निर्वासितांच्या छावणीत जन्मलेले अफगाण क्रिकेट

क्रिकेट हा खेळ अफगाणिस्तानसाठी व तिथल्या क्रिकेटपटूंसाठी वेगळी ओळख निर्माण करण्याचा, चांगले आयुष्य जगण्याचा आणि राष्ट्रनिर्मितीचा पासपोर्ट बनलेला आहे. 

जेव्हा अफगाण संघ क्रिकेटचा सामना खेळत असतो, तेव्हा सारा देश हातातली कामे व वांशिक भेदाभेद बाजूला सारून त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो. या खेळाची लोकप्रियता मोठ्या शहरांतच आहे असे नाही; उलट अफगाण क्रिकेट संघाकडे नजर टाकल्यास असे लक्षात येते की, देशाच्या सर्व भागांतून क्रिकेटपटू येत आहेत. वांशिक आधारावर विभागलेल्या या देशाला एकत्र आणण्याचे, भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय अस्मिता तयार करण्याचे काम क्रिकेट करते आहे. तालिबानचे दहशतवादी आणि अफगाण सरकार एकमेकांचे कट्टर शत्रू असले, तरी दोहोंनाही क्रिकेटविषयी प्रेम आहे.

मानवी जीवनातील सर्वोच्च आविष्कार खेळात होतो. त्यामुळेच सततची युद्धे, दहशतवाद, संघर्ष आणि हिंसा यांनी होरपळलेल्या देशांमध्ये मानवी मनाला दिलासा देण्याचे व आशावाद जिवंत ठेवण्याचे काम खेळ व खेळाडू करतात. अफगाणिस्तान या आपल्या शेजारी देशातील क्रिकेटकडे पाहताना याचीच जाणीव पुन्हा पुन्हा होत राहते. क्रिकेटची कोणतीही परंपरा नसलेल्या या देशात गेल्या काही काळात क्रिकेट केवळ रुजले आहे असे नव्हे तर त्या देशाच्या व्यापक समाजजीवनाशी जोडले गेले आहे. अफगाण समाजाच्या आशा-आकांक्षा, गुण-दुर्गुण, नैराश्य आणि वैफल्य अशा साऱ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या क्रिकेटमध्ये पडलेले दिसून येते. त्यामुळेच गेली चाळीस वर्षे सतत अस्वस्थ असलेल्या या देशात क्रिकेटसारखा ‘जंटलमन्स गेम’ रुजला कसा आणि लोकप्रिय झाला कसा, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्कीच आला असेल.  

अफगाण क्रिकेटचा जन्म पाकिस्तानातील निर्वासित छावण्यांत झाला. सोव्हिएत रशियाने 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात लष्करी हस्तक्षेप केला होता. त्यामुळे देश सोडून शेजारील पाकिस्तानमध्ये निर्वासिताचे जिणे जगू लागलेल्या लाखो लोकांपैकी काही अफगाण तरुण मुले (आजूबाजूच्या पाकिस्तानी मुलांना पाहत) क्रिकेट खेळायला शिकली. दिवसातून एकदा खायला अन्न मिळाले तरी खूप झाले, इतकी भीषण परिस्थिती निर्वासितांच्या छावण्यांत असते. त्यामुळे क्रिकेटसाठीचे साहित्य उपलब्ध होणे शक्यच नव्हते. म्हणून ही मुले मिळेल त्या प्लॅस्टिकच्या तुकड्याला बॉलचा आकार देऊन, सापडेल ती काठी बॅट म्हणून वापरत क्रिकेट खेळू लागली. 

ही अफगाण मुले 1990 च्या दशकात कुटुंबासमवेत अफगाणिस्तानात परतल्यानंतरही त्यांचे क्रिकेटचे वेड संपले नाही. दिसेल त्या रस्त्यावर, येतील तितकी मुले सोबतीला घेत क्रिकेट चालू राहिले. असे म्हणतात की, 1995 मध्ये अफगाण क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली, तेव्हा देशात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या 25 ते 30 इतकीच होती.

