स्पर्धेचे विजेतेपद, स्पर्धेचा मानकरी आणि सामन्याचा मानकरी, असे तिहेरी यश यंदाच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मिळवून भारताने महिनाभर चाललेल्या या स्पर्धेची संस्मरणीय सांगता केली. या यशाबरोबरच भारत या स्पर्धेत तीन विजेतीपदे मिळवणार पहिलाच संघ ठरला, त्याचप्रमाणे लागोपाठ दोनदा अजिंक्यपद मिळवणारा, आणि मायभूमीत स्पर्धा होत असताना विजयी ठरलेलाही तो पहिलाच संघ होता. प्रेक्षकांना भारत जिंकल्याचा आनंद जरूर मिळाला पण हा सामना चुरशीचा मात्र झाला नाही. म्हणजे अव्वल आठ संघांच्या गट साखळीत दक्षिण आफ्रिकेने भारताला ज्याप्रमाणे सपशेल पराभूत केले होते, तसाच हा सामना एकतर्फी झाला. फरक एवढाच की, यावेळी भारताचे सामन्यावर पहिल्या चेंडूपासून वर्चस्व राहिले आणि दर चेंडूगणिक न्यूझीलंडची कामगिरी अवघड होत गेली.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक वर्मा या जोडीने वादळी सुरुवात केली. चौकार आणि षटकारांची बरसात होत होती आणि पॉवर-प्ले मध्येच भारताच्या बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. तेथेच विजयाची अशी भक्कम पायाभरणी झाली होती की न्यूझीलंडच्या कर्णधार सँटनरला काय करावे कोणाला गोलंदाजी द्यावी हे सुचेनासे झाले असणार. तसे पाहिले तर ग्लेन फिलिप्सने पहिल्याच षटकात केवळ पाच धावा दिल्या होत्या.
पण नंतर हेन्री आणि फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने जोरदार फटके लगावले आणि सॅमसननेही त्याचाच कित्ता गिरवला. मात्र तो सतत टोलेबाजी करत नव्हता तर योग्य चेंडू मिळाल्यानंतर मात्र उत्तुंग टोले लगावात होता. त्यामुळे भांबावलेल्या सँटनरला चेंडू कोणाकडे सोपवावा हे उमगत नव्हते. मात्र तो स्वतः गोलंदाजीला आला आणि त्याने काही प्रमाणात धावांचा वेग रोखला, पण त्याला कुणाचीच साथ मिळाली नाही. कारण अन्य गोलंदाज मात्र धावांची खैरातच करत होते आणि त्याचा पुरेपूर फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला.
आठव्या षटकात शर्मा बाद झाला. (52 धावा, 6 चौकार 3 षटकार) त्याच्या जागी आलेल्या इशान किशनने न्यूझीलंडला समाधान मिळू दिले नाही. कोणत्याही गोलंदाजापुढे तो नमून गेला नाही त्यामुळे 15 व्या षकातच भारताच्या 200 धावा फळ्यावर लागल्या. त्यानंतर निशॅमने सुरु केलेल्या सोळाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसन 89 धावा करून बाद झाला (5 चौकार आणि 8 षटकार) आणि पाचव्या चेंडूवर किशनही परतला (54 धावा 4 चौकार 4 षटकार). त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादव एकही धाव न करता रचिन रविंद्रच्या हाती झेल देऊन खाते न खोलताच बाद झाला. पण तोवर सामन्यावर भारताची घट्ट पकड बसली होती. त्यामुळे भारताच्या फलंदाजांनी धावसंख्या अडीचशे पार नेली. हार्दिक पंड्या 18 (1 चौकार 1 षटकार) धावा करून परतला आणि शिवम दुबेने (26 धावा 3 चौकार दोन षटकार) तिलक वर्माच्या (8 धावा) साथीने धावसंख्या 255 वर नेली आणि भारताचा डाव संपला. दोघेही नाबाद राहिले. या सगळ्यात एक गोष्ट अनाकलतीय होती. एका षटकात केवळ पाच धावा देणाऱ्या फिलिप्सला सँटनरने नंतर गोलंदाजी का दिली नाही, हा अनुत्तरित प्रश्न होता.
