शिक्षणाचं मूळ मानवी संबंधांत आहे. एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याशी बोलतो, ऐकतो, समजून घेतो आणि शिकवण्याच्या पलीकडचं काहीतरी देऊन जातो. म्हणून चांगले विद्यार्थी चांगल्या शिक्षकांना आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि शिक्षकांसाठीही विद्यार्थी तेवढेच मौल्यवान असतात. आजच्या काळात AI आपल्या कामात मदत करेल, हे निश्चित आहे. पण विद्यार्थ्याला जीवनाचं भान, विचारांची दिशा आणि जिज्ञासेची ठिणगी शिक्षकच देतील.
आज शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या शुभेच्छांना उत्तर देता देता विचार येत गेले... मागच्या काही वर्षांत जग किती बदललं! आधी समाजमाध्यमं आणि आता एआय (AI), ChatGPT, डिजिटल टूल्स हे सगळंच दैनंदिन आयुष्याचा भाग झालंय. शिक्षणक्षेत्रात तर याचा खोलवर परिणाम होतोय. आता शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, चर्चांमध्ये सतत एकच प्रश्न ऐकायला मिळतो – AI मुळे शिक्षकांची गरज राहणार का?
ही काळजीची गोष्ट आहे खरी, कारण आता मुलांनी काहीही विचारलं की AI लगेच उत्तर देतं. घरात बसूनच अभ्यास, नोट्स, स्पष्टीकरण सगळं मिळू शकतं. मग प्रश्न असा पडतो की, शिक्षकांची काय गरज उरते? पण इथेच थोडं थांबायला हवं. AI उत्तरं / माहिती मिळवून देतं खरं, पण प्रश्न विचारायला शिकवतं का? तर त्याचं उत्तर कदाचित नाही असंच आहे. AI म्हणजे एक प्रॉम्प्ट-आधारित साधन आहे. तुम्ही काय विचाराल, त्यावर ते उत्तर देईल. एकच प्रश्न अनेक वेळा विचारलात तर अनेक वेळा एकच उत्तर देईल किंवा वेगळ्या पद्धतीने उत्तर मागितलेत तर तसेही देईल. कोणत्याही भाषेत देईल, उत्तरे देताना कधीच थकणार नाही, चिडणार नाही, शिक्षा सुद्धा करणार नाही. किंवा तुमच्याबद्दल कसलाही राग मनात धरणार नाही. त्याचे कुणी आवडते-नावडते विद्यार्थी नसतात. सर्वांना समान उत्तर देईल किंवा समोरच्याची प्रॉम्प्ट लक्षात घेऊन वेगवेगळी उत्तरे देईल. AI मानवी चुका करणार नाही कदाचित...
पण मूलभूत प्रश्न असा आहे की, शिकणे (मानवी दृष्टीकोनातून) ही एक निरंतर प्रक्रिया आहे. शिकणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे. त्यामुळे शिकणे शिकवणे ह्यात शिक्षकाची भूमिका ही एक facilitator अशी आहे. विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडणं, शंका घ्यायला शिकवणं हे काम शिक्षकांचं आहे. शिक्षक केवळ माहिती देत नाहीत, तर ते विद्यार्थ्याच्या डोक्यात विचारांची, प्रश्नांची साखळी निर्माण करतात. वर्गात एखादा प्रश्न विचारून, एखादी गोष्ट पटवून न देता उलट प्रश्न विचारून, ते त्या मुलाच्या मनात शिकण्याची उत्सुकता जागवतात. AI हे करू शकतं का? शिकणं म्हणजे फक्त उत्तरं मिळवणं नाही, तर योग्य प्रश्न शोधणं. आणि हे प्रश्न तयार होतात मानवी संवादातून, जे AI अजूनतरी करू शकत नाही असं मला वाटतं. शिक्षक म्हणजे फक्त 'माहितीचं यंत्र' नाही तर ते प्रेरणास्रोत असतात.
