विरामचिन्हांवर गुरूची कविता, शिष्याची विडंबन कविता

26 फेब्रुवारी 2026 या पहिल्या मराठी विरामचिन्हे दिवसानिमित्त

मराठी लेखनविश्वाला विरामचिन्हे बहाल करणाऱ्या मेजर थॉमस कँडी यांचे 150 वे स्मृती वर्ष 26 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने व प्रकाशनाने एक व्याख्यान आयोजित केले आहे आणि त्या निमित्ताने या वर्षी व इथून पुढे दरवर्षी 26 फेब्रुवारी हा विरामचिन्हे दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर,  राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज)आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार) या गुरु-शिष्यांनी शंभर वर्षांपूर्वी विरामचिन्हांचा संदर्भ घेऊन लिहिलेल्या दोन कविता, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे रसग्रहण असलेला हा लेख.

मराठीतले जे जुने साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, ते प्रामुख्याने संत, पंत, तंत किंवा महानुभाव वाङ्मय होते. त्या सर्व लेखनात दंड किंवा विसर्ग होते, विरामचिन्हे नव्हती. 1805 मध्ये विल्यम कॅरे यांनी कलकत्त्याजवळील श्रीरामपूर येथे पहिले मराठी पुस्तक छापले. त्यातही विरामचिन्हे नव्हती. त्यानंतरच्या पन्नास वर्षांत फार थोडी मराठी पुस्तके छापली गेली, त्यातील बहुतांश पुस्तकांत विरामचिन्हे नव्हती. त्यामुळे 'मराठी भाषेला विरामचिन्हे' बहाल करणारा माणूस म्हणून मेजर थॉमस कँडी यांचे नाव घ्यावे लागते. त्यांनी 175 वर्षांपूर्वी, 1850 मध्ये ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही छोटी पुस्तिका लिहिली आणि प्रकाशित केली. मराठी भाषेच्या लेखनात विरामचिन्हे कुठे, कधी व कशी वापरावीत हे अचूकपणे सांगणारी ती पहिली नियमावली आहे. ती पुस्तिका लिहिण्याच्या आधीपासून ते स्वतः मराठी लेखनात आणि संपादनात विरामचिन्हांचा वापर करत होते आणि सर्व लेखकांनी विरामचिन्हे वापरली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे. तेव्हा मराठीत विरामचिन्हे वापरणारे कमी लोक होते, आणि अचूक वापर करू शकणारे तर फारच कमी होते. 

या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत कँडी म्हणतात, “मराठी भाषेतील ग्रंथांत विरामचिन्हें घालण्याची चाल मागें नव्हती, परंतु, युरोपखंडांतील इंग्लिश वगैरे भाषांमध्यें ह्या चिन्हांपासून बहुत उपयोग होतो, हें पाहून मराठी भाषेंतही ही चिन्हें घालण्याची चाल पडावी, अशी इच्छा अलीकडे बहुतांस झाली आहे; म्हणून इंग्लिश भाषेंतील जी चिन्हें मराठी भाषेत घ्यावयाजोगीं आहेत, तीं घेऊन, त्यांचें ज्ञान सर्व लोकांस व्हावें ह्या हेतूनें, ही परिभाषा केली आहे. मराठी भाषेत विरामचिन्हें पांच घेतलीं आहेत, तीं येणें प्रमाणे. स्वल्पविरामचिन्ह (,), अर्धविरामचिन्ह (;), पूर्णविरामचिन्ह (.), प्रश्नचिन्ह (?), आणि उद्गारचिन्ह (!).”

सुरुवातीला ही पाचच विरामचिन्हे मराठीसाठी पुरेशी आहेत असे कँडी यांना वाटले होते, हे यावरून स्पष्ट दिसते. या संपूर्ण पुस्तिकेतदेखील या पाच विरामचिन्हांव्यतिरिक्त अन्य कोणतेही विरामचिन्ह वापरलेले नाही. मुद्रणाच्या तत्कालीन प्रथेप्रमाणे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला असल्यास तिथे संयोगचिन्ह (-) वापरलेले आहे, आणि पुढील ओळीवर उरलेला शब्द छापला आहे. मात्र जोडशब्द दाखवण्यासाठी संयोगचिन्ह वापरण्याची पद्धत (उदाहरणार्थ, सुख-दुःख, दिवस-रात्र) तोपर्यंत निश्चित सुरू झालेली नव्हती, असे लक्षात येते.

