साने गुरुजींचं सारंच मूर्तिमंत... 

तुंबाडचे खोत कादंबरीतील कॉंग्रेसचे संमेलन, साने गुरुजी आणि श्यामची आई...

नरसू लिंबाडला परत आला, तो एक नशा घेऊन. डोक्यातून सानेगुरुजी उतरले नव्हते. चण्याच्या भावानं एक मौल्यवान पुस्तक त्यांनी फुंकून टाकलं ! वेडेपणा? असेल; पण असलं वेड लाभायला भाग्य लागतं. अंगात हत्तीचं बळ लागतं, ह्या त्यागाची कुठे नोंद होणार नव्हती. गुरुजींना त्याची फिकीर नव्हती. असली फकिरी ही माणसं मिळवतात कोठून ? एक अपूर्व व्यक्ती पाहिल्याचं नरसूला समाधान वाटत होतं.

अनेकदा असं होतं की, आपण एकदा पाहिलेला चित्रपट पुन्हा पाहात असताना एखादं दृश्य समोर येतं, आणि आपल्याला एकदम वाटतं, अरेच्चा, हे आपल्या नजरेतून कसं सुटलं होतं, किंवा शास्त्रीय संगीत कॅसेटवर व आता सीडीवर, पुन्हा ऐकताना ठखादी जागा अशी येते की, आपण हे नव्यानंच ऐकतोय का, त्यावेळी ही जागा कशी निसटली? असं अचानक वाटतं. तसंच वाचताना होतं. एखादी कादंबरी पुन्हा वाचताना काही वेळा अशीच भावना होते, हे आपण कसं विसरलो बरं ? श्री. ना पेंडसे यांची महाकादंबरी 'तुंबाडचे खोत' पुन्हा वाचताना अचानक त्यातला एक भाग असा आला की त्यात गुंतलो. पुन्हा पुन्हा ती पानं वाचली आणि वाटलं की, बऱ्याच वर्षांपूर्वी आपण ही कादंबरी वाचली होती. त्यावेळी या भागाशी आपण थांबलो नव्हतो. तसंच वाचत पुढं गेलो होतो. यावेळी असं का व्हावं, असा विचार करताना एकदम ध्यानात आलं की, कदाचित त्यावेळी आपल्याला याचं महत्त्व जाणवलं नव्हतं. पण यंदाचं वर्ष हे साने गुरुजीचं ७५ वं स्मृती वर्ष आहे. त्यामुळंच असं झालं असावं. कारण आता गुरुजींबाबत बरंच वाचायला मिळत आहे. त्यांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्तयाही येत आहेत. 'शामची आई' हा चित्रपट नव्या पिढीतील कलाकारांनी नव्याने निर्माण केला आहे, तोही आचार्य अत्रे यांच्या राष्ट्रीय पारितोषक मिळवणाऱ्या चित्रपटाप्रमाणेच दर्जेदार असल्याने, सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. 'साधना' ने तर त्याच्यावर अंकांत बरंच काही दिलं होतं. चित्रपटाबाबत संपादकीय आणि दिग्दर्शक, कलाकारांच्या मुलाखती, छायाचित्रं वगैरे.

