आता प्रतीक्षा खुल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेची...

नोवाक योकोविच आणि एलेना रिबाकिना यंदाचे विम्बल्डन विजेते ठरले आहेत.

किर्गिऑसच्या पराभवामुळे विम्बल्डनला नवा पुरुष विजेता मिळाला नाही, पण महिलांमध्ये मात्र नवी विजेती मिळणार हे खूप आधीच स्पष्ट झाले होते; कारण आधीच्या विजेत्यांपैकी कोणीच उपान्त्य फेरीतही पोहोचली नव्हती. केवळ क्रमवारीत तिसरी - ट्युनिशियची ओन्स जेब्युर उपान्त्य फेरीत दाखल झाली होती. अशी मजल गाठणारी ती पहिलीच आफ्रिकी/अरब खेळाडू होती. अंतिम फेरीत तिची गाठ कझाकस्तानच्या एलेना रिबाकिनाशी होती. या दोघीही ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. ओन्स जेन्युर 27 तर एलेना रिबाकिना 23 वर्षांची. त्यामुळेच लढत चांगली होणार अशी अपेक्षा होती आणि तशी ती झालीही. तीन सेटमध्ये एलेनाने 3-6, 6-2, 6-2 असा विजय मिळवला.

टेनिस जगतातला आजवरचा सर्वश्रेष्ठ टेनिसपटू कोण? हा प्रश्न आता पुन्हा चर्चेत आला आहे. राफा नदालने खुली फ्रेंच स्पर्धा जिंकल्यावर ग्रँड स्लॅम मालिकांतील स्पर्धांतील त्याची जेतेपदांची संख्या 22 वर गेली होती. त्यामुळे काही काळ फेडरर आणि योकोविचपेक्षा तो दोनने पुढे गेला होता. पण रविवारी विम्बल्डन अजिंक्यपदावर सातव्यांदा कब्जा करून योकोविचने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याच्यात आणि नदालमध्ये आता केवळ एका विजेतेपदाचे अंतर आहे. योकोविचकडे आता ग्रँड स्लॅम मालिकांतील स्पर्धातील 21 जेतेपदे आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन खुल्या स्पर्धेला आता मोठे महत्त्व असेल.

नदालच्या दुर्देवाने त्याला उपान्त्यपूर्व सामन्यातच दुखापतीचा त्रास सुरू झाला. पोटातील एक स्नायू फाटल्याने त्याला खूप वेदना होत होत्या. सर्वच प्रेक्षकांच्या ते ध्यानात आले होते आणि गारिनबरोबरच्या त्याच्या लढतीत तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरच्या वेळी तर त्याचे वडील आणि बहीण त्याला सामना सोडायला सांगत होते. पण तरीही त्याने तो पुरा केला. इतकेच नाही तर तो विजयीही झाला. पण इच्छाशक्तीच्या जोरावर काही काळ त्याने दुखापतीवर विजय मिळवला, तरी नंतर मात्र त्याच्या वेदना वाढतच गेल्या आणि त्याने उपान्त्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिऑसला पुढे चाल दिली. अमेरिकन स्पर्धेपर्यंत आपण पुन्हा तंदुरुस्त होऊ असे आता तो म्हणत आहे, तसे झाले तर ती स्पर्धा आणखीच रंगणार हे निश्चित. अमेरिकन स्पर्धा त्याने चारदा तर योकोविचने तीनदा जिंकली आहे. यावरूनच तिथे किती चुरस असेल हे कळते. अर्थात कोणत्याही स्पर्धेत काही अनपेक्षित निकाल लागतात. पण तसे झाले नाही तर रसिकांना त्या दोघांतील चुरस पाहायला मिळेल, हे नक्की.

योकोविचचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास तसा अवघडच होता. त्याने केवळ दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचे सामने सरळ तीन सेटमध्ये जिंकले. पहिल्या, चौथ्या आणि सहाव्या फेरीत त्याला चार सेट खेळावे लागले आणि पाचव्या फेरीत तब्बल पाच सेटचा सामना त्याने जिंकला, तोही पहिले दोन सेट गमावल्यानंतर. तेथेच त्याच दर्जा आणि मोठेपण दिसून आले. इंग्लंडच्या नॉरीला त्याने हरवून प्रेक्षकांचा रोषही ओढवून घेतला होता. पण अंतिम फेरीतील विजयानंतर मात्र प्रेक्षकांनी त्याला उभे राहून मनापासून दाद दिली. ग्रँड स्लॅम मालिकांतील स्पर्धातील अंतिम फेरी त्याने 32व्यांदा गाठली होती आणि त्याची गाठ या मालिकेत अंतिम सामन्यात प्रथमच खेळणाऱ्या तरीही जिद्दीच्या निक किर्गिऑसशी होती. निकने पहिल्याच फेरीत पाच सेटची लढत जिंकली होती आणि नंतर चौथ्या फेरीतही त्याला पाच सेट झुंजावे लागले होते. बाकी तीन फेऱ्यांत त्याने सरळ सेटमध्ये विजय मिळवले तर उपान्त्य फेरीत नदालने त्याला पुढे चाल दिली होती. गरम डोक्याच्या किर्गिऑसने काहीवेळा स्वतःवरचा ताबा गमावल्यासारखे वर्तन केले होते. पण त्याचा परिणाम खेळावर होऊ दिला नाही.

या खेळाडूंची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल अशी : नोवाक योकोविच : विजयी वि. एस. क्वोन 6030, 3-6, 6-3, 6-4. विजयी वि. कोक्किनासिस 6-1, 6-4, 6-2. विजयी वि. एम. केन्मनोविक 6-0, 6-3, 6-4. विजयी वि. टी. व्हॅन. रिज्थेवेन 6-2, 4-6, 6-1, 6-2. विजयी वि. टी. सिन्नर 5-7, 2-6, 6-3, 6-2, 6-2. विजयी वि. सी. नॉरी 2 6, 6-3, 6-2, 6-4. निक किर्गिऑस विजयी वि. पी. जुब 3-6, 6-1, 5-7, 7-6, 7-5. विजयी वि. एफ. काथिनोविक 6-2, 6-3, 6-1. विजयी वि. एस. त्सित्सिपास 6-7, 6-4, 6-3, 7-6. विजयी वि. बी. नाकाशिमा 4-6, 6-4, 7-6, 3-6, 6-2. विजयी वि. सी. गारिन 6-4, 6-3, 76. उपान्त्य फेरीत नदालने त्याला पुढे चाल दिली.


हेही वाचा : ‘दंगल गर्ल’ लीना सिद्दी - ज्योती भालेराव - बनकर


हे दोघे प्रथमच ग्रां प्री स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळत होते. मात्र व्यावसायिकांच्या स्पर्धेत त्यांची यापूर्वी दोनदा गाठ पडली होती आणि त्या दोन्ही वेळा किर्गिऑसने योकोविचला पराभूत केले होते. त्यामुळेच या सामन्याबाबत जास्तच उत्सुकता निर्माण झाली होती. कारण येथेच किर्गिऑसने 2014 साली नदालला हरवले होते. यावेळी नदालला दुखापत झाल्यामुळे किर्गिऑसचा नदालशी सामना होऊ शकला नाही. पण आता त्याची गाठ योकोविचबरोबर पडणार होती. तीही अंतिम सामन्यात. इतर स्पर्धा आणि विम्बल्डन यांत फरक आहे, तिथे आधीच खेळाडूंवर दडपण असते आणि अंतिम फेरीत ते नक्कीच असते. अव्वल खेळाडूंसकट अगदी सर्वांनीच ते मान्य केले आहे. आणि त्याचा अनुभव किर्गिऑसला येणार होता. योकोविच मात्र येथे अनेक वर्षे खेळतो आहे. दडपण त्याच्यावरही होते, पण येथे अनेक अंतिम सामने तो खेळला आहे. आणि त्यांत सहादा विजयीही झाला आहे. त्यामुळे पहिला सेट गमावल्यानंतरही त्याच्यात काहीच चलबिचल झाली नाही. सारे काही तो आपल्याच चालीत घेत होता. किर्गिऑसवर मात्र दबाव येत असल्याचे जाणवत होते. एक नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे विम्बल्डनवरही आता खेळाडू ‘सर्व्ह अ‍ॅन्ड व्हॉली’चा गेम करताना दिसत नाहीत. जॉन मॅकेन्टो, बोरिस बेकर, पीट सॅम्प्रस यांची ती खासियत होती. सर्व्हिस करून ते नेटकडे धावत आणि प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणत त्याचे परतीचे फटके तेथूनच परतवून गुण मिळवत असत. पण आता अनेक खेळाडूंची सर्व्हिस त्यांच्यापेक्षाही वेगवान असली तरी सर्व्ह अ‍ॅन्ड व्हॉलीचा गेम क्वचितच पाहायला मिळतो. उलट आता पुरुष खेळाडूही जास्तकरून बेसलाइनवरून खेळतात आणि बँक हँड फटके मारताना दोन्ही हातांचा वापर करतात. अंतिम फेरीतील हे प्रतिस्पर्धीही याला अपवाद नव्हते.

