मुमताज

सीएए- एनआरसीमुळे निर्माण झालेल्या सर्वसामान्यांमधील संभ्रमाचा वेध घेणारी कथा 

प्रातिनिधिक चित्र

मुमताजने पायात चपला सरकावल्या आणि घरातच शिरू पाहणार्‍या रस्त्यावर येऊन उभी राहिली. बाशामियाँनी घराला कुलूप लावलं. सकाळचे दहा वाजत होते. उन नव्हतंच. थंडीने दोघांना चांगलीच हुडहुडी भरत होती. पण रोजच्यासारखं दोघांनीही त्याचा बाऊ केला नाही. मुमताज-बाशामियाँ, पन्नाशीच्या आसपासचं जोडपं. त्यांना एकच मुलगी होती. वयात आली तशी आजुबाजूचे, नात्यागोत्यातले लोक मुलीला का ठेवून घेतायेत म्हणून दोघांचा जीव काढू लागले. तोंडातून ब्र ही काढू न शकणाऱ्या तिलाही मग त्यांनी उजवून टाकली. इथं शहरातच होती पण आता तिच्या दुनियेत लागेल तेवढीच लुडबुड करायची ठरवून दोघे अलिप्त झाले.. आणि मग हे दोघेच उरले एकमेकांना.

आयुष्यात निवांत बसून राहणं त्यांना कधी जमलं नाही.. म्हणजे नशीबात काम होतं की कामात नशीब कोण जाणे! आता या वयातही कष्ट उपसणं काही चुकलं नव्हतंच... दिवसा कामावर जायचं, संध्याकाळी घरी यायचं. खानपान उरकलं कि टीव्हीवरची हलती चित्रं पाहत बसायचं हा त्यांचा रोजचा शिरस्ता होता. टीव्ही म्हणजे त्यांच्यासाठी हलत्या मुक्या बाहुल्यांचा खेळ असायचा तो... दोघं आपणहून त्या हलत्या चित्रांना आपलेच काही अर्थ लावत जरश्याने करमणूक करून घ्यायचे. गंमत म्हणजे त्यांना कुणाच्याही आवाजाचा त्रास व्हायचा नाही पण त्यांच्या टीव्हीचा चढा आवाज मात्र सगळ्यांना त्रास द्यायचा. 

मग शेजारची रेशमा, समोरचा अर्शद, बगलवाली बुढ्ढी, सकीना चाची, जाधव बाबा या दोघांवर खेकसत यायचे तेव्हा कुठं टीव्हीचा आवाज कमी व्हायचा. बाशामियाँ मग मुमताजकडे वैतागायचे, “ही शेजार-पाजारची कार्टीच आवाज वाढवत असणार. पोरंसोरं यावीत म्हणून आपण त्यांना घटकाभर घरात घेतो आणि ती पोरं धुडगूस घातल्यासारखं करत हा कारनामा करून जातात. आपल्याला कमजोर समजतात, लोकांनी आपलं हसं करावं असंच या पोट्ट्यांना वाटत असणार... पण सांगणार कुणाला?” मुमताजला देखील असंच वाटायचं; पण ही टींगणी पोरं आपलं ऐकत नाहीत तिथं मोठं कोण ऐकणार! असे हतबल झाले कि दोघंच एकमेकांशी भांडून घ्यायचे, एकमेकांवर चिडायचे आणि मग 'जाऊ दे' म्हणत विषय सोडून द्यायचे. शेवटी दोघंच तर होते एकमेकांना.

आतादेखील दोघं एकत्रच घराबाहेर पडले. बाशामियाँ एका ज्युसच्या छोट्या हॉटेलात कामाला होते. मुमताज एकाच घरी पूर्णवेळ काम करी. दोघंही गल्लीतून चालायला लागले. आपल्या दाराच्या ओट्यावरुन उतरल्या उतरल्या मुमताजच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. बाशामियाँनी तिच्या आठया पहिल्या, हीची रोजची चिडचिड सुरू होणार याची त्यांना आता सवयीने मजाच वाटू लागली.. झालंही तसंच. मुमताजला ती कोंदटलेली अरुंद गल्ली आवडायचीच नाही. ती बाशामियाँना म्हणायची देखील, “आपल्या इथली परिस्थिती  बरी कधी होणार?” अन् ते तिला हसून म्हणायचे, “आपण पुन्हा तरूण झाल्यावर.” दोघांची मग यावर नोकझोक सुरू व्हायची. 