त्यानंतर जवळपास पाऊण शतकानंतर 1921 मध्ये कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांचा ‘वाग्वैजयंती’ नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात त्यांची विरामचिन्हें असे शीर्षक असलेली एक पाच कडव्यांची कविता आहे. या कवितेत याच पाच विरामचिन्हांचा उल्लेख आहे. अन्य कोणत्याही विरामचिन्हाचा उल्लेख नाही. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या पुरुषाच्या जीवनातले महत्त्वाचे टप्पे विरामचिन्हांच्या रूपकातून गडकरींनी कवितेत दाखवले आहेत. त्या त्या टप्प्याचे आयुष्यातले महत्त्व आणि एकेका विरामचिन्हाचा वाक्यातला उपयोग यांची संगती जोडून दाखवली आहे. ती कविता अशी : 

विरामचिन्हें
[ शार्दूलविक्रीडित ]

जेव्हां जीवनलेखनास जगती प्रारंभ मी मांडिला, 
जो जो दृष्टिंत ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला ! 
बाल्याची पहिली अशी बदलली दृष्टी सदा बागडे, 
तेव्हां 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहींकडे ! 

आहे काय जगांत ? काय तिकडे? हें कोण? कोठें असे ? 
सांगा ईश्वर कोण? त्यापलिकडे तें काय ? केव्हां ? कसें ?
जें तें पाहुनि यापरी भकतसे, दृक् संशये टाकित, 
सारा जीवनलेख मी करितसें तैं 'प्रश्नचिन्हां' कित ! 

अर्धांगी पुढती करी वश मना, शृंगारदेवी नटे, 
अर्धें जीवन सार्थ होइल इथें साक्षी मनाची पटे ! 
प्रेमानें मग एकजीव बनतां भूमीवरी स्वर्ग ये ! 
केला 'अर्धविराम' तेथ, गमले येथून हालूं नये ! 

झाली व्यापक दृष्टि, चित्त फिरलें साश्वर्य विश्वांतरी, 
दिक्कालादि अनंतरूप बघतां मी होत वेड्यापरी ! 
सूक्ष्मस्थूलहि सारखी भ्रमविती, लागे मुळीं अंत न, 
त्याकाळीं मग जाहलें सहजची 'उद्गार' वाची मन ! 

आशा, प्रेम, नवीन वैभव, तशी कीर्तिप्रभा, सद्यश, 
हीं एकेक समर्थ आज नसती चित्ता कराया वश ! 
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला, 
देवा ! 'पूर्णविराम' त्या नव पदीं दे शीघ्र आता मला !

या कवितेत उल्लेख पाचच विरामचिन्हांचा येतो. मात्र गमतीची गोष्ट अशी की कवितेत जिथे जिथे एखाद्या विरामचिन्हाचा उल्लेख येतो तिथे तिथे पुस्तकात एकेरी अवतरणचिन्ह (‘’) छापलेले आहे. गडकरींची प्रतिभा, त्यांच्या आयुष्यातील चढउतारांशी असलेला त्यांच्या कविताविषयांचा संबंध आणि दीर्घ पल्लेदार कविता लिहिण्याकडे असलेला त्यांचा कल यांचा एकत्रितपणे विचार केला तर असे वाटते की, आणखी विरामचिन्हे जर लेखनात सर्वत्र रूढ झालेली असती, तर या प्रतिभावंत कवीने त्या सर्व विरामचिन्हांची मानवी आयुष्याशी संगती लावून हा कल्पनाविलास सहज वाढवला असता. परंतु तसे झालेले दिसत नाही. 

