कारागृहाच्या भिंती

15 जून: ना. ग. गोरे यांची 113 वी जयंती

फोटो सौजन्य: sateeshpaknikar.com

नारायण गणेश ऊर्फ नानासाहेब गोरे यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे ती मुख्यतः समाजवादी नेते म्हणून. 15 जून 1907 ते 1 मे 1993 हा त्यांचा कालखंड, आज त्यांची 113 वी जयंती. 1957 ते 62 पुणे लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर, 1967-68 पुणे शहराचे महापौर, 1970 ते 76 राज्यसभेवर, 1977 ते 79 ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाचे टप्पे. मात्र 1981 ते 83 या काळात ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते आणि  ललित व वैचारिक स्वरूपाच्या दोन डझन पुस्तकांचे लेखक अशीही त्यांची महत्वाची ओळख आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मकथनाचा मराठी अनुवादही त्यांनी केलेला आहे. 1942 च्या 'चले जाव' आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला, तेव्हा ते वयाच्या पस्तिशीत होते. त्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी लिहिलेल्या पत्रांचे पुस्तकही नंतर प्रसिद्ध झाले. त्यांच्या निवडक लेखांचे पुस्तक 'नारायणीय' या नावाने ,1993 मध्ये प्रकाशित झालेले आहे, त्याची नवी आवृत्ती जून अखेर येणार असून, अन्य काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्याही आगामी वर्षभरात साधना प्रकाशनाकडून येतील. नारायणीय या पुस्तकाचा प्रारंभ ज्या तीन पत्रांनी केलेला आहे तीच ही पत्रे... आजच्या लॉक डाऊन काळात विचारांना चालना देतील अशी... 
- संपादक


18 मार्च 1943

तुरुंगातले हे दिवस व्यर्थ चालले आहेत, की त्यांचा सदुपयोग होतो आहे? अर्थात ते निरर्थक करून टाकणे अथवा सार्थकी लावणे, हे सर्वस्वी माझ्याच हातात आहे. पण एकंदरीत हा काळ फुकट चालला आहे, असेच मनाला वाटते. आणि असे वाटू लागले की, समाधानाला जागा इतकीच राहते की, जे वर्षानुवर्षे तुरुंगात पडलेले आहेत, त्यांच्याकडे पाहावे. पण हे काही टिकणारे सुख नव्हे. टिकणारे सुख मनाला खरी शांती प्राप्त झाल्याशिवाय कसे लाभावे?

मनाची क्षोभशीलता घालवून त्याला शांतिशील बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. मी म्हणतो की, बाहेर असलो की आपला सगळा वेळ इतरांच्या तोंडाकडे पाहण्यातच जातो, आत्मनिरीक्षणाला संधीच राहत नाही. गेल्या सबंध आयुष्यात मनाचा काही विकास झाला आहे की नाही, ते जमाखर्च पाहून ताळेबंदात नमूद करता येत नाही. बाहेर ज्या क्रिया होतात, त्या केवळ घोकीव असतात. आमचे काही विचार, काही राजकीय गट, काही क्रिया ठरलेल्या आहेत.

फोनोग्राफच्या जशा तबकड्या असतात, तशाच आचार-उच्चार-विचारांच्या काही तबकड्या आमच्यापाशी असतात. कोणत्या परिस्थितीत कोणती तबकडी लावायची ते मनाला ठाऊक असते आणि परिस्थितीनुरूप योग्य ती तबकडी ते लावीत जाते. पण मनाचा जो मसाला आम्ही केव्हा एकदा तयार करून भरून ठेवला आहे, त्याचे काय झाले...? एवढ्या कालावधीत ते आम्ही पाहतो का कधी? त्याचे नाव नको. कारण आम्ही बाहेर एकटे असे नसतोच. अगदी केव्हाही पाहा- ‘घरी दारी शय्येवरी’ पाहा! मग आम्ही आमचे मन बाहेर काढणार केव्हा? ते निर्मळ आहे की नाही, अभंग आहे की नाही, शिस्तीने वाढते आहे की बेशिस्त वाढले आहे, हे अजमावणार केव्हा? आम्ही स्वत:समोर कधी उभेच राहत नाही. आरशासमोर आपला देह उभा करून आम्ही जशी त्याची साफसफाई करतो, तसे आमचे अंतरंग अधून-मधून आरशासमोर उभे करावयास नकोत काय?

