छोट्या धनगरवाड्याची मोठी संघर्षगाथा​​​​

मेंढपाळ संस्कृतीवरची रावसाहेब पुजारी यांची कादंबरी - कातरबोणं

चित्र - पराग बोरसे

नंतर येतं दौलतवाडीचं वर्णन. वसबाच्या तीस पस्तीस शेरडांच्या खांडाची चौकशी करणारा सुभानराव आणि त्या शेरडांच्या चार पिढ्यांची कोणत्या शेळीच्या किती करड्या किती बोकड याची माहिती सहज देणारा वसबा आपल्याला भेटतात. तो सुभानराव पाटलांना आपल्या खांडाची माहिती देताना सांगतोः ही मोरकानी. तिच्या नाना आठवणी त्याला बायकोनं सांगितलेल्या. मोरकानीची आई जाते, तेव्हा बायको आणि मोरकानी दोन दिवस अन्न टाकतात. कानं टाकतात. त्यातनं ती सावरली. मोठी झाली. वसबा म्हणतो आमच्या संसाराबरोबर मोरकानीचा संसार फुलू लागला. 

काळाबरोबर माणूस बदलतो, जगण्याचे संदर्भ बदलतात, गावं, बदलतात आणि माणसांचे स्वभावही बदलतात. बरेचदा उद्योग तसंच उपजीविकेची साधनं देखील बदलून जातात. फार पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. असं म्हणतात की, काळाबरोबर सारंकाही बदलून जाणार आहे. पण बदललं तरी ते विसरु म्हटलं तरी विसरता येत नाही. त्याच्या आठवणी येतच राहतात. अस्वस्थ व्हायला होतं आणि या अस्वस्थतेतून लेखन होतं. 'कृषी प्रगती' या मासिकाचे संपादक, रावसाहेब पुजारी यांच्या बाबतीत असंच झालं आणि त्यांनी त्यांच्या गावातील छोट्या धनगरवाड्याची संघर्ष गाथा, व्यथा आणि संवेदनादेखील 'कातरबोणं' या कादंबरीत प्रकट केली.

धनगर म्हटलं की पहिल्यांदा आठवते 'बनगरवाडी' ही व्यंकटेश माडगूळकर यांची अविस्मरणीय कादंबरी. त्यानंतर काही काळानं धनगरांच्यावर काही साहित्यही आलं. त्यात प्रा. श्याम येडेकरांचं 'मी धनगर', डॉ. शिवाजी ठोंबरे यांचं 'डोंगरा पल्याड', संजय सोनवणी यांचं 'धनगरांचा गौरवशाली इतिहास', रामचंद्र वरक यांचं 'धनगरगाथा', नवनाथ गोरे यांचं 'फेसाटी', नागु विरकर यांचं 'हेडाम' आणि डॉ. मुरलीधर केळे यांचं 'एडका' इत्यादी पुस्तकं आली.

रावसाहेबांचं 'कातरबोणं', हे पुस्तक मात्र या सर्वांपेक्षा वेगळं आहे, हे सुरुवातीलाच जाणवतं. कारण संपूर्ण पुस्तकामध्ये त्यांनी ललित निबंधांतून, कथांतून त्यांच्या गावातील छोट्या धनगरवाड्याची मोठी संघर्षगाथा उभी केली आहे आणि त्याबरोबरच आलेल्या माळरान आणि डोंगरावरच्या मेंढपाळांची व्यथा, वेदना आणि संवेदनाही प्रत्ययकारी आहेत. त्यांनी मनोगतात म्हटलंय की, "साधारणपणे 50-55 वर्षांपूर्वीचा 1972 चा दुष्काळाच्या आजूबाजूचा तो काळ. तिथल्या घटनांचं माझ्यावर गारुड. माझ्या माणसांवर, खेड्यावर, परिसरावर काहीतरी लिहावं, ही आतली उर्मी. काळ बदलला, माणसं बदलली, जगण्याचे संदर्भही बदलले. नव्या वाटेची नोंद घेत राहिलो. यातलं बरंच काही माझ्या जगण्याचा भाग, वास्तव आहे. मात्र कादंबरीचा पट उभा करताना गरजेपोटी काही मिथ्यके बरोबर आली आहेत. प्रसंग तेच आहेत, मात्र सोयीनं पात्रं बदलली आहेत. मेंढपाळांचे जगणे, खाणे, गाणे, वाजविणे ही एका वेगळ्या संस्कृतीची लक्षवेधी अंगं आहेत, त्यांचे उभे आडवे धागे विणण्याचे काम कादंबरीच्या निमित्ताने करता आले".

