द एलिफंट व्हिस्परर्स : नि:शब्दाचे कोडे

2023 चा ऑस्करविजेत्या भारतीय लघुपटाचा परिचय..

alphauniverse.com

‘प्राण्यांकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन वेगळ्या नजरेतून मांडणं’ हा या डॉक्युमेंटरीचा हेतू असल्याचं कार्तिकीनं सांगितलं आहे. याचबरोबर पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व आणि त्याचं खरं प्रयोजन परत एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे असंही ही डॉक्युमेंटरी पाहताना जाणवतं. पर्यावरणात होत गेलेले बदल, माणसांची राक्षसी हाव जग गिळंकृत करत असल्यामुळे दिवसेंदिवस कमी होत जाणारी प्राण्यांची निवासस्थानं आणि प्राण्यांबद्दलची आपली काहीशी विकृत होत गेलेली दृष्टी असं सगळं या डॉक्युमेंटरीत दिसतं. 

“तू जर माझ्या अंगावर तुझा भार टाकलास तर मार देईन हं” असं ऑस्करविजेत्या ‘एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंटरीमधली बेल्ली हत्तीच्या एका पिल्लाला म्हणते. त्या पिल्लाचं नाव आहे रघु. रघुला बेल्ली काय म्हणते आहे ते नीट कळतं आणि तो चक्क अंग दुमडून घेऊन अगदी हलकेच बेल्लीच्या खांद्यावर मान टाकतो. दुसऱ्या एका प्रसंगात बोम्मन आणि बेल्ली हे हत्तींचा सांभाळ करणारे दोघं जण रघुला घास भरवत असतात आणि तो ते घास जमिनीवर टाकून देतो. दोघंही त्याच्या बाळलीला पाहत मायेनं त्याला भरवत राहतात. हे दृश्य पाहताना रघु हा हत्ती आहे आणि ते दोघं मनुष्यप्राणी आहेत हे आपण विसरुन जातो. आपल्याला दिसतात लहान मुलाला मायेनं आणि ममतेनं घास भरवणारे आई-बाप..! ‘एलिफंट व्हिस्परर्स’ अनेक दृष्टिकोनांमधून मनाला स्पर्श करत जाते. पण या डॉक्युमेंटरीमधला सर्वात लडिवाळ भाग, माणूस आणि प्राणी यांचं साहचर्य किती प्रखर आहे त्याची जाणीव उलगडत जाणं हा आहे. 

‘राजहंस सांगतो, कीर्तीच्या तुझ्या कथा’ या गाण्यामधून किंवा रामायणात रावणानं सीतेला पळवून नेताना त्याच्याशी झुंजत असताना जखमी झालेल्या जटायूपक्ष्यानं रामाला मार्ग सांगताना ‘अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता’ असं सांगण्यातून माणसांशी बोलणारे पक्षी सहज समोर येतात.

प्राणी-पक्ष्यांची भाषा माणसाला कळणं यात आपल्याला वेगळं काहीच वाटू नये असे उल्लेख पुराणकाळापासून सातत्यानं जगभरच्या साहित्यात येतात. उदाहरणार्थ, स्कॅंडिनेव्हियन देशांमध्ये ओदिन हा देव त्याच्या ह्युजिन आणि मुनिन या दोन कावळ्यांमार्फत मर्त्य मानवांची खबरबात मिळवतो असा उल्लेख त्यांच्या पुराणात सापडतो. पक्ष्यांची भाषा कळणं हे ख्रिस्तपूर्व काळापासून विद्वान माणसांचं लक्षण समजलं जायचं. स्वीडनचा राजा ‘डॅग द वाईज’ यानं एक चिमणी पाळली होती. ती जगभर फिरुन राजाकडे यायची आणि त्याला बातम्या सांगायची. ग्रीक पुराणात अपोलोनियस र्‍्हॉडिअस या कवीनं लिहिलेल्या महाकाव्याचा जेसन हा नायक आहे. त्याच्या आर्गो नावाच्या जहाजाच्या प्रमुखाला पक्ष्यांची भाषा उत्तम कळत असते. तसंच टायरेसियस या ग्रीक अंध विद्वानाला अथेना या बुद्धीच्या देवतेकडून संदेश घेऊन आलेल्या पक्ष्यांची भाषा समजत असते. ‘इसापच्या नीतीकथा’ लिहिणाऱ्या ग्रीसमधल्या इसापला प्राणी-पक्ष्यांची भाषा कळत होती असं मानलं जातं. विष्णुशर्मा याचं पंचतंत्र वाचल्यानंतर त्यालाही ती भाषा कळत असावी असा अंदाज बांधता येतो. 

