'निव्वळ बातमी पोचवणारे दूत' यापेक्षा - कोणत्याही बातमीमागचा हेतू आणि त्याभोवतीच्या कल्पित कथा समजून घेणारी महत्वाची व्यक्ती - या दृष्टिकोनातून पत्रकारांनी स्वत:कडे पाहायला हवं..!” हे स्वत:चं म्हणणं अंगिकारलेला, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि इतर पत्रकार जे उच्चारायचं धैर्य दाखवत नाहीत तेच सत्य कायम उच्चारणारा जॉन पिल्जर वयाच्या 84व्या वर्षी, नुकताच म्हणजे 30 डिसेंबर 2023 रोजी मरण पावला.
बिकिनी अॅटॉल म्हणजे नारळांचा प्रदेश..! पॅसिफिक समुद्रात विषुववृत्ताजवळ मार्शल आयलॅंड ही बेटं आहेत. त्यापैकी एक म्हणजे बिकिनी अॅटॉल. 1946 मध्ये अमेरिकेनं बिकिनी अॅटॉलवरच्या रहिवाशांना जवळच्या, दुसऱ्या म्हणजे रिंगेरिक बेटावर जायला सांगितलं. त्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं होतं. ते म्हणजे, अमेरिकेला बिकिनी बेटांवर अणुचाचण्या घ्यायच्या होत्या. “आपण अणुचाचण्या झाल्यावर परत आपल्या बेटावर येऊ” या आशेनं बिकिनीचे रहिवासी रिंगेरिकवर गेले. तिथे ना त्यांना खायला अन्न होतं, ना प्यायला पाणी. मग अनेकजण जवळपासच्या इतर बेटांवर गेले.
1946 मध्ये बिकिनी बेटांवरच्या ‘ऑपरेशन्स क्रॉसरोडस्’ या अणुचाचण्या यशस्वी झाल्यामुळे पॅरिसच्या लुई रेरा यानं स्त्रियांनी घालायच्या एका पोशाखाचं नाव त्या बेटांना ठेवलं - बिकिनी! दरम्यान बिकिनी बेटांवरचे रहिवासी वणवण फिरत आपल्या जन्मभूमीवर परतले. तिथे किरणोत्सर्गी घटकांनी वातावरण आणि पाणी प्रदूषित झालं होतं. इकडे पाश्चात्य जगात बिकिनी या पोशाखाला सुरुवातीला सहजी मान्यता मिळाली नसली तरी बिकिनीचा खप 2000 सालापर्यंत दरवर्षी 81.1 कोटी डॉलर्सपर्यंत पोचला होता..! बिकिनी घातलेल्या स्त्रिया हा जगभरातल्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. बिकीनी बेटावरच्या सर्व बायकांना तोपर्यंत स्ट्रॉंटियम-90 या किरणोत्सारी घटकामुळे थॉयरॉईडचा कर्करोग झालेला होता....!
जॉन पिल्जर या पत्रकाराच्या ‘The coming war on China’ या डॉक्युमेंटरीत हे पाहायला मिळतं. त्यानं प्रत्यक्षात या बेटांवर जाऊन काही रहिवाशांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
'निव्वळ बातमी पोचवणारे दूत' यापेक्षा - कोणत्याही बातमीमागचा हेतू आणि त्याभोवतीच्या कल्पित कथा समजून घेणारी महत्वाची व्यक्ती - या दृष्टिकोनातून पत्रकारांनी स्वत:कडे पाहायला हवं..!” हे स्वत:चं म्हणणं अंगिकारलेला, आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि इतर पत्रकार जे उच्चारायचं धैर्य दाखवत नाहीत तेच सत्य कायम उच्चारणारा जॉन पिल्जर वयाच्या 84व्या वर्षी, नुकताच म्हणजे 30 डिसेंबर 2023 रोजी मरण पावला.
