अलीकडं अनेकदा अचानक काहीतरी बातमी वाचण्यात येते वा टीव्हीवर पाहण्यात येते आणि एकदम अस्वस्थ वाटायला लागतं. अनेकदा आपण सुन्न होतो. जे काही घडतंय ते तसं का घडतंय, आणि खरोखरच तसं घडतंय का असे प्रश्न मनात निर्माण होतात... पण ते खरंच असतं हे आपल्याला पुरतं माहीत असतं त्यामुळंच खरं तर अशी कासाविशी येते. आजच्या जगात खरोखरच अगदी विश्वास बसू नये अशा परस्परविरोधी घटना घडत आहेत. दुर्दैवानं त्यांत अस्वस्थ करणाऱ्यांचीच संख्या आश्वस्त करणाऱ्या घटनांच्या तुलनेत प्रचंड आहे. गेलं दीडेक वर्ष प्रत्येकाच्याच मनावर कमीअधिक ताण आहे आणि तो कसा कमी करता येईल हे प्रत्येक जण आपल्या परीनं शोधतो आहे, त्याबाबत चर्चा करतो आहे, मार्गदर्शन मिळवण्याचाही प्रयत्न करतो आहे... जेणेकरून मनाची उभारी कायम राहील... हे पाहतो आहे.
समाजात दोन प्रकार असतातच पण त्यांच्यातला फरक एवढ्या प्रकर्षानं एरवी जाणवत नाही. तो या काळात जाणवायला लागला आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार यांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्या थोडं अस्वस्थही करतात पण या काळात त्यांचं प्रमाण खूपच वाढल्याचं दिसतंय आणि त्या सर्व घटनांशी संबंध आहे करोनाचा. साऱ्या जगाला ग्रासणाऱ्या या साथीनं अनेकांची मनं खचलीयत, विकल झालीयत, काहींची तर पार उद्ध्वस्तच झाली आहेत. तसा त्यांचा इतरांना त्रास नसतो कारण ते बिचारे आपलं दुःख आपल्यापाशी म्हणून गुपचूप सारं सहन करतात पण खरंतर त्यामुळंच ते अधिक खचतात. जर ते त्याबाबत मोकळेपणानं इतर कुणाशी बोलले तर त्यांना कळतं की, आपली स्थिती काही अगदी वाईट नाही. मग ते इतरांकडे बारकाईनं बघायला लागतात आणि नकळत आपल्यासारख्या अशा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करायला लागतात... कारण आता आपल्या वाट्याला जे आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटायला लागलेलं असतं.
याउलट या साऱ्या परिस्थितीला कुणीतरी जबाबदार आहे असं समजून मग त्यांच्याविरुद्धच पेटून उठायचं अशीही अनेकांची वृत्ती झालेली दिसते. ते इतर कधी बाहेरचे अनोळखी, कधी परिचित-मित्र, कधीकधी तर पोलीस वा अन्य जबाबदार व्यक्ती तर कधी घरातलीच बायकोपोरं नाहीतर आईवडील अशांवर त्यांचा राग निघतो. अगदी जीवघेणी मारहाण करतात ते आणि अचानक यांना झालं तरी काय असं वाटायला लागतं.
तुम्हालाही अनेक बातम्यांचे मथळे आठवतील... बायकोला आणि मुलांना मारून नवऱ्याची आत्महत्या, लहानशा कारणावरून मित्रांत जुंपली, दोघे ठार; दारूला पैसे नाकारले म्हणून वडीलधाऱ्याचा खून, जेवण आवडलं नाही म्हणून बायकोला मारहाण... पण यापेक्षाही गंभीर म्हणजे वाहनांची मोडतोड वा ती पेटवून देणं, दारूसाठी बंद दुकानं फोडणं, गुत्त्यात मारामारी करणं, पोलिसांना मारहाण करणं, भांडण सोडवायला गेलेल्याचाच बळी जाणं, माहेरी जाऊन पैसे म्हणजे हजारो वा लाखो रुपये आणायला नकार दिल्यानं झालेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू होणं... अशा बातम्या आपण आधीही वाचल्या असतील पण कधी सहा महिने- वर्षानंतर पण आता त्यांमध्ये नियमित वारंवारिता आलीय. त्यांतही भर पडलीय ती शहारे आणणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्यांची. त्या मुलांनाही आत्महत्या करायला जे क्षुल्लक वाटणारं कारण पुरतं ते वाचून थक्क व्हायला होतं म्हणजे कुणाला मोबाईलवर गेम खेळायला दिला नाही, कुणाला मोबाईल विकत आणता येणार नाही असं सांगितलं गेलं, कुणाला आई वा वडील रागावून बोलले, कुणाची काहीतरी चैनीच्या वस्तूची वा खाद्यपदार्थाची मागणी पुरवली नाही इत्यादी. मनात येतं की, मुलं एवढ्या थराला का जातात?