ChatGPT सारखं AI अतिशय उपयुक्त आहे, यात शंका नाही. हे काय काय करू शकतं तर संक्षिप्त उत्तरं देणं, नोट्स बनवणं, अभ्यासाचं वेळापत्रक आखणं, विषय सोपा करून समजावणं वगैरे... अर्थात माहितीचा स्रोत म्हणून शिक्षकाला मानवी मर्यादा नक्कीच आहेत. इंटरनेट किंवा AI इतकी माहिती एका साधारण शिक्षकाला असणं शक्यच नाही! खरं म्हणजे AI, Google लेन्स किंवा AI glasses सारखी साधनं म्हणजे शिक्षकांना हृदयात धडकी भरवणारी आहेत. पण अजूनतरी शिक्षकांची उपयुक्तता निश्चितपणे कमी झालेली नाहीये. शिक्षक नक्की काय वेगळे करतात तर ते विद्यार्थ्याचं मन वाचू शकतात! त्याच्या भीतीला ओळखतात, वर्गातली शांतता, गैरसमज, किंवा गोंधळ हाताळू शकतात. आणि योग्य वेळी योग्य उदाहरण देऊन शिकवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेरणा देतात... कधीकधी एखादा शब्द, एक हसू, किंवा एखादं वाक्य आयुष्यभर लक्षात राहतं हे कदाचित AI नाही करू शकणार.
शिवाय AI हे सोशल मीडियासारखं तुम्हाला आवडेल ती आणि तशी बाजू दाखवण्यासाठी प्रशिक्षित केलेले असतात (अल्गोरिदम). कारण AI बरीचशी माहिती रेडिट आणि फेसबुक यासारख्या समाजमाध्यमातून उचलतं. त्यामुळे माहितीची नकोशी बाजू दिसण्याची शक्यता कमी होते. आणि अर्थातच मग मतं पूर्वग्रहदूषित बनण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे मिळालेली माहिती पडताळायला शिकणे. याचसाठी विज्ञानाच्या शिक्षणात प्रयोगांना महत्व आहे. AI च्या बाबतीत ही शक्यता नजीकच्या भविष्यात तरी कमी राहणार आहे. आणि म्हणूनच AI हे साधन आहे, पण शिक्षकांचा पर्याय नाही असे म्हणावेसे वाटते.
सध्या बऱ्याच ठिकाणी AI चा विचार 'शिक्षक वजा' शिक्षणासाठी होतोय. पण ही दिशा चुकीची आहे. AI चा योग्य वापर झाला, तर शिक्षकांचा वेळ वाचेल, क्रयशक्ती वाढेल. शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे वैयक्तिक शिक्षण शक्य होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता वेगळी असते, तसे त्याच्या कलानुसार त्याला शिक्षण देणे शक्य होत जाईल. विद्यार्थ्यांना ताबडतोब मदत मिळू शकेल जिथे शिक्षक सदासर्वकाळ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असू शकत नाहीत. (त्यासाठीही internet ची उपलब्धता ही आवश्यक अट आहेच.)
म्हणजेच AI हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सहकारी ठरू शकतं, त्यांच्यामधील दुवा बनू शकतं, त्यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करू शकतं पण नजीकच्या भविष्यात तरी AI म्हणजे शिक्षकांसाठी पर्याय नक्की ठरणार नाही. अर्थात तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय कि हे वाक्य पुढे किती काळासाठी लागू पडेल सांगता येत नाही. आणि शिक्षकांकडे सहानुभूती (empathy) असते ती AI कडे नाही. म्हणून शिक्षकांना AI ज्या युगातही निर्विवाद महत्व आहे. शिक्षकांना काळजी वाटते, विद्यार्थी वर्गात नाही आले, त्यांना नाही एखादी संकल्पना समजली तर शिक्षक व्यथित होतात, पुन्हा पुन्हा शिकवतात. शेवटी आपण हे ही लक्षात घ्यावे लागेल शिकणं - शिकवणं म्हणजे मानवी संबंध आहेत.
