फोर डेज ऑफ नेपल्स : युद्ध येता दारी

युद्धपटांवरील लेखमाला : 7

साधारण 1962 मध्ये एक वेगळ्याच प्रकारचा युद्धपट आला होता. त्याचे नाव होते, फोर डेज ऑफ नेपल्स. वेगळ्याच प्रकारचा म्हणण्याचे कारण म्हणजे, सर्वसाधारण युद्धपटात असते त्याप्रकारचे दोन देशांतील सैन्यांचे युद्ध या चित्रपटात नव्हते. आणि तरीही तो युद्धपटच आहे. कारण ते अगदी वेगळ्या प्रकारचे आणि घराघरातून लढवले गेलेले युद्ध होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांबरोबर इटलीच्या नेपल्स या शहरातील नागरिकांनी आपले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी एकजुटीने दिलेली ही लढाई होती.

बलाढ्य रशियाच्या फौजांनी छोट्या युक्रेनवर आक्रमण केले त्याला आता महिना उलटून गेला आहे. केवळ चार-सहा दिवसांत आपण युक्रेनचा फडशा पाडू अशा घमेंडीत रशियाने हे पाऊल उचलले होते. पण त्यांचा अंदाज युक्रेनच्या नागरिकांनी साफ चुकवला. आपल्याला फारसा प्रतिकार होणार नाही, अशी रशियाची अपेक्षा होती. संख्याबळ त्यांच्या बाजूने होते. आणि त्यांना जुना सोविएत संघ पुन्हा अस्तित्वात आणायचा आहे, हा त्यांचा मानस जगाला कळून चुकला होता. मात्र काहीतरी कारणाच्या शोधात रशिया होता. कारण तसे काही कारण सापडले नाही, तर जगात त्याचीच बदनामी होणार होती. (आताही तशी झालीच आहे म्हणा, पण मोजके का होईना सहानुभूतीदार त्याला लाभले आहेत.) ते कारण सापडले. खरं तर तो एक अंदाज होता, पण युक्रेनच्या झेलेन्स्की यांच्या वक्तव्याने त्याला पुष्टी मिळत होती. निदान रशियाला तसे वाटत होते. अमेरिकेच्या आधिपत्याखालील नाटो या संघटनेत सामील व्हायचा युक्रेनचा इरादा आहे, हा तो अंदाज. एके काळी आपल्यात असलेल्या या देशाला रशियाचे पुतीन थेट प्रतिस्पर्ध्याच्या गोटात जाऊ देणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी या अंदाजाला वास्तव मानून युक्रेनवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.

खरं तर युक्रेन सोविएत संघातून बाहेर पडून स्वतंत्र झाला, तेव्हा त्याच्याकडे पूर्वीच्या सोविएत संघाच्या अण्वस्त्र साठ्याचा मोठा हिस्सा होता. पण जागतिक धोरणाला मान देऊन त्याने तो साठा काढून टाकला होता. तसे नसते, तर रशिया त्याच्यावर हल्ला करण्यास धजावलाच नसता, असे काही तज्ज्ञ म्हणतात, ते पटण्याजोगे आहे. कारण रशियाने आपला अण्वस्त्र साठा कायमच राखला आहे. त्याच बळावर तो युक्रेनच्या मदतीला जाण्यापासून बड्या देशांना थोपवत आहे. प्रथम चढाई करणाऱ्याला सुरुवातीला यश मिळते तसे ते रशियालाही मिळाले. पण सहजी निर्णायक विजय मिळेल ही त्यांची अपेक्षा मात्र पुरी झाली नाही. युक्रेनने सर्वस्व पणाला लावून प्रतिकार करण्याचे ठरवले आणि नागरिकांनी त्या निर्णयाला केवळ उत्स्फूर्तच नाही, तर सक्रीय पाठिंबा दिला. अगदी लढती सैनिक लढू नागरिक असे म्हणून ते लढू लागले. प्रत्येक रस्त्यावर रशियनांना प्रतिकार होऊ लागला. रशियन रणगाडेही थोपवण्यात आणि नष्ट करण्यात आले. आणि हा प्रकार अद्यापही सुरूच आहे. पण जे घडते आहे, ते भयानकच आहे, म्हणूनच युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

