पावसाचे अंदाज जेव्हा चुकतात...

पावसाच्या चुकलेल्या अंदाजाचे परिणाम हा गंभीर चिंतनाचा विषय आहे.  

opindia.com

भारतीय उपखंडातील बहुतांश शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. भारतीय हवामान खाते आधुनिक तंत्रज्ञान, वाऱ्याची दिशा, आणि वेग यांचा अंदाज घेत आणि गेल्या शंभर वर्षांच्या डाटाबेसवर आधारित हवामानाचे व पावसाचे अंदाज व्यक्त करतात. या वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे म्हणजे देशातील बहुसंख्य असलेल्या शेतकरी समाजाच्या जीवाशी खेळ असतो. जेव्हा हे अंदाज चुकतात, तेव्हा त्याचे अपरिमित परिणाम विविध घटकांवर होतात. यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाचे अंदाज आणि तेही जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, असे म्हटलेले होते. मात्र जून महिना बहुतांश कोरडा गेल्याने कशाकशावर त्याचे परिणाम झाले, याचा मागोवा घेणारा हा लेख.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये हवामान खात्याच्या तज्ज्ञांपेक्षा राजकीय नेतृत्वच हवामानाचे सोयीचे अंदाज व्यक्त करण्यासाठी पुढाकार घेते, असे अनेक कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे राजकीय, आर्थिक सोयीच्या अंदाजाने अनेक घोटाळे होतात. हवामान खात्याची विश्वासार्हता धुळीला मिळते आहे. आपल्या अंदाजावर उलट-सुलट भूमिका हवामान खात्याने घेतल्याचे दिसते आहे. तसेच त्यांच्या अंदाजाच्या उलट स्थिती आज पाहावयास मिळते आहे. या चुकलेल्या आणि अंदाजपंचे हवामानामुळे अनेक घटकांवर दूरगामी आणि विपरित परिणाम होतात. यंदा त्याची प्रचिती अधिक तीव्रतेने समोर आलेली आहे. जागतिक पातळीवरील नवनवीन तंत्रज्ञान, त्यातील विश्वासार्हता तसेच पारंपरिक डाटाबेसवर आधारित भारतीय हवामान खात्याचे अंदाज, देशाच्या विविध भागातील घटमांडण्या, प्राणी-पक्ष्यांच्या वर्तनातील आणि वृक्षराजीच्या बहरण्यातील बदल, पंचांगातील ग्रह-ताऱ्यांच्या भ्रमणावर आधारित अंदाज या सगळ्यांनाच यंदा पावसाने चकवा दिला आहे. पावसाच्या चुकलेल्या अंदाजाचे परिणाम किती दूरवर होत राहतात, हा गंभीर चिंतनाचा विषय आहे.  

केरळ किनारपट्टी, कोकण आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात 7 जून किंवा त्यापूर्वीच नैऋत्य मोसमी पावसाचे हमखास आगमन होते. याबाबतचे अंदाज जाहीर करण्याच्या पद्धती वर्षांनुवर्षे ठरून गेल्या आहेत. गेल्या 100 वर्षांतील पावसाच्या नोंदीवरून हा ठोकताळा तयार झालेला आहे. पावसाला सुरूवात होते, पाऊस सुरू होताच पेरण्या सुरू होतात. पुढे नक्षत्र बदलते, पाऊस कमी – जास्त होत राहतो. पण पेरण्यांचा हंगाम सुरूवातीच्या पावसामुळे सुरू होतो. पावसाचा ताण निर्माण झाल्यास काही वेळा येणाऱ्या खरिपाच्या पिकांवर त्याचा विपरित परिणाम होतो. सर्वसाधारणपणे हे चित्र आजवर चालत आलेले आहे. दोन पावसांतील अंतर आणि पडणाऱ्या पावसाचे सातत्य यावरही खरीप हंगामाचे भवितव्य आधारलेले असते. यामुळे पावसाच्या अंदाजाला भारतीय शेतीसाठी विशेष महत्त्व आहे. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संस्थासुद्धा पावसाचा अंदाज देतात. त्याचे त्यांनी टप्पे केलेले आहेत. वाऱ्याची दिशा आणि वेग यावर आधारित वेगवेगळे अंदाज ठरविले जातात. ते टप्प्या-टप्प्याने अधिक अचूक केले जातात. तसेच काही भागात घटमांडण्यांतून पावसाचे अंदाज जाहीर केले जातात. याशिवाय विविध पंचांगांतील पाऊस अधिक विश्वासार्ह मानला जातो. ग्रह-ताऱ्यांच्या भ्रमणावरून पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात. याचबरोबर प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या पाना-फुलांतील बदलावरून, बहरण्यावरूही पावसाचा अंदाज स्पष्ट केला जातो. कावळा झाडाच्या कोणत्या भागात घरटे बांधतो, यावर पाऊसमान कसे आहे, हे समजते. या सगळ्यावर शेतकऱ्यांचेच नव्हे अनेक संबंधित घटकांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे पावसाचा अंदाज हा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.

