सायंटिस्ट खोपड्या घडवू पाहणारे पुस्तक

डॉ. नितीन हांडे लिखित 'सायंटिस्ट खोपडी : बेलपासून नोबेलपर्यंत' या पुस्तकाचा परिचय 

शोध कसे लागले याची रंजक सफर सांगणारी गोष्ट ऐकायला कुणाला नाही आवडणार? वर उल्लेख केलेल्या शास्त्रज्ञांनी जे निरनिराळे शोध लावले, त्यांच्याविषयी सोप्या, खेळकर पद्धतीने, लहान मुलांच्या नजरेतून आणि दररोजच्या बोलीभाषेतून सांगायचा प्रयत्न या पुस्तकात आहे. शोध लागतात, त्यामागची माणसाची प्रेरणा हे पुस्तक वाचताना मनावर ठसते. 

तत्त्वज्ञ आणि गणितज्ञ बर्ट्रांड रसेल त्यांच्या ‘On Education’ या पुस्तकात म्हणतात, “बऱ्याच लहान मुलांना शाळेत जाईपर्यंत काही ना काही जाणून घेण्याची इच्छा असते. पण एकदा शाळेत गेल्यानंतर बऱ्याच बाबतींत खराब शिक्षकांमुळे ते मूर्ख किंवा उत्सुकता गोठून गेलेले बनतात. कुतूहल ही उत्स्फूर्त बौद्धिक आयुष्याची पायाभरणी आहे. ज्ञानाबद्दल असलेल्या असीम ओढीमुळे कुतूहल उफाळून येते. एखाद्या खोलीत पहिल्यांदाच एखादे मांजर आले असेल तर तेथील प्रत्येक गोष्ट हुंगण्यात त्या मांजराचा वेळ जातो. हेच तुम्हाला लहान मुलांबाबतही जाणवेल. जेव्हा एखाद्या कपाटाचे ड्रॉवर बंद असते तेव्हा लहान मुले तो ड्रॉवर कधी उघडला जातोय आणि मग कधी आपण त्यातील वस्तूंचे निरीक्षण करतोय, याचीच वाट पाहत असतात. प्राणी, आकाश, पाऊस-विजांचा कडकडाट, यंत्रे, यामुळे मुलांची उत्सुकता चाळवली जाते. पण वय वाढल्यावर ही प्रेरणा कमी होत जाते.”  मुलांच्या उत्सुकतेला आणि त्यामागील उर्मीला विधायक किंवा उत्पादक कामाकडे घेऊन जाण्यासाठी तिला जोडून कृती करता आली पाहिजे. डॉ. नितीन हांडे यांच्या ‘सायंटिस्ट खोपडी:बेलपासून ते नोबेलपर्यंत’ या पुस्तकाचा तोच उद्देश आहे. 

या पुस्तकात अलेक्झांडर ग्रॅहम बेल, रॉबर्ट बॉयल, बेंजामिन फ्रँकलीन, मायकेल फॅरेडे, निकोला टेस्ला, लिओनार्दो दा विंची, शंकर आबाजी भिसे, नरिंदरसिंह कपानी, रुचिराम साहनी, वसंत खानोलकर, वर्गीस कुरियन, सत्येंद्रनाथ बोस, गिरींद्रशेखर बोस, होजे डेलगाडो, जॅक पार्सन्स, डॉ. वामन कोकटनूर, होरेस वेल्स, निकोलाय वाव्हिलोव्ह, ज्युलियन हक्सले, पॉल डिरॅक, मॅक्स प्लॅन्क, नील्स बोहर, वर्नर हाईझेनबर्ग, हेडी लमोर, जेम्स वॉट, रिचर्ड फाइनमन आणि आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांच्या आयुष्यातील लहानपणापासूनच्या महत्त्वाच्या घटना-गोष्टींची धमाल मजा वाचायला मिळते.    

