एखादी शाळा चांगली करणं म्हणजे युध्द जिंकणं!

शिक्षकदिनानिमित्त उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांची मुलाखत 

कर्तव्य साधना

सध्या सांगली येथे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव माळी यांची शिक्षकदिनानिमित्त (5 सप्टेंबर) घेतलेली ही मुलाखत.

नामदेव माळी यांनी 1989 ते 1995 संगमेश्वर येथील पैसाफंड विद्यालय येथे शिक्षक म्हणून काम केले. काही काळ ते गटशिक्षणाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. चार कथासंग्रहदोन कादंबऱ्या यांसह नियतकालिकांतूनही त्यांनी विपुल लेखन केलं आहे. शाळाभेट ही त्यांची लेखमाला 2011च्या 11 जूनपासून साधना साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. त्यात त्यांनी भेट दिलेल्या मराठी माध्यमाच्या उपक्रमशील प्राथमिक शाळांविषयीचे लेख होते. विशेष म्हणजे या शाळा त्यांच्या कार्यक्षेत्रातील नव्हत्या. शिक्षणात असलेला रस त्यांना या वैशिष्ट्यपूर्ण शाळांकडे घेऊन गेला. नंतर 2014 आणि 2015 मध्ये आठ प्राथमिक शिक्षकांच्या आत्मवृत्तांचे साधनाचे दोन विशेषांक प्रकाशित झाले. त्यानंतर 'शाळाभेटव 'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तंही पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली.

 

प्रश्न- 'शाळाभेट' ही तुम्ही भेट दिलेल्या उपक्रमशील शाळांवर लिहिलेली लेखमाला साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तुम्ही संपादित केलेली 'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं'देखील साधनेत प्रसिद्ध झाली. साधना प्रकाशनाने या दोन्हींची पुढे पुस्तकंही काढली. या दोन्ही पुस्तकांच्या लेखनामागची तुमची प्रेरणा काय होती?

नामदेव माळी- गुणवत्ता वाढीसाठी धडपडणारे शिक्षक! खेड्यापाड्यातल्या, वाडीवस्तीवरच्या, झोपडीतल्या मुलांनी शिकावं म्हणून कित्येक शिक्षकांना आनंदानं काम करताना मी बघत होतो. हे सरकारी शाळांतील, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आहेत. त्यांच्यासोबत धडपडणारे अधिकारीही मी बघत होतो. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून गोरगरिबांची मुलं शिकतात. या शाळा टिकल्या पाहिजेत. नकारात्मक वातावरणात काम करणाऱ्यांचाही उत्साह मावळतो. तो उत्साह टिकावा, वाढावा, काम करणाऱ्यांचं कौतुक व्हावं, इतरांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी असं मला वाटत होतं. मी शिक्षण विभागात काम करतो आणि त्याविषयी समाजात वाईट बोललं जात असेल तर मी अस्वस्थ होणं साहजिक होतं. या अस्वस्थतेतून 'इथं चांगलं कामही होत आहे' हे सांगावंसं वाटलं.

‘शाळाभेट’च्या यशानंतरही मी आणखी शाळांना भेटी द्याव्यात, शाळांविषयी लिहावं म्हणून खूप आग्रह होत होता. मुलांनी आणि शिक्षकांनी लिहितं झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. महाराष्ट्रातून लिहिणारे विद्यार्थी व शिक्षक तयार झाले पाहिजेत, शिक्षकांनी त्यांच्या कामाविषयी स्वतः लिहायला हवं, म्हणजे शिक्षकांचं काम समाजासमोर येईल. एखादी शाळा चांगली करणं म्हणजे युद्ध जिंकणं असतं. यासाठी शिक्षकांना खूप संघर्ष करावा लागतो. युक्त्या-प्रयुक्त्या कराव्या लागतात, समाजामध्ये मिसळावं लागतं. एखाद्या शाळेला यश कसं मिळतं, त्यासाठी काय करावं लागतं याच्या कहाण्या इतरांपर्यंतही पोहचायला हव्यात. या कहाण्या, संघर्षकथा वाचून ‘आपणही हे करू शकतो, आपणही लिहू शकतो’ अशी इच्छा एखाद्या शिक्षकाला व्हावी यासाठीचा नमुना पाठ म्हणजे 'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं' आहेत. आज महाराष्ट्रात खूप मुलं आणि शिक्षक लिहित आहेत. मुलांची आणि शिक्षकांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत,होत आहेत याचाही आनंद आहे. 

