त्या काळी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतही लेझीम पथकांना मान असे. त्यांचा बोलबाला असे. अलीकडे ढोल-ताशाच्या पथकांचा असतो तसाच, पण निदान पुण्या-मुंबईत तरी हे चित्र आता जास्त अस्पष्ट होत चालले आहे. लेझीम मागे पडते आहे. कारण लोकांना काहीतरी मधुर कानांना सुखावणारे जणू नकोसेच झाले आहे. ढोल पथकांची आणि त्यातील सदस्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. त्याच प्रमाणात ध्वनीप्रदूषणही वाढते आहे. पण लक्षात कोण घेतो!
आजकाल गणपती उत्सवाआधी महिना-दीड महिना सर्वत्र आवाजाची दुनिया निर्माण होऊ लागते. कारण ढोल-ताशे पथकांचा सराव याच सुमारास सुरू होतो आणि त्यांच्या आवाजाने आसपासच्या लोकांना होणाऱ्या त्रास, त्यामुळे केल्या जाणाऱ्या तक्रारी, होणारे ध्वनिप्रदूषण याबाबतच्या बातम्या येत राहतात. गेली काही वर्षे हेच चित्र सर्वत्र आहे. या बातम्यांबरोबरच त्या पथकांची गाऱ्हाणी, आम्हाला सरावासाठी जागा द्या अशा मागण्या, याबाबतही वाचायला मिळते. ध्वनिप्रदूषणाच्या अभ्यासकांनी तर या सरावामुळे होणारे ध्वनिप्रदूषण विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या प्रदूषणाएवढेच असल्याचे दाखवून दिले आहे, तसेच नदीकाठचा भाग रिकामा म्हणून तेथे केल्या जाणाऱ्या सरावाच्या आवाजाने आसपासच्या लोकांना विशेषतः वृद्ध आणि रुग्णांना खूपच त्रास होतो कारण मोकळ्यावर आवाजाच्या तीव्रतेत भर पडते आणि खास करून इमारतीतील वरच्या मजल्यावरील रुग्णांना व इतर लोकांना त्याची जास्त झळ बसते असे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
हे आजचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वीही गणेश विसर्जन व अन्य मिरवणुकांत ढोल-ताशे असत. पण त्यावेळी त्यांची भूमिका साथीदारांची अथवा सहकलाकारांची असावी तशी दुय्यम होती. अर्थातच त्यांची संख्याही खूप कमी होती.. कारण मुख्य पथके लेझीमची असत आणि त्यांना ढोल ताशाची संगत वा ठेका असे. पण कालपरत्वे यात बदल झाला. काही वर्षापूर्वी आशा भोसले यांनी काढलेले उद्गार आठवतात. आजच्या सिनेमातील गाण्यांबाबत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, पूर्वी आम्ही गात असू आणि तेव्हां आम्हाला वाद्यवृंदाची साथ असे, पण आता मात्र प्रमुख भूमिका वाद्यवृंदाची असते आणि मध्ये गाण्याच्या एक-दोन ओळीच गायक कलाकारांच्या वाट्याला येतात. त्याची सत्यता आपण अनुभवतोच. त्यामुळेच आजही जुन्या गाण्यांची गोडी अवीट असते. तसेच आजदेखील लेझीमच्या आठवणीनेही सुखावल्यासारखे होते. त्याच्या आवाजात मधुरता होती. तो कानांना सुखावह असे. कानठळ्या बसवणारा नसे. अगदी पथकांमध्ये जास्त संख्येने सदस्य असले तरी! त्यांच्या लेझीमचा ताल, त्यावर चालणारी पावले आणि काही वेळा त्यांच्या नृत्यासारख्या हालचाली यांनी पाहणारे भान विसरून जात असत. त्यांना ढोल-ताशाची, झांजा टोल यांची साथ असे पण ती केवळ ठेका आणि ताल बदलण्याच्या सूचना देण्यासाठी शिट्टी वाजवण्यात येत असे..
हे आठवत होते आणि त्याचवेळी कवी श्री. बा. रानडे यांची लेझीम ही शाळेत असतानाची कविता आठवली. तिची सुरुवात खरोखरच लेझीमचा अनुभव देणारी...
