आश्चर्यकारक, तितकेच अविश्वसनीय तरीही वास्तव!

एम्मा राडुकानु व डानिल मेदवेदेव यांनी पटकावले अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद!

अशा अनेक घटना असतात ज्यांचे आपण साक्षीदार असलो तरी त्या घडल्यावर मात्र आपल्याला त्याबाबत आश्चर्य वाटत राहतं. यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना पाहताना अनेकांना हा अनुभव आला. आर्थर ॲश कोर्टवर रंगलेल्या या स्पर्धेमध्ये पात्रता फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेली इंग्लंडची 18 वर्षांची एम्मा राडुकानु... कुणाच्याही काय... खुद्द तिच्याही ध्यानीमनी नसताना महिलांमध्ये लहान वयात हे विजेतेपद मिळवणारी केवळ दुसरीच (याबाबतीत पहिला क्रमांक मारिया शारापोवाचा आहे.) विजेती ठरली. दुसरीकडे ग्रँड-स्लॅम स्पर्धांत तब्बल 20 विजेतीपदे जिंकणारा जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावर असलेला, सर्बियाचा नोवाक योकोविच पुरुषांच्या अंतिम फेरीत क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील रशियाच्या डानिल मेदवेदेवकडून अगदी सरळ सेटमध्ये पराभूत झाला हे तर महदाश्चर्यच म्हणायचे!

प्रथम महिला अंतिम फेरीबद्दल. दीर्घ काळानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विशीच्या आतल्या दोन खेळाडू दाखल झाल्या होत्या. एम्मा राडुकानु आणि डावखुरी लैला फर्नांडीस. त्यातही एम्माची वाटचाल कौतुकास्पद होती. तिने सुरुवात पात्रता फेरीतून केली कारण या वर्षाच्या सुरुवातीला ती क्रमवारीत तीनशे त्रेपान्नाव्या तर स्पर्धेपूर्वी दीडशेव्या स्थानावर होती त्यामुळे तिला थेट स्पर्धेत प्रवेश नव्हता. (आता मात्र ती एकदम तेविसाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.) पात्रता स्पर्धेतील तीनही सामने तिने सहज, एकही सेट न गमावता जिंकले आणि ती मुख्य स्पर्धेत दाखल झाली. तिथेही तिने अंतिम फेरीत प्रवेश करेपर्यंत एकही सेट गमावला नव्हता. अगदी उपान्त्य सामन्यातही मारिया सक्कारीवर तिने सरळ सेटमध्ये 6-1, 6-4 असा विजय मिळवला होता. लैलाची वाटचाल एवढी सोपी नव्हती. तिला काही ‘सीडेड’ खेळाडूंबरोबर लढावे लागले आणि तरीही ती विजय नोंदवतच राहिली. उपान्त्य फेरीत तिने आर्यना सबालेंकाचा चुरशीच्या सामन्यात तीन सेटमध्ये 7-6, 4-6, 6-4 असा पराभव केला होता. अव्वल पाच खेळाडूंवर तिने तीन वेळा मात केली होती त्यामुळेच आपले विजेतेपदाचे स्वप्न साकार होणार असे तिला वाटू लागले होते. तरीही एम्माबरोबरची लढत अगदी चुरशीची होणार असेही तिला वाटत होते.

...पण तसे काही घडायचे नव्हते. सामन्याच्या सुरुवातीपासूनच एम्माने आपला खेळ उंचावला होता आणि लैलाला लय सापडण्यापूर्वीच तिने लैलाची सर्व्हिस भेदून आघाडी मिळवली आणि ती टिकवून 6-4 असा सामना जिंकला मात्र हा विजय सहज मिळाला नव्हता. लैलाही चांगला खेळ करत होती त्यामुळेच दुसऱ्या गेममध्ये तिची सर्व्हिस भेदली गेली तरी लगेच तिने एम्माची सर्व्हिस भेदली आणि नंतर स्वतःची सर्व्हिस राखून 2-2 अशी बरोबरी साधली. 4-4 अशा बरोबरीनंतर मात्र एम्माने सर्व्हिस गेम घेऊन आघडी मिळवली आणि दहाव्या गेममध्ये पुन्हा लैलाची सर्व्हिस भेदून सेट जिंकला. मोक्याच्या क्षणी लैलाकडून चुका झाल्यानेच तिला सेट गमवावा लागला होता. तिचे फटक्यांचे अंदाज चुकत होते. कधी ते कोर्टबाहेर जात होते तर कधी जाळयात अडकत होते. तरीही ती जिद्दीने लढत देत होती. एक गोष्ट खरी की, दोन्ही खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते कारण त्यांच्याकडून कोणाच्याही मोठ्या अपेक्षा नव्हत्या. परिणामी त्या अगदी मोकळेपणे, विनादडपण खेळत होत्या आणि म्हणूनच त्यांचा सामना रंगतदार झाला.