तसं पाहायला गेलं, तर 'कातरबोणं' या कादंबरीत वीस लहान लहान ललितलेख / कथा आहेत. त्या स्वतंत्र केवळ ललितलेख / कथा म्हणून वाचता येतात आणि वाटतं की, ती एक कादंबरीही असू शकते. यातच या लेखनाचं वेगळेपण आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणतात की, "म्हटलं तर हा मेंढपाळ समाजाच्या जगण्याचा शोध आहे. छोट्या कथांचा संग्रह आहे. सलग वाचत गेलो तर ती एक कादंबरी आहे. म्हटलं तर ते एका गावाचं चरित्र आहे आणि एका समाजाची भ्रमणगाथा आहे. कोल्हापूर परिसरातील मेंढपाळ समाजाचे जगणे माणसाइतकंच मेंढरं, पाळीव जनावरं, कुत्री घोडी या सगळ्यांचं मिळून बनलेलं समूह जीवन आहे. या सगळ्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब 'कातरबोणं' मध्ये प्रत्ययास येते. मेंढपाळ समूहाच्या स्वतःच्या अशा प्रथा परंपरा, चालीरीती, श्रद्धा अंधश्रद्धा आहेत. देव देवस्की, यात्रा-खेत्रा, सण-समारंभ आहेत. त्यांची जगण्याची स्वतंत्र रीत आहे. मेंढपाळ समाजात जातीची उतरंड आहे. श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव आहेत. या साऱ्याच्या तपशीलवार नोंदी या पुस्तकात सापडतात. माणूस आणि प्राणी यांचे खोल नातेसंबंध, राग, लोभ या साऱ्याचा शोध येथे लेखक घेताना दिसतो.

मेंढपाळ विश्व भाषिक संस्कृतीनं बनलेलं आहे. फिरस्ती करणाऱ्या या समाजाची भाषा अनेक भाषिक समूहांचे संस्कार घेऊन आकाराला येते. त्यांची दैवत परंपरा मिश्र स्वरूपाची आहे. लेखक या साऱ्याचा शोध सखोलपणे घेण्याची आकांक्षा बाळगतो. त्यामुळे हे लेखन वैशिष्ठ्यपूर्ण बनलेले आहे. एका समूहाचा सर्वांगिण शोध घेणारे हे लेखन ललितलेखन म्हणून महत्त्वाचे आहेच, त्याबरोबरच समाजशास्त्राच्या अभ्यासकांना अधिक उपयुक्त ठरणारे आहे. म्हणून या ग्रंथाचे मोल मराठी साहित्यात अधिक आहे. रावसाहेब पुजारी यांनी ही मराठी साहित्यात घातलेली मोलाची भर आहे". 

'कातरबोणं' च्या सरुवातीला धनगरांच्या जीवनक्रमाची ओळख लेखकानं करून दिलीय. त्यांची वस्ती हळूहळू तयार होत जाते. पण ती गावाबाहेरच असते. चारणीच्या निमित्ताने मेंढक्यांची गावोगाव भटकंती होते. आज एका तर उद्या दुसऱ्या वस्तीवर. मेंढकं पावसाळ्यात गाव सोडतात. वाटेत झडीच्या पाऊस सुरू झाला तर त्यांना हाल सहन करावे लागतात. रात्र रस्त्यावरच काढण्याची वेळ येते. मग ते मिळेल तेथे आसरा शोधतात. उजाडलं की नवी वाट धुंडाळत पुढे जातात. लहान पोरं, तान्ही मेंढरं, बाया, बिछाना या सगळ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करत राहतात. वाटेत चोऱ्यामाऱ्या, अपघात, प्रण्यांचे हल्ले या साऱ्याला तोंड द्यावं लागतं. मेंढक्याच्या जीवनाची आबाळ होते.