‘एलिफंट व्हिस्परर्स’ पाहताना ही सगळी उदाहरणं आठवतात. पण त्याचबरोबर आजच्या काळातली कित्येक माणसं आठवतात. आपापल्या पाळलेल्या कुत्र्यावर किंवा मांजरावर नितांत प्रेम करणारी, त्यांच्या बारीकशा हालचालींमधून त्यांचं मनोगत सहज कळणारी आणि आपल्या दिवंगत पाळीव प्राण्याच्या आठवणी उरभरल्या अश्रूंनी सांगणारी..! माणूस आणि प्राणी यांच्यातल्या साहचर्याची अशीच सुरेख कथा ‘द इअरलिंग’ या कादंबरीत दिसते. एका हरणाच्या गोंडस पिल्लाभोवती गुंफलेली ही कथा माणूस, जंगल आणि प्राणी यांच्यातल्या साहचर्याबद्दल खूप महत्त्वाचं सांगून जाते. राम पटवर्धन यांनी ‘पाडस’ या नावानं केलेला या पुस्तकाचा अनुवाद प्रत्येक मराठी वाचकाला सहसा ठाऊक असतोच. 

असंच एक गोंडस हत्तीचं पिल्लू कार्तिकी गोन्साल्व्हिस हिला बेंगलोरपासून उटीकडे जातानाच्या प्रवासात दिसलं. 2017मध्ये या प्रवासात कार्तिकीला रघु या त्या हत्तीच्या पिल्लाला प्रेमानं अंघोळ घालणारा एक माणूस दिसला. ‘एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंटरीचा प्रवास कार्तिकीच्या या प्रवासात सुरु झाला. कार्तिकी तेव्हा रघुच्या प्रेमातच पडली. 

निलगिरीनं लपेटलेल्या मदुमलाईच्या जंगलातला मायर नदीच्या किनाऱ्यावरचा ‘थेप्पाकडू एलिफंट कॅंप’ गेली 100 वर्षं कार्यरत आहे. आशियातला हत्तींसाठी असलेला तो सर्वात जुना कॅंप आहे. कार्तिकीला तिथेच रघु प्रथम दिसला होता. तेव्हा तो तीन महिन्यांचा होता. कार्तिकीचं बालपण दक्षिण भारतातल्या निसर्गातच गेलं आहे. तिचे आईवडील कायम झरे, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयं अशा ठिकाणी तिला घेऊन जायचे. कॅंपिंगची घरातल्या सगळ्यांनाच आवड होती. कार्तिकीची आई प्राण्यांवर नितांत प्रेम करणारी आहे आणि वडील फोटोग्राफर आहेत. तिची आजीदेखील जवळच्या जंगलात शाळेच्या सहली घेऊन जायची. अशा जंगलप्रेमी वातावरणात वाढलेल्या कार्तिकीनं कोईमतूरमधून ‘व्हिज्युअल कम्युनिकेशन्स’चं शिक्षण घेतलं. नंतर ती छायाचित्रण, वाईल्डलाईफ, प्रवास आणि जंगल / माणूस यांच्या साहचर्याचा अभ्यास यात गुंतत गेली. 

रघुला पाहिल्यानंतर डॉक्युमेंटरी बनवायची असं तिनं ठरवलं असलं तरी मार्ग सोपा नव्हता. तिनं आधी रघुचा, त्याचा सांभाळ करणाऱ्या बोम्मन आणि बेल्ली यांचा तसंच तिथल्या गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. रघुबरोबर तिचं एक नातं जुळलं. त्याला जिभेचा खरारा केलेला आवडतो असं कळल्यावर तासन्तास ती रघुच्या जिभेचा खरारा करायची. दोघं पाण्यात मस्ती करायचे. त्यानंतर काही काळानं कार्तिकीनं ‘नेटफ्लिक्स’ला एक फूटेज पाठवलं आणि त्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये ते स्वीकारलं. या सुमारास ‘सिख्या एंटरटेनमेंट’ कंपनीनं या डॉक्युमेंटरीची निर्मिती करायला होकार दिला. ‘गॅंगज् ऑफ वसेपूर’सारखे चित्रपट निर्माण करणाऱ्या या निर्मितीसंस्थेची प्रमुख आहे गुणीत मोंगा. ‘पीरीयड. एंड ऑफ सेंटेन्स’ या तिच्या शॉर्ट फिल्मला 2019मध्ये ऑस्कर पारितोषिक मिळालं होतं. 

