भारतीय बॅडमिंटनपटूंचा ऐतिहासिक विजय

इंडोनेशियाचा पराभव करून बॅडमिंटनमधील सर्वात मानाचा थॉमस चषक भारताने प्रथमच जिंकला.

भारताने इतिहास घडवला याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघामध्ये केवळ एखाददुसरा खेळाडूच अव्वल नव्हता (जसे काही वर्षांपूर्वी प्रकाश पडुकोण, गोपीचंद होते) तर सर्वच खेळाडू चांगल्या दर्जाचे होते. म्हणजेच संघ अगदी समतोल म्हणावा असा होता. लढतींत कुणी कमी पडले तरी बाकीचे पुढे सरसावून संघाला विजयी करत होते. त्यामुळेच भारताने उपान्त्यपूर्व आणि उपान्त्य फेरीत 2-2 अशी बरोबरी झाल्यावरही त्याचे दडपण न घेता विजय मिळवला होता. भारतीय खेळाडू केवळ गुणवत्तेचेच नाहीत, तर त्यांच्यात दबावाखाली खचून न जाण्याची जिद्द आहे हेच यामुळे स्पष्ट झाले होते. तीन गेम होऊनही ते जिंकण्याची कुवत त्यांची दमछाकही उत्तम असल्याचे दाखवून देते. कदाचित यामुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढून अंतिम सामन्यात त्यांनी पहिले तीनही सामने जिंकून अजिंक्यपद मिळवले. भारताची मान उंचावली. आता बॅडमिंटनची लोकप्रियता भारतात आणखीच वाढेल याबाबत शंका नाही.

भारतीय बॅडमिंटनपटूंना सलाम! गतसालच्या विजेत्या इंडोनेशियाचा त्यांनी 3-0 असा पराभव करून बॅडमिंटनमधील सर्वात मानाचा थॉमस चषक प्रथमच जिंकला. इतिहास घडवला. थॉमस चषक ही बॅडमिंटनमधील सांधिक स्पर्धा आहे. ती बॅडमिंटनमधील जागतिक स्पर्धाच समजली जाते. या स्पर्धेत प्रत्येक संघाला प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एकेरीचे तीन आणि दुहेरीचे दोन सामने खेळायचे असतात. अशा या पाच सामन्यांत किमान तीन सामने जिंकणारा संघ विजेता ठरतो. म्हणजे बेस्ट ऑफ फाइव्ह असे या स्पर्धेचे स्वरूप आहे.

टेनिसमध्ये जसा डेव्हिस चषक तसाच बॅडमिंटनमध्ये थॉमस चषक मानाचा तर आहेच पण ही स्पर्धा सांघिक नैपुण्याची कसोटी पाहणारी आहे. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा बरीच जुनी आहे, त्यामानाने थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा उशिरा सुरू झाली. 1949 मध्ये ही स्पर्धा प्रथम खेळवण्यात आली. भारतीय संघ या स्पर्धेमध्ये दीर्घकाळ सहभागी होत असला, तरी त्याला म्हणावे तसे यश आजवर कधीच मिळाले नव्हते. इंडोनेशियाने मात्र (1982 पासून) आजवर 14 वेळा हा चषक जिंकला होता. गेल्या वर्षीचा विजेतादेखील इंडोनेशियाचा संघच होता. मात्र या स्पर्धेच्या 73 वर्षांच्या दीर्घ इतिहासात भारताने प्रथमच यावेळी प्रथमच हा मानाचा चषक जिंकला आहे. आणि त्याचे महत्त्व सांगताना बॅडिमंटनचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद म्हणाले की, क्रिकेटमध्ये 1983 मधील विश्वचषक विजेतेपदाला जे महत्त्व आहे, तेवढेच या तरुण खेळाडूंच्या थॉमस चषक स्पर्धा जिंकण्याला आहे.

