लोकमान्य टिळकांचे मंडाले तुरुंगातील दिवस

1 ऑगस्ट : लोकमान्य टिळकांच्या 101 व्या स्मृतिदिनानिमित्त...

मंडाले तुरुंगात लोकमान्य टिळक | सौजन्य : Tilak Archive

23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असे 64 वर्षांचे आयुष्य लोकमान्य टिळक यांना लाभले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1956 मध्ये त्यांचे चरित्र लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय काँग्रेस समितीने घोषित केली. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक तीन पुस्तकांना विभागून दिला. त्यातील एक पुस्तक होते अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले इंग्रजी चरित्र. ते दोघेही त्यावेळी इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी वयाची पस्तिशी ओलांडली नव्हती. ते पुस्तक जयको पब्लिशिंग हाऊस, दिल्ली यांनी प्रकाशित केले. त्याला त्यावेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली. नंतर त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला नव्हता. म्हणून लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप आणि ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ, ही दोन निमित्तं साधून अवधूत डोंगरे यांनी केलेला प्रस्तुत अनुवाद साधना प्रकाशनाकडून आला आहे. त्यातील 'सार्वजनिक जीवनापासून दूर' या प्रकरणातील हा एक भाग.

लोकमान्य टिळक मंडालेमध्ये सार्वजनिक जीवनापासून दूर होते. दैनंदिन घडामोडींची व्यग्रता व गदारोळ त्यांच्या आसपास नव्हता. एकांत बंदीवासाच्या काळात कैद्याचं एक नवं जग निर्माण होतं. या जगामध्ये काळ गोगलगाईच्या वेगाने पुढे सरकतो, गुदमरवून टाकणारा एकसुरीपणा येतो आणि दडपून टाकणारा एकटेपणाही सहन करावा लागतो. कैद्याच्या जीवनाचा केवळ एक छोटा भाग या वस्तुनिष्ठ वर्णनातून मांडलेला आहे. संपूर्ण सत्य समजून घेण्यासाठी संबंधित कैद्याची मन:स्थिती व प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं असतं. ‘मन स्वतःच्या मर्जीचं मालक असतं, ते स्वर्गाचा नरक करू शकतं आणि नरकाचा स्वर्ग करू शकतं,’ ही मिल्टन यांच्या कवितेतली ओळ तुरुंगात खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अवतरते. टिळकांच्या वैयक्तिक जीवनाचा धांडोळा घेण्यासाठी त्यांनी तुरुंगातून पाठवलेल्या पत्रांचा विचार आपण करू शकतो, पण तिथेही त्यांचा मितभाषीपणा कायम असल्याचं दिसतं. स्थितप्रज्ञ मनोवृत्तीमुळे ते वैयक्तिक भावभावनांपासून अलिप्त राहत असत. सगळ्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांनाही अर्थातच या भावना स्पर्श करून जात असतील. तुरुंगामध्ये राजकीय जीवनातील व्यग्रतेपासून दूर असताना कोणाही व्यक्तीने अधिक व्यक्तिनिष्ठ, वैयक्तिक व काहीसं हळवं होणंही स्वाभाविक वाटतं. परंतु, टिळकांच्या तात्त्विक स्वभाववृत्तीमुळे त्यांना कल्पनांचं जग निर्माण करून वैयक्तिक सुख-दुःख त्यात मिसळून टाकणं शक्य होत असे. या कल्पना त्यांच्या आत्म्याला होणारे क्लेश कमी करत असत आणि त्यांना व इतरांनाही कृतीचा मार्ग दाखवत. तुरुंगात असताना ते क्वचितच स्वतःबद्दल काही बोलल्याचं दिसतं. त्यामुळे तुरुंगातील त्यांच्या जीवनक्रमाबद्दल फारसं काही ज्ञात नाही. भावी पिढ्यांच्या सुदैवाने तुरुंगात टिळकांचा एक नम्र चरित्रकार होता- या चरित्रकाराने अपेक्षेपेक्षा खूपच मोठी कामगिरी केली.

