भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन (सी. व्ही. रामन) यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. रामन इफेक्ट या शोधाची घोषणा यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्या घटनेच्या गौरवार्थ आणि देशात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो. या निमित्ताने विज्ञान आणि विज्ञानाचा आभास निर्माण करणारे छद्मविज्ञान यांचं थोडक्यात परामर्श घेऊ.
विज्ञान म्हणजे पुराव्यावर आधारित पद्धतशीर कार्यपद्धतीचे अनुसरण करून नैसर्गिक आणि सामाजिक जगाचे ज्ञान समजून घेणे आणि त्याचा वापर करणे.
विज्ञानाच्या संज्ञाचा वापर करून सांगितलेल्या अवैज्ञानिक गोष्टी म्हणजे छद्मविज्ञान! विज्ञानाच्या नावाखाली अवैज्ञानिक गोष्टी बेमालूमपणे खपवणे इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यातही इंटरनेट आणि Whatsapp या गोष्टींमुळेही ह्या छद्मविज्ञानाला अतिशय वेग आलाय आणि त्यांची पोहोच वाढली आहे. वारंवार इतक्या सगळ्या बातम्या येऊन आदळताहेत की खरं खोटं करायला कुणाला वेळ नाही. लोकांना त्याची गरजही वाटत नाही. कितीतरी उदाहरणे देता येतील.
तारा भवाळकर त्यांच्या भाषणात बायकांनीच टिकली का लावायची याबद्दल बोलहाताहेत. पण अशी उदाहरणे इतकी आहेत की बोलता सोय नाही.
खरं म्हणजे सामाजिक संस्थांनी यांच्याविरोधात एक मोठी मोहीम सुरू करायला हवी. चळवळीशी संबंधित लोक ह्याविरोधात थोडं बोलताहेत, निरनिराळ्या माध्यमांतून आवाज उठवत आहेत पण तो आवाज इतका क्षीण आहे की ज्यांना ऐकू जायला हवा त्यांच्यापर्यंत तो पोहोचतच नाही. लोकांपर्यंत आधी पोहोचतंय ते हे छद्मविज्ञान. त्यातही शाळकरी संस्कारक्षम मनं ह्याला अधिक बळी पडताहेत.
यातील काही उदाहरणे सहज इंटरनेट वर उपलब्ध आहेत. आधी ती पाहूयात -
1. तुळशीची पूजा केल्याने घरात समृद्धी येते. सुख आणि शांती राहते. (अ)वैज्ञानिक तर्कानुसार तुळशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे घरात एखादे झाड असेल तर त्याची पाने खाल्ल्याने रोग दूर होण्यास मदत होते.
2. विवाहित हिंदू स्त्रिया कुंकू लावतात. (अ)वैज्ञानिक तर्क - कुंकवामध्ये हळद, चुना आणि पारा असतो. हे मिश्रण शरीराचा रक्तदाब नियंत्रित ठेवते. त्यामुळे लैंगिक उत्तेजनाही वाढते, त्यामुळे विधवा महिलांना कुंकू लावणे निषिद्ध आहे. यामुळे तणाव कमी होतो.
3. हिंदू धर्मात ऋषी-मुनी डोक्यावर शेंडी ठेवत असत. आजही अनेकजण ती ठेवतात. (अ)वैज्ञानिक तर्क- मेंदूच्या सर्व नसा या ठिकाणी एकत्र येतात. यामुळे मन स्थिर राहते आणि व्यक्तीला राग येत नाही, विचार करण्याची क्षमता वाढते.
4. जर कोणी दक्षिणेकडे पाय ठेवून झोपला तर लोक म्हणतात की त्याला वाईट स्वप्ने पडतील, भूतांचा पछाड होईल इ. त्यामुळे उत्तरेकडे पाय ठेवून झोपावे. (अ)वैज्ञानिक तर्क- जेव्हा आपण उत्तरेकडे डोके ठेवून झोपतो, मग आपले शरीर पृथ्वीच्या चुंबकीय लहरींशी एकरूप होते. शरीरातील लोह मेंदूकडे वाहू लागते. यामुळे अल्झायमर, पार्किन्सन्स किंवा मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. एवढेच नाही तर रक्तदाबही वाढतो.
