मानवतावादी दृष्टिकोनातून आकाराला आलेली 'दृष्टी आरोग्यक्रांतीची'

डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या साधना प्रकाशनाच्या अतुल देऊळगावकर लिखित आगामी पुस्तकाची प्रस्तावना

महाराष्ट्र शशिकांतमुळे आणखी एक उत्तम योजना देशाला देऊ शकला. शशिकांत यांची गावांना निरामय करणारी ‌‘भारतवैद्य‌’  ही योजना, भविष्यात भारत सरकारची ‌‘आशा‌’ योजना म्हणून आकाराला आली. आज गावागावांतील ‌‘आशां‌’नी भारतीय आरोग्यसेवेचा भार पेलला आहे. त्यांच्यामुळे कित्येक आजार गावांतच नियंत्रणात येत आहेत. भारत ‌‘कोविड-19‌’सारख्या महासाथीच्या अरिष्टात तरून जाऊ शकला, ते प्रामुख्याने ‌‘आशां‌’मुळे. त्यांच्या कष्टांचं आणि योगदानाचं मोल करताच येणार नाही.

शशिकांत अहंकारी डॉक्टरच झाले नसते, तर काय झाले असते? किंवा, त्यांना शुभांगीचा सक्रिय सहभाग आणि सहवास लाभला नसता, तर त्यांच्या जीवनाने कसा आकार घेतला असता? आणि, डॉक्टर होऊनही ते या प्रकारच्या; विशेषतः स्त्रियांच्या बाळंतपणाच्या, गर्भपाताच्या, विशिष्ट शारीरिक व्याधींच्या निवारणासाठी रुग्णसेवेच्या कार्यात उतरले नसते तर?

हे प्रश्न तसे अतार्किक वा अनुचितही वाटू शकतील. पण ते असयुक्तिक नाहीत. कारण, शशिकांत यांनी ज्या काळात हे व्रत स्वीकारले, त्या काळात सर्वसाधारण प्रभाव होता वैयक्तिक महत्त्वाकांक्षांच्या मानसिकतेचा. लौकिक यश  प्राप्त करण्यासाठी झटण्याचा, वा अलीकडच्या लोकप्रिय मॅनेजमेंट थिअरीनुसार ‌‘किलर इन्स्टिक्ट‌’ अंगात मुरवून पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, संपत्ती संपादन करण्याचा.

शशिकांत युरोप-अमेरिकेतही जाऊन यशस्वी होऊ शकले असते. त्याच्या मध्यमवर्गीय स्तरावरचे सगळेच त्या प्रवृत्तीचे होते असे नव्हे. त्यांच्यातही अनेक सेवाभावी आणि आदर्शवादी तरुण होते. किंबहुना म्हणूनच, बाबा आमटे, अभय बंग, डॉक्टर आरोळे वा वेगळ्या संदर्भात अरुण लिमये, अनिल अवचट आणि नरेंद्र दाभोळकर यांना सहकारी मिळत गेले. तरीही, शशिकांत अहंकारी यांची कहाणी ही कमालीची असामान्य आणि झपाटून टाकणारी आहे.

अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या या संहितेचे वाचन करताना मला सातत्याने डॉक्टर अल्बर्ट श्वाईट्झरची आठवण येत होती. शशिकांत यांच्या सुमारे 75-80 वर्षे आधी, तत्कालीन सुस्थित जर्मनीत जन्माला आलेल्या अल्बर्टला सुखी समूह जीवनाचे अनेक मार्ग उपलब्ध होते. तो मुळात तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा विद्याथ. पण एकदा बायबल वाचताना त्याला येशू ख्रिस्ताच्या वचनांचा साक्षात्कार झाला. ‌‘दुःखी, आजारी, अशक्त लोकांची सेवा कर. महारोग्यांच्या जखमा स्वच्छ करून त्यांना आधार दे. मरणासन्नांना जीवनदान दे आणि मृत झालेल्यांना मानाने वागव. दुष्ट, विकृत प्रवृत्तींना हटव... तुला हे जीवन न मागता मिळाले आहे. ते तितक्याच मुक्तपणे उपेक्षितांना दे.‌’