प्रश्न-  'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं' या पुस्तकात अक्षरलेखन, कविता, वृक्षारोपण इथपासून ते कुस्ती, कबड्डी अशा विविध क्षेत्रांत रस असलेले, मुलांमध्ये त्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी काम करणारे शिक्षक तुम्ही निवडले आहेत. ही निवड कशी केलीत?

नामदेव माळी- माझ्या कामाचा भाग म्हणून शाळाभेटी करत असताना हे शिक्षक भेटत गेले. खरंतर ज्यांनी लिहिलं पाहिजे असे खूप शिक्षक होते, ज्या शाळांच्याविषयी लिहिलं पाहिजे अशा शाळाही होत्या. मी लिहिण्यासाठी शिक्षकांची निवड केली म्हणण्यापेक्षा शाळेतील काम पाहून, शाळा कोणत्या परिस्थितीतून उर्जितावस्थेला आली याचा विचार करून शाळेची निवड केली. अर्थातच काम शिक्षकांनी केलं असल्यानं ज्यांनी काम केलं त्यांनी लिहावं या न्यायानं शिक्षक निवडले. शाळांमध्ये, शाळेतील कामांमध्ये विविधता असावी यासाठी नंदीवालेवस्ती गोसावी, पारधी समाजाची वस्ती, बाजारपेठेचं गाव, द्विशिक्षकी शाळा, मोठ्या पटांच्या शाळा अशा विविध स्तरांतील शाळा निवडल्या. शिक्षक आणि महिला शिक्षकांनाही लिहायला सांगितलं. अमुक एक प्रकारच्या शाळेत यश मिळतं, अमुक अडचणींमुळं यश मिळू शकत नाही, पुरुष शिक्षकांना हे शक्य आहे हे गैरसमज दूर व्हावेत तसेच कल्पकतेचा आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येतं हा विश्वास निर्माण झाला पाहिजे हा यामागचा विचार होता.  

प्रश्न- यातील आठही शिक्षकांनी याआधी फारसं लेखन केलेलं नव्हतं. त्यांचे अनुभव लेखनातूनही प्रभावीपणे उतरावेत यासाठी तुम्ही त्यांच्याकडून लेखन कार्यशाळेत कसून काम करून घेतलं, असं सगळ्याच शिक्षकांनी पुस्तकाच्या शेवटी मनोगतात सांगितलं आहे. ही लेखन कार्यशाळा नक्की कशी होती?

नामदेव माळी- 'आत्मवृत्तं' लिहिण्यापूर्वी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लेखन कार्यशाळा घेतली होती. एकनाथ पाटील, जी. के. ऐनापुरे, गोविंद पाटील यांनी एका कार्यशाळेत मार्गदर्शन केलं होतं. आपले अनुभव, आपल्याला आवडलेलं लिहावं, अनुभवाचं आशयामध्ये रूपांतर कसं करायचं, सभोवतालच्या घटना कशा टिपायच्या, लेखन प्रक्रिया, इष्ट नसलेल्या गोष्टी वगळणे, भर घालणे याविषयी चर्चा आणि मार्गदर्शन झालं. आत्मवृत्तपर लेखन केलेल्या शिक्षकांची स्वतंत्र कार्यशाळा झाली नाही. प्रत्येकाचं लेखन वाचणं आणि त्यामध्ये बदल सुचवणं ही प्रक्रियाच खूप वेळा झाली. प्रत्येकाचं काम मोलाचं होतं, म्हणजेच लेखनाचा आशय सशक्त आणि मौल्यवान होता. योग्य शब्द वापरणं, छोटी वाक्यरचना, अनावश्यक शब्द - वाक्यं बदलणं, नेमकेपणानं लिहिणं, महत्त्वाचा भाग सूक्ष्मतेने आणि सविस्तर लिहिणं या गोष्टी वारंवार केल्या. अगदी मनाचं समाधान होईपर्यंत केल्या. पुस्तकात ते सविस्तर आलंय. 

प्रश्न- या दोन्ही पुस्तकांना मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. 'शाळाभेट'च्या सातेक वर्षात २५०००हुन अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. ही पुस्तकं वाचल्यानंतर मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या काही विशेष प्रतिक्रिया किंवा अनुभव तुम्ही सांगू शकाल?