दुसऱ्या सेटमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली आणि एम्माने सातव्या गेममध्ये लैलाची सर्व्हिस भेदण्यात यश मिळवले आणि 5-3 अशी आघाडी घेतली. त्याच वेळी तिचा पाय दुखावला होता म्हणून तिने त्यावर इलाज करण्यासाठी, नियमांनुसार, वैद्यकीय विश्रांती (मेडिकल टाईम आऊट) घेतली. त्या वेळी लैला थोडी नाराज झाली होती कारण सर्व्हिस गेमआधी एम्माला विश्रांती मिळणार होती. ते काहीही असो... पुन्हा मैदानावर उतरल्यावर एम्माने आपल्या सर्व्हिस गेममध्ये तीन गुण मिळवले आणि नंतर ताशी 108 वेगाची बिनतोड सर्व्हिस (एस) करून तिने अजिंक्यपद मिळवले. सामन्यामध्ये तिच्या एकूण आठ बिनतोड सर्व्हिस होत्या. दोन्ही तरुण वयाच्या खेळाडू. त्यांचे चापल्य वाखाणण्याजोगे होते आणि ज्या तऱ्हेने त्या प्रत्येक गुणासाठी लढत होत्या त्यावरून त्यांची चिकाटी दिसत होती. दोघींची दमछाकही चांगली होत होती. सरळ सेटमध्ये एम्माने सामना जिंकला तरीही तो एकतर्फी नक्कीच नव्हता पण तरीही एम्माचे वर्चस्व जाणवत होते हे मात्र खरे. तिच्याकडून चुका कमीत कमी होत्या. सामन्यावरील तिचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले होते. कल्पनाही करता येणार नाही असे यश तिने संपादन केले होते. स्पर्धांमध्ये व्यावसायिक खेळाडूंना प्रवेश देण्यात आल्यानंतर पात्रता फेरी ते विजेतेपद असे यश मिळवणारी ती एकमेव खेळाडू ठरली. 23,000 प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले. अगदी लैला फर्नांडीसनेही! यापुढे मात्र सामने खेळताना माझ्यावर दडपण असेल कारण प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा असतील हेही एम्माने मान्य केले तर लैलानेही पुन्हा पुढच्या वर्षी आपण नक्की इथे येऊ असे सांगितले. त्यावर दोघींनीही प्रेक्षकांची दाद मिळवली.

पुरुषांच्या अंतिम सामन्याची गोष्ट अगदी वेगळी होती कारण दोन्ही खेळाडू नावाजलेले होते आणि सामना चांगला चुरशीचा होणार या अपेक्षेनेच प्रेक्षक आले होते. टेनिसच्या ग्रँड-स्लॅम स्पर्धांत तब्बल 20 विजेतीपदे जिंकणारे तीन खेळाडू मैदानात आहेत. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक योकोविच. फेडरर 39, नदाल 35 तर योकोविच 34 वर्षांचा... तरीही या तिघांचा दबदबा आहे. त्यात योकोविचने यंदाच्या पहिल्या तीन म्हणजे खुली ऑस्ट्रेलिअन, फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या होत्या आणि अमेरिकन स्पर्धेत त्याने याआधी तीन वेळा अजिंक्यपद मिळवले होते त्यामुळेच आता तो वर्षात ग्रँड-स्लॅम पुरे करणार असा अनेकांचा होरा होता. त्यालाही त्याबाबत विश्वास वाटत असणार.

