सत्यमेव जयते!

तिस्ता सेटलवाड, मोहम्मद झुबेर, नुपूर शर्मा आणि उदयपूर हत्या प्रकरणाच्या निमित्ताने...

बहुतेक माध्यमांनी तर ‘वाका’ म्हटल्यावर लोटांगणच घातले आहे. मग कुणी सत्य प्रकाशात आणण्याचे काम केले, तर तो सरकारला विरोधच नाही का? शेवटी सरकार म्हणेल तेच सत्य लोकांनी स्वीकारायला हवे हा अट्टहास. देशवासी हे मानतात. परंतु काही धाडसी देशी आणि परदेशी पत्रकारांचं काय, ते तर सारा प्रकार चव्हाट्यावर आणतातच. देशी पत्रकारांना नावं ठेवून, अटक करून, वा या ना त्या प्रकारे धमकावून गप्प करण्याचा प्रयत्नही केला जातो. पण तोवर त्यांचं लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचं कार्य पूर्ण झालेलं असतं, त्यामुळं ते शिक्षा झाली तरी भोगण्यास तयार असतात. सरकारला तेवढंच समाधान!

राजस्थानातील उदयपूर येथे भयानक हत्या. नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणाऱ्याचा गळा कापून खून. वाचकांनी ही बातमी नक्कीच वाचली असणार. कदाचित याबाबत नंतर काही विचारही केला नसणार. तेही बरोबरच म्हणा. कारण सध्या ज्या वेगानं घडामोडी होत आहेत, त्या पाहता कुठं कुठं लक्ष द्यायचं असं वाटणं साहजिकच आहे. पण थोड्या बारकाईनं बातम्यांकडे पाहिलं तर बरंच काही समजतं. तो खून कट्टरपंथीय मुस्लिमांनी केला होता, हे पहिल्या बातमीतूनच उघड झालं होतं. पण नंतर आलेल्या बातम्या त्याहीपेक्षा महत्त्वाच्या होत्या. म्हणजे कोणाही कट्टरपंथीय धर्मांधांचा कैवार घेणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणाऱ्या. त्या बातम्यांनुसार शाही इमामांपासून ते थेट इतर अनेक मौलवींपर्यंत सर्वांनी ‘हा खून इस्लामविरोधी आहे, इस्लामला हे मान्य नाही’ असे स्पष्टपणे सांगून, ‘खुन्यांना शासन व्हायलाच पाहिजे’ असेही म्हटले होते. म्हणजेच बहुतेकजण जे समजतात तसे नसते. सर्वच इस्लामपंथीय धर्मांधळे नसतात. ते त्यांच्या अतिरेकी कट्टरपंथीय आणि बुरसटलेल्या विचारसरणीच्या सहधर्मीयांवरही टीकाच करतात, हे यावरून दिसून येते.

आता याच प्रकरणाची दुसरी बाजू पाहू. भाजपाच्या ज्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या दूरचित्रवाणीवरील बेजबाबदार आणि लांच्छनास्पद बरळण्याने (असे बोलणे म्हणजे बरळणं नाही, तर दुसरं काय असतं?) हे घडलं आणि जगभरात लाजेने मान खाली घालण्याची वेळ देशावर आली, त्यांच्यावर वा त्यांच्या बरळण्यावर त्यांच्या पक्षातील कोणीही पदाधिकारी उच्चपदस्थांनी ब्र काढला नाही. बहुतेक ही मूकसंमती असावी. किंवा त्यांना तसा आदेश असावा. आपल्या देशात हे चालून जाते असा त्यांचा नित्याचा अनुभव. परंतु ज्यावेळी अरब देशांनी ‘कडक धोरण स्वीकारले जाईल’ असे म्हटले, तेव्हा पक्ष खडबडून जागा झाला आणि नुपूरना निलंबित करण्यात आले. पक्षातून काढले गेले नाही, हे महत्त्वाचे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्याच्याच पक्षातील एकाला मात्र पक्षाबाहेर काढण्यात आले. कारण तो नुपूर यांच्याएवढा उपयोगाचा नसावा!

