काश्मीरमध्ये गांधी आणि काश्मीरविषयी गांधीवादी

Kashmirlife.net

ऑगस्ट 1947 च्या पहिल्या आठवड्यात गांधींनी काश्मीर खोऱ्याला भेट दिली. या वेळी त्यांचे वय सत्त्याहत्तर वर्षे होते. हा प्रवास अत्यंत खडतर असून देखील व्यक्तिगत जबाबदारी तसेच राष्ट्राचा सन्मान या दोन बाबींनी त्यांना काश्मीरकडे खेचून आणले होते. देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणार होते, मात्र त्याचबरोबर देशाचे विभाजन देखील होणार होते. काश्मीर संस्थान कोणाकडे जाईल याची अद्याप स्पष्टता नव्हती. राज्यातील जनता मुखत्वे मुस्लीम असली तरी राज्यातील सर्वात लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला स्वतः एक खंदे सेक्युलॅरीस्ट असल्याने त्यांना पाकिस्तानविषयी घृणा होती. काश्मीरचे संस्थानिक महाराजा हरिसिंग यांना मात्र भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याची इच्छा नव्हती. पुर्वेकडील स्वित्झर्लंड अशी काश्मीरची स्वतंत्र ओळख निर्माण करून त्या राष्ट्राचे सर्वेसर्वा होण्याची आकांक्षा ते बाळगून होते. 

काश्मीर भेटीमागे गांधींचे दोन प्रमुख उद्देश होते. एक, महाराजा हरिसिंग यांच्याशी चर्चा करून त्यांना शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून मुक्तता करण्यास भाग पाडणे. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे एकूणच काश्मिरी जनतेचा कल जाणून घेणे. खोऱ्यात पोहचताच गांधींचे अभूतपूर्व स्वागत झाले. श्रीनगरमध्ये प्रवेश केल्याबरोबर रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा देत त्यांच्या स्वागताला उभे होते. झेलम नदीवरील पुलावर हजारो लोक जमल्यामुळे पैलतीरावर जाण्यासाठी गांधींनी बोटीचा वापर केला. झेलमच्या काठावर शेख अब्दुल्लांच्या पत्नीने आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेला गांधींनी संबोधित केले. इथे त्यांनी (हिंदुस्थानी भाषेत) राजकीय मुद्द्यांवर भाष्य न करता अध्यात्मिक बाबींवर बोलणे पसंत केले. गांधींच्या आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी सोबत आलेल्या डॉ. सुशीला नायर यांनी याविषयी नोंद करताना लिहिले, ‘नजीकच्या गावातील पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने महात्म्याचे फक्त दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. जनतेवर असलेला गांधींचा प्रभाव पाहून गांधींचे समर्थक आणि विरोधक देखील अचंबित झाले आहेत. येथील जनतेला गांधीची केवळ उपस्थिती देखील प्रफुल्लित करीत आहे.’   

गांधीनी खोऱ्यात तीन दिवस आणि जम्मू मध्ये दोन दिवस व्यतीत केले. आपल्या काश्मीर भेटीविषयी नेहरू आणि पटेल यांना लिहिलेल्या संक्षिप्त टिपणामध्ये गांधींनी महाराजा हरिसिंग आणि त्यांचे पुत्र करणसिंग यांच्याशी झालेल्या संवादाविषयी नमूद केले. या टिपणामध्ये त्यांनी लिहिले, ‘महाराजा हरिसिंग आणि त्यांचे पुत्र करणसिंग या दोघांनी हे मान्य केले आहे की, ब्रिटिशांची अधिसत्ता संपल्यानंतर इथे काश्मिरी जनतेचे अधिपत्य येईल. आणि भारतात सामील होण्याची त्या दोघांची कितीही व्यक्तिगत इच्छा असली तरीही, अंतिम निर्णय त्यांना जनतेचा कौल ऐकूनच घ्यावा लागेल. पण जनतेचा कौल आणि या संबंधीचा अंतिम निर्णय कसा घेतला जावा याबाबत मात्र आमच्यात चर्चा झाली नाही.’