कार्तिकीनं यानंतर पाच वर्षं 450 तासांचं चित्रीकरण करुन 39 मिनिटांची एलिफंट व्हिस्परर्स ही डॉक्युमेंटरी तयार केली. 2023 मधल्या 95व्या ऑस्कर सोहळ्यात या डॉक्युमेंटरीला पारितोषिक मिळाल्यावर “भवितव्य म्हणजे जोखीम पत्करणं आणि ते भवितव्य इथे माझ्या हातात आहे” असे उद्गार गुणीत मोंगा हिनं काढले होते. “या चित्रपटासाठी आर्थिक सहाय्याबरोबरच निरनिराळ्या परवानग्या आणि परवाने मिळवणं, जंगली प्राणी वावरत असलेल्या जंगलात सतत काम करणं आणि एक स्त्री-दिग्दर्शिका म्हणून आव्हानं पेलणं अवघड होतं” असं कार्तिकी गोन्साल्व्हिसचं म्हणणं आहे.  

कार्तिकी गोन्साल्व्हिस

नैसर्गिक प्रकाशात ही डॉक्युमेंटरी चित्रित करण्याचं आव्हान कार्तिकी गोन्साल्व्हिस, क्रिश मखिजा, आनंद बन्सल आणि करण थापलियाल यांनी उत्कृष्टपणे पेललं आहे. डॉक्युमेंटरीमध्ये सतत एक उबदारपणा आणि लोभस उजेड जाणवत राहतो. झाडांचे बदलते रंग, नदीचं आटत गेलेलं पात्र, जंगलातले वणवे असं ऋतुचक्र समोर येतं. आनंद, दु:ख, भीती, प्रेम अशा सगळ्या भावना जंगलाशी, ऋतूंशी, प्राण्यांशी जोडलेल्या या छायाचित्रणातूनही जाणवत राहतात. 

यातले ‘एलिफंट व्हिस्परर्स’ आहेत बोम्मन आणि बेल्ली. हे जोडपं आजही मुदुमलाई टायगर रिझर्व्ह या जंगलात हत्तींच्या पिल्लांची काळजी घेतं. बोम्मन आणि बेल्ली हे दोघं एकमेकांना तामिळनाडुच्या मुदुमलाईच्या जंगलातल्या हत्तींच्या कॅंपमध्येच प्रथम भेटले. हत्तींची काळजी घेणारे दोघं हे कट्टुनायकन (जंगलाचे राजे) जमातीतले आहेत. या जमातीची संस्कृती जंगलाशी कायमस्वरुपी जोडलेली आहे. तिथेच जन्मलेली ही माणसं जंगलातल्या आयुष्याबरोबर एकरुप होऊन राहतात.

बोम्मनचे वडील आणि आजोबा हेदेखील हत्तींचा सांभाळ करणारे माहुत होते. त्याचे वडील गेल्यानंतर तो आपसूकच माहूत बनला. बेल्ली मात्र हत्तींची काळजी घेण्यासाठी नेमलेली एकमेव स्त्री आहे. त्या दोघांच्या आयुष्याचा जंगल हा एक अनिवार्य हिस्सा आहे. खरं तर प्राण्यांमुळे या दोघांना त्रासही झालेला आहे. एका रानटी हत्तीनं बोम्मनवर हल्ला केल्यावर मोठ्या हत्तींना सांभाळणं त्यानं बंद केलं होतं. तसंच बेल्लीच्या नवऱ्याला वाघानं मारलं होतं. “मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलं आहे. माझा नवरा एका वाघानं केलेल्या हल्ल्यात मरण पावला. त्यातून मला जंगलाची भीती वाटायला लागली. वाघ पाहिला तर मला भीती वाटते. पण मी आदिवासी आहे आणि आमची माणसं या जंगलाचाच एक भाग आहेत. आम्हा कट्टुनायकन लोकांना जंगलाचं भलं चाललेलं असावं हे सर्वात महत्त्वाचं वाटतं” असं बेल्ली एका प्रसंगात म्हणते. हे लक्षात घेता त्या दोघांच्या प्राण्यांच्या प्रेमाबद्दलच्या प्रामाणिकपणाची खात्री पटते.