आपल्याला हा जणू येशूने दिलेला आदेश आहे, असे मानून अल्बर्टने कमालीचा मागासलेला, उपेक्षित, गरीब आणि कोणतीही सुविधा नसलेला आफ्रिकेचा प्रदेश निवडला. त्याने त्या तुलनेने समृद्ध असलेल्या युरोपमधून आफ्रिकेच्या मागास भागात (विमानसेवा, टेलिफोन, रेल्वे नसताना, कार वा ॲम्ब्युलन्स असे काही नसताना) जायचे ठरवले. त्याने त्याच्या पत्नीसह तेथील लोकांची सेवा, मुख्यतः रुग्णसेवा केली. स्वतंत्र-स्वायत्त हॉस्पिटल्स बांधली आणि सुमारे तीस-पस्तीस वर्षांत एक समांतर रुग्णसेवायंत्रणा उभी केली. विज्ञान, समाजकारण व संगीत, यातही अल्बर्ट रस घेत असे. म्हणूनच त्याने हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याच्या घटनेनंतर अल्बर्ट आइन्सस्टाइन, बर्ट्रांड रसेल यांच्यासोबत जागतिक शांतता चळवळीत भाग घेतला. युरोपात जन्म, अतिशय दुर्गम आणि मागास आफ्रिकेत अनेक दशके रुग्णसेवा आणि तरीही आरोग्यापासून जागतिक शांतता, संगीत आणि इतर कलांपर्यंत, जीवनाच्या सर्व अंगांमध्ये विरघळून जाण्याची क्षमता... हे सर्व कुठून येते?

शशिकांत यांचा हा चित्तथरारक आणि मन हेलावून टाकणारा जीवनप्रवास वाचताना, नेमका हाच प्रश्न माझ्या मनात आला. अतुल देऊळगावकर यांना दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनात परकायाप्रवेश करण्याची विलक्षण कला अवगत आहे. मग ती व्यक्ती कुमार गंधर्व असो, वा लॉरी बेकर, एम.एस. स्वामीनाथन असो, वा महेश एलकुंचवार... तसाच परकायाप्रवेश त्यांनी शशिकांत आणि शुभांगी या दांपत्याच्या आयुष्यक्रमात केला आहे. त्यामुळेच केवळ अणदूर गावच नव्हे, तर अवघा सोलापूर, धाराशिव आणि लातूर परिसर या जीवनक्रमात जिवंत आणि करुण; त्याचवेळेस आशावादाने आणि आत्मविश्वासाने ओथंबलेला असा होतो. गावांतल्या स्त्रियांची दयनीय अवस्था, त्यांच्या वेदना व व्यथा, कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय साहाय्य उपलब्ध नसताना त्या कशा जगतात (वा मरतात) त्याचे हृदयद्रावक चित्र अहंकारी दांपत्याच्या नजरेतून आपल्याला कळते. (म्हणजे तसे वाटते!)

‘आरोग्य व शिक्षण यांना केंद्रस्थानी ठेवणारा विकास आवश्यक आहे‌’, यासाठी अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक आणि डॉ. अमर्त्य सेन 1980-90च्या दशकात आग्रह धरत होते. त्यातून ‌‘मानव विकास निर्देशांक‌’ आकार घेत होता. त्याच काळात शशिकांत अनेक खेड्यांत आरोग्य आणि शिक्षण यांची उत्तम व्यवस्था लावून देत होते. त्यांनी त्या ओघात ‌‘हॅलो‌’ ही महाराष्ट्राच्या ग्रामीण आरोग्यावर व्यापक सकारात्मक परिणाम घडवणारी संस्था आकाराला आणली.