शेख अब्दुल्ला जरी तुरुंगात होते तरी नॅशनल कॉन्फरन्सचे इतर नेते उपलब्ध असल्यामुळे गांधीनी त्यांची भेट घेतली. नेहरू आणि पटेल यांना लिहिलेल्या पत्रात गांधीनी नमूद केले, ‘ज्या नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांची मी भेट घेतली आहे ते अतिशय आशावादी आहेत. प्रौढ मताधिकाराच्या आधारावर किंवा सध्या राज्याच्या रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या नागरिकांचा कौल घेतल्यास, भारताच्या बाजूने तो मिळण्याची मोठी शक्यता आहे. अर्थातच त्यासाठी शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या बरोबरीने तुरुंगात डांबण्यात आलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांची मुक्तता करणे ही पूर्वअट त्यांना अपेक्षित आहे.’ 

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीमध्ये न थांबता तो दिवस गांधीनी कोलकात्यात व्यतीत केला. गांधी त्यावेळी स्वातंत्र्यदिवस साजरा करण्याच्या मनस्थितीनव्हते. देशभर हिंदू-मुस्लीम दंग्यांची एकच लाट पसरली होती. स्वतःच्या कृतीमधून आणि उपोषण सुरु करून गांधींनी कोलकात्यातील हिंसाचार थांबवण्यात एकहाती यश मिळवले. आणि त्यानंतर देशाच्या राजधानीत देखील अशीच कृती करण्याचा निर्धार करून ते दिल्लीत परतले.

सप्टेंबरच्या उत्तरार्धात महाराजा हरिसिंग यांनी शेख अब्दुल्ला यांची तुरुंगातून मुक्तता केली. तीन आठवड्यांच्या नंतर बळाच्या जोरावर काश्मीर हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानने आक्रमण केले. यावेळी शेख अब्दुल्ला यांनीच पुढाकार घेऊन आक्रमकांच्या विरुद्ध जनतेला एकत्र करण्यास सुरुवात केली.  काश्मिरी जनतेच्या या धैर्याने प्रभावित होऊन, दिल्लीतील 29 ऑक्टोबर 1947 च्या प्रार्थना सभेत गांधी म्हणाले, ‘काश्मीरचे रक्षण महाराजा हरिसिंग करू शकत नाहीत. काश्मीरचे रक्षण जर कुणी करू शकत असेल तर ती मुस्लीम, काश्मिरी पंडित, राजपूत आणि शीख यांची एकत्र युतीच करू शकते.’ पुढे गांधीनी अतिशय कौतुकाने नमूद केले की, ‘शेख अब्दुल्लांचे या सर्व समुदायांसोबत अतिशय सोहार्दाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत.’

त्यानंतर एक महिन्याने भारतीय सेनेने (आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी टोळ्यांना पिटाळून) आपले वर्चस्व प्रस्थापित केले, आणि मगच शेख अब्दुल्ला दिल्लीला रवाना झाले. २८ नोव्हेंबरच्या प्रार्थना सभेत गांधींच्या सोबत शेख अब्दुल्ला येऊन उभे राहिले. याप्रसंगी गांधी म्हणाले, ‘शेख अब्दुल्ला यांनी मोठे महत्वाचे काम केले आहे. त्यांनी काश्मीरमध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम यांच्यामध्ये एकजूट निर्माण करून अशी परिस्थिती निर्माण केली की, इथल्या विभिन्न समुदायांमध्ये एकत्र येऊन जीवन जगण्याची आणि एकत्र मरण्याची इच्छा निर्माण झाली आहे.’

त्यानंतर दोन महिन्यांनी एका माथेफिरू हिंदूने गांधींची हत्या केली. आणि मग गेली सत्तर वर्षे काश्मीर एकापाठोपाठ एक संकटाना समोरे जात आहे. राष्ट्राची दमशक्ती आणि धार्मिक कट्टरता अश्या दुहेरी कात्रीमध्ये अडकलेला हा भारतातील सर्वांत सुंदर प्रदेश सर्वांत जास्त हिंसाग्रस्त भाग देखील बनला आहे. आज गांधी हयात असते तर कदाचित काश्मीरच्या आधुनिक इतिहासातील तीन घटनांनी ते अतिशय अस्वस्थ झाले असते. एक- 1953 साली नेहरू सरकारने शेख अब्दुल्लांना केलेली अटक; दोन- इस्लामी जिहादींनी 1989-90 साली काश्मिरी पंडितांचे केलेले शिरकाण; तीन- 2019 साली कलम 370 रद्द करण्याची केंद्र सरकारची एकतर्फी कृती आणि काश्मिरी जनतेची अतिशय निर्दयीपणे करण्यात आलेली मुस्कटदाबी. यातील शेवटच्या कृतीने म्हणजेच भारत सरकारने काश्मिरी जनतेच्या इच्छेविरुद्ध एकतर्फी निर्णय घेऊन, काश्मीर खोऱ्याला मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या खुल्या तुरुंगात रुपांतरीत केल्यामुळे गांधी अतिशय भयचकित झाले असते. 

