करकट्टम : मूळ हरवत चाललेली एक लोककला

तामिळनाडूमधील एका वैशिष्ट्यपूर्ण, पारंपरिक नृत्यप्रकाराच्या बदलत्या स्वरूपाचा वेध..

करकट्टमचे पारंपरिक स्वरूप

पूर्वीचा साज-शृंगार बाजूला जाऊन आज करकट्टम अश्लीलता आणि बीभत्सतेच्या दिशेने सरकत आहे. या नृत्याच्या सादरीकरणामध्ये आता ‘एजंट’चा शिरकाव झाला आहे. हे एजंट कलाकारांना ‘गर्दी’च्या मागणीनुसार कला सादर करण्यासाठी दबाव टाकतात. यात कार्यक्रमादरम्यान अश्लील चाळे करून गर्दीकडून हशा वसूल करणं, महिलेला किंवा महिलेच्या रूपातील पुरुषाला / मुलाला एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून वागणूक देणं. यातून कार्यक्रमात बघ्यांची गर्दी वाढते, पण त्यातून या कलेचं मूळ स्वरूप हरवतं आहे. या वाढत्या बाजारीकरणावर चेन्नई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली गेली. कोर्टाने यावर चिंता व्यक्त करत या कार्यक्रमाच्या बदलत्या स्वरूपावर आक्षेप व्यक्त केला आणि या ‘पारंपरिक नृत्याच्या सादरीकरणात अश्लीलता रोखणं आवश्यक असल्याचं’ सांगितलं.

सध्याचा आघाडीचा तमिळ दिग्दर्शक मारी सेल्व्हराज यांनी ‘परीयल पेरूमल’ नावाचा एक चित्रपट बनवला होता. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता, पण या चित्रपटाने कमाल केली! एखाद्या कसलेल्या दिग्दर्शकाला लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी हा चित्रपट मांडला होता. कथा, मांडणी सगळंच उच्च प्रतीचं होतं. ते पा रंजिथ यांच्यासोबत काम करत असल्याने आणि या चित्रपटाची निर्मिती पा रंजिथ यांनीच केलेली असल्याने त्यांचा प्रभाव या चित्रपटावरही होता. पा रंजिथ त्यांच्या भडक शैलीमुळे जास्त प्रसिद्ध आहेत. स्वाभाविकच, हे गुणविशेष मारी सेल्व्हराज यांच्या चित्रपटातही उतरले. रंजिथ यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे प्रतिकांचा योग्य वापर, पारंपरिक कलांना फुटेज हे सगळंच या चित्रपटात होतं. यातील हिरोच्या वडिलांची भूमिका ‘थंगराज’ या अभिनेत्याने केलेली. वास्तविक ते यापूर्वी चित्रपटाच्या दुनियेतच नव्हते. ते ज्या कलेशी निगडित होते, तीच कला त्यांनी या चित्रपटात साकारली. या चित्रपटातील मुख्य पात्राचे वडील ‘करकट्टम’ ही प्राचीन लोककला सादर करणाऱ्या पथकात काम करणारे होते. हे पारंपरिक नृत्य चित्रपटात दाखवलं गेलं आहे.