भरीत भर म्हणून महिलांचाही या आत्महत्यांत भरघोस वाटा आहे आणि त्यांची कारणंही तशी वरकरणी साधी वाटणारी पण सध्याच्या वातावरणात त्यांना स्वतःचा जीव घेण्यास पुरेशी असतात. कुणी पती पत्नीवर संशय घेतो, कुणाला घरखर्चासाठी पैशास नकार मिळतो, कुणाला मुलांची हालत बघवत नाही, मुलांचा मोबाईलचा हट्ट पुरवता येत नाही, कुणाला साथीची भीती, तर कुणी कोविड झाला या भीतीनं इत्यादी. दीड वर्षातल्या परिस्थितीमुळं आलेला मनावरचा असह्य ताण या साऱ्याला जबाबदार आहे हे खरंच पण केवळ तेवढंच नाही तर ही अशी मनोवृत्ती का निर्माण झालीय याचा शोध घेण्याचीच आवश्यकता वाटायला लागलीय. हीसुद्धा एक प्रकारची मनोविकाराची साथच नाही ना असा प्रश्न निर्माण झाल्यासारखं वाटतंय.
...पण यापेक्षाही भयानक म्हणजे आता वेगवेगळ्या कारणांनी सामूहिक हिंसाचाराचंही अभद्र दर्शन वारंवार होत आहे.. गेल्या सातआठ वर्षांपासून (त्याआधीही अल्प प्रमाणात) असा हिंसाचार होतच होता. कारणं म्हणाल तर गोहत्या, गोमांस ने-आण, ते शिजवणं वा भक्षण करणं (खरंतर गोमातेबाबत एवढं प्रेम, एवढा आदर बाळगणाऱ्यांना, स्वतःला कट्टर शाकाहारी म्हणवणाऱ्यांना, गोमांस इतक्या चटकन कसं ओळखता येतं? काही घटनांत तर ते अगदी ताटातलं वा चुलीवरचं असल्याचं सांगण्यात येत होतं हे कोडंच आहे. कुणी तज्ज्ञ यावर उत्तर देईल का?), लव्ह जिहाद, पबमध्ये जाणाऱ्या तरुणींवर किंवा पाश्चात्त्य पोशाख करणाऱ्या मुलींवर हल्ले, पूर्वापर आलेली कामं करायला दलितांपैकी कुणी नकार दिला म्हणून वा आपल्याला योग्य मान दिला नाही म्हणूनही... अशा असंख्य कारणांनी सामूहिक हिंसाचार होत होताच आणि त्याला अटकाव करण्यात येत नव्हता. शक्य तिथं उत्तेजनच दिलं जात होतं त्यामुळं गुन्ह्यांची नोंद वगैरे शक्यताच नाही. समजा गुन्ह्याची नोंद होऊन शिक्षा झाली तर शिक्षा संपवून बाहेर येणाऱ्या गुन्हेगाराच्या स्वागताला मंत्र्यांपासून अनेक जण हारतुरे घेऊन सज्ज. त्यांच्याकडून, जणू काही ते गुन्हेगार मोठे वीर आहेत असा त्या गुन्हेगारांचा खास गौरवही अशा लोकांकडून होत होता.
...पण आता जास्तच वाईट घटना घडत आहेत... म्हणजे वर सांगितलं त्यांहीपेक्षा गंभीर हल्ले डॉक्टर, कोविड योद्धे, पोलीस, परिचारिका, आशासेविका अशांवर होत आहेत. साथीनं बाधित रुग्णांसाठी स्थापन केलेल्या ठिकाणांवर, त्यांच्यासाठी असलेल्या हॉस्पिटल्सवरही हल्ले होत आहेत. या हल्लेखोरांना माणूस का म्हणावं असा प्रश्न पडतो.
