माझी मेक्सिको वारी…   

मेक्सिको पर्यटनाचा अनुभव

हॉट एअर बलूनमधून पिरॅमिडचे विहंगम दर्शन

अमेरिका व मेक्सिको हे एकमेकाला लागून असणारे देश आहेत पण दोन्हीकडच्या संस्कृतींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अमेरिकेत मोठमोठाले रस्ते, गाड्यांशिवाय कोणी माणसे दृष्टीपथात येत नाहीत. याच्या विरूद्ध मेक्सिको येथे रस्ते आपल्यासारखेच माणसांनी गजबजलेले, प्रचंड वाहतूक, हॅार्नचे आवाज, पदपथांवर खाद्यविक्रेत्यांच्या गाड्या व तेथेच मनसोक्त खाणारे लोक...

अमेरिकेला जाण्याचा योग बऱ्याच वेळेला आला पण मेक्सिकोला कधी गेलो नव्हतो. यावेळेच्या अमेरिकेच्या भेटीमध्ये मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी येथे गेलो होतो. आमच्याकडे अमेरिकेचा व्हिसा होता. तो असल्यास मेक्सिकोला जायला वेगळा व्हिसा लागत नाही.

आम्ही विमानतळावर उतरलो आणि टॅक्सीने हॉटेलात चाललो होतो. त्या टॅक्सी ड्रायव्हरने जाताजाता एवढ्या गप्पा मारल्या की, आपण भारतात तर नाही ना असे क्षणभर वाटले. त्याच्याकडे गाडीमध्ये ‘गुगल ट्रान्सलेटर’ होता. तो ड्रायव्हर स्वतः स्पॅनिश भाषेत बोलायचा व त्याचे इंग्रजीत भाषांतर होउन स्क्रीनवर यायचे. आणि उलट, आम्ही इंग्रजीत बोललो, की ड्रायव्हरला ते स्पॅनिश भाषेत स्क्रीनवर दिसायचे. त्यामुळे आम्हाला जाताजाताच बरीच माहिती मिळाली. मेक्सिको येथे गेल्यावर तर आपण भारतातीलच एखाद्या शहरात आल्याचा भास होत होता.

अमेरिका व मेक्सिको हे एकमेकाला लागून असणारे देश आहेत पण दोन्हीकडच्या संस्कृतींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अमेरिकेत मोठमोठाले रस्ते, गाड्यांशिवाय कोणी माणसे दृष्टीपथात येत नाहीत. याच्या विरूद्ध मेक्सिको येथे रस्ते आपल्यासारखेच माणसांनी गजबजलेले, प्रचंड वाहतूक, हॅार्नचे आवाज, पदपथांवर खाद्यविक्रेत्यांच्या गाड्या व तेथेच मनसोक्त खाणारे लोक... येथे खाण्याबरोबर गाणे आलेच. त्यामुळे जागोजागी विविध प्रकारची वाद्ये वाजवत गाण्याचे कार्यक्रमदेखील चालू असतात.

मेक्सिको म्हणजे मका व त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची लयलूट. असे म्हणतात की, मका ही मेक्सिकोने जगाला दिलेली एक देणगी आहे. मका व त्यापासून बनणारे पदार्थ, टॅारटियाज, टॅकोज, तमाले, अतोले, पिनोले हे मेक्सिकन लोकांचे आवडते पदार्थ आहेत. आपल्याकडे जसे मसाला पापड असतात तसे मेक्सिकन लोक मक्यापासून पापड बनवतात व त्यावर कांदा-टोमॅटो घालून, निरनिराळे मसाले घालून खातात. टोमॅटोच्या तिखट चवीच्या चटणीला ‘साल्सा’ म्हणतात व प्रत्येक रेस्टॅारंटमध्ये पापड व चटणी 'स्टार्टर' म्हणून देतात. भारतासारखेच तिखट व मसालेदार पदार्थ खाण्याची या लोकांना आवड आहे.

तिखट पदार्थांबरोबर डेझर्ट पाहिजेतच! च्युरोज, सोपापिला, ड्युल से डिलेचे, फ्रिटोज असे अनेक गोड पदार्थ मेक्सिकोमध्ये स्ट्रीट फूडपासून ते सगळ्या रेस्टॅारंटस् मध्ये हमखास मिळतात.

मक्यापासून बनवलेले विविध प्रकारचे पापड 

मेक्सिको सिटी म्हणजे जुन्या व नव्या संस्कृतींचा संगम आहे. एका बाजूला टोलेजंग इमारती, मोठमोठाले मॅाल्स; तर त्याला लागूनच स्पॅनिश संस्कृतीच्या खुणा दाखविणारी चर्चेस, नक्षीदार इमारती व राजवाडे महाल दिसतात.