अर्थात यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. केवळ दाखवण्यापुरताच हा प्रकार. कारण जगभरात देशाची आणखी नाचक्की होऊ नये, आर्थिक व्यवहारांवर वाईट परिणाम होऊ नये हा हेतू. म्हणजेच वरवरची मलमपट्टी. पण अनेकांनी तक्रार नोंदवल्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे नुपूरच्या वकिलांनी सांगितले की, तिने माफी मागितली आहे. त्यावर न्यायालयाने खडसावले की, तिची माफी ही सशर्त आणि उद्धटपणाची आहे. म्हणूनच न्यायालयाने तिला सांगितले की, तिने दूरचित्रवाणीवरूनच साऱ्या देशाची माफी मागायला हवी. एवढेच नाही तर आम्ही एकत्रित सुनावणी घेणार नाही, जेथे जेथे तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत तेथे तेथे तिला जावेच लागेल! काही प्रकरणात का होईना, सर्वोच्च न्यायालय काहीशी कडक भूमिका घेते एवढे तरी समाधान यामुळे मिळाले.

पण तरीही नंतर पक्षातील धेंडांतर्फे नुपूरचा सत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांना हवा होता तो विद्वेष पसरवण्याचे काम तिने योग्य प्रकारे केले होते, असे नाइलाजाने म्हणावे लागते; कारण गेली आठ वर्षे आपण बघत आहोत की, विविध कारणांमुळे ज्या दंगली घडवण्यात आल्या, ज्या हत्या झाल्या, त्यापैकी अनेकजण मोकाटच राहिले, काही मोजक्यांनाच थोड्याफार शिक्षा झाल्या. आणि सुटकेनंतर त्यांच्या मिरवणुका काढून मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचे सत्कार केले गेले. अगदी नुपूरलाही पक्षातील अनेकांनी जोरदार पाठिंबा दिल्याच्या बातम्या आपण वाचल्याच की. पण जरा डोकं खाजवून विचार केला तर हत्या, दंगल अशा प्रकरणांबाबत कोणातरी हिंदू धर्मगुरूने निषेध व्यक्त केला का? अर्थात धर्मसंसदेमध्ये सरळसरळ अशा हत्यांना चिथावणी, खरं तर फूस देणारी भाषणे करणाऱ्यांकडून यापेक्षा वेगळं काही घडण्याची अपेक्षा नाहीच.

गमतीची गोष्ट म्हणजे याच परिवारातील एका संस्थेतील एकाने असे लिहिले आहे की, शिवाजी हे एक हिंदू राजे होते; तेव्हा ते सेक्युलर होते हे ओघानेच आले. म्हणजे, राजा हा हिंदू होता याचा अर्थ तो सेक्युलर होता. (अर्थात कुणालाही हे मान्य होईल. याबाबत दुमत असायचं कारणच नाही.) फारच छान राजा म्हणजे सत्ताधीश. सध्याचे आपले सत्ताधीशही हिंदूच आहेत. म्हणजे या तर्कशास्त्राप्रमाणं ते सेक्युलरच असायला हवे. पण ते सेक्युलर असल्याचे क्वचितच कुणाच्या अनुभवाला आले असेल. त्यांनी निवडणूक प्रचारात वापरलेली भाषा आणि शब्दप्रयोग पाहिले तर कुणीही सुज्ञ माणूस ते सारे सेक्युलरपणाचे दर्शन घडवतात, असे म्हणायला धजावणार नाही. त्यांचाच कित्ता त्यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यातील कुणी योगी घडवीत असेल तर त्यात नवल ते काय? कारण तो तर साक्षात योगी म्हणजे हिंदूंचा मेरुमणीच की. मग इतर सोम्यागाम्यांनी त्यांचे अनुकरण करताना शाबासकीसाठी अधिकच जहाल भाषा केली असेल, तर त्यांना पक्ष शिक्षा कशी करणार? शाबासकी मात्र आवर्जून देण्यात येते..

शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, बेरोजगारांना वाईट भाषेत संबोधणे, परिणामी कुणा मंत्रीपुत्राने काही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारणे, दीर्घकाळ त्याच्यावर कारवाई न होणे आणि खूप उशिराने का होईना ती झाली, तरी त्याच्या पिताजींच्या मंत्रीपदाला मात्र धक्का न लागणे. केवळ गोमांसाच्या संशयावरून हत्या तर अनेक झाल्या आणि त्यांना पोलिसांचाही हातभार होता, हे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालये केवळ पुरावा नसल्याने अशा हत्या करणाऱ्यांना, दंगली घडवणाऱ्यांना निर्दोष सोडतात. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याची खबरदारी थोरांपासून लहानांपर्यंत सर्वजणच घेतात. पण गुन्हा तर झाला आहे, हे सर्व जगाला ठाऊक असतेच की. पण जणू काही पुरावा नाही म्हणून तो घडलाच नाही का? पण असे प्रश्न विचारायचे नसतात. एका अशाच बळी पडलेल्याच्या भावाने स्पष्टच विचारले हे दोषी नाहीत, म्हणजे माझा भाऊ मारला गेलाच नाही, मग तो कोठे आहे. सर्वांनाच गप्प करणारा प्रश्न.