हॉस्पिटलमध्ये घेण्याआधीच काही लाखांची मागणी करणारे, नंतर त्याहीपेक्षा मोठ्या रकमांची बिलं करणारे आणि वर ती भरल्याशिवाय पार्थिव ताब्यात मिळणार नाही असं सांगणारे, भलत्याचेच पार्थिव देणारे डॉक्टर; अगदी अंत्यसंस्कारांबाबतही वादंग निर्माण करणारे, दगावलेल्या रुग्णाजवळही न जाणारे, त्याचा ताबा घेऊन अंत्यसंस्कारास नकार देणारे नातेवाईक, मुळात ज्या औषधाचा सर्रास वापर करण्यात अर्थ नाही म्हणजे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं तरच द्या असं तज्ज्ञांनी सांगितल्यानंतरही त्याच औषधांची मागणी करणारे आणि त्या सतत वाढणाऱ्या मागणीचा फायदा घेऊन अनेक पटींनी काळ्या बाजारात त्याची विक्री करणारे डॉक्टरनं ते इंजेक्शन द्यायला नकार दिला तरीही भरमसाठ पैसा खर्च करून आणलेलं असं इंजेक्शन रुग्णाला देण्यासाठी डॉक्टरला दमदाटी करून भाग पाडणारे, वारेमाप भाडं घेणाऱ्या रुग्णवाहिका, शववाहिका... या काळातही अमानवीय कृत्ये करणाऱ्यांची यादीही मोठी आहे.
...आणि या सगळ्यावर कडी करतात धोरणकर्ते. महानेते. त्यांचे केवळ उपदेशाचे शब्द वा उत्सवांचं आवाहन, अगदी लसीचाही उत्सव. लसोत्सव! (त्यांच्या भक्तांसाठी ती आज्ञाच!). त्यांनी काय करायला हवं होतं आणि अजूनही काय करणं शक्य आहे असं तज्ज्ञ वा विरोधी पक्षांचे नेते सांगत असताना त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचा अहंगंड. भक्त तर काय... तज्ज्ञांपेक्षा आमच्या नेत्यालाच सारं कळतं म्हणायला सज्ज आहेतच. मग विरोधक कसे देशद्रोही आहेत वगैरेची नेहमीची समूहगाणी... पण अखेर नाइलाजानं का होईना महानेत्यानं आडूनआडून काही सूचना मान्य केल्या तरीही आपणच कसे हे निर्णय घेत आहोत हे दाखवण्याची त्यांची वृत्ती हे सारंच विचित्र वाटायला लागलंय. लसीकरण वाढवा असं सांगायला लसींचा साठा आणि आवश्यक लसींचे डोस यांचा समतोल आहे का नाही हे बघायचीही इच्छा यांना नाही... त्यामुळे घोषणा केली म्हणजे नंतर ते झाल्याप्रमाणेच वागायचं ही सवयही आता सर्वांना माहीत झालीय. लसींचा तुटवडा नाही असं सांगायचं तर राज्य सरकारं, अगदी त्यांच्या पक्षांचीही लसी नाहीत, लसीकरण करणं शक्य नाही असं सांगतात. त्याकडं दुर्लक्ष करायचं. वर्षअखेर लसींचे किती डोस येतील हे सांगताना आजची स्थिती काय याबाबत काहीच सांगायचं नाही. तीच गोष्ट देशातल्या यासंबंधीच्या आकडेवारीची.
आर्थिक बाबीत तुम्ही आकड्यांचे खेळ करून बनवाबनवी करून स्वतःचं समाधान भले करून घ्याल पण मृतांच्या आकड्यांबाबत कितीही लपवालपवी केली तरी मृत्यू तर खराच असतो. मग तो करोनामुळं झाला नाही हे सिद्ध करायचं... पण एकदम एवढ्या प्रमाणात माणसं कशी मेली हा प्रश्न अर्थातच अनुत्तरित ठेवायचा. दुसरीकडं अंत्यसंस्कारांचाही प्रश्न आहेच. त्यासाठी बराच खर्च येत आहे, काही ठिकाणी स्मशानात प्रवेशासाठीही पैसे घेतले गेल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं शेकडो मृतदेह गंगामातेला अर्पण केले जात आहेत. ते तुमच्या हद्दीतले की आमच्या हद्दीतले यावरूनच प्रशासनातच वादंग माजत आहे. कुठं ते काठावरच्या वाळवंटात पुरले जात आहेत आणि त्या गावचे- उन्नावचे लोक म्हणतात की, आमचा याच्याशी संबंध नाही, तिथला एक अधिकारी काय सांगतो... तर इथं मृतांचं दहन करण्यासाठी लाकडाचा तुटवडा नाही! गंगामातेच्या आशीर्वादानं आम्हाला महामारीची झळ पोहोचणार नाही कारण महामारी इथं येऊ शकणार नाही हेही यांच्यापैकी एका मुख्यमंत्र्याचं अद्यापही गाजत असलेलं वक्तव्य. ज्या साधूंच्या आखाड्यांची पुण्याई आपल्याला तारेल असं म्हटलं जात होतं त्यांतल्या प्रमुख आखाड्याचाच सर्वोच्च साधून का कोविडनंच दगावला...आणि मग कुंभमेळा, स्नानं प्रतीकात्मकच करण्यात यावीत असा महानेत्याचा उपदेश!
