केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आणि क्रिकेटचे पहिलेच जागतिक विजेतेपद मिळवले. याआधी एकदा न्यूझीलंडने चॅम्पिअन्स स्पर्धा जिंकली होती आणि एकदिवसीय जागतिक स्पर्धेत ते दोनदा उपविजेते होते मात्र क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी जागतिक स्पर्धांमध्ये त्यांना परवापर्यंत (23 जून 2021पर्यंत) जागतिक विजेतेपद मिळवता आले नव्हते. ते त्यांनी दोन वर्षे चाललेल्या जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा आठ गडी राखून पराभव करून मिळवले. हे विजेतेपद सर्वात मोठे समजण्यात येते व त्यामुळेच या कसोटी सामन्याला अल्टिमेट टेस्ट असे म्हणण्यात येत होते.
कसोटी क्रिकेटमधील हा सर्वोच्च सन्मान न्यूझीलंडने मिळवला... तोही जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतावर निर्णायक मात करून... त्यामुळे न्यूझीलंड संघाच्या या विजेतेपदाचे मोल आणखीच वाढले आहे आणि भारताला अपेक्षाभंगाचे दुःख सोसावे लागत आहे.
भारतावर त्यांनी निर्णायक विजय मिळवला हे खरेच... पण त्यामुळे सामना एकतर्फी झाला असे मात्र अजिबात म्हणता येणार नाही. सामन्याच्या अगदी शेवटच्या सत्रापर्यंत विजयाचे पारडे वरखाली होत होते. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना व्यवस्थित पार पडेल का याबाबत सामना सुरू होण्याअगोदरपासूनच कायमच संभ्रम निर्माण केला गेला होता पण क्रिकेटप्रेमींच्या सुदैवाने पहिला आणि चौथा असे दोन दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तरी तो निर्णायक झाला हे महत्त्वाचे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दूरदृष्टीने सामन्यासाठी, तो शक्यतो निर्णायक व्हावा म्हणून एक जास्तीचा दिवस राखीव ठेवला होता आणि तो किती योग्य होता हेच अखेरच्या दिवशीच्या घडामोडींवरून यावरून दिसून आले. (अर्थात त्या दृष्टीने पाहिले तर सामना चार दिवसांतच संपला. अर्थात पहिल्या दिवसापासून खेळ झाला असता तर... असा विचार आता करण्यात अर्थ नाही कारण ती फक्त जर-तरची भाषा ठरेल!)
भारत पराभूत झाल्याने त्याच्या चाहत्यांची घोर निराशा होणे स्वाभाविकच आहे कारण दोनदा एकदिवसीय (1983 आणि 2011), तर 2007मध्ये पहिलीच टी-ट्वेंटी या जागतिक स्पर्धांमध्ये भारताने जेतेपद पटकावले होते त्यामुळे आता कसोटी क्रिकेटच्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्यानंतर तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत विजेतेपद मिळवून या खेळातील आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध करेल असे या चाहत्यांना वाटत होते.
अर्थात भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास पाहता ज्याप्रकारे त्याने अखेरच्या मालिकेत इंग्लंडचा सपशेल पराभव करून क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा अनाठायी नक्कीच नव्हत्या पण त्याचबरोबर भारताने या वाटचालीत न्यूझीलंडविरुद्धची मालिका मात्र गमावली होती. उलट न्यूझीलंडची वाटचाल विजयीच होती. त्यांनी एकही पराभव पत्करला नव्हता त्यामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास बळावला असणार.
भारताने तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले होते आणि त्यांनाही आपणच विजयी होणार अशी खातरी होती. चाहत्यांचीही तीच भावना होती. या कसोटीबाबत एक गोष्ट मात्र भारतासाठी नवी होती. ही कसोटी ही त्रयस्थ अशा ठिकाणी म्हणजे इंग्लंडमध्ये होणार होती. भारताने याआधी एकही कसोटी सामना त्रयस्थ ठिकाणी खेळला नव्हता.
अशा या अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच मानाच्या कसोटीची सुरुवात म्हणजे अगदी प्रथमग्रासे मक्षिकापातः या म्हणीप्रमाणे झाली. पहिल्या दिवशी खळ सुरू होण्याआधीच काही काळ पावसाला सुरुवात झाली आणि तो थांबतच नव्हता त्यामुळेच साधी नाणेफेकही त्या दिवशी होऊ शकली नाही. आता या सामन्याचे काय भवितव्य असेल ही चिंता सर्वांनाच सतावत होती.