शोध कसे लागले याची रंजक सफर सांगणारी गोष्ट ऐकायला कुणाला नाही आवडणार? वर उल्लेख केलेल्या शास्त्रज्ञांनी जे निरनिराळे शोध लावले, त्यांच्याविषयी सोप्या, खेळकर पद्धतीने, लहान मुलांच्या नजरेतून आणि दररोजच्या बोलीभाषेतून सांगायचा प्रयत्न या पुस्तकात आहे. शोध लागतात, त्यामागची माणसाची प्रेरणा हे पुस्तक वाचताना मनावर ठसते. 

‘विज्ञानाची कास धरणाऱ्या, विज्ञानावर प्रेम करणाऱ्या, विज्ञानावर निष्ठा ठेवणाऱ्या आणि विज्ञानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात, अज्ञात अशा सर्वांना’ हे पुस्तक लेखकाने अर्पण केलेले आहे. प्रस्तावनेत हांडे म्हणतात, ‘विज्ञान हा एक विचार असतो, केवळ नवीन काही शोधून काढणं एवढंच वैज्ञानिक दृष्टिकोनात अपेक्षित नसतं. तर्क, प्रयोग, निरीक्षण, अनुमान आणि प्रचिती या वैज्ञानिक दृष्टिकोनात अंतर्भूत असलेल्या पाच घटकांचा समावेश केवळ वैज्ञानिकी प्रयोगात नाही तर जीवनाच्या प्रत्येक बाबतीत करणं गरजेचं असतं. मात्र त्यासाठी आपण वैज्ञानिक संस्कृती रुजवणं, जोपासणं गरजेचं आहे. विज्ञान किंवा शास्त्र हे केवळ प्रयोगशाळेत करण्याची बाब नक्कीच नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात, लहान-मोठ्या सर्व बाबतींत त्याचा समावेश व्हायला हवा. अगदी कांदा कापणं, कोणताही खेळ खेळणं किंवा चित्र काढणं या सगळ्यात विज्ञान लपलेलं असतं. ते समजून घेतलं तर आपल्याला या प्रत्येक बाबीचा आनंद चांगल्या पद्धतीने घेता येतो.’ 

‘मानवानं स्वप्नं पाहिली, त्याचा पाठपुरावा केला म्हणून तर आजवरची प्रगती गाठणं त्याला शक्य झालं आहे. स्वप्नं बघत जा... आजची स्वप्नं... त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला पाठपुरावा हेच उद्याचं वास्तव असेल’ हा रॉबर्ट बॉयलच्या मृत्युपत्रातील दाखला देत पुस्तक आपल्याला शास्त्रज्ञांच्या शोधांच्या प्रवासाला घेऊन जातं. ज्या शास्त्रज्ञांच्या संशोधनांविषयीच्या गोष्टी यात सांगितल्या आहेत, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वैचारिक प्रवाहांचीही ओळख यात करून दिली आहे. यातले काही शास्त्रज्ञ दैववादी किंवा सश्रद्ध होते, काही अज्ञेयवादी होते, तर काही चक्क अंधश्रद्ध होते.. याचाही धांडोळा लेखक घेतो. या शास्त्रज्ञांचा वैयक्तिक वैचारिक पाया कोणता होता याविषयी सांगतानाच त्यांच्या सार्वजनिक भूमिकेवरही लेखक प्रकाश टाकतो. 