या सगळ्यालाच शोकाची आणि शोकांतिकेची झालर आहे. रघुचं आयुष्यही या दोघांसारखंच एकाकी, दु:खी, शोकाचं होतं. त्याची आई जवळच्या गावात चाललेली असताना विजेचा धक्का लागून मरण पावली होती. त्यामुळे तीन महिन्यांचा रघु एकटा, असहाय्य आणि अनाथ झालेला होता. मुळात तो जगेल का, याबद्दलच सर्वजण साशंक होते. सरकारी अधिकारी या पिल्लाला कळपाबरोबर सोडण्यात अयशस्वी झालेले होते. अशा परिस्थितीत बोम्मन आणि बेल्ली यांनी मात्र रघुला वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. महत्त्वाचं म्हणजे, आपण कुणाचेतरी आहोत ही बिलॉंगिगनेसची भावना त्या पिल्लाला सर्वाधिक महत्त्वाची आहे, हे त्या दोघांनी जाणलं. मग या तिघांचं एक कुटुंब तयार झालं. 

ही डॉक्युमेंटरी पाहताना रघु, त्याची मस्ती, बोम्मन आणि बेल्लीचं त्याच्यावरचं विलक्षण प्रेम बघत राहावंसं वाटतं. रघुबरोबरच ते सांभाळ करतात तो अम्मुचा. अम्मु हे पिल्लू सांभाळायला बोम्मन, बेल्लीकडे आल्यावर भावंडांमधला हेवा आणि मत्सर रघुच्या मनात उफाळून येतो. मात्र बोम्मन आणि बेल्लीप्रमाणे रघुही नंतर अम्मूकडे प्रेमानं पाहायला शिकतो. हे सगळं सुरेखपणे समोर येत राहतं.

बोम्मन आणि बेल्ली या दोघांमधलं प्रेम हे रघुचा सांभाळ करत असताना कसं फुलत गेलं हे या डॉक्युमेंटरीमध्ये कळतं. दोघं एकत्र जेवत असताना त्यांचे रुसवेफुगवे, लाजणं हे विलक्षण हळवं करणारं आहे. रघु आणि अम्मुची काळजी घेताघेता ते दोघं एकमेकांची काळजी कशी घेतात ते पाहणं सुखद आहे. बोम्मन आणि बेल्लीचं लग्न होतं तेव्हा सगळ्या बायका नटुनथटुन फेर धरुन शेकोटी पेटवून नाच करतात, तर पुरुष हत्तींना नटवतात. सगळ्यांचे हसरे चेहरे या सोहळ्याच्या आनंदाची साक्ष पटवतात. आज हत्तीची दोन अनाथ पिल्लं वाढवणारे बोम्मन आणि बेल्ली हे दक्षिण भारतातलं पहिलं जोडपं आहे.

माणूस आणि प्राणी यांच्यातल्या साहचर्याचा समांतर प्रवास उलगडणारी कथा हे या डॉक्युमेंटरीचं वैशिष्ट्य आहे. बोम्मन, बेल्ली, अम्मु आणि रघु यांच्याभोवतीच्या जंगलात आपल्याला सतत घुबडं, फुलपाखरं, वाघ, कोंबड्या दिसत राहतात. म्हशींच्या पाठींवरचे बगळे, हत्तींच्या वाटेतली रानडुकरं आणि हत्तींचं उरलेलं अन्न खाणारी माकडं अशी दृश्यं साहचर्याची साक्ष पटवतात.  

मात्र या सगळ्याला एक दु:खद बाजू आहे. खरं तर हत्ती प्राणी हा भारतीय लोककथांमध्ये दैवत मानला जातो. पण आशियातल्या हत्तींना राहण्याची जागा कमी होत जाणं आणि पर्यावरणबदलाची प्राण्यांना भेडसावणारी समस्या यांचं रघु हा प्रतीक आहे. भारताच्या दक्षिण भागात माणूस आणि प्राणी यांच्यातलं द्वंद्व रोजचं झालं आहे. हत्तींनी केलेला विध्वंस माध्यमांमधून समोर येतो. पण मुळात त्यांच्या जंगलातल्या अधिवासावर मनुष्य आक्रमण करत चालला आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. गेल्या आठ वर्षांत भारतात रघुच्या आईला बसला तसे विजेचे धक्के बसून 550 हत्ती मरण पावले आहेत असं सरकारी अहवालच सांगतो. अर्थात, याच काळात अनेक माणसं हत्तींच्या उन्मादानं मरण पावली हेही खरं आहे. ‘हत्ती इलो’ या अजय कांडर यांच्या कवितेची इथे अपरिहार्य आठवण होते. गावं उध्वस्त करणाऱ्या हत्तींच्या रुपात आजची उध्वस्त समाजव्यवस्थाच या दीर्घकवितेत उतरली आहे. 