पण कादंबरीतील एक प्रसंग वाचताना एकदम चक्रावल्यासारखं झालं. कारण गुरुजींबद्दल इतरांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनीही बरंच काही लिहिलेलं साधनातूनच वाचलं होतं आणि खुद्द गुरुजींनी लिहिलेली बरीच पुस्तकंही पूर्वी वाचली होती. पण श्री. नां. च्या कादंबरीतील एका ठिकाणी साने गुरुजींबाबतची आठवण, अर्थात कथानायकाची, यावेळी 'तुंबाडचे खोत' वाचताना वाचली, आणि तिच्यातील गुरुजींबाबतचं वर्णन वाचून मात्र थक्क झालो हे सारं प्रथमच वाचतो आहे, असं वाटलं. त्यांच्या एकंदर वागण्याचं हे रूप वेगळंच होतं. अर्थात हा कादंबरीतील भाग असल्यामुळं कदाचित कल्पित असण्याचीही शक्यता आहे. पण तो खरोखर घडल्यासारखं वाटतं. गुरुजींबाबत जे काही वाचलं आणि त्यांच्याबाबत जे काही समजलं होतं, त्यावरून गुरुजींचं एक चित्र डोळ्यापुढे आणि मनात निर्माण झाले होते. हा माणूस अगदी जगावेगळा आहे आणि त्यांचे काही गुणही इतरांमध्ये क्वचितच आढळतात, अशी समजूत झाली होती. पण हे काही आणखीच वेगळं होतं. गुरुजींच्या मनातील चित्राबरहुकूमच होतं. त्यांच्या वागण्या बोलण्यात सहज मिसळून गेलं होतं. त्यामुळं नवीनच काहीतरी समजल्यासारखं वाटलं. त्यांच्याबाबतचा आदर आणखीच वाढला. त्या मजकुरात असलेली त्यांची भाषाही तशीच सोपी वाटली आणि त्यामुळे खरं तर हा लेखकाने स्वतः घेतलेला अनुभव आहे, किंवा त्याला कोणी तरी प्रत्यक्ष घडलेला प्रसंग सांगितला आहे, आणि त्यावरून पेंडसे यांनी हे लिहिलंय की काय, असं वाटू लागलं. काय असेल ते असो, काही काळ भारावल्यागत झालं.

श्री. ना. पेंडसे यांनी तो काळ स्वतः पाहिला आणि अनुभवला होता. आणि नंतर दीर्घकाळाने त्यांनी ही कादंबरी लिहिली. दरम्यानच्या काळात त्यांनी बरंच काही लिहिलं होतं. तोवर त्यांना साहित्य अकादमीनंही गौरवलं होतं. त्यांच्या गारंबीच्या बापू या कादंबरीवर नाटक आलं होतं, तसा चित्रपटही आला होता. पण त्या काळातही या कादंबरीचं कथानक त्यांच्या डोक्यात तयार होत असावं. त्यामुळंच बऱ्याच लिखाणानंतर त्यांनी कोकणातील एका काल्पनिक गावातील एका कुटुंबाच्या चार पिढ्यांची कथा सांगण्यासाठी ही कादंबरी लिहिली. त्यात खोतांच्या कुटुंबात कसे बदल झाले, त्यांचा लौकिक कुणामुळं आणि कसा वाढला, एक शाखा लिंबाडला स्थायिक का झाली. खोत कुटुंबातील सगळ्यांच्याच वाट्याला कसे चढउतार आले, त्यांनी उत्कर्षाचा अनुभव घेतला आणि पुन्हा घसरण झालेली अनुभवली. आणि त्या कुटुंबानं पुढच्या पिढीत पुन्हा उभारी घेतली. जुनी प्रतिष्ठा परत मिळवली पण कालगतीनुसार चक्र पुन्हा फिरलं आणि कुटुंबाचाच नाही, तर त्या परिसरालाही अभिमान वाटावा असा पूर्वजांनी बांधलेला, मोठी ख्याती आणि प्रसिद्धी असलेला. सगळ्या तालुक्यात उंच जोत्याचा, उठून दिसणारा वाडा जळून कोळसा झाला. ही नियती. वाड्याचं वर्णन साक्षात तो प्रत्यक्ष पाहात आहोत एवढं चित्रमय आणि त्यामुळं प्रभावी आहे. आणि त्याचा नाश झाल्यावर आपल्यालाही सुन्न वाटायला लागतं. आणि नरसूच्या गाांधीजींच्या सत्याग्रहाच्या चळवळीत झोकून देण्यामुळं घ्राण्याला पुन्हा एकदा प्रतिष्ठा कशी प्राप्त झाली हे वाचताना ते डोळ्यापुढं येत राहातं.

कादंबरीबाबत वा तिच्या कथानकाबाबत थोडक्यात लिहिणं अवघडच आहे. कारण दोनही भाग मिळून ही कादंबरी जवळपास १५०० पानांची आहे. आणि या लेखात सारी कथा सांगण्याची आवश्यकताही वाटत नाहीय. त्यामुळं ते बाजूला ठेवून आपण वर जो भाग उदधृत केला आहे, त्या भागाकडं वळूया. कारण तोच या लेखाचा महत्त्वाचा भाग आहे. हा उतारा दोन भागाच्या या कादंबरीच्या दुसऱ्या भागातील आहे.