सुदैवाने दुसऱ्या दिवशी थोडा उशिरा का होईना खेळ सुरू झाला. त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करले होते त्यामुळे भारताची जोडी मैदानात उतरली. त्यांनी काहीसा संथ पण आत्मविश्वासपूर्ण खेळ केला आणि धावसंख्या अर्धशतकापार नेली. क्षणभर आपला निर्णय चुकला तर नाही ना असे या वेळी न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनला वाटून गेले असेल पण त्याच्या गोलंदाजांवरचा त्याचा विश्वास गोलंदाजांनी सार्थ ठरवला. एकविसाव्या षटकात सहा फूट आठ इंच उंचीच्या जेमीसनने रोहित शर्माला (34) बाद केले, त्याचा झेल सौदीने घेतला.
भारताच्या आघाडीच्या जोडीने दीर्घ काळानंतर परदेशात 20 षटके खेळली होती. पाठोपाठ पंचविसाव्या षटकात शुभमन गिल (28) बाद झाला, त्याला वॅगनरने चकवले. त्यानंतर बोल्टच्या गोलंदाजीवर पुजारा (8) बाद झाला. दिवसअखेर भारताच्या तीन गडी बाद 145 धावा होत्या व त्यामुळेच त्याची सामन्यावर पकड असल्याचे चित्र दिसत होते पण दुसऱ्या दिवशी हे चित्र अचानक बदलले. कर्णधार कोहली (44) एकाही धावेची भर न घालता जेमीसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. भारत 149. पाठोपाठ ऋषभ पंत (4) जेमीसनच्याच गोलंदाजीवर बाद झाला तेव्हा भारताच्या 156 धावा होत्या. जडेजाने रहाणेच्या साथीने धावसंख्या 182पर्यंत नेली तेव्हा रहाणेला (44) वॅगनरने बाद केले. अश्विन (22) बाद झाला तेव्हा भारताच्या 205 धावा झाल्या होत्या. ईशांत आणि बुमरा यांना बाद करून जेमीसनने मिळवलेल्या बळींची संख्या पाचवर गेली आणि अखेर जडेजाला बोल्टने बाद करून भारताचा डाव 217 धावांवर संपवला.
भारताप्रमाणेच न्यूझीलंडच्या आघाडीच्या लॅथॅम आणि कॉनवे या जोडीने 70 धावांची भागीदारी केली तेव्हा लॅथॅमला अश्विनने बाद केले. न्यूझीलंडने धावांचे शतक पार केले आणि 101 धावा असताना कॉनवे 54 धावा करून बाद झाला. खेळाचा दुसऱ्या दिवसाचा खेळ तेव्हाच संपला.
पुढच्या दिवशी पुन्हा पावसानेच चांगली खेळी केली त्यामुळे त्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. सामना निकाली होणार की नाही अशी चर्चा तेव्हापासूनच सुरू होती. खेळ झालेल्या तिसऱ्या दिवसाअखेर सामन्यातील चुरस वाढली होती व ती चर्चा चालूच राहिली. त्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी चांगलाच लगाम घातला आणि जलदगती माऱ्याने अचूकता दाखवून योग्य टप्पा व दिशा ठेवून मारा केला.
अक्षरशः गोगलगायीच्या गतीनेच धावफलक हलत होता. दुसरीकडे न्यूझीलंडचे फलंदाज बाद होत होते. कर्णधार विलियम्सन मात्र निर्धाराने आणि चिकाटीने खेळत होता. आठव्या क्रमांकावर आलेल्या जेमीसनने मात्र आक्रमक खेळी केली. केवळ 16 चेंडू तो खेळला आणि त्याने 21 धावा केल्या, त्यात त्याने एक षटकारही मारला होता. तो बाद झाला तेव्हा न्यूझीलंडच्या 192 धावा होत्या. त्याची जागा घेतली टीम सौदीने आणि त्यानेही आक्रमक धोरण स्वीकारले.
