डॉ. आंबेडकरांच्या चिरकालीन प्रेरणेचा परिणाम

दुर्दैवाने भारतातील आदिवासींकडे मात्र या कुवतीचा नेता निर्माण होऊ शकलेला नाही

भारतीय संविधानाने दोन समाजघटकांना उपेक्षित आणि वंचित म्हणून मान्यता दिली आहे. ज्यांना रोजच्या भाषेत दलित म्हणून ओळखले जाते, त्या अनुसूचित जाती (Scheduled Castes) आणि ज्यांना सामान्यतः आदिवासी म्हणून ओळखले जाते, त्या अनुसूचित जमाती (Scheduled Tribes) यांचा त्यामध्ये समावेश होतो. या दोन्ही घटकांमध्ये अतिशय अंतर्गत वैविध्य आहे. ज्यात भाषा, जात, वंश, धर्म आणि उपजीविकेची साधने यातील विविधतेचा उल्लेख आपल्याला करता येईल. आंध्रप्रदेशमधील ‘मडीगा’ जातीतील एक गृहस्थ आणि उत्तरप्रदेशमधील एक ‘जाटव’ जातीतील गृहस्थ या दोघांत फक्त इतकीच समानता असते की, दोघेही सरकारी नोकरीसाठी ‘एस.सी.’ कोट्यातून अर्ज करू शकतात. अगदी याच प्रकारे तमिळनाडूच्या निलगिरी डोंगररांगेत राहणाऱ्या ‘इरुला’ आणि मध्यप्रदेशच्या महादेव डोंगररांगेत राहणाऱ्या ‘गोंड’ जमातीमध्ये फक्त इतकीच समानता आहे की, दोघेही सरकारी नोकरीसाठी ‘एस.टी.’ कोट्यातून अर्ज करू शकतात.

पण वरील बाब सोडता संपूर्ण भारतातील दलितांना- मग ते केरळमधील असतील किंवा कर्नाटकातील, पंजाबमधील असतील किंवा पश्चिम बंगालमधील – त्या सर्वांना एकत्र आणणारी बाब म्हणजे, त्यांच्या समोरील महान बी. आर. आंबेडकरांचा आदर्श. आंबेडकरांजवळ अफाट बुद्धिमत्ता होती आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाची राजकीय पदे भूषवलेली होती. असे असूनही त्यांच्या जीवनकाळात त्यांना मुख्यत्वे फक्त त्यांच्या जातीचा, म्हणजे महाराष्ट्रातील महार जातीचाच पाठींबा होता. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र संपूर्ण देशभरातील दलितांचे ते आदर्श बनले आहेत. या उलट आदिवासींना मात्र भौगोलिक आणि भाषिक सीमा ओलांडणारा आंबेडकरांच्या तोडीचा नेता लाभलेला नाही.

दलितांमध्ये आंबेडकरांविषयी असणारा आदर मला फार पूर्वीपासूनच माहित होता आणि त्या बाबीने मला नेहमीच प्रभावित केले आहे. ‘जग बदल घालुनि घाव’ हे मूळ मराठी मध्ये लिहिलेले आणि जेरी पिंटो यांनी इंग्रजी भाषेत अतिशय सुरेख अनुवादित केलेले एकनाथ आवाड यांचे आत्मचरित्र वाचताना हीच बाब मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. आवाड यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील एका मांग जातीतील कुटुंबात झाला. पण शिक्षण घेण्याविषयीची त्यांची तळमळ पाहून तरुणपणी त्यांचे नातेवाईक त्यांना ‘महाराची अवलाद’ म्हणू लागले. कारण स्वतः महार कुटुंबात जन्मलेल्या आंबेडकरांनी, ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जे प्यायल्यानंतर तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असा संस्मरणीय संदेश दिला होता. 

आपल्या माध्यमिक शाळेत एकनाथ आवाडांनी आंबेडकरांचे साहित्य अतिशय बारकाईने वाचले. आणि त्याचबरोबर एकेकाळी प्रेरणादायी असलेले पण आता दुर्दैवाने विस्मरणात गेलेले समाजवादी आणि तेव्हा खासदारही असलेले- बॅरिस्टर नाथ पै यांची भाषणे आवाडांनी अतिशय आवडीने ऐकली. सत्तरीच्या दशकात आवाड जेव्हा वयात येत होते, तेव्हा ‘दलित पँथर’च्या विचाराने आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यासाठी सुरु झालेल्या नामांतराच्या चळवळींनी त्यांना अत्यंत प्रभावित केले. यातील विद्यापीठ नामकरण चळवळीविषयी आवाड लिहितात, ‘एखाद्या दिवशी नामकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला तर दुसऱ्या दिवशीच नामकरणाच्या विरोधातही मोर्चा निघत असे. एकामागून एक असे साखळीप्रमाणे मोर्चे निघत होते. शिवसेनेचा नामकरणाला विरोध होता. विद्यार्थी, शिक्षक, वकील, डॉक्टर यांच्यापासून तर सामान्य खेडुतदेखील आपापली बाजू घेत होते.’