हेही वाचा : पावसाचे अंदाज जेव्हा चुकतात... - रावसाहेब पुजारी 


दुसरीकडे ‘सत्यमेव जयते’ हे देशाचे ब्रीद म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र असत्यालाच चांगले दिवस आलेले दिसतात. कारण सत्य बोलणाऱ्यांना, अर्थात सरकारच्या अयोग्य वा घातक निर्णयांवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरवण्यात येते. सत्य दडवून ठेवून आम्ही सांगतो तेच सत्य म्हणून मान्य करावे अशी अपेक्षा. खरे तर अप्रिय होईल असे सत्य जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले जातात. खोटी आकडेवारी देण्यात येते. कुणा जागतिक संघटनेने पुराव्यानिशी ती खोटी असल्याचे म्हटले, की ‘तो त्यांचा भारतद्वेष आहे’ असे ठसवण्याचा दुबळा प्रयत्न करण्यात येतो. पण कितीही प्रयत्न केले तरी गंगेचे शववाहिनी रूप कसे झाकणार? रातोरात जाहीर कलेल्या लॉकडाऊनने जगण्यासाठी गावाकडे जाणाऱ्या असंख्यांचे शेकडो मैलांची पायपीट करताना विविध कारणांनी मृत्यू झाले. कुणी रेल्वे रुळांवर तर कुणी अन्नाविना चालण्याचे (आणि जगण्याचेही) त्राण न राहिल्याने रस्त्यात पडून, तर कुणी गावापर्यंत पोहोचूनही गावात प्रवेश बंद केल्यामुळे, अशा विविध कारणांनी अनेक मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या. पण सरकारकडे त्याबाबतची आकडेवारीच नाही, अर्थात ती कोविड महामारीत मेलेल्यांचीही नाही म्हटल्यावर कोण काय करणार! अनेकजण घाबरून गप्प बसतात.

बहुतेक माध्यमांनी तर ‘वाका’ म्हटल्यावर लोटांगणच घातले आहे. मग कुणी सत्य प्रकाशात आणण्याचे काम केले, तर तो सरकारला विरोधच नाही का? शेवटी सरकार म्हणेल तेच सत्य लोकांनी स्वीकारायला हवे हा अट्टहास. देशवासी हे मानतात. परंतु काही धाडसी देशी आणि परदेशी पत्रकारांचं काय, ते तर सारा प्रकार चव्हाट्यावर आणतातच. देशी पत्रकारांना नावं ठेवून, अटक करून, वा या ना त्या प्रकारे धमकावून गप्प करण्याचा प्रयत्नही केला जातो. पण तोवर त्यांचं लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचं कार्य पूर्ण झालेलं असतं, त्यामुळं ते शिक्षा झाली तरी भोगण्यास तयार असतात. सरकारला तेवढंच समाधान!

आजही अनेकजण विनाकारण तुरुंगात डांबले गेले आहेत. त्यांचे खटले वर्षानुवर्षे रेंगाळत राहतील याकडे लक्ष दिले जाते. अर्थात इतरांना दहशत वाटावी म्हणूनच हे करण्यात येतं. पण अजूनही अनेकजण याला सामोरे जायला तयार आहेत. सत्याला कधी ना कधी वाचा फुटते हेच खरं. आता तर नव्या तंत्रयुगाचा फायदा घेऊन सत्ताधारी आपली द्वेषाची विखारी प्रचारयंत्रणा सराईतपणे वापरत आहे. त्यासाठी हजारोंना कामावर भरपूर पैसे देऊन ठेवण्यात आलं आहे. त्यांनी एखादा संदेश माध्यमातून दिला, की तो लाखो अनुयायांपर्यंत फॉरवर्ड करणारे स्वयंसेवक दिमतीला आहेतच. पैशाचा अमाप वापर यासाठी केला जात आहे. पण ‘इडी’ला हे कसं दिसणार? नको त्यांना त्रास देणारे हे खाते सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे ही समजूत आता दृढ होत चालली आहे. कारण त्यांच्या यादीतील कुणी सत्ताधारी गोटात शिरला, की लगेच त्याला क्लीन चिट मिळण्याची हमीच असते. आपल्या राज्यात तर 2014-19 या काळात एवढ्या क्लीनचिटस् दिल्या गेल्या होत्या, की लोक म्हणू लागले होते की, गुन्हा होतो तोच मुळी क्लीन चिट हातात घेऊन!