‘प्राण्यांकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन वेगळ्या नजरेतून मांडणं’ हा या डॉक्युमेंटरीचा हेतू असल्याचं कार्तिकीनं सांगितलं आहे. याचबरोबर पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व आणि त्याचं खरं प्रयोजन परत एकदा तपासून पाहण्याची वेळ आली आहे असंही ही डॉक्युमेंटरी पाहताना जाणवतं. पर्यावरणात होत गेलेले बदल, माणसांची राक्षसी हाव जग गिळंकृत करत असल्यामुळे दिवसेंदिवस कमी होत जाणारी प्राण्यांची निवासस्थानं आणि प्राण्यांबद्दलची आपली काहीशी विकृत होत गेलेली दृष्टी असं सगळं या डॉक्युमेंटरीत दिसतं. 

यावरुन ‘सॉयलेंट ग्रीन’ हा 1973 सालचा सायफाय चित्रपट आठवला. त्यातल्या एका दृश्यात एकजण ‘हे जे अन्न आपण खातोय ते प्रत्यक्षात मृत माणसांपासून बनवलेलं आहे..’ (सॉयलेंट ग्रीन इज पीपल.) असं ओरडतो. पृथ्वीवरची संसाधनं संपल्यामुळे 2022 मध्ये जगात काय घडेल त्याचं चित्र या चित्रपटात रंगवलेलं होतं. 'आत्ता आपण वापरतो तितकीच नैसर्गिक संसाधनं वापरत राहिलो तर 2030 सालापर्यंत आपल्याला दोन पृथ्वी लागतील' असा 'स्टीलिंग फ्रॉम अवर चिल्ड्रेन' या पुस्तकातही उल्लेख आहे.  

आपण ही नैसर्गिक संसाधनं किती ओरबाडतो आहोत याच्या मोजमापासाठी पर्यावरणीय पदचिन्ह (इकॉलॉजिकल फूटप्रिंट) ही संकल्पना वापरली जाते. यानुसार औद्योगिक उत्पादनं, अन्नधान्यं इ. गोष्टींमध्ये हवा, पाणी आणि जमीन किती वापरली गेली ते आपण मोजू शकतो. उदाहरणार्थ, कोलाच्या 300 मिलिलीटर कॅनसाठी किती पाणी लागलं हे शोधायचं झालं तर केवळ कोलामध्ये किती पाणी वापरलं हे मोजून चालत नाही. त्यासाठी कारखान्यात केलेला पाणीवापर, त्यातल्या साखरेसाठी केलेला पाणीवापर, कॅन तयार केलेल्या अ‍ॅल्युमिनियमसाठीचा पाणीवापर अशा गोष्टी गृहीत धराव्या लागतात. थोडक्यात, 300 मिलिलीटर कोलाचा कॅन तयार करायला कित्येक लिटर पाणी खर्च झालेलं असतं. उदाहरणार्थ, भारतात प्लाचिमाडा या केरळमधल्या गावात कोलाच्या कारखान्यामुळे आजूबाजूचे सगळे जलस्त्रोत आटले आणि असलेलं पाणी रसायनांमुळे प्रदूषित झालं. अशा उत्पादनांमुळे लोकांना प्यायला पाणी नाही आणि धनिकांची तहान भागवायला पाण्याबरोबरच महागडे कोलाचे कॅन उपलब्ध आहेत हे चित्र निर्माण होतं. 

गेल्या शतकात दोन्ही महायुध्दांमुळे पर्यावरणावर अतोनात दुष्परिणाम झाले. शस्त्रास्त्रं तयार करण्यासाठी लागणारे धातू बेसुमार प्रमाणात वापरले गेले. अणुबॉंबच्या चाचण्या घेतलेल्या ठिकाणची जैवविविधता नष्ट झाली. समुद्रातही युध्द लढल्यामुळे तिथल्या अनेक प्रजाती संपल्या. रसायनांमुळे प्रदूषणाने हवा, पाणी आणि मातीची प्रत घटली. तशातच पारंपरिक शेती न करता जागतिक स्पर्धेच्या रेट्यातून घेतलेल्या पिकांमुळे जमिनीची झालेली धूप, जमिनीतले आटत जाणारे पाण्याचे स्त्रोत, बेसुमार प्रमाणात मासेमारी झाल्यामुळे उद्भवलेल्या समस्या, वृक्षतोडीमुळे कमी होत जाणारी जंगलं आणि शेतीयोग्य जमीन कमी होत जाणं हे भीषण परिणाम आहेत. पृथ्वीवरच्या 800 कोटी लोकांना पुरेल इतकं अन्न उत्पादन करणं हेच आव्हान असल्यामुळे आपण जंगलांवर अतिक्रमण करत चाललो आहोत. रघुच्या आईसारखे अनेक प्राणी हे या अतिक्रमणाला बळी पडत चालले आहेत.

