आराखड्यांचे आडाखे 

अयोध्येतील मंदिर आणि नियोजित मशीद या दोन प्रकल्पांविषयी...

अयोध्येतील धन्नीपूर गावात बांधल्या जाणाऱ्या मशिद संकुलाचे संकल्पचित्र

अयोध्येमध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिर ट्रस्टच्या वतीने दोन कोटी रुपयांची जागा केवळ दोन तासांनंतर अठरा कोटी रुपयांना खरेदी केल्यामुळे झालेल्या वादाविषयीच्या बातम्या काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या. हा ‘अतिमहत्त्वाकांक्षी’ प्रकल्प अशा प्रकारे वेगळ्याच कारणाने चर्चेत यावा हे काही बरे वाटले नाही. मुळात बांधकामाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने पाया खोदणे वगैरे कामे गेल्या वर्षीच पंतप्रधानांनी मुहूर्त करून, चांदीची वीट ठेवून सुरू केली आहेत. 

मग प्रश्न पडला की, काम सुरू झाल्यावर जागाखरेदीचा हा व्यवहार का झाला? मंदिराचा आराखडा तसेच कल्पनाचित्रही प्रसिद्ध झाले तेव्हाही या प्रकल्पासाठी जास्त जागेची गरज असल्याचे कुणी सांगितले असल्याचे ऐकिवात नाही आणि ही अधिकची जमीन कोणत्या उपक्रमासाठी खरेदी करण्यात आली आहे तेही स्पष्ट केले गेलेले नव्हते.

जी पुरातन बाबरी मशीद पाडली गेली आणि त्या खटल्यात  सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी राममंदिराच्या बाजूने निर्णय दिला आणि पाडल्या गेलेल्या मशिदीला मूळ जागेच्या बदल्यात नवी मशीद उभारण्याकरता अयोध्या जिल्ह्यामध्येच महत्त्वाच्या जागी पाच एकरचा प्लॉट सरकारतर्फे उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला देण्यात यावा असा निकाल दिला.

त्यानुसार उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला अयोध्या जिल्ह्याच्या सोहवाल तहसीलमधील धन्नीपूर या गावात पाच एकर जागा देण्यात आली आहे. त्या जागेवर बोर्डाच्या वतीने नवी मशीद बांधण्यात येणार आहे अशी माहितीही प्रसिद्ध झाली होती. मात्र त्याची कुठवर प्रगती झाली आहे वा त्याबाबत काय योजना आखण्यात येत आहे याबाबत मराठी वृत्तपत्रांत वा नियतकालिकांत फारसे काही प्रसिद्ध झाल्याचे पाहण्यात नाही... 

या नव्या मशिदीचा आराखडा तयार करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले आहे त्या प्रमुख स्थपती (आर्किटेक्ट) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागाचे प्रमुख प्रोफेसर एस. एम. अख्तर यांनी आराखड्यासंदर्भात सादरीकरण करताना सांगितले होते की, धन्नीपूर येथील या आयताकृती जागेत केवळ मशीदच असणार नाही, तर तिच्याबरोबरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सार्वजनिक स्वयंपाकघर (कम्युनिटी किचन) आणि संग्रहालय (म्युझिअम) असेल. या नियोजित मशिदीमध्ये एका वेळी 2000 नमाझी सामावले जाऊ शकतील. बाबरी मशिदीच्या तुलनेत ती चारपट मोठी असेल.

या आराखड्यानुसार मशीद 3500 चौरस मीटर जागेत असेल तर अन्य प्रकल्पांची बांधकामे 24,150 चौरस मीटर क्षेत्रात होतील. 300 खाटांची सोय असलेले नियोजित बहुमजली हॉस्पिटल हे मशिदीच्या सहापट मोठे असेल. दुसऱ्या टप्प्यात त्याची क्षमता वाढवण्याचा विचार ट्रस्ट करत आहे. 