या पुस्तकात निरनिराळ्या शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे विचारही त्यांच्यावरील प्रकरणांत आपल्याला वाचायला मिळतात. ते विचार आणि लेखकाचे त्याविषयीचे भाष्य आपल्या विचारांना चालना देते. त्यातील काही नमुने इथे दिले आहेत. अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यातील लढवय्या कार्यकर्ता आणि शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो, "अज्ञानी असणं लाजिरवाणं नाही, मात्र शिकायची इच्छा नसणं हे लाजिरवाणं आहे." सतत शिकत राहण्याच्या या विजिगिषु वृत्तीमुळेच मानवी इतिहासातील वैज्ञानिक क्रांती, प्रबोधन युग घडले आहे याची प्रचिती त्याचे उद्गार देतात. शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन कष्टाचे महत्त्व सांगणाऱ्या मायकेल फॅरेडेबद्दल लेखक म्हणतो, ‘अर्धवट शालेय शिक्षण त्याच्या कल्पनेला कुंपण घालू शकलं नाही. चिकित्सा, चिकाटी आणि परिश्रम यांच्या साहाय्याने त्यानं विज्ञानात महत्त्वाची भर टाकली आहे. मनात इच्छा असेल तर व्यक्ती सर्व कुंपणं तोडून आपलं ध्येय कसं गाठू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मायकेल फॅरेडे.’ एडिसनशी स्पर्धा करून निकोला टेस्लाने एसी करंटचा शोध लावला. टेस्ला म्हणायचा, “काही नवीन शोधायचं असेल तर आधी स्वतःला वेळ द्या. गर्दीमध्ये नाही, तर एकटे असताना नवनव्या कल्पना सुचतात.” त्या काळातदेखील तीव्र असलेल्या वैज्ञानिक-व्यापारी संघर्षाविषयी टेस्ला म्हणतो, “ते माझ्या कल्पना चोरतात याचं मला दुःख नाही. या कल्पना त्यांना कशा सुचत नाहीत याचा मला खेद वाटतो.” शिल्पकला, चित्रकला, प्रयोगकला, संगीत या व इतर क्षेत्रांत गती असलेल्या लिओर्नाडोबद्दल लेखक म्हणतो, ‘संशोधकांसाठी आवश्यक असलेली एक वृत्ती म्हणजे डोक्यात आलेली कल्पना कागदावर उतरवणं. याबाबत विंचीला शंभरपैकी शंभर मार्क द्यावे लागतील. कारण त्यानं बनवलेली शेकडो अभियांत्रिकी डिझाईन्स तसेच शरीरशास्त्राचा अभ्यास करताना नोंदवलेली निरीक्षणं आज आकृती, चित्र किंवा सूत्रांच्या रूपात उपलब्ध आहेत.’ 

या पुस्तकाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या भारतीय शास्त्रज्ञांविषयी यात लिहिले गेले आहे. डॉ. शंकर आबाजी भिसे, नरिंदरसिंह कपानी, रुचिराम साहनी, वसंत खानोलकर, गिरींद्रशेखर बोस, डॉ. वामन कोकटनूर या शास्त्रज्ञांच्या कामावर या पुस्तकात दृष्टिक्षेप टाकलेला आहे. 

त्यातील, शंकर आबाजी भिसे यांच्याविषयीचा लेख उद्बोधक आहे. लहानपणी भारतीय वैज्ञानिकांच्या दर्जाबद्दलचे एक अपमानकारक वाक्य त्यांनी वाचले आणि त्यांचे आयुष्य बदलून गेले. भिसे फक्त संशोधक, व्यापारी नव्हते तर ते प्रबोधन करणारे एक समाजसुधारकही होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात अनेक देशभक्तांनी त्यांना संशोधनासाठी मदत केली होती. असे काही महत्त्वाचे संदर्भ या पुस्तकात मिळतात. ते वाचताना या विषयांवर आणखी ऐतिहासिक संशोधन व्हायला हवे असे वाटते. 

इंटरनेट सेवेचा जगभर वेगाने विस्तार करणाऱ्या फायबर ऑप्टिक्सचा शोध हा नारिंदर सिंह कपाणी यांनी लावला हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसते. त्यांच्याबद्दलचे या पुस्तकातील किस्से वाचणे हा एक सुंदर अनुभव आहे. या फायबर ऑप्टिक्समुळे एक्स-रे इमेजिंग, एन्डोस्कोपी, लाईट थेरपी आणि सर्जिकल मायक्रोस्कोपी यांसारख्या अनेक तपासण्या आणि शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. कपानी यांच्याविषयीच्या लेखात हांडे म्हणतात, ‘फायबर ऑप्टिक्समुळे आज माहितीचा प्रचंड साठा गतीने उपलब्ध होतो आहे. या सुविधेचा अधिक सर्जनशील वापर केला तर प्रत्येकाला आपल्याला आवडत्या विषयातील सर्वोत्तम माहिती वापरून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवता येईल. आपलं सांस्कृतिक भावविश्व समृद्ध करता येईल. पुढच्या पिढीला अधिक चांगला मानव म्हणून घडवता येईल.’ 

भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, पुरावनस्पतीशास्त्र, अणुशास्त्र यांसह अनेक विषयांवर संशोधन करणाऱ्या रुचिराम साहनी यांची प्रेरणादायी कथा यात आहे. विज्ञान प्रसार चळवळी, समाज परिवर्तन आणि देशाची बांधणी यांचा घनिष्ट संबंध असतो हे त्यांच्या कामाविषयी वाचताना लक्षात येते. ‘विज्ञान चळवळ ही जेव्हा लोकचळवळ होईल आणि जेव्हा ती शहरी भागातून ग्रामीण भागाकडे जाईल तेव्हा आपण भविष्यातील आव्हाने पेलायला तयार होऊ’, असे लेखक या लेखात सांगतो. 

कुष्ठरोग, प्रजननशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि कर्करोग यावर मूलभूत संशोधन करणाऱ्या वसंत खानोलकरांच्या दुर्लक्षित चरित्राचीही ओळख या पुस्तकात ओळख होते. खानोलकरांच्या कर्करोगाविषयी जे संशोधन झाले त्याबद्दल लेखक म्हणतो, ‘भारतातील बहुसंख्य कष्टकरी समाज तंबाखू चघळतो, या सवयीला कुपोषण, तोंडाची अस्वच्छता आणि रोजच्या आहारामध्ये जीवनसत्त्वांचा अभाव या सर्वांची जोड मिळते आणि कर्करोगाची शक्यता वाढते. याशिवाय बदलतं पर्यावरण, वाढतं औद्योगिकीकरण आणि नात्यांमधील विवाह हेदेखील कर्करोगाचं महत्त्वाचं कारण आहे.’ खानोलकरांच्या संशोधनाचा खूप फायदा भारतातील धोरणकर्त्यांना आणि आरोग्य व्यवस्थेला झाला आहे.

‘भारतामध्ये मानसिक आजार आणि उपचार यांची मोठी परंपरा आहे. (पण) भारतात मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर 1922 पासून सुरु झाला. गिरींद्रशेखर बोस यांनी या विषयावरच्या पाश्चात्त्य ज्ञानाला भारतीय तत्त्वज्ञानाची तसेच योगसाधनेची जोड दिली. केवळ औषधाचा मारा न करता आहार पद्धतीमध्ये बदल, अन्न घटकांत बदल करण्याचे सुचवले, त्यांत अभिनव प्रयोगही केले. एक मनोचिकित्सक आणि मानसशास्त्रज्ञ याबरोबरच ते एक कुशल मनोविश्लेषकसुद्धा होते.’ अशी नोंद भारतातील मनोविश्लेषक शाखेचे जनक गिरींद्रशेखर बोस यांच्याविषयी लेखक करतो.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षता सिद्धान्तांची मांडणी करून न्यूटनप्रणित भौतिकशास्त्राची पुनर्रचना केली. या शोधानांतर भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, आण्विक भौतिकशास्त्र, पुंज भौतिकशास्त्र (quantum physics) यांनी संपूर्ण जगात आधुनिक संशोधन युगाची सुरुवात केली. यामुळे अनेक पातळ्यांवर विज्ञानाने भरगोस प्रगती केली. विशेषत: पहिल्या महायुद्धानंतर ते दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या काळापर्यंत भौतिकशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पनाचे शोध या काळात लागले. विज्ञानाच्या अनेक शाखांवर या शोधांनी अभूतपूर्व प्रभाव टाकला. या सर्व प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या पॉल डिरॅक, मॅक्स प्लँक, नील्स बोहर, वर्नर हायजेनबर्ग, रिचर्ड फाइनमन या वैज्ञानिकांच्या आयुष्यातील गमतीशीर गोष्टींसह त्यांच्या शोधांचा प्रवाससुद्धा सांगितला आहे. 