1996 ते 2001 या पाच वर्षांत तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात सर्व प्रकारच्या संगीतावर, खेळांवर, करमणुकीवर बंदी होती. ही बंदी मोडल्यास कठोर शिक्षा केली जात असे. मात्र तालिबानने क्रिकेटला सवलत दिली होती. याची दोन कारणे असावीत - एक, क्रिकेट खेळताना गुडघे झाकणारी फुल पॅन्ट घालावी लागत असल्याने हा खेळ इस्लामविरोधी नाही, असे त्यांचे मत होते. तसेच या खेळाचे स्वरूपच असे होते की, खेळ थांबवून कधीही प्रार्थना करता येत असे. दोन, तालिबानला सक्रिय पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ होता.

2001 मध्ये अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपाने तालिबानची अफगाणिस्तानातील सत्ता संपुष्टात आली. त्याच वर्षी अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मान्यता मिळाल्याने त्यानंतरच्या दहा वर्षांत अफगाणिस्तानच्या क्रिकेटचा प्रवास वेगाने झाला. मात्र अफगाणिस्तानात क्रिकेटची कोणतीही परंपरा नसल्याने क्रिकेटसाठी आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नव्हते. खेळाडूंना सरावासाठी स्टेडियम नव्हते. आहार, आरोग्य, फिटनेस, खेळाचे तंत्र या संदर्भात मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. स्वतःच चुका करत, त्यातूनच शिकत या संघातील खेळाडू पुढे गेले.

तरुण पिढीतील क्रिकेटची आवड पाहून काबुलमधील ब्रिटिश दूतावासाच्या पुढाकाराने अफगाणिस्तानात ‘क्रिकेट प्रशिक्षण केंद्र’ सुरू झाले होते. एखाद्या छोट्या गावातील शाळेचे मैदान असते तितक्या आकाराच्या मैदानावर चार ‘नेट्स’ लावून चालणाऱ्या या प्रशिक्षणकेंद्रात अफगाण खेळाडू सराव करत असत.


Read Also : Cricket, Caste, and Caste Blindness - Rushikesh Gawade


अशा अवघड परिस्थितीत तयार झालेला अफगाणिस्तानचा नवखा संघ 2004 मध्ये पहिल्यांदाच मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाणार होता. मात्र तिथे जाण्यापूर्वी अनपेक्षित अडचणी उद्भवल्या. अनेक अफगाण क्रिकेटपटूंचा जन्म निर्वासित छावणीत झाला असल्याने, अनेकांना त्यांची नेमकी जन्मतारीख व म्हणून नेमके वय माहीत नव्हते. जन्मदाखला व इतर कागदपत्रे नसल्याने पासपोर्ट व मलेशियाचा व्हिसा मिळवणे कठीण होते.

मात्र अफगाणिस्तानातील खेळाडूंसाठी क्रिकेट हाच त्यांचा ‘पासपोर्ट’ झाला. पहिलाच विमानप्रवास आणि पहिलीच विदेशवारी करणाऱ्या अफगाण संघातील खेळाडूंना बाहेरच्या देशात कसे वागावे, स्वतःला कसे प्रेझेंट करावे, कसे बोलावे, काय कपडे घालावेत वगैरे अनेक गोष्टी मुळापासून शिकवाव्या लागल्या. तसेच हा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अगदीच नवखा असल्याने संघाजवळ चांगले प्रशिक्षक, व्यवस्थापकही नव्हते.

अशा या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, आयसीसीच्या वेगवेगळ्या स्पर्धांत चांगली कामगिरी करत करत अफगाणिस्तानचा संघ 2010 च्या ट्वेंटी - ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र झाला. म्हणजे क्रिकेटचा संघ नसणे ते आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणे, हे अवघ्या दहा वर्षांत अफगाणिस्तानने करून दाखवले. निर्वासित छावणीत क्रिकेट खेळायला शिकलेले खेळाडू इतकी प्रगती करतात हे पाहून साऱ्या क्रिकेटविश्वाला त्यांचा अभिमान वाटला असावा.