सातारा जिल्ह्यातून आलेले एक कैदी वासुदेव रामचंद्र कुलकर्णी जवळपास दोन वर्षं टिळकांचे आचारी म्हणून काम पाहत होते. टिळकांच्या आठवणींचं संकलन करणारे सदाशिव विनायक बापट यांच्या आग्रहाखातर कुलकर्ण्यांनी टिळकांच्या मंडालेतील दिनक्रमाची उत्कृष्ट हकिगत नोंदवली आहे. कुलकर्णी शिक्षित नव्हते आणि लेखनकलेतही त्यांना गम्य नव्हते, तरीही त्यांनी ही हकिगत आश्चर्यकारक रीत्या उत्कृष्टपणे नोंदवली आहे. त्यांची टिळकभक्ती आणि या थोर माणसाची सर्वतोपरी सेवा करण्यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यांमुळे त्यांच्या साध्या व अनलंकृत वृत्तान्ताला अनन्यसाधारण मौलिकता प्राप्त झाली आहे. कुलकर्णी लिहितात : ‘एके रात्री मला येरवडा तुरुंगातून अचानकपणे उचलण्यात आले. मला कोठे नेत आहेत, याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. मला मद्रासला नेण्यात आले आणि तिथे जहाजातून समुद्रापार नेले, तरीही माझा अंतिम ठावठिकाणा कोणता आहे याबद्दल मला काही कळू शकले नाही... रंगूनहून मला थेट मंडालेच्या तुरुंगात नेण्यात आले. मंडाले किल्ल्याच्या वायव्य कोपऱ्यामध्ये मंडालेचा तुरुंग आहे. सुरुवातीला मला एका स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले. सामाइक स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात अन्न शिजवण्याची आणि जेवणाचे ताट टिळकमहाराजांना नेऊन देण्याची सूचना मला करण्यात आली. तुरुंगात कैदी म्हणून येण्यापूर्वी मी टिळकमहाराजांना पाहिलेले नव्हते, त्यामुळे आता त्यांना पाहिल्यावर मला खूप संतोष वाटला. काही दिवस ही व्यवस्था सुरू राहिली. दरम्यान, आपला आचारी आपल्यासोबतच असावा, अशी मागणी टिळकमहाराज सातत्याने करत होते. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मी त्यांच्या सोबत राहण्यास गेलो. टिळकमहाराजांना पहिल्या मजल्यावरील कोठडीत ठेवण्यात आले होते. ही 20 बाय 12 फुटांची खोली होती आणि उर्वरित बराकीपासून लाकडी भिंत घालून ती वेगळी करण्यात आली होती. तसेच सभोवती विटांच्या उंच भिंती घालून बराकीच्या कंपाउंडपासूनही ती वेगळी करण्यात आली. महाराजांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, ती मुळात गोऱ्या कैद्यांच्या वापरासाठीची होती. खोलीभोवतीचे आवार सुमारे 150 फूट लांब व 60 फूट रुंद होते. त्यात काही आंब्याची व निंबाची झाडे होती. टिळकमहाराजांना केवळ या आवारातच प्रवेश करण्याची मुभा होती. आवाराचे कुलूप दिवसरात्र लावलेले असे. जेलर स्वतः जातीने रात्री कोठडीचे कुलूप लावून जात असे. तळमजल्यावर आम्हाला वरच्या कोठडीइतकीच जागा होती. तिथे अंघोळ, स्वयंपाक इत्यादींसाठी तजवीज करण्यात आली होती. उर्वरित बराकींप्रमाणे आमच्या कोठडीलाही पिंजऱ्यात असतात तसे दोन लाकडी गज लावलेले होते. टिळकमहाराजांच्या कोठडीत एक टेबल, दोन खुर्च्या, एक आरामखुर्ची, एक लोखंडी खाट आणि पुस्तके ठेवण्यासाठी दोन कपाटे होती. महाराजांना सातत्याने बरीच पुस्तके लागत असत. त्यांना त्यांचा नेहमीचा पोशाख- धोतर, पकडी, सदरा, पुणेरी चपला- घालण्याची परवानगी होती. या गोष्टींसोबतच एक कंदील व पलंग इत्यादी वस्तू त्यांच्या कोठडीत होत्या. स्वयंपाकघरात आवश्यक भांडी, लाकडी बाकडे आणि वस्तू ठेवण्यासाठी एक वा दोन टोपल्या होत्या. हे सर्व महाराजांना स्वतःच्या खर्चाने विकत घ्यावे लागले. परंतु, तुरुंगाच्या अधीक्षकाने मंजुरी दिल्याशिवाय आम्हाला काहीही मिळत नसे.

‘महाराजांचा दिनक्रम पुढीलप्रमाणे होता : ते पहाटे लवकर उठत, दात घासून झाल्यावर संस्कृतमधील काही मंत्रांचे पठण करत. मग ते त्यांच्या पलंगावर ध्यानधारणा करण्यासाठी सुमारे दीड तास बसायचे. इतका वेळ ते कशाचे चिंतन करायचे, हे ईश्वरास ठाऊक! मग ते त्यांचे प्रातर्विधी उरकत. यासाठीची व्यवस्था पुरेशी स्वच्छ होती. यादरम्यान मी त्यांच्यासाठी दात घासण्याची पावडर, पाणी (हिवाळ्यात गरम पाणी), टॉवेल इत्यादी गोष्टी तयार ठेवत असे. ते माझे मालक होते आणि मला त्यांच्या सेवेसाठी नेमलेले होते. पण मी हे सर्व करत असताना ते शरमल्यासारखे वाटत. एकदा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही बंदी आहात, तसाच मीही आहे. माझ्यासाठी तुम्ही इतकी तसदी घ्यायची जरुरी नाही. मला हे आवडत नाही. शिवाय, यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो.’’ परंतु, मी त्यांच्या या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही आणि माझी सुटका होईपर्यंत सर्व काही नेहमीच्या काटेकोरपणाने करत राहिलो. त्यानंतर ते चहा घेत आणि मग लेखन-वाचनात गढून जात. नऊ वाजता ते अंघोळीसाठी खाली येत. मी त्यांचे धोतर घडी घालून तयार ठेवत असे, हेही त्यांना आवडायचे नाही. स्वयंपाकघराचा एका कोपरा अंघोळीसाठी मोकळा ठेवलेला होता, तिथे ते अंघोळ करत. अंघोळीसाठी त्यांना भरपूर आणि अतिशय स्वच्छ पाणी लागत असे. आजारी असतानादेखील ते कोणालाही स्वतःच्या शरीराला स्पर्श करू देत नसत. त्यांना अशा स्पर्शाचा तिटकारा वाटत असे. ते दर आठवड्याला हजामत करत, पण एकदाही त्यांनी अंगाला तेल लावलं नाही. सुरुवातीला कोणी कैदी त्यांची हजामत करून देत असे. पण त्यासाठी वापरली जाणारी हत्यारे अगदीच खराब दर्जाची होती आणि त्या कैद्याला हे कामही फारसे जमत नव्हते. त्यामुळे टिळकांनी या व्यवस्थेबद्दल तक्रार केली आणि हजामतीसाठी न्हावी द्यावा, अशी मागणी केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली. प्रत्येक वेळी हजामतीसाठी त्यांना स्वतःच्या खिशातून एक रुपया खर्चावा लागत होता. एकदा ते म्हणाले, ‘‘आपले संस्थानिकसुद्धा हजामतीवर इतका खर्च करत नाहीत. पण मी काय करू? मला मधुमेह आहे, त्यामुळे अशा बाबतीत मी खर्चात कपात केली, तर मला गंभीर संकटाला सामोरे जावे लागू शकते.’’ हिवाळा सोडता बाकीचे दिवस ते थंड पाण्याने अंघोळ करत आणि उन्हाळ्यामध्ये दोनदा अंघोळ करत. एक ब्रह्मदेशी कैदी त्यांचे कपडे धूत असे. तो अतिशय आस्थेने हे काम करायचा... अंघोळीनंतर कपाळावर काही तरी लावण्याची टिळकांची सवय होती, त्यामुळे काही वेळा ते चिमूटभर राख मागत. नंतर आम्ही थोडेसे चंदन आणले. सुरुवातीला ते दैनंदिन पूजा-अर्चा केवळ नाममात्र स्वरूपात करत होते. पण एकदा ते मला म्हणाले, ‘‘इथे माझ्या हाताशी बराच वेळ आहे. पुण्यासारखी इथे घाई-गडबड नाही. पुण्यात मला जेवायलाही फुरसत मिळत नव्हती! त्यात आम्ही ब्राह्मण! त्यामुळे आपण इथे आहोत तोवर प्रसाद ठेवल्याशिवाय आणि गायत्री मंत्राचे पठण केल्याशिवाय अन्नग्रहण करायचे नाही, असे मी ठरवले आहे.’’ ही पद्धत आम्ही न चुकता पाळली.

