कल्पनेच्या चष्म्यातून वास्तव दाखवताना ते वाचकांना खिळवून ठेवतात, उत्कंठा वाढवत राहतात आणि तरीही ‘सुरू केलं आणि सलगपणे पुस्तक वाचून काढलं’ या पद्धतीने हे पुस्तक वाचणं अशक्य आहे, किंवा फारच कमी लोकांना शक्य आहे. या कल्पनेतल्या जगाविषयी वाचता वाचता आपल्याला माहीत असलेल्या जगाच्या वास्तवाशी आपण इतक्या नकळतपणे जोडले जातो की पुस्तकाच्या पानांमधल्या कल्पना जास्त अंगावर यायला लागतात आणि गुदमरायला होतं. श्वास घेण्यासाठी वास्तव जगातल्या आभासी स्वस्थतेकडे आपल्याला परतावसं वाटतं.
विनोद कुमार शुक्ल यांना 2025 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि साहित्य वर्तुळात, वाचक वर्तुळात, विचार वर्तुळात खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचे पडसाद उमटले. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणं ही घटना एका गटाला आनंदाची वाटते आहे, तर दुसऱ्या गटात हा त्यांनी हा तोंडदेखला पुरस्कार स्वीकारू नये, अशी भावना आहे.
या निमित्ताने मागच्या वर्षीच्या ज्ञानपीठ पुरस्कारावरून उठलेला गदारोळ पुन्हा चर्चेत आला आहे. या पुरस्काराच्या निवडप्रक्रियेचा पोकळपणा पुन्हा अधोरेखित केला जात आहे. 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिराचे राजकीय समर्थक, भारतातल्या मुस्लीमांविषयी अनुदार उद्गार सातत्याने काढत राहणारे, रामचरितमानस या तुलसीदासांच्या ग्रंथात भरताड करण्याच्या आरोपावरून वादात अडकलेले, आणि मुख्य म्हणजे कोणतेही म्हणण्यासारखे साहित्यिक कर्तृत्व नावावर नसलेले स्वामी रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेतील केंद्र सरकारचा हस्तक्षेप उघडच होता. त्यामुळे पुरस्कारांची स्वायत्तता, प्रामाणिकता, यांवरच प्रश्नचिन्ह उमटले होते.
मागच्या वर्षी हा वाद चालू असताना हिंदी कवी विष्णू नागर यांनी “विनोद कुमार शुक्ल यांच्यासारख्या थोर लेखकाकडे दुर्लक्ष करणे हे ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या सांस्कृतिक गरीबीचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा PEN सन्मान प्राप्त झालेल्या या प्रतिभावान साहित्यिकाला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारासाठी योग्य मानले गेले नाही, ही दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे.” अशा अर्थाचे विधान केले होते. त्या स्मृती अजून ताज्या असतानाच विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार हा अनेक अर्थांनी भारतातला सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे आणि विनोद कुमार शुक्ल यांचे लेखन निश्चितच सर्वोच्च सन्मानास पात्र आहे. मात्र ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने केवळ गेल्या वर्षी गमावलेली आपली पत परत मिळवण्याच्या हेतूने हा पुरस्कार यंदा सर्वार्थाने पात्र असलेल्या व्यक्तीला दिला आहे, मागच्या वर्षीचे कांड घडले नसते, तर व्यवस्थेविरुद्ध वंचितांच्या आवाजाला शब्द देणारा हा लेखक कदाचित अजूनही पुरस्कारार्ह ठरला नसता, याबद्दल खंत आणि उद्वेग साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला याविषयी आनंद व्यक्त केल्याबद्दल विनोद कुमार शुक्ल आणि त्यांच्या समर्थकांवर टीकाही होत आहे.
विनोद कुमार शुक्ल यांचे समर्थकही ‘जे पुरस्कार स्वीकारू नये असे सुचवत आहेत, त्यांना स्वतःला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असता तर त्यांनी तो नाकारला असता का?’, ‘आपली योग्यता नसताना दुसऱ्याला पुरस्कार नाकारायला सांगण्याचा अधिकार यांना कोणी दिला?’, ‘ही निव्वळ jealousy आहे’ इत्यादी प्रतिवाद करत आहेत.