... काँग्रेसचे अधिवेशन देशातील कोणत्यातरी खेडेगावात भरवायचे, असे चौतीसच्या मुंबई अधिवेशनात ठरले होते. त्याकरता महाराष्ट्राची निवड खुद्द गांधींनी केली होती. कार्यकर्त्यांचे मोहोळ फक्त त्या भागात आहे, ह्याची कल्पना त्यांना होती. महाराष्ट्र प्रतिक काँग्रेसने त्याकरता खानदेशातील फैजपूरची निवड केली होती एवढा अवाढव्य मेळावा त्या टिचभर गावाला कसा झेपणार, ही सर्वांच्याच चिंतेची बाबत होती. महाराष्ट्र काँग्रेसने तर तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता. फैजपूरची निवड होताच विरोधकांना तो चेष्टेचा विषय झाला. नरसूला या विरोधकांचं सर्वात मोठं वैगुण्य हे वाटे. 'काँग्रेसला, गांधींना विरोध' हा एकच कार्यक्रम त्यांच्याकडे होता. त्याचवेळी इंग्रजांशी असे लढू या असे म्हणाले असते तर नरसूसारखे लोक थबकून त्यांच्याकडे पाहते.

फैजपूरची निवड होताच विरोधकांनी भविष्य वर्तवलं. 'फैजपूरचं फजितपूर' होणार. ही गर्जना नसून कुत्र्याचं केकाटणं आहे ह्याची कल्पना असली तरी अगदीच स्वस्थ बसता येत नव्हतं. काका गाडगीळांना विरोधकांची भाषा वापरणं चांगलं जमत असे. त्यांनी जाहीर सभा घेऊन 'फैजपूरचं फत्तेपूर' करणार अशी गर्जना केली. इरेस पडून कार्यकर्ते कामाला लागले. 'पुणे' हे केंद्र होतं. नरसूच्या पुण्याच्या मित्रांकडून त्याला सगळी माहिती मिळत होती. पण मित्रांचा आग्रह होता, "तुम्ही नुसते फैजपूरला येऊन भागणार नाही. इथले वातावरण कसं ओसंडून जात आहे ते प्रत्यक्ष पाहा. शिकायला खूप मिळेल. सानेगुरुजी या अचाट माणसाशी तुम्ही परिचय करून घेतलाच पाहिजे. ते तुमच्या तिकडलेच - पालघरचे आहेत."

नरसू पुण्याला आला तेव्हा वातावरणात 'फैजपूर' शिवाय विषय नव्हता. हे गाव कुठे आहे ह्याचा नरसूला पत्ता नव्हता. सानेगुरुजीशिवाय मित्र काही बोलत नव्हता. गुरुजी एम. ए. ला पहिल्या वर्गात आलेले. कॉलेजातली नोकरी सोडून खानदेशाात अंमळनेरला एका शाळेत नोकरीला गेले. तेथे कामगारांना जागे केले. संप घडवून आणला. सगळा खानदेश काँग्रेसमय करून टाकला. त्यांच्या प्रेरणेने सत्याग्रहात अनेक विद्यार्थ्यांनी शाळा साडल्या. त्यांपैकीच काही विद्यार्थी पुण्याला कॉलेजात शिक्षण घेत होते. सानेगुरुजी त्यांच्याबरोबर राहात. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून त्यांचा सैपाक करत. इतर वेळात काँग्रेसचे काम करीत.