सुमारे 50 वर्षं वर्तमानपत्रांमधल्या लेखांमधून, डझनावारी पुस्तकांमधून आणि 50 डॉक्युमेंटरीजमधून त्यानं वंशवाद, वर्णवाद, दारिद्र्य, युध्दांमुळे अपरिमित हानी सोसणारे नागरिक, यादवी युध्दांमुळे स्थलांतरित झालेले नागरिक, भांडवलशाहीला बळी पडलेले कामगार, अणुयुध्दाच्या चाचण्यांमुळे देशोधडीला लागलेले नागरिक, कॉर्पोरेट कंपन्यांमुळे झालेली पर्यावरणाची हानी, ऑस्ट्रेलियातल्या मूळ रहिवाशांचा झालेला संहार अशा असंख्य विषयांवर सतत आवाज उठवला. त्याच्या सर्व लेखांमध्ये, डॉक्युमेंटरीजमध्ये शेलीसारख्यांच्या कवितांच्या ओळी, ऑन द बीच, द अग्ली अमेरिकन अशांसारखे चित्रपट, लॅटिन अमेरिकेतली म्यूरल्स असे अत्यंत समर्पक संदर्भ दिसतात. त्याच्या तर्कनिष्ठ आणि जहाल विचारांना अत्यंत यथोचित मृदू शब्दांची जोड अजोडपणे त्याच्या साहित्यात येते. अत्यंत मुद्देसूद, ओघवतं प्रभावी लेखन हे त्याच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे.
1979 मध्ये कंबोडियामध्ये पोल पॉटच्या खेमर रुज या संघटनेनं 70 लाखांपैकी 20 लाख माणसांची कत्तल केली आणि 20 लाख नागरिक नंतर उपासमारीनं आणि अन्नाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या रोगराईनं मरण पावले हे त्यानं 'इयर झिरो : द सायलेंट डेथ ऑफ कंबोडिया' या डॉक्युमेंटरीतून प्रथमच उघडकीला आणलं. 50 देशांमधल्या 15 कोटी लोकांनी ही डॉक्युमेंटरी पाहिली आणि तिला 30 आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कामामुळे कंबोडियामध्ये 40 मिलियन डॉलर्सची मदत पोचू शकली.
आज पॅलेस्टाईन – इस्त्राएल युध्दानं पेट घेतला आहे. यावर 2002 मध्ये पिल्जरनं 'पॅलेस्टाईन इज स्टिल द इश्यु' ही डॉक्युमेंटरी तयार केली होती.
इतिहासात अजरामर ठरलेल्या व्हिएतनाम युध्दावर तर पिल्जरनं अनेक डॉक्युमेंटरीज काढल्या. त्यापैकी 1970 मधली ‘द क्वाएट म्युटिनी’ ही डॉक्युमेंटरी अनेक पारितोषिकांची धनी ठरली. या अप्रतिम डॉक्युमेंटरीमधलं हे पहिलं वाक्य..! “व्हिएतनामचं युध्द संपलं नाहीये.. संपत आलंय. पण ते काही मुत्सद्दी राजकारण्यांच्या चर्चेमुळे संपत नाहीये. पृथ्वीवरच्या सर्वात बलशाली आणि सर्वात धनवान ऑर्गनायझेशन असलेल्या अमेरिकेच्या लष्करातल्या सैनिकांनीच या युध्दाबद्दल प्रश्न उपस्थित करुन सरकारला आव्हान दिलंय म्हणून हे युध्द संपतंय..” !
अमेरिकेच्याच 9/11 प्रकरणानंतर त्यानं एका लेखात लिहिलं होतं, “तेव्हा मुस्लीम जगतातून माणसं निवडून अमेरिकेनं एक सिक्रेट आर्मी तयार केली. त्यांना पाकिस्तानातल्या कॅंपमध्ये सीआयए / ब्रिटनच्या एमआय 6 आणि पाकिस्तान इंटेलिजन्स यांच्या सहकार्यानं प्रशिक्षण दिलं गेलं. काहीजणांना ‘इस्लामिक कॉलेज ऑफ ब्रुकलिन’मध्ये प्रवेश दिला. ‘ट्विन टॉवर्स’ नजरेसमोर असलेल्या या कॉलेजमध्ये प्रवेश दिलेला एक सौदी इंजिनिअर होता – ओसामा बिन लादेन.