 
तसे पाहता काश्मीरच्या घडामोडींवर बोलण्यासाठी गांधी आज हयात नसले तरी, प्रस्तुत विषयावर अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या आणि गांधींच्या नावाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या काही उत्कृष्ट संस्था अस्तित्वात आहेत. गांधींचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी 1959 साली अस्तित्वात आलेल्या आणि तेव्हापासून उत्तम काम करणाऱ्या गांधी पीस फाउंडेशन (जीपीएफ’) ने प्रसिद्ध केलेले काश्मीरवरील पत्रक नुकतेच मला प्राप्त झाले.  तरुण वाचकांना याची कल्पना नसेल की, महान नेते जयप्रकाश नारायण हे देखील जीपीएफ’सोबत जोडले गेले होते. आणि जेपींप्रमाणेच जीपीएफ’ने 1975 च्या आणीबाणीला धैर्याने विरोध केला होता. आणि त्यामुळेच इंदिरा गांधी 1980 मध्ये सत्तेत पुन्हा आल्या तेव्हा, त्यांनी संस्थेवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला होता.  


गांधी पीस फाउंडेशनने जारी केलेले पत्रक हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात म्हटले गेले आहे, ‘ज्या बंदुकीने काश्मिरी जनतेची मुस्कटदाबी करण्यात आली आहे,  त्याच बंदुकीच्या नळीतून काश्मिरींवर टेलिस्कोपप्रमाणे नजर ठेवण्यात येत आहे. हे सर्व अतिशय लाजिरवाणे, दुर्दैवी आणि पुढे येणाऱ्या अनिष्ट घटनांच्याकडे सुचक इशारा करणारे आहे.’ पुढे पत्रक म्हणते, ‘भारतीय संघराज्यात एकूण 28 राज्ये होती आणि आज अचानक 27 राज्ये झाली आहेत. हा काही जादूचा खेळ नाही की ज्यात जादुगार आपल्या हातचलाखीने तुम्हाला वेगवेगळ्या करामती करून दाखवतो. पण तुम्हाला याची कल्पना असते की, समोर घडणाऱ्या गोष्टी काल्पनिक आणि आपल्याला भ्रमित करणाऱ्या आहेत. इथे आपण जे चित्र पाहत आहोत ते अतिशय पाशवी, दुर्भाग्यपूर्ण, लोकशाही विरोधी आणि अपरिवर्तनीय भासणारे आहे. या सर्व घटना आपल्या लोकशाहीवादी राजकारणाला उघड्या पाडणाऱ्या आहेत.'

‘लोकांच्या सभागृहात’ अर्थात लोकसभेत करण्यात आलेल्या लबाडीवर भाष्य करताना हे पत्रक म्हणते, ‘संसदेत इतक्या गहन मुद्द्यांवर किमान चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण सुद्धा करण्यात आली नाही. एक माणूस आरडा-ओरड करत होता, तीनशे पेक्षाही अधिक लोक आपली बाके वाजवत होते आणि उरलेले लोक हताश-निराश होऊन बसले होते. आणि त्यामुळेच याला ‘बहुमत’ (majority) न म्हणता ‘बहुसंख्याक नीती’ (majoritarianism) म्हणजेच संख्येच्या बळावर राज्य करणे असे म्हणायला हवे.'

