कूस : ऊसतोड कामगार महिलांच्या आयुष्यावरील ताकदवान प्रकाशझोत!

ज्ञानेश्वर जाधवरलिखित 'कूस' या कादंबरीचा परिचय

सरकारी अहवालातील आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड कामगारांच्या कष्टाचे-दुःखाचे मानवीकरण होत नाही आणि जोपर्यंत आपण त्यांच्या वेदनेशी सहृदय होत नाही तोपर्यंत या समाजाला सामोरे जावे लागणारे भोग सुटणार नाहीत असे वाटते. त्यांच्या वाटेला येणाऱ्या तीव्र मरणकळा या रोजच्या आहेत आणि या मरणकळांमागील व्यक्तीचरित्रांची आयुष्ये उलगडल्याशिवाय, ते जाणून घेतल्याशिवाय केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.

कोणत्याही औद्योगिक उत्पादन-वितरण व्यवस्थेशी संबंधित अशी सत्ता राबवणारी, आर्थिक हितसंबंध जोपासणारी सत्तेला अनुकूल परिव्यवस्था (ecosystem) असते. समाजातील कष्टकरी लोकांचे जीवन हे अशा उत्पादन व्यवस्थेतील कच्च्या मालासारखे वापरले जाते. बहुजन समाजातील अनेक कष्टकरी समूहांचे जीवन हे ती व्यवस्था चालवणाऱ्या इंजिनाच्या भट्टीतील सरपणासारखे असते याचा अंगावर काटा आणणारा अनुभव ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ या कादंबरीच्या पानापानावर येतो. आपल्या समाजात शेकडो वर्षे डॉ. आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘graded inequality’ आहे आणि त्याचाच धागा घेऊन असे म्हणावेसे वाटते की, जसजसे आपण असमानतेच्या पातळीनुसार आणखी मागास समुदायांबद्दल जाणून घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला समजते की, शोषणाचे प्रमाण हेसुद्धा भूमितीय गतीने, पटीने वाढत जाते. ऊसतोड कामगारांच्या पिढ्यानपिढ्या या शोषणाच्या विविध स्तरांवर साखर कारखान्यांनी केलेली आर्थिक पिळवणूक, राजकीय सत्तास्थानांवरील नामदारांनी फक्त आपले करियर पुढे रेटण्यासाठी इंधन म्हणून केलेला उपयोग याला जवळून अनुभवत आहेत. सामाजिक मागासलेपण हे यांच्या समुदायाला गोचिडासारखे कायमचे चिकटले आहे.

ऊसतोड, ऊसवाहतूक आणि साखर कारखानदारी संबंधित व्यवसाय साखळीमधील कष्टाच्या कामांच्या व्यापात या समाजाचा मानव विकास निर्देशांक प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरला होताच. यावर वेळोवेळी प्रसारमाध्यमे प्रकाशझोत टाकत होते. ऊसतोड कामगार किंवा ते करणाऱ्या समाजातील महिलांचे अल्पवयात होणारे विवाह, शिक्षणाचा संपूर्ण अभाव, कमी वयात मुले झाल्यामुळे आणि गरिबीमुळे कुपोषण व गंभीर आरोग्याच्या अनेक समस्या तसेच या कुटुंबांचे (कोयता जोडी) सातत्याने व्यसन-कर्ज-हताशा या चक्रात गुरफटत जाणे याबद्दल महाराष्ट्राला माध्यमांतील बातम्यांमधून अधूनमधून थोडीफार जाणीव होत असते. ज्याप्रमाणे ‘एक चित्र हे हजार शब्दांचे काम करते’, असे म्हटले जाते त्याचप्रमाणे ‘एक कथा ही हजार बातम्यांचे काम करू शकते’ अशी भावना ‘कूस’च्या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.