‘सुरुवातीला महाराजांना दिवसातून एकदा भात दिला जात होता, एकदा पीठ व डाळी दिल्या जात होत्या. काही दिवसांनी तुरुंगाच्या महानिरीक्षकाच्या आदेशावरून दर आठवड्याला त्यांना काही फळेही देण्यात येऊ लागली. कालांतराने सर्व निर्बंध शिथिल झाले आणि महाराजांच्या मागण्यांनुसार त्यांना गोष्टी दिल्या जाऊ लागल्या. महाराजांना पुण्याहून लोणची, पापड, मसाले इत्यादी मागवायलाही परवानगी देण्यात आली. उन्हाळ्यात हापूस आंबाही मागवण्यात येत होता. परंतु, सर्व गोष्टी आमच्यापर्यंत पोचण्यापूर्वी त्यांची कसून छाननी केली जात असे. मी दर दिवशी महाराजांसाठी भात, रोटी, भाजी व चटणी असे जेवण तयार करत होतो. त्यांना वाढलेले सर्व अन्न ते संपवत, पण मुळातच थोडेसे अन्न घेत. जेवताना ते अन्नाकडे फारसे लक्ष देत नसत. पुस्तक लिहायला सुरुवात केल्यावर ते पूर्णतः त्यातच गढून गेलेले असायचे आणि मी चटणीत मीठ घालायचे विसरल्याचेही त्यांच्या लक्षात यायचे नाही. मी खायला बसलो, तेव्हा ही चूक माझ्या लक्षात आली. काम संपल्यावर मी वर गेलो आणि हात जोडून, मान खाली घालून शरमेने त्यांच्यासमोर उभा राहिलो. मी इतका का शरमून गेलोय, हे त्यांना कळले नाही. मी त्यांना म्हणालो, ‘‘कृपया मला माफ करा. तुमच्या चटणीत मीठ घालायचे मी विसरलो.’’ यावर ते हसून म्हणाले, ‘‘मीठ नसल्याचे माझ्या लक्षातही आले नाही. आणि कशातच मीठ नसते, तरी मी ते मनावर घेतले नसते. त्यामुळे माफ करण्यासारखे काही नाही. तसेही क्वचित प्रसंगी असे घडल्यास त्याची एवढी फिकीर कशाला?’’ सकाळचे भोजन झाल्यानंतर ते काही वेळ खोलीतच येरझारा घालत आणि मग पुन्हा लेखन-वाचनाला सुरुवात करत. एक क्षणभरही ते रिकामे बसल्याचे मला दिसले नाही. ते लेखन-वाचनात इतके गढून गेलेले असत की, मी त्यांच्याशी काही बोललो तरी त्यांना ऐकू जात नसे. दुपारी दीड वाजेपर्यंत ते काम करत. मंडालेमध्ये उष्णता खूप होती, त्यामुळे दररोज दुपारी दीड वाजता ते लिंबू सरबत पीत असत. भूक लागली असेल, तर ते साखर घातलेले दूध घ्यायचे किंवा काही फळे खायचे. या वेळामध्ये ते माझ्याशी तपशिलात बोलत असत. त्यांच्याइतके ज्ञान असणारेच खूपच कमी लोक आहेत. रोज ते मला काही ना काही नवी गोष्ट सांगायचेच. आता या गोष्टीला सोळा वर्षे उलटून गेली आणि वयोमानामुळे मला त्यातले फारसे काही आठवत नाही. हा सुमारे पाऊण तासाचा वेळ अत्यंत सुखद असे. मग ते पुन्हा त्यांच्या कामाला लागायचे आणि मी माझ्या. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला आमचे जेवण आटपावे लागायचे. तुरुंगाच्या नियमांनुसार सहाचे ठोके पडल्यावर आमच्या कोठड्यांना तत्काळ कुलपे लावली जात आणि बारा तास आम्हाला त्या लहानशा कोठडीत घालवावे लागत असत... आम्ही वर जायचो तेव्हा ते मला तुकाराममहाराज, ज्ञानोबा, एकनाथ, रामदासस्वामी, श्रीकृष्ण, राम, शिवाजीमहाराज आणि कौरव-पांडवांच्या गोष्टी सांगायचे. दासबोध व तुकारामगाथा यांमधील अर्थ सांगायचे. काही वेळा ते पेशव्यांच्या किंवा इंग्रजांच्या गंमतीशीर गोष्टीही सांगत. त्यांच्याकडे जगाचा नकाशा होता. ते हा नकाशाही समजावून सांगायचे. पण मी एक अडाणी निरक्षर कुलकर्णी होतो. माझ्या संथ मेंदूला ते काय सांगत आहेत, हे फारसे कळायचे नाही. असे आमचे दोन तास जायचे. मग ते हात-पाय धुऊन पहाटेप्रमाणे सुमारे तासभर ध्यानधारणेच्या स्थितीत बसत. त्यांची ध्यानधारणा सुरू असताना मी पूर्णपणे स्तब्ध बसून राहायचो. ही समाधी झाल्यावर ते शांतपणे झोपायचे.