खेडेगावांतील एकल महिलांच्या जगण्यात अंतहीन यातना असतात. त्यांना बाहेरच्या जगाची खिडकी आणि दार उघडून दिलं, तर त्या स्वतःच्या गावांत विलक्षण स्थित्यंतर घडवून आणू शकतात. अहंकारी दांपत्यामुळे तशा अनेक जिवंत कहाण्या घडू शकल्या. भारतवैद्यांनी आपापल्या गावात दिलेल्या आरोग्यसेवांमुळे किती आयुष्यं वाचली? किती बालविवाह टळले? आणि किती कुटुंबं स्थिरावली, याचा सविस्तर व सखोल अभ्यास व्हायला पाहिजे. तसं झाल्यास, एका स्त्रीमुळे गावात होणारे आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक बदल समजून येतील.

वि.स.पागे यांनी 1972च्या दुष्काळात सुचवलेली ‌‘रोजगार हमी योजना‌’ संपूर्ण देशात लागू झाली. त्यानंतर महाराष्ट्र  शशिकांतमुळे आणखी एक उत्तम योजना देशाला देऊ शकला. शशिकांत यांची गावांना निरामय करणारी ‌‘भारतवैद्य‌’  ही योजना, भविष्यात भारत सरकारची ‌‘आशा‌’ योजना म्हणून आकाराला आली. आज गावागावांतील ‌‘आशां‌’नी भारतीय आरोग्यसेवेचा भार पेलला आहे. त्यांच्यामुळे कित्येक आजार गावांतच नियंत्रणात येत आहेत. भारत ‌‘कोविड-19‌’सारख्या महासाथीच्या अरिष्टात तरून जाऊ शकला, ते प्रामुख्याने ‌‘आशां‌’मुळे. त्यांच्या कष्टांचं आणि योगदानाचं मोल करताच येणार नाही.

शशिकांत यांचा विचार मानवतावादी दृष्टिकोनातून आकाराला आला होताच, पण त्याच वेळी तो जागतिक पातळीवरील अनेक विचारांशी मेळ साधत होता. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील ‌‘वैद्यकीय नीतिमत्ता आणि आरोग्य धोरण‌’ विषयाच्या संचालक प्रो. जेनिफर रुगर यांनी त्यांचे गुरू प्रा. अमर्त्य सेन यांच्या ‌‘मानवाचा परिपूर्ण विकास‌’ या संकल्पनेचा विस्तार केला आहे.

त्यांच्या ‌‘ग्लोबल हेल्थ जस्टिस अँड गव्हर्नन्स‌’ (2018) या पुस्तकाची कोरोना काळात विलक्षण चर्चा झाली. जेनिफर यांनी त्यात 2014 साली आलेल्या ‌‘इबोला‌’ साथीचा विविध देशांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांचा अन्वय लावला होता. त्या म्हणतात, “सध्या अनेक देशांत आरोग्य सुविधा देताना न्याय व समता या संकल्पनांचा विचारच केला जात नाही. मानवाची भरभराट करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळ्यांवर उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर भक्कम सार्वजनिक यंत्रणा उभी करणं अनिवार्य आहे. सध्या काही देशांत केंद्रीय सार्वजनिक आरोग्य धोरण राबवलं जातं. ते अधिक नियोजनबद्ध, विचारपूर्वक लक्ष्य ठरवून आखलेलं असतं. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पायाभूत सुविधा तयार होत असतात. याउलट, विकेंद्रित सार्वजनिक आरोग्य धोरण हे थातूरमातूर, त्या क्षणी सुचेल तसं आखलेलं, ठिगळासारखं असतं. अमेरिकेतली आरोग्ययंत्रणा विकेंद्रित आहे. तर तैवान, सिंगापूर आणि युरोपातील अनेक देशांत केंद्रीय पद्धत अवलंबली जाते. त्यामुळे त्या देशांतील आरोग्य व्यवस्था अमेरिकेच्या तुलनेत सुदृढ आहे.”

