तारांगणातील 'मांडव' (उत्तरार्ध)

मांडू (मध्यप्रदेश) येथील ‘सोलो बॅकपॅक ट्रीप’चा अनुभव

हिंडोला महल

समोर अशरफी महल आणि चतुर्भुज राम मंदिर गुण्यागोविंदाने नांदत असलेलं दिसलं. मनात विचार आला, काळाच्या विशाल पटावरील आपण एक छोटा बिंदूदेखील नाही. मोठमोठी साम्राज्ये आली आणि लयाला गेली. राजेरजवाडे आले आणि गेले. ‘इतिहास’ या अनंत चालणाऱ्या प्रक्रियेने सर्वांनाच सामावून घेतलं. सत्तेच्या सारीपाटात विध्वंस करणारे, लढाया करणारे, जिंकणारे हरणारे असे सर्वच इतिहासाच्या सन-सनावळीपुरते मर्यादित राहून लृप्त होतील आणि इतिहास बनतील. पण नवनिर्मिती करणारे, कलागुणांना प्रोत्साहन देणारे, स्वत:चं आयुष्य सुखासमाधानाने जगणारे आणि इतरदेखील तसंच आयुष्य जगू शकतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे, सर्वांच्या सुखाची कामना करणारे लोक इतिहास घडवतील.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात मी ‘मांडू’च्या मध्यभागापासून केली. कोणत्याही गावाचा/शहराचा असतो तसा हा वर्दळीचा चौक होता. आधुनिक काळातील दुकाने, हॉटेल्स, बस स्टँड, कार्यालये तर येथे होतीच पण जुन्याकाळातील जामी मस्जिद, अशरफी महल, होशंगशहाचा मकबरा या वास्तू या स्थानाचं महत्त्व अधोरेखित करत होत्या. 

होशंगशहाचा मकबरा ही वास्तू मांडूच्याच नव्हे तर भारताच्या स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. संपूर्ण संगमरवरात (मूळ शब्द ‘संग-मर्वर’ म्हणजे शुभ्र पत्थर) बांधलेली भारतातील ही पहिली वास्तू आहे. ताज महाल पाहून रोमांचित होणाऱ्यांना हे माहीत नसते की, ताज महाल चे कारागीर येथे पाहणी करून गेले होते व या वास्तूला प्रमाण मानूनच त्यांनी ताज महल बांधला होता. दोन्ही शेवटी मकबरेच! पण होशंगशहाने स्वतःच्या हयातीतच तो बांधायला घेतला. 

होशंगशहा हा खिलजी घराण्याशी विद्रोह करून उठलेल्या नसीरुद्दीन दिलावर खान यांचा मुलगा. इ.स 1293 पासून जरी मांडूवर खिलजींनी आक्रमण केले असले तरी त्यांना सत्ता काबीज करता आली नाही. नसीरुद्दीन दिलावर खान पंधराव्या शतकाच्या प्रारंभी मांडूचा प्रथम मुस्लीम शासक बनला तर त्याचा मुलगा होशंगशाहने मांडूस राजधानी बनवले आणि अनेक वास्तू निर्माण केल्या. 

जामी मस्जिद ही त्यातलीच एक. जामी मस्जिद असो की अशरफी महल की होशंगशहाचा मकबरा, होशंगशहाने बांधकाम सुरु केले पण ते तो पूर्ण करू शकला नाही. होशंगशहा 1422 मध्ये निवर्तल्यावर 1440 मध्ये त्याचा मकबरा पूर्ण झाला तर जामी मस्जिद 1454 मध्ये. जामी मस्जिद च्या अगदी समोर असलेला अशरफी महल हा एक मदरसा होता पण महमूद खिलजीने तो पाडून तिथे आपला मकबरा बांधला. आता हा मकबरा अस्तित्वात नाही. पण एका मुस्लीम शासकाने दुसऱ्या मुस्लीम शासकाने बांधलेले बांधकाम तोडून त्यावर दुसरे बांधकाम करण्याचे उदाहरण मी पहिल्यांदाच पाहत होतो.

विजयनगर किंवा हंपीला ज्या भयाणपणे विध्वंसाच्या खुणा दिसतात तशा खुणा इस्लामी आक्रमणांना बळी पडूनसुद्धा आणि त्यांचा दीर्घकाळ वावर असून सुद्धा मांडूमध्ये मात्र नजरेस पडत नव्हत्या. अन्यथा जलालुद्दीन खिलजी, महमूद खिलजी, गियासुद्दीन खिलजी या उपटसुंभ सुलतानांचे अस्तित्व असताना विध्वंस न होणे हे, आणि भोजराजासारख्या राजाची राजधानी केवळ 40 किमीवर असताना या ठिकाणी काही निर्मिती न होणे हे एकप्रकारे आश्चर्यच होते.