बातम्यांच्या माऱ्याने, समाजातील अन्याय-शोषणाबद्दल झालेल्या चर्चा-चर्वणाने आणि वेळोवेळी समोर येत असलेल्या समाजशास्त्रीय संशोधनामुळे या कष्टकरी ऊसतोड भावा-बहिणींबद्दल आपल्याला अनेक धक्कादायक बाबी कळत असतात. पण जोपर्यंत सरकारी अहवालातील आकडेवारीच्या पलीकडे, सनसनाटी बातम्यांच्या निर्देशांकांच्या पलीकडे, अकादमिक पातळीवर केलेल्या धोरणात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन ऊसतोड कामगारांच्या कष्टाचे-दुःखाचे मानवीकरण होत नाही आणि जोपर्यंत आपण त्यांच्या वेदनेशी सहृदय होत नाही तोपर्यंत या समाजाला सामोरे जावे लागणारे भोग सुटणार नाहीत असे वाटते. त्यांच्या वाटेला येणाऱ्या तीव्र मरणकळा या रोजच्या आहेत आणि या मरणकळांमागील व्यक्तीचरित्रांची आयुष्ये उलगडल्याशिवाय, ते जाणून घेतल्याशिवाय केवळ तर्कनिष्ठ ज्ञानाच्या पातळीवर आपण हा संघर्ष समजावून घेऊच शकणार नाही, त्यासाठी ‘कूस’सारखी कथाच मदतीला हवी.

घरात मुलीच्या जन्म होताच या समाजातील ऊसतोड कामगारांच्या कोपीवरचं जगणं कसं उपेक्षा आणि संकटांच्या मगरमिठीतुन सुटता सुटत नाही हे सांगायला ‘कूस’मध्ये मध्यवर्ती कथा आहे, सुरेखाची! तिच्या तोंडातूनच आपण तिच्या लहानपणापासून तिला काय काय भोगावे लागले याचा उलगडत जाणारा जीवनपट समजून घेत पुढे जात राहतो. उसाच्या फडात बालपणापासूनच तिला बरीच कष्टाची कामं रोजच करावी लागतात. आजकालच्या निमशहरी-शहरी वातावरणात वेगवेगळ्या कुटुंबात ग्रामीण राहणीमानाच्या तुलनेत सुखकर जीवनशैली असल्यामुळे मुलींच्या शरीरात होणारे बदल हे किमानपक्षी योग्य वेळेवर होणाऱ्या कौटुंबिक-समुपदेशनाने आणि हळूहळू जागरूकता वाढत असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांनी सुसह्य होऊ शकतात. पण दिवसरात्र अंधारात जीवन जगणाऱ्या, तांडा, उजाड माळरानावरील कोणत्याही सुविधा नसणारा आणि गाव-गाड्याच्या गोतावळ्यातील मदतीचे कोणतेही आश्वासक वातावरण नसणारा हा समाजगट सतत आरोग्याच्या अनेक अडचणींनीं त्रासलेला असतो. त्यामध्ये भर असते ती, वेगवेगळ्या आरोग्यविषयक समजुती-गैरसमजुतींची. मासिक पाळी हा वाढत्या वयातील मुलींच्या आरोग्यातील एक महत्त्वाचा भाग! या विषयावर सुरेखाला कमी वयात आलेले भान जेव्हा गोष्टीत आपणाला समजते तिथून कूसची कथा हळूहळू आपल्यात भिनायला सुरुवात करते. एका बाजूला कष्टकरी जीवनाचे आणि साखर कारखानदारीच्या अंगाने समोर येणारे अनेक तपशील प्रसंगानुसार त्यांच्या बोलीभाषेत आपल्यासमोरून पुढे सरकतात आणि दुसऱ्या समांतर पातळीवर मासिक पाळी, विविध वयोगटातील स्त्रियांचे आरोग्याचे नाजूक प्रश्न आणि मग गर्भवती महिलांच्या आरोग्याची वैज्ञानिक पद्धतीने माहिती असा समृद्ध आशयपट विस्तारत जातो.


हेही वाचा : बदलत्या साहित्याचा नकाशा - अजिंक्य कुलकर्णी


सुरेखाला शिकायचं असतं, पण प्राथमिक शाळेत असतानाच तिला पुढे शिकण्यापासून परावृत्त केलं जातं. पण ती बोर्डिंगपर्यंत शिकण्यासाठी ठाम राहते. यात सवलत मिळावी म्हणून ती जातीचा दाखला काढण्यासाठी वडिलांना सांगते. यासाठी त्या दोघांना रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मतदान कार्ड आणि 1961 पूर्वीचा कोणताही अधिकृत पुरावा मिळवावा लागणार होता. हे पुरावे मिळवण्यासाठी या पालावरच्या कुटुंबाला दिवसेंदिवस प्रचंड पायपीट आणि खर्च करावा लागतो. आपल्या शासकीय व्यवस्थेत त्यांची नोंद नसणे हेच त्यांच्या अस्तित्वाबद्दल भयाण वास्तव समोर आणणारे असते. हळूहळू तिचे थोडेथोडके शिक्षण पुरे होऊन तिला बोहल्यावर चढवले गेले आणि हे करतानासुद्धा हुंड्याची घासाघीस कशी या कुटुंबाच्या तोंडाला फेस आणते हा नेहमीचा मुलीकडच्यांना येणारा अनुभव पुढे सुरेखाला येतो.