‘एलिफंट व्हिस्परर्स’ पाहताना सामाजिक पातळीवर अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत गेली. ती गोष्ट म्हणजे ‘नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स – एनआय’ ओळखण्याची समाजात असलेली गरज. एनआयबद्दल बोलायचं झालं तर ‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ हे कृष्णमेघ कुंटेचं पुस्तक आठवतं. वेगळं करिअर म्हणजे काय याचा तो एक वस्तुपाठ होता. कृष्णमेघ कुंटे याच्याकडे होता तो एनआय. मजा म्हणजे, ‘एलिफंट व्हिस्परर्स’च्या टीममध्ये एक नॅचरलिस्ट होता. त्यानं टीमला जंगलात कसं वागायचं याचं मार्गदर्शन केलं होतं.

‘एनआय’चा इतिहास पाहायचा झाला तर केन रॉबिनसन या शिक्षणतज्ञाच्या टेड टॉकचं शीर्षक आठवतं. ते शीर्षक होतं. – ‘डू स्कूल्स किल क्रिएटिव्हिटी?’. वाचन, लिखाण आणि गणिती कौशल्यांना शाळेत पराकोटीचं महत्त्व दिल्यामुळे मुलांमधली कौशल्यं दडून राहतात किंवा मरुन जातात असा या टेड टॉकचा गाभा होता.

याची सुरुवात कुठून झाली? तर ‘आयक्यू टेस्ट – इंटेलिजन्स कोशंट टेस्ट’ ही बुध्दिमत्तामापन पध्दत आल्फ्रेट बिने या फ्रेंच मानसशास्त्रज्ञानं विसाव्या शतकात विकसित केली. आयक्यू टेस्टनुसार जास्त गुण म्हणजे तुम्ही स्मार्ट आहात याची खात्रीच आणि यात कमी गुण मिळाले तर… काय समजलं जातं ते सर्वजण जाणतातच. जास्त आयक्यू संधींचे अनेक दरवाजे उघडतो आणि कमी आयक्यूला करिअरच्या मर्यादित संधी उपलब्ध असतात असं आजही सर्रास मानलं जातं. 

फक्त ‘इंटेलिजन्स कोशंट’वरुन एखाद्याची बुध्दिमत्ता मोजता येते असं 1967 साली होवार्ड गार्डनरच्या ‘प्रोजेक्ट झिरो’च्या आधीपर्यंत समजलं जात होतं. कला, मानवतावाद आणि विज्ञान या शाखांमध्ये आकलन, विचार आणि सृजनशीलता या गोष्टी समजून घेऊन विकसित करण्याचा अभ्यास म्हणजे प्रोजेक्ट झिरो. होवार्ड गार्डनर हा हार्वर्ड विद्यापीठाच्या या प्रोजेक्टचा संचालक आहे. 