आपण कितीही तंत्रज्ञान वापरलं, तरी शिक्षणाचं मूळ मानवी संबंधांत आहे. एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याशी बोलतो, ऐकतो, समजून घेतो आणि शिकवण्याच्या पलिकडचं काहीतरी देऊन जातो. म्हणून चांगले विद्यार्थी चांगल्या शिक्षकांना आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि शिक्षकांसाठीही विद्यार्थी तेवढेच मौल्यवान असतात. आजच्या काळात AI आपल्या कामात मदत करेल, हे निश्चित आहे. पण विद्यार्थ्याला जीवनाचं भान, विचारांची दिशा आणि जिज्ञासेची ठिणगी शिक्षकच देतील. एवढंच काय विद्यार्थी शिक्षकांचं वागणं, बोलणं, चालणं ह्या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करीत असतात. लहान मुलांचा तर आई वडिलांच्या सांगण्यावर जेवढा विश्वास नसतो तेवढा शिक्षकांवर असतो. विद्यार्थी शिक्षकांचं अनुकरण सुद्धा करीत असतात. समाज शिक्षकांचं जास्त कठोरपणे मूल्यमापन करतो ते यासाठीच. म्हणूनच आपल्याकडे शिक्षकांच्या शुध्द चारित्र्यालाही अतिशय महत्व आहे. आणि मला वाटते ते अवास्तव नाहीये.
हेही वाचा - Partnership of Human And Non-Human Intelligence by Vivek Sawant
परंतु दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी तर AI इतकं उपयुक्त आहे की बोलता सोय नाही. AI मुलांच्या सगळ्या assignments चुटकीसारशी पाहिजे त्या स्वरूपात पूर्ण करून देऊ शकतं. खरं म्हणजे तंत्रज्ञानापुढील आणि शिक्षकांपुढील सध्या असलेला मोठा प्रश्न म्हणजे काय AI आहे आणि काय genuine (human/ मानवी) आहे ते ओळखणे. आणि AI समोरील आव्हान म्हणजे गोष्टी जास्तीत जास्त मानवी स्वरूपात सादर करणे.
AI मुळे अभ्यासविषयातल्या गोष्टी शिकणं-शिकवणं अत्यंत वेगवान झालंय हे नक्की. पण त्यामुळे विद्यार्थ्यांची बैठक मारून अभ्यास करण्याची उर्मी / गरज / क्षमता हळूहळू कमी होईल की काय अशी भीती वाटते. त्यातही कल्पना करणे, critical thinking या गोष्टी सावकाश घडत असतात. AI सर्व गोष्टी अत्यंत जलद आणि instant स्वरूपात देत असल्याने मानवाचे मेंदू हळूहळू आळशी आणि निकामी होतील की AI उत्क्रांत होत असताना आणखी मोठे होतील आणि जास्त जलद काम करतील, हे पाहणे मजेशीर असेल.
शिक्षणात अभ्यासविषयांच्या पलीकडे जाऊन सामाजिक कौशल्ये, सहकार्य, संघर्ष निराकरण आणि नैतिक चौकटी तयार करणे यांचा समावेश करते, जे प्रभावीपणे शिकवण्यासाठी AI अजून तरी चाचपडत आहे. म्हणून AI च्या जमान्यातही चांगल्या शिक्षकांचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही.
तात्पर्य काय, तर येणाऱ्या भविष्यात जे शिक्षण असेल ते ‘AI + शिक्षक’ असेच असेल पण ‘शिक्षकाऐवजीबAI’ हे अजूनतरी शक्य नाही. त्याचबरोबर शिक्षकांनीही AI चा वापर आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. AI च्या सहाय्याने शिकवणे अधिक परिणामकारक, मनोरंजक, विद्यार्थीकेंद्रित करता येणे शक्य आहे.
- स्नेहलता जाधव
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)
Tags: शिक्षक शिक्षकदिन AI कृत्रिम बुद्धिमत्ता artificial intelligence प्रेरणा Load More Tags
Add Comment