ती संधी अशा फुरसतीच्या वेळी येते. तिचा उपयोग करून घ्यावा, असा मी मनात बेत करीत असतो. मनाच्या तंतूंचा तणावा जरा ढिला पडल्यासारखा झाला आहे. तो पीळ भरून दृढ करण्याची खटपट करावी, असे मनात फार येते. येथे जगाला माझ्यापासून चार भिंतींच्या पलीकडे ठेवलेले. पण माझे मन त्या भिंतींपलीकडे पाहण्याचा, बाहेरून काही आवाज कानी पडतो का, हे ऐकण्याचा प्रयत्न करीत असते.

हे मन आवरावे कसे? ध्यानाची, एकाग्र चित्त करण्याची सवय करावयास हवी. हा योगाभ्यास आवश्यकच आहे, असे मला वाटते. त्याने ईश्वरप्राप्ती होवो न होवो, मनुष्याला त्यापासून अधिक सुखप्राप्ती जरूर होईल. सध्या माझे अशिक्षित मन म्हणजे नुकत्याच सायकलीवर बसू लागलेल्या माणसाप्रमाणे आहे. माणसे आपापल्या वाटेने नीट जात असली, तरी सायकलस्वाराला ती आपल्या वाटेत येणार असे वाटू लागते आणि त्यांना टाळण्याच्या प्रयत्नांत तो नेमकाच त्यांच्या अंगावर जाऊन आदळतो किंवा डाव्या-उजव्या बाजूच्या पादचाऱ्यांना घसटत धक्के देत जातो.

माझे मनदेखील ज्या गोष्टी माझ्या कक्षेत वास्तविक येत नाहीत, त्यांचा उगीचच विचार करीत असते. जे प्रसंग कधी घडणार नाहीत, त्यातले आपण जणू मुख्य आहोत, असे समजून भूमिका वठवीत राहते. योगाभ्यासाशिवाय हा वाह्यात व्याप साधणार नाही. व्यवहाराच्या गर्दीतून शिक्षित मन अधिक सफाईने म्हणजेच अनवलिप्त राहून मार्ग काढीत जाईल. म्हणजेच त्याला अधिक सुखाने, अधिक त्वरेने मार्ग काढता येईल, असे नव्हे काय?

पण मनाची एकाग्रता साधत नाही. स्तनपान करणाऱ्या लहान मुलाला जर स्तनापासून अलग केले, तर ते एकदम बिचकते. त्याच्या मनावर भीतीचा ठसा उमटतो असे करण्याने. म्हणून असे करू नये, असे मानसतज्ज्ञ सांगतात. तसाच काहीसा हा तुरुंगात पडण्याचा प्रकार झालेला आहे. बाहेर आम्ही काही योजना आखीत होतो, बेत रचीत होतो. त्यात आम्ही गुंग होऊन गेलो होतो. ते स्तनपान, ती आसक्ती, आमच्या कर्ममय जीवनाचा तो आधार व त्याचे केंद्र जसे काही एकदम दुरावले आणि त्याबरोबर मन अंतराळी हेलकावत राहिले.

मी स्वत: होऊन कामापासून महिना-दोन महिने लांब सरलो असतो, तर असे होते ना. तुरुंगवास हा सक्तीचा संन्यास झाला. यात स्मशानवैराग्यदेखील नाही. न्यास स्वेच्छा केला, तरच ती गोष्ट अंगापासून दूर सरणार. म्हणून प्रव्रज्या केव्हाही घेण्यास हरकत नाही, पण मन आधी व्यवहाराला विटले असले पाहिजे, असे म्हटले असावे. मनाची एकाग्रता होण्याकरिता मन:शांतीची, प्रसन्नचित्ताची, नित्य कर्मांपासून दूर सरण्याची जी पूर्वभूमिका तयार व्हावी, तीच येथे नाही.

मनाला निराळे काढून, ते नीट हातात घेऊन त्याचे निरीक्षण करणे त्यामुळे साधत नाही. विचारांच्या फापटपसाऱ्यातून ते वेगळे होतच नाही. हातात ठरत नाही. त्याचे निरीक्षण करण्यासाठी त्याच्यावर बुद्धिनेत्र स्थिर करू पाहावेत, तर ते अप्रस्तुत विचारतरंगांचा भला जाड धूम्रपट आपल्या आड उभा करून अदृश्य होते. असा हा खेळ चालू आहे. खेळ कसला, ससेहोलपटच म्हणा. ती कधी थांबेल तेव्हा थांबेल. राधाकृष्णन्‌नी म्हटले आहे, The solitude of the soul is the birthplace of Religion.