याच काळात डॅनियल गोलमन यानं ‘इमोशनल आणि सोशल इंटेलिजन्स’ या संकल्पना मांडल्या. तर होवार्ड गार्डनरनं ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ ही संकल्पना प्रोजेक्ट झिरो अंतर्गत केलेल्या अभ्यासावरुन विकसित केली. या क्षमता ओळखण्यासाठी होवार्ड गार्डनर यानं आपल्या मल्टिपल इंटेलिजन्स या थिअरीत भाषाविषयक – लिहिण्याचं आणि बोलण्याचं भाषाकौशल्य (भाषातज्ञ, लेखक, कॉमेडियन); लॉजिकल-मॅथेमॅटिकल–संख्याविषयक (शास्त्रज्ञ, इंजिनिअर); संगीतविषयक – गायन किंवा संयोजन (गायक, वादक, गीतकार, संगीतसंयोजक); स्पटायल – विश्लेषण कौशल्य (स्थापत्यशास्त्रज्ञ, इंटिरिअर डेकोरेटर); बॉडी-कायनेस्थेटिक – नृत्य किंवा अ‍ॅथलेटिक क्षमता (नर्तक, टेनिस किंवा इतर खेळाडू, क्रीडाप्रशिक्षक); इंटरपर्सनल – इतरांना समजून घेण्याची आणि त्यांच्याशी साहचर्य साधण्याची क्षमता (शिक्षणतज्ञ, समुपदेशक), इंट्रापर्सनल – स्वत:ला समजून घेण्याची क्षमता (समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ) अशा सात बुध्दिमत्ता मांडल्या. 1995 साली गार्डनरनं त्यात नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स (एनआय) या आठव्या प्रकाराची भर घातली. भोवतालचा निसर्ग, पर्यावरण, प्राणीजगत समजून घेऊन त्याबद्दल माहिती गोळा करुन, त्यावर प्रक्रिया करण्याची विशेष क्षमता असणाऱ्यांचा एनआय जास्त असू शकतो. ते पक्षीनिरीक्षक, पर्यावरणतज्ञ असं करिअर करु शकतात. 

एका क्षेत्रात यशस्वी न होऊ शकलेली व्यक्ती दुसऱ्या क्षेत्रात अमाप यशस्वी होऊ शकते ही संकल्पना मल्टिपल इंटेलिजन्सवरुन समोर आली. आयक्यूत मोजल्या जाणाऱ्या गणिती किंवा भाषिक बुध्दिमत्ता या माणसाच्या आयुष्यात तो काय करिअर करु शकेल याच्या शक्यता आजमावण्यासाठी पुरेशा नसतात असं महत्त्वाचं विधान होवार्ड गार्डनरच्या या संकल्पनेनं केलं. आज गार्डनरच्या मल्टिपल इंटेलिजन्सबद्दल अनेक लोकांना माहिती असलं तरीही करिअर निवडताना या पर्यायांचा विचार सहजी केला जात नाही. मल्टिपल इंटेलिजन्स मान्य केला तर ‘तुम्ही किती स्मार्ट आहात?’ हा प्रश्न किंचित बदलून ‘तुम्ही कशात स्मार्ट आहात?’ हे स्वत:ला विचारायला हवं. तुमच्यातल्या कौशल्यांची यादी करायला हा प्रश्न सोपा पडतो. 

आयक्यूमुळे तुमचं संवादकौशल्यं किंवा गणिती कौशल्यं समजू शकतात पण तुमच्यातली सृजनशीलता, पर्यावरणाबद्दलच्या किंवा भावनिक क्षमता त्यातून कळूच शकत नाहीत. एखादी संगीतरचना करणं, चित्र काढणं, राजकीय मोहीम राबवणं किंवा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना बनवणं, अवघड परिस्थिती आणि अवघड माणसं हाताळणं यातलं कोणतंही कौशल्य आयक्यू मोजू शकत नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांचं यश मोजताना शिकायच्या वेगळ्या पध्दती, पर्यायी पध्दती आणि यशाची वेगवेगळी मोजमापं असतात हे मान्य करावं लागतं. उदाहरणार्थ, मोझार्ट, हेन्री फोर्ड, महात्मा गांधी, आईनस्टाईन, चार्ली चॅप्लीन या व्यक्तींमध्ये अशा वेगवेगळ्या बुध्दिमत्ता दिसतात. 

मल्टिपल इंटेलिजन्सचा उपयोग कसा होतो? तर आपल्या आवडीनिवडी म्हणजेच आपला इंटेलिजन्स ओळखून काम केलं तर स्वत:ला आणि इतरांना ते आनंददायक होतं. उदा. सी.ए. म्हणून स्वतचा व्यवसाय वाढवायचा असेल तर अकाउंटिंग तर यायला हवंच पण लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्यही हवं. अंतर्मुख (इंट्रोव्हर्ट) असणाऱ्यांनी शक्यतो एकट्यानं काम करण्याची आवश्यकता असणाऱ्या म्हणजे संशोधन, विश्लेषण, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग, कला अशा क्षेत्रांत करिअर करायला हवं. यासाठी करिअर निवडताना त्या करिअरमध्ये काय काम करणं अपेक्षित आहे आणि ते आपल्या कौशल्यांशी जुळतं का, याचा विचार करणं आवश्यक आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे बेरोजगारी वाढेल असा धोका वाटणाऱ्या आताच्या समाजात तर करिअरच्या वेगळ्या वाटांचा आणि एनआयचा विचार अत्यावश्यक आहे. 