न्यूझीलंडने पहिल्या डावात आघाडी घेतली आणि नंतर लगेचच विलियम्सन बाद झाला तेव्हा त्यांना फक्त चार धावांची आघाडी होती. तेरा धावांनंतर वॅगनर बाद झाला. सौदी सर्वात शेवटी बाद झाला. त्याने एक चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने 30 धावा केल्या. अशा प्रकारे न्यूझीलंडचा डाव 249वर आटोपला. भारताकडून शमीने चार, ईशांत शर्माने तीन आणि अश्विनने दोन गडी बाद केले. न्यूझीलंडला केवळ 32 धावांची नाममात्र आघाडी मिळाली होती पण ती बहुमोल होती.
भारताचा दुसरा डाव सुरू झाला आणि दहा षटकांनंतर गिल केवळ आठ धावा करून सौदीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. 1 बाद 24. रोहित शर्माने तिशी गाठली आणि तेव्हा सौदीनेच त्याला पायचीत केले. भारत 2 बाद 51. त्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी दिवसाअखेर धावसंख्या 64पर्यंत नेली. आता सामन्याचा एकच दिवस बाकी होता. एक जादा दिवस म्हणून ठेवण्यात आलेल्या राखीव दिवसाचा उपयोग सामना निकाली निघण्यासाठी होईल का हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता. सुदैवाने या जादा ठेवण्यात आलेल्या दिवशी पाऊस नव्हता आणि एकंदर हवामान खेळाच्या दृष्टीने अगदी योग्य होते.
खेळ सुरू झाला आणि पुजाराने दोन चौकार मारून भारताची धावसंख्या 71वर नेली पण भारताच्या चाहत्यांना पुन्हा एकदा जेमीसनने जबरदस्त धक्का दिला. त्याने सामन्यात दुसऱ्यांदा कोहलीचा (13) बळी मिळवला आणि एवढे पुरे नव्हते म्हणून की काय जेमीसनच्या पुढच्या षटकामध्ये पुजाराला (15) परत पाठवले.
आता रहाणेच्या साथीला पंत आला आणि या दोघांनी भारताची धावसंख्या 100पार नेली. भारत चांगली आघाडी मिळवणार अशी चिन्हे दिसू लागली. तसे झाले असते तर सामना जिंकता आला नाही तरी अनिर्णित नक्कीच राखता आला असता पण तसे व्हायचे नव्हते. रहाणेच्या 15 धावा असतानाच बोल्टने त्याला बाद केले. भारत 5 बाद 109. आता पंत आणि जडेजा या जोडीवर भारताच्या आशा केंद्रित झाल्या होत्या व त्यांचा खेळही आशादायक होत होता. त्यांनी 43 धावांची भर घातली आणि जडेजा (16) वॅगनरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
भारत 6 बाद 142. नंतर भारताच्या 156 धावा असताना एक उतावळा फटका मारून पंत (41) परतला आणि त्याच धावसंख्येवर अश्विनदेखील बाद झाला. या दोघांनाही बोल्टने बाद केले. शमीने ईशांतच्या जोडीने धावसंख्या 170पर्यंत नेली आणि तो बाद झाला. सौदीने त्याला बाद केले आणि त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बुमरालाही परत धाडले. भारत सर्व बाद 170. आघाडी 138 धावांची पण आता सामना बराचसा न्यूझीलंडच्या बाजूने कलला होता कारण खेळाची बरीच षटके बाकी होती.
...परंतु न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाच्या 14व्या षटकात अश्विनने लॅथॅमला पंतकरवी यष्टिचीत केले. न्यूझीलंड 1 बाद 33. अठराव्या षटकात कॉनवेलाही पायचीत केले. न्यूझीलंड 2 बाद 44. अचानक भारताला विजयाची अंधुक शक्यता दिसू लागली पण तसे व्हायचे नव्हते. पहिल्या डावात चिकाटीने खेळलेल्या विलियम्सनच्या जोडीला रॉस टेलर आला आणि त्या दोघांनी संथपणे कोणताही धोका न पत्करता धावा हळूहळू वाढवण्यास सुरुवात केली. त्यांचा जम बसत गेला तशी धावगतीही वाढत गेली आणि षटकागणिक भारताच्या विजयाची शक्यता दुरावत चालली. लॅथॅमचा झेल पुजाराने सोडला तेव्हा तर आता हे जीवदान भारताला चांगलेच महागात पडणार असे वाटले आणि तसेच झाले. त्याने त्यानंतरही न बिचकता धावा वाढवण्याचे सत्र चालूच ठेवले आणि विल्यमसनही आक्रमक होत चालला. शेहेचाळिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार लगावून विलियम्सनने न्यूझीलंडच्या क्रिकेटच्या इतिहासातील महान विजयाची नोंद केली.