युद्धाची भाषा कोण करतात? तर ज्यांना ‘युद्धस्य कथा रम्या’ म्हणून केवळ करमणुकीसाठी त्या हव्याहव्याशा वाटतात आणि रहस्यकथा वाचताना आपणच त्यातील नायक असल्याचे त्यांना भासते, तसेच युद्धात पराक्रम गाजवणारे वीर आपणच असल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण जे वाचतो तसे सहजपणे करू शकू, अशी धुंदी त्यांना चढते. पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच शहरात बॉम्बस्फोट होतो, तेव्हा हे शूरवीर दोनचार दिवस स्वतःला घरात कोंडून घेऊन बसतात. कधी शहरावर हल्ला होण्याची नुसती शक्यता वर्तवली गेली, तर ते सांगितल्यापेक्षाही अधिक काळजी घेतात. म्हणजे काय तर घराच्या बाहेरच पडले नाही, तर मग भीती कसली, अशी त्यांची समजूत असते. याचे कारण असे की, खरे युद्ध म्हणजे काय असते, याचा त्यांना अनुभव नसतो. तर या साऱ्यामुळेच युद्ध येता दारी हा अनुभव त्यांना कल्पनेतही आणता येत नाही. अशा या स्वतःला शूर वीर समजणाऱ्यांसाठी एका चित्रपटाची मुद्दाम आठवण करून देत आहे. म्हणजे काय की, बोलणे वेगळे आणि प्रत्यक्ष कृती करणे यात महदंतर आहे, हे त्यांच्या ध्यानात यावे. आणि सुदैवाने तसे झालेच, तर मग आपोआपच त्यांना लष्करी अधिकारी, तज्ज्ञ, जवान आणि वीरपत्नी- वीरमाता हे सारेजण, युद्ध नको असे सतत का बजावत असतात याचा, इच्छा असलीच तर, उलगडा होईल.

साधारण 1962 मध्ये एक वेगळ्याच प्रकारचा युद्धपट आला होता. त्याचे नाव होते, फोर डेज ऑफ नेपल्स. वेगळ्याच प्रकारचा म्हणण्याचे कारण म्हणजे, सर्वसाधारण युद्धपटात असते त्याप्रकारचे दोन देशांतील सैन्यांचे युद्ध या चित्रपटात नव्हते. आणि तरीही तो युद्धपटच आहे. कारण ते अगदी वेगळ्या प्रकारचे आणि घराघरातून लढवले गेलेले युद्ध होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांबरोबर इटलीच्या नेपल्स या शहरातील नागरिकांनी आपले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी एकजुटीने दिलेली ही लढाई होती. बघता बघता सारे शहर या विषम भासणाऱ्या लढ्यासाठी एकजूट झाले होते. अर्थात सर्वत्रच आढळतात त्याप्रमाणे त्यातही काही गणंग होतेच. पण त्यांना खड्यासारखे वगळण्यात आले होते, त्यामुळेच नेपल्सच्या या लोकलढ्याला यश मिळाले. जॉफ्रे लोम्बार्डिनीने हा आगळावेगळा चित्रपट तयार केला होता. त्याचा दिग्दर्शक होता नॅन्नी लॉय. त्याने फास्कल फेटा, कॅम्पानाइल, कालो बर्नेट्टी, मासिमो फ्रान्सिओसा आणि वास्को प्रॅटोलिने यांच्या मदतीने लेखन केले होते. छायाचित्रण मार्सेलो गत्तीचे आणि संगीत फार्लो रस्टिचेलीचे होते. मुख्य भूमिका रेगिना बिआंची, अल्डो गिऊप्रे, ली मस्सारी, जीन सोरेल, फ्रँको स्पोर्टेली, चार्लस बेलमाँट आणि इतरांच्या होत्या.