मुमताजला चाळींची ‘एकासमोर एक येणारी घरं’ ही रचनाच खटकायची. एकाच्या दारात उभं राहिलं की दुसर्‍याच्या आतल्या खोलीतलं दिसणार आणि आपल्याच घरात बसलं तरी दुसर्‍याच्या आतल्या खोलीतला आवाजही नीट ऐकू येणार. मुमताजला दुसरा प्रॉब्लेम कधीच आला नसला तरी तो बाकी सगळ्यांना माहीत होताच की! तिला ते जाम खटकायचं. बरं, हे कोंदटलेपण कमी म्हणून की काय रस्त्यावर बदाबदा पाणी वाहत राहायचं. लहान मोठ्या खड्ड्यांत चिखल साचायचा. कुणाचं तरी बंब दहा वाजले तरी धूर सोडत असायचा.  तिला उबग यायचा या वातावरणाचा. ती गल्ली सोडून मुख्य रस्त्याला यावं तर त्याची अवस्था देखील काही फार बरी नव्हतीच.  रस्त्यावरच भाजीवाल्यांच्या, लहान मुलांच्या कपड्यांच्या, खेळण्यांच्या, स्टेशनरीच्या गाड्या उभ्या असायच्या. लोकांची गर्दी, पथारीवाल्यांची गर्दी, माणसंच माणसं. आणि रस्त्यांची दशा अशी की, ते वाईट असल्याशिवाय इथली माणस खूशच राहू शकणार नाहीत जणू!

त्या दोघांना या अशा गजबलेल्या उतारावरुन दहापंधरा मिनिटं अजून चालायचं होतं. मुमताजला हा उतार उतरायचा आणि पुन्हा येताना चढायचा, दोन्हींचा वैताग यायचा. ती तिच्या नेहमीच्या पद्धतीत साडी हातात वर धरुन तिचा ‘यँयँयँ’चा चिडका स्वर काढू लागली.

बाशामियाँही 'येंयेंयेंयें’ सोबत हातवारे करत तिला सांगू लागले, “तुला ना त्या कोकीळांच्या घरी काम करून पंख फुटलेत. या गल्लीत आयुष्य सरायला लागलंय पण तुला काही त्याची सवय होत नाहीये.”

“हां, सवय चांगल्याची होते. वाईट गोष्टींची कशी होणार, त्याने नुसता जीव घाबरा होतो. आणि कसली टापटीप असते ती गल्ली. कित्ती स्वच्छ. रस्तेसुद्धा छान” ती त्याच रस्त्यातून चालत निघाल्यासारखी खूश होऊन म्हणाली.
 
बाशामियाँ हसले तशी ती पुन्हा म्हणाली, “तुमच्या इथल्या सायबाला एक रस्ता बनवता येत नाही का?” बाशामियाँ काहीच बोलले नाही. कधी काळच्या मित्राची त्यांना आठवण झाली. राजकारणाला लागल्यावर त्यानं बाशामियाँशी नुसतं तोंडदेखलं - कामापुरतं नातं ठेवलं होतं.

दोघांमध्ये असा ठरलेला ‘येंयेंयेंयेंयें’ संवाद सुरूच होता. शांतपणे चालण्याची दोघांना अजिबातच सवय नव्हती. दोघं काही काही बोलत-हसत आपल्याच धुंदीत चालले होते. उताराच्या पुढं, मुख्य रस्त्यावरून एक मोठा जुलूस चालल्याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही. तिथून येणार्‍या मोठमोठ्या घोषणांच्या आवाजानेही त्यांच्या गप्पात खंड पडला नाही. त्यांच्या आजूबाजूचे लोक घाईघाईने त्यांना क्रॉस करून त्या जुलुसमध्ये मिसळत होते. पण त्यांचं लक्षच नव्हतं. मुख्य रस्ता जसा त्यांच्या एकदम नजरेच्या टप्प्यावर आला तसं दोघांना लोकांच्या गर्दीचा अंदाज आला.