होशंगशहाचा मकबरा

नीट विचार करता असं लक्षात येतं की, विजयनगर ही खिलजी राजवटीस आव्हान देणाऱ्या साम्राज्याची राजधानी होती त्यामुळे ती काबीज केल्यावर तिची मानहानी करणे व विध्वंसाच्या खुणा जाणूनबुजून मागे ठेवणं हे स्वातंत्र्यप्रेरणा दाबण्याच्या व पुढील संभाव्य विद्रोहाला पायबंद घालण्यासाठीच्या धोरणाचा भाग होता. मांडूचं तसं नव्हतं, इथे विध्वंस कोणालाही दाखवायची आवश्यकता नव्हती, त्यामुळे इथे विध्वंस केला पण तो अर्धवट नाही तर समूळ. त्यामुळे समोर दिसत होत्या, त्या नव्याने उभारलेल्या वास्तू.

इतिहासाचं उदात्तीकरण करणं, इतिहासाचं विद्रुपीकरण करणं आणि इतिहास लपवायचा प्रयत्न करणं ह्या तिन्ही बाबी समाजाच्या दृष्टीने हानिकारकच. इथे इतिहास लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसलं. त्याचा उद्देश जरी भूतकाळातील भांडणं आठवून वर्तमानात झगडे होऊ नये असा आहे असं मानलं तरी ते चूकच. पुरातत्व खात्यातर्फे लावलेल्या पाट्यावर हा इतिहास लपवण्याचा प्रयत्न बारकाईने वाचन केल्यास उठून दिसत होता. उदा., एका पाटीवर लिहिलं होतं, ‘यह मस्जिद उस समय की है जब हिंदू भवनो की सामग्री का उपयोग मस्जिदो के निर्माण के लिये किया जाता था.’ दुसऱ्या एका पाटीवर लिहिलं होतं, ‘यह संभवत: हिंदू मंदिर था, जिसकी रचना मुस्लीम शासको ने परिवर्तन किया.’ 

‘दर-उल-इस्लाम’चा पुरस्कार करणाऱ्या धर्मांध राजवटी विध्वंसक होत्या, मूर्तीभंजन हा त्यांच्या धोरणाचा भाग या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या तर त्यामुळे समाजात तेढ उत्पन्न होत नसते तर समाज डोळस बनत असतो. त्यामुळेच पैगंबराच्या सुरवातीच्या काळातील उम्मतुल वाहिदा (सर्वधर्म समभाव) चा अर्थ सांगण्याचा मार्ग प्रशस्त होत असतो. 

या चौकातच पुढे जैन मंदिर होतं. जैनांच्या मंदिरात मी अनेकदा गेलेलो आहे पण तिथली महावीराची प्रतिमा फारच उग्र दिसते आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या हत्ती, घोडे व त्यावर बसलेल्या तीर्थंकर/अनुयायी यांच्या dis proportionate प्रतिमा थोड्या भीतीदायक असतात, त्यामुळे शांततेची प्रचीती येत नाही.

दुपारचे साडेबारा वाजले होते. म्हणजेच जेवणाची वेळ झाली होती. मी जेव्हा फिरस्तीला जातो तेव्हा शक्य असेल तेथे लंगर, महाप्रसाद येथे जेवणे पसंत करतो. एकतर जेवण स्थानिक पद्धतीचं मिळतं, ते शुद्ध व सात्विक असतं आणि बहुतेक वेळा ते अनुदानित असल्याने नाममात्र शुल्क भरावं लागतं. या मंदिरातदेखील महाप्रसाद होता. मी त्याचं कुपन घ्यायला ऑफिसमध्ये गेलो तर अनुदान देणाऱ्यांच्या यादीत एक नाव होतं, (गुटखा किंग) रसिकलाल माणिकलाल धारिवाल! त्यांच्यातर्फे धर्मशाळा बांधली जात आहे, हे मंदिराच्या आवारात फिरताना लक्षात आलेच होते. पण महाप्रसादाच्या (जेवणाच्या) प्रायोजकांमध्ये हे नाव पाहिलं आणि माझ्यासमोर थिएटरमध्ये सिनेमा चालू होण्याआधी गुटखा, खैनी, तंबाखू यांचे दुष्परिणाम अधोरेखित करणारी जी जनहितार्थ जाहिरात प्रसारित होते, त्या जाहिरातीमधील कर्करोगामुळे जबडा फाटलेल्या स्त्रीचा चेहरा समोर आला आणि पोटात मळमळू लागलं. साध्य-साधनशुचितेचा अभाव असलेल्या त्या ठिकाणाहून तडक बाहेर पडलो आणि स्कुटी भरधाव सोडली. कुठे जायचे माहीत नव्हतं. थोड्याच वेळात एका विस्तीर्ण तलावाशी पोहोचलो. हाच तो सागर तलाव. जरा निवांत बसलो. बाजूच्या टपरीवर लिंबू सरबत प्यायलो तेव्हा थोडी तरतरी आली. दुपारचा एक वाजला होता. माझा पुढचा पाडाव ‘जहाज महल’ परिसर होता. कारण या परिसरात किमान 12 प्रेक्षणीय स्थळं होती आणि हा परिसर म्हणजे मांडूचा ‘क़्विन्स नेकलेस’ होता..’ ‘यह नही देखा तो क्या देखा’ या श्रेणीतला. आजचा सूर्यास्त जहाज महलमधून पाहायचे नियोजन होते आणि सर्व परिसर नीट पाहायला दोन तास पुरेसे होते. म्हणजेच तीन वाजता पोहोचलो तरी चालणार होते. हे ठिकाण मुख्य चौकातून एक  किमीवर आहे. 

