फ्रेंच कवी, तत्त्वज्ञ आणि निबंधकार पॉल व्हेलरी (1871- 1945) यांचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे : 'तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणायची असतील तर त्यासाठी तुम्ही जागे होणे हा सर्वांत चांगला मार्ग आहे.' बार्ट फिशर आणि अरुण तिवारी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'इंडिया वेक्स' (India Wakes) या पुस्तकाच्या सुरुवातीलाच व्हेलरी यांचे हे वचन उद्धृत करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसच्या महामारीने जागतिक मंदीचे सावट हे भयस्वप्न सुरू असलेल्या जगात भारताच्या प्रभावाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. 'कोरोना महामारीचा चीनने संधी म्हणून उपयोग केला आहे काय? नेमक्या याच काळात भारताच्या सीमेवर भारतीय जवानांना चिनी फौजांकडून मरण पत्करावे लागल्याने चीनवरील अविश्वासात भरच पडेल की हा प्रकार विसरला जाईल? चीन आणि अमेरिका यांच्यात हे नवे शीतयुद्ध आहे का? आणि तसे असल्यास भारत त्यापासून होणारे नुकसान टाळू शकेल का? परस्परांच्या गरजा आणि हेतू यावर आधारलेले नवे जग अमेरिका, भारत आणि चीन निर्माण करतील का?' अशा अनेक बाबींचा विचार करणारे हे पुस्तक आहे आणि त्यामुळेच त्याचे उपशीर्षक 'पोस्ट कोरोना व्हायरस न्यू वर्ल्ड ऑर्डर' (कोरोनानंतरचे नवे जग) असे आहे.
अमेरिका या राष्ट्राची उभारणी कशी झाली याची माहिती या पुस्तकात थोडक्यात देण्यात आली आहे. चीन आज महाशक्ती बनलेला आहे. त्यांचे नेते आणि नागरिक यांनी ही भरारी कशी मारली, भारताने आता जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात प्रवेश केला आहे, मात्र त्याची दिशा काय असेल हे निश्चित नाही. दुसरीकडे अमेरिका आणि चीन वैरी बनले तर कशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो याविषयीही पुस्तकात भाष्य करण्यात आले आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असेही यात प्रतिपादन करण्यात आले आहे.
जगातील चार अब्ज लोक गरिबीत असताना संघर्ष आणि विनाश यांच्याएवजी सहकार्याची गरज असल्याचे या पुस्तकातून बजावण्यात आले आहे. त्यासाठी भारत, अमेरिका आणि चीन हे देश कसे एकत्र येवू शकतात आणि पृथ्वी अधिक जगण्यायोग्य बनवण्यासाठी काय हातभार लावू शकतात या शक्यताही पुस्तकात पडताळण्यात आल्या आहेत.
पुस्तकाचे पाच भाग आहेत : 1. भारत जागा झाला आहे - कोणत्या परिस्थितीत? 2. चीनच्या संपत्ती निर्मितीचे यंत्र, 3. चीन आणि अमेरिका यांची सांगड मोडणे आणि त्याचे होणारे परिणाम, 4. आशियाच्या सूत्रधाराच्या कामाची पूर्तता करणे (आस पक्का करणे), 5. अधिक राहण्याजोगी पृथ्वी. या प्रत्येक भागात पाच प्रकरणे आहेत .
पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये भारतात कालानुरूप झालेल्या आणि होत असलेल्या बदलांचा विचार इतिहासाच्या आधारे केला गेला आहे. अगदी इसवी सन पूर्व कालखंडापासून ते थेट स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्राप्ती - फाळणी आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत. पहिल्या प्रकरणाचा शेवट अमेरिकेचे गॅलब्रेथ (जे नंतर भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून आले होते.) यांच्या या वाक्याने केला आहे: "गांधींबरोबर जवाहरलाल नेहरू हे खरोखरच भारत होते. गांधी हे त्याचा इतिहास होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू हे त्याचे वास्तव."
दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणात शीतयुद्ध काळातील अवघडलेली स्थिती आणि रशियाबरोबर अनिवार्यपणे करावी लागलेली सलगी, तसेच बदललेल्या परिस्थितीत विशेषत: सोव्हिएत संघाची शकले झाल्यानंतर त्यात आवश्यक बदल होऊन आता भारताचा कल उजवीकडे - अर्थात अमेरिकेकडे कसा झुकत आहे याचे विवेचन आहे. नंतरच्या प्रकरणांत लोकशाहीची घसरण कशी होत गेली हे सांगून तरीही लोकशाहीपासून आता दूर जाता येणार नाही असे सांगून ते शक्यही होणार नाही असा विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे : "स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता हा आदर्श मान्य करणारे लोक सध्याच्या पेचप्रसंगातून नक्कीच मार्ग काढतील. नव्या तंत्रज्ञानाचा निर्माता हॅकर्सकडून पराभूत होणार नाही. लोकशाहीचा पाया नष्ट करू पाहणारे आणि लोकशाही संस्थांचा नाश करू पाहणारेच नष्ट होतील - ज्याप्रमाणे जुलुमी राज्यकर्ता आणि हुकूमशहा दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. लोकशाही ही राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर होणारी उत्क्रांती आहे. ती आता मागे जाणे शक्य नाही." पाचव्या प्रकरणात आता जगाची नव्या प्रकारे जडणघडण कशी असेल, याचा विचार करण्यात आला आहे.
दुसऱ्या भागात चीनच्या संपत्ती यंत्राबाबत माहिती आहे. एके काळी भारताच्या थोडा मागे असलेला चीन आता इंग्लंड, जपान, जर्मनी यांनाही मागे टाकून आता थेट अमेरिकेच्या अग्रक्रमांकालाच आव्हान देत आहे. चीन आव्हान देण्याएवढा प्रबळ कसा झाला, त्यासाठी त्याने जागतिक व्यापार संघटनेचा- वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा, खूप उशिरा तिच्यात अमेरिकेच्या मदतीने प्रवेश मिळवून कसा फायदा उठविला, हे खुलासेवार सांगितले आहे. त्याच बरोबर त्याच्या विस्तारवादी धोरणावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
हे रोखण्यासाठी काय करता येईल हे सांगताना जॉर्ज केनान म्हणाले होते - 'रशियाच्या अशाच धोरणाला प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेने स्वत:साठी दीर्घकालीन सरंक्षण योजना तयार केली पाहिजे. तसे केल्यास अखेरीस सोव्हिएत संघ मोडकळीस येईल.' तसे झालेही. पण ते केवळ अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांच्या खंबीरपणाने नव्हते तर त्याला सोव्हिएत संघाचा कमकुवतपणा आणि सोव्हिएत प्रणालीतील विरोधाभासही कारणीभूत होता.
अमेरिका, भारत आणि जपान यांनी तसे धोरण (केनान यांनी सांगितलेले) जाहीर केले तर आता क्षी जिनपिंग करीत असलेल्या अमेरिका विरोधी प्रचारात व त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणात भरच पडेल. त्याऐवजी अमेरिका, भारत, जपान यांच्यासह इतर देशांनी एकत्र येऊन चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' या उपक्रमाला विरोध करायला हवा हे नमूद करत असतानाच ते कसे करता येईल हेही या पुस्तकात स्पष्ट केलेले आहे.
अनेक आफ्रिकी देशांना भरघोस आर्थिक, तांत्रिक व इतर प्रकारची मदत करून चीनने मिंधे बनवले आहे. त्यामुळे ती राष्ट्रे एक प्रकारे चीनच्या वसाहतीच बनली आहेत. आता मात्र अमेरिकेने चीनचे त्यांच्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी 'विकासाकडे नेणारी योग्य प्रकारची गुंतवणूक - बेटर युटिलायझेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट लीडिंग टू डेव्हलपमेंट- कायदा' मंजूर केला आहे. त्यासाठी 60 अब्ज डॉलरचा निधी तर निर्माण केला आहेच, पण त्याच बरोबर त्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मंडळाला अधिक स्वातंत्र्यही दिले आहे. त्यात आता आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकही पाच अब्ज डॉलरच्या निधीनिशी भागीदार बनली आहे. खरे तर चीनने 2006 मध्येच याचा प्रारंभ केला होता, आता उशिरा का होईना अमेरिकाही ते सुरू करीत आहे.
'द ट्रम्प अँड ट्रॅजिडी ऑफ फ्री ट्रेड' (ट्रम्प आणि मुक्त व्यापाराची शोकात्मिका) या नंतरच्या प्रकरणाच्या नावावरूनच त्यात काय आहे हे स्पष्ट होते. त्यानंतरचे प्रकरण आहे 'अनस्टेबल आशिया' (अस्थिर आशिया). चीनला जगाचे नेतृत्व हवे असले, तरी त्याबरोबर येणारी जबाबदारी नको आहे, असे निरीक्षण या प्रकरणात मांडलेले आहे. अमेरिका आणि चीन यांनी सहकार्य करावे. व्यापार, गुंतवणूक, हवामान बदल, ऊर्जा, दहशतवादाला विरोध याबाबत उभयतांचे हित विचारात घेतले जावे. याचा फायदा जपान, द. कोरिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम यांनाही होऊ शकेल. पण तसे होण्याची शक्यता दिसत नाही. म्हणजे अमेरिका-चीन संघर्ष होण्याची शक्यता अधिक. हा संघर्ष कसा टाळता येईल याचा ऊहापोह उर्वरित भागात केला आहे.