या हॉस्पिटलची इमारत म्हणजे नेहमीची काँक्रीटची इमारत नसेल तर ती मशिदीच्या आराखड्याशी एकरूप असणारी असेल. तिच्यात इस्लामिक धर्तीचे सुंदर अक्षरलेखन (कॅलिग्राफी) आणि प्रतीकचिन्हे (सिम्बॉल्स) असतील. हॉस्पिटलमध्ये 300 खाटांचे खास दालन (स्पेशॅलिटी युनिट) असेल. तिथे डॉक्टर अगदी समर्पित भावनेने आजाऱ्यांना मोफत उपचार पुरवतील. तिचा आराखडा (डिझाइन) सौर ऊर्जेवर आधारलेला असेल आणि तिथे नैसर्गिक तापमान कायम राखणारी यंत्रणा (नॅचरल टेंपरेचर मेन्टेनन्स सिस्टिम) असेल. तेथील सार्वजनिक स्वयंपाकगृहात आजूबाजूला राहणाऱ्या गरीब लोकांची सकस अन्नाची गरज तिथून भागवली जाईल.

या प्रकल्पात हॉस्पिटलची उभारणीही होणार आहे हे वाचल्यावर माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा त्यांच्या चिटणिसांबरोबर -अरुण तिवारी यांच्याबरोबर- झालेल्या एका संवादाची आठवण झाली. त्यांनी म्हटले होते की, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, गांधीजी, पं.नेहरू यांच्याप्रमाणेच मी टाटांना, विशेषतः जे.एन. टाटा आणि जे.आर.डी. यांना राष्ट्राची उभारणी करणाऱ्या या साऱ्यांएवढेच महत्त्व देईन. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले होते, 'समाजाची काळजी असणे ही चांगल्या उद्योगासाठी मूलभूत बाब आहे. ज्या वेळी टाटा त्यांचे उद्योग चालवत होते त्याच वेळी त्यांनी आशियातील पहिले कर्करोग रुग्णलय - टाटा मेमोरिअल सेंटर फॉर कॅन्सर रिसर्च अँड ट्रीटमेंट - 1941 मध्ये सुरू केले. टाटा समाजविज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) 1936मध्ये आणि आणि टाटा मूलभूत संशोधन केंद्र (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) 1945मध्ये स्थापन केले होते.' 

ते पुढे म्हणाले होते की, 'सामर्थ्य हे सामर्थ्याचा आदर करते. त्याप्रमाणे चांगलेपणाकडे चांगलेपणा आकृष्ट होतो. टाटा स्मृती कर्करोगकेंद्राचा उत्कृष्टपणा हा डॉ.अर्नेस्ट बोर्जेस यांच्या असामान्य प्रतिभेत आहे. आता चांगले लोक आणि धनाढ्य लोक यांच्यात मोठीच दरी दिसते. याला कारण लोभीपणाची संस्कृती.' यावर तिवारींनी विचारले, ‘तुम्हाला असे म्हणायचे आहे का की,  फायदा आणि सत्ता अशी केंद्रे निर्माण करण्यात अडथळा निर्माण करत आहेत?’ त्यावर डॉ. कलाम उत्तरले होते ‘होयऽ’. 

भारतातील शंभर सर्वाधिक श्रीमंतांपैकी सर्वच अब्जाधीश आहेत (करोनाच्या काळात तर आता ही संख्या बरीच वाढली आहे.) त्यांची एकूण संपत्ती तीनशे शेहेचाळीस अब्ज डॉलर एवढी आहे. मग आपल्याकडे टाटा कर्करोग केंद्रासारख्या किमान शंभर संस्था का नसाव्यात?