चित्रपटाची सुरुवात एका धार्मिक मिरवणुकीने होते. मोठ्या उत्साहाने भान हरपून लोक तिच्यात भाग घेत असतात. सर्वत्र एकच जल्लोष आणि उत्साहाचे, आनंदाचे वातावरण दिसते. आणि या उत्सवाचा धमाका सुरू असतानाच अचानक बॉम्बहल्ल्याची सूचना देणारा भोंगा सुरू होतो. अर्थातच लोकांची आश्रयासाठी धावपळ होते. पण तेथेही त्यांची चर्चा सद्यस्थितीचीच. एक जण म्हणतो, इथं बॉम्ब कशाला टाकताय, रोमवर टाका म्हणावं. त्यावर एक बाई म्हणते, “रोम नको रे बाबा. तिथं माझा मुलगा आहे. आपण बुढ्ढे मेलो तरी चालेल, पण मुलं जगली पाहिजेत.” अशा संवादांतूनच त्या लोकांच्या मनोवृत्तीवर सहज प्रकाश पडतो. तेवढ्यात कुणीतरी बातमी आणते की, इटलीच्या जनरलने युद्धबंदीला मान्यता देऊन केलेल्या तहानंतर आता युद्ध संपले. ते ऐकताच साऱ्या नेपल्समध्ये चैतन्य निर्माण होते. एकच जल्लोष सुरू होतो. युद्ध संपले! असा नारा देत सर्वजण रस्त्यांवर गर्दी करतात. धडाधडा दुकाने उघडतात. आश्रयस्थानी व अन्य ठिकाणी लपलेले लोक बाहेर पडतात. आपण जिंकलो सर्व जिनसा मोफत, असे दुकानदार सांगतात. जर्मन परत जाणार म्हणून सारे खुश असतात. एक बाई म्हणते, "ते परत गेले की माझा नवरा परत येईल."


हेही वाचा : नो मॅन्स लॅंड : मानवजातीचे प्राक्तन? - विजय पाडळकर


पण तेथील जर्मन अधिकाऱ्याला हे मानवत नाही. तो इटलीने आमचा विश्वासघात केला म्हणून आता आम्ही शहराचा ताबा घेणार, असे जाहीर करतो. आमच्या विरोधात जाणाऱ्यांना ठार करण्यात येईल, असे सांगतो. लगेच आदेश न पाळणाऱ्या एका खलाशाला गोळ्या घालून मारण्याची शिक्षा फर्मावली जाते. पण त्याबरोबरच ती शिक्षा पाहण्यासाठी सर्वांना हजर राहा, गुडघे टेकून बसा आणि त्याला मारल्यावर टाळ्या वाजवा, असेही बजावण्यात येते. नाइलाजाने लोकांकडून अनिच्छेने का होईना, त्याचे पालन होते. पण त्यामुळेच लोकांमधील विरोध तीव्र होत जातो. काही दिवसांत जर्मन नेपल्सवर कब्जा करतात. नेपल्सवासी एकत्र येऊन विचारविनिमय करत असतात. शेवटी सर्वानुमते आपण लढायचे असा निर्णय होतो. पण लढणार कसे? उत्तर येते, मिळेल त्या साधनांनी. एक परत आलेला सैनिक त्यांना लपवलेली शस्त्रे दाखवतो आणि सर्वजण ती ताब्यात घेतात. तिकडे उद्रेक वाढतच असतो. समुद्राकाठच्या इमारती मोकळ्या करण्याचा हुकूम होतो. लोकांना ते मानावे लागते. हाल होतात त्यांचे. तोच आता पुरुषांना पकडून कामासाठी घेण्यात येणार, अशी पत्रके लागतात. पण सर्वजण पुरुषांना बाहेर पडू नका, लपून बसा असे सांगतात.

काही दिवस जातात, मग घराघरात घुसून पुरुषांना बाहेर काढून नेण्यात येते. आता संयम संपत आलेला असतो. पुरुषांना धरून नेणारी मोटार बायका वाटेत अडवतात आणि पुरुष ती संधी घेऊन निसटतात. बायका सैनिकांना विरोध करतात. काहीजण होडीतून निसण्याचा प्रयत्न करतात पण एक होडी गोळीबार करून नष्ट करण्यात आल्याने त्यांच्यापुढे पर्याय उरतो तो लढ्याचा. आता ते मानसिकरीत्याही सज्ज झालेले असतात. मग कुणी थोडा जाणकार पुढाकार घेतो. दुसरीकडे पकडलेल्यांना स्टेडियममध्ये आणले जाते. त्यांच्यातील काहींची निवड गोळ्या घालून मारण्यासाठी केली जाते. त्याची अंमलबजावणी करण्याचा हुकूम होतो... तोच शेजारच्या इमारतीच्या छपरावरून गोळीबार होतो. त्यात मारणारेच मरतात, सारे पडकलेले निसटून जातात. जाताजाता चलाखीने मिळेल ती शस्त्रेही सैनिकांकडून हिसकावून घेतात. युद्धाला खऱ्या अर्थाने तोंड फुटते.

