गृहिणीच्या प्रतिमेत अडकलेली मिसेस

प्रश्न गृहिणी असण्याचा नाही, सन्मानाचा आहे!

"यांना आवडणार नाही", "आपल्याकडे सगळ्यांना माझ्या हातच्याच पोळ्या लागतात", "आपण बाहेरच्या कुणाला स्वयंपाकघरात येऊ देत नाही" हे संवाद तुम्हालाही परिचयाचे असतील. गेल्या पिढीपर्यंत "माझी आई काहीच करत नाही/घरीच असते/housewife आहे" पासून आपण "माझी आई गृहिणी आहे, घराची काळजी घेते/homemaker आहे" इथपर्यन्त प्रवास केला आहे. पण आत्ताच्या पिढीतल्या मुलीला काय हवं आहे, हे आपल्याला समजतं का?

पद्मा गोळे यांची एक कविता आहे, "मी घरात आले". घरात नवीन आलेली सून ही कविता म्हणते आहे. त्यातलं हे एक कडवं. 

चूल म्हणाली, "तू माझी." 
मी तिचीं लाकडं झालें. 
जातं म्हणालं, "तू माझी." 
गहू झालें, ज्वारी झालें. 
उखळीतलं भात झाले; 
ताकांतली रवी होऊन 
मथणींत नाचत राहिलें.

नवीन सून त्या घराच्या एकेक जबाबदाऱ्या - घर टापटीप, स्वच्छ, सुंदर ठेवणं; स्वयंपाक करणं; घरात शांतता राहिल असं पहाणं: घरची अब्रू राखणं - आपल्या अंगावर घेते. हळूहळू या सगळ्यांत हरवत जाते, स्वतःची ओळख विसरते, या कल्पनेवर आधारित ही कविता सद्य स्थितीवरही भाष्य करते. ही अशी सून आपल्याला नवीन नाही. आपली आजी, आई, बहिण, मैत्रिण यांच्यात आपण ती अनेकदा पाहिली आहे. 

घरातल्या बाईने अशी जबाबदारी घेणं हे आपल्या इतक्या अंगवळणी पडलं आहे की या विषयावर एखादा चित्रपट निघू शकेल असं वाटणारही नाही. पण काही दिवसांपूर्वीच Mrs नावाचा हिंदी सिनेमा एका ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे, जो या विषयाला थेट भिडतो. 

2021 मध्ये, कोरोनाच्या सावलीत जगत असताना, द ग्रेट इंडियन किचन हा मल्याळी भाषेतला सिनेमा प्रदर्शित झाला. एका प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर. अजून सिनेमा थिएटर बंदच होते. चांगला सिनेमा शोधून शोधून पाहणाऱ्यांनी हा सिनेमा पाहिला आणि त्याचं खूप कौतुक केलं. गेल्या दोन वर्षांत या सिनेमाचे तमिळ आणि हिंदीत रिमेक आले आहेत. हिंदी रिमेक "Mrs" बऱ्याच चित्रपट महोत्सवात फिरला, वाखाणला गेला. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता अजून वाढली होती. 7 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, तेव्हा वेळ काढून पाहिलाच.

Mrs म्हणजे सौ. एवढीच जिची ओळख ठरते अशा रिचाची ही गोष्ट. तरूण, उत्साही रिचा लग्न होऊन एका नवीन कुटुंबात येते. हे मध्यमवर्गीय कुटुंब काही फार मोठंही नाही. शांत सासू, प्राणायाम करणारे सासरे आणि समंजस डॉक्टर नवरा! नणंद लग्न होऊन दुसऱ्या शहरात राहणारी. राहतं घर प्रशस्त. दारात गाडी. वाणसामान आणि भाजी आणून द्यायला गडी. रिचा नवीन सुनेची भूमिका छान वठवू शकेल असं पोषक (?) वातावरण! पण मग अडतं कुठे?  

