मांडू हे तिठीवर वसलेलं दिसतं. उत्तर भारतातून दख्खनला जाण्यासाठी आणि गुर्जर प्रदेशातून (गुजरात) समुद्रमार्गे व्यापारउदीम करण्यासाठी मांडू हे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचं व तत्कालीन घाटरस्त्यावरचं मोक्याचं ठिकाण होतं. साहजिकच व्यापारी, यात्रेकरू, सैन्य इ.च्या वर्दळीने भरलेलं असणार. मांडूमध्ये कोण्या सुलतानाने किंवा राजाने कायमस्वरूपी निवास केला नसणार, तर ते त्यांचं विरंगुळ्याचं ‘विकएंड होम’ असणार. व्यापार आला की सुबत्ता येते, राज्यकर्ते प्रसन्नचित्त असतील त्यांच्या निर्मितीक्षमतेला चालना मिळते आणि मग विकसित होतं मांडूसारखं शहर.
काही काळापूर्वी जर मला कोणी असे सांगितले असते की, सुरेश द्वादशीवार यांच्यासारख्या विचारवंत लेखकाच्या पुस्तकातून संदर्भ घेऊन मी माझा ‘ट्रॅव्हल प्लॅन’ बनवीन तर त्यावर माझाही विश्वास बसला नसता. पण असं झालं खरं!
काही दिवसांपासून ‘सोलो बॅकपॅक ट्रीप’ करायची असा विचार मनात घोळत होता. कुठं जायचं त्याचे निकष ठरलेले होते. 1. ठिकाण ‘ऑफबीट’ असावे 2. पुण्यापासून 500 ते 1000 किमी च्या रेंजमध्ये असावे आणि त्या ठिकाणाला काही ऐतिहासिक संदर्भ असावे. ही ट्रीप ‘शून्य फोटो’ ट्रीप असणार होती (म्हणजे स्वत: चे फोटो काढायचे नाहीत).पण कुठं जायचं ते ठरत नव्हतं.
अशातच घरातील लायब्ररी लावायला घेतली. तेव्हा ‘तारांगण’ हे पुस्तक नजरेस पडलं, सहज चाळायला घेतलं तर ‘विष्णुदत्त शर्मा’ या लेखात ‘मांडू’चा संदर्भ आला. मग लक्षात आलं की, आधी एकदा मी हा लेख वाचला होता तेव्हाच मांडू माझ्या ‘बकेट लिस्ट’मध्ये गेलं होतं आणि ते माझ्या निकषातदेखील अगदी फिट्ट बसत होतं. मुस्लीम राजा-हिंदू राणी यांच्या प्रेमकहाणीचा खास ‘बॉलीवूड’ला साजेसा मसाला भरलेला असूनदेखील ‘भन्साळी’चं लक्ष अद्याप न गेल्याने मांडू ‘ऑफबीट’ होतं; पुण्यापासून रस्ता व लोहमार्गाने सुमारे 1000 किमी होतं; आणि मौर्य काळापासून ते राजा भोज, दिल्ली सल्तनत, मुघल आणि मराठे असा विशाल ऐतिहासिक पट त्याला लाभला होता. कालिदासाचं साहित्य, जैन शीलालेख ते जहांगीरनामापर्यंतच्या साहित्यात मांडूचा उल्लेख/वर्णन आहे.
नर्मदा, बेतवा, क्षिप्रा अशा नद्यांनी वेढलेला माळवा प्रांत मोठा सुपीक प्रदेश आहे आणि उत्तर व दक्षिण भारत जोडत असल्याने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देखील. साहजिकच माळवा प्रांतावर वर्चस्व ठेवण्याच्या प्रत्येक राजसत्तेच्या धोरणामुळे माळवा ‘ऐतिहासिकदृष्ट्या गजबजलेला’ आहे. मांडू ही माळव्याची एकेकाळची राजधानी. मग मांडूला जायचं पक्कं केलं.