याचे कारण शोधायचा प्रयत्न केला तर एक शक्यता अशी दिसते की हा कवितासंग्रह संकलित स्वरूपाचा आहे, मूळ कविता 1921 पेक्षा बरीच जुनी असण्याची शक्यता आहे. म्हणजे कविता जेव्हा रचली, तेव्हाच्या गडकरींच्या हस्तलिखितात अवतरणचिन्ह असेलच असे नाही, किंवा असले तरी त्या चिन्हाचा वापर तेव्हा सर्रास सर्वत्र होतच असेल असे नाही. दुसरी शक्यता अशी की, ‘विरामचिन्ह’ या शब्दाचा शब्दशः अर्थ ‘कुठे थांबायचे याची खूण’ असा होतो. अवतरण, संयोग, कंस, वगैरे चिन्हांमुळे वाक्यात कुठे थांबावे लागत नाही. म्हणूनही त्यांची गणना सुरुवातीच्या काळात ‘विरामचिन्ह’ म्हणून होत नसेल, आणि म्हणूनच कँडी यांनी या चिन्हांविषयी काही नियमावली दिलेली नसेल. किंवा गडकरींनी ‘आयुष्याचा एक टप्पा, एक विराम’ म्हणून त्याविषयी काही कल्पना केली नसेल. (प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर यांनी आपल्या Punctuation And Other Marks In Marathi Writing : A Functional Analysis या शोधनिबंधात मराठीतल्या विरामचिन्हांचा इतिहास आणि विकास याविषयी जी मूलभूत निरीक्षणे नोंदवलेली आहेत, त्यांच्याआधारे या शक्यता नोंदवल्या आहेत.)

वाग्वैजयंतीतल्या बऱ्याच कवितांसोबत त्या त्या कवितेच्या रचनेची तारीख, जागा किंवा आठवण दिलेली आहे. या कवितेखाली अशी काही नोंद दिसत नाही. मात्र वाग्वैजयंतीला न. चिं. केळकर यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यात त्यांनी 'या कवितेत गडकऱ्यांच्या काव्यातील अस्सल प्रतिभाजन्य कल्पना दिसून येतात' असे कौतुक केले आहे. प्रस्तावनेत गडक-यांच्या काव्यरचनेतील दोषही सांगितले आहेत. क्वचित व्याकरणदृष्टया अशुद्ध असलेली भाषा, अव्यवस्थित रचना, ठरावीक शब्दांची व कल्पनांची पुनरुक्ती, ग्राम्य शब्दप्रयोग, उत्प्रेक्षा अलंकाराचा अतिरेक, काही कवितांची क्लिष्टता, असे काही गौण दोष सांगून ते म्हणतात की गडकऱ्यांच्या कवितेतला प्रमुख दोष ‘कल्पनांची शब्दांवर जबरी आणि त्यामुळे येणारी कृत्रिमता व प्रसादाभाव (साधे-सोपेपणा नसणे)’ हा आहे. हा महत्त्वाचा दोष तर या कवितेत नक्कीच दिसतो; शिवाय क्लिष्टता, व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असलेले काही शब्द असेही काही दोष आढळतात. कवितेत एकाच वेळी एकीकडे अस्सल प्रतिभा आणि दुसरीकडे हे दोष दिसतात. कदाचित म्हणूनच आचार्य अत्रे यांनी ‘झेंडूची फुले’ मध्ये या कवितेचे विडंबन केले असावे.

कवीचीं 'विरामचिन्हें'
(मानवी जीवनालेखांतील गोविंदाग्रजांनीं दर्शविलेल्या 'विराम चिन्हां' पेक्षां कवीच्या आयुष्यांतील 'विरामचिन्हें’ निराळीं असावींत ही गोष्ट हल्लीं शुद्ध-लेखनासंबंधीं चालू असलेल्या वादास धरूनच नाहीं काय ! )

जेव्हां काव्य लिहावयास जगतीं प्रारंभ मीं मांडिला, 
जें जें दृष्टींत ये तयावर 'करूं का काव्य ?' वाटे मला, 
तारा, चंद्र, फुलें, मुलें किती तरी वस्तू लिहाया पुढें, 
तेव्हां 'स्वल्पविराम' मात्र दिसती स्वच्छंद चोहींकडे !

झालें काव्य लिहून - यास कुठल्या धाडूं परी मासिका ? 
यातें छापिल कोण ? लावुं वशिला कोठें ? कसा नेमका ! 
रद्दीमाजिं पडेल का ? परत वा साभार हें येइल ? 
सारें लेखन तेधवां करितसें मी 'प्रश्नचिन्हा' कुल !

अर्धांगी पुढतीं करून कविता नांवें तिच्या धाडिली, 
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनीं वाटली ! 
कैसा हा फसणार डाव ? कविता छापून तेव्हांच ये ! 
केला 'अर्धविराम' तेथ; गमलें तेथून हालूं नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरें मोकळी, 
केलें मीं मग काव्यगायन सुरूं स्वच्छंद ज्या त्या स्थळी ! 
माझें 'गायन' ऐकतांच पळती तात्काळ श्रोतेजन ! 
त्या काळीं मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !

(पुढील श्लोक 'कोरसा' दाखल असून तो वाचकांनी कवीला ऐकूं न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. बाकी ऐकूं गेलें तरी काय व्हावयाचे आहे म्हणा ?)

डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएंझा जरी 
हीं एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरीं-
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथें परी साधला, 
देवा, 'पूर्णविराम' त्या कविस या देशी न कां आजला ?*

* आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठीं वरील कवितेचे 'नोटेशन' आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थाबरोबर तिच्यांतील 'संगीन' ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्छु बालकवींचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र स्वरलेखन करतांना आम्ही 'प्रो० मौलाबक्षांचीं चिन्हें न वापरतांना आमचीं स्वतःचीं 'चिन्हें' वापरलीं आहेत, हैं एक सुचिन्हच नव्हे काय ? स्थलाभावामुळे टंकालयांतील (Foun-(dry) टंचाईमुळे दर श्लोकांतील एकाच चरणाचे नोटेशन देणें शक्य झाले आहे.*

‘झेंडूची फुले’ला अत्र्यांनी स्वतःच ‘मी विडंबनकार कसा झालो?’ या शीर्षकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, रविकिरण मंडळातल्या अनेक कवींकडे स्वतंत्र प्रतिभा असूनही माधव जूलियन यांचे अनुकरण करण्याचा सोयीस्कर पायंडा पडला, आणि रविकिरण मंडळाच्या कवितांची एकच एक पठडी तयार झाली. त्यातले एकसुरीपण, विसंगती आणि काव्यदोष त्यांना जाणवले आणि त्यातून विडंबनांना सुरुवात झाली. आणि पुढे आणखी काही जुन्या आणि समकालीन कवींच्या त्यांना सदोष वाटणाऱ्या कवितांचाही परामर्श ते विडंबनांतून घ्यायला लागले.  

प्रस्तावनेत शेवटी अत्रे एक ‘पॉलिटिकली करेक्ट’ मात्र प्रामाणिक विधान असेही करतात की, मुळातच सत्त्वहीन असलेल्या कवितेचे विडंबन होऊ शकत नाही, त्यामुळे ज्या कवितांचे विडंबन केले आहे, त्या कविता वाईट आहेत, किंवा त्या कवींविषयी अत्र्यांना आदर नाही असे कोणी समजू नये. उलट विडंबन करणे हे अप्रत्यक्षपणे आदर करण्यासारखेच आहे, आणि विडंबनकार कवींसाठी उपकारकर्ताच आहे! अतिशयोक्ती आणि विनोद सोडून दिले तर या विधानातला जो प्रामाणिकपणा आहे, त्याचे ठळक उदाहरण म्हणजे कवीचीं 'विरामचिन्हें' ही कविता. 

अत्र्यांनी गडकरींना गुरू मानले होते. कवी म्हणून गडकरी हे त्यांचे प्रेरणास्थान होते. ‘मला बालकवि व्हायचे होते, मला गोविंदाग्रज व्हायचे होते, त्यासाठी माझी खटपट चालू होती; पण ते सगळे राहिले बाजूला आणि ‘देवा’च्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मो ‘चोरा’च्या आळंदीला जाऊन पोहोचलों’ असे त्यांनी आपल्या विडंबनांविषयी म्हटले आहे. गडकरींच्या प्रतिभेबद्दल त्यांना नितांत आदर असला तरी गडकरींची कविता निर्दोष आहे असे समजण्याएवढा तो आदर पोकळ नव्हता. न. चिं. केळकरांनी दाखवून दिलेले किंवा त्यापेक्षा वेगळे दोष त्यांना या कवितेत दिसले, आणि त्यामुळेच त्यांनी तिचे विडंबन केले. 