जॉन केनेडी यांनी म्हटले होते की, चीन म्हणतो की संकट आले तर त्याच्या धोक्यापासून सावध राहा, पण त्यामुळे निर्माण होणारी संधी पहा. तिसऱ्या भागाला याच वाक्याने सुरुवात केली आहे. या भागामध्ये चलनासंबंधात झालेले व होत असलेले खेळ- हेतुतः निर्माण करण्यात येणारे बदल व त्यांचे परिणाम यांचा उहापोह केलेला आहे. अमेरिका हे सहन करणार नाही हे चीनच्या संदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले होते, "जगातील सर्वात श्रीमंत देश आपण विकसनशील असल्याचा दावा करीत जागतिक व्यापार संघटनेचे नियम झुगारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि खास सवलतींची अपेक्षा करीत आहेत." त्यामुळे आता या दोन देशांतील अर्थपूर्ण व्यापाराचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सांगून लेखकद्वयीने त्याची कारणेही दिली आहेत.
आता अशा प्रकारच्या व्यापार करारांसाठी अमेरिका इतरत्र पाहात असून त्यासाठी युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेल्या इंग्लंडकडे आणि भारताकडे त्यांनी आपले लक्ष वळवले आहे. भारताने या संधीचा फायदा घेऊन अमेरिकेबरोबर व्यापार करार केल्यास त्याची खीळ बसलेली अर्थव्यवस्था कशी कार्यरत होईल याचे विवेचनही पुस्तकात आले आहे. (असा करार कोणत्या प्रकारचा असेल याचा विचार अखेरच्या भागात आहे.)
पुढच्या प्रकरणात चीनच्या 'मेड इन चायना 2025' या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तर नंतरच्या 'कंटेन अँड कॉम्पिट' या प्रकरणात चीनला रोखण्याबरोबरच त्याच्याशी स्पर्धा कशा प्रकारे करता येईल याबद्दल सांगितले आहे. 'हौडी ट्रम्प' (Howdy Trump) हे प्रकरण ट्रम्प यांच्या धोरणांविषयी आहे. पुढच्या 'न्यू अलायन्सेस' या प्रकरणात नावाप्रमाणेच नवे मित्र -नवी फळी कशी निर्माण होऊ शकते हे सांगितले आहे.
अमेरिका आता अलिप्त राहू शकणार नाही. पर्ल हार्बर आणि 9/11 यांमुळे ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच त्याला मित्र देशांची गरज आहे. चीनचे जागतिक अर्थवयवस्थेवर प्रभुत्व निर्माण होऊ नये यासाठीही हे आवश्यक आहे. त्यासाठी भारताला सहकारी करणे हा मार्ग कसा होऊ शकतो याचा आढावा या प्रकरणात घेण्यात आला आहे.
पुस्तकाचे अखेरचे दोन भाग अतिशय महत्त्वाचे आहेतच, पण ते तितकेच माहितीपूर्ण आणि रंजकही आहेत. त्यांमध्ये आशियाई आणि आफ्रिकी बाजारपेठ खुली करणे, दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उदध्वस्त करणे, सायबर सुरक्षा, लष्करी आणि औद्योगिक क्षेत्राची गुंतागुंत, समान काळजी आणि वाटून घेतलेल्या संधी, इंटरनेट वर्ल्ड - महाजालाचे जग, डिजिटल युगात स्पर्धा करणे, बौद्धिक मालमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता या सर्व घटकांमुळे होणारे बदल कसे असतील, समुद्र - स्वातंत्र्य (सागर संचाराचे स्वातंत्र्य) अशा विविध विषयांचा समावेश आहे. शेवटचे प्रकरण कोरोना व्हायरस नंतरचे नवे जग याविषयीचे आहे. अत्यंत सोप्या भाषेत ही सर्व माहिती देण्यात आली आहे आणि ती मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ती वाचण्यात मोठा आनंदही आहे.