दिवस सुगीचे सुरू जाहले,
ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रसन्न झाले,
छन् खळखळ छन्, दुमदुम पट दुम
लेझीम चाले जोरात...
त्यावेळी शाळांमध्ये कवायतीच्या तासाला एक-दोन दिवस लेझीमचा तासही असायचा. शाळेच्या पटांगणात विद्यार्थी गोळा होत. ‘आज लेझीमचा तास आहे’ असे सांगितले की, लेझीम ठेवलेल्या कोठीकडे सर्वजण धावत. स्वतःच्या पसंतीचे लेझीम मिळवण्यासाठी ही घाई असे. त्या घाईगडबडीत खळ खळ छनछन असा एकच आवाज होत असे. मग परत पटांगणाकडे जाताना आपलेच लेझीम किती छान अशा नजरेने इतरांकडे पाहण्यात आगळीच मौज असायची. आणि मग लेझीमचा तास सुरू व्हायचा. ढोल, झांज, तोल यासाठीही चढाओढ असे. पण मोजक्याच मुलांना ती संधी मिळायची. तरीही त्याबाबत कुणाची कुरकुर नसायची.
शिक्षक जोरदार शिट्टी वाजवत. सारेजण स्तब्ध होत. आणि मग शिक्षक सुरू करत एक दोन तीन चार... पाच सहा सात आठ... काही वेळाने त्यात बदल होत असे. म्हणजे एक दोन तीन चार समोर, पाच सहा सात आठ मागे, एक दोन तीन चार वळसा..., पाच सहा सात आठ वळसा पुन्हा मूळ पदावर येण्यासाठी, एक दोन तीन चार चक्र... इत्यादी. मग दोन वा चार जणांच्या रांगा करून हा खेळ सुरू राही. कधीकधी गोल रिंगण करूनही त्यात विविधता आणली जात असे. वाकणे, वाकूनच एकदा इकडे तर एकदा दुसऱ्या बाजूस होणे, कधी गोल फिरणे, कधी एका बाजूला वळणे, हात वर करून लेझीमचा खळखळाट करणे. मग ते शांतपणे खाली घेणे, याबरोबरच कधी उडी मारून गिरकी घेणे, तर कधी चक्क बसून तालातच लेझीम खेळणे, अशा वेगवेगळ्या हालचाली असत. हळूहळू ठेक्याचा तालाचा वेग वाढायचा. त्याबरोबर हालचालींनाही गती यायची. ती वाढत जाऊन टिपेला पोहोचताना जणू अंगामध्ये भिनायची. आणि मग अगदी संथपणे पुन्हा कमी कमी होत मूळपदावर यायची. सारेजण तेव्हा घामाघूम झालेले असत. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित कायम असायचे. तसे पाहिले तर हा एक व्यायाम प्रकारच होता. पण श्रम अजिबातच जाणवू न देणारा. त्याबरोबरच कळत-नकळत तालाची जाणीव करून देणारा. शरीराच्या हालचाली, त्याला दिले जाणारे झोके यामध्येही एक डौल जाणवायचा. म्हणूनच लेझीमचा तास शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना आवडत असे.