तीन तास आणि एक मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात किर्गिऑसने पहिला सेट जिंकून अपेक्षा वाढवल्या होत्या. योकोविचची सर्व्हिस भेदण्यात तो यशस्वी झाला होता. पण यंदा योकोविचने येथे आधीच्या दोन फेऱ्यांतही पहिला सेट गमावला होता. त्याच्यावर अशा बाबींचा दबाव येत नाही हे बऱ्याचदा दिसून आले आहे. तसेच झाले. तो नेहमीच्याच सफाईने खेळत राहिला आणि त्याला सूर सापडला. त्यानंतर मात्र त्याने पुढचे दोन्ही सेट जिंकले. त्यातही तिसऱ्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी होती आणि नवव्या गेममध्ये किर्गिऑस 400 अशा आघाडीवर होता. पण चिवट प्रतिकार करणाऱ्या योकोविचने तो गेम जिंकला आणि नंतर स्वतःची सर्व्हिस राखून सेटही जिंकला. चौथ्या सेटमध्ये किर्गिऑसने जिद्दीने खेळ केला आणि त्यामुळे सामना 6-6 अशा बरोबरीत आला. खरेतर किर्गिऑसची सर्व्हिस अधिक प्रभावी होती. त्याने सामन्यात 30 बिनतोड सर्व्हिस केल्या होत्या, तर योकोविचच्या बिनतोड सर्व्हिसची संख्या 15च होती. पण टायब्रेकरमध्ये किर्गिऑसला सर्व्हिस तारू शकली नाही. सर्व्हिस परतीच्या फटक्यांबाबत प्रसिद्ध असणाऱ्या योकोविचने त्याच्या सर्व्हिस परतावून लावल्या आणि आघाडी मिळवली. शेवटी त्याने टायब्रेकर 7-3 अशा सहजपणे जिंकून आपले लागोपाठ चौथे आणि एकूण सातवे विंबल्डन विजेतेपद मिळवले आणि याबाबतीत पीट सँप्रसची बरोबरी केली. आता या स्पर्धेत त्याच्यापुढे आठ विजेतीपदे मिळवणारा रॉजर फेडरर आहे.

योकोविचने आता ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत नऊ (2008, 11, 12, 13, 15, 16, 19, 20, 21), खुल्या फ्रेंच स्पर्धेत दोन (2016, 21), विम्बल्डनला सात (11, 14, 15, 18, 19, 20, 21) तर अमेरिकन खुल्या स्पर्धेत तीन अजिंक्यपदे (2011, 15, 18) संपादित केली आहेत. आता 36 वर्षांचा नदाल आणि 35 वर्षीय योकोविच यांच्यातच वर्चस्वासाठी अमेरिकन खुल्या स्पर्धेत चुरस असणार असे दिसते. फेडरर आता मागे पडला आहे. यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत तो खेळणार नाही हे त्याने सांगितलेच आणि यानंतरच्या काळात तो खेळला तरी पूर्वीच्याच तडफेने खेळेल का याबाबत काही सांगणे अवघड आहे. कारण आता तो चाळीशीच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळेच अजिंक्यपदांच्या स्पर्धेत नदाल आणि योकोविच दोघेच उरले आहेत. बाकी कोणताही खेळाडू याबाबतीत त्यांच्या जवळपासही दिसत नाही.