नामकरण चळवळीमुळे उच्च जातीचे लोक सुडाच्या भावनेने पेटून उठले होते. त्याविषयीच्या आपल्या आठवणी जाग्या करत आवाड लिहितात, ‘अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महारांना लक्ष्य केले जात होते. मराठवाड्यातील किमान 180 गावांना या प्रकारच्या हिंसेचा सामना करावा लागला. या दंगली दहा दिवस चालल्या. 18 जागी पोलीस गोळीबार झाला. हजारहून जास्त दलित घरांना आगी लावण्यात आल्या.’  

त्यावेळी कॉलेजात शिकणाऱ्या आवाडांना या संघर्षाने अतिशय प्रभावित केले. ते लिहितात, ‘दलितांच्या विरोधातील हिंसेच्या बातम्या जसजशा माझ्यापर्यंत पोहचत होत्या, तसतसे माझे मन क्रोधाने भरून येत होते आणि मी आणखीनच अस्वस्थ होत होतो. सरकारला विनंतीपत्रे देण्यात आणि अपील करण्यात मी वारंवार सहभाग घेत होतो. माझ्या आईला माझी चिंता वाटू लागली होती कारण, मी एकाच वेळी गावातील अनेकांची नाराजी ओढवून घेतली होती.’

आपल्या जीवनातील सुरुवातीचा गरिबी आणि जातीभेदाविरोधातील संघर्षाचा कालखंड आठवताना आवाड लिहितात, ‘उपेक्षेत कसलाच आनंद नाही. आयुष्यभर जर तुम्हाला अपमान आणि तिरस्कारच सहन करावा लागणार असेल तर अशा आयुष्यात कोणताच आनंद उरत नाही. परंतु जेव्हा मनुष्य आपल्या नियतीशी लढण्यास सुरुवात करतो, अन्यायाविरोधात दंड थोपटून उभा राहतो, तेव्हा जीवन एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देते. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, जीवनातील संघर्ष राग-संताप अशा भावनांचा निचरा होण्यासाठी वाट मोकळी करून देतो. माझ्यासाठी ही एक सवयच होऊन बसली आहे.’ 

सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील महाराष्ट्रातील राजकारणाविषयी आवाड लिहितात, ‘त्यावेळी शिवसेना आणि कॉंग्रेस दोघांचाही दलितांविषयीचा दृष्टिकोन अतिशय विखारी होता. एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा मुंबईस्थित पक्ष म्हणून शिवेसेनेकडे पाहिले जात होते. दुसरीकडे, ग्रामीण भागात शिवसेनेची ओळख ‘हिंदू जातीयवादाचा कडवा अभिमान असणाऱ्या सवर्णांचा पक्ष’ म्हणून होती.’

समाजकार्य या विषयात बी.ए. आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर एकनाथ आवाडांनी उच्च जातीतील एका आदर्शवादी जोडप्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. या जोडप्याच्या समाजवादी विचारांमुळे आवाडांनाही आदिवासी समाजासोबत काम करण्याची प्रेरणा मिळाली. आजच्याप्रमाणे तेव्हाही आदिवासी समाजच सर्वात जास्त उपेक्षित समाज होता. आदिवासी समाजासोबत काम करताना आलेल्या अनुभवावरून आदिवासी आणि दलित समाजाची उद्बोधक तुलना करताना आवाड लिहितात, ‘आदिवासींची कष्ट सहन करण्याची आणि दलितांची संघर्ष करण्याची शक्ती वाखाणण्याजोगी आहे. कोणत्याही क्रांती किंवा सामाजिक चळवळीमध्ये आदिवासी समाज फक्त कुणा नेत्याच्या किंवा समूहाच्या नेतृत्वाखाली, अनुयायी म्हणून सहभागी होतात. त्यांचा स्वतःचा कोणीही नेता नसतो. आजतागायत आदिवासींमधून खचितच कोणी नेता म्हणून समोर आला आहे.'