पण हा एकांतवास ऐच्छिक हवा. तो हवा तेव्हा स्वीकारता येईल आणि हवा तेव्हा संपविता येईल, अशी सत्ता हाती हवी; तरच उच्च विचार स्फुरतील. मनाची समता अथवा शांती ज्याला अभ्यासाने प्राप्त झालेली आहे, त्याच्यावर अशा सक्तीच्या एकांतवासाचाही विपरीत परिणाम होणार नाही. परंतु ‘येशूला अथवा बुद्धाला प्रारंभापासूनच बंदिवासात ठेवले असते, तर त्यांच्या मानसात विश्वधर्माचे कमळ फुलले असते काय?’ हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मनाचा तंतू दृढ बनवण्यास त्याला समाजसंपर्काची खळ आवश्यक असते. 

तथापि, मी ज्या परिस्थितीत आहे, ती काही विशेष यातनामय आहे असे नव्हे. ती रुक्ष, निरानंद, भकास आहे. मनाला फुलवणारी नव्हे, सुकवणारी आहे. असे जरी असले तरी जरा नेट धरला, तर थोडे तरी नियंत्रण किंवा संयम साध्य होईल; होईल नव्हे, झाला आहे. प्रथम मनाची जितकी दंगामस्ती चालत होती, तितकी आता चालत नाही. परिस्थितीशी जुळते घेत जाणे, हा प्रकृतिस्वभावच आहे. त्यातच आपल्या निश्चयाची भर टाकली तर अधिक फलप्राप्ती होईल.

सध्या मन नरम आले आहे ते परिस्थिती दुर्भेद्य आहे, धडपड करण्यात अर्थ नाही असे कळल्यामुळे. त्याची नरमाई ही क्रियावैफल्यातून उपजली आहे. ती मोठीशी इष्ट आहे, असे नव्हे. असली मन:शांती वांझ असते. परिस्थिती ओळखून पण तिच्या काबूत न जाता, तिच्या पुढे न नमता, तिचा अधिकाधिक उपयोग स्वहिताच्या दृष्टीने करून घेण्यास मनाला शिकवले, म्हणजे निष्क्रियता अथवा हताशता यांच्यामुळे प्राप्त झालेले शैथिल्य जाऊन जी क्रियाशील शांती प्राप्त होईल, तीच खरी शांती. पहिल्या प्रकारची शांती हे एक प्रकारचे मरण होय.

19 मार्च 1943

सकाळी अंगणात येरझाऱ्या घालत असता, कसला तरी सूक्ष्म सुवास वाऱ्याबरोबर येत आहे, असे वाटले. पण माझे विशेष लक्ष तिकडे गेले नाही. आपल्याच तंद्रीत होतो. पण जरा वेळाने वाऱ्याची मोठी झुळूक आली, तसा मी पुरा जागा झालो. तो सुगंध इतर विचारांच्या दुलईत शिरून साखरझोप घेत पडलेल्या माझ्या मनाला हळूहळू स्पर्श करीत होता आणि मंद आवाजात म्हणत होता, ‘ऊठ, ऊठ ना. मला तू ओळखलं नाहीस का?’ एकदा-दोनदा मी मोठ्याने श्वास घेतला आणि तो सुगंध पोटात गेल्यावर मनाला एकदम ओळख पटली. ‘हं, शिरीष फुलांचा वास हा!’

शिरीषाची फुले! माझी फार आवडीची फुले आहेत ती. प्रथम मी शिरीष फुले केव्हा पाहिली, मला ती कोणी दाखवली- ते सारे माझ्या पक्के स्मरणात राहिले आहे. मी त्या वेळी पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजला जोडलेल्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये होतो. आमच्या वर्गात सर रघुनाथराव परांजप्यांचा पुतण्या विष्णू होता. तो माझ्या शेजारीच बसत असे. एक दिवस त्याने आपल्या मराठीच्या पुस्तकाच्या पानातून एक फूल काढून माझ्यापुढे धरले. तसले फूल पूर्वी मी कधीही पाहिले नव्हते. त्याचे ते रेशमासारखे तंतू, त्याचा रंग, त्याचा आकार, त्याचा गंध- सर्व काही अपरिचित होते मला. मग नाव कोठून ठाऊक असणार?