मुलींच्या शाळांमध्येही लेझीम पथके असायची. त्यांचे कौशल्यदेखील वाखाणण्याजोगे असे त्यांच्या हालचालींमध्ये नैसर्गिक डौल असायचा. यावरून आठवते ती आमच्या एका बहिणीची गोष्ट... तशी ती तुम्हालाही आवडावी. त्याचे असे होते की, आमच्या घराजवळच म्युनिसिपालिटीची मुलींची शाळा होती. तेथेही अर्थातच प्रांगणात लेझीम असे. आमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून ते छान पाहता येई. असाच त्यांचा सराव सुरू झाला होता. एके दिवशी बहीण खिडकीत बसून तो पाहताना अस्वस्थ होत होती. त्या मुलींना काही बरोबर येत नव्हते आणि त्यांच्या बाईंनाही फारशी माहिती नव्हती. न राहवून शेवटी बहीण खिडकीतूनच त्या मुलींना ओरडून म्हणाली, अग तुम्ही चुकताय की गं. नीट करा ना. तेव्हा त्या मुली एकदम गप्प झाल्या. त्यांच्या बाईदेखील चपापल्या. पण त्या खिलाडू वृत्तीच्या असाव्यात. त्यांनी तिथून ओरडूनच बहिणीला सांगितले की, अगं, मग तूच येऊन कसे ते त्यांना दाखव ना. बहिणीला ते फारच आवडले. जणू ती त्याचीच वाट पाहत होती. ती धावतच तेथे गेली आणि त्याच झपाट्यात तिने लेझीमचे हात करून दाखवले. मुली चकित झाल्या. बाई बघतच होत्या. हे काहीतरी छान आहे, असे त्यांना जाणवले. त्या म्हणाल्या, अगं मग थोडे दिवस तूच शिकवशील का यांना? आमच्या शाळांच्या स्पर्धा आहेत, त्यात भाग घ्यायचाय म्हणून तयारी सुरू आहे. बहिणीला काय, तेच हवे होते! ती अगदी खूशच झाली. अगदी मन लावून तिने त्यांना शिकवले, सरावही करून घेतला. सांगायची गोष्ट अशी की, काही दिवसांनी त्या बाई मुद्दाम बहिणीला भेटायला आल्या आणि त्यांनी तिचे कौतुक केले, “अगं, तुझ्यामुळे आमच्या शाळेला बक्षीस मिळालं बरं का” असे म्हणत त्यांनी तिला शाबासकीही दिली.
पण आता तर शाळांमध्ये नावालाही लेझीम दिसत नाही. अर्थात काही अपवाद आहेतच. पण शाळांना प्रांगण नसणे, शाळा दोन सत्रांत असल्याने आणि अभ्यास, क्लास इ. मुळे मुलांना वेळ नसणे, या कारणांनी लेझीम मागे पडले आहे, याचे खूपच वाईट वाटते. कालाय तस्मै नमः!
त्या काळी गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतही लेझीम पथकांना मान असे. त्यांचा बोलबाला असे. अलीकडे ढोल-ताशाच्या पथकांचा असतो तसाच, पण निदान पुण्या-मुंबईत तरी हे चित्र आता जास्त अस्पष्ट होत चालले आहे. लेझीम मागे पडते आहे. कारण लोकांना काहीतरी मधुर कानांना सुखावणारे जणू नकोसेच झाले आहे. ढोल पथकांची आणि त्यातील सदस्यांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. त्याच प्रमाणात ध्वनीप्रदूषणही वाढते आहे. पण लक्षात कोण घेतो! सुदैवाने ग्रामीण भागात मात्र अजूनतरी लेझीम टिकून राहिले आहे. तेथे लेझीमला आजही चांगला मान आहे. पूर्वी गावातील कोणाची वा कुणा थोर माणसाच्या आगमनाची मिरवणूक निघत असे, तेव्हा पुढे लेझीमची पथकेच असत. हा मोठाच बहुमान समजला जात असे. आजदेखील जत्रा/उत्सवात लेझीम आपला आब टिकवून आहे, हे सुखद वाटते, तो तसाच राहायला हवा. याबाबत आपणच काळजी घ्यायला हवी आहे.
लेझीम हे तसे वजनदार वाद्य, साधारण दीड किलोपासून चार किलोपर्यंत लहान-मोठ्या आकारानुसार त्यामुळेच त्याच्या खेळामुळे चांगला व्यायामही होत असे. चांगला वजनदार लाकडी रूळ (क्वचित कुठे लोखंडी दांड्याचाही असे) आणि त्यात अडकवलेल्या लोखंडी साखळ्या. त्यांत गुंफलेल्या चिपळ्यांसारख्या पातळ लोखंडी चकत्या, सुरेल आवाज करणाऱ्या. लेझीम हातानेच बनवण्यात येई. लेझीम सुरू करण्याआधी पथकातील सर्वजण हात उंचावून लेझीमचा खळखळाट करत.. तेव्हा पाहणाऱ्यांच्या मनात आनंदाची लहर उमटून जात असे. लेझीम हा एक नृत्यप्रकारही आहे आणि तोही लोकांना आवडणारा आहे. या नृत्यात काही शास्त्रीय नृत्याप्रमाणे पदन्यास असतो. गरबा नृत्याप्रमाणे लेझीम नृत्यातही आकर्षक रंगीबेरंगी पोषाख परिधान करण्यात येतात. त्यामुळे तो श्रवणीय तर असतोच पण प्रेक्षणीयही बनतो, लेझीम नृत्यात पथकातील सर्वांकडून एकसाथ विविध 25 प्रकारे हालचाली करण्यात येतात. काही वेळा गरबा नृत्याप्रमाणे एकामागून एक गड्यांबरोबर तो खेळला जातो. ताल बदलाची सूचना पथकाचा प्रमुख फुर्रकन शिट्टी वाजवून देतो.