‘स्टीलिंग अ नेशन’ या त्याच्या डॉक्युमेंटरीमध्ये ‘चागोज’ या अरबी समुद्रातल्या एका बेटाची कहाणी आहे. 18व्या शतकापासून ‘चागोज’ या बेटावर लोक आनंदानं रहात होते. या बेटावरच्या गावांमध्ये शाळा, हॉस्पिटल्स, चर्चेस आणि रेल्वेमार्गही होते. विसाव्या शतकात तिथल्या सरकारनं हॅरॉल्ड विल्सन या ब्रिटिश पंतप्रधानांच्या राजवटीत अमेरिकेबरोबर ‘चागोज’ या बेटांच्या समूहामधलं ‘डिएगो गार्सिया’ हे एक प्रमुख बेट अमेरिकेला देण्याचा गुप्तपणे करार केला. मग ब्रिटिशांनी अमेरिकेसोबत संधान बांधून ‘चागोज’ बेटावरच्या 2000 लोकांना मॅारिशसला हलवलं. या स्थलांतरित केलेल्या लोकांना प्रत्येकी 3000 पौंड भरपाई देताना परत त्यांच्या बेटावर जाण्याचे त्यांचे हक्क चलाखीनं काढून घेतले गेले. आज ‘डिएगो गार्सिया’ या बेटावर अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ दिमाखात उभा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉरिशसला स्थलांतरित केलेले ‘डिएगो गार्सिया’मधले अनेक लोक नंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचं कारण एकच होतं, स्थलांतर! केवळ स्वत:चा देश मागे राहिला या दु:खानं त्यातली कित्येक माणसं मरण पावली होती. स्थलांतरित लोकांचं जिणं किती भयावह असतं त्याची सहसा आपल्याला कल्पना नसते. जगात युध्दं, गरीबी आणि दुष्काळ या कारणांमुळे स्थलांतर करावं लागणाऱ्या माणसांची संख्या 2050 सालापर्यंत 100 कोटीला पोचेल असा जाणकारांचा अंदाज आहे!
आताच्या जगावर उद्योगसमूहांनी मालकी कशी स्थापन केली आहे ते ‘द न्यू रुलर्स ऑफ द वर्ल्ड’ या जॉन पिल्जरच्या डॉक्युमेंटरीत पाहायला मिळतं. आज जगातल्या 200 कंपन्यांकडे 25 टक्के संपत्ती आहे. ‘जनरल मोटर्स’ ही कंपनी आता डेन्मार्कपेक्षा मोठी कंपनी आहे. ‘फोर्ड’ कंपनी संपूर्ण दक्षिण आफ्रिकेपेक्षा मोठी आहे तर बिल गेटसकडची संपत्ती संपूर्ण आफ्रिकेतल्या लोकांकडच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे अशा प्रकारची माहिती या डॉक्युमेंटरीत पाहायला मिळते.