न्यूझीलंडने उपान्त्य सामन्यात द. आफ्रिकेला हरवताना केवळ एक गडी गमावला होता त्यावेळी सीफर्ट आणि अॅलन यांनी कामालीची फलंदाजी केली होती. त्यामुळे आता न्यूझीलंडची मदार त्यांच्यावर होती. पण सॅमसनने जे सातत्य दाखवले ते टिम सीफर्ट आणि कर्णधार मिशेल सँटनरचा अपवाद सोडला तर त्यांच्यातील बाकी कुणालाच दाखवता आले नाही. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अॅलन बाद झाला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा पुरता अंदाज घेण्याआधीच एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. तिलक वर्माने त्याचा झेल घेतला. फिन अॅलनने फक्त नऊ धावा केल्या. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूला फटका मारण्याचा प्रयत्न रविंद्रने केला पण तो चुकला आणि चेंडू उंच उडाला. धावत जाऊन किशनने अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे उपान्त्य सामन्यात अक्षरने घेतलेला याच प्रकारचा ब्रूकचा झेल आठवला. (प्रथमच विश्वचषक जिंकला त्याही वेळी कपिलेदेवने रिचर्डसचा असाच झेल घेतला होता.) रविंद्रने केवळ एक धाव केली. पाचव्या षटकात फिलिप्सला अक्षरने सपशेल चुकवून त्याचा त्रिफळा उडवला. त्याच्या फिरकीचा अंदाजच फिलिप्सला आला नाही. फिलिप्सने फक्त पाच धावा केल्या. आठव्या षटकात हार्दिकने चॅपमनचा त्रिफळा उडवला. आणि नवव्या षटकात सीफर्टही बाद झाला. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर त्याचा झेल किशननेच घेतला. टिम सीफर्टने दोन चौकार आणि पाच षटकारांच्या सहाय्याने ५२ धावा केल्या. आता सामना पुरताच भारताच्या हातात आला होता. कारण षटके आणि आवश्यक धावा हे समीकरण न्यूझीलंडच्या आवाक्याबाहेर जात होते. कारण त्यांचे फलंदाजही एकामागून एक असे बाद होत होते.
तेराव्या षटकात मिचेलने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर इशानकडे झेल दिला. दोन षटकार मारून त्याने 17 धावा केल्या होत्या. दुसरीकडे सँटनर त्याच्या परीने प्रयत्न करत होता. पण भारताच्या जिंकण्याबाबत शंका राहिली नव्हती. प्रश्न होता तो फक्त किती धावांनी जिंकतो हा. अठराव्या षटकात सँटनर 42 धावा करून बाद झाला. बुमराने त्याच्या यष्टी उदध्वस्त केल्या. त्याआधी सोळाव्या षटकान त्याने निशॅम आणि हेन्री यांनाही त्रिफळाचीत केले होते. एकोणिसाव्या षटकात अभिषेक गोलंदाजीसाठी आला. पण त्याच्याही एकेका चेंडूवर एकेक धाव काढली गेली, तरी अजून ते 99 धावांनी पिछाडीवर होते. पण त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डफीने मारलेला फटका उंच उडाला तो वर्माच्या दिशेने गेला. वर्मा झेल घेण्यासाठी सज्ज होता. पण चेंडू त्याच्या हातात जाण्याआधीच हार्दिकने भांगडा सुरू केला होता. प्रेक्षकांचीही त्याला साथ होती. वर्माने झेल घेतला आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
याआधी एक दिवसाच्या विश्वचषक स्पर्धेत येथेच भारताला हरवून ऑस्ट्रेलिया विजयी झाला होता तेव्हा सर्वत्र जीवघेणी शांतता होती, सन्नाटा पसरला होता. स्टेडियमधील प्रेक्षक सुन्न झाले होते. नंतर कमिन्स म्हणाला होता की अशी भरगच्च स्टेडियममधील शांतता मला आवडते. भारताच्या दुःखावर त्याने मीठ चोळले होते. तसे करण्याची इच्छा सँटनरनेही बोलून दाखवली होती. पण त्याच्या डावपेचांनी त्याला दगा दिला आणि प्रेक्षकांऐवजी तोच सुन्न झाला. बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची हे सूर्यकुमारच्या संघाने दाखवून दिले आणि याआधी विश्वचषक उंचावणाऱ्या कपिल देव निखंज, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या तीन माजी कर्णधारांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विजयाचा जल्लोष दीर्घकाळ सुरूच होता. खेळाडूंनी स्टेडियममध्ये फेरी मारून प्रेक्षकांना अभिवादन केले, तसेच या माजी कर्णधारांचेही. विश्वचषक स्पर्धेत भारताने या प्रकारे पाचवे विजेतेपद मिळवले.
महिनाभरापेक्षा जास्त काळ चाललेल्या या स्पर्धेत यावेळी सर्वाधिक म्हणजे वीस संघांना प्रवेश मिळाला होता. प्राथमिक फेऱ्यांसाठी त्यांची विभागणी चार गटांत करण्यात आली होती. त्या प्रत्येक गटात पाच संघ होते. प्रत्येक गटात क्रमवारीतील पहिले दोन संघ सुपर 8 फेरीला पात्र ठरणार होते. या या दोन्ही फेऱ्यांतील सामने साखळी पद्धतीने होणार होते आणि अव्वल आठ फेरीतील प्रत्येक गटातील दोन संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरणार होते. आणि उपान्त्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी लढणार होते.