हा चित्रपट पाहिल्यापासून मला उत्सुकता होती, ती या कलेबद्दल जाणून घेण्याची. पण मला त्या कलेचं नावही पूर्वी माहीत नव्हतं. ‘गुगल’वर शोध घेण्याचा प्रयत्न केला. ‘फेसबुक’वरील मित्रांकडूनही माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला, पण काही हाती लागलं नाही. अशातच काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये अगदी योगायोगाने एका तमिळ डोसा सेंटरमध्ये जाणं झालं. त्या सेंटरची मालक एक मुलगी होती. मी पदार्थ मागवले. तेवढ्यात, मी ज्या मित्रासोबत तिथे गेलो होतो, त्याला काही कारणाने तातडीनं जावं लागलं. तो परत येईपर्यंत हॉटेलमध्ये मी आणि हॉटेलची मालकीण असे दोघेच होतो. मित्र येईपर्यंत करायचं काय, हा प्रश्न होताच. हॉटेलमध्ये मुरूगन स्वामींचा फोटो पाहून मी म्हटलं की, यांच्याशी बोलून बघूयात. मग त्यांच्याकडूनच समजलं की, त्या चित्रपटातील नृत्याचं नाव ‘करकट्टम’ असून हा तमिळ लोकनृत्याचा एक प्रकार आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या नृत्यात वापरला जाणारा पोषाख इतरही चित्रपटांतील गाण्यांत वापरला गेला आहे. पण त्यामध्ये आणि परिमल पेरूमलमधील करकट्टममध्ये फरक आहे. इतर चित्रपटांमध्ये याचा वापर ‘मास’ला बेधुंद करून गल्लाभरू मानसिकतेतून केला गेला आहे, तर परिमलमधील करकट्टमचा वापर हा उपेक्षितांचं जगणं समोर मांडण्याकरता केला आहे, ज्यात पारंपरिक संगीताचा आवर्जून वापर केल्याने वास्तवाची दाहकता थेट भिडते.  

‘करकट्टम’ची (याची फोड ‘कर’ म्हणजे मातीचा घडा आणि ‘कट्टम’ म्हणजे तोल सांभाळणे) मुळं प्राचीन साहित्यात तर सापडतातच, पण त्याचे धागे हे त्याहून जुने आहेत. (करकट्टमचा उल्लेख संगम साहित्यातही येतो.) ज्या पद्धतीने लोकसंगीत, लोकनृत्य हे बव्हंशी कुठे न कुठे स्थानिक लोकदैवतांशी येनकेन प्रकारेण निगडित असते. वानगीदाखल, आपल्याकडे बिरोबाच्या स्तुतीसाठी गजी नृत्य करतात. शाक्त पंथातील लोक हातात पोतराज घेऊन नृत्य करतात. खंडोबाची आळवणी गोंधळ घालून केली जाते. त्याचप्रमाणे, करकट्टमचं मूळ स्वरूप मरीअम्मा या तामिळनाडूमधील स्थानिक लोकदेवतेशी निगडित आहे. (‘मरीअम्मा’चेच मराठी स्वरूप म्हणजे मरीआई / मरीमाता / लक्ष्मी आई होय. आपल्याकडे आषाढात मरीची पूजा केली जाते, रोगराई येऊ नये म्हणून तिची आळवणी केली जाते. अगदी तसेच तामिळनाडूमध्येही तिला पाऊस पाडणारी, गोवर, कांजण्या अशा आजारांपासून रक्षण करणारी देवता म्हणून पाहिलं जातं.) पाऊस व्यवस्थित व्हावा, यासाठी करकट्टमच्या माध्यमातून या मरीअम्माची आराधना केली जाते.

हे नृत्य दोन स्वरूपांत सादर केले जाते -

1. शक्ती करक्कम
2. अट्ट करक्कम

यातील शक्ती करक्कम हे फक्त धार्मिक प्रसंगी मंदिरात, तर अट्ट करक्कम हे मनोरंजनासाठी सादर केलं जातं.