‘तात्काळ’मध्ये तिकीट काढून बॅग उचलली आणि इंदोरला पोहोचलो. मांडू इंदोरपासून सुमारे 95 किमीवर आहे. इंदोर ते मांडू अशा थेट बस दोनच आहेत पण त्या माझ्या वेळेत बसत नव्हत्या म्हणून प्रथम धारला गेलो. धार ही महान चक्रवर्ती, कलागुणसंपन्न परमार राजा भोज याची दहाव्या शतकातील राजधानी. काळाच्या प्रवाहात परमार साम्राज्य नष्ट झाले आणि परमार वंशांना परागंदा व्हावे लागले. पुढे इ.स 1730 मध्ये बाजीराव पेशव्यांनी माळवा काबीज केल्यावर ‘धार’ सरदार उदाजी पवार (परागंदा झालेले परमार) यांचेकडे सोपवले. ‘जहा उदा वहा खुदा’ अशी ख्याती सरदार उदाजी बाळगून होते.
धारपासून मांडू सुमारे 40 किमीवर आहे आणि जाण्यासाठी नियमित बससेवा आहेत. धार मार्गे मांडूला येऊन पोहोचलो. मांडू हे एकप्रकारे ‘टेबल टॉप’ आहे. मांडूमध्ये अनेक तलाव, मकबरे, गढ्या, मंडप (मांडव) आहेत. मंडपांच्या या नगरीला नाव पडले ‘मांडवगढ’. मांडवगढचे ‘मांडव’ आणि मांडवचे संक्षिप्त ‘मांडू’ झाले आहे. मांडू हा भारतातील तिसरा मोठा कोट आहे, ज्याचे क्षेत्रफळ 75 चौ.किमी आहे आणि या कोटाभवती 12 दरवाजे आहेत. धार मार्गे येताना आलमगीर दरवाजा, भंगी दरवाजा, कमानी दरवाजा, दिल्ली दरवाजा (हा जवळपास प्रत्येक किल्ल्याला असतोच!) असे चार दरवाजे लागले.
मध्यप्रदेश पर्यटन विभागाच्या गेस्ट हाउसमध्ये उतरलो. तिथल्या व्यवस्थापकाने ‘स्कुटी’चा ‘जुगाड’ करून दिला. आता माझ्या फिरस्तीमध्ये कोणताही अडथळा उरला नव्हता. मांडूमध्ये पाहण्यासारखी 48 ठिकाणे आहेत आणि ती पाहण्यासाठी किमान दोन संपूर्ण दिवस हवेत. ही ठिकाणे बऱ्यापैकी विखुरलेली आहेत पण त्यातील सोयीची बाब म्हणजे हे विखुरलेपण समूहामध्ये आहे. म्हणजे एका समूहाच्या ठिकाणी गेलात की किमान 5 ते कमाल 12 ठिकाणे पाहून होतात. तेथे पर्यटनाचे अलिखित समूह ठरलेले आहेत. (म्हणजे गाईड केला तर तो समूहानुसार फिरवतो.) मी अशा समूहानुसार फिरलो नाही पण रेवाकुंड समूह, सागर तलाव समूह, जहाजमहल समूह, मांडू गाव समूह असे ढोबळमानाने पडलेले समूह आहेत.
मांडू हे तिठीवर वसलेलं दिसतं. उत्तर भारतातून दख्खनला जाण्यासाठी आणि गुर्जर प्रदेशातून (गुजरात) समुद्रमार्गे व्यापारउदीम करण्यासाठी मांडू हे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचं व तत्कालीन घाटरस्त्यावरचं मोक्याचं ठिकाण होतं. साहजिकच व्यापारी, यात्रेकरू, सैन्य इ.च्या वर्दळीने भरलेलं असणार. मांडूमध्ये कोण्या सुलतानाने किंवा राजाने कायमस्वरूपी निवास केला नसणार, तर ते त्यांचं विरंगुळ्याचं ‘विकएंड होम’ असणार. व्यापार आला की सुबत्ता येते, राज्यकर्ते प्रसन्नचित्त असतील त्यांच्या निर्मितीक्षमतेला चालना मिळते आणि मग विकसित होतं मांडूसारखं शहर.
पण मांडूचा विकास केला तो मूळ सत्तेपासून विद्रोह केलेल्या सुभेदारांनी. त्यातील एक बाझ बहादूर. बाझ बहादूर आणि राणी रूपमतीची प्रेम कहाणी वाचनात होती त्यामुळे प्रथम ‘बाझ बहादूर पॅलेस’ पाहायला गेलो. मुघल बादशहा हुमायून आणि शेरशहा सुरी यांच्यातील सत्तापट अनिर्णीत ठरला तेव्हा शेरशहाने आपला सरदार शुजा खान याला माळव्यात पाठवले. त्याचा शूर मुलगा म्हणजे मलिक बैझाद. हा मलिक शत्रूवर एखाद्या गरुडाप्रमाणे झडप घालायचा त्यामुळे बाझ म्हणून ओळखला जाऊ लागला.