पुढे 2010 च्या ट्वेंटी - ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतले दोन्ही सामने अफगाणिस्तानचा संघ हरला तरीही काबुलमध्ये परतल्यानंतर या संघाचे जंगी स्वागत झाले. आपल्या संघाचे कौतुक करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हजारो लोक उभे होते. त्या दिवशी कोणालाही बॉम्बस्फोट, गोळीबार, आत्मघातकी हल्ले याची कशाचीही भीती नव्हती. कारण अफगाणिस्तानला त्यांचे ‘आयकॉन्स’ सापडले होते. शतकानुशतके वंश, भाषा आणि प्रादेशिक अस्मितेमुळे विभागलेला देश त्या दिवशी क्रिकेटने एकत्र आणला होता.       

या देशासाठी क्रिकेटचे महत्व किती आहे यासाठी एक उदाहरण देता येईल. 2017 मध्ये, काबुलमधील क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोक मारले गेले. यानंतर क्रिकेटशी संबंधित अनेक परदेशी व्यक्तींनी अफगाणिस्तान सोडले. पण जे मागे राहिले त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी, अध्यक्ष अश्रफ घनी यांनी ब्रेकफास्टचे आमंत्रण दिले.     

अर्थात कोणत्याही नवख्या देशात होते तसेच अफगाणिस्तानातही क्रिकेटबाह्य घटकांचा प्रभाव क्रिकेटवर पडत असतो. अमेरिकी सैन्याने 2008 मध्ये केलेल्या लष्करी कारवाईत रेहमत वाली नावाचा क्रिकेटपटू मारला गेला. त्याचे तालिबानशी संबंध असल्याचा संशय अमेरिकी सैन्याला होता. या घटनेचा मोठा धक्का अफगाणिस्तानात बसला. पुढे 2013 मध्ये, राष्ट्रीय संघाचा कप्तान असलेल्या मोहम्मद नबीच्या वडिलांचे अपहरण झाले होते. इतर कोणत्याही देशातील क्रिकेटपटू इतक्या धोकादायक वातावरणात क्रिकेट खेळत नाहीत. मात्र या व इतर अनंत अडचणींचा सामना करत अफगाण क्रिकेटपटू चांगली कामगिरी करत आहेत.  

जेव्हा अफगाण संघ क्रिकेटचा सामना खेळत असतो, तेव्हा सारा देश हातातली कामे व वांशिक भेदाभेद बाजूला सारून त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतो. या खेळाची लोकप्रियता मोठ्या शहरांतच आहे असे नाही; उलट अफगाण क्रिकेट संघाकडे नजर टाकल्यास असे लक्षात येते की, देशाच्या सर्व भागांतून क्रिकेटपटू येत आहेत. वांशिक आधारावर विभागलेल्या या देशाला एकत्र आणण्याचे, भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय अस्मिता तयार करण्याचे काम क्रिकेट करते आहे. तालिबानचे दहशतवादी आणि अफगाण सरकार एकमेकांचे कट्टर शत्रू असले, तरी दोहोंनाही क्रिकेटविषयी प्रेम आहे. (श्रीलंकेतही हाच प्रकार होता. तमिळ दहशतवादी आणि श्रीलंकन सरकार या दोहोंनाही देशाच्या क्रिकेटविषयी सारखेच प्रेम होते. तमिळ विरुद्ध सिंहली या संघर्षात दोन्ही समूहांना व देशाला एकत्र बांधून ठेवणारा धागा क्रिकेट हा होता. यासंदर्भातील कुमार संगकाराचे 2015 च्या साधना युवा दिवाळी अंकातील भाषण अप्रतिम आहे.) देशाला एकत्र आणण्यासाठी व पुढे जाण्यासाठी ज्या अभिमानबिंदूंची गरज असते, ती पुरवण्याचे सामर्थ्य अफगाण क्रिकेटमध्ये आहे.