लेकुरवाळ्या मेंढ्यांना पोराबाळांत बरोबर ठेवून बाकी मेंढ्यांना खतावणीला म्हणजे शेतात बसवून खत द्यायला सोडतात. मेंढ्यांच्या लेंड्या मूत्र हे उत्तम खत असतं. त्या मेंढक्याला एकटं राहून चालत नाही. सगळीकडे लक्ष द्यायला लागतं. यातून चुकलं माकलं, लंगडं पांगळं, आजारी अशा मेंढ्यांच्या सगळ्या उसबऱ्या (उस्तवारी) मेंढक्याला नित्यनेमाने कराव्या लागतात, तेव्हां कुठं मेंढका तयार होतो.

हे मेंढवाडं कुठं होतं, तर गावानं टाकलेल्या, खडकाळ वावरात मेंढवाडं होतं. हा सारा परिसर वनविभागाचा असला, तरी तिथं वन मात्र नव्हतं. कारण मुळात तो सारा फोंडा माळ. त्याचं वर्णन पांडू रुकड्या सांगतो, " वेडी धनगरं म्हणून या माळावर थांबल्यात नव्हं. दुसरी असती तर तवाच पसार झाली असती लांब नदीकाठाला आणि राहिली असती सुखानं." त्याच्या बोलण्यात तिथल्या एकूण परिस्थितीचं वास्तव ओसंडून वाहत होतं, असं लेखक म्हणतो.

ती मेंढवाडं वसलेला भाग जागोजागी चढ उताराचा. उंचवट्यापेक्षा घसरटीच जास्त. पावसाच्या पाण्यानं त्यात दिवसेंदिवस भर पडत निघालेली. मोठा पाऊस झाला की जागोजागीचं लहान गोठं दगड पुन्हा उठत. बाजूची माती वाहून जाई. जाग्यावर आणि त्यांच्या नशिबात सगळं दगड गोठंच भरलेलं. त्या ठिकाणी झाडही जगत नसे. कधी काही उगवलंच, तर शेळ्या मेंढ्या ते फस्त करत. वनहद्दी लगतचा तो मोकळा माळ कुणा धनगरी कारभाऱ्यानं हेरला. बाजूला जंगल खात्याची जागा. त्यावर मुबलक प्रमाणात हिरवा चारा. तो शेळ्या मेंढ्यांचं अन्न. चार सहा महिनं त्यावर सहज गुजराण होईल, असं कारभाऱ्याला वाटलं. बाकी सहा महिने चारणीला जाऊ पावसाळ्यात. मेंढरं कटणाला म्हणजे (खडक फोडून झालेल्या डोंगर उतारावर) जगतील, हा अंदाज. मग हळूहळू त्या ठिकाणी मेंढवाडं वाढतच गेलं. होता होता तिथं 30-40 वाडगं (म्हणजे घरं), उभं होतं. डोंगरमाथ्यावरून दूरचे ते मेंढवाडं एखाद्या रांगोळीसारखं भासत होतं, असं लेखक म्हणतो.