5. भारतीय संस्कृतीनुसार जमिनीवर बसून अन्न खाणे ही चांगली गोष्ट आहे. (अ)वैज्ञानिक तर्क - मांडी घालून बसणे हे एक प्रकारचे योग आसन आहे. या स्थितीत बसल्याने मन शांत राहते आणि जेवताना मन शांत राहिल्यास पचनक्रिया चांगली राहते. या स्थितीत बसताच मेंदूकडून पोटात अन्नपाचक रस तयार होण्यासाठी एक सिग्नल आपोआप जातो.
6. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भूत पळून जाते असे अनेकांना वाटते. (अ)वैज्ञानिक तर्क - लोकांच्या मनात या झाडाबद्दल आदर वाढावा आणि ते तोडू नयेत म्हणून त्याची पूजा केली जाते. पिंपळ हे एकमेव झाड आहे जे रात्री देखील ऑक्सिजन निर्माण करते.
7. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा आपण हात जोडून नमस्ते किंवा नमस्कार म्हणतो. (अ)वैज्ञानिक तर्क- जेव्हा सर्व बोटांच्या टिपा एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्यावर दबाव येतो. ॲक्युप्रेशरमुळे त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर, कानांवर आणि मेंदूवर होतो, ज्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती दीर्घकाळ लक्षात राहते.
8. बांगड्या घातल्याने सतत घर्षण होते ज्यामुळे रक्ताभिसरण पातळी वाढते. तसेच बांगड्यांच्या अंगठीच्या आकारामुळे शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा परत शरीरात जाते.
9. जेव्हा आपण घंटा वाजवतो तेव्हा प्रतिध्वनी ऐकू येतो. जे आपले शरीर उपचार केंद्र सक्रिय करते. यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता दूर होते.
अजूनही कितीतरी गोष्टी आहेत. जसे की, बायकांनी मंगळसूत्र का घालावे, गंगेच्या पाण्यात बॅक्टरओफाज असतात म्हणून ते जास्त पवित्र आहे. हवन केल्यावर काही चांगले वायू निर्माण होतात आणि हवा शुद्ध करतात, फलज्योतिष इत्यादी..
खेदाची गोष्ट अशी की काही वैज्ञानिक लोक ह्यावर प्रयोग करून प्रायोगिक पुरावा हुडकण्याचा प्रयत्न करतात., त्यात IKS सारखे विषय निर्माण करून याला सरकारी अधिष्ठान सुद्धा दिलं जातंय.
बाईने टिकली लावावी की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. टिकली लावल्यावर विशिष्ट दाब बिंदू वगैरे काही activate होत नाही, हे तारा बाई मोठी टिकली लावून सांगतात त्यात मला कोणताही विरोधाभास दिसत नाही. तसंच बायकांनी बांगड्या घातल्यावरच ऍक्युप्रेशर वगैरे होतं हे ही खरं नाही. पिंपळ काय किंवा वड काय किंवा तुळस काय सर्वच झाडं प्राणवायू सोडतातच, त्यांची पूजा करणे हा परंपरेचा भाग आहे. पण सरसकट सगळीच झाडे लावायला पाहिजेत वाढवायला पाहिजेत हे पूर्ण सत्य आहे. त्यामुळे एका विशिष्ट झाडाला असं खोटं विज्ञानाचे लेबल लावून विज्ञानाला बदनाम करू नये. टिकली लावणे, तुळशीची पूजा करणे, वड पिंपळ यांची पूजा करणे इत्यादी हा परंपरेचा भाग आहे. परंपरांचा अभिमान असू शकतो. इथे परंपरांना विरोध नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पण त्यांच्या समर्थनासाठी विज्ञानाचा खोटाच टेकू देणे मान्य नाही.