जेवणाची इच्छा मेली होती आणि पूर्ण दोन तास हाताशी होते त्यामुळे आणखी काही ठिकाणे पाहायला मिळणार होती. ‘Blessing in disguise’ म्हणतात ते हेच! 

मांडू परिसरातील सर्वात प्राचीन अशा नीलकंठ महादेव मंदिराकडे मोर्चा वळवला. हे मंदिर मांडूपासून सुमारे सहा किमी अंतरावर, महेश्वर रोडला आहे. जाताना छोटा घाट लागतो. शिवाचे मंदिर बहुतेक करून मुख्य गाव/शहराबाहेर असते आणि कधी डोंगरावर तर कधी दरीत असते म्हणजे तिथे जाणे सुकर नसते. हे मंदिर छोट्याश्या दरीत होते आणि सहजी सापडणार नाही असे वसलेले होते. मंदिर एकटे व सुने सुने होते पण तिथे ‘शिवाचे’ अस्तित्व जाणवल्यासारखे वाटत होते. शिवलिंगावर अभिषेकाच्या रूपाने पडणारे पाणी एका पन्हळीद्वारे एका झिगझॅग चक्रात आणले होते आणि त्या चक्रातील मार्गाने ते शांतपणे प्रवाहित होत होते. पाण्याचा निचरा करण्याची इतकी कल्पक योजना पाहून मी स्तंभित झालो. दाढी व लांब जटा असलेला एक साधू तिथे मोठे पुस्तक वाचत बसला होता. डोके पुस्तकात असल्याने त्याचा केवळ भालप्रदेश मला दिसत होता पण वैराग्याचे तेज त्यावर दिसत होते. माझ्या अस्तित्वाची त्याने दखल घेतली नव्हती. मी त्याला नमस्कार करताच मान वर न करता त्याने बाजूच्या ताटातून प्रसाद माझ्या हातात ठेवला. ‘प्रसाद’ ही संकल्पना मला खूप भावत आली आहे. देवाचं दर्शन केलं म्हणून काहीतरी खायला द्यायला पाहिजे हे ज्या माणसाला पहिल्यांदा सुचलं असेल तो सृष्टीच्या इतिहासातील पहिला मायाळू माणूस म्हटला पाहिजे.

मांडूची एक खासियत म्हणजे ‘बाओबाब’ किंवा ‘मांडू की इमली’ हे फळ. आपली नेहमीची चिंच काकडीएवढी किंवा दुधीभोपळ्याएवढी वाढली तर जशी दिसेल तसं हे फळ दिसतं. मंदिराच्या बाहेर एका मुलीकडून मी त्याचे काप विकत घेतले. ते मला तुरट लागलं आणि फारसं आवडलं नाही. पण हे बाओबाब वृक्ष जागोजागी दिसतात. एका वयस्कर माणसाने आपल्या मुलांना कवेत घेण्यासाठी बाहु पसरावेत तसे हे वृक्ष पसरलेले दिसतात.

परत मांडू गावाकडे येत असताना एक पाटी बघून मी थांबलो. ‘दाई का महल’ अशी पाटी बघून कुतूहल जागृत झाले म्हणून आड वाट करून गेलो तर दोन महाल एका शेजारी एक बांधलेले होते. एक होता ‘दाई का महल’ आणि एक ‘दाई के छोटी बहन का महल’.

सर्वसाधारणपणे महल वगैरे बादशाह/बेगम यांचे असतात पण येथे एका सुईणीला (सेवा पुरवठादार) महल दिलेला पाहून नवल वाटले. नीट निरीक्षण केलं तर असं अनुमान निघत होतं की हा महल नसून सूतिकागृह असावे. 

दाई का महल

असेच आणखी दोन महल पाहिले, ते म्हणजे हाथी महल व तवेली महल. हे अनुक्रमे हत्ती ठेवायची जागा व पागा होती. पण तिथे माहूत व रिसालदार यांच्यासाठी विश्रामगृह होते. मांडूचे राज्यकर्ते आपल्या सेवा-पुरवठादारांच्या सुखसुविधांसाठी जागरूक होते. मी तरी असं उदाहरण प्रथमच पाहत होतो.