मेंढवाडयाच्या उशाला जुनी वडाऱ्यांनी खणलेली खाण होती. पण आता तिच्यात वाहतं निवळसंख पाणी भरलं होतं. बारा महिने पाण्याचा स्रोत. पावसाळ्यात ती काठोकाठ भरे. गावातल्या बायका तिथं गर्दी करत. त्यांच्यासाठी ती मोकळं बोलण्याची जागा. तिथं विषयाचं बंधन नव्हतं. पाठोपाठ मेंढवाड्यातील घरं कशी उभी राहिली याचं वर्णन आहे: तुक्या तू सुरबाला मेंढवाडा घाल म्हटलं की, दुसऱ्या दिवशी तुक्याचा वाडगा तयार होई. तुक्याचे चार सहा जोडीदार त्याच्या मदतीला धावत. रात्रीचा दिवस व्हायचा. सगळं मेंढकं एकमेकाच्या मदतीला धावत. अक्कल हुशारीचं धागंदोरं वस्त्रत विणावं तसे एकेक लगड गुंफून मेंढवाडं आकाराला यायचं. कोणी मेडी आणायचं, कोणी पांझरण ओढायचं कोण घम टाकायचं. दोघा चौघांनी तुळ्यांची जमवाजमव करायची. हाताच्या वितीवर मापं पडायची. सहा हाती, आठ हाती लाकडं कोपरांनी मोजायची. असं एकेक मेंढवाडं तयार झालं होतं. आजघडीला त्या माळावर 30-40 मेंढवाडं आकाराला आलेलं. त्याची नवी वसाहत तयार झालेली. पुढचं वर्णन मुळापासूनच वाचायला हवं.

"वाडग्यातल्या जिराबावर मेंढक्यांची श्रीमंती ठरत असे. पूर्वी मेंढक्यांचं शिक्षण फारसं नसे. लिखापढी अर्थातच नव्हती. पण गिणती हिशेब मात्र पक्के असत. त्यांच्याकडं अंगभूत शहाणपण. पण वीस पंचविसाच्या आकड्यांपलीकडं पलीकडं त्यांची उडी पोहोचत नव्हती. त्यांना वीसपर्यंत आकडे येत. तिथंच आकडेमोड थांबे. म्हणून वीस मेंढरांचा एक गडी. दोन गडी म्हणजे चाळीस, तर पाच गडी म्हणजे शंभर मेंढरं, एक खंडी. ज्याच्याकडं जास्त गडी तो बडा मेंढका. वाडगं यांच्या उभारणीहून मेंढ्या, शेळ्यांत त्यांचा जीव अडकलेला. बक्कळ करडं कोकरी यालाच महत्त्व. मेंढवाड्याच्या आसपास माणूस येताच शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या-मुताचा वास भसकन नाकात घुसं. तिथल्या माणसांनी त्याची सवय. ते त्याची फिकीर करत नसत. पुढचं वर्णन पाहाः मेंढवाड्याच्या आवारामध्ये परक्या माणसाची चाहूल लागताच अंगावर धावून जाणारी धनगरी वाघी कुत्री. त्यांच्या गुरगुरण्यानं पळता भुई थोडी होई. जणू ती अंगावर झ्यॉप टाकतात की काय असा त्यांचा आवेश. त्यांच्या त्या आक्रमक पवित्र्यानं समोरच्याला धडकीच भरे. भितीनं त्यांची गाळणच उडे. त्यांचं नुसतं गुरगुरनं सदिक समोरच्यांची गाळण करून टाके. मेंढका, मेंढवाडं, जित्राबं, करडं-कोकरी यांच्या रक्षणाची सगळी जबाबदारी त्यांच्याच खाद्यांवर असल्याच्या आवेशात ते येणाऱ्या जाणाऱ्यावर भुंकतअसत. ही वाघी कुत्री मेंढक्यांची शान. त्याच्यावर त्यांचा भारी जीव.... धनगरी कुत्री, घोडी, सिंगरं, कोकरी आणि पोरासोरांनी भरलेला सगळा परिसर म्हणजे धनगरांचा गोतावळा."

बिरुबा त्यांचा देव, असं सांगून लेखक त्यांचं बिरुबाचं काही शतकांपूर्वीचं देऊळ आता जीर्ण झालंय असं सांगतो. पण त्यामुळं देवळाचं महत्त्व कमी होत नाही. बिरुबाची पूजा, घंटानाद, मुखवटा, पालखी या साऱ्याचं चित्रमय वर्णन करतो. देवळाच्या प्रथा, त्याचं पावित्र्य, पुजारी आणि परंपरा जपण्यासाठी धडपडणारा, मुलांना पत्त्यांत गुंतू नका सांगणारा, पोरासोरांना मोठ्या पैलवानांच्या गोष्टी सांगणारा कारभारी, देवळाच्या आवारातला तेलघाणा, तेथील बायकांची गर्दी, संध्याकाळी सताड उघडी असणारी तालीम, हे वाचताना ते डोळ्यापुढं दिसायला लागतं.