महाराष्ट्राभर पायपीट केल्यानंतर एकनाथ आवाडांना आपल्या बालपणीच्याच अनुभवांचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आला. त्यांचे असे मत बनले की, त्यांच्या स्वजातीतील लोक आंबेडकरांच्या महार जातीतील लोकांहून अधिक आज्ञाधारक होते. यातून सावरण्यासाठी त्यांनी आपल्या मांग समाजासोबत काम करण्यास सुरुवात केली. मांग समाजातील लोकांना आपले पारंपारिक काम सोडून आधुनिक शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांचे आत्मचरित्र त्यांनी सहभाग घेतलेल्या विविध सामाजिक लढ्यांचा लेखाजोखा मांडते. यातील काही लढे यशस्वी ठरले तर काहींच्या पदरी अपयश आले. आपल्या प्रौढ जीवनाच्या आठवणी केवळ घेराव-मोर्चा यामध्ये आकंठ बुडाल्याच्या आणि सरकारी कार्यालये आणि पोलीस स्टेशनात नेहमीच उपस्थित असण्याच्या होत्या, असे आवाड नमूद करतात. ते लिहितात की, जातीय अत्याचाराचा बळी ठरलेल्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी छेडलेल्या संघर्षामुळे प्रत्येक गावात त्यांचे शत्रू निर्माण झाले होते. आणि हत्येच्या धमक्यादेखील येऊ लागल्या होत्या. 

एकनाथ आवाडांचे हे आत्मचरित्र इंग्लिश मध्ये ‘स्ट्राईक अ ब्लो टू चेंज द वर्ल्ड’  या शीर्षकाखाली प्रकाशित झाले आहे. उत्तम साहित्यमूल्य असलेले हे चरित्र, समाजशास्त्रीय अंतर्दृष्टीचाही उत्तम नमुना आहे. या चरित्रामध्ये आवाडांच्या सहयोगी कार्यकर्त्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांची (विशेषतः त्यांच्या पत्नीची) तरल व्यक्तीचित्रणे आली आहेत. याचबरोबर हे चरित्र सामाजिक न्यायाची साथ करणाऱ्या आणि त्याची प्रगती रोखू पाहणाऱ्या या दोन्ही मनुष्यवृत्तीची मीमांसा देखील करते. आपल्या चरित्रात आवाड लिहितात, ‘अस्पृश्यतेचा प्रश्न काही दलितांना केवळ अन्न देऊन आणि त्यांच्यासाठी सिमेंटची पक्की घरे बांधून सुटणार नाही. त्यांच्यातील स्वाभिमान जागृत करणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे.’ मांग जातीतील एका ठेकेदाराच्या मुजोरीची एक घटना नमूद करताना आवाड लिहितात, ‘मनुष्याची जात कुठलीही का असेना, थोडीशी जरी सत्ता त्याला प्राप्त झाली - भले मग ती सामान्य उसतोड मजुरांवरसुद्धा असली तरी त्या माणसाकडे लागलीच उद्धटपणा येतो!’

कार्यकर्ता म्हणून आपली कारकीर्द सुरु केल्यानंतर आलेल्या अनुभवाविषयी आवाड लिहितात, ‘माझा जन्म मांग जातीतील असल्यामुळे मुख्य दलित पक्षांकडून मला सावत्रपणाची वागणूक देण्यात आली. जणू काही बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरण्याचा अधिकार फक्त एकाच जाती साठी मर्यादित करण्यात आला होता. बाबासाहेबांची ओळख फक्त एका जातीसाठी मर्यादित करणे मला स्वतःला योग्य वाटत नव्हते. ‘अशा परिस्थितीत आंबेडकरांच्या महान कर्तृत्वाची ओळख इतर सामाजिक घटकांपर्यंत पोहोचवण्यात आणि फक्त महारच नव्हे तर मांग समाजात आणि अनेक सवर्ण व्यक्तींमध्येही आंबेडकरांना प्रेरणेचे प्रतिक बनवण्यात आवाडांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