‘त्यांचा दिनक्रम असा होता. तुरुंगात दोन वर्षे झाल्यानंतर त्यांचा मधुमेह खूप वाढला... ते रोज औषधे घ्यायचे, पण काही सुधारणा होत नव्हती आणि त्यांची ताकद कमी होऊ लागली. मग त्यांनी पुण्याप्रमाणे इथेही आहारात पथ्य पाळायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तुरुंग अधीक्षकाला कळवले. त्यांच्या आहारात इतर अन्नधान्यांऐवजी केवळ सातूचा समावेश करायचा होता. तुरुंग अधीक्षकाने यासाठी परवानगी दिली आणि तांदूळ, गहू व डाळी यांऐवजी टिळकमहाराजांना सातू आणि पुरेसे दूध व तूप दिले जाऊ लागले. या पथ्यामुळे साखरेचे प्रमाण एका पंधरवड्यात चांगल्यापैकी खाली आले. त्यानंतर त्यांनी हाच आहार सुरू ठेवला. दृढनिश्चयी माणसांनाही अन्नावरील वासना नियंत्रणात ठेवणे खूप अवघड जाते, पण महाराजांनी त्यांच्या चवीवरही विजय मिळवला होता, याची मला खात्री पटली. यानंतर ते सातूचे पीठ, खोबरे व तूप यांनी तयार केलेल्या पुऱ्या खात असत. त्यासोबत ते दही घेत. त्यांना घट्ट व आंबटसर दही आवडायचे. ते म्हणत, ‘‘मी कोकण्या आहे. मला आंबट गोष्टी आवडतात.’’ सुरुवातीला मी त्यांच्यासाठी पालेभाज्या केल्या, तेव्हा त्यांना त्या खूप आवडल्या. ते म्हणाले, ‘‘धोंडू आणि माझी मुले यावर ताव मारतील. पण हे खाण्यासाठी त्यांना मंडालेला सहा वर्षे घालवावी लागतील.’’!’

कुलकर्णींच्या भावना उचंबळून आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना पुढील घटनाक्रम आठवत नव्हता. म्हणून ते लिहितात : ‘आता मी आठवतील तशा गोष्टी लिहितो.

‘मी शिक्षा भोगणारा अपराधी होतो, त्यामुळे मला तुरुंगातील गणवेश घालावा लागत असे. आचारी म्हणून मला इतर कैद्यांच्या तुलनेत कमी काम पडते, असे तिथला पारशी तुरुंग अधीक्षक म्हणाला आणि त्याने माझ्यावर आणखी काम लादले. त्या वेळी महाराजांनी माझी बाजू ताकदीने मांडली. ते म्हणाले, ‘‘मुळात त्याला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली नसतानाही तुम्ही इथे आणले, ही पहिली चूक. आता त्याला इथल्या तुरुंग नियमांप्रमाणे सुविधा न देणे हा त्याच्यावर आणखी अन्याय नाही का?’’ यामुळे मला तत्काळ वॉर्डर करण्यात आले, आणि मला कैदेच्या कालावधीतून दीड वर्षाची सूटही मिळाली.

‘महाराजांना वाचनाची प्रचंड आवड होती. मी तिथे असताना त्यांच्याकडे पुण्याहून आणलेली अनेक जाडजूड पुस्तके होती. ते दिवसरात्र या पुस्तकांमध्ये गढलेले असत. पण या सर्व पुस्तकांमध्ये एक कपटाही राजकारणाशी संबंधित नव्हता. त्यांना मराठी अथवा इंग्रजी मासिकांचे एकही पान दिले जात नसे, कोणतेच वर्तमानपत्रही दिले जात नव्हते. एका वेळी ते स्वतःपाशी चारच पुस्तके ठेवू शकतील, असा आदेश देण्यात आला होता. या वेळी त्यांनी ब्रह्मदेशाच्या सरकारकडे अर्ज केला. आपण एक पुस्तक लिहीत आहोत, त्यामुळे संदर्भाची सर्व पुस्तके स्वतःपाशी ठेवण्याची परवानगी दिली जावी, असे त्यांनी अर्जात नमूद केले होते. मग आधीचा आदेश रद्द झाला आणि त्यांना त्यांची सर्व पुस्तके परत मिळाली. पण प्रत्येक पुस्तकातील पानांची संख्या मोजली जात असे. ही पानसंख्या मुखपृष्ठावर लिहिली जायची, त्यावर अधीक्षक सही करायचा आणि मग ती पुस्तके महाराजांच्या हवाली केली जात.