आता तीन वाजत आले होते व मी ‘क़्विन्स नेकलेस’, जहाज महल परिसरात दाखल झालो. अकबराच्या काळातील, सत्ता प्राप्तीसाठी झालेला संघर्ष व राणी रुपमतीची कहाणी आपण पाहिली. अकबराचा उत्तराधिकारी जहांगीर (‘मुघले आझम’च्या सलीम-अनारकलीमधील सलीम) हा ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ या वृत्तीचा होता. त्याचा काळ तुलनेने शांततेचा होता. त्याच्या काळात मुघल साम्राज्य ना वाढले ना कमी झाले. (त्याने मुघलसाम्राज्याचा ‘चार्ज’ जसा घेतला, तसाच्या तसाच ‘शाहजहान’ला सुपूर्त केला.) जहांगीर कट्टर नव्हता. त्याने रामायणाचा फारसी अनुवाद करवला, नाण्यांवर राम-सीतेच्या प्रतिमा कोरल्या. त्याच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत विविध कलांना प्रोत्साहन मिळाले.अशा या जहांगीरचा 45 वा वाढदिवस जहाज महलमध्ये पार पडला. कपूर तलाव आणि मुत्रज तलाव या नैसर्गिक तलावांच्या मधल्या जमिनीवर हा दुमजली महाल पंधराव्या शतकात बांधला तो गियासउद्दीन खिलजी या विषयलोलुप सुलतानाने. तळमजल्यावरील शयनकक्षांची संख्या व रचना पाहिली तर त्याच्या जनानखान्याचा अंदाज लावता येतो. ‘एरियल व्ह्यू’ने या महालाकडे पाहिल्यावर जहाज तरंगत असल्याचे दिसते, त्यामुळे यांस जहाज महल हे नाव पडले. सध्याच्या काळात एरियल फोटोग्राफी शक्य आहे. पण मला प्रश्न पडला की, पंधराव्या शतकात एरियल व्ह्यू कोणी व कसा घेतला कारण येथे तितकी उंच झाडंदेखील दिसत नव्हती आणि असली तरी एका झाडावरून संपूर्ण लँडस्केप दृष्टीत सामावणे कठीण होते.

याच परिसरातील आणखी एक महल म्हणजे जल महाल. जलक्रीडा करण्यासाठी या महालाचा उपयोग होत असावा. आता सर्वत्र पाण्याची नक्षीदार कुंडं होती, त्यात उतरण्यासाठी गोलाकार पायऱ्या होत्या. कोणाला बाजूच्या मुत्रक तलावात डुंबायचे असेल तर त्यासाठी तलावापर्यंत पायऱ्या खोदलेल्या होत्या. तसेच जहाज महलच्या सज्जातून सुलतान ही जलक्रीडा पाहू शकेल अशीदेखील व्यवस्था केलेली दिसत होती.

हिंडोला महल हीसुद्धा वास्तूशास्त्राचा उत्तम नमुना होता. त्याच्या भिंती दोन्ही बाजूंना तिरक्या पसरत गेलेल्या होत्या, त्यामुळे लांबून पाहताना झुलणारा झोपाळा पाहत असल्याचा फील येत होता. 

हिंडोला महलच्या मागच्या बाजूला संगमरवरात कोरलेला एक सज्जा होता. त्याच्या बाजूला पाटी होती ‘नाहर झरोखा’. भोगविलासातून वेळ मिळाला की जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी ही रचना केलेली असावी. बाजूच्या ग्रुपला गाईडदेखील तसंच सांगत होता. पण हा झरोका ज्या उंचीवर होता त्या उंचीवर आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी कर्णकर्कश आवाज असण्याची आवश्यकता होती. भोगविलासासाठी बनवलेल्या या परिसरात जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी अवकाश दिला जात असेल, हे बुद्धीला पटत नव्हते. जंगलातील प्राणी-पक्षी पाहण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा असा तर्क करायला जागा होती.

तो चंगळवाद पाहून थोडेसे खजील व्हायला होत होते. अशातच फिरता फिरता मी ‘हमाम’ अशी पाटी लिहिलेल्या वास्तूबाहेर पोहोचलो. नावावरून ते एक स्नानगृह होते हे स्पष्ट होते. पण त्याला दरवाजे नव्हते आणि आतमध्ये जी दालने होती तिथेदेखील ‘प्रायव्हसी’ दिसत नव्हती आणि त्या वास्तूच्या छताकडे पाहिल्यावर तर मला त्या काळच्या कल्पकतेला सलाम करावासा वाटला. त्या छताला तारकांच्या (चांदणी) आकारात झरोके पाडलेले होते, जेणेकरून ‘तारांगणाचा’ फील येईल. टर्किश बाथ म्हणून जे सध्या प्रचलित आहे ते या लोकांना पंधराव्या शतकात माहीत होते. आणि त्यामुळेच ती जागा म्हणजे नुसते स्नानगृह नसावे तर काव्यशास्त्रविनोद करण्याची ‘चिल मारण्याची’ जागा असावी असा निष्कर्ष निघत होता. 

