दैवी लता अन् सुदैवी आपण!

लतादीदींच्या वाढदिवशी त्यांच्याच अनवट गाण्यांची सुरेल भेट...

28 सप्टेंबर 1929 ही तारीख भारतरत्न स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची जन्मतारीख म्हणून अवघ्या भारताला माहीत आहे. लतादीदी यंदा 95 वर्षांच्या झाल्या असत्या. त्यांच्या स्वरांना मात्र वय नाही, मृत्यूचंही भय नाही. त्यांच्या काही अवीट गोडीच्या पण कमी ऐकल्या गेलेल्या अनवट गीतांची आठवण करून देणारा हा लेख त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध करत आहोत. या सर्व गाण्यांच्या शब्दांवर क्लिक केल्यास ते गाणे ऐकताही येईल, जेणेकरून चाहत्यांसाठी दीदींचा जन्मदिवस त्यांच्या मधुर स्वरांनी सुरमय होईल.

साधारण वीस एक वर्षांपूर्वी गुलजार आणि विशाल भारद्वाज यांनी लताच्या आवाजात एक गाणे ध्वनिमुद्रित केले होते. दुर्दैवाने ते गाणे कोणत्याही चित्रपटामध्ये घेण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वी जेव्हा लताचे निधन झाले, त्या वेळेस विशाल भारद्वाजला या गाण्याची आठवण झाली. त्याने खूप शोधले, जिथे ध्वनिमुद्रित केले होते त्या कंपनीलाही विचारले, पण ते मिळाले नाही. अचानक एके दिवशी त्या कंपनीचा विशाल भारद्वाजला फोन आला की, ‘तुमची एक टेप आम्हाला आवराआवर करताना सापडली आहे, ती घेऊन जा. अथवा आम्ही ती भंगार सामानात टाकून देणार आहोत. कारण आम्ही कंपनी बंद करत आहोत.’ धावत धावत विशाल भारद्वाज तिथे गेला. टेप व्यवस्थित होती. त्याने ती वाजवून (चालवून) पाहिली. आणि काय आश्चर्य, त्यात ते लताचे गाणे होते. मग त्याने त्याचे पुन्हा नव्याने संगीत बनवले. लताचा आवाज तसाच ठेवला (निलाद्रीकुमार यांनी त्यात सतार वाजवली आहे) आणि लता गेल्यावर हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले. गाण्याचे बोल आहेत – ‘सब ठीक तो है लेकिन कुछ ठीक नही लगता…’ 

जणू काही माझ्या आणि सर्व भारतीयांच्याच भावना लता गाऊन सांगत होती. कारण तिच्या निधनानंतर माझीच नाही तर, अनेकांची ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ अशीच भावना आहे. 28 सप्टेंबरला लताचा जन्मदिवस असतो, म्हणून तिची जी काही खास, अनवट आणि एक टक्का लोकांनीही ऐकली नाहीत अशी गाणी आणि त्यातील उच्चार यांबद्दल काहीतरी लिहावे असे मनात आले, म्हणून हा लेखनप्रपंच.

के. महावीर हे मोठे संगीतकार होते. किती मोठे तर, पं. हृदयनाथ मंगेशकर हे स्वतः किती मोठे संगीतकार/गायक आहेत हे आपण जाणतोच, तर हृदयनाथ मंगेशकर यांच्या दृष्टीने के. महावीर म्हणजे फार मोठा विषय आहेत. के. महावीर हे काय नव्हते? ते जयपूर घराण्याचे उत्कृष्ट गायक होते, ते तबला आणि हार्मोनियम उत्कृष्ट वाजवायचे, ते उत्तम कथ्थक नर्तक होते. त्यांचे नावच मुळी ‘महावीर कथ्थक’ असे होते. तर असे विलक्षण प्रतिभावंत के. महावीर; त्यांनी लताकरिता चार सर्वोत्तम गाणी केली. इतरांना दुर्लभ असलेली लता त्यांच्याकडे गायला नेहमी तयार असायची. त्यांनी तिच्याकरिता केलेल्या चार गाण्यांपैकी दोन गजलही आहेत. अतिशय अद्भुत आणि सुरेल अशी ही चार गाणी म्हणजे रत्ने आहेत, जी दुर्दैवाने खूप कमी जणांनी ऐकली असतील. 
1. आँखसे आँख मिलाता है कोई... 
2. अहदे गम में मुस्कुराते हैं... 
3. सांझ भयी घर आजा रे पिया... 
4. आज की रात न जा न जा रे...