बाझ बहादूर पॅलेस
बाझ बहादूर पॅलेस टेकडीच्या उतारावर वसलेले आहे. पॅलेस असूनही त्याचा आकार ‘आटोपशीर’ असाच म्हणावा लागेल. पॅलेसच्या मध्यभागी एक पुष्करिणी आहे आणि बाजूला रेखीव पायऱ्या आहेत. या दुमजली इमारतीच्या सज्जात उभे राहिले तर दृष्टीच्या अंतरावर दोन घुमट दिसतात, हाच राणी रूपमतीचा राजवाडा. नीट पाहिले तर लक्षात आले की दोन्ही ठिकाणच्या सज्जात उभे राहिले तर नुसते हातवारे, खुणा करूनदेखील बोलता येईल. बाझ बहादूरने राणी रूपमतीशी संवाद साधण्यासाठी अशी व्यवस्था केलेली असावी. शेवटी प्रेमी युगुलांना मौनाची भाषाच जास्त उपयुक्त.
तर हा बाझ बहादूर शिकारीला गेलेला असताना त्याच्या कानावर मधुर स्वर पडले आणि शिकार सोडून तो त्या स्वरांचा माग काढत राणी रूपमतीसमोर येऊन पोहोचला. राणी गाण्यात तल्लीन झाली होती. गाणे संपल्यावर पाहते तो बाझ धनुष्य ताणलेल्या अवस्थेत उभा आणि तो ज्याची शिकार करू इच्छित होता ते हरीणदेखील बाजूला उभे. राणी आणि बाझ बघताक्षणीच एकमेकांच्या प्रेमात पडले. राणी ‘नर्मदे’चे दर्शन घेतल्याखेरीज पाणी देखील घेत नसे त्यामुळे पेच उत्पन्न झाला पण बाझ बहादूरने दगडी नळ बांधून नर्मदेचे पाणी 40 किमीवरून एका कुंडात आणून सोडले, हेच ते रेवा कुंड. रेवा कुंड हा एक रेखीव चौकोनी तलाव आहे आणि तो या राजवाड्याच्या पायथ्याशी आहे. त्याने राणीला एक महालदेखील बांधून दिला ज्याच्या सज्जातून तिला नर्मदेचे दर्शन घडेल.
बाझ बहादूर पॅलेसमधून मला राणी रूपमती महालात जायचे होते. कारण तिथून सूर्यास्त फार चांगला दिसतो अशी माहिती मला मिळाली होती. दुपारचे चार वाजले होते त्यामुळे माघारी वळलो. झालं असं की, बाझ बहादूर पॅलेसला येताना ‘जाली महल’ अशी पाटी दिसली म्हणून मी तिथे वळलो. तो महल म्हणजे एक पडकी गढी होती. तिथून पुढे रस्ता जात होता, महल अजून पुढेच असेल म्हणून गेलो तर एका विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो. तिथे एक हेलीपॅड होते आणि ‘पॅरा ग्लायडिंग’ करणारे दोन इसम होते. जुजबी चौकशी करून मी परत फिरलो होतो पण दहा मिनिटांच्या राईडमध्ये राणी रूपमती महालावरून फिरवून आणू हे त्याचे शब्द सारखे मनात घोळत होते त्यामुळे अनिवार उर्मीने पुन्हा त्या ठिकाणी पोहोचलो. सर्व करून फार फार तर पाच वाजता राणी रूपमती महालात परत येऊ असा विचार केला.