मेक्सिको सिटीमधील ‘म्युझियम ऑफ अ‍ॅन्थ्रोपॅालॅाजी’ आम्ही पाहावयास गेलो होतो. मेक्सिकन संस्कृती कशी उदयास आली हे तेथे जुन्या अवशेषांच्या माध्यमातून दाखविले आहे. मेक्सिकोमधील आद्य रहिवासी सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी आशिया खंडातून तेथे गेले असावेत. ग्रामीण कृषी संस्कृती साधारणपणे इ.स.पू. 1500 च्या आसपास स्थिर झाली असावी. तेथील मुख्य पीक मका, स्क्वॅश (एक प्रकारचा भोपळा) व सोयाबीन असे. मेक्सिकन संस्कृतीचे सुवर्णयुग साधारणपणे इ.स.पू. 200 ते इ.स. 900 या काळात होते. सुसंस्कृत नागर समाज, भव्य वास्तुकला, ललितकला व वैज्ञानिक प्रगती ही या युगाची वैशिष्ट्ये होत. ‘तेओतिवाकान’ हे या सुवर्णकाळाचे प्रमुख केंद्र होते. ते मेक्सिकोपासून 40 किमी अंतरावर आहे. सपंख सर्प ही या नगराची देवता होती. तेथे असणारे भव्य पिरॅमिड पाहण्यास आम्ही गेलो होतो. सूर्य देवता व चंद्रदेवता यांचे पिरॅमिडस् व बाजूला असणारी मंदिरे ही त्या काळातल्या उत्कृष्ट वास्तूकलेची साक्ष देत अजून उभी आहेत.

आम्ही हॅाट एअर बलून मधून सफर केली. सकाळी सात वाजता बलून्स हवेत घेउन जातात. बलून्स या पिरॅमिडस् वरून नेतात. सकाळच्या उगवत्या सूर्यप्रकाशात उंचावरून या पिरॅमिडचे दृश्य खूपच विलोभनीय दिसते. साधारणपणे एक तासाची फेरी असते. एखाद्या मोकळ्या शेतात ते बलून्स खाली येउन उतरवतात. बलून्स हवेत नेणे व योग्य ठिकाणी उतरवणे हे मोठे कौशल्याचे काम आहे व सराईत ऑपरेटरच ते काम करतात.


हेही वाचा : मांडू (मध्यप्रदेश) येथील ‘सोलो बॅकपॅक ट्रीप’चा अनुभव - मकरंद दीक्षित


मेक्सिको शहरात एका टेकडीवर असणारे ‘चॅपुल्टपेक कॅसल’ हे असेच एक प्रेक्षणीय ठिकाण. चॅपुल्टपेक याचा स्पॅनिश भाषेत अर्थ ‘ग्रासहॅापर टेकडीवर’. मेक्सिकोतल्या स्थानिक अ‍ॅझटेक लोकांवर स्पॅनिश लोकांनी आक्रमण करून राज्य करायला सुरवात केली व त्याला ‘न्यू स्पेन’ असे नाव दिले. तेथे राज्य करणाऱ्या व्हाइसरॅाय यांच्या राहण्यासाठी या भव्य प्रासादाची उभारणी केली. ह्या प्रासादामधील मोठमोठाली दालने व उंची फर्निचर पाहताना आपल्या इथल्या राजेराजवाड्यांची आठवण येते. या प्रासादाशेजारीच अजून एक भव्य इमारत आहे. तेथे आता ‘हिस्टरी म्युझियम’ आहे. या प्रासादाच्या भोवताली कारंजी व बागा केल्या आहेत. या टेकडीवरून मेक्सिको शहराचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते.

मेक्सिको शहरातील अजून एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे मध्यवर्ती भागात असलेला भव्यदिव्य असा झाकोला चौक व त्याला लागून असलेले मेट्रोपोलिटीयन कॅथेड्रल. हा चौक आपल्याला जगातला सर्वात मोठा व प्रसिद्ध चौक म्हणजे बीजिंग येथील तिआनमेन चौक याची आठवण करून देतो. येथे मिलीटरी परेड, स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम, सार्वजनिक सोहळे होत असतात. मेक्सिकन लोकांचे हे एक आवडते ठिकाण आहे व ते कायम गजबजलेले असते.

झाकोला चौकातील मेट्रोपोलिटीयन कॅथेड्रल 

मेट्रोपोलिटीयन कॅथेड्रल स्पॅनिश लोकांनी स्थानिक अ‍ॅझटेक यांच्यावर विजय संपादन केल्यावर त्यांच्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. 1573 मध्ये याचे बांधकाम सुरू झाले व 250 वर्षे काम चालले होते. अनेक राजवटींच्या काळामध्ये यांचे बांधकाम झाल्यामुळे त्यावर विविध स्थापत्य शैलींचा परिणाम जाणवतो.

मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात एक स्मारक आपले लक्ष वेधून घेते. ते म्हणजे ‘एंजल ऑफ इंडिपेन्डन्स’. स्पॅनिश वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ याची उभारणी केली आहे. 36 मीटर उंचीच्या लोखंडी स्तंभावर ग्रीक स्वातंत्र्य देवता एन्रिक अल्सियाटी हिचा सोन्याचा पुतळा आहे. तिच्या उजव्या हातात स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून मुकुट व डाव्या हातात तीन शतकांच्या स्पॅनिश अमलापासून सुटका म्हणून तीन तुटलेल्या साखळ्या आहेत.

तीन शतकांच्या स्पॅनिश अमलामुळे मेक्सिकोची अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. देशातील 90 टक्के लोक हीच भाषा बोलतात. तेथे केवळ काही शिक्षित लोकांनाच इंग्रजी भाषा येते. त्यामुळे आपल्याला हातवारे करून किंवा कॅलक्युलेटरवर आकडे दाखवून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. तेथे आम्ही काही स्पॅनिश शब्द शिकलो. तेथे एका ठिकाणी आम्हाला एक पाटी दिसली ‘SALA VIP’ ती पाटी पाहून दचकलोच. व्हीआयपीला ‘साला’ म्हटले आहे? नंतर कळले की, ‘साला’ म्हणजे स्पॅनिश भाषेत ‘स्वागत कक्ष’ ‘सालीडा’ म्हणजे ‘एक्झिट’. ‘एन्ट्रीडा’ म्हणजे ‘एन्ट्रन्स’. ‘अल्काझार’ म्हणजे ‘रॅायल पॅलेस’. स्पॅनिश भाषेतून इंग्लिशमध्ये बरेच शब्द आले आहेत. जसे Silo, Stampede, Ranch. काही शब्द मुळात स्पॅनिश आहेत तसेच इंग्रजीत राहिले आहेत, जसे Salsa, Siesta.

एंजल ऑफ इंडिपेंडन्स 

आम्ही तेथल्या एका स्थानिक मार्केटमध्ये गेलो होतो. तेव्हा आम्हाला आपल्या तुळशीबागेची आठवण झाली. तशीच लागून लागून छोटी दुकाने... तेथे आम्हाला तेथल्या लोकांशी दरावरून घासाघीस करताना आपल्या इथल्या दुकानदारांची आठवण येत होती. अमेरिकेत बार्गेनिंग हा प्रकार नाही. किंमतीची लेबल लावलेली असतात व तेवढेच पैसे द्यायचे. मेक्सिकोचं चलन आहे ‘मेक्सिकन पेसो’. साधारणपणे पाच रूपये म्हणजे एक मेक्सिकन पेसो. (आपल्या स्वभावाप्रमाणे आपण लगेच प्रत्येक वस्तूची किंमत रूपयांनुसार काढून वस्तू स्वस्त की महाग याचा अंदाज घेतो!) तथापि मेक्सिकोमध्ये अमेरिकेपेक्षा स्वस्ताई आहे. त्यामुळे बरेचसे मेक्सिकन लोक अमेरिकेत नोकरी करतात व मेक्सिकोला राहतात.

मेक्सिकोतसुद्धा महिला विक्रेत्यांचे प्राबल्य आहे. सगळीकडे सर्व क्षेत्रांत महिलांचा पुढाकार दिसून येतो. सर्व दुकानांत, रेस्टॅारंटस्, ऑफिसेस, विमानतळ येथे महिला कर्मचारी पुढे असतात व शिताफीने सर्व व्यवहार सांभाळताना दिसतात.

मेक्सिको हा आवर्जून बघण्यासारखा देश आहे. तेथील समुद्रकिनारे खूप स्वच्छ व आकर्षक आहेत. पश्चिमेस दक्षिण पॅसिफिक महासागर व पूर्वेस गल्फ ऑफ मेक्सिको व कॅरेबियन समुद्र (अटलांटिक महासागर) आहे. पण वेळेच्या अभावी आम्ही फक्त मेक्सिको सिटी व आजूबाजूचा भाग बघू शकलो. धावत्या भेटीत झालेल्या मेक्सिको दर्शनाने आम्ही भारावून गेलो.

प्रदीप चंद्रचूड, पुणे
deeptipc@gmail.com


हेही वाचा : 

 

Tags: पर्यटन प्रवास सफर प्रवासवर्णन सहल मेक्सिको अमेरिका साहित्य Load More Tags

Add Comment

संबंधित लेख