प्राथमिक गटवारी अ, ब, क, आणि ड याप्रमाणे करण्यात आली होती. ती अशीः अ गटः भारत पाकिस्तान, अमेरिका नेदरलँडस आणि नामिबिया. ब गटः झिम्बाब्वे, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, ओमान. क गटः वेस्ट इंडीज, इंग्लंड, स्कॉटलंड, इटली, नेपाळ. ड गटः दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, अमिराती (यूएई) आणि कॅनडा.
प्राथमिक फेरीत अ गटातील भारत, पाकिस्तान, ब गटातील झिम्बाब्वे, श्रीलंका, क गटातील वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि ड गटातील दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे संघ अव्वल आठ साखळीसाठी पात्र ठरले. लक्षणीय बाब अशी की अनेक बऱ्याच संघांनी अनुभवी संघांना चांगली लढत दिली. अ गटात अमेरिकेने भारताविरुद्ध चमक दाखवली. यामुळे भारत खडबडून जागा झाला असणार. पाकिस्ताला हरवून त्यांनी पुढची फेरी गाठली. तर नेदरलँडस आणि नामिबिया यांनीही आपल्या खेळातील प्रगती दाखवली. भारत आणि द. आफ्रिका या दोनच संघांनी सर्व सामने जिंकले होते.
ब गटात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला हरवून मोठा धक्का दिला, तर आयर्लंडचा खेळही चांगला होता. ऑस्ट्रेलियाच्यासंघातील बरेच खेळाडू जायबंदी झाल्याने या स्पर्धेत नव्हते त्यामुळे तो संघ बराच कमकुवत बनला होता. विशेषतः गोलंदाजीवर त्याचा परिणाम झाला आणि फलंदाजीतही त्यांचे हेड, मॅक्सवेलसारखे खेळाडू फार काही करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अव्वल आठ संघांच्या साखळीमध्येही प्रवेश करता आला नाही. असे प्रथमच घडले होते. अन्य सामन्यांत ओमानने काही वेळा चांगला खेळ केला. पण त्यांच्यात सातत्य नव्हते. क गटात स्कॉटलंड, आणि नेपाळ यांनी वाहवा मिळवली आणि प्रथमच खेळणाऱ्या इटलीने आपले भवितव्य उज्ज्वल असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या खेळाला सर्वांकडून दाद मिळाली. ड गटात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला दुसन सुपर ओव्हरपर्यंत झुंज दिली. आफ्रिकेने हा सामना कसाबसा जिंकला असेच म्हणावे लागेल. तरी त्यांना सावधानतेचा इशारा मिळाला होता. त्यामुळे नंतर त्यांनी खेळ उंचावला व उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडलाही असेच झुंजावे लागले आणि त्यांनीही उपान्त्य फेरी गाठली होती.
अव्वल आठ संघांच्या फेरीत द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे तसेच इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका अव्वल आठच्या फेरीत दाखल झाले. अ गटात द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे तर ब गटात इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी प्रवेश केला.
दक्षिण आफ्रकिने भारताला जबरदस्त हादरा देऊन मोठा विजय मिळवला. भारताच्या संघासाठी हा धोक्याचा इशारा होता कारण नेक जबरदस्त फलंदाज असतानाही त्यांचा डाव केवळ 111 धावांवर संपला होता. त्यांच्या जलदगती गोलंदाजांनी मधूनच कमी गतीचा चेंडू टाकण्याचे तंत्र वापरले आणि त्या भारताचे फलंदाज उत्तर देऊ शकले नाहीत (अंतिम सामन्यात न्यूझीलंडने असा काही प्रयत्न केल्याचे दिसले नाही, त्यामुळे ते सपशेल पराभूत झाले.) नंतर मात्र भारताने वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांना हरवून द. आफ्रिकेबरोबर उपान्त्य फेरी गाठली तर गट 2 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड उपान्त्य फेरीत दाखल झाले. श्रीलंकेने शिकस्तीने प्रयत्न केले तरी त्यांना उपान्त्य फेरी गाठता आली नाही. मात्र त्यांनी पाकिस्तानलाही उपान्त्य फेरी गाठू दिली नाही. कारण त्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 147 धावांत बाद केले तरच तो उपान्त्य फेरी गाठणार होता. पण त्याच्या आवश्यक सरासरीचे गणित श्रीलंकेने चुकवले.