नंतर येतं दौलतवाडीचं वर्णन. वसबाच्या तीस पस्तीस शेरडांच्या खांडाची चौकशी करणारा सुभानराव आणि त्या शेरडांच्या चार पिढ्यांची कोणत्या शेळीच्या किती करड्या किती बोकड याची माहिती सहज देणारा वसबा आपल्याला भेटतात. तो सुभानराव पाटलांना आपल्या खांडाची माहिती देताना सांगतोः ही मोरकानी. तिच्या नाना आठवणी त्याला बायकोनं सांगितलेल्या. मोरकानीची आई जाते, तेव्हा बायको आणि मोरकानी दोन दिवस अन्न टाकतात. कानं टाकतात. त्यातनं ती सावरली. मोठी झाली. वसबा म्हणतो आमच्या संसाराबरोबर मोरकानीचा संसार फुलू लागला. 

माझ्या दोन बायका हैत. मोरकानीनं माझ्याकडं सोन्याचा संसार केलाय. मोरकानीच्या लेकी, नाती, पणती या पिढ्यांची माहिती देतो. त्यावरून या जिवांचा या मेंढकांना किती जिव्हाळा असतो, ते समजतं. तिथला आवबानाना कारभारी जुन्या आठवणींत मेंढकांबरोबर आपणही गंगून जातो. मग आजूबाजूला बसलेले मेंढके आवबाला प्रश्न विचारतात. मग मेंढपाळ व्यवसायातील खाचाखोचा तो अनगड वास्तवासकट सांगतो. शेमलं काढलेलं फेटं आजकाल कोणी मेंढकं बांधत नाही, तिरक्या पांढऱ्या टोप्या वापरणारांची संख्या वाढलेली. घोंगडीला धनगरी समाजात खूप मानाचं स्थान आहे. खांद्यावरली घोंगडी हे त्यांचं भूषण. तिचा अनेक प्रकारं वापर करता येतो. घोगडीच्या कारागरी करणारे सनगर अनेक गावांत अहेत. त्यांच्याकडं घोंगडी, जेन घडवण्याची यंत्रणा आहे. गावागावी फिरून कातरणीच्या वेळी ते लोकरी जमा करतात. मागणीनुसार देवाची घोंगडीडी करतात. आठवडी बाजार, जत्रा, यात्रा तसे घोंगडीचे बाजार. तिथं मालाला चांगलं गिऱ्हाइक भेटतं. फिरस्ते व्यापारीही घोंगड्यांचा व्यापार करतात.

बिरुबाच्या देवळात भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिरसाला ताल आलेला. सारं मेंढकं त्यात रंगून गेलं असतानाच मेंढवाड्यात दरोडा पडल्याचा ओरडा होतो. सगळे त्या दिशेनं धावतान. दरोडेखोरांशी झटापट करतात. एका जखमी करतात. त्या जखमीला घेऊन दरोडेखोर जीपमधून पळून जातात. एका दरोडेखोरा जखमी कसं केलं, लक्सू तात्या आणि सुरबानं रामोशाला कसा हेलपाडला, कुऱ्हाडीचं घाव कसं घातलं हे सांगतात. मग चर्चा होते धनकरांच्या पोरांनी धाडसाने दरोडा परतवून लावल्याची. गावकरी त्यांचं कौतुक करतात. त्या पोरांना जोश आलेला. "सांभाळा. गड्यांनो ती जगली तर आपण जगू. कुणबी असो वा रामोशी, सगळ्यांच्या बांधाला मेंढकाला जावं लागतं. तवा कुणाशी खुन्नस घेऊन चालणार नाही". तो जमिनीवरचं वास्तव सांगत होता. मात्र दरोड्याच्या घटनेनं धनगरवाड्याला नवी झळाळी आणि आत्मविश्वास येतो.