आता जमावाचे मार्गदर्शक 'मृतांची शवे बघा' असे नेपल्सवासियांना सांगतात. "अरे, ते सारे तुमच्यासाठी मेले. आता तरी जागे व्हा, जर्मनांविरुद्ध उठा" असे आवाहन करतात. जर्मनांची वाहने गल्लीगल्लीतून फिरू लागतात. लोक घरातील मिळेल ते सामान रस्त्यावर टाकून रस्तेच बंद करतात. मग रणगाडे आणले जातात. त्यांनाही थोपवण्याचा प्रयत्न होतो. पण त्यात फारसे यश येत नाही. शेवटी एक तोफगाडा ताब्यात घेण्यात यश मिळते. आता मुलेही युद्धात सहभागी होतात. आम्हालाही काम द्या असे सांगतात. सुचेल ते करतात. त्यांचीही मदत होते. त्यातच एका छोट्या मुलाचा अंत होतो. तेव्हा आता सर्वांना जाळूनच टाकायचं असं म्हणून ते निकराने तुटून पडतात. शेवटी जर्मन सैनिक पांढरा झेंडा दाखवतात. पण त्यांच्यावर विश्वास नाही असे सांगून म्हणून त्यांच्या जनरलला नेपल्सवासियांकडे ओलीस ठेवले जाते.

अखेर पराभूत झालेले जर्मन सैनिक परततात. त्यांना निरोप देताना, 'जा जर्मनीला, परत येऊ नका' अशा शब्दांत जमावाकडून निरोप दिला जातो. जर्मन जनरललाही प्रेमाने एक तरुणी "तुला बायकोची आठवण येते का?" असे विचारते त्यावर "हो मला बायको आहे आणि तिची आठवणही येते. आणि मला दोन मुलेही आहेत. एक बारा आणि एक आठ वर्षांचा" असे सांगतो. तिला वाटते, ती त्याच्या मुलांची नावे आहेत. तिचा मित्र ती त्यांची वये असल्याचे सांगतो. युद्ध संपताच वैरभावही संपल्याचं हे दृश्य कोणतीही शेरेबाजी न करता दाखवले आहे. त्यामुळेच खरे तर त्याची परिणामकारकता आणखीच वाढली आहे.

साधारण 124 मिनिटांच्या या चित्रपटात काही प्रसंग अविस्मरणीय आहेत. बरेच दिवस अन्न नसल्याने लोक कातावलेले आहेत. एक आई तिच्या मुलाला रस्त्यात थांबवते. आजूबाजूला कुणी नाही हे बघून हळूच लपवून ठेवलेला एक उकडलेला बटाटा काढते आणि त्याला खायला सांगते. ती स्वतःशी पुटपुटते, “मी तो कसा मिळवला हे त्याला कळलं तर?” तो खाताना एकदम तिच्यापुढे तो करतो, “तूही खाना, थोडी चव तरी घे.” असे सांगतो. ती कसाबसा एक घास घशाखाली उतरवते. एक जण आपल्याला पकडू नये म्हणून आपण फॅसिस्ट असल्याचे सांगतो आणि एकदम दुसऱ्याला विचारतो, “हे जर्मनमधून कसं सांगायचं?” सुधारगृहातील मुले खात बसलेल्या रेक्टरला डिवचतात. “बाहेर आम्ही लढतोय. आम्हाला खायला हवे.” तो कसाबसा त्यांना उकडलेला एकेक बटाटा देतो आणि हे शेवटचेच असे सांगतो. नंतर तोही युद्धात सामील होतो. जखमी होतो. तेव्हा तीच मुले त्याला इस्पितळात नेतात, त्याची काळजी घेतात.

एक वयस्कर पिता गाडी नाही म्हणून मुलाचे शव उचलूनच घरी नेतो. एक तरुण त्याची काळजी घेणाऱ्या तरुणीला म्हणतो, “मी तुझा एकेकाळचा प्रियकर होतो आता तुझे लग्न झालेय. तू माझी काळजी का करतेस?” ती नुसते त्याच्याकडे पाहते. बस्स. त्या नजरेतूनच ती सारं काही सांगते. काही बोलायची आवश्यकताच नसते.

खरं तर सांगण्यासारखे खूप आहे, पण जागेच्या मर्यादेत ते शक्य नाही, आणि इंटरनेटवर हा चित्रपट उपलब्ध आहे. तेव्हा, तुम्हाला तरी पाहण्यासाठी काही शिल्लक राहू दे ना!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..


'फोर डेज ऑफ नेपल्स' हा सिनेमा पाहण्यासाठीची लिंक :

 

Tags: आ. श्री. केतकर सिनेमा युद्ध युद्धपट चित्रपट समीक्षा Load More Tags

Add Comment