लग्न जुळवणे, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नाच्या दिवशी या गरीब कुटुंबाची मुलाच्या कुटुंबाचे समाधान करताना जी दाणादाण उडाली ते अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून सुरेखा सांगत जाते. एकीकडे लग्नाच्या बोहल्यावर चढत असतानाच सुरेखाला मासिक पाळीच्या त्रासाने अगदी असह्य होते आणि तिथूनच सुरु होतो तिचा या जीवन देणाऱ्या ऊर्जेशी लपाछपीचा खेळ! प्रचंड वेदना आणि यावर आपल्या आसपासच्या बायांचे अज्ञान (आणि पुरूषांचेसुद्धा) याचा सामना करत आपल्या संसाराची सुरुवात तिला करावी लागते. विवाहित आयुष्यात स्वतःच्या बायकोची संमती न मिळवता नवऱ्याकडून जबरदस्तीचे होणारे शारीरिक संबंधांचे प्रसंग आपल्याला अंतर्मुख करतात. उसाच्या फडावर आणि घरातील पलंगावर स्त्रीची गुलामगिरी काही संपत नाही हे जळजळीत सत्य छोट्या छोट्या नाजूक प्रसंगांतून गोष्ट आपल्याला सांगत जाते, त्यातून आपण अधिकच अस्वस्थ होत जातो वाचक म्हणून!

पुढे सुरेखा आई होते. पण तिची कष्टाची जिंदगी काही थांबत नाही. ती अशीच कामं करीत जाते. अशाच एका मेहनतीच्या दिवशी तिला कळतं की, आपलं गर्भाशय हे काही कारणाने विघटित होऊन योनीमार्गे शरीराच्या बाहेर फेकलं जात आहे. हे समजावून घेताना सुरेखा म्हणते: “माह्ये बोलणं बंद झालं व्हतं. आता फकस्त त्या वाहणाऱ्या रगताकड ध्यान जात व्हतं. कशामुळं झालं असंल? वाकून पाट खांदल्यामुळं झालं असंल काय? का राती मालकानी झोपल्यावर अंगाला झटल्यामुळं झालं असंल?... चार दिस गोळ्या खाल्ल्या तवा कमी आलं. रगत वुलसक वुलसक यायचं. पण भग भग उटणं कमी झालं व्हतं. चारीही दिस मला कॉपीवरच ठिवलं व्हतं. नीट झाल्यावर म्याच फडात गेले. सांच्याला आल्यावर मातर पुन्हा पोटात दुखाया लागलं. आन रगताची धार सुरु झाली. आता मातर मला जास्तच भ्या वाटाया लागलं. कशामुळं असं व्हतं असलं. काय बाया म्हणत व्हत्या की, पिशवीत आजून मासाचं तुकडं राहिलं असत्याल. ते सारंच बाहेर काढावं लागत्यात. नाय तर त्याच्या गाठी व्हून कँन्सर व्हतोय. हे ऐकून तर म्या हबकलेच व्हते. माही कंबर धीरच धरू देत नव्हती. काय करायचं आन काय नाय याचाच रातभर टकुऱ्यात विचार. नुसत्या मकळ्या कालवील्यासारखं व्हत व्हतं. पहाटे गाडी निघताना सासूबाई मला चल म्हणाल्या पण म्या गेले नाय, तशीच कुंती धुवून पडून राहिले. मालकांनी इचारलं, “व्हय गं, चल की, नुसत्या मोळ्या बांध... उचलू नकूस.”