यातील ‘आँखसे आँख मिलाता है कोई, दिल को खिंचे लिये जाता है कोई’ हे गाणे ऐका. यात लता आँखचा उच्चार ‘आंख्ख’ असा जो करते, तो निव्वळ जीवघेणा आहे. ही गझल शकील बदायुनी यांनी लिहिली आहे. यातील हैरत, करिश्मासे, मिलाता या शब्दांना गाताना जसे लांबवले व जशी आवाजातील फिरत आहे, ते ऐकून आपली ब्रह्मानंदी टाळीच लागते.

अहदे गम में मुस्कुराते हैं’ हीपण गजल अशीच सर्वांगसुंदर आहे. यात सुरुवातीचा जो आलाप आहे, तो अतिशय गोड आहे, आणि मनाला मुग्ध करून जातो. गजलचा अर्थच मुळी माणसाने दुःखातही हसले पाहिजे असा आहे, त्यामुळे यात लता भन्नाट सुटली आहे. मुस्कुराते, आसूओंके, किसलिये, गममें, टकराकर या साध्यासुध्या शब्दांना ती ज्या प्रकारे ताना, फिरत आणि मुग्धपणे गाते, ते ऐकून कासावीस झालेला आपला जीव चांगलाच थंडावतो.

सांझ भयी घर आजा रे पिया’ हे नितांतसुंदर असे गीत आहे. हे गीत लता ज्या हळुवारपणे, अलगदपणे, मुग्धपणे, हुरहुरणाऱ्या स्वरांमध्ये म्हणते, ते ऐकण्यासारखेच आहे. 

आज की रात न जा’ हे गीतसुद्धा एक बंदा रुपया आहे. यातील आर्जव ती ज्या प्रकारे आपल्या आवाजातून व्यक्त करते, ते काबिले तारिफ आहे. यात न जा, आज की रात, नदी आगसी, है घुटी, ना सता, झुक या सहज सोप्या शब्दांना ती ज्या प्रमाणे खेळवते, ते फक्त तीच करू शकते. 

ही चारही गाणी के.महावीर यांनी तंबोरा, तबला, सतार आणि सारंगी ही चारच वाद्ये घेऊन तयार केली आहेत. (एका गाण्यात मात्र सोबतीला व्हायोलिनही आहे.) ‘सुतावरून स्वर्ग गाठणे’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, तसेच त्यांनी प्रत्येक गाण्यात दोन-तीन वाद्ये आणि लता यांच्या साथीने सुरांचा स्वर्गच गाठला आहे. 

वनराज भाटिया हे एक असेच अवलिया संगीतकार होते. त्यांचा सिंफनीवर आणि वेस्टर्न क्लासिकल म्युझिकवर खूप जोर असायचा. त्यांना प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण अशी हवी असे. त्यांच्यासोबत लताने एक गाणे गायले आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘तरंग’. रघुवीर सहाय हे या गीताचे कवी आहेत. कुमार सहानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. गीताचे बोल आहेत, ‘बरसे घन सारी रात, संग सो जाओ, प्रियतम आओ.’ 

या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात जसे सुंदर शब्द आहेत, तसेच ‘अंतिम सिसकी, मधुर समर्पण’ असे अनवट शब्ददेखील आहेत. परत मुखडा, पहिला अंतरा, दुसरा अंतरा या तिन्ही चाली वेगळ्या आहेत. गाणाऱ्याचे संपूर्ण कसब यात पणाला लागते. वनराज भाटियांवर पाश्चात्त्य सिंफनीचा प्रभाव होता व ते त्यात मास्टर होते. मला तर वाटते, ज्या वेळेस हे गीत लताकडून गाऊन घ्यायचे असे ठरले, त्यानंतर वनराज भाटियांनी चाल जितकी अवघड आणि व्यामिश्र करता येईल, तितकी केली. सुरुवातीला तंबोरा, सारंगी आणि मध्ये किंवा मागे सिंफनीच्या अंगाने जाणारा भरदार असा स्वरमेळ वापरला आहे. खरे तर हे सगळेच गाणे उंच स्वरात आहे. फक्त एकदाच लता खालचा आवाज लावते व आपण अचंबित होतो. एक रिहर्सल व फक्त एक टेक व गाणे ओके झाले. ध्वनिमुद्रण झाल्यावर आपले गाणे कसे झाले हे ऐकण्यासाठी ती कधीच थांबत नसे. पण हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यावर ती थांबली. तिने भाटियांना ते ध्वनिमुद्रण लावण्यासाठी सांगितले, ते ऐकले आणि नंतर ती निघून गेली. विशेष म्हणजे या गाण्याचे पैसेही तिने घेतले नाहीत. 