अशा अनेक उत्तमोत्तम डॉक्युमेंटरीजपैकी ‘बर्प : पेप्सी विेरुध्द कोक इन द आईस कोल्ड वॉर’ या डॉक्युमेंटरीत सुरुवातीच्या काही प्रसंगांमध्ये अमेरिकन यादवी युध्दानं कोकाकोला या पेयाला कसा जन्म दिला ते काही क्षणांपुरतं दिसतं…! कोकाकोला आज जगभरातल्या 200 देशांमध्ये विकला जातो. 62600 कर्मचारी असलेल्या कोकाकोलाची 2018 ची उलाढाल 3180 कोटी अमेरिकन डॉलर्स होती. आज दिवसाला 190 कोटी बाटल्या कोकाकोला जगभरात प्यायले जातात. 1898 साली सुरु झालेली पेप्सी देखील 200 देशांमध्ये विकली जाते. 2,63,000 कर्मचारी असलेल्या ‘पेप्सीको’ कंपनीची 2018 ची उलाढाल 6466.1 कोटी अमेरिकन डॉलर्स होती. पेप्सी आणि कोला या दोन ब्रॅंडसमध्ये सतत स्पर्धा सुरु असते. या डॉक्युमेंटरीमध्ये पेप्सी आणि कोकाकोला या दोन शीतपेयांमधलं शीतयुध्द दिसतं. त्या अनुषंगानं पर्यावरण, पाणीप्रश्न, भांडवलशाही अशा विषयांचा त्यानं मागोवा घेतला आहे.
हेही वाचा : पेप्सी व्हर्सेस कोक इन द आईस कोल्ड वॉर - नीलांबरी जोशी
डॉक्युमेंटरी या माध्यमाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘WHY THE DOCUMENTARY MUST NOT BE ALLOWED TO DIE’ या लेखात तो म्हणतो, ‘बॅटल ऑफ चिली’ या डॉक्युमेंटरीमध्ये शेवटच्या प्रसंगात चिलीमध्ये नौदलातल्या एका अधिका-याच्या मृत्यूनंतर सरकारी इतमामात त्याची शवयात्रा निघते. 11 सप्टेंबर 1973 ला अॅलेंदे या नेत्याच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार एका रक्तपाती हल्ल्यात उलथून लावलेलं असतं. लेंदेच्या हत्येचा कट करणाऱ्या लोकांविरुध्द तो अधिकारी लढलेला असतो. साहजिकच त्याचीही हत्याच झालेली असते. तेव्हा त्या शवयात्रेत सामील असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची मेडल्स, त्यांचा रुबाब यावरुन त्यांच्या धोकेबाज चेहऱ्यावरुन कॅमेरा अलगद फिरत जातो. त्यावरुन ती ‘लोकशाहीचीच शवयात्रा’ आहे याची प्रेक्षकांना खात्री पटते. ‘बॅटल ऑफ चिली’ या डॉक्युमेंटरीचं चित्रीकरण 27 वर्षांचा तरुण कॅमेरामन जॉर्ज म्युलर यानं अतिशय धैर्यानं केलं होतं. मात्र त्याला त्याची किंमत चुकवावी लागली. म्युलरला पकडून छळछावणीत डांबलं. तो नंतर नाहीसाच झाला. अनेक वर्षांनंतर त्याचं थडगं सापडलं..!”
या लेखात पिल्जर म्हणतो, "फरक पडेल अशी डॉक्युमेंटरी कशी तयार करणार? असं जेव्हा मला डॉक्युमेंटरीज तयार करणारे विचारतात तेव्हा मी एकच उत्तर देतो.. सोपं आहे. They need to break the silence..!" जॉन पिल्जरवरुन प्रेरित होऊन त्याच्याचप्रमाणे शोषणाविरुध्द आवाज उठवत राहणं ही त्याला खरी श्रध्दांजली ठरेल.
- नीलांबरी जोशी
neelambari.joshi@gmail.com
(लेखिका, मुख्यतः संगणकतज्ज्ञ म्हणून परिचित असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची 15हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. त्याचबरोबर जागतिक साहित्य, चित्रपट, मनोविकार, औद्योगिक मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.)
संदर्भ
1.
The Coming war on china
2.
Year Zero : The Silent Death of Combodia
3.
Stealing a nation
4.
Palestine is still the issue
5.
The Quiet Mutiny
6.
WHY THE DOCUMENTARY MUST NOT BE ALLOWED TO DIE
7.
Battle of Chile
8.
Burp : Pepsi vs Coke
9.
The new rulers of the world
Tags: john pilger nilambari joshi documentry obitury journalist film maker Load More Tags
Add Comment