न्यूझीलंडच्या विजयाचा तो क्षण सुवर्णाक्षरांनी नक्कीच लिहिला जाईल. सामन्याचा मानकरी अर्थातच जेमीसन ठरला. कोहलीला दोन्ही डावांत बाद करण्याची करामत त्याने केली होतीच आणि एकूण सामन्यात सात गडी बाद केले होते. तसे पाहिले तर त्यांच्या संघातील प्रत्येकाचाच विजयात सहभाग होता.
या स्पर्धेतील सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या आणि गोलंदाजांच्या यादीमध्ये त्यांच्या फक्त गोलंदाज सौदीचे नाव होते. तो चौथ्या क्रमांकावर होता आणि तरीही त्यांनी हे यश मिळवले ही बाबच त्यांच्या सांघिक सामर्थ्याची जाणीव करून देते.
विल्यमसनच्या नेतृत्वालाही काही प्रमाणात श्रेय द्यायला हवे. अगदी कोणत्याही परिस्थितीत तो गडबडून गेला नाही. शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेत राहिला आणि याचे फळ त्याला त्याचे निर्णय योग्य ठरून मिळाले. पहिल्या डावात भारताची आघाडीची जोडी खेळत होती तेव्हाही तो शांत होता. त्यांच्या फलंदाजीच्या काळात एकामागून एक साथीदार बाद होत असतानाही तो चिवटपणे खेळत राहिला होता आणि त्यामुळेच त्यांना आघाडी घेणे शक्य झाले होते. त्यांच्या गोलंदाजांनीही एकंदर वातावरणाचा अंदाज घेऊन त्यानुसार गोलंदाजी केली. संघात एकही फिरकी गोलंदाज न घेतल्याने काहींच्या भुवया उंचावल्या होत्या पण कर्णधाराचा आपल्यावर पुरेपूर विश्वास आहे हे माहीत असल्याने त्यांनीही कसून गोलंदाजी केली. संघातील प्रत्येक जणच जणू काही विजयाला आपण हातभार लावायला हवा या भावनेने खेळला. त्यांचा माजी कर्णधार रिचर्ड हॅडली याने हा आमच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहे असे म्हटले आणि ते सार्थच आहे.
भारताच्या पराभवाबाबत विचार करताना पहिली गोष्ट जाणवते. ती म्हणजे त्यांना या महान कसोटी सामन्याआधी प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याची संधीच मिळाली नाही. भले आमच्या खेळावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही आमच्याच दोन टीम पाडून सामना खेळलो आहोत असे कर्णधार कोहली म्हणाला होता. तरीही त्याला काही प्रत्यक्ष प्रतिस्पर्ध्याबरोबरच्या लढतीचा अनुभव म्हणता येणार नाही... शिवाय इंग्लंडमध्येही सुरक्षित वातावरणात राहावे लागल्याने त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. उलट इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड दोन सामन्यांची मालिका खेळला होता. इतकेच नाही तर त्यांनी ती निर्णायकपणे जिंकलीही होती त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला होता शिवाय तेथील वातावरणात कसोटी खेळण्याचा अनुभवही त्यांना मिळाला होता. अर्थात यामुळे काही त्यांच्या कामगिरीला कमीपणा येतो असे समजण्याचे कारण नाही.
भारताने पहिल्या दिवशीच अंतिम 11चा संघ जाहीर केला. प्रत्यक्षात त्या दिवशी पावसामुळे खेळच झाला नाही त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. त्याने दोन फिरकी गोलंदाजांना खेळवायला नको होते असेही म्हटले गेले पण त्याने सांगितले की, आम्हाला एका अष्टपैलू खेळाडूची गरज होती म्हणूनच त्याने जडेजाला संघात घेतले आणि अश्विन तर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. अंतिम सामन्याआधी त्याने 41 बळी मिळवले होते त्यामुळे कोहलीचा निर्णय काही चूक म्हणता येणार नाही. अश्विनने प्रत्येक डावात दोन बळी मिळवले आणि पहिल्या डावात 22 धावा केल्या आणि धावसंख्येला काहीसा आकार द्यायलाही मदत केली हे लक्षात घ्यायला हवे. दुसऱ्या डावात सौदी चांगला खेळत असताना जडेजानेही त्याचा बळी मिळवला होता.