परंतु पुरस्कार देण्यासंबंधीची निवड समितीची प्रक्रिया मूल्याधिष्ठित नाही, त्यात बेलगाम सरकारी हस्तक्षेप होतो, व्यवस्थाविरोधी लेखनाला दडपण्याची वृत्ती आहे, आणि साहित्यिक वर्तुळातला परस्परांविषयीचा आदर पुरस्कारासारख्या गोष्टींमुळे कमी-जास्त होत राहतो, अशा सगळ्या गोष्टींचे अत्यंत कुरूप दर्शन पुरस्काराची घोषणा झाल्यापासून घडते आहे.
या पार्श्वभूमीवर विनोद कुमार शुक्ल यांच्या ‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबरीची आठवण होते. या कादंबरीत एक कमालीची अनागोंदी आहे आणि तरीही सगळं काही सुशेगात चालू असल्याचा फुगवटा आहे. परस्परांवर कुरघोडी करायला बघणारी प्रवृत्ती आहे आणि त्याचवेळी लाळघोट्या, परिस्थितीला शरण जाऊन हतबल होणाऱ्या प्रवृत्तीही आहेत. स्पर्धा आहे, अनिश्चिती आहे, आणि पुन्हा पुन्हा तेच ते घडत राहण्याची अनिवार्यताही आहे. त्यामुळे पुरस्कारानिमित्त उठलेल्या गदारोळाकडे पाहून या कादंबरीची प्रकर्षाने आठवण झाली.
शुक्ल यांना चिरपरिचित असलेल्या छत्तीसगडमधील, ग्रामीण आणि आदिवासी यांच्या सामाजिक सीमेवर असलेल्या वस्त्यांमधलं वास्तव एका वेगळ्याच रूपात या कादंबरीतून आपल्यासमोर येतं. कुठलाही कार्यकारण संबंध स्पष्ट न होता घडत जाणाऱ्या घटनांकडे आणि माणसांच्या आयुष्याकडे कल्पनेच्या एक अद्भुत चष्म्यातून पाहून त्यांचं भयाण वास्तव चितारणारी ही कादंबरी आहे. हिला कादंबरी म्हणावं की नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे. सलग अडीचशे पानांमध्ये ठराविक पात्रांची नावं वारंवार येत राहतात आणि त्यांच्या आयुष्यातल्या घटना एकापुढे एक घडलेल्या असाव्यात की काय अशा पद्धतीची मांडणी आहे म्हणून कादंबरी म्हणायची इतकंच.
वाचताना एक प्रकरणच काय एक पानसुद्धा कुठलाही एक सलग अनुभव वर्णत बसत नाही. घडत जाणाऱ्या घटनांमधून आणि ज्या शब्दांत ती घटना मांडली आहे त्या शब्द आणि वाक्यरचनांमधून आपण काही अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आहोत तोवरच अत्यंत abrupt पद्धतीने काहीतरी वेगळंच चालू होतं, ते मागच्या प्रसंगापेक्षा, कल्पनेपेक्षा आणि शब्दयोजनेपेक्षा अधिक absurd असतं. एकेका मुद्याचा आणि शब्दप्रयोगाचा अर्थ लावताना आपली मती गुंग होऊन जाते. ‘आत्ता काय चालू होतं आणि हे अचानक काय??’ असं वाटेपर्यंत त्या पुढच्या प्रसंगात आपण गुंतत जातो आणि तिथेच आणखी नवं काहीतरी चालू होतं. याचा अर्थ असा नव्हे की हा अनुभव तुटक आहे. त्यात रूढार्थाने त्यात सलगपणा किंवा सुसंगती नसणं हा विचारपूर्वक केलेल्या रचनेचा भाग आहे. हा अनुभव म्हणून तुटक नाही, तर अत्यंत बौद्धिक गोंधळ निर्माण करणारा, बुद्धीला अलर्ट राहण्याचं आव्हान देणारा असा आहे.