हे सानेगुरुजी आहेत तरी कोण? पालगडला 'साने घराणं' आहे, एवढंच त्याला माहीत होतं. तो रोज काँग्रेसच्या ऑफिसात जाई. तेथील लोकांत मिसळे. सगळे अधिवेशनाच्या कामात बुडाले होते. दोन दिवस झाले तरी मित्र सानेगुरुजींकडे त्याला नेत नव्हता. शेवटी म्हणाला, "तुम्ही असे उतावीळ होऊ नका. गुरुजींची तुमची भेट तशी सोपी नाही. ते सारखे काही ना काही कामात असतात. त्यांना थोडा वेळ तर मिळाला पाहिजे! एक लक्षात ठेवा, इतका मोठा माणूस तुम्हाला पुन्हा भेटणार नाही."
"गांधी - ?"
"त्यांच्यापेक्षा मोठा. गांधी सगळ्यांना माहीत आहेत. गुरुजी कोणाला माहीत नाहीत. म्हणूनच मला ते मोठे वाटतात. इतका बुद्धिमान, इतका मोठा लेखक, वक्ता, संघटक. पण ह्या माणसाला अहंकाराचा स्पर्श नाही. त्यांना कोणी प्रांतिक काँग्रेसचा अध्यक्ष करू लागलं तर तिकडे ढुंकून पाहणार नाहीत. ते म्हणतात, 'मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. म्हणूनच ते असामान्य." मित्र आणि नरसू सानेगुरुजींकडे निघाले होते. एस. पी. कॉलेजच्या समोर एका इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावर ते आले. खोलीत संताजीच्या वयाचा एक मुलगा बसला होता. मित्र त्याच्याकडे गेला.
"मोहाडीकर, हे माझे मित्र नरसू खोत. त्यांना गुरुजींना भेटायचं आहे-"
"मी त्यांचीच वाट पाहतोय. खोत म्हणजे-"
नरसूने आपण कोण, कुठले सांगितलं. दोन वेळा तुरुंगात जाऊन आल्याचं कळलं तेव्हा मोहाडीकर आदराने बोलू लागले. दुसऱ्या सत्याग्रहात पोलिसांनी रक्तबंबाळ केलं. पुढचे दोन दात पडले हे कळलं तेव्हा मोहाडीकर आदराने बोलू लागले. "नरसूभाऊ, चळवळीच्या बाबतीत तुमचं कोकण म्हणजे वाळवंटच हो-"
"वाळवंट. पण थोडंफार उगवतं ते तण असतं. त्याला गांधींचं वावडं-"
"अशा वातावरणात काम करायचं म्हणजे परीक्षाच आहे. तुमच्या गावापासून पालगड किती लांब हो ?"
"दहा मैलावर. गुरुजीचं घर पाहिलेलं आहे-"
"तुम्ही पुण्यवान -"
"तुम्हाला पुण्यवान करू. या तिकडे. तोंडदेखलं बोलवीत नाही. शिक्षण मोडून तुम्ही तुरुंगात गेलात -"
त्यांचं बोलणं चाललं होतं इतक्यात डोक्यावर ओझं घेऊन एक हमाल आला. मोहाडीकर उठले आणि हमालाच्या डोक्यावरचा बोजा उत्तरु लागले.
शुद्ध मराठीत हमाल म्हणाला, "खाली टांग्यात अजून एक बोजा आहे, तो घेऊन ये."
मोहाडीकर गेले. नरसूच्या मित्राची ही धांदल उडाली होती. त्याने घाईने हमालाच्या डोक्यावरचा बोजा उतरला. घाम पुशीत हमाल खाली बसला.
"नरसूभाऊ, हे सानेगुरुजी!" मित्र म्हणाला.