डॉ.कलामांचे बोलणे आठवताच या प्रकल्पाबद्दल आपोआपच जास्त आदर वाटायला लागला. कारण एका भाषणामध्ये त्यांनी म्हटले होते की, 'आधुनिक वैद्यकीय सेवा ज्यांना परवडत नाहीत त्यांच्यापर्यंत त्या नेणे शक्य व्हायला हवे. आपण त्यांच्या यातना कमी करू शकलो तर परमेश्वर आपल्यावर कृपा करील.'

या प्रकल्पातील हॉस्पिटलद्वारे हेच काम होणार आहे. इथे गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. आपल्या परीने ही मंडळी शक्य ते प्रयत्न करत आहेत. तेही देणग्या वा मदत यांसाठी कोणाकडे न जाता. कुपन्स, पावतीपुस्तके आणि लाखो कार्यकर्त्यांना न राबवता आणि सर्वसामान्य लोकांवर धर्माच्या नावाखाली सक्तीची खुशी न लादता! या कामासाठी देणग्या मागितल्या जाणार नसल्या तरी या प्रकल्पासाठी कोणी आपण होऊन स्वखुशीने काही दिले तर ते स्वीकारले जाणार आहे. या देणगीदारांना करातून माफी मिळेल असे 29 मे रोजी जाहीर करण्यात आले आहे.

या मशिदीच्या आराखड्याबाबत आपले विचार स्पष्ट करताना प्रो.अख्तर यांनी सांगितले होते की, 'आपली घटना ही बहुविधतेवर (प्लुरॅलिझमवर) आधारलेली आहे आणि तोच आदर्श आम्ही समोर ठेवला आहे. या मशिदीला भारतातील इस्लामिक बांधकामांची वैशिष्ट्ये असणारे, पारंपरिक एकसारखे दिसणारे घुमट, मिनार किंवा कमानी नसतील. त्याऐवजी तिचा आराखडा (डिझाईन) हा वैश्विक (कॉस्मिक डिझाईन) स्वरूपाचा असेल. अंतराळामध्ये आरामात भ्रमणकक्षेत फिरणाऱ्या, गोलाकार पृथ्वीसदृश तो असेल.' 

या मशिदीसाठी इस्लामिक स्थापत्यकलेतील - आर्किटेक्चरमधील जुने घटक उपयोगात आणले जाणार नाहीत. याविषयी अख्तर यांनी मांडलेली कल्पना सुधारणावादी म्हणावी अशीच आहे. ते म्हणतात, ‘मध्ययुगामध्ये इस्लामिक वास्तुकला - स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) हे अतिशय चांगले होते मात्र केवळ मध्ययुगाचा काळ हाच केवळ चांगला होता असे आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळे इस्लामिक स्थापत्यकलेच्या भाषेमध्येच बदल घडवून आणण्याची आमची इच्छा आहे कारण भूतकाळ हा काही वर्तमानकाळ होऊ शकत नाही वा भविष्यकाळदेखील होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही त्यातून (भूतकाळातून) स्वतःची सुटका करून घ्यायलाच हवी कारण खरेच सांगायच झाले तर भूतकाळ म्हणजे केवळ स्मरणरंजन आहे, तो तुम्हाला काहीही देऊ शकत नाही.'

यावर पत्रकारांनी त्यांना विचारले होते की, 'या मशिदीबाबत भूतकाळात जे काही कटू घडले होते त्याचे प्रतिबिंब या नव्या वास्तूवर पडेल का?' या प्रश्नाला उत्तर देताना अख्तर म्हणाले, ‘मला इतिहासामध्ये काय घडले यात अजिबात रस नाही आणि तो इतिहास खणून काढण्याची आवश्यकताही भासत नाही. स्थापत्याची नक्कल कधीच करता येत नाही. त्याची निर्मिती व्हावी लागते आणि म्हणूनच कोणत्या प्रकारे पुढे जावयाला हवे याची मला दिशा मिळाली.’ 