विचार केला तर ह्या सगळ्या तर्कांत काही समान धागे आढळतात. जसे की यांचा जनक कोण हे सांगता येत नाही. विज्ञानात असं होतं नाही म्हणजे उत्क्रांतीवादाचा जनक डार्विन असतो हे आपल्याला माहिती असतं तसाच प्रत्येक खऱ्या वैज्ञानिक तथ्याचा जनक माहीत असतो पण वरील उदाहरणात आपल्याला त्यांचा जनक सापडत नाही. हे असेच उडत उडत पसरलेले तर्क आहेत. काही लोक ह्यांना वेद किंवा इतर संदर्भ लावतात पण तो ही विश्वासार्ह नसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या प्रकारे धर्माशी, संस्कृतीशी, श्रद्धेशी जोडलेल्या आहेत. यांच्या विरोधात बोलायला गेलं की सनातनी लोक अचानक फार आक्रमक होतात. खून पडू शकतात इतके आक्रमक. काही लोक म्हणतात फक्त आमच्याच धर्माविरुद्ध का बोलता दुसरे धर्म नाहीत का? आणि खरं सांगायचं तर सामान्य माणूसही अशा श्रद्धांशी भावनिक दृष्ट्या चिकटलेला असतो. त्यामुळे सर्व चुकीचे तर्क जे पूर्वग्रहदूषित असू शकतात तो भाबडेपणाने स्वीकारतो.
तिसरे म्हणजे ह्या गोष्टींच्या मध्ये वैज्ञानिक शब्द / संदर्भ बेमालूमपणे मिसळलेले असतात. एक प्रकारे अर्धसत्य लोकांना सांगण्याचा प्रयत्न असतो.
आणि चौथी गोष्ट म्हणजे अशा बिनबुडाच्या तर्कांवर लोकांचा लवकर विश्वास बसतो. कारण लोकांना खोलवर विचार करून खरं खोटं करायचा आळस असतो. ह्याला मानसशास्त्रीय आधार देता येईल.
ह्याच्याही पुढे जाऊन छद्मवैज्ञानिक जेव्हा मार्केटिंगसाठी ह्या गोष्टींचा आधार घेतात तेव्हा सामान्य लोकांना जास्त त्रास होण्याची शक्यता असते. जसे की विविध प्रकारची तेले, वेदनाशामक, केसांसाठीचे उपाय, वजन कमी करण्यासाठीचे उपाय, इतकंच काय कॅन्सर आणि कोणत्याही दुर्धर व्याधींवर रामबाण उपाय देणारी औषधे आयुर्वेदाच्या नावावर खपवली जातात. ह्यातही त्रासलेले लोक कोणत्याही मार्गाने व्याधीपासून सुटका इच्छित असतात आणि पुन्हा ह्या खोट्या विज्ञानाच्या विळख्यात अडकतात. ह्यात नेतेमंडळी आणि सेलिब्रिटी मंडळी यांचे अधिष्ठान मिळाले की विषयच संपतो.
ह्यासाठी विज्ञान म्हणजे काय, त्याच्या कसोट्या आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजेत. विज्ञान प्रत्येक गोष्टीला पुरावा मागते, जो प्रयोगांनी सिद्ध करता यावा लागतो. ह्यात Reproducibility (पुनरावृत्ती होण्याची शक्यता) असावी लागते. म्हणजे प्रयोग त्याच प्रकारे पुन्हा केला तर तसेच अनुमान पुन्हा पुन्हा तेच यायला हवे. वस्तुनिष्ठ निरीक्षण, मोजमाप, यांनी मुद्दा सिद्ध व्हायला हवा. नुसता तर्क ही विज्ञानाची कसोटी नाही. विज्ञानाधारित तर्क असू शकतात पण ते सिद्ध करावे लागतात. विज्ञानात भावनांना जागा नाही. गंभीर विश्लेषण, पडताळणी, चाचणी, छाननी, पुनरावलोकन आणि मूल्यांकनासाठी प्रदर्शन यांचा समावेश असतो.
वरील सर्व कसोट्यांवर छद्मविज्ञान टिकत नाही म्हणून ते खरे विज्ञान नाही. त्यातल्या त्यात मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, विश्लेषण, सुधारणा या गोष्टींबाबत पारदर्शक कसोट्यांसाठी छद्मवैज्ञानिक तयार होणार नाहीत. आणि इथेच विज्ञानाच्या कसोटीवर छद्मविज्ञान नापास होते. शाळेतील मुलांना हे ओळखता आलं तर हा गोंधळ कमी व्हायला मदत होईल. आणि ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणखी निकराने विज्ञानातल्या लोकांकडून होणे अपेक्षित आहे.
- स्नेहलता जाधव
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)
Tags: राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी छद्मविज्ञान विज्ञान Load More Tags
Add Comment