सुरेखाचा छोटा मुलगा मधल्या काळात दगावतो, तिची तब्येत प्रचंड खालावते आणि हळूहळू ऊसतोड कामगाराच्या जगण्यातील दुष्टचक्र तिला घेरायला लागते. स्वतःच्या आयुष्यावर आलेल्या संकटातून ती अधिक तर्कनिष्ठेने स्वतःच्या जीवनाचे मूल्यमापन करते आणि नशिबाला-दैवयोगाला प्रश्न विचारते. एका स्वगतात ती म्हणते, “आता आबा अन आय म्हणती तुहं नशीबच फुटकं. मह्या नशीब कसं काय फुटकं? आपून जर काम केलं तर आपल्याला खायला मिळतंय. आपून एवढं काम करतेय म्हणून पोटाला घास मिळतोय. पण खाल्लेल्या घास अंगाला का लागत नाय. अंगाला लागलं तर आपून आजारी पडणार नाय. पण सारखं काय ना काय दुखाया लागलंय. मानपाठ गळून येतीय. तर कवा सार आंग रवा रवा करतंय. ठसठसल्यासारखं व्हतंय. काय करायला पाहिजेलंय? का ह्यालाच नशीब म्हणत्यात. आपून किती जरी केलं तरी आपल्याला सुख मिळत नाय. हेच का नशीब हाय. ज्याच्या जिंदगीत सुख हाय ते त्यांचं नशीब कुणी लिहलं असलं आन मह्या कुणी लिहलं असंल. माह्यावर अन्याय कसा केला बरं देवानं ?  कोणत्या देवानं केलाय? आसरांनी केलाय का? सटवाईनं? म्हसुबानं? माहूरगडच्या रेणुकामातेनं? तुळजापूरच्या आंबाबाईंनं? येडाईनं? का पांडुरंगाच्या रुक्मिणीनं ? कुणी केला आसंल बर मह्या जिंदगीचा खेळ. कुणाला इचारू? अंगठा गेला तरी सोसलं, पिशवी गेली तरी रेटलं. आता माझं सारं जातंय, कसं जगू आता? कुणीतरी सांगा मला?”        

सुरेखाच्या आरोग्याची वाताहत ही ऊसतोड कामगार महिलांच्या व्यापक दुःखाचे प्रातिनिधिक चित्रण वाटावे असेच आहे. व्यापक पातळीवर (macro) त्यांच्या आरोग्याची झालेली ही हेळसांड आणि लघु-पातळीवर (micro) त्यांचे गर्भाशय काढण्यासाठी दबाव तयार करणारे सामाजिक-कौटुंबिक सूत्रधार कोण आहेत यावर, तसेच कर्जाच्या फेऱ्यातून बाहेर निघण्यासाठी सतत काम करत राहण्याची सक्ती यावर लेखक प्रकाशझोत टाकतो.

यातील आणखी एक पात्र आहे एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या पुरुष पत्रकाराचे! त्याच्या शोधक नजरेतूनसुद्धा या विषयाचे अनेक न उलगडलेले पदर आपल्यासमोर उघडत राहतात. या पत्रकाराच्या ज्ञानात, जाणिवेत आणि नेणीवेत या ऊसतोड कामगारांच्या आयुष्याबद्दल जसजसे अनुभव रुजत जातात तसेतसे आपल्यासारख्या या ‘अदृश्य आणीबाणी’कडे डोळेझाक करणाऱ्या व्यक्तींच्याच डोळ्यातच जणू अंजन घातले जाते. हे सर्व सांगताना पत्रकाराच्या भूमिकेतून त्या त्या ठिकाणी या समस्येचा शोध कसा घेतो हे वाचणे म्हणजे कोणत्याही सामाजिक विषयाचा अभ्यास कसा करावा याचा कथात्मक धडाच दिला आहे असे वाटते. यात विशेष उल्लेख करावा म्हणजे मासिक पाळी, लैंगिक जीवशास्त्र, प्रसूतीशास्त्र, गर्भाशय संबंधित आजार, गर्भाशय आरोग्याची काळजी घेण्याचे विज्ञान, कुटुंबनियोजनातील गुंतागुंती आणि महिलांची या सगळ्यात होणारी प्रचंड मानसिक ओढाओढ, शारीरिक ओढाताण याला टिपायला एक कारुण्याची नजर लागते आणि ती या पुस्तकाच्या पानापानावर दिसते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्याच्या परिघातील एक दुर्लक्षित राहिलेली समस्या कादंबरीच्या स्वरूपात अधिक सुसह्य करून समजावून घ्यायला हा कथाविस्तार मदत करतो. यामुळे यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी सुरेखाच्या नजरेतून आपण प्रत्येक मुद्द्याकडे पाहायला शिकतो आणि अलगद स्त्रीवादाच्या प्रांतात आपण प्रवेश करतो. महिलांचे प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनातून ऐकून, समजून, अभ्यासण्याचा संयम विकसित करणे हासुद्धा स्त्रीवादाचा एक महत्त्वाचा आग्रह राहिलेला आहे. या पुस्तकाचे हे एक महत्त्वाचे योगदान म्हणावे लागेल.