प्रो.अख्तर यांनी असेही सांगितले होते की, 'या प्रकल्पामध्ये इस्लामच्या तसेच आपल्या देशाच्या प्राथमिक मूल्यांचा आदर करून खिदमत-ए-खलक म्हणजे मानवतेची सेवा करणार आहोत. ही मशीद माणसामाणसांतील दरी बुजवून टाकेल. माणसाला आवश्यक असलेल्या दोन गोष्टी कोणत्या असतात... तर शिक्षण आणि आरोग्यसेवा. आपल्याकडे या दोन्हींचा तुटवडा आहे... विशेषतः फैझाबाद भागात. या भागात हॉस्पिटल्स अगदी अभावानंच आढळतात म्हणूनच येथील अद्ययावत हॉस्पिटलमध्ये गरिबांवर मोफत उपचार करण्यात येतील.'

योध्येतील या मशीद संकुलाला स्वातंत्र्यसेनानी मौलवी अहमदुल्लाह शाह फैझाबादी यांचे नाव देण्यात येईल असे इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने जाहीर केले आहे. फैझाबादी हे 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. या भागातील स्वातंत्र्ययुद्धाला त्यांनीच सुरुवात केली होती. त्यांना जिवंत पकडून देणाऱ्याला पन्नास हजार चांदीची नाणी देण्यात येतील असे ब्रिटिशांनी जाहीर केले  होते. तरीही ते अखेरपर्यंत अहमदुल्लाह शाह फैझाबादी यांना जिवंत पकडू शकले नाहीत. त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले होते. (अहमदुल्लाह शाह यांना शाहजानपूर जिल्ह्यातील पोवायनचा राजा जगन्नाथ सिंग याने मारले आणि त्यांचे शिर ब्रिटिशांना दिले होते. जगन्नाथ सिंगलाच ते मोठे बक्षीस देण्यात आले आणि पुढच्याच दिवशी ते शिर कोतवालीत टांगण्यात आले होते.)

पुष्पेश पंत हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे प्रोफेसर होते. आता ते निवृत्त झाले आहेत. त्यांना पारंपरिक पाककलेतही खूप रस आहे. या संकुलातील नियोजित संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले याचेच त्यांना आश्चर्य वाटले आणि ते भारावूनही गेले. ते म्हणतात, ‘भारतातील हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येत जे काही मिळविले, त्याचा इतिहास दाखवण्याची सोय असलेल्या एका संग्रहालयाची फार आवश्यकता होती. ती गरज या संग्रहालयामुळे पूर्ण होईल. आम्ही इथे असे केंद्र विकसित करणार आहोत की, तिथे इस्लामच्या खऱ्या विचाराने आम्ही आजाऱ्यांवर उपचार करू आणि भुकेलेल्यांना अन्न देऊ. इथल्या कम्युनिटी किचनद्वारे आम्ही ते करणार आहोत. तिथे अवधी पद्धतीचे खाणेही देण्यात येईल. त्यात कदाचित गोश्त-रोटी, तेहरी आणि पुरी-सब्जी यांचा समावेश असेल. या पदार्थांची चव ही अवध अगदी लखनौ, फैझाबाद आणि जौनपूरपासून बनारसपर्यंत अशा संमिश्र पद्धतीची असेल.

प्रो.पंत म्हणतात, ‘या संकुलामध्ये आपला भव्य भूतकाळ प्रतिबिंबित असेल मात्र त्यात वादग्रस्त वर्षांचा समावेश नसेल. आम्ही याकडे कोऱ्या पाटीप्रमाणे बघत आहोत. आपण असुखकारक अशा शत्रुत्वाच्या भावनेतून बाहेर येण्याची ही एक चांगली संधी आहे. आम्हाला अशी जागा निर्माण करायची आहे जिथे अगदी बारीकशा कलहालाही संधी देणारी बाब नसेल. उलट एकपणाचा गौरव आणि उत्सव साजरा करण्यात येईल... जो समाजात एकजिनसीपणा आणून सर्वांना एका धाग्यात गुंफेल.’