घरात आल्यावर दुसऱ्याच दिवसापासूनच रिचाचं कुटुंबातलं स्थान अधोरेखित होताना दिसतं. थोड्याच दिवसांत रिचाचा सासरा आपल्या मुलीकडे रहायला गेलेल्या बायकोला फोनवर अगदी सहज, हसत हसत विचारतॊ, "आपने अपने असिस्टंट को कुछ सिखाया की नहीं!" म्हणजे आधीच्या पिढीतील "मास्टर शेफला" मदत करायला एक नवीन असिस्टंट म्हणजे सून आहे, हे स्पष्ट होतं. नृत्यात तरबेज असणाऱ्या रिचाचं पदलालित्य अडकतं स्वयंपाकघरात. हस्तमुद्रा दिसतात खरकट्या भांड्याच्या बेसिनमध्ये. आणि सुखी संसार ते एक खचलेली बाई या तिच्या भावमुद्रांचा प्रवास आपल्यासमोर येतो. 

रिचा तिच्या नवीन कुटुंबाचा भाग होण्यासाठी खूप धडपडते. घरातल्यांच्या आवडी निवडी समजून घेत, शिकत, चुकतमाकत का होईना, ती प्रयत्न करते. हे सगळं ती सुरुवातीला स्वतःहून आनंदाने करते. पण हळूहळू ती घरकामात, मुख्यतः स्वयंपाकघरावर केंद्रित असलेल्या कामांच्या रगाड्यात अडकते आणि तिचा नववधू म्हणून असलेला सुरुवातीचा उत्साह मावळतो. तिच्या लक्षात येऊ लागतं कि या "आधुनिक" कुटुंबातल्या बाईकडून अपेक्षा आहे ती केवळ स्वयंपाकघरात राहून विविध पदार्थ करणे आणि घरातल्या पुरुषांना खाऊ घालणे, या गोष्टींची. रोज सकाळी ताटात पडलेला गरम फुलका, (आजच्या काळातही) पाटा वरवंटा वापरून भरडलेले मसाले, पुरुषांनी खरकटं करून ठेवलेल्या टेबलवर जेवायला बसणं, आणि सगळ्यात कहर म्हणजे अनेक काळ ठिबकत असलेला बेसिनचा पाईप  आणि तो दुरुस्त करण्याची पूर्ण निरिच्छा - असे अनेक लहान लहान प्रसंग स्वयंपाकघरात अडकलेल्या बायकांचं शल्य समोर आणतात. 

रिचा ही आजच्या काळातली विशीतली मुलगी आहे. तिच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नवी नवरी म्हणून तिचे लाड होणं, तिने केलेल्या गोष्टींचं/स्वयंपाकाचं कौतुक होणं, नवऱ्याने प्रेम दर्शवणं अश्या तिच्या माफक अपेक्षा असाव्यात. अर्थातच या पूर्ण होत नाहीत. उलट, तिने कष्ट घेऊन सासरच्या पद्धतीनुसार केलेल्या पदार्थातही चूक काढली जाते. सासऱ्याला बिर्याणीत मीठ कमी लागतं, नवऱ्याला आईची दाल पिठीची रेसिपी बिघडल्याचा साक्षात्कार होतो, आणि पाहुण्या पुरुषाला तिने केलेली शिकंजी (लिंबू सरबत) सुद्धा अळणी लागते. 

रिचा पूर्ण सिनेमात एकदाही आपल्याला घराबाहेर गेलेली दिसत नाही. अपवाद फक्त एका वेळेचा. ती नवऱ्यासोबत तिच्या मैत्रिणीकडे जेवायला जाते. घरात नाश्त्याचं खरकटं ताटही न उचलणारा रिचाचा नवरा तिथे मात्र जेवणानंतर आवरायला मदत करू लागतो. रिचा त्यावरून त्याला चिडवते आणि त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जातो. 

या गोष्टी तर अगदी लगेच खटकतात. पण इतर कितीतरी प्रसंगातून पुरुषी सत्तेचे बारीक बारीक तपशील ही गोष्ट पकडते. 

प्रसंग 1: सुरूवातीला स्वयंपाकघरात काम करून आलेल्या रिचाच्या शरीराचा आवडणारा मादक वास तिच्या नवऱ्याला नावडेनासा होतो, जेव्हा ती तिच्या शारीरिक भावनिक गरजा व्यक्त करत तेव्हा! 