भारतीय हवामान खात्याच्या पावसाचे अंदाज अनुकूल असतील तर आपल्याकडील शेअर बाजार उसळी घेतो. प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्यास तो कोणत्याही क्षणी कोसळतो. यामध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यावधीचे नुकसान होते. या सगळ्या गोष्टी हवामान खात्याच्या हातात असतात.

पावसाचे अंदाज तीन टप्प्यांत जाहीर होतात. नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा, त्यातील प्रगती आणि पूर्वापार अनुमान यांचा मेळ घालून हे अंदाज वर्तविले जातात. पहिला, दुसरा आणि अंतिम अंदाज व्यक्त करताना त्यातील अचूकतेला प्राधान्य दिलेले असते.

भारतीय हवामान खात्याचे अंदाज बऱ्याचदा चुकतात. तो कुचेष्टेचा विषय होतो. यात नवीन असे काही नाही. तरीही भारतीय शेतकऱ्यांचे या हवामान अंदाजाकडे विशेष लक्ष असते. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम त्यावर विसंबून असतो. या अंदाजानुसार पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू होतात. बियाणे बाजारातील हालचाली अधिक गतिमान होतात. नव्या वाणांची उपलब्धता करताना पाऊसमान कसे आहे, याला विशेष प्राधान्य दिले जाते. अनेक उद्योजक हवामानाचा कल लक्षात घेऊन या क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढवितात. तसेच राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक बियाणे कंपन्या, डिलर्स आणि गावोगावच्या कृषी सेवा केंद्रातील आवक कमी-जास्त होत राहते. यामध्ये प्रचंड मनुष्यबळ कार्यरत असते. पावसाच्या अंदाजावर त्याला गती मिळत राहते. हवामान खात्याच्या पहिल्या अंदाजानंतर या हालचालींना सुरूवात होते. म्हणजे पावसाळ्यापूर्वी किमान दोन-तीन महिने अगोदर हे सगळे सुरू होते. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक, सेंद्रिय खताच्या उपलब्धतेची तयारीसुध्दा याचप्रमाणे सुरू राहते. वर खते, भर खते, मिश्र खते असे नियोजन सुरू होते. खत कंपन्यांसाठी हा ‘Peak Hour’ असतो. मागील काही वर्षांची मागणी, चालू हंगामातील पावसाचे अंदाज आणि पिकनिहाय बाजारभाव यावर संबंधितांच्या आकडेवारीला, उत्पादनाला, तिच्या प्रोकोमेंटसना आकार येत राहतो. याबाबतची सज्जता, तयारी कृषी विभागाकडून करून घेतली जाते. खते, बियाणे, इतर निविष्ठा शेतकऱ्यांना कमी पडू नये, यासाठी कृषी विभाग हातघाईवर आलेला असतो. त्याच्या तगाद्याने यामध्ये भर पडत असते. बैठकांवर बैठकी सुरू असतात.  

वायदे बाजारातील उलाढालीसुद्धा पावसाच्या या अंदाजावर सुरू असतात. कोणत्या पिकातील उत्पादनाला भविष्यात तेजी-मंदी राहील, याचे अनुमान काढले जाते. यासाठी विविध पातळीवर अंदाज घेतले जातात. पाऊसमान चांगले असेल तर मोठ्या उलाढाली होत असतात. शेतीमालाच्या आयात-निर्यातीचे ठोकताळेसुद्धा यावरच अवलंबून राहतात. धोरणात्मक क्रमसुद्धा पावसाच्या अंदाजानुसार प्रभावित होतात. शासनाच्या तयारीचे आकडेवारीनिहाय चित्र यातून तयार होत जाते. त्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्र्यांसमोर राज्य, विभाग, जिल्हानिहाय सादरीकरण केले जाते. बॅंकांच्या शेतीसाठीच्या अर्थपुरवठ्यावरसुद्धा या अंदाजाचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो.