सत्तरीच्या दशकात जेव्हा आवाड लहानाचे मोठे होत होते तेव्हा मराठवाड्यातील सवर्ण समाज आंबेडकरांच्या नावे विद्यापीठाचे नामांतरण करण्यास विरोध करत होता. या घटनेच्या अनेक वर्षांनंतर आवाडांनी आंबेडकरांच्या पत्नी- रमाबाई यांच्या नावे एक सहकारी संस्था काढून ती यशस्वीरित्या चालवली. या सहकारी संस्थेत विविध जातींमधील महिलांनी सहभाग घेतला. या सहकारी संस्थेद्वारे मच्छीमार, गुराखी आणि बांगड्या बनवणाऱ्यांना त्यांच्या वस्तू कोणत्याही मध्यस्थाशिवाय योग्य बाजारभावाने विकण्यास मदत करण्यात येत होती. 2010 पर्यंत जवळपास 20 लाख लोक या सहकारी संस्थेचे लाभार्थी झाले होते. या गोष्टीच्या सार्थ अभिमानाने आवाड लिहितात, ‘एकेकाळी ज्या गावांनी विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यास पाठींबा दर्शवणाच्या माझ्या कृतीला विरोध केला होता, आज तीच गावे बाबासाहेबांच्या पत्नीच्या नावे चालणाऱ्या पतसंस्थेचा एक भाग बनली होती. यापेक्षा मला आणखीन काय हवे? इतकेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या जिल्ह्यात आता उच्च जातीतील लोकदेखील बाबासाहेबांची जयंती साजरी करू लागले होते. स्वप्नातदेखील ज्याचा कुणी विचार केला नसेल, ती बाब आज वार्षिक कार्यक्रम होऊन बसली आहे.’

बी. आर. आंबेडकरांच्या मृत्यूला सहा दशकांचा काळ लोटला. तरीसुद्धा आजही त्यांचा आदर्श दलितांना शिकण्यास, संघटीत होण्यास आणि संघर्ष करण्यास; त्याचबरोबर जातीभेदाला आव्हान देऊन त्यावर मात करण्यासाठी प्रेरित करतो. कदाचित याहीपेक्षा उल्लेखनीय बाब म्हणजे आंबेडकरांचे नाव आणि त्यांचे उदाहरण अनेक सवर्णांमध्येदेखील आज आदराने घेतले जाते. कदाचित हा आदर काहीशा विलंबाने आणि काहीशा नाईलाजाने आला असला तरी तो सवर्णांना आता राखून ठेवता येऊ शकत नाही. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनंतरदेखील दलित समाज आज त्यांच्याकडे नैतिक, राजकीय आणि बौद्धिक प्रेरणेसाठीचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत म्हणून पाहतो. दुर्दैवाने भारतातील आदिवासींकडे मात्र या कुवतीचा नेता निर्माण होऊ शकलेला नाही, जो त्यांच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठीच्या संघर्षाला प्रेरणा आणि योग्य नेतृत्व देऊ शकेल. 

(अनुवाद: साजिद इनामदार)

-  रामचंद्र गुहा, बेंगळूरू

Tags: Babasaheb Ambedkar एकनाथ आवाड Eknath Awad Ramchandra Guha रामचंद्र गुहा Load More Tags

Comments: Show All Comments

Dattaram Jadhav

दलीत -वंचितांची चळवळ काहींशी मागे पडली आहे असे वाटते. रामचंद्र गुहा यांच्या या लेखाने एकनाथ आव्हाड यांचे आत्मचरित्र वाचण्यास उद्युक्त केले आहे.

Vivek Ghotale

Nice article ,इंग्रजी भाषेत पुस्तक आल्याने राष्ट्रीय पातळीवर जीजांचे काम पोहोचणार आहे.

Rajendra Bhoiwar

एकनाथ आव्हाड यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले तेंव्हाच वाचण्यात आले होते. अनेक आत्मचरित्रापैकी एक खूप चांगले आत्मचरित्र वाटले. त्या आत्मचरित्राची भाषा मराठी असल्यामुळे कमी वाचक मिळाले होते. पण आता त्याचे इंग्रजीत अनुवाद झाल्यामुळे ते आता जगभरातील वाचकांकडून वाचले जाईल. या आत्मचरित्राचे परीक्षण प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा सारख्या अभ्यासकांकडून होणे म्हणजे अधिक चांगले वाटते. खूप चांगली मांडणी करून निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. या अनुवादामुळे जिजा वैश्वीक पातळीवर पोहचतील.

sac

very good lines. it makes me to read that book.

Ravi Jagtap

विचारप्रवृत्त करणारा लेख. Thanks for sharing

लतिका

सुबोध विश्लेषण.

Vishal

Brilliant observations... Very simple solution to serious problem.. Thanks for sharing

Add Comment