मला जहाज महलच्या सज्जात बसून सूर्यास्त पाहायचा होता. माझी ही सोलो ट्रीप ‘शून्य फोटो’ असणार होती. पण इतर पर्यटकांना त्याचं काय? माझ्यासारखा सडाफटिंग माणूस पाहून सर्व मला फोटो काढण्याची विनंती करू लागले. त्यात माझी एक चूक अशी झाली की, सर्वात पहिल्यांदा ज्या युगुलाने मला फोटो काढण्याची विनंती केली, त्यांना मी (हात दाखवून अवलक्षण!) काही ‘पोझ’ सुचवल्या. मी काढलेले फोटोदेखील त्यांना आवडल्याचे दिसत होते. त्यामुळे नंतर रीघ लागली. अतिशयोक्ती न करता सांगावंसं वाटतं की, मी जर त्याचे जुजबी जरी शुल्क आकारले असते तरी माझा मांडूमध्ये राहण्याचा खर्च सुटला असता. असो. या सहप्रवासी लोकांचा ससेमिरा चुकवून मी जहाज महलच्या 40 पायऱ्या चढून सज्जात पोहोचलो तेव्हा साडेपाच वाजले होते आणि सूर्याने आवराआवर करायला घेतली होती. थोड्या अंतरावर एक ग्रुप होता. त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. एक इंगजी ‘कहावत’ आठवली, ‘If you need music on the beach, you are missing the point’. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून शांतपणे बसून राहिलो. मांडूच्या पश्चिमेकडे डोंगररांगा नाहीत त्यामुळे दोन डोंगरांच्या मध्ये सूर्यास्ताचं दृश्य दिसत नाही. तर लालबुंद गोल आपली आभा पसरवत हळूहळू अस्पस्ष्ट होत नाहीसा होतो.

सूर्यास्त झाला. हवेत गारठादेखील वाढला होता. जहाज महलच्या बाहेर वाफाळता चहा घेतला. हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो व हिंडोळा महलच्या आवारातील लाईट अँड साउंड शो पाहून जेवण केले. दुसरा दिवस संपला होता आता माझ्याकडे तिसऱ्या दिवसाचा फर्स्ट हाफ बाकी होता. दिवसभराच्या नोंदी केल्या आणि सकाळचे नियोजन करून निद्रेच्या अधीन झालो. 

कोणतेही ठिकाण नीट समजून घ्यायचे असेल तर ते पायी फिरण्याशिवाय पर्याय नसतो. मांडूमध्ये मी दोन सूर्यास्त पाहिले होते पण तिसरा दिवस मी सूर्योदय पाहण्यासाठी राखून ठेवला होता. त्यामुळे सकाळी उठून पूर्व दिशेने पायी चालू लागलो. मला असे ठिकाण हवे होते, ज्याला गच्ची असेल. शोधत शोधत मांडूच्या वेशीपर्यंत आलो. याच रस्त्याने माझा दोन दिवसांपूर्वी मांडूमध्ये प्रवेश झाला होता. उजव्या बाजूला झुडुपांच्या गर्दीत हरवलेला एक बोर्ड दिसला ‘चिस्ती खान का महल’. बघू तरी हा चिस्ती खान कोण, म्हणून पायवाटेने पुढे निघालो आणि मला हवे होते तसे ठिकाण मला सापडले. हा चिस्ती खान कोणीतरी सहृदय पण ‘बिझनेस माइंडेड’ इसम असावा. कारण त्याने घाट जिथे संपतो तिथे त्याचा महल बांधला होता. जेणेकरून थकल्याभागल्या जीवांना विश्रांती घेता यावी आणि हा चिस्ती खान त्यांना ‘श्रम परिहार’ देत असावा. दुमजली वाड्याची एका बाजूची पडझड झाली होती पण त्याच्या रचनेवरून खालचा भाग हा यात्री निवास व उपहारगृह असावा व वरचा भाग म्हणजे चिस्ती खानचं घर असावं. जो भाग शाबूत होता त्या जिन्याने मी वर गेलो. समोर एक डोंगर होता. मध्ये एक दरी होती आणि त्यात बाओबाब व सागाचे वृक्ष दिसत होते. लाल रंग अस्फुट दिसत होता. संध्याकाळी पाहिलं त्याच्याविरुद्ध दृश्य आज दिसत होते. दोन डोंगरांच्यामध्ये प्रथम लाल रंग अस्फुट दिसत होता, हळूहळू त्याचा परीघ विस्तारत गेला आणि सूर्यबिंब अवतरले. हा हायड्रोजन व हेलियमचा गोळा आहे म्हणून आपण आहोत हा वैज्ञानिक विचार करताना आपसूक हात जोडले व परत निघालो. 

मांडू माझ्या ‘बकेट लिस्ट’मध्ये असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तेथील बावडया. जलसंवर्धनाशी निगडीत काम करत असल्याने जुन्याकाळातील जल व्यवस्थापन हा कुतूहलाचा विषय होता. त्यामुळे सकाळचा वेळ मी बावडी पाहण्यासाठी राखून ठेवला होता. दोन बावडया माझ्या परतीच्या वाटेवर होत्या. त्यातील ‘उजाला बावडी’ या बोर्डपाशी मी थांबलो. मांडूला येण्याआधी जो थोडाफार रिसर्च केला होता, त्यात हे नाव होतं. पण तिथे जाणाऱ्या रस्त्याला पुरातत्व विभागाचं कुलूप होतं. एका स्थानिकाला विचारलं तर त्याने “गाडा शाहच्या दुकानातून जा” असं सांगितलं. हे दुकान म्हणजे एक मोठा चौसोपी टोलेजंग वाडा होता. वरचा भाग पडला होता पण खालील दालनांची (दुकानांची) रचना दिसत होती. हे दुकान नसून मॉल होता आणि त्याची जागा मोक्याची होती.