वनराज भाटियांनी नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘लता म्हणजे संगीतकारांसाठी देवदूत आहे. मी जसे गाणे तयार केले होते, ते तर तिने तसेच आणि उत्तम गायलेच; पण त्या गाण्यामध्ये तिने स्वतःचीही अशी भर घातली की, मी आश्चर्यचकित झालो व हे मला आधीच कसे सुचले नाही असे वाटले. (बहुधा यात लता एकदा खालचा असा काही जीवघेणा स्वर लावते, त्या बाबतीत ते म्हणत असावेत.) 

सलील चौधरी माझे आवडते संगीतकार. त्यांनीही लताकरिता उत्तम, अवघड, गोड, तार स्वरातली व एकदम खालच्या स्वरातली अशी अनेक अजोड गाणी तयार केली. हिंदीएवढीच बंगाली गाणीही त्यांनी तिच्याकडून गाऊन घेतली. त्यांनाही सिंफनी (ऑपेरा)चे खूप आकर्षण होते. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये जो भरगच्च आणि प्रवाही वाद्यमेळ दिसतो, ते त्याचेच प्रतीक आहे.
तर त्यांचे ‘माया’ या चित्रपटामध्ये एक गाणे आहे, जे द्विजेन मुखर्जी आणि लताने गायले आहे. (हे लताने सोलोही गायलेले आहे) गाण्याचे बोल आहेत, ‘ऐ दिल कहाँ तेरी मंजिल.’ - तर हे संपूर्ण गाणे द्विजेन मुखर्जींनी गायले आहे व लता त्यात फक्त आलापी गाते. पण ती आलापी जर तुम्ही ऐकलीत, तर तुमचा कानांवर विश्वास बसणार नाही, हृदयाची धडधड वाढेल व जे आत्तापर्यंत तिच्या स्वरात ऐकले नाही आणि जे कोणालाही जमणार नाही, असा चमत्कार ती करते. ऑपेरा सिंगर जशा गातात, तशाच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक भरदार, वजनदार, तार सप्तकात जे काही ती गाते, ते या जगातले नाही असे खात्रीने समजा. हे एकच गाणे तिच्या गळ्याची अद्भुत रेंज आणि करामत दाखवते. हे लिहितानाही माझ्या हृदयाचे ठोके मला ऐकू येत आहेत. 

अशी अनेक गाणी आहेत, जी लताने जीव ओतून गायली आहेत, पण जास्त रसिकांनी ती ऐकली नाही. त्याबद्दल खूप काही लिहिता येईल किंबहुना त्यावर जास्त किंवा काहीच लिहिले गेले नाही. उदाहरणार्थ - 
1. ‘लिबास’ चित्रपटातील ‘सिली हवा छू गयी.’ 
2. ‘सती सावित्री’मधील गोड आणि मधुर ‘जीवनडोर तुम्ही संग बांधी.’ 
3. ‘कभी कभी’ चित्रपटातील भारदस्त आणि भावनेने ओथंबलेले ‘सुर्ख जोडे की ये जगमगाहट.’ 
4. ‘मैं तुलसी तेरे आंगन की’मधील आशाबरोबर गायलेले अतिउंच स्वरातील ‘छाप तिलक सब छिनी रे.’ 
5. ‘जमीं आसमान’मधील पंचमचे सुंदर ‘ऐसा समाँ ना होता.’ 
6. ‘शंकर हुसेन’ चित्रपटामधील खय्याम यांनी संगीतबद्ध केलेले अतिशय तरल असे ‘आंप यूँ फासलोंसे गुजरते रहे.’ 
7. लताच्या ‘श्रद्धांजली’ अल्बममधील तिने थरथरत्या स्वरात गायलेले के.एस.सैगलचे ‘मैं क्या जानू क्या जादू है.’
8. ‘तराना’ चित्रपटातील सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले, लताच्या कोवळ्या आवाजातील व मनाला हुरहुर लावणारे ‘बेईमान तोरे नैनवा निंदिया ना आये.’
9. ‘बरसात की एक रात’मधील पंचमने स्वरबद्ध केलेले व लताने ठसक्यात गायलेले प्रेम गीत ‘हाय हाय वो परदेसी, मनमें हो हो कौन दिशा से आ गया’ आणि यातीलच अतिशय मधुर असे ‘नदियाकिनारेपे हमरा बगान , हमरे बगानोंपे झूमे आसमान’ 
10. जगजीत सिंह यांनी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर (लताच्या) ‘सजदा’ नावाचा अल्बम लतासोबत केला होता. त्यामधील ‘दर्द से मेरा दामन भर दे’ आणि ‘मेरी तसवीरमें रंग और किसी का तो नही’ ही दोन लताची गाणी, तिने वयाच्या सत्तरीमध्ये अतिशय मनापासून गायली आहेत. 
11. भारतामध्ये ज्या वेळेस, साधारण 1982 मध्ये एशियाड खेळ संपन्न झाले होते, त्या वेळेस लताने हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात ‘आकाशके उस पार भी आकाश है’ हे मस्त असे गाणे गायले होते. 
12. जावेद अख्तरांच्या गजलांचा एक ‘सादगी’ नावाचा अल्बम लताने काढला होता. त्यातील ‘अंधे ख्वाबोंको उसूलोंका तराजू दे दे’ ही भग्न हृदयाची व्यथा तिने समरसून गायली होती.