ते पुढे म्हणतात,  ‘मशीद म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नव्हे. तो काळ केव्हाच मागे पडला आहे. आता मशीद हे अनेकांनी एकत्र येण्याचे स्थान आहे. इथे अवधचे अनेक खास चविष्ट पदार्थ मिळतील. जौनपुरचे कबाब, बनारसची निमोना म्हणजे दळलेल्या हिरव्या वाटाण्याची कढी यांसारख्या जिन्नसांची चवा घेता येईल आणि त्याबरोबरच अवधमधील जीवनाच्या विविध बाजूही समजतील. अपुऱ्या जागेमुळे अनेक गोष्टी इथे डिजिटल स्वरूपातच दाखवल्या जाणार आहेत.’

अहमदिया मुस्लीम जमातीतही एकीचे तत्त्व (तौहीद) तीन प्रकारांनी सांगितले आहे. ते म्हणजे देव, धर्म आणि मानव यांच्याबरोबरचे एकत्व. बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्लाह यांनी त्यांच्या टॅबलेट ऑफ मकसूद मध्ये लिहिले आहे की... सारी पृथ्वी एक आहे आणि सारी माणसे तिचे नागरिक आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका प्रमुख तत्त्वज्ञानाला उबुंटू म्हणतात. त्याचा अर्थ मानवीपण असा आहे. त्याचे भाषांतर अनेकदा इतरांबरोबर मानवतेने वागणे असे केले जाते आणि त्याचा अर्थ जागतिक ऐक्याच्या, मानवतेच्या धाग्याने  एकत्र जोडले गेलेले असल्याचा विश्वास असा आहे. धन्नीपूर येथील या नियोजित मशीद संकुलाद्वारे नेमके हेच कार्य केले जाईल, अशी आशा वाटते.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ता. क. - हा लेख तयार करत असतानाच ‘अयोध्या 2051’चा आराखडा पंतप्रधानांनी जाहीर केला. त्यात इतर अनेक गोष्टींबरोबरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचाही समावेश करण्यात आला आहे असे वृत्त आले. ही चांगली बाब आहे. पुढील तीस वर्षांत कधीतरी ते साकार होईल अशी आशा करता येईल.

Tags: आ. श्री. केतकर अयोध्या मंदिर मस्जिद हिंदू मुस्लीम राममंदिर जन्मभूमी बाबरी मस्जिद नरेंद्र मोदी ए पी जे अब्दुल कलाम A S Ketkar Ayodhya Mandir Masjid Hindu Musli RamMandir Janmabhumi Babri Masjid Narendra Modi APJ Abdul Kalam Load More Tags

Comments:

Vasant

लेख आवडला

सुरेश भटेवरा

अयोध्या प्रकरणाचा हा उत्तरार्ध मनाला निश्चितच समाधान देणारा आहे. बाबरी मशिद प्रकरणी एकतर्फी निकाल आल्यानंतर, मुस्लिम समुदाय नेमके काय करतो आहे याची फारशी माहिती ठळकपणे प्रकाशात आलेली नाही. तुमच्या या लेखामुळे या विषयाला सकारात्मक गती प्राप्त होईल, अशी आशा करायला हरकत नाही. भारतात अगणित मंदिरे, प्रार्थनास्थळे अगोदरच भरपूर आहेत. यापैकी अनेकांचे व्यवस्थापन ढिसाळ, वादग्रस्त आणि भ्रष्ट कारभारा बद्दल चर्चेत असते. धर्मस्थळाला जोडून शैक्षणिक उपक्रम अथवा आरोग्याच्या सोयी उभारण्याचा लौकिक आजवर ख्रिश्चन समुदायाचा होता. या निमित्ताने तसे संस्कार अन्य धर्मियांवर होत असतील तर ती नक्कीच चांगली घटना आहे. *सुरेश भटेवरा*

Add Comment