उजाला बावडी पाहायला म्हणून मी आत शिरलो तर समोर आली ‘अंधेरी बावडी’. तिथे काही मुली पाणी भरत होत्या. तिथून जवळच ‘उजाला बावडी’ होती. अंधेरी बावडीला आच्छादन केलेलं होतं त्यामुळे तिथे प्रकाश पोहोचत नसावा त्यामुळे अंधेरी बावडी नाव दिलं असावं. ‘उजाला बावडी’ला आच्छादन नव्हतं त्यामुळे ती उजळून निघाली होती. ही बावडी म्हणजे भूजलशास्त्र, स्थापत्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ होता. ही बावडी चौकोनी व स्तर असलेली होती. तसंच पाणी शेंदायला येणाऱ्या माणसांना कमीतकमी श्रम पडावं याचा विचार करून चहूबाजूंनी पायऱ्यांची रचना केलेली होती. मी खाली जाऊन पाहिलं तर बावडीच्या बाजूला दालनं होती. वाटसरू, पाणके यांनी पाणी पिऊन/भरून काही काळ विसावा घ्यावा. अनेक बंधनांनी बांधलेल्या स्त्रिया पाणी भरायच्या निमित्ताने एकत्र आल्यावर त्यांना हितगुज करता यावं हा विचार ध्यानात ठेवून ही रचना केलेली दिसली. अशा या स्थापत्याचं आरेखन करणारे, त्याला तांत्रिक-प्रशासकीय-आर्थिक मंजुरी देणारे, कार्यादेश काढणारे, प्रत्यक्ष बांधकाम करणारे आणि त्याचा निगुतीने वापर करणारे अशा सर्वांना मनोमन सलाम केला.

उजाला बावडी

स्थानिकांशी चर्चा केली तेव्हा समजले की, दोन्ही बावडयांना वर्षभर पाणी असतं. पण उजाला बावडीचं पाणी पिण्यासाठी चांगलं नाही. दोन्ही बावडया जवळजवळ असून देखील पाण्यात इतका फरक आहे! याला ‘निसर्गाची करणी’ म्हणता आलं असतं पण भूजलशास्त्राच्या प्राथमिक अभ्यासानुसार असं अनुमान निघत होतं की दोन्ही बावडयांचं ‘Aquifer Demarcation’ वेगवेगळं असावं. उजाला बावडीचा जलस्त्रोत प्रदूषित असावा. या बावडयांच्या जीवावर आसपासच्या लोकांची जमीन सिंचित होत होती. काही ठिकाणी कापूस, गहू, हरभरा लावलेला दिसत होता. आणखी दोन बावडया मी जहाज महल परिसरात पाहिल्या होत्या. त्यातील ‘प्राचीन हिंदू बावडी’ उजाला बावडीप्रमाणेच पण थोडी खोल होती व त्या पाण्याचाच उपयोग जहाज महल परिसरात होत होता. चौथी विलक्षण बावडी म्हणजे ‘चंपा बावडी’. ही बावडी खाली जाऊन पाहता येत होती. आणि तो एक नैसर्गिक कुलर होता. त्यातील पाणी खालच्या बाजूने असे फिरवलं होतं की, या बावडीच्या आसपासच्या इमारतीमध्ये गारवा राहील. इतर बावडया चौकोनी/आयताकृती होत्या. पण या बावडीचं बाह्य आवरण गोलाकार होतं. या बावडीच्या बाजूला एक प्रासाद होता आणि त्याच्या पहिल्या मजल्यावर जाता येत होतं. तिथे जाऊन ‘वरून’ पाहिलं तर हा आकार चाफ्याच्या उमललेल्या फुलासारखा दिसत होता. या बावडीला चंपा नाव का दिलं असावं याचा संदर्भ लागला.

माझ्या अनप्लॅन्ड ट्रीप मधला आणखी एक अनप्लॅन्ड भाग आला, तो म्हणजे महेश्वर. रेल्वेचं तिकीट मिळालं नाही तर मांडूहून इंदोरला यायचं आणि तिथून पुणे बस पकडायची असा माझा प्लॅन होता पण ‘तात्काळ’मध्ये तिकीट मिळालं म्हणून माझा महेश्वरला जाण्याचा प्लॅन नक्की झाला. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