भारतीय खेळाडूंनी पुरुष एकेरीत वा दुहेरीत जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवलेले नाही. तरीही किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणोय या खेळाडूंच्या कामगिरीने, ते जागतिक दर्जाचे आहेत हे वारंवार सिद्ध केले आहे. क्रमवारीतही त्यांचा क्रमांक वर असतो. युवा लक्ष्य सेनने तर जागतिक स्पर्धेत ब्राँझपदक मिळवले आहे आणि दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी अनेक स्पर्धात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत भारताला हे यश मिळवता आले आहे. कारण पाच पैकी किमान तीन सामने जिंकायचे तर एखादाच खेळाडू चांगला असून भागत नाही, तर संघातील सर्वच खेळाडूंचा दर्जा चांगला असावा लागतो, तरच पुढील फेरी गाठता येते. भारताचे अन्य खेळाडू म्हणजे आणि दुहेरीत एम. आर अर्जुन आणि ध्रुव कपिल. पण पहिले तीनही सामने जिंकल्यानंतर प्रणोय आणि अर्जुन कपिल यांना कोर्टवर उतरावेच लागले नाही. मात्र मलेशिया आणि डेन्मार्कवरील विजयात त्यांचा, खास करून 2-2 बरोबरीनंतर निर्णायक एकेरी सामना जिंकणाऱ्या प्रणोयचा मोठाच हातभार होता.

या स्पर्धेत चीनने भाग घेण्यास 1982 मध्ये सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत हा चषक इंडोनेशियाने 14, चीनने 10 आणि मलेशियाने 5 वेळा जिंकला आहे, तर डेन्मार्क आणि जपानने प्रत्येकी एकदा या चषकाचा ताबा मिळवला आहे. यंदा विजेतेपद मिळवणारा भारत सहावा विजेता देश आहे.


हेही वाचा : रणजी चषक आणि वृद्ध चाहत्यांच्या प्रेरक आठवणी - रामचंद्र गुहा


बलाढ्य डेन्मार्क आणि मलेशियाला हरवणारा भारत अंतिम फेरीत दाखल झाला होता आणि त्याला चीनवर मात करणाऱ्या इंडोनेशियाबरोबर झुंजायचे होते. चीनला हरवणारा इंडोनेशियाचा संघ बलवानच होता. अँथनी गिटिंग सिनिसुका याने ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक संपादन केले होते. यावरून त्याचा दर्जा लक्षात यावा. दुसरे म्हणजे क्रमवारीत अँथनी गिटिंग सिनिसुका पाचव्या तर लक्ष सेन नवव्या क्रमांकावर आहेत. पहिल्याच एकेरीच्या लढतीत लक्ष्य सेनला त्याच्याशी लढत द्यायची होती. आणि ती जिंकल्यामुळेच सेनच्या विजयाचे मोल वाढते. या सांघिक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात खेळताना खेळाडूवर चांगलाच दबाव असतो, कारण दोन्ही संघांतील अव्वल खेळाडूंमध्येच हा सामना होतो. म्हणून संघाचे मनोबल त्यातील विजयाने वाढणार असते. शिवाय आधीच्या लढतींत सेन पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता त्यामुळे तो या लढतीत काय करतो याकडे सर्वांचे लक्ष होते.

अंतिम लढतीतही एकेरीच्या पहिल्या सामन्यातील पहिला गेम अँथनी गिटिंग सिनिसुकाने सहजपणे 8-21 असा जिंकल्यामुळे नंतरच्या गेममध्ये लक्ष्यवर चांगलेच दडपण असणार. पण अशावेळी दबावाने खचून न जाता त्याने आपला खेळ उंचावला. दुसऱ्या गेममध्ये त्याच्यावर किती ताण आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. कारण सामन्याचे भवितव्यच ठरणार होते. पण त्याची जिद्द आणि चिकाटी वाखाणण्याजोगी होती. आक्रमक खेळ करून लक्ष्यने हा गेम 23-17 असा जिंकून आपले आव्हान कायम राखले, इतकेच नाही तर नंतरचा गेम अटीतटीचा झाला तरी आत्मविश्वासाने खेळ करून, प्रतिस्पर्ध्यावर सतत दबाव राखून, तो जादा गुणांवर जाऊ न देता 21-16 असा विजय मिळवला. सामना  65 मिनिटे चालला होता. भारतासाठी लक्ष्यची कामगिरी महत्त्वाची अशीच होती. कारण त्याने 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचे मनोबल नक्कीच वाढले असणार.