पण काही असले तरी लेझीम हा कवायतीचा, व्यायामाचा प्रकार आहे. हे खरे. लेझीम नृत्यदेखील दोन वा चाराच्या रांगा करून केले जाते. कधीकधी रिंगणही बनवले जाते, कित्येकदा लेझीम हाताळताना त्याचा लाकडी रूळ किंवा लोखंडी साखळ्या आणि चकत्यामुळे लहानसहान जखमा होत. पण त्याची फिकीर कुणालाच नसे. लेझीमची ती झिंग असे म्हणा ना! आंतरराष्ट्रीय पातळीवर लेझीमची पहिली ओळख दिल्लीत 1982 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धात करून दिली गेली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 400 लेझीम खेळाडूंनी त्याचे प्रदर्शन घडवले होते. त्यावेळी देशोदेशीच्या खेळाडू आणि इतरांकडूनही त्याला चांगली दाद मिळाली होती.
पण... कालपरत्वे आता लेझीम मागे पडत चालले आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे. त्याला कारण ढोल ताशा पथके, त्यांची वाढती संख्या आणि सुरू असलेले व्यावसायीकरण. अलीकडे लोकांना सारे काही भव्य, दिव्य, महा असे आवडू लागले आहे. त्यामुळेच ज्याचा आवाज जास्त तेच पथक चांगले अशी धारणा बनते आहे. त्यातील वादकांनाही आपल्या श्रवणशक्तीवर या आवाजाचा वाईट परिणाम होतो असे तज्ज्ञांनी सांगितले तरी त्याचे काही वाटत नाही. गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये हे अधिकाधिक जाणवते आहे. तक्रार करणारे आहेत. आवाजाची पातळी मोजणारे, ती किती प्रमाणात मर्यादेचे उल्लंघन करते ते सांगत आहेत. वयस्कर नागरीक, आजारी लोक आणि त्या मिरवणुकीच्या मार्गावरील लोकांचे हाल तर विचारूच नका. ज्यांना शक्य असते, ते त्यावेळी दूर कुठेतरी शांत जागी जातातही. पण सर्वांनाच हे कसे शक्य होणार?
यासाठी लेझीम पथकांना पुन्हा चांगले दिवस यायला हवेत. अर्थात आपल्याला वाटते म्हणून असे होईल असे अजिबात नाही, हेही प्रत्येकाला माहीत आहे. पण तरीही गावोगावी लेझीम आजही दिमाखात आहे. शहराचे अनुकरण करण्याची सवय लागलेल्या गावांनी निदान या बाबतीत तरी शहरांचे अनुकरण करणे टाळले, तरच लेझीम जिवंत राहणार आहे. नाही तर ते लयाला जाऊन केवळ त्याच्या आठवणीच शिल्लक राहणार आहेत. मग शाळांमध्ये.
दिवस सुगीचे सुरु जाहले,
ओला चारा बैल माजले, शेतकरी मन प्रसन्न झाले,
छन् खळखळ छन्, छन् खन खन छन्,
लेझीम वाजे जोरात...
ही कविता समजा अभ्यासाला असली, तर त्या मुलांना काय समजेल? कोण ती समजावून सांगेल? निदान तेवढे होऊ नये म्हणून तरी लेझीम जगवले पाहिजे, जिवंत ठेवले पाहिजे. ही जबाबदारी लोकांवरच आहे. (सुदैवाने महाजालावर लेझीमच्या अनेक चित्रफिती पाहता येतात. त्या पाहिल्या तर त्यातील गोडवा, सौंदर्य आणि नादमधुरता समजेल.)
तुम्हाला काय वाटते?
- आ.श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: गणेशोत्सव लेझीम क्रीडा ढोल पथके ताशा मिरवणूक ग्रामीण Load More Tags
Add Comment