हेही वाचा: मीरेचा स्वर: लता (मॅक्सवेल लोपीस)


अशी अनेक गाणी आहेत, जी तिच्या इतर गाण्यांपेक्षा कमी ऐकली गेली आहेत. म्हणून मला यावर लिहावेसे वाटले. तीनही सप्तकांत फिरूनही आवाजाच्या प्रतीवर कोणताही ताण न जाणवणारी ती एकमेव गायिका आहे. तिने 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. या भाषांमध्ये डच, रशियन, फिजी, स्वाहिली आणि इंग्रजी या भाषांचाही समावेश आहे. शिवाय तिला हिंदी, उर्दू, पंजाबी, डोंगरी, आसामी आणि बंगाली या भाषाही उत्तम येत असत. 36 भाषा तर सोडा, पण आपल्या मातृभाषेसोबतही आपला 36 चा आकडा असतो!

स्त्रीशक्तीसारखी दुसरी कोणती शक्ती नाही, हे नीतीवचन लताने वेगळ्या अर्थाने मतलबी चित्रपटसृष्टीवर सत्तर वर्षे राज्य करून सिद्ध केले. संगीतकारांना जे हवे, त्यापेक्षा ती नेहमी दुप्पट-तिप्पट देत होती. त्यामुळे तिचे ध्वनिमुद्रण वेळेवर झाले नाही, तर नायक, नायिका, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक, रेकॉर्डिंग स्टुडिओ सर्वांचीच कामे ठप्प होत. 
लताने गाणे कसे गायला हवे, त्याचे उच्चार कसे हवे, त्यात भावना कशा ओतायच्या हे सर्वांना शिकवले. म्हणून आज जो किंवा जी कोणी गायक-गायिका तिचं गाणं म्हणतात, ते ऐकताना आपल्याला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. कारण तिचे उच्चार, भावना, लय, मींड, तान, हरकत सर्व ती सोबत घेऊन गेली आहे. एखादा प्रेमात पडला तर त्याला जसे त्याच्या प्रेयसीच्या डोळ्यात जग दिसते, तसेच लताच्या उच्चारांत सर्व जग सामावलेले आहे.

पं. अजय चक्रवर्ती एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, ‘लताजीने शास्त्रीय संगीत नहीं गाया और उससे शास्त्रीय संगीत का सबसे बडा नुकसान हुआ है.’ यावर अधिक भाष्याची गरज नाही. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मनमोहन देसाई नेहमी म्हणायचे, ‘अरे, मला फक्त लता द्या रे, मी तुम्हाला हिट चित्रपट देतो.’

मी लताचा एकेरी उल्लेख केला आहे, कारण आपण देवाला, आईला अरे-तुरेच करतो ना! लता गेल्यापासून मात्र मी अस्वस्थ झालो आहे. ‘देव नाही देव्हाऱ्यात’ अशी अवस्था झाली आहे. कारण लता म्हणजे माझ्या दृष्टीने सर्वस्व होते, जे देवाने न मागता मला दिले होते व न सांगताच ते परत घेतले. - ‘तुम्ही पे सब शुरू और तुम्ही पे सब खतम.’ अर्थात, दैवी स्वरांच्या रूपात लता तर कालही सोबत होती, आजही सोबत आहे व उद्याही सोबत असेलच हा विश्वासही आहे. मन भावनांचे असे हेलकावे घेत असतानाच गुलजारांच्या शब्दात मी निरोप घेतो, 
‘दिल अब पहले सा मासूम नहीं रहा
पत्थर तो नही बना, पर अब मोम भी नहीं रहा.’