ज्या पद्धतीचं वास्तव आपल्याला कदाचित परिचित नाही त्या वास्तवाकडे भांबावून बघायला लावणारा, कधी कणवेने तर कधी अन्यायाच्या जाणिवेतून येणाऱ्या तिरस्कार आणि रागाने आपण या कथेकडे बघावं अशी लेखकाची तळमळ आणि अपेक्षा या मांडणीतून जाणवत राहते. उदाहरणार्थ -
गुरुजी दमले होते, त्यांना झोप येत होती. तरीही सगळे बसमधून बाहेर पडले आणि शहराच्या दिशेने पळू लागले. थोड्या वेळाने बस हॉर्न वाजवत त्यांच्या मागे आली. पळता पळता हे लोक एका बारक्या गल्लीत शिरले. त्या गल्लीत बस शिरू शकत नव्हती. आता ते वाचू शकत होते. पण वस्तूंचं समजूतदार असणंही धोक्याचंच होतं. बस आकुंचन पावत बारक्या गल्लीत घुसली. एखाद्या तीन मजली घरच्या छतावर गेले, तर बस जिन चढून बस वर जायची...
लोकांच्या वाट्याला येणारी संकटं, भीती शोषण, आणि किड्यामुंगीसारखं मरण हे तर त्यांनी जवळजवळ फँटसीच्या चष्म्यातून मांडलेलं आहे. ती फँटसी प्रचंड अस्वस्थ करून जाते. उदाहरणार्थ -
वर हवेत उडणाऱ्या पतंगाकडे लक्ष देताना हाडूची एखाद्या सायकलीशी टक्कर झाली नसती, तशाही अवस्थेत पावली त्याच्या मुठीतून सुटली नसती, त्याला जिलबी मिळाली असती... अशी स्थिती झाली की हाडू हवेत उडू लागला असता. हाडूला शोधत त्याच्या आईची नजर वर वळली असती म्हणजे तीही हाडूच्या मागोमाग उडायला लागली असती. कुठलं तरी जनावर मेलं होतं... गिधाडं खाली उतरू लागली होती. अशा स्थितीत हाडूने उडायला नको होतं.
या कादंबरीतलं गाव आणि गावातली माणसं वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर जातात. जणू वास्तव जगातले नियम या गावाला आणि माणसांना लागूच नाहीत. ते माणसांनी झुगारलेत असं नव्हे तर असे काही नियम असतात हेच त्यांच्या गावी नाही. माणसाचं नाव घेऊन ‘ठो’ म्हटलं की बंदुकीची गोळी त्याच माणसाचा मग काढत त्याच माणसाला जाऊन लागेल असं या माणसांना वाटतं. कांदे बटाटे पिंजऱ्यात ठेवले तर ते पिंजऱ्याचं दर उघडल्यावर उडून जातील असं त्यांना वाटतं. शाळेतल्या फळ्यावर ‘सोनं’, ‘चांदी’ असं लिहिलं तर शाळेचं रूपांतर सोनाराच्या दुकानात होऊ शकेल, असं ते मानतात, आणि त्याच वेळी आपण केलेल्या कामाचे पैसे मागितले तर आपला जीवही जाईल हेही त्यांनी अनुभवलेलं असतं पण ते आपल्याला सूचक वाक्यांतून दिसतं.
या गावात शाळा आहे, गुरुजी आहेत, रेल्वे स्टेशन आहे, दुकान आहे, भजीवाला आहे, कुटुंबं आहेत, एकमेकांसाठी काहीतरी चांगलं करणारी माणसं आहेत आणि तशीच किरकोळीत एकमेकांचा जीव घ्यायलाही कमी न करणारी माणसं आहेत. अत्यंत मर्यादित स्वरूपाचं शिक्षण, सरकारी नोकऱ्यांच्या जागा भरणं आणि त्यातून छोट्या छोट्या गावांमधल्या आणखी छोट्या छोट्या समुदायांमध्ये सतत धुमसत असलेलं वितुष्ट आहे. तत्त्वाच्या आधारे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला व्यवस्था कशी गुन्ह्याकडे वळवते हादेखील कादंबरीतला एक महत्त्वाचा विचारधागा आहे.
समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींचा संघर्ष दाखवतानाच स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, वरची जात - खालची जात, वयाने मोठे आणि लहान अशा वेगवेगळ्या सत्ता संघर्षांकडे आपलं लक्ष लेखक वेधून घेतात. हे वास्तव कल्पनेच्या चष्म्यातून दाखवताना ते वाचकांना खिळवून ठेवतात, उत्कंठा वाढवत राहतात आणि तरीही ‘सुरू केलं आणि सलगपणे वाचून काढलं’ या पद्धतीने हे पुस्तक वाचणं अशक्य आहे, किंवा फारच कमी लोकांना शक्य आहे. वाचता वाचता आपल्याला माहीत असलेल्या जगाच्या वास्तवाशी आपण इतक्या नकळतपणे जोडले जातो की पुस्तकांच्या पानांमधल्या कल्पना जास्त अंगावर यायला लागतात आणि श्वास घेण्यासाठी वास्तव जगातल्या आभासी स्वस्थतेकडे आपल्याला परतावसं वाटतं.
हेही वाचा - विंदांच्या कवितेतील त्रिपदी संस्कृतिसंगम
(ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेविषयी...)
सुरुवातीला आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते कदाचित छत्तीसगडच्या आदिवासीबहुल परंतु थोडं थोडं ग्रामीण जीवन ओळखीचं होऊ लागलेल्या परिसरातलं येतं. पण हळूहळू कथेतला अंधार इतका गडद होत जातो, की डोळ्यांपुढचं ते चित्र धूसर होतं आणि तुमच्या-आमच्या गावातल्या घटना आणि माणसांचे चेहरे त्यांच्या जागी उभे राहायला लागतात. आणि म्हणूनच एका वेगळ्याच कल्पनेच्या जगात वावरत असतानाही आपल्याच आजूबाजूच्या वास्तवाची दाहकता आपल्याला पोळत राहते. वाचक म्हणून अस्वस्थ करत राहते.
या कादंबरीचा ‘फुलेल तेव्हा बघू’ या नावाने मराठीत अनुवाद निशिकांत ठकार यांनी केला आहे. समकालीन प्रकाशनाने हा अनुवाद प्रसिद्ध केलेला आहे. मूळ हिंदीतल्या कादंबरीच्या तोडीस तोड कल्पनांची मांडणी आणि शब्दरचना ठकारांनी केलेली आहे. हे मराठी वाचताना ते अनुवादित आहे, किंवा मराठी बोलणाऱ्या विचारविश्वाला हा आशय अपरिचित / कमी परिचित आहे असं अजिबात वाटत नाही. यात हा अनुभव सार्वत्रिक असण्याचा जितका हात आहे, तितकाच अनुवादकाच्या उत्तम संदर्भ माहितीचा, सामाजिक जाणिवांचा, भाषिक क्षमतेचासुद्धा हात आहे. विनोद कुमार शुक्ल यांची मूळ हिंदी कादंबरी आणि मराठी अनुवाद यात काही ‘lost in translation’ आहे, असं न जाणवणं, हे या अनुवादित पुस्तकाचं आणखी एक बलस्थान आहे.
एखादी कलाकृती – पुस्तक, नाटक, चित्रपट, शिल्प, चित्र – काहीही असो, तिने त्या कलाकृतीचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीला ‘डिस्टर्ब’ केलं पाहिजे, तर ती अत्यंत प्रभावी आणि समाजाभिमुख कलाकृती ठरते. विनोद कुमार शुक्ल यांची ही कादंबरी असाच अनुभव आपल्याला देते.
फुलेल तेव्हा बघू (मूळ हिंदी – खिलेगा तो देखेंगे)
लेखक – विनोद कुमार शुक्ल
अनुवादक – निशिकांत ठकार
प्रकाशक – समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या – 247
किंमत – 300 रुपये
Tags: ज्ञानपीठ पुरस्कार विनोदकुमार शुक्ल अनुवादित पुस्तक खिलेगा तो देखेंगे Load More Tags
Add Comment