ज्या भागात अतिवृष्टी होते, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे काम जोरदार सुरू होते. यासाठी जिल्हा प्रशासनाचा एक विभाग तयारी करीत असतो. अतिवृष्टी, महापूर आल्यास कोणत्या खबरदारीच्या योजना हाताशी असल्या पाहिजेत, याचे नियोजन आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सुरू होते. त्याचे गावनिहाय, तालुकानिहाय नियोजन असते. ज्या भागात यापूर्वी महापूर येऊन गेला, तिथे विशेष यंत्रणा सज्ज केली जाते. यासाठी गावोगावी सभा, बैठका, साधनसामुग्री यांची सज्जता केली जाते. लोकजागृतीचे कार्यक्रम पावसापूर्वीच घेतले जातात.

पावसाच्या अंदाजानुसार सगळ्या गोष्टी घडल्या तरी बियाणे, खतांतील बोगसगिरीचे अनेक नमुने पुढे येतात. त्यावर नियंत्रण, कारवाई, पर्यायी व्यवस्था, दुबार पेरणीचा भुर्दंड, पर्यायी व्यवस्था अशा नाना भानगडी या केवळ पावसाच्या अंदाजावर सुरू असतात. पण यंदा भारतीय हवामान खात्याच्या अंदाज वर्तवण्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चुकीचे अंदाज, अंदाजपंचे अंदाज असे चित्र समोर आल्याने या खात्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. एक चूक लपविण्यासाठी पुढच्या काही चुका झाल्या आहेत, असा आरोप हवामान खात्यावर घेतला गेला आहे. पुन्हा, जे अंदाज वर्तविले त्यानुसार पाऊस आलेलाच नाही!  

यंदा पावसाचे सगळे अंदाज सुरूवातीपासूनच चुकू लागलेले आहेत. हक्काचा जून महिना हा पावसाचा महिना. तो बऱ्यापैकी कोरडा गेला आहे. त्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. केवळ पेरण्या लांबल्या असे नाही, तर त्याचे अनेक परिणाम आता दिसू लागले आहेत. यंदा 7 जूनपूर्वीच पाऊस केरळकिनारपट्टी, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात बरसेल, असा अंदाज होता. त्यामुळे पेरणीपूर्वी मशागतीची कामे अगदी वेळेवर पूर्ण झालेली आहेत. खते-बियाण्यांची सज्जता शासकीय आढावा बैठकीसह पूर्ण झालेली आहे. धुळवाफ्यातील पेरण्या झाल्या आहेत. तिथे पिके तरारून उगवून आली, पण आता पाऊस नसल्याने ती माना टाकू लागली आहेत. 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस सुरू होतो. अंदाजानुसार त्याचा पत्ता नाही. त्यानंतरची नक्षत्रेही कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातात बियाणे आहे, पण कोरड्या वातावरणात कोणीही शेतकरी पेरणीचे धाडस करत नाही. यामुळे गावात शेतमजुरांच्या हाताला काम नाही. पेरणीसाठी बैलांना विशेष महत्त्व असते. पेरण्याच थांबल्याने बैलांना काम नाही. ग्रामीण भागातील खते, औषधे व बियाण्यांची दुकानं ओस पडलेली आहेत. दुकानात बियाणे, खतांचा मोठा स्टॉक असूनही पाऊस नसल्याने या कृषी निविष्ठांना उठाव नाही. खतांच्या वॅगन्स खत कंपन्यांच्या आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत. जिथं पेरण्या झाल्या, ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते लोक या पिकांना पाणी देण्यात व्यस्त आहेत. पावसाचे अंदाज आणखी चुकत गेल्यास नवीन संकटांची मालिकाच सुरू होईल. दुबार पेरणीचे संकट पुढे येऊ शकते. हा सगळा अनर्थ एका चुकीच्या पावसाच्या अंदाजाने घडविलेला आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांची तर फार मोठी तारांबळ सुरू झालेली आहे. सरासरीच्या 106 टक्के पाऊस म्हणजे महापूर नक्की येणार असे नक्की गृहीत धरून त्यांना नदीकाठापासून दूरवर हलविण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यांनी घर-दार, शेती-वाडी सोडून, गरजेपुरते संसारोपयोगी साहित्य, जनावरे घेऊन सुरक्षित निवाऱ्यास हलविण्यास सुरूवात केली आहे. मात्र पावसाचे अंदाज चुकल्याने कोणी प्रशासनाला दाद देईनासे झालेले आहे. एकदम पाऊस सुरू झाल्यास काय करायचे, याची चिंता आपत्ती व्यवस्थापन समित्या, अधिकारी आणि संबंधित घटकांना लागून राहिलेली आहे. महापूर परिस्थितीत आरोग्य सेवा सज्जता केली आहे. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने ही यंत्रणाही सुस्तावलेली आहे. धरणातील पाण्याचे साठे कमी होऊ लागलेले आहेत. अचानक पाऊस झाल्यास धरणे भरून घेता येतील, या अंदाजाने पाटबंधारे विभागाने धरणातील असलेले पाणी यापूर्वीच सोडून दिलेले आहे. त्यामुळे पाऊस केव्हा होईल, याचा अंदाज येत नसल्याने काही ठिकाणी पाणी टंचाई, वीज भारनियमन सुरू झालेले आहे. तसेच शेतीसाठीचा पाणी उपसा बंदीची वेळ आलेली आहे.