- योगेश वसंतराव भोसे
9423790027

पाथर्डी, अ.नगर
(लेखक संगीताचे अभ्यासक आहेत.)

Tags: lata mangeshkar lata songs lata mangeshkar songs vanraj bhatia salil chowdhury hridaynath mangeshkar k mahaveer Load More Tags

Comments:

हेमंत कर्णिक

तराना या चित्रपटाचं संगीत सी रामचंद्रचं नव्हतं. अनिल विश्वासचं होतं.

Rucha Mulay

चुकून लेकिन चित्रपट असे म्हणाले, लिबास मधील "सिली हवा " हे गाणे असे वाचावे.

Rucha Mulay

लेख खूप छान जमून आला आहे. अशी स्वर्गीय गाणी कमी का ऐकली गेली असतील असा प्रश्नच पडला. लेकिन चित्रपटातले 'सिली हवा छू गयी' हे यापैकी त्यातल्या त्यात सर्वाधिक लोकप्रिय झालेले गाणे असावे. बरीचशी गाणी माहीत होती, पण वणाराज भाटियांचे प्रथमच ऐकले. आणि के. महावीरांची चारपैकी दोन गाणीही प्रथमच ऐकली. ही गाणी सहजपणे अनेकांच्या 'प्लेलिस्ट' चा भाग नसावीत. मात्र त्यांचे स्वरसौन्दर्य अगदी वादातीत आहे. गाण्यांविषयी मोजकेच पण नेमके लिहिलेत तेही छान आहे. आल्हाददायक लेख.

Nikhil gadgil

अप्रतिम लेख आणि महत्वपूर्ण माहिती. गाणी तर फारच सुंदर आहेत. ही गाणी पूर्वी ऐकलीच नव्हती, त्यामुळे वेगळ्याच लताबाई अनुभवता आल्या. स्वरसम्राज्ञीला आदरांजली !!

अरविंद व्यं. गोखले

लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर आणि त्याही आधीपासून मी त्यांच्यावरील अनेक लेखांची पारायणे केली आहेत. मीही त्यांचा जबरदस्त चाहता होतो आणि आहे. मी पूर्वी संगीतावर लिहित होतो, आजच्या संगीतावर लिहिण्याची बिशाद नाही. मी योगेश भोसे यांचा हा लेख वाचताना थोडासा चाचरत होतो. हल्ली माणूस कितीही मोठा असला आणि मानाने उंच असला तरी त्याचे मूर्तीभंजन झालेले नाही ना, हे मी आधी पाहतो. तसे ते नाही याची खात्री झाली, नव्हे इतका सर्वांगसुंदर लेख मी गेल्या कित्येक वर्षात वाचलेला नाही. खरोखरच अनवट गाण्यांची मैफल जमून यावी तसा हा लेख उत्तम जमलेला आहे. त्याबद्दल योगेश यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. लता दीदी मला प्राणाहून श्रेष्ठ होत्या. शतकाशतकांमध्ये अशी एखादीच व्यक्ती जन्माला येते तशा त्या होत्या. योगेश यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या अनेेक गाण्यांची उकल केलेली आहे तिला तोड नाही. आपण ती गाणी त्याची लिंक देऊन अधिक सजग केली आहेत. काय गाणी आहेत आणि काय लेखन आहे, असे वाटावे इतका हा सर्वोत्तम लेख आहे. पाथर्डीसारख्या गावात (असे मी म्हणतो तेव्हा त्या गावाला कमी लेखायचे नसते, मीही सांगलीतून आलेला आणि प्रथमदर्शी गावंढळ वाटावा असाच होतो) राहून अशी समीक्षा करता येणे हे त्यांचे कर्तृत्व आणि आमच्या सारख्या वाचकांचे भाग्य. मला योगेश भोसे यांचे कौतुक वाटते ते यासाठी तर आहेच, पण त्यांच्या रसग्रहणाला आणि रसात्मकतेला जेवढी दाद द्यावी तेवढी थोडीच आहे. काय लेख आहे, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे आणि हा लेख या वर्षातला सर्वोत्तम लेख आहे. तो दिवाळी अंकात शोभला असता पण तो इथेच घेतला हे अधिक चांगले झाले, त्यानिमित्ताने तो अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तो व्हॉट्सअॅपवर आल्याने तो अनेकांना वाचता आला असावा. कर्तव्य साधनाने हा दिलेला धक्का या वर्षातला सुखद यात शंका नाही.

Add Comment