विष्णूने बराच वेळ आढेवेढे घेऊन मग त्याचे नाव सांगितले, ‘शिरीष’. पुढे मी त्याच्या ओळखीने परांजप्यांच्या बंगल्यावर जाऊ लागलो. तिथे शिरीषाचे वृक्ष पाहिले. तिथेच मी प्रथम तांबडा गुलाब पाहिला. आणखीही पूर्वी न पाहिलेली कित्येक फुले पाहिली. शकुंतला परांजपे व इरावती करमरकर यांना प्रथम मी तिथेच पाहिले. आणखी डॉ. परांजप्यांची भव्य मूर्ती सभय अंत:करणाने प्रथम तिथेच बघितली. इतका रुबाबदार पुरुष मी पूर्वी पाहिलाच नव्हता. आणि त्या मिश्या! अहो आश्चर्यम्‌! आयुष्यात प्रथमच घोडा पाहिलेल्या ऋषिकुमारांप्रमाणे माझी त्या मिश्या पाहून अवस्था झाली!

तथापि, या सर्व वस्तूंमधून माझ्या मनात भरून राहिलेली कोणती वस्तू असेल, तर शिरीष पुष्प. शिरीष पुष्प आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्यामधील अविभाज्य साहचर्य तेव्हापासून माझ्या मानत दृढ झालेले आहे. शिरीषाचे फूल म्हटले की, फर्ग्युसनचे आवार डोळ्यांपुढे उभे राहते. त्या आवारात शिरीषाची किती तरी झाडे आहेत.

पुढे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असताना ओक मास्तरांनी आपल्या भारती भवनातील रविवारच्या वर्गात शाकुंतल शिकवले. ओक मास्तर म्हणजे साक्षात काव्य होते. संस्कृत काव्यात ते स्वत: रंगत असत, पोहत असत आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींना रंगवीत असत. शाकुंतलच्या पहिल्याच अंकात शिरीषाचा उल्लेख आला आणि तो अशाप्रकारे आला की, एका सुंदर प्रतिमेला दुसऱ्या सुंदर प्रतिमेची जोड मिळाली. उल्लेख असा :

    ईषदीषच्चुम्बितानि भ्रमरै: सुकुमारकेसरशिखानि।
    अवतंसयन्ति दयमाना: प्रमदा: शिरीषकुसुमानि।।

आधीच शिरीष कुसुमे! त्यातून ती प्रमदांनी वसंत काळाच्या आगमनाबरोबर कानात लोंबती घातलेली! आणि ती शिरीष पुष्पे तरी कशी? भ्रमरांनी हळुवार चुंबिलेली! याहून अधिक काव्य काय हवे? आमची चौदा-पंधरा वर्षांची मने आणि शरीरे अशा वर्णनांनी कढत होत.

तिथेच ओक मास्तरांच्या वर्गातच आम्ही मेघदूत शिकलो. तिथेच आम्ही प्रेमाचे गूढ जाणून घेतले. तिथेच आम्ही प्रेम करावयास शिकलो. यौवनात पदार्पण केलेल्या युवतींना काचोळ्या एकाएकी तंग का वाटू लागतात, त्याचे रहस्य चेष्टेखोर लबाड प्रियंवदेने आम्हास सांगितले ते तिथेच! प्रियकराचे अधीरे हात इकडे नीविबंध शिथिल करीत असता मुठी भरभरून फेकलेल्या चंदनाच्या चूर्णानेही रत्नदीप विझत नाहीत हे पाहून लाजेने चूर झालेल्या, परम सौख्याचा क्षण समीप आला म्हणून रोमांचित झालेल्या आणि या मिश्र भावनांच्या संमिश्र-छबीने अधिकच कमनीय दिसणाऱ्या यक्षवधू मेघरूप घेऊन आम्ही अगदी थेट शय्यागारात शिरून पाहिल्या, त्याही त्याच वेळी!