...मात्र एक बाब मान्य करायलाच हवी. फलंदाजीबाबत जगातील सर्वोत्तम फलंदाजी असलेल्या संघातील एक असे आपल्याबाबत म्हटले जाते आणि ते काही प्रमाणात खरेही आहे. तरीही हे फलंदाज म्हणावे तितके भरवशाचे नाहीत त्यामुळेच केवळ 36 धावांत गारद होण्याची नामुश्की आपल्याला ऑस्ट्रेलियात पत्करावी लागली होती हे विसरता येत नाही. या कसोटीतही बरेच जण त्यांचा जम बसतो आहे असे वाटत असतानाच बाद झाले. अर्थात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही याचे श्रेय आहे पण त्यामुळे फलंदाजांचे अपयश झाकले जात नाही.
पंत चांगला खेळतो आणि त्याचाच आम्हाला सर्वाधिक धोका आहे असे न्यूझीलंडचे खेळाडू म्हणत होते. तसा तो दुसऱ्या डावात खेळतही होता आणि त्यामुळेच तो आता भारताची धावसंख्या वाढवून सामना अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्न करेल असे वाटत होते पण नेमका त्याला उतावीळपणा नडला आणि एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला त्यामुळे भारताचा दुसरा डाव अपेक्षेपेक्षा आधीच संपुष्टात आला.
दुसरे आणि मुख्य कारण म्हणजे ज्याच्या गोलंदाजीवर भारताची मदार होती तो जसप्रीत बुमरा सपशेल अपयशी ठरला त्यामुळेच न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा केल्या. या शेपटाला लवकर बाद न करण्यात आलेले गोलंदाजांचे अपयश भारताला चांगलेच महागात पडले.
अर्थात गोलंदाजांनी प्रयत्नांची कसूर केली असे अजिबात म्हणता येणार नाही पण त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही आणि प्रतिस्पर्ध्यांना ती मिळाली असे म्हणता येईल. अर्थात त्यांचा खेळही विजेत्याला साजेसाच झाला म्हणूनच त्यांना विजय मिळाला हे योग्यच झाले असे म्हणता येईल... पण खरा विजय क्रिकेटचा झाला कारण अशी मोठी स्पर्धा आणि तिला साजेल असाच रंगलेला अंतिम सामना यांमुळे कसोटी क्रिकेटमध्येच खेळाडूचा दर्जा, तंत्र, मनोधैर्य यांचा कस लागतो हे दिसून आले. मर्यादित षटकांचे सामने भलेही रंगतदार होवोत पण क्रिकेटचे सर्व पैलू त्यांतील खेळात दिसत नाहीत. ते फक्त धावा जास्तीत जास्त होतील अशा प्रकारे तयार केलेल्या खेळपट्ट्यांवर होतात. (तरीही त्यात काही वेळा गोलंदाजच निर्णायक ठरतात!) उलट कसोटी सामना पाच दिवसांचा असल्याने त्यात सर्वच खेळाडूंचा कस लागतो. संयम-प्रसंगानुरूप खेळ आणि क्षेत्ररक्षण रचना हे खूपच महत्त्वाचे असते त्यामुळे फलंदाजाची छोटीशी चूकही त्याला महाग पडते. गोलंदाजांना खेळपट्टीबरोबरच फलंदाजाच्या शैलीचा विचार करून गोलंदाजी करावी लागते व योग्य व्यूहरचना करावी लागते हे महत्त्वाचे.
...त्यामुळेच अखेरपर्यंत रंगलेल्या या कसोटीची तुलना केवळ मनोरंजनाला महत्त्व असलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांपेक्षा जास्त आहे कारण खरेखुरे सर्वांगीण क्रिकेट इथेच पाहायला मिळते म्हणून खऱ्या जाणकारांना आणि शौकिनांना कसोटी क्रिकेटचे आकर्षण वाटते. या सामन्यामुळे पुन्हा एकदा कसोटी सामने गर्दी खेचू लागतील ही अपेक्षा! (अर्थात इंग्लंडमधील आणि ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक याला अपवाद आहेत कारण त्या देशांत कसोटी सामन्यांनाही भरपूर प्रेक्षक असतात.)
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)
Tags: क्रीडा क्रिकेट कसोटी आ श्री केतकर भारत न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप Sports A S Ketkar Cricket Test India New Zealand World Test Championship Load More Tags
Add Comment