अहमदाबाद येथे दिवसरात्र खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना भारताने दहा गडी राखून जिंकला. कसोटी सामना केवळ दोन दिवसांतच संपण्याची ही सातवी वेळ... आणि दोन दिवसांत विजय नोंदण्याची भारताची दुसरी वेळ. या विजयाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. आता अहमदाबाद येथेच होणारी चौथी कसोटी किमान अनिर्णित राखली तरीही भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. या मालिकेमध्येही त्याने 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.
इंग्लंडच्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे मनसुब्यांवर मात्र पाणी पडले आहे. आता त्यांचा प्रयत्न असेल तो केवळ अखेरची कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा... पण तिसऱ्या कसोटीतील त्यांचा खेळ पाहता हे काम एकंदरीत खडतरच वाटते.
पहिल्या दोन कसोटींनंतर 1-1 अशी बरोबरी झाल्याने दोन्ही संघ मोठ्या अपेक्षेने अहमदाबादला पोहोचले होते. तेथे नव्याने तयार करण्यात आलेल्या आणि सर्वात जास्त प्रेक्षकक्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (आधीचे नाव मोटेरा) हा सामना होणार होता. तेथील खेळपट्टीही नव्यानेच तयार करण्यात आली होती... त्यामुळे ती कशी असेल याबाबत कुतूहल होते तरीही ती फिरकी गोलंदाजांना अनुकूल असेल असाच अंदाज होता. सामन्याआधी खेळपट्टीवर थोडे गवत दिसत होते तरी सामना सुरू होण्याआधी मात्र त्याचा मागमूस नव्हता. चेन्नईमधील दुसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आली होती तशीच ही खेळपट्टी दिसत होती आणि प्रत्यक्षात ती त्या खेळपट्टीपेक्षाही धोकेबाज ठरली... कारण अगदी सुरुवातीपासूनच ती फिरकीला साहाय्य देत होती.
हा कसोटी सामना दिवसरात्र खेळवला जाणार असल्याने या सामन्यासाठी गुलाबी चेंडू वापरण्यात आला होता. गुलाबी चेंडू हा लाल चेंडूपेक्षा जास्त (विशेषतः सूर्यास्तानंतर) स्विंग होतो... त्यामुळे जलदगती गोलंदाजांना त्याचे साहाय्य होते असा बऱ्याच सामन्यांतील अनुभव आहे. इशांत शर्माने त्याप्रमाणे सामन्यातला पहिला बळी मिळवलाही... पण त्यानंतर मात्र भारताच्या पहिल्या डावात आर्चरने मिळवलेला बळी सोडल्यास जलदगती गोलंदाजांना एकही बळी मिळाला नाही. अर्थात त्यांच्या वाट्याला अगदी मोजकीच षटके आली हे मान्य करायला हवे... पण कर्णधार संघासाठी योग्य तो निर्णय घेतो आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांनी तेच केले...! त्यामुळेच हा सामना फिरकीचा सामना म्हणूनच ओळखला जाईल.
चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी मिळवण्याचा विक्रम केला होता... तर या सामन्याच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर डावखुऱ्या अक्षर पटेलने बळी मिळवला. (पहिल्या डावात त्याने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवला होता आणि दुसऱ्या डावात तर पहिल्याच षटकात दोन गडी बाद केले... तेदेखील एकही धाव न देता...!) डावाची सुरुवात होत असतानाच केवळ दुसऱ्याच कसोटीत खेळणाऱ्या अक्षरच्या हाती नवा चेंडू सोपवण्याची कल्पना विराट कोहलीला सुचली. त्याला खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आला होता की, केवळ अंतःप्रेरणेने त्याने हा निर्णय घेतला होता कोण जाणे...! अर्थात त्याचा हा निर्णय अगदी अचूक ठरला. पहिल्या डावामध्येदेखील अनुभवी अश्विनऐवजी जलदगती माऱ्यानंतर प्रथम अक्षरच्या हाती चेंडू सोपवण्याचा विराटचा निर्णय अक्षरने सार्थ ठरवला आणि पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. खरेच सांगायचे तर तेव्हापासूनच या कसोटीवर अक्षरची छाप उमटली.
तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याचा रूटचा निर्णय मात्र सपशेल चुकीचा ठरला. (त्याला बहुधा गुलाबी चेंडू आणि जलदगतीला यश हे समीकरण आठवत असावे.) बेसची चेन्नईच्या पहिल्या कसोटीतील कामगिरी विचारात घेता या खेळपट्टीवर त्याचा समावेश होईल असे वाटत होते... (कारण खेळाडूंना विश्रांती देण्याच्या त्यांच्या धोरणानुसार चेन्नईत प्रभावी मारा करणाऱ्या, डावखुऱ्या मोईन अलीला परत पाठवण्यात आले होते. हा निर्णय अर्थातच भारताच्या पथ्यावर पडला.) दुसरे असे की, बेस संघात असता तरीही त्याचा प्रभाव कितपत पडला असता हे सांगणे अवघड आहे.
या सामन्यामध्ये इंग्लंडच्या फलंदाजांचे फिरकीपुढील दुबळेपण उघडे पडले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचे फलंदाज फिरकीपुढे भांबावून जातात हे पूर्वीही दिसले आहे... पण ते एवढ्या मानहानीकारकपणे खेळतील... खरे म्हणजे खेळू शकणार नाहीत... असे मात्र वाटत नव्हते... पण तसे झाले...!
याबाबत विश्लेषण करताना क्रिकेट विश्लेषक रॉब जॉन्स्टन यांनी म्हटले आहे की, ‘क्रिकेटच्या बदलत्या स्वरूपामुळे इंग्लंमधील काउंटी क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक बदलले आहे आणि त्यामुळे आता त्या सामन्यांच्या वेळी खेळपट्ट्या जलदगती माऱ्याला अनुकूल असतात आणि फिरकीला साथ देणारी खेळपट्टी क्वचितच असते... त्यामुळे या फलंदाजांना फिरकीला, त्यातही भारतीय गोलांदाजांच्या सरस फिरकीला कसे तोंड देता येईल? श्रीलंकेत त्यांचा खेळ चांगला झाला हे मान्यच... पण तेथील वातावरण खूपच वेगळे होते आणि त्यांच्या फिरकी गोलांदाजांचा दर्जाही भारतीय फिरकीएवढा नक्कीच नव्हता.’ जॉन्स्टन यांचे हे मत इंग्लीश क्रिकेट संघटकांनी नक्कीच विचारात घेण्यासारखे आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजांना फिरकी गोलंदाजीला सामोरे जाण्याचे... आणि तेदेखील फिरकीला चांगली साथ देणाऱ्या खेळपट्टीवर... तंत्रच उमगले नाहीय की काय अशी शंका यावी असा खेळ होता. इंग्लंडच्या फलंदाजांचे राहू दे. भारतीय फलंदाज तरी कुठे योग्य प्रकारे खेळले! दोन्ही संघांतील फलंदाज जणू काही क्रीझ न सोडताच खेळायचे ठरवल्याप्रमाणे खेळत होते आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली... त्यामुळे भारताने पहिल्या डावात घेतलेली 33 धावांची आघाडी बहुमोल ठरली... त्यामुळे त्यांना दुसऱ्या डावात फारसे दडपण न घेता खेळता आले.
इंग्लंडची परिस्थिती पहिल्या डावात दोन बाद 74 अशी होती... म्हणजे त्यात वेगळे काही नव्हते. साधारण कसोटी सामन्यांमध्ये अशीच परिस्थिती असते... पण त्यानंतर त्यांची जी घसरण सुरू झाली ती थांबलीच नाही... अगदी दुसरा डाव सुरू झाल्यानंतरही! भारताचा पहिला डावदेखील याहून फारसा वेगळा नव्हता. गिल अकरा आणि पुजारा शून्यावर बाद झाल्यावर पहिल्या दिवसाअखेरीला त्यांचा तिसरा गडी विराट कोहली (27) संघाच्या 97 धावा असताना बाद झाला होता. दुसऱ्या दिवशी भारत मोठी आघाडी घेणार अशी चिन्हे दिसत होती... पण तसे झाले नाही.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच लीचने रोहितला आणि रहाणेला बाद केले आणि त्यातून भारत सावरलाच नाही... कारण नंतरच्या फलंदाजांपैकी फक्त अश्विन (17) आणि इशांत शर्मा (10) यांनीच दोन आकडी धावसंख्या गाठली. लीचला साथ दिली रूटने आणि त्याची कामगिरी त्याचाही विश्वास बसू नये अशी झाली. त्याने केवळ आठ धावा देऊन पाच बळी मिळवले. (सामन्यानंतर तो म्हणाला, या सामन्याने खरेतर उपस्थित साधारण चाळीस हजारांच्या आसपास असलेल्या प्रेक्षकांची फसवणूकच केली... कारण ते अँडरसन-आर्चर, ब्रॉड वि. वेहित, कोहली अशी झुंड पाहायला आले होते... पण त्यांना बघावी लागली माझी गोलंदाजी.) भारताचा पहिला डाव 145वर आटोपला. लीचने चार गडी बाद केले.
इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 81वर आटोपला. अक्षरने पुन्हा एकदा पाच बळी मिळवले, अश्विनने चार आणि उरलेला बळीही वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीचाच होता. दुसऱ्या डावात विजयासाठी आवश्यक 49 धावा भारताने एकही गडी न गमावता केल्या व मोठा विजय मिळवला. या डावात मात्र गिलने सुरुवातीला आणि रोहितने अखेरीस मोठे फटके मारले. दोघांनीही षटकार ठोकला... रोहितने तर षटकार मारूनच संघाच्या विजयाची नोंद केली. (शंभर कसोटींच्या कारकिर्दीमध्ये या कसोटीच्या पहिल्या डावात प्रथमच कसोटी सामन्यात षटकार ठोकणाऱ्या इशांतने बहुधा त्यांना प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला असावा.)
फलंदाजांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात घाबरून, बिचकून जावे अशी काही खेळपट्टी नव्हती. स्टोक्सनेही या खेळपट्टीवर धावा काढता येतात हे 25 धावा करून दुसऱ्या डावात दाखवून दिले... पण पुन्हा एकदा तो स्वीपच्या मोहात पडून बाद झाला. बहुतेक सर्वच फलंदाज फिरकीला खेळताना क्रीझमध्ये राहूनच खेळत होते. त्यांना आपण यष्टिचीत होण्याची भीती वाटत होती... कारण पुढे जाऊन खेळले आणि फटका हुकला तर बाद होण्याची शक्यता.
काही काळापूर्वी फलंदाज फिरकीला तोंड देताना काही वेळा क्रीझ सोडून पुढे जाऊन चेंडू पडण्याआधीच मारण्याचा वा तटवण्याचा प्रयत्न करत. काही वेळा ते चेंडूचा टप्पा अचूक हेरून तिथल्या तिथे चेंडू दाबून टाकून तो वळण्याची शक्यताच नाहीशी करत. अर्थात याला उत्तर म्हणून गोलंदाजही चेंडूचा टप्पा वारंवार बदलण्याचा प्रयत्न करत अशी ही लढत संस्मरणीय असे. एरापल्ली प्रसन्ना तर चेंडूला झकास उंची देत असे आणि त्यामुळे फलंदाजांना चेंडूचा टप्पा कोठे पडेल आणि तो नंतर कसा वळेल याचा अंदाज करायला पुरेसा वेळच मिळत नसे... त्यामुळेच त्याला यश मिळाले.
...पण या वेळी अक्षरने तर सांगितले की, मी फक्त योग्य रेषेमध्ये सरळ चेंडूच टाकत होतो आणि मला यश मिळत होते... वेगळे काही करण्याची म्हणजे चेंडूचा टप्पा बदलण्याची वा त्याला उंची देण्याची गरजच मला भासत नव्हती. अर्थात तो सर्वच चेंडू असे टाकत नव्हता. तो चेंडू चांगला वळवत होता हे खरेच... पण त्याहीपेक्षा त्याचे साधे किंचित वेगाने येणारे सरळ चेंडू प्रभावी ठरत होते हाच याचा अर्थ.
फलंदाजाला चकवण्याकरता फिरकी गोलंदाज वेगवेगळे मार्ग अवलंबतात. त्याचप्रमाणे फलंदाजदेखील त्यांचा मारा बोथट करण्यासाठी तंत्रांचा वापर करतात. पुढे जाऊन खेळणे हे त्यातील एक... त्यामुळे गोलंदाजाची लय बिघडते. त्याच्या माऱ्यातील अचूकता कमी होते आणि फलंदाजाला हेच हवे असते. याला पदलालित्य म्हणत... पण आता त्या काळी सररास म्हटले जाई... तसे डान्सिंग डाऊन द विकेट अथवा निंबल फुटेड बॅट्समन अशी वर्णने आता क्वचितच ऐकायला मिळतात.