क्रिकेटचे हे सामर्थ्य लक्षात घेऊनच ‘अफगाण कनेक्शन’ नावाची एक सामाजिक संस्था शिक्षण आणि क्रिकेट अशा दोन क्षेत्रांत काम करते. शाळांना क्रिकेटचे साहित्य देणे, शाळांमध्ये क्रिकेटची खेळपट्टी तयार करणे, शिक्षकांना क्रिकेट कोच कसे व्हावे याचे ट्रेनिंग देणे अशी कामे ही संस्था करते. या संस्थेने अफगाण स्त्रियांनाही क्रिकेटचे प्रशिक्षण दिलेले आहे. आज या स्त्रिया क्रिकेटच्या मैदानावर खेळत आहेत. काही काळाने त्या स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करायलाही पुढे येतील. पुरुषांच्या बरोबरीने क्रिकेट खेळत अफगाणिस्तानसारख्या मागासलेल्या समाजात त्या नकळतपणे स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवतील.   

अफगाण क्रिकेटवर ‘आउट ऑफ दी ऍशेस’ नावाची एक सुंदर फिल्म तयार केली गेली आहे. 2008 ते 2010 ही दोन वर्षे अफगाण टीमबरोबर राहून शूट केलेल्या या फिल्मचे जगभरात कौतुक झाले. ती पाहण्यासाठी यूट्युबवर उपलब्ध आहे. अफगाण टीमचे आनंदाचे क्षण, दुःख, फ्रस्ट्रेशन, परदेश दौऱ्याचे नावीन्य, तिथले अनुभव असे सारे त्यात येऊन जाते. अनेक अफगाण खेळाडूंसाठी क्रिकेट हे कसे चांगले जगण्याचे, सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे साधन आहे याची जाणीव ती फिल्म देते. मुळात युद्धवार्ताहर असलेल्या त्या फिल्मच्या दिग्दर्शकाने त्यानंतर एकही फिल्म केलेली नाही. कारण अफगाण संघाचा प्रवास अशा रीतीने मांडल्यानंतर त्या दिग्दर्शकाला इतर कोणतीही स्टोरी इतकी इंटरेस्टिंग, पॉवरफुल वाटलेली नाही. त्याने आपल्या त्या अनुभवावर ‘आउट ऑफ दी ऍशेस’ याच नावाचे पुस्तकही लिहिले.

एक काळ असा होता की, युद्ध, संघर्ष आणि मानवी हाल-अपेष्टा यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून अफगाणिस्तानकडे बोट दाखवले जात असे. अजूनही तो देश राजकीय दृष्ट्या भीषण अवस्थेतच आहे. तरीही क्रिकेटमुळे या देशाची वेगळी ओळख तयार होत आहे. जिगरबाज व गुणवत्तावान खेळाडूंचा अफगाण संघ ट्वेंटी-ट्वेंटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्तमच खेळतो. त्या संघाचे हे पोटेन्शियल पाहूनच त्यांना कसोटी क्रिकेटचा दर्जा दिलेला आहे.

अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध 2018 मध्ये बंगळूरू येथे खेळला गेला. (हा सामना भारताने जिंकला मात्र जेव्हा विजयी संघाचा फोटो घ्यायची वेळ आली तेव्हा कप्तान अजिंक्य रहाणेने अफगाणिस्तानच्या संघालाही बोलावले. म्हटलं तर अगदी साधी कृती. पण फारच अर्थगर्भ. एका नव्या संघाला असे सामावून घेणे आणि त्यांना पराभूताची वागणूक न देणं यातून फारच अर्थपूर्ण ‘मेसेज’ दिला गेला.) आता त्या देशात कोणाचीही सत्ता असली, तरीही त्यांचे क्रिकेट सुधारतच जाणार आहे. त्यामुळेच असे म्हणता येईल की, क्रिकेट हा खेळ या देशासाठी व क्रिकेटपटूंसाठी वेगळी ओळख निर्माण करण्याचा, चांगले आयुष्य जगण्याचा आणि राष्ट्रनिर्मितीचा पासपोर्ट बनलेला आहे. 

- संकल्प गुर्जर
sankalp.gurjar@gmail.com


हेही वाचा : 

 

Tags: लेख Cricket afganistan international संकल्प गुर्जर आंतरराष्ट्रीय refugee आउट ऑफ दी ऍशेस out of the ashes Sankalp Gurjar Load More Tags

Add Comment