"कोऽऽण?"
नरसूला आयुष्यात एवढा मोठा बसला नव्हता. अभावितपणे त्याचे हात गुरुजीच्या पायाशी गेले, गुरुजींनी पाय झटकन मागे घेतले. नरसूला बसा म्हटले. नरसू अजून पुरता शुद्धीवर आला नव्हता. डोंगराएवढा एक माणूस तो पाहत होता. त्याच्याजवळ बसण्याचीसुद्धा आपली लायकी नाही असं त्याला वाटलं. फावल्या वेळात तुरुंगात जाणारे आपण ह्या माणसापुढे चिलटासारखे आहोत असं त्याला वाटत होतं. तो सारखा गुरुजींकडे पाहत होता. इतका मोठा माणूस इतका साधा ! मोहाडीकर बोजा घेऊन वर आले. गुरुजींनी कसले बोजे आणले अजून कळलं नव्हतं. बोजा खाली ठेवत मोहाडीकरांनी
विचारलं, "गुरुजी, हे काय आहे?"
"राम, ह्या तिन्ही बंडलांत आपल्या पुढाऱ्यांचे फोटो आहेत. महात्माजी, पंडितजी, सरदार, सरहद्द गांधी, सुभाषबाबू, सरोजिनीदेवी
"इतके ? त्याचं काय करायचं ? "
"आपण परवा अंमळनेरला जात आहोत. तेथून प्रथम फैजपूर. घरोघरी हे फोटो वाटायचे. खानदेशातएकही घर राहता कामा नाही, जिथे हे फोटो गेले नाहीत ?"
अजूनही आ वासून सगळे ऐकत होते. प्रत्येकापुढे प्रश्न पडला होता हा उद्योग कशाला? पण गुरुजीचं बोलणं अजून संपलं नव्हतं.
"अरे, सगळ्या देशातून आपले नेते येणार. शहरातल्या आपल्यासारख्यांचे ठीक रे. सगळ्यांचे निदान फोटो पाहिलेले आहेत. शेतकऱ्यांना, मोलमजुरी करणारांना पुढाऱ्यांचे फोटो पाठ झाले पाहिजेत अधिवेशनाला शेतकऱ्याची गर्दी लोटली पाहिजे. खानदेशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे."
"गुरुजी, एवढे पैसे कुठले आणलेत ?"त्याबरोबर गुरुजीचा चेहरा पडला, घोगऱ्या आवाजात म्हणाले, "त्याकरता आज माझ्या आईला विकून आलो-" गुरुजीचे डोळे पाणावले होते. ते काही बोलेनात. वातावरण एकदम गंभीर झालं.
"तुम्ही काय म्हणताहात ?"
"अरे, 'श्यामच्या आई' चे सारे हक्क प्रकाशकाला विकले, पैसे उभे केले."
सर्वांनी त्यांचं हस्तलिखित वाचलं होतं. 'श्यामची आई' हे पुस्तक अजून प्रकाशित झालं नव्हतं. सर्वांनी त्याचं हस्तलिखित वाचलं होतं. गुरुजी काय करून बसले होते ह्याची नरसू सोडून इतरांना कल्पना आली.
नरसूने मित्राला बाजूला घेतलं. विचारलं, "कुठलं पुस्तक हो- ?"
"गुरुजींनी आईच्या आठवणी लिहिल्या आहेत, नरसूभाऊ हे पुस्तक प्रसिद्ध होईल तेव्हा सगळा महाराष्ट्र अधाशासारखं ते वाचणार आहे. खूप खपणार आहे. हजारोंनी रुपये लेखकाला मिळतील इतकं ते पुस्तक मोलाचं आहे. गुरुजी अगदी थोडक्यात ते विकून आले असतील." त्यावर कोणी बोलायच्या अवस्थेत राहिला नाही.