विविध प्रश्नांवरून अमेरिका आणि चीन यांच्यात शीतयुद्ध सुरू होण्याची शक्यता उपसंहारामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारताची भूमिका काय असेल असा प्रश्न आहे. या प्रश्नाची उकल करताना पुस्तकात वॉल्टर रसेल यांच्या 'वॉल स्ट्रीट जर्नल' मधील लेखाचा काही भाग दिला आहे. त्यात ते म्हणतात, "संपन्न -श्रीमंत, सशक्त आणि लोकशाहीवादी भारतच चीनच्या महत्त्वाकांक्षांना फोल ठरविण्यात मोठी मदत करू शकेल. मध्य,आग्नेय आशिया आफ्रिकेतील चीनचा प्रभाव कमी करू शकेल. भारत शक्तिमान झाला की भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि व्हिएतनाम यांच्या सहभागाचा समतोल राखण्यासाठी अमेरिकेला पार पाडावयाची जबाबदारी कमी होईल. त्याबरोबरच चीनच्या महत्त्वाकांक्षांनाही लगाम लावता येईल."
भारत संपन्न होण्यासाठी व्यापार, गुंतवणूक, धोरणात्मक (डावपेचांचे) लष्करी सहकार्य, बौद्धिक मालमत्ता आणि आरोग्य सुरक्षा यांवर भर द्यावा लागेल. भारतात औषधनिर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत या बाबीकडेही पुस्तकात लक्ष वेधण्यात आले आहे. चीनबरोबरचे शीतयुद्ध जिंकण्यासाठी अमेरिकेला लोकशाही देशांना संपन्न बनवावे लागेल. त्यांची स्वत:ची सुरक्षा आणि भरभराट यासाठी हे आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी भारत हा योग्य देश आहे, असा निष्कर्ष पुस्तकाच्या या प्रकरणात मांडण्यात आला आहे.
सद्यस्थितीचे वर्णन करताना राजकीय विश्लेषक अँड्रयू सलीवन म्हणतात : "अतुलनीय प्रचंड संपत्ती आणि ज्ञान आपल्याकडे असूनही रस्त्यांवर शुकशुकाट आहे. आपले बहुसंख्य उद्योगधंदे स्थगित आहेत. आपली कार्यक्षमता आणि तांत्रिक प्रभुत्व यांना निसर्गाच्या एका कणाने हिणवले आहे."
आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ 'इंडिया वेक्स' मध्ये अनेक लेखांचे अंश देण्यात आले आहेत. प्रत्येक पानावर तळटीपेत संदर्भ दिले आहेत. लेखकद्वयीने लेखनाबरोबरच संकलन आणि संपादनाचे कामही केल्याचे ध्यानात येते. त्यासाठी ते खचितच प्रशंसेस पात्र आहेत. पुस्तकाचा आवाका प्रचंड असल्याने सर्वच गोष्टी लिहिणे अवघड आहे.
या पुस्तकाबाबत एकच गोष्ट खटकते. ती म्हणजे, भारताचे विद्यमान पंतप्रधान आणि आजचे अमेरिकेचे अध्यक्ष यांना पूर्वसूरींपेक्षा चांगले ठरविणारे संदर्भ देतानाच आधीच्या राज्यकर्त्यांचे केवळ दोष आणि चुका दाखविणाऱ्या संदर्भांचाच बहुतांशाने समावेश करण्यात आला आहे. अगदी नाईलाज झाला आहे त्यावेळी त्यांच्याबद्दल मोजके चांगले शब्दही आहेत. दोन्ही देशांतील सद्यस्थिती व राजकारण पाहता असे का असावे हे कळण्यासाठी काही परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. म्हणून त्याबद्दल इथे केवळ ओझरता उल्लेख केला आहे. पण ही एकच बाब वगळली तर हे पुस्तक सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय संदर्भग्रंथ म्हणूनही त्याचे मोलही आहेच. हे पुस्तक योग्य वेळी अगदी तत्परतेने, तरीही उत्कृष्ट निर्मिती करून प्रकाशित करणाऱ्या 'सकाळ प्रकाशन'चेही कौतुक करायला हवे.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
इंडिया वेक्स : पोस्ट कोरोना व्हायरस न्यू वर्ल्ड ऑर्डर
लेखक : बार्ट एस. फिशर आणि अरुण तिवारी
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
पाने : 480 (पुठ्ठा बांधणी)
किंमत : 999 रुपये ( अमेरिकन डॉलर 39.99)
Tags: पुस्तक नवे पुस्तक परिचय परीक्षण इंडिया वेक्स सकाळ प्रकाशन आ श्री केतकर भारत अमेरिका चीन बार्ट फिशर अरुण तिवारी Book Book Review New Book A S Ketkar India Wakes Arun Tiwari Bart Fisher India America China Load More Tags
Add Comment