अत्र्यांच्या विडंबनांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मूळ कवितेपेक्षा वेगळा, स्वतंत्र आशय-विषय घेऊन, मूळ कवितेची रचना, वृत्त आणि शब्दयोजना यांच्याशी सुसंगती साधून नवी कविता लिहीत. कवीची ‘विरामचिन्हें देखील याला अपवाद नाही. नियतकालिकांना प्रसिद्धीसाठी आपल्या कविता पाठवणारे कवी हा तत्कालीन विनोदी कथा-कवितांचा लाडका विषय होता. आपल्या नावाने पाठवलेली कविता एका ठिकाणी स्वीकारली गेली नाही तर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा काल्पनिक नावाने पाठवणे, संपादकांच्या उत्तरांची वाट बघणे, आपली कविता प्रथम छापून आल्याचा कवीला होणारा आनंद, सातत्याने छापून आल्यामुळे येत गेलेला आत्मविश्वास, पुढे अतिआत्मविश्वास हा समकालीन लोकप्रिय विषय त्यांनी या विडंबनात आणला. शेवटी 'कोरस'साठी कडवे आणि काव्यगायनासाठी नोटेशन देऊन रविकिरण मंडळाला टोमणे मारले, आणि त्याचबरोबर शुद्धलेखन आणि विरामचिन्हे याबाबत तेव्हा सुरू असलेल्या वादाचीही नोंद घेतली. 

या दोन कविता दिसायला थोड्या सारख्या असल्या तरी त्यांचा गाभा मात्र पूर्ण वेगळा आहे. दोन प्रतिभावंतांनी आपापल्या प्रकृतीला अनुसरून भाषेतल्या विरामचिन्हांची वेगवेगळ्या पद्धतीने दाखल घेतली आहे. गडकरींनीही विनोदी कविता लिहिल्या परंतु कवी म्हणून त्यांची प्रकृती आत्ममग्न, अंतर्मुख, गंभीर आहे. अत्र्यांच्या मात्र मूळ प्रकृतीतच विनोदबुद्धीचा वास आहे, आणि हे या दोन कवितांतून स्पष्टपणे जाणवते. या दोन कवितांच्या निमित्ताने विरामचिन्हांचे अर्थ, त्यांचा इतिहास, त्यांची गरज, ती मराठीत आणताना सरसकट सर्व न आणता मराठी लेखनातल्या गरजांप्रमाणे आणण्याची दृष्टी, याविषयी विचार करण्याची संधी मिळाली आणि पहिल्या मराठी विरामचिन्हे दिवसानिमित्त मेजर थॉमस कँडी, राम गणेश गडकरी आणि आचार्य अत्रे या मराठीतल्या ‘पायोनिअर्स’ ना एकत्रितपणे अभिवादन करण्याचा योगही जुळून आला.

- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com


या वर्षीच्या 26 फेब्रुवारीला पहिला विरामचिन्हे दिवस साजरा करण्याचे आवाहन करताना, त्याची पार्श्वभूमी तयार व्हावी म्हणून, साधना साप्ताहिकाच्या 14 फेब्रुवारीच्या अंकात थॉमस कँडी यांची ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही संपूर्ण पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे, ‘थॉमस कँडी : कालखंड व कर्तृत्व’ हा डॉ. प्रदीप कर्णिक यांचा विस्तृत लेख प्रसिद्ध केला आहे. या सर्व आयोजनाची पार्श्वभूमी आणि भूमिका त्यांनी संपादकीयात मांडलेली आहे. त्याचबरोबर हा दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने काय संशोधन आणि कृतिकार्यक्रम करता येऊ शकतात असे सूतोवाचही केलेले आहे. या अंकातील हे सर्व विवेचन आपल्याला वरील निळ्या लिंकवर क्लिक करून वाचता येईल. 

साधना साप्ताहिक आणि प्रकाशन यांच्यातर्फे 26 फेब्रुवारीला ‘थॉमस कँडी यांचे मराठी भाषेला योगदान’ या विषयावर प्रदीप कर्णिक व्याख्यानही पुणे येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे.

Tags: विरामचिन्हे मराठी विरामचिन्हे दिवस 26 फेब्रुवारी आचार्य अत्रे राम गणेश गडकरी गोविंदाग्रज केशवकुमार कविता विडंबन वाग्वैजयंती झेंडूची फुले Load More Tags

Comments:

Uday Dandavate

विराम चिन्ह प्रचलित होण्यापूर्वी लिहिलेले गद्य वा पद्य वाचताना वाचकांचा काय अनुभव होता आणि तो विराम चिन्ह प्रचलित झाल्यावर कसा बदलला ह्याबद्दल कुणी अभ्यास केला असला तर वाचायला आवडेल.

Vishwas Sutar

विरामचिन्हांवरील विस्तृत आणि नवी माहिती देणारा लेख छान ! आभार !

Add Comment