नरसू लिंबाडला परत आला, तो एक नशा घेऊन. डोक्यातून सानेगुरुजी उतरले नव्हते. चण्याच्या भावानं एक मौल्यवान पुस्तक त्यांनी फुंकून टाकलं ! वेडेपणा? असेल; पण असलं वेड लाभायला भाग्य लागतं. अंगात हत्तीचं बळ लागतं, ह्या त्यागाची कुठे नोंद होणार नव्हती. गुरुजींना त्याची फिकीर नव्हती. असली फकिरी ही माणसं मिळवतात कोठून ? एक अपूर्व व्यक्ती पाहिल्याचं नरसूला समाधान वाटत होतं.
आणि याच कादंबरीत पुढं एका ठिकाणी श्री. ना. पेंडसे म्हणतात म्हणतात, "सानेगुरुजीचं सारंच मूर्तिमंत !" हे तर साने गुरुजींची माहिती असणाऱ्या कुणालाही पटण्यासारखंच !

असं म्हणतात की, लेखकाच्या जीवनाच्या अनुभवातील काही ना काही, या ना त्या रुपात त्याच्या लिखाणात दिसतं. तसं पाहिलं तर ते काही त्याचं आत्मचरित्र नसतं, आठवणींचं पुस्तकही नसतं. तरी त्याच्या लेखनात कदाचित त्याच्याही नकळत ते येतं. पण इथं तर थेट साने गुरुजीच 'तुंबाडचे खोत' या कादंबरीत प्रकटतात. साक्षात त्यांच्या रूपानं. लेखकाच्या कळत वा नकळत हे झालंय खरं. साने गुरुजी १९५० साली गेले. त्याआधी थोडा काळ श्री. ना. पेंडसेंनी 'तुंबाडचे खोत' लिहिली असणार. पण ती प्रकाशित झाली १९८७ मध्ये. म्हणजे तब्बल सदतीस वर्षांनंतर. म्हणजे त्यांच्या आठवणीतून गुरुजी जात नव्हते. त्यामुळंच 'तुंबाडचे खोत' मध्ये ते आले. लेखकानंच त्यांना आणलं असावं. अगदी गुरुजींच्याच नावानं. त्यामुळं ते जास्तच वास्तव वाटतं. कारण त्यांना गुरुजींचं नाव बदलून कोणती वेगळीच व्यक्तिरेखा उभी करायची नव्हती. तो प्रसंग त्याच्या कथानायकाच्या म्हणजे नरसूच्या, आयुष्यात घडलेला. त्यानं तो प्रत्यक्ष घेतलेला अनुभव होता आणि म्हणूनच तो वाचणाऱ्याच्या अंगावर शहारा आणतो. त्याला हादरवतो. अशी माणसं भेटायला सोडाच पण बघायलाही भाग्य लागतं आणि त्यांचीच व्यक्तिरेखा साक्षात कादंबरीत येते. तीही कथानकाच्या अनुषंगानं. जिवंत होऊन. उगाच बळेबळे ओढूनताणून आणलेली नाही. त्यामुळं हा प्रसंग हे ठिगळ लावल्यासारखी वाटत नाही. उपराही वाटत नाही. ती साने गुरुजींची व्यक्तिरेखा कथानकात सहज मिसळून गेली आहे. म्हणूनच ती अधिक प्रभावी झाली आहे. त्यांचं बोलणं वागणंही त्यांच्या व्यक्तिरेखेला साजेसं आहे. म्हणजे नरसूचे हात गुरुजींच्या पायाशी जातात तेव्हा गुरुजी चटकन पाय मागे घेतात. त्यावेळी 'साने गुरुजींचं सारंच मूर्तिमंत' हे वाचकाला जाणवतं. पटतं. कादंबरी वाचून संपल्यावरही डोळ्यापुढं ते दृश्य येत राहातं. आपणही साने गुरुजींना अभिवादन करतो.

'तुंबाडचे खोत' ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली ती १९८७ साली. नंतर तिची पाच पुनर्मुद्रणं १९९४, २०००१, २०१५, २०२२ आणि २०२४ मध्ये झाली आहेत. आणि 'श्यामची आई' या पुस्तकाची तर अनेक प्रकाशकांकडून अनेकदा पुनर्मुद्रणं झाली आहेत, अजूनही होत आहेत. पुढेदेखील होत राहतील. साने गुरुजींचं सारंच मूर्तिमंत हे पुढच्या अनेक पिढ्या वाचत राहतील!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

('तुंबाडचे खोत' या कादंबरीचे सर्व स्वामित्वहक्क अनिरुद्ध पेंडसे यांच्याकडे आहेत, त्यांच्या परवानगीने कादंबरीतील साने गुरुजींविषयीचा अंश २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुनर्मुद्रणातून येथे उद्धृत केला आहे.)

Tags: साने गुरुजी तुंबाडचे खोत श्यामची आई कॉंग्रेस संमेलन साधना डिजिटल साने गुरुजी कॉंग्रेस श्री. ना. पेंडसे अनिरुद्ध पेंडसे Load More Tags

Comments:

अनिल आवटी

लेख खूपच छान आहे.

Add Comment