या सगळ्याचा विचार केला तर ‘एलिफंट व्हिस्परर्स’सारखे चित्रपट आणि त्यांचे विषय खूप महत्त्वाचे ठरतात. पाहायला गेलं तर भारतातून निर्माण झालेल्या वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मानसन्मान गेल्या काही वर्षांत मिळू लागले आहेत. मागच्या वर्षी रिंकू थॉमस आणि सुश्मित घोष यांच्या ‘रायटिंग वुईथ फायर’ या डॉक्युमेंटरीला नामांकन मिळालं होतं. ‘खबर लहरिया’ या दलित महिलांनी चालवलेल्या भारतातल्या एकमेव वृत्तपत्रावर ही डॉक्युमेंटरी आधारित होती. याच भागात या वर्षी ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ या शौनक सेनच्या फिल्मला नामांकन मिळालं. दिल्लीमध्ये घारींवर इलाज करणारा दवाखाना चालवणाऱ्या दोन मुस्लीम भावांवर ही फिल्म आधारित आहे. दूषित हवेनं भरलेल्या आणि सामाजिक वातावरणही गढूळलेल्या असणाऱ्या या शहरात या दोन तरुणांचं घारींवरचं प्रेम आपल्या मनात ठसतं. ‘कान चित्रपट महोत्सवा’त या चित्रपटाला पारितोषिक मिळालं आहे. 


हेही वाचा : ‘खबर लहरिया’च्या ब्युरो चीफ मीरा देवी यांच्याशी संवाद...


पायल कपाडिया हिच्या ‘अ नाईट ऑफ नोईंग नथिंग’ या डॉक्युमेंटरीला हेच पारितोषिक मागच्या वर्षी मिळालं होतं. जातीव्यवस्थेचा गुंतागुंतीचा प्रश्न यात मांडला होता. शर्ली अब्राहम आणि अमित मधेसिया यांची ‘सिनेमा ट्रॅव्हलर्स’; खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांची ‘अ‍ॅन इनसिग्निडफिकंट मॅन’ आणि सर्वनिक कौरची ‘अगेन्स्ट द टाईड’ या वास्तववादी फिल्म्सदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहेत. भारतात या डॉक्युमेंटरीज्साठी आर्थिक सहाय्य हा कळीचा मुद्दा आहे. तसंच त्यांना इथे फारशी लोकप्रियतादेखील लाभत नाही. यामागची कारणं मुळातून शोधण्याची म्हणजेच करिअरचा वेगळा विचार करायची गरज सर्व पातळ्यांवर निर्माण झाली आहे असंच म्हणावं लागेल. 

‘आपल्यामागे काय होतं आणि आपल्यासमोर काय आहे हे आपल्या आत काय आहे यापुढे फारच क्षुद्र आहे..’ असं थोरो या महान निसर्गवेत्त्याचं एक वाक्य आहे. ‘एलिफंट व्हिस्परर्स’ ही डॉक्युमेंटरी आपल्या आत एक माणूस म्हणून नक्की काय दडलं आहे याचा शोध घ्यायला भाग पाडते हे तिचं सर्वात मोठं यश आहे..!

- नीलांबरी जोशी
neelambari.joshi@gmail.com 


'द एलिफंट व्हिस्परर्स'चा ट्रेलर :

 

Tags: ऑस्करविजेती डॉक्युमेंटरी हत्ती कार्तिकी गोन्साल्व्हिस The Elephant Whisperers Oscar-Winning Documentary Theppakadu Elephant Camp Kartiki Gonsalves Guneet Monga Load More Tags

Comments:

उमा नाबर

नितांतसुंदर डाॅक्युमेंटरीचे इतकं परिणामकारक मानवीय दृष्टीने केलेलं, लाघवी विवेचन. आपल्याला अंतर्मनात लीलया डोकावयाला लावणारं, आपल्या आत जे आहे त्यापुढे मागचं पुढचं क्षुद्र आहे, अगदी खरं आहे. थोरोने नकळतच मानव व निसर्ग यांचे नाते, माणूस व समाज यातील द्वंद्व, त्याची आत्मिक प्रेरणा या गोष्टी चैतन्यमय आयुष्य देणगीम्हणून मिळालं याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि हे सर्व या 'व्हिस्पर'मध्ये सहज अधोरेखित झालंय. धन्यवाद .

Add Comment