मांडूचा निरोप घेण्याआधी काही गोष्टी नोंदवणं क्रमप्राप्त होतं. मांडू हे स्वच्छ गाव होतं. मांडूवासियांना आपल्या गावाचं ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या अंगाने जाणारं आर्थिक महत्त्व माहीत होतं. त्यांचा वारसा त्यांना माहीत होता व त्याबद्दल त्यांना अभिमान व आदर होता. चर्चा करताना अनाहूतपणे नर्मदा नदीचा उल्लेख ‘नर्मदा’ असा करत होतो. शेवटी एका स्थानिक माणसाने मला सांगितलं, “बंधू, नर्मदाजी या नर्मदा माता कहो” इतर ठिकाणी पर्यटकाभवती गराडा पडून जीव नकोसा होतो तसं इथे नव्हतं. माणसं अदबशीर व अगत्यशील होती. सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जो कमालीचा उद्धटपणा भरलेला आहे, त्याचा मागमूसदेखील इथे नव्हता. अनास्था हा पुरातत्व विभागाचा स्थायीभाव असतो. ते स्वत: काही करत नाहीत आणि इतरांनादेखील काही करू देत नाहीत (पुरातत्व विभाग आणि वन विभाग कायमस्वरूपी बंद करावे या मताचा मी आहे.), इथे मात्र उलट चित्र होतं. त्यामुळे इथल्या पर्यटनस्थळांचं निगुतीने जतन केलेलं दिसत होतं. काही ठिकाणी पडझड दिसत होती पण जे शिल्लक आहे ते जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसत होता. प्रत्येक ठिकाणी साफसफाई होत होती. प्रसाधनगृहे स्वच्छ होती. सर्व पर्यटनस्थळांवर रात्री रोषणाई केली जात होती. सर्वत्र दिशादर्शक फलक होते आणि फिरताना सुरक्षित वाटत होतं. मी काही वर्षांपूर्वी शनिवारवाड्यात लाईट अँड साउंड शो पाहायला गेलो होतो, तेव्हा 15 मिनिटांत तीन वेळा ‘व्यत्यय’ आला होता. मांडूचा लाईट अँड साउंड शो संहिता, सादरीकरण व तांत्रिकदृष्ट्या मास्टरपीस होता. ‘छप्पन महल’ ही एक पुराणी वास्तू होती पण पुरातत्व विभागाने तिथे एक चांगलं संग्रहालय तयार केलं आहे.

एकटे असताना एकाकी न वाटणे ही मनाची सर्वात समृद्ध व उन्नत अवस्था असते. मांडूमध्ये फिरताना मला कुठेही एकाकी वाटलं नाही आणि त्याबद्दलची कृतज्ञता शब्दांत व्यक्त करता येणं शक्य नाही. 

मांडूहून महेश्वरला थेट बस नाही त्यामुळे जामनोदच्या बसमध्ये बसलो. एक सहज विचार आला की, त्या काळच्या तंत्रज्ञानाच्या व इतर मर्यादा लक्षात घेता, या लोकांनी किती भव्य दिव्य काहीतरी निर्माण केलं आहे! मी विसाव्या/एकविसाव्या शतकात निर्माण झालेली -  भारतातीलच नव्हे तर जगभरातील - एखादी नेत्रदीपक वास्तू, स्थापत्य आठवायचा प्रयत्न करू लागलो. काही केल्या डोळ्यांसमोर काही येत नव्हतं. आजही आपण पाहायला जातो ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या वास्तू. आपण आपला म्हणून असा काही वारसा सोडणार आहोत की नाही?

समोर अशरफी महल आणि चतुर्भुज राम मंदिर गुण्यागोविंदाने नांदत असलेलं दिसलं. मनात विचार आला, काळाच्या विशाल पटावरील आपण एक छोटा बिंदूदेखील नाही. मोठमोठी साम्राज्ये आली आणि लयाला गेली. राजेरजवाडे आले आणि गेले. ‘इतिहास’ या अनंत चालणाऱ्या प्रक्रियेने सर्वांनाच सामावून घेतलं. सत्तेच्या सारीपाटात विध्वंस करणारे, लढाया करणारे, जिंकणारे हरणारे असे सर्वच इतिहासाच्या सन-सनावळीपुरते मर्यादित राहून लृप्त होतील आणि इतिहास बनतील. पण नवनिर्मिती करणारे, कला गुणांना प्रोत्साहन देणारे, स्वत:चं आयुष्य सुखासमाधानाने जगणारे आणि इतरदेखील तसंच आयुष्य जगू शकतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे, सर्वांच्या सुखाची कामना करणारे लोक इतिहास घडवतील.

माझ्या बसच्या अवतीभवती विक्रेते फिरत होते. काही 20 रुपयांना तीन सामोसे देत होते तर काही चार. इतरवेळी पटकन लक्षातदेखील आलं नसतं पण एक विक्रेता बसमध्ये चढला आणि त्याने लक्ष वेधून घेतलं. तो सामोसे विकताना म्हणत होता, “सुनो सुनो मेहेरबान, बीस के तीन वाले कॉंग्रेसीयो से सावधान... आओ खाओ बीस के चार, यह है मोदी सरकार.”

इतिहासातून वर्तमानात आलो तोपर्यंत बसने चांगलाच वेग पकडला होता व मांडू नगरी मागे राहिली होती.