तो एक अतीव गूढ व मधुर हुरहुरीने भरलेला काळ होता! शाकुंतलातील आणि मेघदूतातील वर्णने वाचताना मास्तरांच्या उजव्या हाताच्या खोलीत बसलेल्या विद्यार्थिनींच्या कानांच्या पाळ्यांपर्यंत जो रक्तिमा पसरे, त्यावरून कालिदासोक्ती किती सत्य आहे, याचा पुरावाही मिळत गेला. तेव्हापासून तरुणी ही धोतराऐवजी लुगडे नेसलेली आणि सदऱ्याऐवजी चोळी घालणारी केवळ एक व्यक्ती उरली नाही; काही विशिष्ट रसांची ती मूर्ती आहे, याची जाणीव झाली. मनोमनच का होईना, पण त्या वेळी ‘ज्ञानाचे फळ’ आम्ही चाखले. त्यापासून स्वर्गलाभ झाला नसेल, पण स्वर्गच्युती झाली असेही नाही.

22 मार्च 1943

रोज लिहावयास कंटाळा येऊ लागला आहे. वेळ काय, कसाही जातोच. परिस्थितीत काहीही बदल नसला, तरी मन:स्थिती एकसारखी खाली-वर होत असते. सध्या येथे उकाडाही अधिक प्रमाणात आहे. रात्री सरळ दोन तासही झोप लागत नाही. झोप म्हणजे तऱ्हेतऱ्हेच्या स्वप्नांची एक गोधडी बनली आहे. त्यामुळे दिवसा मनाप्रमाणेच शरीरही सुस्तावल्यासारखेच असते.

आता दुपारी अडीच-तीनचा सुमार आहे. सगळे कैदी कारखान्यात, इकडे-तिकडे कामावर गेलेले आहेत. दळणही पुरे झाल्यामुळे जात्याची घरघर बंद पडली आहे. क्वचित वाऱ्याची झुळूक येते आहे, पण वाफारा मारल्याप्रमाणे तिचा स्पर्श अंगाला दाहक वाटत आहे. रखरखीत ऊन पडले आहे. लांबवर एक-दोन झाडांचे शेंडे दिसत आहेत. वाऱ्याच्या झुळकीबरोबर ते हलत आहेत. दूर कोठे पिठाची गिरणी सुरू झाली आहे. तिचा भो-भो आवाज जरा वेळ झाला आणि बंद पडला. त्यामुळे तर शांततेच्या या डोहात अधिकच बुडाल्याप्रमाणे वाटत आहे. काहीही हलत नाही आहे, बोलत नाही आहे. जीवनाला एक प्रकारची तंद्री आल्यासारखे झाले आहे.

नाही म्हणायला माझ्या कोठडीतल्या चिमण्यांचा फडफडाट आणि चिवचिव मात्र अखंड चालू आहे. माझ्या कोठडीत दहा-बारा तरी चिमण्या आहेत, म्हणजे सहा जोडपी आहेत म्हणा ना! लहानपणी आम्ही राहत होतो, त्या घरातही खूप चिमण्या होत्या. पिटकरांच्या प्राजक्ताच्या व डाळिंबाच्या झाडांवर त्यांचा थवाच बसलेला असे. त्या वेळी त्यांची मौज वाटे. पण येथे या चिमण्यांची मौज वाटत नाही. मला त्यांच्याबद्दल एक प्रकारची घृणाच उत्पन्न झाली आहे.

गेला दीड महिना सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांचा चिवचिवाट ऐकावा लागतो! आणि तो थांबला, असा एक पळही जात नाही! निरनिराळे आवाज त्या घाईघाईने काढीत असतात. तुळईवरून खिडकीत, खिडकीतून फरशीवर, फरशीवरून पुन्हा तुळईवर अशा येरझाऱ्या अव्याहत चालू असतात. टुण्‌टुण्‌ उडत असतात. शेपूट, मान एकसारखी हलत-वळत असते.

हल्ली त्यांचा अंडी घालण्याचा काळ आहे. या काळात तर हे प्राणी पिसाट होतात की काय, न कळे. नर अशा मारामाऱ्या करतात की यंव! कोठल्या तरी तिलोत्तमेच्या रूपवाणीने मदांध होऊन हे माथे फिरवून लढत असतात. चोचीतून, डोळ्यांतून रक्त वाहू लागले तरी चिंता नाही. एकमेकांच्या चोचींत चोच खुपसून भांडू लागले, टोचू लागले की, मग एका हातावर आपण उभे राहावे नि मारामारी पाहावी. आठ दिवसांपूर्वी मला बरे वाटेना म्हणून मी एक लढत सोडवली.