‘मंडालेतील प्रचंड गर्मीमुळे महाराज अत्यंत अस्वस्थ होत. उष्णतेमुळे त्यांच्या अंगावर फोड उठले होते. त्यामुळे त्यांनी मुंबई सरकारकडे अर्ज केला आणि आपल्याला अंदमानात पाठवले जावे आणि आवश्यक जातमुचलका दिल्यानंतर मुक्तपणे फिरण्याची मुभा असावी, अशी त्यांनी विनंती केली. ही विनंती फेटाळण्यात आली. त्यांना याबद्दल कळल्यावर आधी ते थोडे नाराज झाले, पण मग शांतपणे म्हणाले, ‘‘ठीक आहे. मला तुरुंगात मृत्यू यावा, अशी ईश्वराची इच्छा दिसते आहे.’’

‘महाराजांनी मधुमेहामुळे पथ्य सुरू करण्यापूर्वी त्यांना अतिशय चांगल्या दर्जाचा भात दिला जात असे आणि मला सर्वसामान्य कैद्यांना मिळणारे अन्नधान्य दिले जात होते. परंतु, महाराजांनी त्यांना मिळणाराच भात मी खावा, अशी सक्त ताकीद दिली होती. मला त्यांच्यातील अन्न मिळावे यासाठी ते स्वतः पुरेसे खात नसत, असे मला वाटले. यामुळे मला खूप अवघडल्यासारखे व शरमल्यासारखे वाटले. खरे तर मला अपराधीच वाटत होते.

‘...‘‘मला दूध आणि फळे मिळतात. तुम्ही तो खराब भात खात जाऊ नका. तुम्हाला तो पचणार नाही आणि तुम्ही आजारी पडाल’’, असे ते मला म्हणाले होते. त्यानंतर मला देण्यात येणारे अन्नधान्य ते चिमण्यांना भरवू लागले. असे काही दिवस सुरू राहिल्यावर चिमण्या धीट झाल्या आणि खोलीत येऊन पुस्तकांवर व टेबलावर बसू लागल्या. कधी महाराज जेवत असताना त्यांच्या ताटाभोवतीही त्या गोळा होत. चिवचिव करत त्या माश्यांसारख्या महाराजांच्या अंगावरही बसत... एकदा या चिमण्या महाराजांच्या खोलीत जमल्या असताना अधीक्षक आला आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. महाराज त्याला म्हणाले, ‘‘आम्ही त्यांना खात नाही. आम्ही त्यांना घाबरवत नाही. उलट, काही वेळा आम्ही त्यांना धान्य देतो. आम्ही विषारी जीवांबद्दलही मनात अढी ठेवत नाही आणि तेही आम्हाला भीत नाहीत.’’ साहेबाला या बोलण्याचे बरेच आश्चर्य वाटले.

‘महाराज लेखनापेक्षा वाचनात अधिक वेळ घालवत; पण त्यांचा त्याहून अधिक वेळ विचार करण्यात जात असे- सुपारी खात डोळ्यांची उघडझाप करत ते खुर्चीत बसून असायचे. ‘‘तुम्ही सतत कशाचा विचार करत असता?’’ असे मी त्यांना एकदा विचारले. ते हसून म्हणाले, ‘‘माणसाच्या मस्तकामध्ये संपूर्ण विश्व असते आणि या विश्वाची खळबळ मेंदूमध्ये सुरू असते.’’ एकदा ते म्हणाले, ‘‘मी शालेय विद्यार्थी आहे. ही खोली म्हणजे माझी शाळा. हे ग्रंथ म्हणजे माझे शिक्षक. जेलर म्हणजे शाळेतला शिपाई, तर तुम्ही माझे खेळगडी. इथे मी जर्मन, फ्रेंच, पाली व इतर काही भाषा शिकतो. सुटका झाल्यावर माझी जर्मनीला जायची इच्छा आहे. तिथेही तुम्ही माझ्यासोबत आचारी म्हणून याल का?’’ एकदा महाराजांना मराठीत काही तरी लिहायचे होते. त्या वेळी ते मी लिहून घ्यावे, असे त्यांना वाटले. पण ते लगेचच म्हणाले, ‘‘नको. तुम्ही माझ्यासाठी हे कष्ट करावेत, असे मला वाटत नाही. तुमच्याकडे आधीच पुरेसे काम आहे. माझे काम मीच मार्गी लावेन.’’

‘तीन महिन्यांतून एकदा महाराजांना बाहेरच्या व्यक्तींशी बोलण्याची परवानगी होती; पण त्यांचे नातेवाईक वगळता कोणालाही भेटण्यासाठी त्यांनी ही सुविधा वापरली नाही. एकदा अमरावतीहून श्रीमंत खापर्डे आणि रंगूनहून श्री. विजापूरकर त्यांना भेटायला आले होते. त्यांचे भाचे बाबासाहेब विद्वांस अधून-मधून येत असत. या मुलाखतीवेळी तुरुंगाधिकारी उपस्थित असायचा. बाबासाहेबांशी बोलणे झाले, त्या दिवशी महाराज अतिशय आनंदी होते. त्यांना पुण्यातील कुटुंबीयांना महिन्यातून एक पत्र लिहिण्याची परवानगी होती आणि त्यांच्याकडे महिन्याला एक खासगी पत्र आलेले चालत असे. पण पत्रात कौटुंबिक घडामोडींव्यतिरिक्त काही असेल, तर त्यावर तत्काळ काट मारली जात असे. महाराजांनाही वैयक्तिक माहिती सोडून काहीही लिहायला बंदी होती. एकदा त्यांनी एक दीर्घ पत्र लिहिले, पण तुरुंगाधिकाऱ्याला त्यातील एका शब्दाबद्दल शंका आली आणि त्याने त्यांना नवे पत्र लिहायला सांगितले. त्या वेळी महाराज संतापून म्हणाले, ‘‘गुलामी सर्वार्थाने वेदनादायक असते.’’