दुहेरीच्या लढतीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची गाठ महमद एहसान आणि संजय सुका मुल्जो या इंडोनेशियन जोडीशी होती. दुहेरीच्या लढतीत नेहमीच अतिशय वेगवान खेळ होतो आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी असले तर त्यांच्यातील रॅली चांगल्याच रंगतात आणि दीर्घकाळ चालतात. दुहेरीमध्ये जोडीतील खेळाडूंचा ताळमेळ, आपसातील समज आणि दुसऱ्याला उत्तेजन देण्याचे, वेळप्रसंगी सांभाळून घेण्याचे महत्त्वही असते. ही लढतही याला अपवाद नव्हती. इंडोनेशियाच्या जोडीने पहिला सेट 21-18 असा जिंकून आघाडी घेतली होती. मात्र हार न मानता आपला अनुभव पणाला लावून भारतीय जोडीने दुसरा सेट 23-21 असा जिंकून सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये मात्र त्यांनी सामना जादा गुणांवर जाऊ न देता 73 मिनिटांत सरळ 21-18 असा विजय मिळवला आणि भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली.

आता तिसऱ्या लढतीत, जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा अनुभवी किदांबी श्रीकांत काय करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आणि त्यानेही निराशा केली नाही. आधीच्या दोन लढतींमध्येही त्याने आपले एकेरीचे सामने जिंकून भारताचे आव्हान कायम राखण्यास मदत केली होती (आणि नंतर प्रणोयने निर्णायक अखेरची लढत जिंकली होती व त्यामुळेच भारताने अंतिम फेरी गाठली होती.) श्रीकांतचा सामना जोनाथन क्रिस्तीबरोबर होता. जोनाथन हा आशियाई क्रीडा स्पर्धांतील सुवर्णपदक विजेता आहे, तर श्रीकांतने ब्राँझपदक मिळवले आहे. पण त्याच्या या लौकिकाचा दबाव श्रीकांतवर नव्हता. तो नेहमीच्याच सहजपणे खेळत होता आणि त्यामुळे जोनाथनवरच दबाव येत होता. श्रीकांतने सरळ गेममध्ये 21-15 आणि 23-21 असा विजय मिळवला. दुसरा गेम जादा गुणांवर गेला तरीही भांबावून न जाता 21-21 अशा बरोबरीनंतर सलग दोन गुण घेऊन श्रीकांतने निर्णायक ठरलेली ही लढत सरळ गेममध्ये केवळ 48 मिनिटांत जिंकली. भारतीय खेळाडूंनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोश केला

भारताने इतिहास घडवला होता. आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संघामध्ये केवळ एखाददुसरा खेळाडूच अव्वल नव्हता (जसे काही वर्षांपूर्वी प्रकाश पडुकोण, गोपीचंद होते) तर सर्वच खेळाडू चांगल्या दर्जाचे होते. म्हणजेच संघ अगदी समतोल म्हणावा असा होता. लढतींत कुणी कमी पडले तरी बाकीचे पुढे सरसावून संघाला विजयी करत होते. त्यामुळेच भारताने उपान्त्यपूर्व आणि उपान्त्य फेरीत 2-2 अशी बरोबरी झाल्यावरही त्याचे दडपण न घेता विजय मिळवला होता. भारतीय खेळाडू केवळ गुणवत्तेचेच नाहीत, तर त्यांच्यात दबावाखाली खचून न जाण्याची जिद्द आहे हेच यामुळे स्पष्ट झाले होते. तीन गेम होऊनही ते जिंकण्याची कुवत त्यांची दमछाकही उत्तम असल्याचे दाखवून देते. कदाचित यामुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढून अंतिम सामन्यात त्यांनी पहिले तीनही सामने जिंकून अजिंक्यपद मिळवले. भारताची मान उंचावली. आता बॅडमिंटनची लोकप्रियता भारतात आणखीच वाढेल याबाबत शंका नाही.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: इंडोनेशिया बॅडमिंटनपटू बेस्ट ऑफ फाइव्ह खेळ क्रीडा Load More Tags

Add Comment