हेडी लॅमोर ही एक अमेरिकन अभिनेत्री होती. आज काल आपले ज्यावाचून चालत नाही त्या ब्लुटूथ आणि वाय-फायचा शोध लावला. तिच्याविषयी रंजक माहिती सांगणारे एक प्रकरण पुस्तकात आहे. उत्क्रांतीविषयक संशोधन करणारे आणि विज्ञान प्रसारार्थ बऱ्याच संस्था उभ्या करणाऱ्या ज्युलियन हक्सले यांच्या प्रवासाबद्दल या पुस्तकात सांगितले आहे. भूल देणाऱ्या वायूचा शोध लावणाऱ्या होरेस वेल्स याच्याविषयीचे एक प्रकरणसुद्धा यात आहे. त्या प्रकरणात अनपेक्षितपणे पु.ल. देशपांडे यांचा संदर्भ येतो. पु.ल. म्हणाले होते, ‘तथाकथित अवतारी पुरुषांपेक्षा ज्या व्यक्तीने भूल देण्याचं औषध शोधून काढलं त्याचा मला आदर वाटतो.’  

लेखकाची काही सूत्रमय वाक्येदेखील आपल्याला अधिक विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. विशेषतः मुलांच्या विचारांमध्ये मुलभूत स्पष्टता येण्यासाठी ती मदत करतात. अशा विधानांचे काही नमुने इथे दिले आहेत. ‘विज्ञान नेहमी प्रश्न उपस्थित करायला शिकवतं. झापडं काढून बघायला शिकवतं. म्हणून वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास सोडता कामा नये आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आपण प्रेम केलं पाहिजे, त्याचा आपल्या जीवनातील सर्व बाबींमध्ये समावेश केला पाहिजे.’ (पृ. 123) ‘नवीन शोध लागताना जुने कालबाह्य होत असले तरी त्या त्या टप्प्यांवर त्या शोधांची मांडणी झालेली असते, म्हणूनच विज्ञान विकसित होत असतं.’ (पृ. 179) ‘कल्पना एखाद्या क्षणी जन्माला येते. मात्र त्यासाठी मूलभूत विज्ञानाचा पाय भक्कम असणं गरजेचं असतं. तसंच, ती कल्पना विकसित करायला संशोधनाचा कळस देखील आवश्यक असतो.’ (पृ. 203) 

वस्तूंची मोड-तोड करून काहीतरी करू पाहणाऱ्या खटपटी मुलांना “गप्प बसा” म्हणणारी आपली संस्कृती आता बदलत आहे. बरेच पालक मुलांना सुटीच्या काळात विज्ञान केंद्रात घेऊन जातात, विज्ञानाशी दोस्ती करण्यासाठी उपयुक्त खेळणी भेट देतात. या मुलांना विज्ञानाच्या आणि मानवी बुद्धीच्या अफाट अशा कर्तृत्वाची ओळख करून द्यायची असेल तर आपल्याला विज्ञानविषयक विविध संग्रहालये-प्रदर्शने, गंमती जमतीच्या स्पर्धा तसेच सहली, चर्चासत्रे इथे मुलांना नेण्याबरोबरच त्यांना सकस साहित्याचीसुद्धा ओळख करून दिली पाहिजे. त्यामुळेच आजकालच्या भाषेत हसत-खेळत विज्ञानाविषयी आणि शास्त्रज्ञांविषयी गप्पा मारणारी ‘सायंटिस्ट खोपडी’ म्हणूनच आपल्या साथीला हवीच! 

सायंटिस्ट खोपडी : बेलपासून नोबेलपर्यंत 
डॉ. नितीन हांडे 
New Era प्रकाशन, 2024 
पाने : 221, किंमत : 300 रुपये

- राहुल विद्या माने
nirvaanaindia@gmail.com 
लेखक, मुक्त पत्रकार आहेत.)

Tags: science book review rahul mane marathi books new era publication sadhana digital Load More Tags

Comments: Show All Comments

Badal tumsare

I am interested in it

Divya Rajkumar tumsare

I am interested in it

Arjun aware

छान लेख आहे

rahul mane

ज्यांना हे पुस्तक पाहिजे असेल त्यांनी लेखक Dr. नितीन हांडे यांच्याशी संपर्क करावा नंबर : 8956445357

Ketki Raut

मला हे पुस्तक हवे आहे ते कसे मागवता येईल.

Pramod Selokar

I want book.pls guide

Add Comment