ्रिदी आणि महम्मदी टोळ्यांना दिली होती असे कनिंगहॅम यांनी डायरीत नोंदवले आहे.

काश्मीरच्या निर्वाणीच्या मदतीच्या हाकेला भारताने प्रतिसाद दिला. ते राज्य भारताचा भाग झाले, हरिसिंग यांना तेथून जम्मू आणि नंतर मुंबईत नेले गेले. भारताच्या फौजा विमानाने काश्मीरला धाडण्यात आल्या. कडाक्याच्या थंडी बर्फाने वेढल्या गेलेल्या झोजी-लामध्ये रणगाडे आणि पायदळाद्वारे प्रतिहल्ल्याची सुरुवात करण्यात आली. जनरल थिमय्या स्वतः आघाडीवर राहून त्यांचे नेतृत्व करत होते. त्या डोंगराळ भागात रणगाडे जाण्यास पुरेसा मार्ग नव्हता. परंतु थिमय्या यांना रणगाडे न्यायचेच होते. त्यामुळे एक वेगळीच क्लृप्ती योजण्यात आली. तेथे संपूर्ण रणगाडे नेणे अशक्य असल्याने त्यांचे सुटे भाग करून नेण्यात आले होते. कारण दगड फोडून रस्ता बनवण्यास वेळ नव्हता. इप्सित स्थळी ते भाग पोहोचल्यावर ते जोडून पुन्हा रणगाडे उभे केले गेले होते. त्यामुळे भारतीय लष्कराला मोठाच लाभ झाला. लष्कराने झोजी-ला मुक्त केल्यावर कारगिलला जाण्याचा मार्ग खुला झाला. लडाख सुरक्षित राहिला. कारगिलमध्ये मुक्ती फौजांचे जोरदार स्वागत झाले. या युद्धाचे वेळी पाकिस्तानी फौजी अधिकाऱ्यांनी या उंचीवर रणगाडे येतील अशी कल्पनाही केली नव्हती. तसे ते साहजिकच म्हणायला हवे. पण भारतीय लष्कराच्या चलाखीमुळे ते पुरते भांबावले. या रणगाड्यांना तोंड देणे शक्य नाही हे वेळीच उमगल्यामुळे दारुगोळा, रसद तेथेच टाकून घाईघाईत त्यांनी माघार घेतली. (1999 मध्येही पाकिस्तानला कारगिलमध्येच हार मानावी लागली.)

कितीही वाटले तरी सर्वच माहिती देणे शक्य नाही. त्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचायला हवे. लेखकाने ते अगदी निष्पक्षपणे लिहिले आहे. त्याने स्वतः कोणतीही भूमिका घेतलेली नाही. जे घडले तसे ते देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. नव्याने मिळालेल्या माहितीचा त्याला सढळपणे वापर करता आला आहे, हे उघडच आहे. पण त्यामुळेच पुस्तकाचे मोल वाढले आहे.

गिल्डेड केज: इयर्स दॅट मेड अ‍ॅन्ड अनमेड काश्मीर
लेखक : संदीप बामझाई,
प्रस्तावना : डॉ. करण सिंग,
प्रकाशक : रूपा पब्लिकेशन्स,
पाने : 168; किंमत 395 रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: Sandeep Bamzai Kashmir Nehru नवे पुस्तक साहित्य कारगिल भारत पाकिस्तान 370 कलम Load More Tags

Comments:

संजय लडगे

माझ्या केवळ असमाधानाचेच नव्हे तर खऱ्या चिंतेचे, आणि काळजीचेही, तिसरे कारण म्हणजे देशाचे परराष्ट्र धोरण.* आपल्या परराष्ट्र धोरणाचे आणि इतर देशांच्या भारताविषयीच्या दृष्टिकोनाचे ज्याने सातत्याने निरीक्षण केले आहे, *त्याला परराष्ट्रांच्या आपल्याविषयीच्या दृष्टिकोनात अचानक घडून आलेला बदल जाणवल्याशिवाय राहणार नाही.* १५ ऑगस्ट १९४७ ला आपण जेव्हा स्वतंत्र राष्ट्र म्हणून जीवन सुरू केले, तेव्हा *कोणताही देश आमचे अहित चिंतीत नव्हता.* जगातले प्रत्येक राष्ट्र आमचे मित्र होते. *आज, चार वर्षांनंतर, आमचे सगळे मित्र आम्हांला सोडून गेले आहेत.* आम्हांला कोणीही मित्र उरलेले नाहीत. *आम्हीच स्वत։ला एकटे पाडून घेतले आहे.* *संयुक्त राष्ट्रसंघात आमच्या प्रस्तावांना कोणी अनुमोदनही देत नाही, अशा एका एकाकी मार्गावर आम्ही चाललो आहोत.* *मी जेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करतो, तेव्हा मला बिस्मार्क आणि बर्नार्ड शॉ यांनी जे म्हणून ठेवले आहे, त्याचे स्मरण होते.* *बिस्मार्क म्हणाला होता,"राजकारण हा आदर्शांना सत्यात उतरवण्याचा खेळ नाही.* *राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे."* अगदी काही काळापूर्वीच बर्नार्ड शॉ म्हणून गेला की, *चांगले आदर्श हे चांगले असतात, पण हे विसरता कामा नये की अतिरेकी चांगले असणे अनेकदा धोकादायक असते.* *जगातल्या या दोन अत्यंत महान व्यक्तींनी सांगून ठेवलेल्या या सुभाषितांच्या संपूर्ण विरोधी असे आपले परराष्ट्र धोरण आहे.*(परराष्ट्र खाते प.नेहरू यांचेकडे होते) *हे अशक्य ते करण्याचे आणि अति चांगले असण्याचे धोरण किती धोकादायक आहे, हे संरक्षणावर झालेल्या खर्चातून निर्माण झालेल्या साधनांवरील ताण, उपासमार सहन करणाऱ्या लक्षावधी लोकांना अन्न मिळण्याची मारामार, आणि आपल्या देशातील उद्योगांसाठी साहाय्य मिळवण्यातील अडचणी यांतून स्पष्ट होते.* दरवर्षी आपण जमा करत असलेल्या ३५० कोटी रुपयांच्या महसुलापैकी जवळजवळ १८० कोटी रुपये आम्ही सैन्यदलावर खर्च करतो. हा खर्च महाप्रचंड आणि एकमेव आहे. हा महाप्रचंड खर्च म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणाचा थेट परिणाम आहे. आपल्याला स्वत։लाच हा सगळा संरक्षणावरचा खर्च सोसावा लागतो याचे कारण, *आणीबाणीच्या परिस्थितीत ज्यांच्यावर विसंबून राहता येईल असे मित्र आपल्याला नाहीत.* *मला प्रश्न पडतो ही योग्य परराष्ट्र नीती आहे असे म्हणावे का?* *पाकिस्तानबरोबरचा आमचा विवाद हाही आमच्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे, आणि त्याबद्दल मी अत्यंत असमाधानी आहे.* *दोन कारणांनी आमचे पाकिस्तानसोबतचे संबंध बिघडले आहेत- एक काश्मीर आणि दुसरे पूर्व बंगालमधील आमच्या लोकांची स्थिती.* मला वाटते, *आपण काश्मीरपेक्षा पूर्व बंगालविषयी अधिक विचार केला पाहिजे.* वृत्तपत्रे सांगतात त्यानुसार तेथील लोकांची स्थिती अधिक दु։सह आहे.हे लक्षात न घेता, *आपण आपली सर्व संसाधने काश्मीरवरच पणाला लावत आहोत.* *आणि तरीही मला असे वाटते की, आपण एका काल्पनिक विषयावरून लढत आहोत. ज्यावर आपण बराच काळ लढतो आहोत, त्याचा आधार आहे तो म्हणजे कोण बरोबर आणि कोण चूक.* *माझ्या दृष्टीने खरा प्रश्न आहे तो, कोण बरोबर आहे, यापेक्षा काय बरोबर आहे.* *हा मुख्य प्रश्न मानला, तर माझे नेहमीच असे मत राहिले आहे की, काश्मीरची फाळणी करावी.* *भारताच्या बाबतीत जे केले, तसेच, हिंदू आणि बौद्धबहुल भाग भारताला द्या* आणि *मुस्लिमबहुल भाग पाकिस्तानला द्या.* *काश्मीरमधील मुस्लिमांविषयी आपण फार चिंता करू नये.* *तो प्रश्न काश्मिरी मुस्लिम आणि पाकिस्तान यांचा आहे.* *त्यांना जसे वाटेल त्याप्रमाणे त्यांनी तो प्रश्न सोडवावा.* *किंवा हवे तर तीन भागांत विभाजन करा; युद्धबंदी भाग, काश्मीर खोरे आणि जम्मू- लडाख भाग,* आणि *फक्त काश्मीर खोऱ्यात जनमत चाचणी घ्या.* *मला काळजी ही वाटते की जी संपूर्ण भागासाठीची जनमत चाचणी प्रस्तावित आहे, त्यामध्ये काश्मीरमधील हिंदू आणि बौद्ध यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध पाकिस्तानात जावे लागेल* आणि *पूर्व बंगालमध्ये ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत, तशाच समस्यांना इथेही तोंड द्यावे लागेल.* *डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकसभा राजीनामा देताना 27 -9-1951 रोजी केलेल्या भाषणाचा अंश...

दीपक पाटील

अतिशय महत्वाचा दस्तऐवज हाती लागल्याचे समाधान या पुस्तकाबद्दल केतकरांनी जी माहिती दिली आहे ती वाचताना वाटले. लेखकाने मांडलेले मुद्दे अभ्यासपूर्ण असल्याच्या खुणा या पुस्तकपरिचय लेखनातून झाला. केतकर सरांचे आभार !

Dinanath Patil

Thank you for sharing the whole thing. Highly needed text and context to be read by every Indian. Appears to be bird's eye view.

Add Comment