मुमताजनं निरागस कुतूहलानं बाशामियाँकडे पाहिलं. तिनं न बोलताही बाशामियाँना प्रश्‍न कळला. हे एवढे लोक आहेत कोण? चाललेत कुठं?’ असंच काहीसं ती विचारत होती. ते मनोमन खुश झाले. आपल्याशिवाय हिचं व्यवहारज्ञान फुकट आहे या फुशारकीतच त्यांनी हातानं तिला थांबण्याची खूण केली. आपण जरा पाहून सांगतो असा मोठा आविर्भाव चेहर्‍यावर आणला. मान उंच करून, भुवया उंचावून ते पाहू लागले. गर्दी पाहून त्यांना एकदम काहीतरी आठवलं तसं त्यांनी मुमताजकडे नजर फेरली. तिला त्यांनी छातीवर बडवून दाखवलं. मोहरमचा जुलूस असेल. मुमताजनं फणकार्‍यानं नकारार्थी मान डोलावली. सणासुदीच्या तारखा, महिने तिच्या चांगल्या लक्षात असायच्या. बाशामियाँचा अंदाज चुकल्यानं ते जरा गडबडले. पण पुढची संधी पुन्हा  त्यांना आनंद देऊन गेली. त्यांनी पाहिलं की चालत निघालेल्या माणसांच्या हातात काहीतरी पोस्टर दिसताहेत. पाच भावडांमध्ये वाढलेल्या मुमताजला बाराखडीसुद्धा येत नाही. आपल्याला किमान लिहिता वाचता येतं.

त्यांनी चष्म्याची काच पुसली आणि एका पोस्टरवरचा मजकूर पाहिला, “हमारे बुरे दिन वापस दे दो.” बाशामियाँना ते वाचून हसायलाच आलं. त्यांनी मुमताजला ती घोषणा सांगितली. तीही खळखळून हसू लागली. “बुरे दिन कशाला परत मागतायेत. आमच्याकडे आहेत म्हणावं आधीपासूनच. बरं, यांचे बुरे दिन घेतले तरी कुणी?”

तरी तेवढ्यावरून त्यांना त्या मोर्च्याचा अंदाज येईना. दुसर्‍या एका पोस्टरवर, ‘हिंदू हूँ पर साथ हूँ’ असं काहीतरी लिहीलेलं दिसलं. ते वाचून बाशामियाँ उगाच हळहळले. त्यांना वाटलं त्या तरुणाला कुणी का बरं विचारलं असेल, “बाबा तू हिंदू आहेस तर सोबत आहेस ना...” बाशामियाँनी ती घोषणा मुमताजला सांगितलीच नाही. पुढं कुठं तरी त्यांना काहीतरी एनआरसी आणि सीएए असं लिहिलेलं दिसलं. त्यावर मोठ्या फुल्या दिसल्या. पण ते पाहूनही त्यांना त्याचा काहीही बोध झाला नाही. जे आपल्यालाच कळालं  नाही ते मुमताजला का सांगायचं म्हणून तेही त्यांनी सोडून दिलं. मुमताजलाही फार रस नव्हताच त्यात. कधी एकदा कोकीळांच्या घरच्या रस्त्याला लागतोय, असंच तिला झालं होतं. उगीच उशीर करायला तिला आवडत नव्हतं. तिनं बाशामियाँना तसं खुणावलंही. बाशामियाँनाही ते पटलं. दोघं त्याच गर्दीतून वाट काढत रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला झाले. रस्त्याच्या वळणालाच बाशामियाँचं हॉटेल होतं. 