या वेळी तर इंग्लंडच्या बहुतेक फलंदाजांनी जणू काही क्रीझ सोडायचे नाही आणि क्रीझमधून खेळतानाही केलेल्या चुकाच पुन्हा करत राहायचे असे ठरवल्यासारखे ते खेळले. क्रीझमधून खेळायचे तर बॅट आणि पॅड हे अगदी चिकटून असायला हवेत, त्यांमध्ये फट असता कामा नये असे प्रशिक्षक सुरुवातीपासूनच सांगतात... पण येथे फटच काय बोगदाच होता आणि त्यामधून चेंडू आरामात यष्टी भेदत होता किंवा बॅट पॅडपुढे नसल्याने सरळ पॅडवर येऊन आदळत होता आणि फलंदाज पायचीत होत होते. चेंडू अचानक वळला आणि त्याने फलंदाजाला चकवले असे काही झाले नाही... त्यामुळे सर्व दोष खेळपट्टीला देऊन चालणार नाही. फलंदाजांनीही आत्मपरीक्षण करायला हवे.
लागोपाठ दुसऱ्या कसोटीमध्ये डावात पाच बळी मिळवण्याची करामत अक्षरने केली. नरेंद्र हिरवानीनेही अशीच करामत केली... पण नंतर तो केव्हा विस्मरणात गेला ते कळलेच नाही. जेसू पटेलचीदेखील अशीच गत झाली होती. लाला अमरनाथ यांनी कानपूरच्या खेळपट्टीबाबत योग्य अंदाज करून जेसू पटेलला त्या रिची बेनॉच्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध खेळण्यासाठी पाचारण केले होते. अक्षर त्यांच्यासारखा अल्पकाळचा हिरो ठरू नये एवढीच अपेक्षा. अक्षरप्रमाणे अश्विननेही आणखी एक मैलाचा, 400 बळींचा दगड याच कसोटीत पार केला आणि त्याने ही मजल केवळ 77 कसोटींमध्ये गाठली आहे... अपवाद फक्त मुथय्या मुरलीधरनचा, त्याने हा टप्पा 74 कसोटींमध्येच पार केला होता.
दिवसेंदिवस अश्विनच्या गोलंदाजीला अधिकच धार येत आहे आणि त्याच्या फलंदाजीची चमकही त्याने वारंवार दाखवली आहे. कसोटींमधील त्याच्या शतकांची संख्या पाच आहे. अनेकदा अनेकांना याचा विसर पडतो व ते केवळ गोलंदाज म्हणूनच त्याच्याकडे बघतात. आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनच त्याच्याकडे पाहिले पाहिजे. अक्षर पटेलदेखील चांगली फलंदाजी करू शकतो. कसोटीमध्ये मात्र अद्याप त्याला ते दाखवून देता आलेले नाही तरीही त्याच्यात फलंदाजी चांगल्या प्रकारे करण्याची कुवत आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे.
...तेव्हा आता सर्वांचे लक्ष अहमदाबादला मोटेरा स्टेडिअमवरच होणाऱ्या शेवटच्या कसोटीकडे असेल आणि त्या कसोटीत भारताचे उद्दिष्ट मालिका जिंकायचेच असायला हवे आणि त्यासाठी सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे गरजेचे आहे. सध्या कसोटी क्वचितच अनिर्णित राहते... त्यामुळेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवायचा तर केवळ ही कसोटी जिंकण्याचाच प्रयत्न भारताला करावा लागेल. गुलाबी चेंडूने खेळली गेलेली दिवसरात्रीची कसोटी जिंकल्याने खेळाडूंचा हुरूप वाढला असणारच. त्यांचा खेळही त्याला अनुरूप असाच व्हायला हवा.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)
Tags: क्रीडा क्रिकेट भारत इंग्लड कसोटी आ श्री केतकर Cricket Sports India England A S Ketkar Load More Tags
Add Comment