पत्रकार म्हणून कादंबरीतील सूत्रधार महत्त्वाचे प्रश्नसुद्धा विचारतो, “सहज म्हणून घड्याळात टायमिंग लावलं की एक मोळी बांधायला किती वेळ लागतो. साधारण मिनिटामध्ये एक मोळी होते. पण त्या मिनिटामध्ये किती वेळा वाकते आणि खाली वाकून किती वेळ मोळी बांधते. तर असं लक्षात आलं की, चार वेळा खाली वाकून उभं राहावं लागतं आणि 20 सेकंद मोळी बांधताना वाकूनच बांधावी लागते. अशा दररोज शंभरपेक्षा जास्त मोळ्या बांधाव्या लागतात. त्या वेळी विचार केला की यामुळेच तर स्त्रियांच्या गर्भाशयावर ताण पडत नसेल ना? कंबर ताटून जाते. सारखं सारखं वाकून काम करण्याने कंबर आणि मानपाट ताटते. त्यामुळे भविष्यात चाळिशीनंतर कंबरेचे, ओटीपोटाचे, पोटात दुखण्याचे, मणक्याचे, गुडघेदुखीचे आजार होत असतील का? अजून महत्त्वाची गोष्ट जाणवली ते म्हणजे जरी त्या बाईची मासिक पाळी सुरू असेल तर सतत वाकून जास्त रक्तस्राव होत असेल का? त्यामुळे गर्भाशयावर ताण पडत असेल का? कदाचित त्यामुळेच पिशवीला सूज येणं, आणि पोटात दुखणं असे आजार होत असतील का? असे प्रश्न माझ्या डोक्यात घुमू लागले…

जर या स्त्रिया सरकारी दवाखान्यात जात असतील तर तिथे त्यांची योग्य तपासणी का होत नाही? तिथेच योग्य तपासणी झाली आणि उपचार मिळाला तर हे खासगी डॉक्टर्स जास्तीचे पैसे कुणाकडून घेतील? सरकारी दवाखान्यांची अवस्था अशी कुणी केलीय? सरकारला लोकांची सेवा करायची नाही का? खासगी डॉक्टर्स आणि सरकारी खात्यातील अधिकारी यांचे काही लागेबांधे आहेत का? की खासगी डॉक्टर्स या सरकारी आरोग्य विभागावर दबाव आणून यंत्रणा कमकुवत करत आहेत का? म्हणजे रुग्णांना पर्याय नसेल तेव्हा खासगी दवाखान्यातच जावं लागेल. असं काही आहे का? खासगी डॉक्टर्स पिशव्या काढण्यासाठी जास्तीचे पैसे घेतात का? आलेल्या रुग्णांना योग्य माहिती देत नाहीत का? जरी गरज नसेल तरी हे पिशवी काढत असतील का? असं कसं होऊ शकतं की, एकाच गावातील पन्नास-पन्नास स्त्रियांची गर्भाशयं काढली जातात आणि तीही ठराविक दवाखान्यातच. याच्या पाठीमागे नेमकं काय आहे? याचा सरकारने तपास करणं आवश्यक आहे. मुकादम ऊसतोड करणाऱ्या कुटुंबावर दबाव आणत असतील का? मासिक पाळीच्या दरम्यान त्यांना कामावरून काढून टाकत असतील का? काम कमी होत असेल तर त्यांची मजुरी कमी करत असतील का? हे मुकादम स्त्रियांना पिशव्या काढा म्हणून सांगत असतील का? यांचं काही जाळं आहे का? मुकादमाच्या सांगण्यावरून कोणी डॉक्टर्स पिशव्या काढत असतील का? कमिशन मिळत आहे म्हणून हे काहीही करत असतील का? कारखान्यांचं यांच्यावर काही नियंत्रण आहे का? जर नसेल तर पैशांसाठी मुकादम आणि डॉक्टर्स मिळून हे काम करत असतील का? जर करत असतील तर याचा तपास झाला पाहिजे, याची सत्यता समोर आली पाहिजे.”