जिथे पेरण्या झालेल्या आहेत, तिथल्या कोरड्या वातावरणात जमिनीत गाडलेले बियाणे हे व्हले, चिमण्या, कावळे, मोर टोकरून खात आहेत. किड्या-मुंग्यांमुळे कोरडे बियाणे खराब होऊ लागलेले आहे. उगवून आलेले कोवळे कोंब काही पक्ष्यांचे खाद्य झालेले आहे. जमिनीतील गाडलेल्या बियांची, उगवून आलेल्या कोंबांची राखण हा शेतकऱ्यांसाठी नवा उद्योग झालेला आहे. पेरणीबरोबर पाऊस झाल्यास या समस्या राहत नाहीत. मात्र या ठिकाणी पक्ष्यांच्या उपद्रवाने बताल पेरणीचा धोका निर्माण झालेला आहे. तसेच काही ठिकाणी दुबार पेरणीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पेरण्यापूर्वी पावश्या घुम्म, पावश्या घुम्म असा पावश्या पक्षाचा आवाज कुठेच येईनासा झाला आहे. संध्याकाळी ढगाळ वातावरण, हलकासा पाऊस, दिवसा कडक ऊन आणि रात्री बोचरी थंडी यामुळे सगळे वातावरण बिघडून गेलेले आहे. जोरदार पाऊस झाला तरच हे सगळे मळभ दूर होईल.

हे अंदाज असेच चुकत गेल्यास आणखी मोठी संकटे शेतीसमोर उभी ठाकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीची चिन्हे दिसू लागताच जनावरांच्या चारा-पाण्याची तसेच लोकांच्या पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. यातून 'दुष्काळ आवडे सर्वांना' या न्यायाने टॅंकर सम्राट, छावणी सम्राट पुढे येतील. तसेच महसूलाची यंत्रणा दुष्काळाच्या नावाने वेगळा गोरख धंदा मांडून बसेल.  

भारतीय शेती हा आजवर जुगार मानलेला आहे. दैवाच्या हवाल्याची शेती हा शिक्का आता बदलत्या काळात तरी पुसला गेला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान खूप विकसित झालेले आहे. जागतिक पातळीवरच्या अनेक संस्थांनी त्यामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे. त्यांचे अंदाज बहुतांशी बरोबर येतात. मग भारतीय हवामान खात्याचेच अंदाज का चुकतात? त्याचा मोठा फटका भारतीय शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यावर आधारित अनेक घटकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते आहे. संशोधनातील सातत्याचा अभाव, नवनव्या तंत्रज्ञानाच्या आधारे पाऊसमानाचा वेध घेण्याची क्षमता आता विकसित केली गेली पाहिजे. यासाठी राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला आवर घालण्यापासून ते प्रगत तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणाकडे आता विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

- रावसाहेब पुजारी, कोल्हापूर
sheti.pragati@gmail.com
(शेती-प्रगती या कृषिविषयक मासिकाचे संपादक)

Tags:Load More Tags

Comments:

शिरीष पाटील

लेखाची मांडणी चांगली केली असून शासकीय संस्थांनी अजून प्रगती करणे आवश्यक आहे हेही सुचविले आहे. पावसाचे नेमके अंदाज किती महत्वाचे आहेत ,आणि ते जर तसे बरोबर आले नाहीत तर त्यावर दुसरी उपाय योजना उपलब्ध असायला हवी हेही स्पष्ट होते.

विनोद तुकाराम जाधव

सुंदर मांडणी

Add Comment