‘मी त्यांना कायम ‘‘महाराज’’ म्हणत असे, हे त्यांना अजिबात आवडायचे नाही.

‘काही वेळा सरकारी अधिकारी महाराजांना भेटण्यासाठी येत असत. एकदा कलेक्टर, अधीक्षक, तुरुंगाधिकारी यांच्यासोबत ‘xxx’ हे अधिकारी महाराजांना भेटायला आले. मी कैद्याच्या वेशात आवारामध्ये उभा होतो. तुरुंगाधिकारी सोडून बाकीच्यांना मीच टिळक आहे असे वाटले. त्यांनी टोप्या काढल्या आणि ‘‘गुड मॉर्निंग’’ असे म्हणाले. मी हात जोडत मान तुकवली आणि हिंदीत त्यांना सांगितले की, मला इंग्रजी येत नाही. टिळकमहाराज तिकडे असल्याचे मी खुणेने त्यांना सांगितले. इतक्यात महाराज त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने खाली आले आणि सर्व जण झालेल्या चुकीबद्दल हसले. मग सर्व जण वर जाऊन बराच वेळ बोलत होते. महाराजांना जर्मनचे चांगले ज्ञान असल्याचे ‘xxx’ ना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘मी माझ्या मुलीला जर्मन शिकवले आहे. तुम्ही कृपया तिची परीक्षा घ्याल का?’ महाराजांनी यासाठी संमती दर्शवली. ‘xxx’ आणि महाराज यांच्यातील या जिव्हाळ्याने तुरुंगाधिकाऱ्याला मत्सर वाटू लागला. त्याला असे वाटले की, संबंधित व्यक्तीला खूश करण्यासाठी टिळक त्याच्या मुलीच्या ज्ञानाची स्तुती करतील. परंतु, ‘xxx’ दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन आले, तेव्हा टिळकांनी तिची परीक्षा घेतली आणि तिचे ज्ञान पुरेसे नसल्याचे लक्षात आल्यावर तसे स्पष्टपणे सांगितले. तुरुंगाधिकारी आणि अधीक्षक दोघांनाही या प्रसंगी आश्चर्य वाटले.

‘महाराजांची तब्येत निःसंशयपणे धडधाकट होती. मी तीन वर्षे त्यांच्यासोबत होतो, पण वय वाढत गेल्यावरही या काळात ते फक्त एकदा वा दोनदा आजारी पडले. एकदा त्यांना पटकीसारखा कोणता तरी आजार झाला. त्यांना दोन-तीनदा शौचास झाले आणि उलटीही झाली. त्या वेळी ते खूप थकले होते, पण तरीही मला त्यांनी स्वतःच्या अंगाला स्पर्श करू दिला नाही. तुरुंगाधिकाऱ्याने डॉक्टरला बोलावून त्यांना औषधे दिली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांची बरीच काळजी घेतली. मी अनेकदा आजारी पडलो, तेव्हा महाराज वडिलांप्रमाणे माझी काळजी घेत असत. मला तुरुंगातील दवाखान्यात पाठवण्याची अधिकाऱ्यांची इच्छा असायची, पण महाराज मला स्वतःसोबत ठेवून माझी शुश्रूषा करायचे! अशा वेळी ते माझ्यासाठी अन्नही शिजवत. माझे जेवून झाल्याशिवाय ते जेवत नसत. वास्तविक ते माझे मालक होते, पण त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी माझी तीन वर्षे काळजी घेतली. मला सक्तमजुरीची शिक्षा झालेली होती, त्यामुळे मला कोणतीही सुविधा मिळत नसे. पण महाराज मला चहा देत, त्यांच्या जेवणातील वाटा मला देत, माझ्याशी समपातळीवरून बोलत, त्यांच्या न्हाव्याकडून माझीही हजामत होईल असे पाहत. रक्ताच्या नातलगाहून अधिक काळजीपूर्वक माझी शुश्रूषा करीत आणि माझ्या सुटकेसाठी त्यांनी कायदेशीर प्रयत्नही केले. या शेकडो गोष्टी आठवल्या की, माझ्या मनात भावना दाटून येतात, माझे डोके गरगरते आणि काय बोलावे ते सुचत नाही.

‘मंडालेच्या तुरुंगात पटकीची साथ पसरली, तेव्हा महाराजांना व मला मिक्टिला तुरुंगात नेण्यात आले. मंडालेच्या तुरुंगातून स्टेशनवर जाईपर्यंत दोन्ही बाजूंनी सशस्त्र रक्षक होते. पण गाडी स्टेशनावर पोचली, तेव्हा तिथे प्रचंड गर्दी जमलेली होती आणि लोक ‘‘टिळकमहाराज की जय’’ अशा घोषणा देत होते. त्यांना गुप्तपणे एका विशेष घोडागाडीतून मिक्टिलाला नेण्यात आले. तिथेही शेकडो लोक जमून ‘‘टिळकमहाराज की जय’’ अशा घोषणा देत होते. महाराज त्या तुरुंगात पोचले, तेव्हा तिथल्या तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही कोणत्या देशावर राज्य करत होतात?’’ महाराज म्हणाले, ‘‘मी स्वतःच्या शरीराचाही मालक उरलेलो नाही. मग माझे कोणते राज्य असणार आहे?’’