कूस समजून घेताना ऊस लागवडीची शेती, साखर कारखान्याचे गळीत हंगामाचे चक्र, साखर उद्योगाबद्दलचे धोरणात्मक-व्यावहारिक तपशील याबरोबरच बदलत्या समाजाचे आर्थिक कंगोरे, जगण्यातील आव्हानांना सामोरे जाताना काय काय तडजोडी करून अपमान गिळावे लागतात, हक्काच्या सुखांवर पाणी सोडावे लागते हे सगळे उमजत जाते — त्या त्या पात्राच्या बोलीभाषेतून!  सामाजिक शास्त्रात व त्यातही मानववंशशास्त्रीय अंगाने केलेल्या संशोधनात गुणात्मक-वर्णनात्मक पद्धतीतून समूहांच्या अनुभवाचे थेट साक्षीदार होऊन, त्यांच्या तोंडून सच्चा आशय किंवा व्यक्तींचा जैविक-इतिहास समजावून घेताना जशी सखोल, समृद्ध व सघन मांडणी करण्याची संधी मिळते त्याप्रमाणे या कादंबरीने ते सामान्यांच्या भाषेतील गोष्ट सांगण्याचा मोठा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या सुमारे आठ ते दहा लाख आहे. ते एका विशिष्ट समाजाचे आहेत. या समाजाचे मोठे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापनासुद्धा आता झाली आहे. पण आपल्या समाजातील इतर अनेक जातींतील बेरोजगारीमुळे, शेतीतील कमी उत्पादकतेमुळे, इतर मजुरीची कामे वाढल्यामुळे आणि दुसरे पर्याय बंद होत असल्यामुळेदेखील या कामाकडे दुसऱ्या समाजातील लोक आकर्षित होत आहेत. महाराष्ट्रातील सहकारी आणि खासगी मिळून दोनशेच्या आसपास साखर कारखाने आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारने प्रत्येक ऊसतोड कामगार कुटुंबासाठी आरोग्यदायी आणि शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने निधी उपलब्ध व्हावा म्हणून प्रत्येक कारखान्याला तेथे गाळप होणाऱ्या प्रत्येक टन उसामागे दहा रुपये यासाठी वेगळे काढून शासनदरबारी जमा करावे असे ठरवले होते. या प्रकारच्या घोषणा होत असतात पण त्याचा या मजुरांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यावर काय फरक पडतो हे पाहावे लागेल आणि कालबद्ध पद्धतीने वारंवार त्याचे मूल्यमापन करावे लागेल.

उसलागवड, ऊसतोड, साखर उत्पादन आणि ऊस-साखर वाहतूक या व अशा सर्व शेती-सहकार-आर्थिक क्षेत्रांतील सामाजिक घटकांच्या जीवनातील प्रचंड संघर्ष, दुःख, आक्रोश समजून घेण्यासाठी ही कादंबरी पुढील काळात एक महत्त्वाचे होकायंत्र ठरेल असा विश्वास वाटतो. मराठी साहित्यात या प्रकारच्या वास्तवाकडे संशोधनात्मक आणि स्थानिक संस्कृतीच्या चष्म्यातून, बोलीभाषेच्या नजरेने पाहणे आपल्याला समाजाच्या अजून जवळ घेऊन जाते. हे वाचन फक्त समज वाढवणारी अनुभूती देत नाही तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सतत धडपडत असलेल्या वर्गाच्या जीवनांतर्गत अहोरात्र चालू असलेल्या लढ्याचा व त्याबरोबर येत असलेल्या अस्वस्थतेचा दृष्टिकोन देते. ‘कूस’च्या लेखकाचे यासाठी विशेष अभिनंदन!

-  राहुल माने
nirvaanaindia@gmail.com
(लेखक, मुक्त पत्रकार आहेत.)

Tags: मराठी कादंबरी साहित्य वाङ्मय मराठी लेखक साहित्यिक ऊसतोड मजूर शेतकरी ग्रामीण साहित्य Load More Tags

Add Comment