किर्गिऑसच्या पराभवामुळे विम्बल्डनला नवा पुरुष विजेता मिळाला नाही, पण महिलांमध्ये मात्र नवी विजेती मिळणार हे खूप आधीच स्पष्ट झाले होते; कारण आधीच्या विजेत्यांपैकी कोणीच उपान्त्य फेरीतही पोहोचली नव्हती. केवळ क्रमवारीत तिसरी - ट्युनिशियची ओन्स जेब्युर उपान्त्य फेरीत दाखल झाली होती. अशी मजल गाठणारी ती पहिलीच आफ्रिकी/अरब खेळाडू होती. अंतिम फेरीत तिची गाठ कझाकस्तानच्या एलेना रिबाकिनाशी होती. या दोघीही ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. ओन्स जेन्युर 27 तर एलेना रिबाकिना 23 वर्षांची. त्यामुळेच लढत चांगली होणार अशी अपेक्षा होती आणि तशी ती झालीही. तीन सेटमध्ये एलेनाने 3-6, 6-2, 6-2 असा विजय मिळवला. तिचा जन्म मॉस्कोचा असल्याने रशियात मोठा जल्लोष झाला. त्यांच्या खेळाडूंना विम्बल्डनने प्रवेश नाकारल्याने त्यांचा स्पर्धेवर राग होताच पण आपल्याच देशात जन्मलेल्या एलेनाने विजय मिळवल्याने ते खुश झाले होते. अरब विजेती मिळाली नाही म्हणून ट्युनिशियात फार मोठा जल्लोष नव्हता तरीही आपल्या खेळाडूने विम्बल्डन उपविजेतेपद मिळवल्याने त्यांना समाधान झाले

होते. नवनवे खेळाडू महिलांमध्ये येत आहेत आणि अजिंक्यही ठरत आहेत. विम्बल्डनमध्ये गेल्या पाच स्पर्धांमध्ये दरवेळी नवी विजेती मिळाली आहे. पुरुषांमध्ये मात्र अद्यापही ‘बिग थ्री’ अर्थात फेडरर, नदाल आणि योकोविच यांच्यानंतर कोण उद्भवलेला नाही.

एलेना आणि ओन्स यांची अंतिम फेरी गाठेपर्यंतची वाटचाल अशी : एलेना रिबाकिना : विजयी वि. व्हेंडेवेग 7-6, 7 5. विजयी वि. अँड्रिस्कू 6-4, 7-6. विजयी वि. क्यू. झेंग 7-6, 7-5. विजयी वि. मॅट्रिक 7-5, 6-3. विजयी वि. ए. टोम्ल्यानोविक 4-6, 6-2, 6-3. आणि उपान्त्य फेरीत विजयी वि. एस. हालेप 6-3, 6-3. ओन्स जेब्युर विजयी वि. ब्योर्कलुंड 6-1, 6-3. विजयी वि. के. कावा 6-4, 6-0 विजयी वि. डी. पॅरी 6-2, 6-3. विजयी वि. ई. मेटेंन्स 7-6, 6-4. विजयी वि. एम. बुझकोवा 3-6, 6-1, 6 1. विजयी वि. टी. मारिया 6-2, 3-6, 6-1.

अंतिम सामन्यातही ओन्सने पहिला सेट 6-3 असा जिंकला. तेव्हा ती क्रमवारीतील तिसऱ्या स्थानाप्रमाणे सरस ठरणार असे वाटत होते. पण एलेनाने हार न मानता खेळ केला. सर्वसाधारण महिलांच्या सामन्याप्रमाणेच त्या बेसलाइनवरूनच खेळत होत्या आणि फटक्यांसाठी दोन्ही हातांचा वापर करत होत्या. मात्र एलेना हळूहळू सामन्यावर पकड घेत होती. ओन्सला ती कोर्टभर नाचवत होती आणि त्यामुळेच ओन्स काहीशी थकल्यासारखी वाटत होती. त्यामुळेच एलेनाने नंतरचे दोन सेट 6-2, 6-2 असे जिंकून आपले पहिले ग्रँड स्लॅम स्पर्धेतील अजिंक्यपद मिळवले.

पुरुषांच्या दुहेरीत अंतिम सामन्यात एबडेनने पर्सेलच्या साथीने मेकटिक आणि पाविक या जोडीचा अटीतटीच्या लढतीत 7-6, 6-7, 4-6, 6-4, 7-6 असा पराभव केला, तर महिला दुहेरीत मिनिआकोवा आणि क्रेयकिकोवा या जोडीने झेंग आणि मर्टेन्स या जोडीला 6-2, 6-4 असे हरवले. मिश्र लढतीत क्रॉक्झिक आणि स्कुप्सकी यांनी एबडेन आणि स्टोसूर या जोडिवर 6-3, 6-3 अशी मात केली. 

आता प्रतीक्षा खुल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेची. तोवर तेथे काय होणार याचा अंदाज करत बसायचे.

-  आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: roger federer novak djokovic rafael nadal grand slam Load More Tags

Add Comment