यापुढेही कोरोनासारखी महासाथ येऊ शकते. ‌‘कदाचित कोरोना हे हिमनगाचं टोक असावं, इतक्या भयंकर जागतिक साथी भविष्याच्या पोटात दडल्या आहेत‌’, असं रोग पर्यावरण शास्त्रज्ञांचं मत आहे. निसर्ग-विनाशामुळे माणसाला एड्स, इबोला, सार्स, स्वाइन फ्लू आणि बर्डफ्लू अशा भयंकर भेटी मिळत आहेत. भविष्यात अशी महासाथ आली, तर सरकारांनी विकलांग करून ठेवलेल्या सार्वजनिक आरोग्यसेवेचे धिंडवडे निघतील. तशा आरोग्याच्या आणीबाणीत शशिकांत यांनी निर्माण केलेली ‌‘भारतवैद्य‌’ संकल्पना आणि त्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ‌‘आशा‌’ कार्यकर्त्या याच आरोग्यसेवेत कळीची भूमिका बजावतील.

‘हॅलो फाऊंडेशन‌’ला अनेक पुरस्कार मिळाले. पण मी शशिकांत यांना कोणत्याही पुरस्काराने मोहरून जाताना पाहिले नाही. आपलं काम अतिशय कमी, अपुरे आणि एकूण स्थानिक व देशाच्या गरजेपेक्षा फारच उणे आहे, असे त्यांना वाटत असे. पण तो नाउमेद न होता, त्याला भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांना आशा आणि विश्वास देऊ शकत असे. विशेष म्हणजे, ज्यांनी जवळजवळ सगळीच आशा सोडली आहे अशा स्त्रियांना ते उभारी देत असत. त्यामुळेच त्या परिसरातील असंख्य स्त्रियांना शशिकांत हे तारणहार किंवा पुनर्जन्म देऊ शकणारा महर्षी वाटत असत.

शशिकांत-शुभांगीचे अद्वैत कधीही आत्मनैतिकतेच्या किंवा अहंगंडाच्या सापळ्यात अडकले नाही. गांधीजी म्हणत असत, की “सर्वांत जास्त अनैतिकता म्हणजे स्वयंभू नैतिकतेचा गंड.” तो कित्येक समाजकार्यकर्ते, सेवाभावी व्यक्ती, तथाकथित विचारवंत, पत्रकार, कवी, लेखक यांना असतो. ते त्यांच्या स्वयंप्रकाशित नैतिकतेत इतके न्हाऊन निघालेले असतात, की त्यांचे सामाजिक भान, करुणा आणि सह-अनुभूती क्षीण होत जाते. अहंकारी त्या रोगापासून कायम मुक्त राहिले. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधू इच्छिणाऱ्यांना (तसेच, असे प्रश्न न पडणाऱ्यांनासुद्धा) या पुस्तकातून अनेक अर्थ (व बोध) गवसणे शक्य आहे.

- कुमार केतकर
ketkarkumar@gmail.com

(लेखक निवृत्त राज्यसभा खासदार, ज्येष्ठ पत्रकार व संपादक आहेत.)


दृष्टी आरोग्यक्रांतीची
लेखक : अतुल देऊळगावकर
प्रकाशक : साधना प्रकाशन
पृष्ठसंख्या : 214
किंमत : 300 रुपये 

पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाइटवर सवलतीच्या किंमतीत (240 रुपये + टपालखर्च) उपलब्ध आहे.

 

Tags: Dr. Shashikant Ahankari Asha डॉ. शशिकांत अहंकारी कुमार केतकर दृष्टी आरोग्यक्रांतीची नवे पुस्तक प्रस्तावना हॅलो फाऊंडेशन महाराष्ट्र आरोग्य आशा सेविका आरोग्य योजना स्त्री आरोग्य kumar ketkar sadhana digital शुभांगी अहंकारी साधना डिजिटल आशा योजना भारतवैद्य Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/