मुमताज पुढं चालत निघाली. तिला तो शांत, रूंद रस्ता फार आवडायचा. रस्त्याच्या कडेला झाडी होती. छोटी टुमदार घरं, इमारती होत्या. परिसरात रहदारी असली तरी गजबज नव्हती. पालिकेच्या एका बागेच्या शेजारच्याच इमारतीत तिचं काम होतं.

मुमताज कोकीळांच्या घरात शिरली. टीव्हीचा मोठा आवाज सुरू होता. टीव्हीसमोरच बसून कोकीळ बाईंचे यजमान टीव्ही पाहत होते. आता ती पाहून आली होती तसाच काहीतरी जुलूस त्या टीव्हीवरही सुरु होता. कोकीळ वहिनी देखील तिथंच बसलेल्या होत्या. तिची वाट पाहत. 

कोकीळ वहिनी खरंतर तिच्याच वयाच्या होत्या पण त्यांच्या स्थूल शरीरयष्टीमुळे मुमताजपेक्षा पाच-सात वर्ष मोठ्याच दिसायच्या. आणि मुमताज तिच्या शिडशिड्या बांध्यामुळं अगदी चाळीस-बेचाळीसची वाटायची. तिचा कामाचा उरक पाहून तर कोकीळ वहिनीच चकित व्हायच्या. दहा वर्षांपूर्वी या नव्या वस्तीत रहायला आल्यावर मुमताज भेटली ते किती बरं झालं, याचं त्यांना कायम कौतुक होतं. आतासुद्धा तिला पाहिल्या पाहिल्या त्या उभ्या राहिल्या. त्यांना कुठलीशी कागदपत्रांची फाईल सापडत नव्हती. त्यांनी तिला आल्या आल्या त्या कामी लावलं आणि मुमताजने काही क्षणांत ती लगेच आणून दिली. वहिनी ती फाईल चाळत बसल्या आणि मुमताज  तिच्या रोजच्या कामाला लागली.

बाहेर टीव्हीवर एनआरसी, सीएए विधेयकांच्या निषेध मोर्चांचं वार्तांकन सुरू होतं. मुमताजच्या भांडी धुण्याचा आवाजही वाढला होता. कोकीळ बाईंची पासपोर्टसाठीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची धांदल सुरु होती. घरात नुसता आवाज आणि कल्ला सुरु होता. मनाली- कोकीळांची मुलगी - त्या सगळ्या आवाजांनी वैतागली. “अहो बाबा, जरा वेळ टीव्ही बंद करा. आईचे डॉक्युमेंट शोधायला मदत करा बरं. तिची केव्हाची चीडचीड सुरु आहे. ताईनं इतकी छान ट्रीप प्लॅन केलीय पण फक्त आईचं पासपोर्ट राहिलंय.”

“तिनं नको का स्वत:च्या वस्तू नीट ठेवायला.” बाबादेखील गरजले.  “एक साधं जन्माचं प्रमाणपत्र मिळवता येत नाही तर काय म्हणायचं.” मुमताजला यातलं काहीही ऐकू येत नव्हतं त्यामुळं ती तिच्याच कामात व्यग्र होती.

शेवटी स्वयंपाक झाल्यावर कोकीळ वहिनींनी मुमताजलाच मदतीला घेतलं. ती हसमुख चेहर्‍यानं त्यांच्या मागं मागं, त्या सांगतील तिथं जात होती. कुठलीतरी फाईल काढून देत होती. कुठली तरी पेटी काढायला मदत करत होती. कुठलं तरी सामान पुन्हा नीट ठेवत होती. या अशा कामात दोन तीन तास गेले. पण शेवटी त्यांना हवी ती कागदपत्रं सापडली. कोकीळ बाईंना हुश्श झालं. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मुमताजही शांत झाली. तिनं बाईंना खुणेनंच विचारलं, “’काय इतकं शोधत होता?”