‘मी मंडालेला गेलो त्यानंतर दहा-बारा दिवसांनी, स्वयंपाक करत असताना मला माझ्या पत्नीची व मुलांची आठवण आली आणि मी खूप अस्वस्थ झालो. मी अशा मन:स्थितीत असताना उकळत्या पाण्याची पातेली कलंडली आणि पिठात पाणी सांडले. खूप भीती वाटून मी रडू लागलो. आता मी महाराजांना खाण्यासाठी काय देऊ, हे काहीच मला सुचेना. महाराज याबद्दल तुरुंगाधिकाऱ्याला सांगतील तेव्हा मला शिक्षा होईल, याची मला भीती वाटत होती. अशातच महाराज स्वयंपाकघरात आले, तिथे काय घडले हे त्यांनी पाहिले. यात काही चूक झाली आहे, असे त्यांनी अजिबात दाखवले नाही. पाकासारखे झालेले पीठ त्यांनी शांतपणे एका कापडावर घेतले आणि पाणी कापडात शोषले गेल्यावर मी त्या पिठाची भाकरी केली. महाराजांनी तीही आनंदाने खाल्ली. या प्रसंगीही ते चिडले नाहीत. किंबहुना, ते इतरही एखाद्या वेळी चिडल्याचे मला आठवत नाही.

‘मला शिक्षेतून दोन वर्षांची सूट मिळाली. आता मला मंडालेहून हलवण्याची शक्यता होती. मग मी महाराजांना म्हणालो, ‘‘आधीप्रमाणे आताही आपण माझी बाजू मांडावी आणि आणखी दोन वर्षे आपल्यासोबत इथे राहण्याची परवानगी मिळवून द्यावी.’’ महाराजांनी मला असे विचार करण्यापासून परावृत्त केले, यासंबंधीचा कायदा समजावून दिला आणि आता मी माझ्या कुटुंबामध्ये जावे यासाठी माझे मन वळवले. त्यांनी मला आशीर्वाद देऊन माझा निरोप घेतला. मी त्यांना सोडून निघालो, तेव्हाच्या माझ्या भावना कशा व्यक्त करू? मी त्यांच्या कुटुंबीयांना काय सांगावे, असे मी त्यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, ‘‘इथे सगळे ठीक आहे, असे त्यांना सांगा.’’ त्यांचे कुटुंबीय माझ्यावर कसा विश्वास ठेवतील, असे मी त्यांना विचारल्यावर त्यांनी काहीच दिवसांपूर्वी पडलेला त्यांचा दात मला दिला आणि म्हणाले, ‘‘हा दात धोंडूला दाखवा, म्हणजे मग कोणीही तुमच्यावर शंका घेणार नाही...’’ मंडालेहून मला पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर माझ्या गावासाठीचे तिकीट काढून मला एम.एस.एम. ट्रेनमध्ये बसवण्यात आले. ‘‘गायकवाड वाड्याकडे गेलास तर लक्षात ठेव!’’ अशी ताकीदही मला देण्यात आली. मग मी माझ्या गावी गेलो, पण नंतर पुण्याला परत आलो आणि महाराजांच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटलो. त्यांना, खासकरून महाराजांच्या पत्नींना सर्व काही सांगितले... महाराजांची सुटका झाल्यानंतर मी त्यांनाही भेटायला गेलो होतो. तिथे त्यांनी मला घरी राहण्याचा आग्रह केल्यावर मी तिथेच राहिलोदेखील... त्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. तपश्चर्या केल्यानंतरही कोणाला अशी संधी मिळणार नाही. या सेवेमुळे मला भौतिक पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवरही बराच लाभ झाला. तुरुंगवासाची शिक्षा हा माझ्या चारित्र्यावरील कलंक होता, पण एका संताच्या साहचर्यामध्ये पवित्र गंगेत स्वतःला शुद्ध करायचे सुदैव मला लाभले. मी कृतकृत्य झालो.’