एकेकाला एकेक मादी मिळाली की, मग घरटी बांधण्याचे कार्य सुरू होते. माझ्या कोठीचे छत चिमण्यांनी भोके पाडपाडून खराब करून टाकले आहे. दररोज त्या पसा-दोन पसे चुना भुईवर पाडतात. भोके पाडण्याचे कार्य आटोपले की मग धागे, अंकुर, काड्या आणून अंड्यांसाठी बिछायत करण्याचे कार्य सुरू होते. पण या कामातही चिमण्या विशेष अक्कलवान नाहीत.

माडांच्या झावळ्यांना लोंबती घरटी बांधणारे पक्षी काय झोकदार घरे बांधतात. तसे कसब यांच्यापाशी नाही. दोऱ्याची गुंडाळी सापडली, तर ती सगळीच्या सगळी आत कोंबण्याचा प्रयत्न करीत राहावयाचे. मग तो पन्नास वेळा फसला, तर एकावन्नाव्या वेळी पुन्हा तेच. हा प्रकार पाहून मलाच कीव आली. वाटले की, ही बया प्रसूत होण्याची वेळ आली तरी बाळंतिणीची शेज काही तयार होण्याचा रंग दिसत नाही. तेव्हा मीच तो सुतळीचा तोडा पिंजून ठेवला.

अद्यापि काहींचा संभोगोत्पादन काळ संपलेला नाही. त्यांची गर्भाधाने व घरबांधणी चालूच आहे. पण ज्यांनी पहिले-पहिलेच मुहूर्त साधले, त्या आता लेकुरवाळ्या झाल्या असून आपली एक-दोन-तीनपर्यंत लेकरे घेऊन त्यांना उडावयास, अन्न टिपावयास शिकवीत आहेत आणि त्यांना भरवीत आहेत, हे दृश्य मात्र फारच मोहक दिसते. आईचा शब्द ऐकल्याबरोबर आपले दोन्ही पंख फडफडवीत चोच उघडून चारा मागणारे पिलू आणि त्याच्या तांबड्या कोवळ्या चोचीत चाऱ्याचा घास भरवणारी चिमणी. त्या वेळचे त्यांचे बोलही मृदू असतात. हा प्राणी फक्त दोनच वेळा मृदू आवाज करताना मी ऐकला. एकदा पिलांना भरवताना आणि एकदा रतिक्रीडा करताना. बाकी सर्व कर्नाटकी खडी बोली!

- ना. ग. गोरे 

(हा लेख ना. ग. गोरेंच्या स्मृतिदिनानिमित्त 1 मे 2020 रोजी 'कर्तव्य'वर प्रकाशित झालेला आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त तो किरकोळ संपादनासह पुन्हा प्रसिद्ध करण्यात आला आहे.)   

Tags: पुस्तक N G Gore Load More Tags

Comments:

रंगनाथ पठारे

वाढूदे कारागृहाच्या भिंतींची उंची किती मन्मना नाही क्षिती, भिंतिंच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी मुक्त तो रात्रंदिनी.

Dr Anil Khandekar

माननीय नानासाहेब गोरे राजकीय नेते होतेच . पण त्यांचा पिंड मात्र शैलीदार मराठी लेखकाचा होता . या पत्रांवरून लक्षात येते . सुबोध बाळबोध मराठी आणि त्याच बरोबर मधूनच संस्कुत शब्दांचा योग्य प्रयोग -- हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य आहे. अशा पत्रातून ते दिसतेच . पण त्यांचे डाली नावाचा ललित लेखांचा संग्रह या वैशिष्ट्यांसह वाचनीय ठरतो. धन्यवाद

नवनाथ नागरगोजे

खूप दिवसानंतर ना ग गोरे यांचे लिखाण वाचायला मिळाले, कॉलेज नंतर आताच तेही ते बंदिस्त असताना लिहिलेले .

संतोष काळे, जेजुरी

आदरणीय ना.ग. गोरे सरांची या लेखातील विचारपत्रे ,भावपत्रे वाचली. मनस्वी भावली ,आवडली .सरांच्या विचारांचे व भावनांचे प्रवाहीपण मनाची पकड घेते. ही पत्रे भावनेने आथंबलेली व विचाराने पक्व झालेली आहेत . तुरुंगातील मनाची झालेली सराचीअवस्था आजच्या काळात आपणा सर्वांची आज घरात झाली आहे. आजची दुपार या पत्रांनी सुरेख , समृद्ध झाली. धन्यवाद.

Govardhan Garad

Very good in lockdown period .

Add Comment

संबंधित लेख