त्याचा प्रतिस्पर्धी होता रशियाचा 25 वर्षांचा डानिल मेदवेदेव. त्याने तोवर ग्रँड-स्लॅम मालिकेतील एकही स्पर्धा जिंकली नव्हती. या स्पर्धांतील त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे यंदा तो ऑस्ट्रेलिअन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता आणि तिथे त्याला योकोविचने पराभूत केले होते. तरीही एक महत्त्वाची बाब त्याचे कौशल्य आणि दर्जा सिद्ध करणारी होती. त्याने गेल्या वर्षअखेर व्यावसायिक टेनिसपटू संघटनेच्या स्पर्धेचे - एटीपी स्पर्धेचे - अजिंक्यपद मिळवले होते. त्या स्पर्धेत वर्षातील अव्वल क्रमांकाचे आठ खेळाडू सहभागी होतात. अर्थातच स्पर्धा जिंकताना किती झगडावे लागत असेल याचा अंदाज केल्यास त्या स्पर्धेच्या दर्जाबाबत अंदाज येऊ शकेल... म्हणूनच मेदवेदेवला कमी लेखून चालणार नाही हे योकोविचलाही नक्कीच माहीत असणार... म्हणूनच ‘हा सामना आपला अखेरचा सामना आहे असे समजून मी त्यात सर्वस्व पणाला लावून खेळ करणार होतो.’ असे योकोविचने सामन्यानंतर सांगितले. यावरूनच या सामन्याला त्याच्या दृष्टीने किती महत्त्व होते हे ध्यानात येईल. ग्रँड-स्लॅम स्पर्धांतील आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी मेदवेदेवही उत्सुक होता. तोही निकराने प्रयत्न करणार हे निश्चित होते तरीही सर्वांच्या दृष्टीने योकोविचचे पारडे जड होते.

सामन्याला सुरुवात योकोविचच्या सर्व्हिसने झाली आणि अहो आश्चर्यम्‌! सुरुवातीलाच मेदवेदेवने त्याची सर्व्हिस भेदून पहिला गेम जिंकला आणि नंतर आपली सर्व्हिस राखून 2-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोघेही आपली सर्व्हिस राखण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यात त्यांना यशही मिळत होते. सामना 5-4पर्यंत आला. आता मेदवेदेवला सेट जिंकायची संधी होती कारण तो सर्व्हिस करणार होता. ती राखली तर सेट त्याला मिळणार होता व तसेच झाले. त्याने सेट 6-4 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. पहिल्याच गेममध्ये योकोविचची सर्व्हिस भेदली गेली आणि प्रयत्न करूनही नंतर त्याला मेदवेदेवची सर्व्हिस भेदता आली नाही व मेदवेदेवने दुसरा सेटही 6-4 असा जिंकला. तरीही योकोविच हार मानणारा नाही हे माहीत असल्याने मेदवेदेवही एकाग्रतेने खेळ करून आपली सामन्यावरील पकड ढिली होऊ नये यासाठी प्रयत्न करत होता.

तिसऱ्या सेटमध्ये त्याने बघता-बघता 5-1 अशी मोठी आघाडी मिळवली व सामना आता संपणार की काय असे वाटू लागले पण इतक्या सहजासहजी हार मानेल तर तो योकोविच कसला!  त्याने स्वतःची सर्व्हिस गेम जिंकली. नंतरच्या गेममध्ये मेदवेदेवची सर्व्हिस भेदली आणि पुढच्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखली आणि सामना 4-5 अशा स्थितीत आणला. आता मात्र मेदवेदेववर दडपण आले होते. त्याने दोन वेळा सर्व्हिसच्या दुहेरी चुका केल्याने हे स्पष्ट झाले होते. प्रेक्षकदेखील आता योकोविच सामन्यात रंगत आणणार आणि लढत लांबणार असा अंदाज करत होते. या दडपणाखालीच मेदवेदेव काहीसा भांबावल्यासारखा वाटला आणि त्याच्याकडून चुका झाल्या होत्या. तेव्हा तर आता सामना नक्कीच चौथ्या सेटमध्ये जाणार असे वाटत असतानाच मेदवेदेव सावरला आणि त्याने आपल्या खेळात सुधारणा केली. तो पुन्हा आत्मविश्वासाने खेळ करू लागला. तो असे करू शकेल असा अंदाज नसल्याने योकोविच गडबडला आणि तिथेच त्याने सामना गमावला. परिणामी मेदवेदेवने सामना सरळ सेटमध्ये 6-4, 6-4, 6-4 असा जिंकला.