या नृत्यप्रकारात संगीताची साथ असते, त्यामध्ये कर्नाटक संगीतातील अमृतवर्षिणीसारख्या रागिण्यांचा समावेश असतो. मुनी, पांबई, उदुक्कू, नादस्वरम आणि तविल या पारंपरिक वाद्यांचा वापर होतो. मूळ करकट्टममध्ये कलाकार साडी अथवा रंगीबेरंगी फ्रॉक घालून, आकर्षक मेकअप करून, डोक्यात गजरा माळून ही कला सादर करत. यात तांदूळ अथवा फुलं असणारे घडे उतरंडीत मांडून, डोक्यावर त्यांचा तोल सांभाळत नृत्य केलं जातं. या नृत्यामधील मुद्राभिनय ‘भरतनाट्यम’च्या जवळ जाणारा आहे. असं सांगितलं जातं की, भरतनाट्यम हाही मूळचा द्रविड प्रांतातील नृत्यप्रकार. पण सुरुवातीला देवदासी आणि नंतर अभिजन वर्गाने त्याला कला म्हणून स्वीकारलं. मात्र या दोन्ही नृत्य प्रकारांत वेशभूषेचा बराच फरक आहे. ‘भरतनाट्यम’मध्ये सौम्य रंगाची वस्त्रे असतात, तर करकट्टममध्ये भडक रंगाची. करकट्टम सादर करताना स्त्री कलाकार पूर्वी भडक रंगाची साडी नेसत; त्या साडीची जागा आता आखूड फ्रॉकने घेतली आहे. दोन्ही नृत्यांच्या विशेषांमध्ये असे काही फरक असले, तरी दोन्हींचे उद्देश देवाची स्तुती हेच आहेत. तामिळनाडूसोबतच केरळमधील काही प्रांतांतही करकट्टम सादर केलं जातं. केरळमध्ये हा नृत्य प्रकार ‘मकरक्कयथू’नंतर (कापणी हंगाम) ‘मेडम’ महिन्यात सादर केला जातो. त्यावेळी ‘मरियमम्मन’ पूजा आयोजित करून त्या पूजेदरम्यान हे नृत्य सादर केलं जातं.

वर्णव्यवस्थेचा शाप असणाऱ्या आपल्या देशात लोककलाही जातींशी निगडित राहिल्या आहेत. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार समाजातील अभिजनवर्गाने स्वीकारला आणि त्याचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. ते भाग्य करकट्टमला लाभलं नाही. काही हजार वर्षं इतकी जुनी असणारी ही लोककला मरीअम्माशी निगडित आहे आणि मरीअम्मा ही वर्णव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या लोकांची, कृषी क्षेत्राशी निगडित असणारी देवता असल्याने ती देवता आणि तिची उपासना पद्धतही महत्त्वाची मानली गेली नाही. करकट्टम म्हटलं की, उच्च वर्ण नाक मुरडत असे. ज्यामुळे ही कला विशिष्ट स्तरातल्या वर्गापुरतीच मर्यादित राहिली. (आपल्याकडेही गजी नृत्य हे धनगर समाजापर्यंतच मर्यादित राहिलं. लावणी हा नृत्यप्रकार एके काळी विशिष्ट वर्गापुरताच मर्यादित होता.) लोकनृत्यांना हीन भावनेने बघत गेल्याने त्या नृत्याचा झालेला तोटा म्हणजे त्याचं झालेलं बाजारीकरण, हरवलेलं मूळ स्वरूप, अश्लीलतेचा झालेला शिरकाव, इत्यादी. (महाराष्ट्रातील लावणी हा नृत्यप्रकारही सध्या याच समस्येला तोंड देतो आहे.) पूर्वीचा साज-शृंगार बाजूला जाऊन आज करकट्टम अश्लीलता आणि बीभत्सतेच्या दिशेने सरकत आहे. या नृत्याच्या सादरीकरणामध्ये आता ‘एजंट’चा शिरकाव झाला आहे. हे एजंट कलाकारांना ‘गर्दी’च्या मागणीनुसार कला सादर करण्यासाठी दबाव टाकतात. यात कार्यक्रमादरम्यान अश्लील चाळे करून गर्दीकडून हशा वसूल करणं, महिलेला किंवा महिलेच्या रूपातील पुरुषाला / मुलाला एक सेक्स ऑब्जेक्ट म्हणून वागणूक देणं. यातून कार्यक्रमात बघ्यांची गर्दी वाढते, पण त्यातून या कलेचं मूळ स्वरूप हरवतं आहे. या वाढत्या बाजारीकरणावर चेन्नई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली गेली. कोर्टाने यावर चिंता व्यक्त करत या कार्यक्रमाच्या बदलत्या स्वरूपावर आक्षेप व्यक्त केला आणि या ‘पारंपरिक नृत्याच्या सादरीकरणात अश्लीलता रोखणं आवश्यक असल्याचं’ सांगितलं. त्याचबरोबर ‘प्रशासनानं यात लक्ष घालावं’ असे निर्देशही दिले. कार्यक्रमात कुणीही दारू पिऊन बीभत्सतेचं प्रदर्शन करणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं. यावरूनच या नृत्याचं मूळ स्वरूप किती बदललं आहे हे लक्षात येतं. 