तर सत्य बोलणाऱ्यावर काहीतरी करून कारवाई करायचीच हा निर्धार केलेल्या सरकारने नुकतीच ‘अल्ट न्यूज’च्या झुबेरला अटक केली आहे. त्यासाठी त्याने 2018 मध्ये केलेल्या एका ट्विटचं कारण दिलं गेलं आहे. हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘किसीसे ना कहना’, या फारूख शेख आणि दिप्ती नवल यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटातील एका दृश्याचा तो फोटो. मूळ ‘हनिमून हॉटेल’ च्या जागी ‘हनुमान हॉटेल’ झाल्याचा. पण बस्स. त्याच्यावर कुणाच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवून त्याला अटक करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, याबाबत कुणीही तक्रार केली नव्हती. केवळ ट्विटरवरची ती पोस्ट होती. तेवढेच निमित्त झाले. बस्स. केली अटक. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या अकाउंटवरून तेवढेच एक ट्विट करण्यात आले होते. आणि शोध घेतला तेव्हा ते अकाउंट बंदच करण्यात आल्याचे दिसले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2018 मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’नेही तो फोटो दिला होता पण तेव्हा कोणाच्याच भावना दुखावल्या गेल्या नव्हत्या म्हणायचं. तर अशी ही सत्यप्रियता!

सर्वोच्च न्यायालयाच्या गुजरात दंगलीबाबत मोदी-शहा यांना (अपेक्षेप्रमाणे) क्लीन चिट दिल्यानंतर कोर्टाने तक्रार करणाऱ्या तिस्ता सेटलवाड आणि मारण्यात आलेल्या खासदाराच्या पत्नीलाच दोषी धरले आणि त्यांना ताबडतोब ताब्यातही घेण्यात आले. एवढी तत्परता कधीच अनुभवाला आली नव्हती. गंमत म्हणजे एका जाणकाराने हे सारे त्याच कोर्टाने 2004 मध्ये दिलेल्या निकालाच्या विरोधात आहे, हे दाखवून दिले. (सुदैवाने त्याला अजून तरी अटक झालेली नाही.) पण त्यावर काही प्रतिक्रिया कुणी दिली नाही. सारे कसे शांत शांत. पण त्यांचे जल्पक तेवढे समंजस नाहीत. त्यांनी तिस्ता सेटलवाड यांच्या आजोबांनी जालियनवाला बाग हत्याकांड करणाऱ्या जनरल डायरचा गौरव केल्याचे सांगून चौकशी समितीत ते असल्याचे सांगितले. सेटलवाड यांच्याविरुद्ध जनमत तयार करण्याचा हा प्रयत्न, हे उघड सत्य. पण चौकशी समितीत पाच इंग्रज आणि तीन एतद्देशीय होते आणि त्यांचे अहवाल वेगवेगळे होते; गौरव करणारा अहवाल अर्थातच गोऱ्यांचा होता आणि त्यावर केवळ त्याच सदस्यांच्या सह्या होत्या; कुणाही भारतीय सदस्याची सही त्यावर नव्हती, हे त्या जल्पकांनी पाहिले नसावे. किंवा खरे तर जाणूनबुजूनच हा भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. अर्थात भक्तगणांना यापैकी काहीच मान्य होणार नाही. कारण ते आंधळे भक्त आहेत किंवा झापड लावलेले. जेवढे दाखवले जाईल ते पाहणारे आणि सांगितले जाईल ते आणि तेवढेच ऐकणारे.

बघू या, पुढं काय होतं ते. असं म्हणतात की, तुम्ही काही काळ लोकांना फसवू शकता, थोड्यांना बराच काळही फसवू शकता; पण सर्वांना सर्वकाळ मात्र कधीच फसवू शकत नाही.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: zubair tweet उदयपुर हत्या अल्ट न्यूज फेक न्यूज तिस्ता सेटलवाड भाजप हिंदू मुस्लीम Load More Tags

Add Comment

संबंधित लेख