नंतर येतं मेंढरांचं आजारपण, त्यांची देखभाल, शहरातून जनावरांच्या डागदराला बोलावलं जातं. तो आजारी मेंढ्यांना तपासतो. खंगलेल्या मेंढीला डागण्याची व्यवस्था करतो. मग मेंढकं वावरावर परततं. डालख्यातल्या पिलांच्या चाऱ्याची व्यस्था होते. लढाईवरच्या सैन्याप्रमाणं मेंढक्यांचं काम. पोटापाण्याची सोय केली तरच ते लढायचं त्यांच्या पोटापाण्याची सोय कारभारी जातीनं बघतो. रंगादाजी आणि तातूबा जवळ बसून पान खाताना बदललेल्या वास्तवाचं वर्णन करतातः सगळ्या धनगरवाड्याचा इस्कोट झालाय. दही, दूध इदळावं तसं मेंढक्यांचे जीवन इदळून गेलंय. त्यांचा जन्म नुसताच उंडारण्यात जातोय याची त्यांना खंत असते. तातूबा म्हणतोः "मेंढरामागं फिरून 'सोन्याचं गठुडं' पाठीला बांधून फिरायचं दिवस मेंढक्यांकडं राहिले नाहीत गड्या रंगा. सगळ्या आयुष्याचा नुसता रौंधा झालाय. वारा येईल तिकडं तो उडून जातो नव्हं. धनगराचं जगणं आता पूर्वीचं राहिलेलं नाय. त्यात काही मेळ दिसत नाय. थोडीफार हैत म्हणायला, ती मेंढरं हाकतात. जित्राबं सुदिक नेटकं कुठं दिसत नाय. एवढंच बाकी हाय तिथं".


हेही वाचा - सामान्यांतील असामान्यत्व शोधणाऱ्या : गावमातीच्या गोष्टी (नरसिंग वाघमोडे)


पुढं पावसाळ्यातलं वर्णन येतं. नव्या चाऱ्याची, नव्या पाण्याची यात्रा असते. धनगरवाड्यावरच्या हिरवटीच्या खाऱ्या जेवणावळीची चर्चा सुरू होते. हिरवट म्हणजे हिरव्या रानाचा उत्सव. छोट्याशा धनगरवाड्यावरची जणू जत्राच. सरता उन्हाळा आणि पुढं येणारा श्रावण यांच्यामध्ये हिरवटीचा बार उडतो. मोंढक्यांची मीटिंग. साआठ तिथं जमलेलं. खरं तर गुप्त बैठक. साऱ्या उचापती बोलल्या जातात. मळ्यातल्या पोरांनी पिकात मेंढरांनी तोंड घातलं म्हणून लक्ष्याला तुडवलेलं. ते ऐकून इठुबा म्हणतो आज तो सापडला उद्या आम्ही सापडू. त्या देवकात्याच्या पोरांना धनगरी हिसका दाखवायला हवा. कारभारी दटावताच सुरबा म्हणतो, ते दांडगेशूर असले तर त्यांच्या घरात. इठुबा म्हणतो, "एवढ्यानं सारं संपतंय का. त्या पोरास्नी सोडायचं नाय. कुऱ्हाडीचा दांडा ढिला सोडायचा नाय". या बहकाव्यानं बाकी मेंढक हो भरु लागतात. लक्ष्याची समजूत काढतात. इठुबाच्या डोक्यात वीज चमकती. देवकात्याच्या मळ्यात दीड एकरात तूर भरलाय. सगळी तूर कापून आणून त्याचा सपाराम करू. हा बेत ठरतो. उंमलबजावणी होते. धनगरांवर वहीम घ्यायला धागादोरा सापडत नाही. धनगरी हिस्का म्हणतात तो असा असतो. असा सगळा धनगरी कारभार ती धनगरवाडी जगू लागते.