बदलत चाललेले करकट्टम 

करकट्टममध्ये मागील एका मोठ्या कालावधीमध्ये एक बदल घडवून आणला गेला आहे. पूर्वी जे नृत्य स्त्रिया करायच्या, ते नृत्य आता कोवळ्या तरुण मुलांकडून करून घेतलं जातं. (यावरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील ‘बच्चा बाजी’ हा प्रकार आठवतो. तिथेही कलेच्या नावाखाली, मुलांना केस वाढवून मुलींसारखे हावभाव करत नृत्य करावं लागतं. पण हा प्रकार आणि करकट्टम यांच्यात फरक आहे. ‘बच्चा बाजी’मध्ये मुलं मुलींचे कपडे घालत नाहीत.) कोवळी मुलं जिथं जिथं या पद्धतीने बाजारात आणली जातात, तिथं तिथं ‘शोषण’ हा शब्द आपसूक येतो. त्याला या कलेतही अपवाद नाही. जोपर्यंत वय कोवळं आहे, कातडीला सुरकुत्या नाहीत; तोवर या मुलांची बाजारात मागणी राहते. एका ठरावीक टप्प्यानंतर या मुलांचं नावीन्य संपलं की, आपसूक मुलांना एजंट म्हणेल त्या मानधनात नाचावं लागतं. कारण त्यांना दुसरा पर्याय नसतो.

उत्तर भारतात कथक हे नृत्य मनोरंजनाचं साधन म्हणून विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित राहिलं. ज्याची प्रतिक्रिया म्हणून ठाकूर भिकारीदास यांनी ‘लौन्डा नाच’ हा पारंपरिक नृत्यप्रकार मुख्य प्रवाहात लोकप्रिय केला. त्याचप्रमाणे, तामिळनाडूमध्ये कदाचित मोठमोठ्या देवळांत आणि व्यासपीठावर ‘भरतनाट्यम’ सादर केलं जायचं, त्याला पर्याय म्हणून ‘करकट्टम’मध्ये मुलांनी मुलींच्या वेशात नृत्य करून मनोरंजन करण्यास सुरुवात झाली असावी. नृत्य करणाऱ्या कलाकारांना पुष्कळ प्रवास करावा लागतो. त्यामुळे सादरीकरणामध्ये महिलांऐवजी कोवळी मुलं उत्तम पर्याय ठरवली गेली असावीत.

करकट्टमची सद्य परिस्थिती पाहता अशी चिंता वाटते की, लोककलांचा प्रवास जर असाच चालू राहिला; तर कदाचित त्यांचं मूळ स्वरूप भविष्यात कुणालाही माहीत नसेल. लोककला या नेहमीच ‘शेती-माती’शी निगडित राहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांत अघळपघळपणा असणं स्वाभाविक आहे. तो गृहीत धरायला हवा, मात्र त्याचं स्वरूप बीभत्सपणाकडे सरकणार नाही याची काळजीही घ्यायला हवी. या कला मूळ स्वरूपात टिकल्या, तरच भविष्यातील पिढीला आपल्या मूळ संस्कृतीची ओळख राहील...

-   शशिकांत हिवरकर
h.shashi43@gmail.com  


हेही पाहा : 

 

Tags: karkattam tamilnadu mariamma shashikant hivarkar lawani launda naach pa ranjith mari selvaraj लोककला तामिळनाडू मारी सेल्व्हराज शशिकांत हिवरकर Load More Tags

Add Comment