प्रसंग 2: रिचाची पाळी येते तेव्हा तिला आराम करायला सांगितला जातं (घराची तशी पद्धतच आहे, असं म्हणून). तेव्हाही नवरा हा विनोद (!) करतो, "अरे आपण तर पूर्ण प्रयत्न करत होतो तुला प्रेग्नन्ट करण्याचा" (म्हणजे चुलीत अडकली आहेस, आता मुलात अडक.)

प्रसंग 3: पाळीच्या पहिल्या दिवशी रिचाचा नवरा बाहेरून नाश्ता आणतो. स्वतःला आणि वडिलांना अशी दोन ताटं घेऊन  टेबलवर येऊन बसतॊ. किती सूक्ष्म प्रकारे  पितृसत्ता प्रकट होते बघा.

प्रसंग 4: आगंतुक आलेल्या पाहुण्याचं रिचा हसून स्वागत करते. जेवणाचा बेत ठरतो आणि पाहुणा दिलदारपणे म्हणतो, "आज मी बिर्याणी बनवतो!" आणि पुढे "रिचा, जरा तयारी कर गं सगळी, मसाला करून दे, बाकी सगळं आम्ही पुरुष करतो आज!" (बाकी सगळं म्हणजे उरलं सुरलं सोपं काम!)

प्रसंग 5: एकदा रिचा आपल्या नोकरीचा विषय काढते. "नृत्य" हे तिचं कौशल्य, त्याला दोघे छंद म्हणून मोडीत काढतात. छंदाचा का कधी व्यवसाय होतो, असंही विचारतात! एवढं होऊनही रिचा मुलाखतीला जायला तयार होते, पण तिचे सासरे चक्क "आपल्या घराण्याला शोभणार नाही" असं त्यांच्या शांत स्वरात सुनवतात. (या प्रसंगात दोन्ही पात्रांच्या शारिरीक उंचीचा फायदा घेऊन, पितृसत्ताक पद्धतीचं वरचढ ठरणं हे ज्या खुबीने दाखवलं आहे त्यासाठी छयाचित्रकाराचे विशेष कौतुक!) 

या प्रत्येक प्रसंगात, खरंतर पूर्ण सिनेमातच, घरातल्या बाईने केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट आणि पाहिलेली स्वप्नं याकडे पितृसत्ताक पद्धती कशी समजून सवरून दुर्लक्ष करते, वेळ आली तर बीमोड करते हे दाखवलं आहे. हा सिनेमा मेलोड्रामा दाखवत नाही, शारीरिक हिंसा दाखवत नाही, एका ठराविक टप्प्यापर्यंत सगळ्यांचं बोलणंही मार्दवाचं आहे. पण अनादर आहे तो घरातल्या बाईच्या व्यक्तिमत्वाचा, तिच्या करण्याचा, तिच्या असण्याचा. 

घरगुती श्रम हा एक मोठा विषय आहे. ह्या कामासाठी दिल्या गेलेल्या वेळेचे आणि केलेल्या श्रमाचे कुणालाही पैसे मिळत नाहीत. पण बऱ्याचदा ही जबाबदारी घरातील बाईची हे ठरलेलं असतं, अगदी ती नोकरी करणारी असली तरी. त्यात श्रम कमी करण्याचे आणि वेळ वाचवण्याचे उपाय करणारी बाई डोक्यात आधुनिकतेचं फॅड असलेली समजली जाते. "यांना आवडणार नाही", "आपल्याकडे सगळ्यांना माझ्या हातच्याच पोळ्या लागतात", "आपण बाहेरच्या कुणाला स्वयंपाकघरात येऊ देत नाही" हे संवाद तुम्हालाही परिचयाचे असतील. गेल्या पिढीपर्यंत "माझी आई काहीच करत नाही/घरीच असते/housewife आहे" (म्हणजे नोकरी करत नाही, पैसे कमवत नाही ) पासून आपण "माझी आई गृहिणी आहे, घराची काळजी घेते/homemaker आहे" इथपर्यन्त प्रवास केला आहे. पण आत्ताच्या पिढीतल्या मुलीला काय हवं आहे, हे आपल्याला समजतं का? स्वयंपाक हे एक जीवनावश्यक कौशल्य (life skill) आहे, हे आता सगळे मान्य करतात. पण तरीही घरातल्या मुलग्यांना, अगदी स्वतःपुरता का होईना, स्वयंपाक किंवा इतर घरकाम शिकवतात का?
 