“अगं पासपोर्ट काढायचा तर जन्माचा दाखला शोधत होते...” बाईंना वाटलं तिला पासपोर्ट कळणार नाही म्हणून त्यांनी मनालीचा पासपोर्ट आणून दाखवला. तो काढून फिरायला जाता येतं. त्या फिरायला जाणार आहेत, त्यासाठी पासपोर्ट काढतायेत असं सगळं त्यांनी तिला खुणेखुणेनं समजावलं. आपल्याला फार कळल्यासारखं मुमताजनंही होकारार्थी मान डोलावली.  खरंतर ती शहरात आल्यापासून गावीसुद्धा निवांत गेली नव्हती. तिला कोकीळ बाईंचा हेवा वाटला. त्या कशा लांब विमानातनं जाणार आहेत. आपण आता बाशामियाँना सांगितलं पाहिजे कि एकदा गावी जाऊन येऊ म्हणून. तिची तंद्री बाईंनी भंग केली.

बाईंनी तिला विचारलं, “तुझ्याकडं आहेत ना गं बाई असा जन्माचा कागद? घराची काही कागदपत्रे...”

"मुमताजनं खुणेनंच सांगितलं, “बाशामियाँच्या आजोबाचं घर आहे. बाशामियाँचे  आजोबा राहिले, वडिल राहिले. आता आम्ही राहतो. आम्ही विकणार नाहीच. कागद कशाला हवेत?”

बाईंनी कपाळाला हात मारला. तेवढ्यात मनाली तिथं आली. तिनं तिच्या आईची कागदपत्रांची फाईल तिच्यासमोर ठेवली, “आई तुझं एकतरी डॉक्युमेंट धड आहे का? जन्माचा दाखला आहे तर त्यातली तारीख आणि तुझी शाळा सोडल्याच्या दाखल्यावरची तारीख वेगळीच. आधार कार्डवर तर वेगळंच जन्मवर्ष पडलंय. कसा पासपोर्ट निघणार?”
 
बाईंचा चेहरा गपकन पडला. “अरे देवा, आता काय करायचं?” बाईंचा पडलेला चेहरा पाहून मुमताजला देखील वाईट वाटलं.
 
त्यांना जरा बरं वाटावं म्हणून मुमताज चहा घेऊन आली. ती बाईंना ‘येंयेंयेंयें’ करत म्हणाली, “काही होत नाही. मिळेल तुम्हाला हवा तो कागद. तुम्ही जाल परदेशात. छान फिरून याल. तुम्ही नशीबवानच आहात.” ती हसतमुख चेहऱ्याने बोलत राहिली. वहिनीला त्यावर काय बोलावं हेच सुचेना. मनालीनेच पुढे होऊन मुमताजच्या हातातल्या ट्रेमधून चहा घेतला. मग एक उसासा सोडून ती म्हणाली, “आई खरं आहे मुमताज म्हणते तशी तू नशीबवानच आहेस आणि आई खरंच तू तुझं नशीब समज, तू कुठल्याच अर्थाने 'मुमताज' नाहीयेस...’ बाईंनी चमकून मुमताजकडे पाहिलं. मुमताज आता तिथं उभी नव्हती. ती भाज्या खुडायला देखील बसली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होतं. गावी जाण्यासाठी बाशामियाँना कसं राजी करायचं याचा बेत शिजवत होती.  

हिनाकौसर खान
greenheena@gmail.com

Tags: Story NRC CAA Muslim हिनाकौसर खान पिंजार एनआरसी सीएए कथा ललित Load More Tags

Comments: Show All Comments

Dr Anil Khandekar

अतिशय सोप्या शब्दात मार्मिकपणे कथा लिहिली आहे. संयमित शब्द .

Ravi Balasaheb Jagtap

अप्रतिम...

हर्षवर्धन

नेहमी सारखेच खूप छान

SURESH DIXIT

Nemkya n sopya shabdat khoop Sundar lihiley.

farid shaikh

Very nice

Aasavari

थोडक्यात खूप काही सांगते ही कथा...

Renuka Kad

महत्वाच्या विषयावर खूप सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.

Pratibha Chandran

खूप छान लिहितेस हीना

Deepa pillay

Khup suchak

Add Comment

संबंधित लेख