इंदर धालीवाल नावाच्या त्या पंजाबी माणसाकडे पॅरा ग्लायडिंगच्या सुरक्षा आणि त्याच्या लायसन्सची चौकशी केली. तिशीतल्या त्या माणसाने मला सांगितले की त्याला 20 वर्षांचा ‘Flying Experience’ आहे, त्याचे इंजिन जर्मनीचे आहे आणि असा सेटअप भारतात कुठेच नाही असे सांगत त्याने मला पॅरा ग्लायडिंगचा सेटअप दाखवला. तो त्याला पॅरा ग्लायडिंगच्या न म्हणता ‘पॅरा मोटरिंग’ म्हणत होता. खरोखरच असा सेटअप भारतात कुठेच नव्हता. आपल्याकडील लग्न समारंभात जमिनीवर उभे केलेले जे मोठे पंखे असतात, त्याची वरची जाळी काढली तर जे दिसेल तो त्याचा पॅरा मोटरिंगच्या सेटअपमधला ‘रोटर’ होता. त्यामागे बऱ्याच वायरचा गुंता इंजिनपर्यंत गेला होता. त्याचा फ्युल टँक म्हणजे एक 10 लिटरचा लाल रंगाचा प्लास्टिकचा डबा (पाम तेलाचा वगैरे असतो तसा) आणि त्यात पाईप असा होता. हे सगळं पाहून त्याच्याकडे लायसन्स नाही याची मला खात्री पटली. त्याचा सेटअप म्हणजे एक ‘लोकल जुगाड’ होता, आणि तो पूर्णपणे असुरक्षित होता. मला टॉम हँक्सचा ‘Sully’ हा चित्रपट आठवला. त्यात पक्षांचा थवा बोईंग विमानाचे इंजिन बंद पाडतो. इथे तर एक कावळासुद्धा पुरेसा होता. तसेच त्या लाल रंगाच्या फ्युल टँककडे आकृष्ट होऊन एखाद्या घारीने त्याला चोच मारली असती तर पुरा आसमंत धुराने भरण्याची पक्की खात्री होती.
माझ्या मेंदू आणि मनाची पूर्ण लढाई चालू होती. शेवटी मनानी मेंदूवर मात केली आणि मी पॅरा मोटरिंग करायला सिद्ध झालो. म्हटलं जे होईल ते होईल. तसंही मिग विमानाचे पायलट, ते विमान धोकादायक आहे हे माहीत असूनदेखील उडवतातच!
आतला स्पंज निघालेले एक हेल्मेट मला सुरक्षा कवच म्हणून देण्यात आलं. त्याने इंजिन चालू केलं, जमिनीवरून वेग घेऊन आमचा ‘लोकल जुगाड’ हवेत झेपावला. मधेच तो थोडा थांबला आणि त्याने आणखी उंची गाठली. असं एक-दोन वेळा केल्यावर तो म्हणाला की, आता आपण 2500 फुटावर आहोत. त्याने हलकेच एक गिरकी मारली आणि उंची कमी केली. आता आम्ही राणी रूपमती महालाकडे निघालो. त्या महालाच्या सज्जावरचे दोन घुमट मला जमिनीवरून, रस्त्यावरून येताना जितके लहान दिसत होते तितकेच ते आताही लहान दिसत होते. त्याने राणी रूपमती महालावर दोन-तीन मिनिटं फिरवलं. मध्येच मला खालच्या लोकांनी ‘टाटा’ केल्याचा भास झाला. त्याने पुन्हा गिरकी घेतली आणि मी त्याला विचारलं की, थोडावेळ स्थिर राहता येईल का? “हवा जोरात आहे पण मी प्रयत्न करतो” असं म्हणून त्याने उंची कमी केली व आमचं ‘यान’ स्थिर झालं. माझ्या समोर विस्तीर्ण आसमंत होता. डाव्या बाजूला राणी रूपमती महालाचे घुमट दिसत होते, उजव्या बाजूला शेतांचे चौकोन आणि पाण्यावरून परावर्तीत होणारे चकाकते पट्टे दिसत होते. खाली खोल दरी होती आणि डावीकडे थोडं मागं वळून पाहिलं तर ‘आबादी’ दिसत होती. थंड हवा अंगाला लागत होती. मागच्या पंख्याची घरघर त्या दैवी शांततेमध्ये बेमालूमपणे लुप्त झाली होती. थोडा वेळ गेला आणि इंदरचा आवाज आला, “और ज्यादा समय ऐसे ही रहे तो इंजिन पे प्रेशर आएगा सर.” मी हातानेच त्याला इशारा केला आणि त्याने सफाईदारपणे गिरकी घेतली. इंदरकडे लायसन्स नव्हतं पण तो निष्णात होता. त्याला केवळ जमीनच नव्हे तर त्यावरचा आसमंतदेखील माहीत होता. आम्ही 3000 फुट उंचीवर असल्याचं त्याने सांगितलं आणि मागच्या डोंगररांगांवरून एक फेरी मारून आम्ही लँड केलं.