सोशल मीडियावर सध्या या चित्रपटावर चहू अंगानी चर्चा होत आहे. कुणाला तो वास्तववादी वाटत आहे तर कुणाला "फेमिनिस्ट अजेन्डा" असलेला! काही मंडळींची मतं/प्रश्न वाचून त्यांना मूळ विषयच कळला नसल्याचं स्पष्ट होतं. तरीही सिनेमाच्या मूळ गाभ्यावर हल्ला करणाऱ्या काही मुद्द्यांचा या लेखात गोषवारा घ्यायलाच हवा. 

मुद्दा 1: एवढ्या लहान कुटुंबाचा स्वयंपाक तर  करायचा आहे, त्यात काय एवढं? 

इथे मुद्दा निवडीचा आहे. "मला आवडतं म्हणून मी स्वयंपाक करणं" आणि "मी घरातली बाई आहे म्हणून मीच नेहमी स्वयंपाक करणं." यात फरक आहे. आधी स्वतःच्या हौसेने घरकामात मदत करणारी रिचा नंतर त्यात पद्धतशीरपणे अडकते. तिच्या सोयी किंवा तिच्या बाकीच्या इच्छा तिने व्यक्त केल्यावर तिला गप्प केलं जातं. तिच्या कष्टांचं कौतुक तर दूरच, दखलही घेतली जात नाही. तिचा वेळ, श्रम आणि ओळख स्वयंपाक घराशीच जोडले जातात. 

मुद्दा 2: बाकीच्या बायका करतात की सगळं मॅनेज - घर, नोकरी, मुलं! त्या कुठे काही म्हणतात!

शांत रहाणं म्हणजे संमती नव्हे. बहुतांश वेळेला बायका त्यांना ठरवून दिलेली भूमिका चोख पार पाडायचा प्रयत्न करत असतात, त्यासाठी त्याग करायलाही तयार असतात, नव्हे त्याग करतात! त्यांना दुसरा पर्यायही नसतो. जरा आधीच्या पिढीच्या बायकांकडे पाहिलं तर हे सहज लक्षात येईल. त्यांना आता विचारलं तर हेही कळतं की त्यांना स्वयंपाक करणं आवडत होतं अशातलाही भाग नव्हता. करावं लागायचं म्हणून त्या करायच्या. 

मुद्दा 3: पुरुषही काम करतातच की! अगदी बांधकामाचं कष्टाचं काम असो की ऑफिसमधला "स्ट्रेस देणारा जॉब" असो. 

अगदी बरोबर. पण या श्रमजीवी किंवा बुद्धिजीवी कामाचा मोबदला मिळत असतो. घरकाम हा 'thankless job" आहे. बाईने तो करायचा हे गृहीत धरलं जातं. अगदी नोकरी करणारी बाई असली तरी स्वयंपाकघर, तिथल्या किराणा सामना, भाज्यांपासून ते बनणाऱ्या खाद्यपदार्थांपर्यंत, तिचीच जबादार असते. 

Mrs. सारखा सिनेमा आपल्याला एक आरसा दाखवतो. तुमच्या आजूबाजूला आता काही आधुनिक विचारांची कुटुंबं, जोडपी असतीलही. पण खोलात जाऊन निरीक्षण करून पहा. किती घरातले पुरुष जबाबदारी म्हणून स्वयंपाक घराशी निगडित कामं करतात? त्यांच्याकडे श्रम विभागणी कशी आहे? ऑप्शनचा विषय आहे की एकदा जबाबदारी घेतली की पूर्ण निभवायचा? 

Mrs. मधली रिचा वेळ येते तेव्हा स्वतःला प्राधान्य देऊ शकते. हताश होऊन आलेली परिस्थिती मान्य केली असे करत नाही. या यावर्षीच्या महिला दिनाच्या लक्षात घेउया, बाईची भूमिका केवळ सेवा करणाऱ्या घटकाची नाहीये. बाईला समान भागीदार म्हणून जगता आलं पाहिजे. सर्वांचा आदर व न्याय्य श्रम विभागणी या मूल्यांवर कुटूंब घडायला हवं. प्रत्येकाला मोकळेपणी स्वप्नं पहाण्याची आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. 