गांधी पीस फाउंडेशनचे पत्रक आपल्याला सावध करताना म्हणते, ‘काश्मीरला आपण काही अनिश्चित काळासाठी असे बंद करू शकत नाही. हे बंद दरवाजे कधी ना कधी उघडावे लागणारच आहेत. लोक या बंद दरवाज्यांच्या मधून बाहेर येणारच आहेत, त्यांचा दाबला गेलेला राग उफाळून येणारच आहे. काश्मिरी जनतेची मने कलुषित करण्याचा प्रयत्न विदेशी शक्ती आणखी जोमाने तर करणारच आहेत. काश्मीरमधील विरोधी पक्षांतील सर्व नेत्यांना (जे जनतेला शांतता राखण्याचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करत होते त्यांना) आपण नजरकैद करून ठेवले आहे. थोडक्यात, आपण काश्मिरी जनतेबरोबर चर्चा करण्याचे सर्व दोर कापून टाकले आहेत.’   

जीपीएफ’चे पत्रक शेवट करताना सामान्य भारतीय जनतेला आणि सरकारला अपील करताना म्हणते, ‘काश्मीर आज संकटातून जात असताना आपण काश्मिरींच्या सोबत उभे राहायला हवे. काश्मीरवर आलेली ही वेळ आपल्यासाठी देखील तितकीच बिकट आहे. भारताचे नागरिक असलेल्या काश्मिरी जनतेला आज बंद करून ठेवण्यात आले आहे. या जनतेला होत त्रासामुळे विवेकबुद्धीने विचार करणारे अन्य भारतीय लोक समदुःखी आहेत याची काश्मिरी जनतेला कल्पना देणे आवश्यक आहे. सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखायला हवी, मात्र त्याच वेळी काश्मिरी जनतेला पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करून परिस्थिती पूर्ववत करायला हवी.’ 

गांधींचा अनेक वर्षांपासून अभ्यास करत असलेल्या आणि त्यांच्या लेखनात आकंठ बुडालेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला याची पूर्ण खात्री आहे की, आज काश्मीरमध्ये जे काही दुर्दैवी घडत आहे त्यावर गांधींची भूमिका जीपीएफ’च्या पत्रकापेक्षा काही वेगळी नसती. यासाठी गांधींच्या 1947 मधील विधानाकडे पुन्हा लक्ष देणे गरजेचे आहे. गांधी त्यावेळी म्हणाले होते, ‘काश्मीरचे रक्षण महाराजा हरिसिंग करू शकत नाहीत. काश्मीरचे रक्षण जर कुणी करू शकत असेल तर ती मुस्लीम, काश्मिरी पंडित, राजपूत आणि शीख यांची एकत्र युतीच करू शकते.’

सत्तेसाठी नेहमी उतावीळ असलेले आणि काश्मीरचे रक्षण करत असल्याचा बहाणा करणारे आजच्या काळातील राजकीय महाराजा काश्मिरींची रक्षण करू शकणार नाहीत. या राजकीय महाराजांच्या मागे उभे राहून त्यांची भलामण करणारे लबाड कॉर्पोरेट महाराजादेखील काश्मिरींचे रक्षण करू शकणार नाहीत. आणि असंख्य काश्मिरी तरुणांचे ब्रेनवॉशिंग कर त्यांना अकाली मृत्युच्या दाढेत ढकलणारी पाकिस्तानी सेना किंवा पाक सेना पुरस्कृत जिहादीसुद्धा काश्मिरींचे रक्षण करू शकणार नाहीत.

काश्मीरचे भौगोलिक स्थान आणि काश्मीरवरील जटील इतिहासाचे ओझे लक्षात घेता, ही शक्यता नाकारता येत नाही की आणखी काही दशके काश्मीरला हिंसा आणि रक्तपात पाहावा लागणार आहे. पण राष्ट्रपित्याच्या शिकवणीपासून अद्यापही फारकत न घेतलेल्या भारतीयांनी (आणि काश्मिरींनी) प्रयत्न करणे सोडता कामा नये. आपल्या लिखाणात आणि वाणीमध्ये सत्य, चर्चा आणि वादविवादामध्ये विवेक, आपल्या कृतीमध्ये अहिंसा आणि रोजच्या सार्वजनिक जीवनात आंतरधर्मिय सलोखा राखण्याप्रती पूर्ण निष्ठा, ही सारी आदर्श तत्वे आपण या अंधाऱ्या आणि अनिश्चितेच्या काळात देखील जिवंत ठेवली पाहिजेत.  

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(अनुवाद: साजिद इनामदार)

Tags: रामचंद्र गुहा अनुवाद Kashmir Ramchandra Guha Load More Tags

Add Comment