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Tags: backpack trip solo trip travel mandu madhyapradesh प्रवास मांडू ऐतिहासिक ठिकाण ऑफबीट भटकंती Load More Tags

Comments:

Shriniwas Hawaldar

कवी ग्रेस यांनी एका ठिकाणी म्हटले आहे: “खरे तर प्रकाश हा सर्वांनाच जाणवतो, दिसतो. त्याच्या उगमाचे स्त्रोत मात्र एखाद्याच्याच बुबुळावर प्रतिबिंबित होतात. आणि हा एखादा कलेचा फकीर , कलेचा राजा असू शकतो.चंद्र,चंद्रकोर सर्वांचीच, तिचा पट म्हणजे अंतरिक्ष, तिचा रंगमंच म्हणजे आभाळ ,हेही सर्वांचेच. पण तेवढयावरून चंद्रउदयिनी वेळा सर्वांनाच दिसू शकेल असे नाही.अखंड चंद्राला, तुटक चंद्राला ,चंद्रकोरीलाही, चंद्रउदयिनी वेळा म्हणावयाचे. ती चंद्राच्या प्रत्येक घटकानुभावाला असतेच. पण ती पाहण्याचे किंवा हुडकून काढण्याचे निर्मितीविश्वाचे भाग्य एखाद्याच कलंदर कलावंताचे असते." ग्रेसच्या याच संदर्भात मकरंद दीक्षित यांचे प्रवास वर्णन वाचताना एकदोन ठिकाणी त्यांच्या निरीक्षण कौशल्याची विशेष दाद द्यावीशी वाटते. ‘बाझ बहादूर पॅलेस’ चे खालील निरीक्षण उल्लेखनीय आहे- “बाझ बहादूर पॅलेस टेकडी ग्रेस उतारावर वसलेले आहे. पॅलेस असूनही त्याचा आकार ‘आटोपशीर’ असाच म्हणावा लागेल. पॅलेसच्या मध्यभागी एक पुष्करिणी आहे आणि बाजूला रेखीव पायऱ्या आहेत. या दुमजली इमारतीच्या सज्जात उभे राहिले तर दृष्टीच्या अंतरावर दोन घुमट दिसतात, हाच राणी रूपमतीचा राजवाडा. नीट पाहिले तर लक्षात आले की दोन्ही ठिकाणच्या सज्जात उभे राहिले तर नुसते हातवारे, खुणा करूनदेखील बोलता येईल. बाझ बहादूरने राणी रूपमतीशी संवाद साधण्यासाठी अशी व्यवस्था केलेली असावी. शेवटी प्रेमी युगुलांना मौनाची भाषाच जास्त उपयुक्त.” “अशा एखाद्या राजवाड्याच्या सज्जामधून सूर्यास्त पहायची मजा काही वेगळीच असते. सूर्याचा लालसर गोल दिसत असतो. एखादा चुकार ढग मध्ये आला तर त्या बिंबावर अस्फुटशी रेघ उमटलेली दिसते. एखाद्या चित्रकाराने समोरच्या कॅनव्हासवर रंगांचे सपकारे मारावेत तशा लाल, नारिंगी, करड्या, निळ्या रंगांची मुक्त उधळण झालेली असते. एकूणच दृश्य विलोभनीय असते. पण अशा या ठिकाणाला विफल प्रेमाची पार्श्वभूमी असेल तर ही लोभस संध्याकाळ क्षणात कातरवेळेत बदलून जाते. माझं ही तसंच झालं कारण इथे होतं राणी रूपमतीचं हौतात्म्य.” “हिंडोला महलच्या मागच्या बाजूला संगमरवरात कोरलेला एक सज्जा होता. त्याच्या बाजूला पाटी होती ‘नाहर झरोखा’. भोगविलासातून वेळ मिळाला की जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी ही रचना केलेली असावी. बाजूच्या ग्रुपला गाईडदेखील तसंच सांगत होता. पण हा झरोका ज्या उंचीवर होता त्या उंचीवर आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी कर्णकर्कश आवाज असण्याची आवश्यकता होती. भोगविलासासाठी बनवलेल्या या परिसरात जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी अवकाश दिला जात असेल, हे बुद्धीला पटत नव्हते. जंगलातील प्राणी-पक्षी पाहण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा असा तर्क करायला जागा होती.”

Archana

दोन्ही लेख सुंदर आहेत.मांडू ची घरबसल्या सहल झाल्यासारखे वाटले. जैन मंदिरातील प्रसंग वाचून अंगावर काटा आला. 'साध्यसाधन शुचिता' चा संदर्भ देखील फारच भावला.

Satish Raje

I was eagerly waiting for part 2 and it is beyond my expectations (raised after part 1).It covers almost every aspect of life. The 'narrator' has excellent knowledge of history, acute observation skills,great sense of humour and sensitivity. It made me remember Pu La. Thanks Kartavya Sadhana for sharing such articles.

Namrata

गेल्या महिन्यात आम्ही मांडु येथे एक दिवस फिरलो होतो. लेख वाचल्यावर काही स्थळे नव्याने कळली. लेखांतील ऐतिहासिक संदर्भामुळे अधिक माहीती मिळाली. नर्मदा नदी आणि संगीतावर प्रेम करणाऱ्या मांडूच्या राणीरूपमतीच्या प्रेमकथेवर आधारित राणी रूपमती चित्रपटात निरुपमा रॉय यांनी राणीची भूमिका केली होती असे गाइडने सांगीतले. 'आ लौटके आजा मेरे मीत ' ह्या पंक्ती गाइडने महालात गाउन echo effect दाखवला. मांडुची चिंच तुरट होती पण सिताफळे खुपच मधुर होती. लेख छान आहेत.

Add Comment