पद्मा गोळेंच्या कवितेतील बाई म्हणतेच ना, 

आता सोंगं पुरे झालीं; 
सारीं ओझीं जड झालीं.
उतरून ठेवून आता तरी 
माझी मला शोधू दे; 
तुकडे तुकडे, जमवू दे. 
विशाल काहीं पुजू दे. 
मोकळा श्वास घेऊं दे; 


Mrs. (मिसेस)
दिग्दर्शक -
आरती कडव
पटकथा लेखक - हरमन बावेजा, अनु सिंह चौधरी
निर्माते - हरमन बावेजा, पम्मी बावेजा, स्मिता बालिगा, अब्दुल अझीझ मकानी, ज्योती देशपांडे
अभिनय - सान्या मल्होत्रा, निशांत दहिया, कंवलजीत सिंग
प्रदर्शन दिनांक - 7 फेब्रुवारी 2025
चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.


- वृषाली गटणे
vrushalee.gatne@gmail.com

(लेखिका कॉर्पोरेट लर्निंग आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात कार्यरत असून त्या सामाजिक सांस्कृतिक विषयांवर लहान मुले व मोठ्या वाचकांसाठीही लेखन आणि कविता अभिवाचन करतात.)

Tags: महिला दिन मिसेस mrs चित्रपट हिंदी चित्रपट महिला स्त्रीवाद गृहिणी Load More Tags

Comments:

Shailesh Deshpande

अप्रतिम लिहिलं आहे Vrushali.

Jayant Ghate

सासरी लग्न करून आलेल्या मुलीला "आमच्या घरी सुरांनी करीयर करण्याची पद्धत नाही. दुपारच्या झोपा काढण्याऐवजी एखादी पार्ट टाईम नोकरी करायला हरकत नाही" असं सुनावणारा सासरा लगेचच मुलीच्या मनातून कायमचा उतरला तर आश्चर्य वाटायला नको. तुमच्या घरातले कायदे सुनेवर लादण्यापूर्वी किमान तिची इच्छा विचारण्याची माणुसकी दाखवतील का सासरची माणसं? नपेक्षा यांना सुनेऐवजी एक मुकाट्याने काम करत राहणारी चोवीस तासांसाठीची मोलकरीण हवी होती असा समज झाला तर तिची काय चूक?

अनुराधा गटणे

साध्या साध्या हक्चांसाठी "संघर्ष "करावा लागणं यातच स्त्रीचा पराभव आहे.पुरषाप्रमाणेच तीचे हक्क तीला सहज,आपसुक का मिळत नाहित?भांडून झगडून मिळवणं आणि सन्मानानी,न्यायानी मिळणं जेंव्हा सुरू होईल तो सुदिन.

Anand Gosavi

स्त्री आणि पुरुष ही समाज किंवा आर्थिक व्यवस्था नसून कुटुंब व्यवस्था आहे. कोणत्याही व्यवस्थापन शास्त्रात श्रम विभागणी केलेली असते. तदनुसार, झालेली स्त्री पुरुष श्रम विभागणी ज्या स्त्रीला अमान्य असेल, तिने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली पाहिजे आणि आवश्यक असेल, तर बंड म्हणजे आक्रमक भूमिका घेऊन आपली अस्मिता उघड केली पाहिजे. तरच ही स्त्रीची कोंडी होणार नाही. सुधारणावादी पुरुषांनी ह्याबाबतीत पुढाकार घेऊन योग्य ते कार्य केले आहे. ह्यापुढील स्त्री अस्मिता पुढे नेण्याचे काम स्त्रियांनीच संघर्षवादी भूमिका घेऊन केलें पाहिजे. सर्व बाबतीत पुरुषांकडून स्त्री अस्मिता पुढे नेण्याची अपेक्षा " सहानुभूती कमावणारी " स्त्री अशीच राहील.

Add Comment

संबंधित लेख