मेंढ्यांच्या (लोकर) कातरणीच्या निमित्तानं केलेलं गोडधोडीचं जेवण म्हणजे कातरबोणं. वर्षातून दोनदा अशी कातरण असते. कातरबोण्याला साधारण खीर-भात, सांजा-भात, आंब्याचं केळ्याचं शिकरण, पुरणपोळया केल्या जातात. मेंढकं याला फीस्ट म्हणतात. जेवढं कातरकरी असतील त्या साऱ्यांना, आजूबाजूचे शेजारीपाजारी, तसंच पै-पाव्हण्यांना आवताण असतं. या दिवशी लक्ष्मी आल्याचा आनंदांत्त्सव मेंढकं आणि त्यांची कुटुंब साजरा करतात. पंचक्रोशीत धनगरांच्या हिरवटीचा बोलबाला. हिरवटीचं वर्णन वाचायला मिळतं.

धनगरी ओवीचा खल सुरू होतो सुंबरानं मांडलं गा, सुंबरान मांडलं। उभ्या राहिल्या जागा बिरुबाच्या सेवेला। डोंगराच्या राजाला गा, टोळभैरी देवाला। गुणगाणं गायला, उभं राहिलो जाग्याला ।। बिरुबाच्या ओव्यांनी सारी रात्र जागते. गरजत हिरवट साजरी होते. त्यामुळं सारं वर्णन एकजीव होतं कादंबरीसारखं. मेंढरांना मच्याळ (मरगळ) आल्यावर त्या डगरीवरची पांढरी माती मातकटखंड वेचूक खाऊ लागतात. त्यांना मीठ-जोंधळ्याच्या कण्यांची टगळ (उपाय) सापडते. बायका मीठ-कण्यांचं कूट करून मेंढरांना खाऊ घालतात. मेंढरं त्यावर तुटून पडतात. त्यांचं मच्याळ दूर होतं. हा उपाय पांडू रुकड्यानं सांगितलेला. असं जुगाड करून मेंढकं संकटावर मात करतात. अशी वर्णनं, गोष्टी 'कातरबोणं' मध्ये येतात.

शेवट गलबलून टाकणारा आहे. "पांडुतात्या सांगतो परवा तर दैवकीला एका पार्टीच्या लोकांनी पंचांना दारवा पाजल्या. ती कुणीकडंही भुकू लागली. भुरटं पुढारी झालं की असंच होतय बाबा, अशानं दैवकीचा आब घालवलाय रांडीच्यांनी दू तुमच्या भनी ... हा सळ दैवकीचा अपमान है. ज्या भंडारा स्मरून देवकी भरते त्या भंडाऱ्याचा अपमान असतोय. अशानं समाजाची सगळी नासाडी झालीया. एकेकाळी पाठीला 'सोन्याचं गठुडं' असलेल्या मेंढीपालनाच्या व्यवसायाला आता सगळ्या उंदीर, घुशी, लांडगं, कुत्रं लागल्यात. त्यातून त्यांची सुटका झाली नाही तर एक दिवस असा येईल हा व्यवसायच संपून जाईल, यावर सगळ्या वयस्क धनगरांचं एकमत झालेलं होतं".

एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे, पुस्तकाच्या अखेरीला बऱ्याच अपरिचित शब्दांचा अर्थ दिला असता तर सर्व वाचकांना पुस्तकाचा आस्वाद अधिक चांगला घेता आला असता. तसा तो काही बोली भाषांतील पुस्तकात असतोही. पुढील आवृत्तीत ही सुधारणा करता येईल.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)


कातरबोणं
लेखक : रावसाहेब पुजारी;
प्रकाशक : अजयकुमार पुजारी, तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पाने: 160
किंमत: पुठ्ठा बाइंडिंग 300 रु.; पेपर बाइंडिंग 250 रु.

Tags: मेंढपाळ संस्कृती मेंढपाळ धनगरवाडा धनगर साधना डिजिटल Load More Tags

Add Comment