त्या राज्यांतलं अचानक वाढलेलं करोनाचं प्रमाण हे कुंभमेळा वा निवडणूक प्रचाराच्या मोठ्या सभा यांनी नाही हे सांगताना निवडणूक नसलेल्या राज्यांचा दाखला दिला जात आहे... पण मग या मेळ्याआधी वा निवडणुकांआधी तिथे मर्यादितच बाधित कसे होते असं विचारायचं नाही. आपल्या नेत्याची महती सांगणारे मंत्री त्याच्या निवडणूकसभांचा, कुंभमेळ्याबाबतच्या परवानगीचा उल्लेख करत नाहीत यात आश्चर्य वाटावं असं काहीच नाही. ते नित्याचंच आहे.
दुसरीकडे यांची फौज राज्य सरकारवर टीका करून तुम्ही काय केलं नाहीत याची यादी देत आहे पण त्यांच्या ध्यानात येत नाही की, ते जे काही बोल राज्य सरकारला लावत आहेत ते तितक्याच चपखलपणे केंद्र सरकारलाही लागू पडतात. याचा अर्थ एक बोट भले राज्यसरकारवर रोखलेलं असू दे... तीन बोटं तर थेट त्यांच्या महानेत्याकडंच वळलेली आहेत... (पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर महानेताही लस, रेमेडिसेविर, ऑक्सिजन यांप्रमाणे गायब आहे!) पण हे त्यांना उमगण्याची शक्यता नाही. तेवढा विचार कोण करतंय? त्यामुळंच प्रत्यक्ष साथ रोखण्याऐवजी लोकांना भडकवण्यातच ते मग्न आहेत.
आता त्यांच्यापैकी काहींना तरी वास्तवाची जाणीव होत असल्याचं दिसतंय कारण त्यांनी त्यांच्या राज्यात खरं काय घडतंय, ते सांगायला सुरुवात केलीय. उदाहरणार्थ, गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, बडोदा, सुरत, जामनगर आणि नवानगर या सहा शहरांत मोठ्या प्रमाणावर मृत्यू होऊन काही दिवसांत तिथे 17,822 मृतांचं दहन झाल्याची बातमी 6 मेच्या एका गुजराती दैनिकात आल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलंय. करोना मृत्यूंची सरकारी नोंद केवळ याच्या जेमतेम दहा टक्के एवढीच आहे पण मग उरलेले हजारो कशामुळं मरण पावले हा प्रश्नच आहे... कारण एरवी अशा अन्य कारणांमुळं होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येच्या अनेकपट हा आकडा आहे. याचा अर्थ त्यांच्या चाचण्या झाल्या नसाव्यात वा घरीच मरण पावलेल्यांची नोंदच नसावी. या सहा शहरांमधली लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या जेमतेम एक तृतीयांश आहे. मोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती तर ग्रामीण भागातली अवस्था काय असेल असा प्रश्न पडतो.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथली परिस्थितीही अशीच आहे त्यामुळंच भारत खरी आकडेवारी देत नाही अशी टीका परकीय वृत्तपत्रं देत आहेत तर इकडे काही जण मात्र मुंबई महापालिका आकडेवारी दडवते असा कंठशोष करत आहेत आणि प्रतिमा जपण्याची, वर्धिष्णु करण्यासाठी प्रयत्न करण्याची ही वेळ नाही असं महानेत्याला सांगायचं धाडस कट्टर भक्त असलेला अभिनेता अनुपम खेरही आता करतो आहे.
या साऱ्यानं डोकं भणभणतं. खरं काय अन् खोटं काय असा प्रश्न पडतो. खरं म्हणजे महानेत्याच्या राज्यात खोटं तेच खरं मानायचं असतं हे पुरतं कळूनही असा प्रश्न पडतच असतो पण मग अंधारात प्रकाशकिरण दिसावा तशा काही बातम्या दिसतात. त्यांना त्यामानानं हवी तेवढी प्रसिद्धी दिली जात नाही तरीही या काळात ती दिली जातीये हे महत्त्वाचं.