असे असले तरी सामना चुरशीचा झाला नाही असे कोणीच म्हणू शकणार नाही. दोघेही खेळाडू अव्वल दर्जाचे होते. त्याबरोबरच ते प्रत्येक गुणासाठी लढत होते. एक गोष्ट मात्र जाणवली. दोघांमध्ये नऊ वर्षांचे अंतर आहे त्यामुळे आपल्या लहान वयाचा फायदा मेदवेदेवला मिळालाच असणार. त्यातच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीत अलेक्झांडर झ्वेरेवकडून पराभूत झाल्यावर, ब्राँझपदकासाठी झालेल्या सामन्यात त्याला बुस्टाकडून हार पत्करावी लागली होती. या वेळीही उपान्त्य सामन्यात झ्वेरेववर मात करताना योकोविचला पाच सेटची कडवी लढत द्यावी लागली होती त्यामुळे त्याला काहीसा थकवा जाणवत असण्याचीही शक्यता आहे. 

नेमका ऑलिंपिक अपयशाच्या स्मृतींनी तो अस्वस्थ झाला असेल शिवाय ग्रँड-स्लॅम करण्याचे दडपण त्याला पेलवेनासे झाले असेल. काहीही असो... त्याची नेहमीची लय त्याला गवसली नव्हती हे खरे. याचाच फायदा घेत मेदवेदेवने स्पिन आणि वेग यांच्या बळावर फटके असे पेरले की, ते परतवणे योकोविचला शक्य झाले नाही. या दोन्हीचा मेदवेदेवने प्रभावी वापर केल्याने योकोविचला सामन्यावर पकडच घेता येत नव्हती. मेदवेदेवच्या फटक्यांपर्यंत तो प्रयत्नांची शिकस्त करूनही पोहोचू शकत नव्हता. उलट अनेकदा तर हताश होऊन खिळून राहिल्यासारखा कोर्टच्या किंचित आत पडलेल्या मेदवेदेवच्या अचूक फटक्याकडे नुसता बघत राहिला होता. 

मेदवेदेव फटक्यांची पेरणी कोर्टच्या दोन्ही बाजूंना करत होता आणि नाही म्हटले तरी या काळात योकोविचला चांगलेच धावावेही लागत होते. कधी अलगद नेटजवळ तर कधी कोर्टच्या अगदी मागील बाजूस. कधी या तर कधी त्या कोपऱ्यात मेदवेदेव फटके मारत होता. तो शेवटच्या सेटचा अपवाद केल्यास कधीच जराही गडबडला नव्हता त्यामुळेच प्रत्येक गुणाबरोबर योकोविचवरील दडपण वाढत जात होते आणि त्याचे फटकेही चुकू लागले होते हे मान्य करावेच लागेल. 

अशा प्रकारे योकोविचचा स्वप्नभंग झाला तर मेदवेदेवचे स्वप्न साकार झाले. नव्हे... त्याने ते साकार केले! अगदी तोंडाशी आलेला ग्रँड-स्लॅमचा घास निसटला याचे दुःख योकोविचला किती झाले असेल याची कल्पना केवळ सेरेना विल्यम्सच करू शकेल कारण 2015मध्ये तिलाही अशाच परिस्थितीत सामोरे जावे लागले होते. रॉबर्टा विंचीने तिचा ग्रँड-स्लॅमचा घास हिरावून घेतला होता. 

पुरुष दुहेरीचा किताब मिळवताना सॅलिसबरी आणि आर. राम यांनी जॉन मरे आणि बी. सोअर्स यांचा पराभव केला तर महिला दुहेरीत स्टोसून आणि झॅग यांनी मॅकेन्ली आणि गॉफ यांना हरवले. मुलांच्या एकेरीत डॅनिअल रिकॉन तर मुलींच्या एकेरीत रॉबिन मॉन्टगोमेरी विजेते ठरले.

अशीही दीर्घ काळ स्मृतीत राहणारी अमेरिकन ओपन स्पर्धा. संपूर्ण स्पर्धेला मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती असूनही काळजी करण्यासारखे काहीही घडले नाही ही तितकीच महत्त्वाची बाब. हळूहळू का होईना... करोना महामारीच्या भीतीतून जग सावरत आहे याचेच हे लक्षण मानायला हवे.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: अमेरिकन ओपन टेनिस एम्मा राडुकानु डानिल मेदवेदेव लैला फर्नांडीस नोवाक योकोविच आ. श्री. केतकर US open tennis emma raducanu Daniil Medvedev Novak Djokovic A. S. Ketkar Load More Tags

Add Comment