“कैसा लगा सर?” या त्याच्या प्रश्नावर “अच्छा लगा” असं म्हणून पैसे देऊन मी राणी रूपमती महालात कधी दाखल झालो हे मला कळलंच नाही. घड्याळात 5 वाजून 10 मिनिटं झाली होती. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसाठी जसा महाल बांधावा तसाच हा महाल होता. पहिल्या मजल्यावर जो मुख्य महाल होता तो बंद केलेला होता. त्यामुळे वरच्या सज्जात आलो आणि शांतपणे बसून राहिलो आणि विचार करू लागलो. आपण काही काळापूर्वी जे केलं ते होतं तरी काय? येडपट साहस, कॅलक्युलेटेड रिस्क... काय नाव द्यायचं? कोणत्या अनिवार ओढीने मी मांडूला आलो आणि कोणत्या गोष्टीने मला हे साहस करण्याची उर्मी जागृत केली?
2500 फुट उंचीवरच्या त्या 30 सेकंदांसाठी मिळालेल्या शांतता-स्थैर्य यांची तर ही ओढ नव्हती? सगळं ‘फ्रेम बाय फ्रेम’ पुन्हा आठवलं तर लक्षात आलं की, आहे हे असं आहे! माणूस जी धडपड, तगमग करत असतो ती हे स्थैर्य-शांतता मिळवण्यासाठीच. पण इंदर जसं म्हणाला, “और ज्यादा समय ऐसे ही रहे तो इंजिन पे प्रेशर आएगा ” तसाच अट्टाहास - मग तो स्थैर्य-संतुलन गाठण्याचा का असेना - निसर्गनियमाच्या विरुद्ध व हानिकारक ठरेल. अस्थैर्य/असंतुलन हा नियम आहे आणि संतुलन हा अपवाद! त्यामुळे सभोवतीची सृष्टी कायम अस्थिर राहणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि याच सृष्टीत परिस्थिती अनुकूल असेपर्यंत शक्य असेल तेव्हा, शक्य असेल तोपर्यंत संतुलन गाठायचा प्रयत्न करायचा!
मोबाईलची रिंग वाजली आणि भानावर आलो. इंदर ने व्हॉट्स अॅपवर ‘टेक ऑफ’ आणि ‘लँडिंग’चा व्हिडीओ पाठवला होता. मांडूने पहिल्याच दिवशी मोलाचा धडा दिला होता.
हेही वाचा : 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन' सह अनुभवलेला काश्मीर - ऐश्वर्या रेवडकर
एव्हाना साडेपाच वाजले होते आणि बाहेर पाहिले तो सूर्य अस्ताला जायची तयारी करू लागला होता. थंडीमध्ये सूर्यास्त तसा लवकरच होतो. मांडूमध्ये सहा वाजताच काळोख पडतो असे मला येताना स्थानिक बोलले होते.
अशा एखाद्या राजवाड्याच्या सज्जामधून सूर्यास्त पहायची मजा काही वेगळीच असते. सूर्याचा लालसर गोल दिसत असतो. एखादा चुकार ढग मध्ये आला तर त्या बिंबावर अस्फुटशी रेघ उमटलेली दिसते. एखाद्या चित्रकाराने समोरच्या कॅनव्हासवर रंगांचे सपकारे मारावेत तशा लाल, नारिंगी, करड्या, निळ्या रंगांची मुक्त उधळण झालेली असते. एकूणच दृश्य विलोभनीय असते. पण अशा या ठिकाणाला विफल प्रेमाची पार्श्वभूमी असेल तर ही लोभस संध्याकाळ क्षणात कातरवेळेत बदलून जाते. माझं ही तसंच झालं कारण इथे होतं राणी रूपमतीचं हौतात्म्य.