अक्षरशः केवळ दोनचार तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामाला लागणारे डॉक्टर, त्यांचे मदतनीस, करोना योद्धे, पैशाकडे न पाहता सेवा करणारे असंख्य कर्मचारी, त्यांच्या मदतीला आपण होऊन येणारे युवक. हे युवक तर धर्म, जात कशाचाही विचार न करता केवळ आपण सारे भारतीय या भावनेनंच या लढ्यात उतरले आहेत. त्यांना मोफत रिक्षा, रुग्णवाहिका पुरवणाऱ्यांची (भले ते संख्येनं फार नसले तरी) साथ आहे. जिवावर उदार होऊन मृत देहांची हाताळणी करणारे आहेत, जिथं नातेवाईक जवळ यायला तयार नाहीत तिथं आपुलकीनं अंत्यसंस्कार करणारे आहेत.
गावातच राहून कोणत्याही आधुनिक सुविधा नसतानाही करोना रुग्णांना बरं करणारे डॉ. बावीस्कर, डॉ. आरोळे असे गाजावाजा न करता आपलं काम करत राहणारे आहेत. आशासेविका आहेत. गावागावांतले काही शिक्षक घरोघरी जाऊन लसीकरणाचं महत्त्व सांगत आहेत. गावकऱ्यांबरोबर मैत्री करून, अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या त्यांच्या गैरसमजुती दूर करून, प्रथम दोनचार जणांना लसीकरणासाठी तयार करत आहेत आणि नंतर मग गावातल्या लोकांचा लसीकरणाचा विरोध संपून त्यासाठी आग्रह सुरू होत आहे. आशासेविकांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना गावात प्रवेश न देणाऱ्यांना वासुदेवाच्या रूपानं लसीची महती सांगणारे मुख्याध्यापक आहेत. लसीचा कणही वाया न घालवणारी केरळमधली आरोग्यसेवा आहे.
(प्रत्येक कुपीत दहा जणांना पुरेल एवढी मात्रा असते पण सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंपनी कुपीत अर्धी मात्रा जास्तच भरते म्हणजे दोन कुप्यांत मिळून21 जणांना पुरणारी लस असते. ती जास्तीची लस वापरून तिथे कुप्यांच्या हिशोबापेक्षा हजारो अधिक नागरिकांना लस देण्यात आली.)
पुण्याच्या कोविड सेंटरमधल्या डॉक्टरांनी ऑक्सिजन वापर योग्य प्रकारे करून किती मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाचवला. गोष्ट साधी वाटते पण रुग्ण मोबाईलवर बोलताना, स्वच्छतागृहात जाताना, चहा-जेवण करताना ऑक्सिजन सुरूच ठेवायचे आणि तो मोठ्या प्रमाणात वाया जायचा. त्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं. अर्थात त्यामुळं इतर अनेकांची गरज भागली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. नंदुरबरच्या डॉ. बरुडांचं नाव तर जगभर झालंय. इतर ठिकाणीही त्यांचं अनुकरण व्हायला लागेल...
दुसरीकडं आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूनं- ऑस्ट्रेलयाच्या कमिन्सनं या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी प्रथम मदत जाहीर केली, नंतर इतरांनी हळूहळू त्याचा कित्ता गिरवायला सुरुवात केली. खेळाडूंपैकी काहींना वा त्यांच्या नातेवाइकांना बाधा झाली. त्यांनाही मग आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली. ते आता आपली मदत जाहीर करत आहेत. त्यांचे संघमालकही त्यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत ही चांगली बाब आहे.
शेकडो कोटी घेणारे सिनेस्टार संगीत-रजनी वगैरे आयोजित न करता आपल्याच खिशातून मदत देतील अशी अपेक्षा. खरंतर मोठी हॉस्पिटल्स उभारून देण्याची त्यांची क्षमता आहे. कुमार केतकरांनी त्यांच्या खासदार निधीतून अडीच कोटी रुपये आवश्यक वैद्यकीय सामग्रीसाठी दिले आहेत, त्याआधी गेल्या वर्षीही त्यांनी अशीच मोठी मदत दिली होती. क्रिकेटपटूंनी कमिन्सचा आदर्श ठेवला. तसे अन्य आमदार, खासदार आता केतकरांचा धडा गिरवतील अशी अपेक्षा करावी का?
असं काही थोडंफार चांगलं आणि तरीही बाकी बरंचसं काळजी वाटायला लावणारं. ती वाढवणारं. कदाचित यामुळंच असेल पण अजूनही मनाची अस्वस्थता जातच नाही....
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: आ श्री केतकर कोरोना आरोग्य आरोग्य व्यवस्था राजकारण केंद्र सरकार प्रशासन A S Ketkar Corona Health Politics Administration Load More Tags
Add Comment