‘राजकारण म्हणजे मुखवटे टिकवण्याचा खेळ असतो,’ असं एका लेखकाने म्हटलं आहे. टिळकांच्या राजकीय स्वरूपामध्ये पारदर्शक प्रसन्नता होती. त्यांच्या कठोर टीकाकारांनीही त्यांच्यावर मुखवटे घातल्याचा आरोप केला नाही. टिळकांच्या राजकीय कृत्यांमधून त्यांच्या भावभावनांबद्दल फारसं काही कळत नाही, हे आधी नमूद केलं आहेच. त्यांच्या भाषणांमध्ये व लेखनामध्ये वैयक्तिक भावनांचा अभाव ठळकपणे जाणवतो. त्यांना खासगी जीवन असं फारसं नव्हतं. पोटच्या मुलाचा मृत्यू झाला, तेव्हा अशा आपत्तीच्या वेळीदेखील ते अनन्यसाधारण शांतचित्त राहिले. शिवाय, त्या काळी महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती स्वतःच्या मनातील भावना फारशा व्यक्त करत नसत. सनातनी कुटुंबांमध्ये प्रचलित असलेली उग्रतेची विशिष्ट धारणा हे या मितभाषीपणामागचं मुख्य कारण होतं. त्यामुळे टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातील भावनिक बाजूची झलक सापडणंही अवघड होऊन जातं. टिळकांच्या मुलांनी व मुलींनी लिहिलेले काही रोचक प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनपेक्षित पैलू उघड करणारे आहेत. त्यांची खासगी संभाषणं नेहमीच सुखद विनोदाने चैतन्यशील होत असत. टिळकांची सर्वांत धाकटी कन्या श्रीमती मथुताई साने यांनी पुढील आठवण नोंदवली आहे : ‘सकाळचा चहा घेताना दादा त्यांचा पत्रव्यवहार पाहत असत आणि ते त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींशी कायमच विनोदाने बोलत. ते भयंकर अडचणींना व दिव्यांना सामोरे जात असले, तरीही घरात क्वचितच चिंताग्रस्त किंवा चिडचिडे वाटत. सुरतेतील काँग्रेसचे अधिवेशन 1908 मध्ये होण्याआधी व झाल्यानंतर नेमस्त व जहाल यांचा वर्तमानपत्रांमध्ये बराच शिवराळ वाद झाला. मग एके दिवशी चहा घेत असताना ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व जण चहासोबत काही ना काही खाता. मी काय खातो, हे तुम्हाला माहीत आहे का?’’ सकाळी ते चहा सोडून काहीच घेत नसत, त्यामुळे आम्ही म्हणालो, ‘‘आम्ही तर काही खाताना पाहिलेले नाही.’’ यावर ते म्हणाले, ‘‘मी चहासोबत ताज्या शिव्या खातो.’’ अन्नाच्या चवीबाबत टिळक उदासीन होते. मधुमेहामुळे त्यांना पथ्य पाळावं लागत असे, पण हे सर्व निर्बंध पाळणं त्यांना कधीच जड गेलं नाही. असलं बेचव अन्न त्यांना कसं रुचतं, असं त्यांच्या मुलीने एकदा त्यांना विचारलं, यावर ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘तू खाण्यासाठी जगतेस, तर मी फक्त जगण्यापुरतं खातो.’’ कामात गढलेलं असताना ते शेजारी ठेवलेला चहा प्यायचाही विसरून जात आणि अनेकदा हा चहा थंड होऊन जात असे. त्यांची दुसरी कन्या पार्वतीबाई केतकर यांनी या संदर्भात एक आठवण सांगितली आहे. एकदा पार्वतीबार्इंनी टिळकांना रात्रीच्या जेवणाची वेळ झाल्याचं सांगितलं, पण टिळकांचं तिकडे काहीच लक्ष नव्हतं; किंबहुना, मुलीचे शब्दही त्यांच्या कानांवर पडले नसावेत. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘देवाने एक चूक केली. आपल्या पोटाला एखादे छिद्र असते, तर आपण त्यात पोषक रस भरले असते. अशामुळे जेवणात वेळ घालवावा लागला नसता.’’

तरुणांना सतत काही तरी नवी व उद्बोधक गोष्ट सांगणं टिळकांना आवडत असे. टिळकांच्या या सवयीसंबंधीचा एक दाखला त्यांचे नातू ग. वि. केतकर यांनी नोंदवला आहे. ‘मुलांना किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची माहिती सांगण्याचे कामी दादांना मोठी हौस वाटे. लहानपणी आईने काही शास्त्रीय विषयाबद्दल माहिती सांगावी व तिला विचारले, ‘‘ही माहिती तुला कोणी सांगितली?’’ तेव्हा तिने सांगावे, ‘‘लहानपणी दादा आम्हास पुष्कळ वेळा माहिती सांगत असत.’’... माहिती सांगताना विषयाशी तादात्म्य झाल्यामुळे त्यात काळ-वेळाचेही भान राहत नसे... यामुळे जेवताना कोणताही विषय काढावयाचा नाही, अशी ती. आक्काने आम्हास सूचना दिली होती. कारण काही विषय निघाला की, बोलण्याचे भरात दादा नीट जेवत नसत. पण या सूचनेचा फारसा उपयोग झाला नाही, कारण आम्ही विषय काढला नाही तर तेच काढीत!


अ. के. भागवत , ग. प्र. प्रधान लिखित 'लोकमान्य टिळक' हे पुस्तक इथून खरेदी करता येईल.

Tags: नवे पुस्तक लोकमान्य टिळक ग. प्र. प्रधान अ.के. भागवत Book Lokmanya Tilak G. P. Pradhan A. K. Bhagawat Load More Tags

Comments: Show All Comments

Pradip zambare

लोकमान्य टिळक यांची मंडाळे च्या तुरुंगातुन सुटका कधी झाली

यशवंतराव चव्हाण सैनिक स्कूल, सुपखेला-

अशी माहिती वाचण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

Spm

hii

विष्णू दाते (कांदिवली)

अत्यंत रोचक व जिव्हाळ्याच्या आठवणी! लोकमान्यां विषयी खूप काही सांगणार्या!

विवेक मठकरी

टिळक फारच विद्ववान होते यात शंकाच नाही पण एकमाणूस महाआठवणीतू समजत टिळकांना अजून २५वर्षे आयुष्य लाभते तर एक आगळा भारत घडला असता.

Rahul Ramesh Gudadhe

खूप समाधान वाटले वाचून. अशा प्रकारचे लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद

प्रकाश हाटे

लोकमानय टिळक याचे मंडालेतील दिवस ,त्याच्या आचारानी कुळकर्णी यानी नमूद केलेल्या आठवणी वाचनीय आहेत यागोषटी पुर्वी वाचनात आल्या नव्हत्या. खूप माहितीपूर्ण आहेत

Vinaya deo

Excellent article. Thanks for sharing.

Add Comment