सम्राट अकबराला माळवा काबीज करायचा होता त्यामुळे त्याने आपला सरदार आधम खान (आझम खान?) याला माळव्यावर सैन्य देऊन पाठवलं. बाझ बहादुराने पराक्रमाची शर्थ केली पण अकबराच्या सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही म्हणून तो मेवाडकडे निसटला (‘ऐन ए अकबरी’मध्ये याचा उल्लेख ‘पलायन’ असा केलेला आहे). एव्हाना आधम खानाला राणी रुपमतीच्या सौंदर्याची आणि गोड गळ्याची माहिती मिळाली होती त्यामुळे त्याने राणीकडे आपली अभिलाषा व्यक्त केली. राणीने त्याच्याकडे विचार करायला वेळ मागून घेतला. सारासार विचार केल्यानंतर, मांडूचा निभाव लागणार नाही याचा अंदाज राणीला आला. चितोडचा जोहार राणीच्या लक्षात होता आणि आपण नकार दिला तर मांडू बेचिराख होणार हे राणीला माहीत होते. त्यामुळे राणीने आधम खानाला रात्री आपल्या महालात येण्याचे निमंत्रण दिले. आधम खानाने महालाचा दरवाजा उघडला तर त्याला दिसली साजशृंगार केलेली, नखशिखान्त सोन्याने मढलेली आणि हातात तंबोरा घेऊन बसलेली राणी रूपमती. खानाने उंबऱ्यातून पाऊल पुढे टाकले तोच राणीने विषाचा पेला आपल्या ओठाला लावला. अशा प्रकारे राणीने आपले शील आणि मांडू या दोघांचे रक्षण केले.
राणी रूपमती महाल
ही कहाणी आठवून मन उदास झालं. कदाचित मी जिथे उभा होतो तिथेच राणीने हा निर्णय घेतला असेल आणि तेव्हा हे असेच विलोभनीय दृश्य तिने शेवटचे पाहिले असेल... सुरक्षा रक्षकांची शिट्टी ऐकून भानावर आलो. वेळ समाप्त झाल्याचा तो इशारा होता. संमिश्र भावना घेऊन माघारी वळलो.
आपल्याला ‘अमक्या अमक्यातील पहिलं’, ‘अमक्या अमक्यातील शेवटचं’, ‘अमक्या अमक्यातील एकमेव’ असं विशेषण लावलेली ठिकाणं पाहायची उत्सुकता अंमळ जास्तच असते. त्यामुळे मांडूच्या मध्यवर्ती चौकातील ‘भारत का एकमेव चतुर्भुज राम मंदिर’ या पाटीने माझं लक्ष वेधून घेतलं. स्कुटी पार्क केली (इथे पार्किंग सर्वत्र विनामूल्य आहे हा एक सुखद धक्का होता) आणि मंदिरात शिरलो. राम हा विष्णूचा अवतार, म्हणून ‘देव’ असला तरी आपल्याला कायम पत्नी, लहान भाऊ व जिवलग सेवकाच्या बरोबर असणाऱ्या कुटुंबवत्सल माणसाच्या रुपात भेटत आला आहे. इथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या सालंकृत मूर्ती होत्या व समोर मारुतीची मूर्ती होती. पण राम शंख, चक्र, कमळ धारण केलेल्या चतुर्भुज रुपात होता. मंदिर स्वच्छ होते व उदा-धुपाच्या वासाने परिसर दरवळला होता. एक पोरसवदा मुलगा बैठकीवर बसून ‘रामचरितमानस’ म्हणत होता. एकंदरीत प्रसन्न वाटलं. पुण्यातील एका गृहस्थाला मांडूमधील औंदुंबराच्या झाडाखाली चतुर्भुज रामाची मूर्ती असल्याचा साक्षात्कार झाला, त्याने धारच्या संस्थानिक शकुबाई पवार यांना ते सांगितले. उत्खनन केले असता भग्न अवशेषातील मूर्ती सापडल्या. मग पवार राणीसाहेबांनी इ.स 1823 मध्ये संगमरवराच्या मूर्तीची स्थापना करून हे मंदिर बांधलं. म्हणून मी या मंदिराचा उल्लेख ‘मांडूमधील एकमेव अर्वाचीन स्थापत्य’ असा करेन.
रात्री माळव्याचा प्रसिद्ध ‘दाल पानीये’चा आस्वाद घेतला आणि थोड्या नोंदी करून झोपी गेलो. दुसरा दिवस भरगच्च असणार होता.
(या लेखाचा उत्तरार्ध उद्या प्रसिद्ध होईल.)
- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Tags: backpack trip solo trip travel mandu madhyapradesh प्रवास मांडू ऐतिहासिक ठिकाण ऑफबीट भटकंती Load More Tags
Add Comment