हेही वाचा - T20 World Cup : Cricket wins T20 World Cup (Vinay Hardikar)
उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडने द. आफ्रिकेला नऊ गडी राखून सहज पराभूत केले. त्यांच्या कर्णधार सँटनरने त्यांच्या विजयाला मोठा हातभार लावला. त्याला रचिन रविन्द्रने गोलंदाजीत चांगली साथ दिली. या दोघांच्या फिरकीमुळे द. आफ्रिकेला अपेक्षेप्रमाणे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा डाव 169 वर आटोपला. तशी ही धावसंख्या फार मोठी नसली तरी गोलंदाजांना न्यूझीलंडपुढे आव्हान उभे करता आले असते. पण न्यूझीलंडच्या सीफर्ट आणि अॅलन या आघाडीच्या जोडीने अगदी सहजपणे या गोलंदाजीचा समाचार घेतला आणि शतकी भागिदारी केली. त्यांचा हल्ला एवढा जबरदस्त होता की, द. आफ्रिकेच्या रबाडा, एंगीडी, यान्सेन, महाराज या चांगल्या गोलंदाजांना चेंडू कुठे टाकावा असा प्रश्न पडत होता कारण कुठेही चेंडू टाकला तरी तो अॅलन सहजपणे सीमापार करत होता. सीफर्ट आणि अॅलन दोघांनीही अर्धशतके नोंदवली आणि विजय दृष्टिपथात असतानाच सीफर्ट बाद झाला. पण आता आश्चर्य घडले तरच सामन्याला कलाटणी मिळणार होती. तसे काही झाले नाही आणि विजयी र्चाकाराबरोबरच अॅलनने त्याचे शतकही पूर्ण केले. तो फक्त 33 चेंडू खेळला, यावरून त्यांच्या खेळाचा अंदाज यावा. त्याने सात षटकार आणि आठ चौकार लगावले होते. मात्र सामना एकतर्फी झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपान्त्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याने मात्र ही उणीव पुरेपूर भरून काढली. प्रथम फलंदाजी करताना भारताने तब्बल 253 धावा केल्या. तशी ही धावसंख्या मोठी होती. पण वानखेडेच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना जराही मदत मिळत नव्हती आणि दंवही नव्हते. त्याचा परिणाम म्हणून इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा सच्माचार घेतला. तसे पाहता त्यांचे सुरुवातीचे तीन गडी लवकर बाद झाले होते. पण कर्णधार ब्रूक बाद झाल्यावर बेथेलने असा काही धडाका लावला की, ही धावसंख्या पुरे पडणार का अशी शंका येऊ लागली. त्याने 87 धावा केल्या. मग मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने चतुराईने अठराव्या षटकात चेंडू बुमराकडे दिला आणि त्याने धावांचा ओघ थांबवताना त्या षटकात फक्त सहा धावा दिल्या.
आता मात्र इंग्लंडपुढे अशक्यप्राय कामगिरी होती. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि अखेरच्या षटकात 22 धावा केल्या. त्यांचा विजय केवळ आठ धावांनी हुकला. पण त्यांची कामगिरी उपान्त्य सामन्याला साजेशीच झाली. धावांची मेजवानी मिळाल्याने आणि त्यापेक्षाही भारताचा संघ विजयी झाल्याने, प्रेक्षकही खूश झाले. अंतीम लढत भारत आणि न्युझीलडं यांच्यात निश्चित झाली. भारताची इच्छा लागोपाठ दुसऱ्यांदा विजेतेपद ज्मिळवण्याची होती तर न्यूझीलंडला प्रथमच जेतेपद मिळवण्याची जिद्द होती. आधच्या स्पर्धात तीन वेळा अंतिम फेरी गाठूनही त्यांना यश मिळाले नव्हते.
अंतिम सामन्यात चार बळी मिळवणारा बुमरा सामन्याचा चा मानकरी ठरला, तर सातत्याने तीन अर्धशतके करणारा संजू सॅमसन स्पर्धेचा मानकरी ठरला. भारताने क्रिकेटच्या या प्रकारातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजासारखे मातब्बर खेळाडू या प्रकारातून निवृत्त झाल्यानंतरही भारताने हे यश मिळवून आपल्याकडे दर्जेदार खेळाडूंची वाण नसल्याचे दाखवून दिले.
या भरघोस यशाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. दरडी क्रिकेटरसिक टी 20 क्रिकेटकडे कमी दर्जाचा प्रकार म्हणूनच बघतात. रामचंद्र गुहा यांनी तर मी टी 20 सामने बघतच नाही असे म्हटले होते. तरीही यश, मग ते कोणत्याही प्रकारातील असो, ते यशच असते, हे विसरून चालणार नाही.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: t 20 cricket world cup टी 20 क्रिकेट विश्वचषक संजू सॅमसन न्यू झीलंड दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया पाकिस्तान Load More Tags
Add Comment