नामदेव माळी- खूप अनुभव आहेत. 'एका बैठकीत वाचून झालेलं हे माझं पाहिलं पुस्तक आहे.' असं एका अधिकाऱ्यांनी पुस्तकावर प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं. पालक आपल्या शाळेतील शिक्षकांच्याकडे आपल्या शाळेतही 'शाळाभेट' सारखे उपक्रम करूया म्हणून आग्रह धरू लागले. या पुस्तकातील शाळांना लाखो रुपयांची मदत मिळाली. खरंच अशा शाळा आहेत काय म्हणून विचारलं जायचं. पुढे लोक या शाळा बघण्यासाठी जाऊ लागले. 'शाळाभेट'नंतर अनेक सरकारी शाळांतील शिक्षकांमध्ये उत्साह आला. कित्येक शिक्षकांनी नव्याने कामाला सुरवात केल्याचं सांगितलं. पुस्तकातील मनोगतामध्ये हे मी विस्तारानं लिहिलंय.

प्रश्न- सरकारी शाळांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणापेक्षा खासगी शाळांतून दिलं जाणारं शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आहे, असा सर्वसाधारण समज असतो. याबद्दल आपलं मत काय आहे?

नामदेव माळी- असं काही नाही. हा गैरसमज आहे. अलिकडचा 'असर'चा (Annual Status of Education Reportअहवाल पाहिला तर काही बाबतीत खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा अधिक गुणवत्तापूर्ण असल्याचे दिसते.

प्रश्न- मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 'पहिलीपासून इंग्रजी' हे धोरण राबवूनही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा का दिसतो? की ते धोरण नीट राबवलंच गेलं नाही? 

नामदेव माळी- सामान्यत: आपल्याकडे ज्या पद्धतीने इतर विषय शिकवले जातात त्याच पद्धतीने इंग्रजी विषयही शिकवला जातो. इंग्रजी विषयाकडे जास्त लक्ष दिलं जायला हवं. फक्त धोरणांची अंमलबजावणी नीट झाली नाही म्हणून इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढला, असं होऊ शकत नाही. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्याची लाट आली आहे, त्यात अनुकरणाचा भाग अधिक आहे. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवणं पालकांना प्रतिष्ठेचं वाटतं. इंग्रजी माध्यमातून शिकल्यानंतर माझ्या मुलाला फार काहीतरी मिळणार आहे, त्याची गुणवत्ता वाढणार आहे, यातच त्याचं कल्याण आहे या गोष्टीनं, विचारानं पालक भारावून जातात. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील झगमगाट, भौतिक गोष्टी, प्रदर्शन यामुळं पालक तिकडे आकर्षित होतात. परंतु इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांचं वेगळं काय झालं हे कुठंच समोर येत नाही. हा भुलभुलैया आहे. असं असलं तरी, मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी विषयाची आबाळ होत आहे, हे अमान्य करता येत नाही.

प्रश्न- इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी हा एक विषय असावा, असं तुम्हाला वाटतं का?

नामदेव माळी- आपल्याला मराठीचा अभिमान जरूर आहे आणि तो असायलाही हवा. म्हणून मराठी शिकायला हवं. त्याप्रमाणं ज्यांची मातृभाषा वेगळी आहे, त्या प्रत्येकाला ती शिकण्याचा अधिकार आणि सोय असायला हवी. मातृभाषा चांगली अवगत असेल तर दुसरी इतर भाषाही उत्तम होते या अर्थानेही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय असायला हवा.

प्रश्न- मुलांसाठी सुरुवातीला इंग्रजी माध्यम निवडणारे काही पालक तीन-चार वर्षांच्या अनुभवानंतर पुन्हा मराठी माध्यम किंवा सेमी इंग्रजी माध्यम निवडतात. याचं नक्की काय कारण असावं? आणि याचं प्रमाण साधारण किती असेल?

नामदेव माळी- प्रमाण नक्की सांगता येणार नाही. तरी ते अंदाजे पाच-दहा टक्के असावं. मूल इयत्ता तिसरी-चौथीमध्ये गेल्यानंतर पालकांच्या लक्षात येतं की, मुलाला इंग्रजी येत नाही आणि मराठीही येत नाही. त्यामानाने त्याच्या शेजारी मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलाचं मराठी कितीतरी चांगलं असतं. यामुळे पालकांचा भ्रमनिरास होतो. भलीमोठी फी आणि इतर खर्च करूनही हाती काहीच लागत नाही. अशावेळी काही सुज्ञ पालक मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घालतात. तर काही लाजेकाजेस्तव, अपमान वाटतो म्हणून किंवा स्वतःच्या हट्टासाठी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच ठेवतात. याचा अर्थ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सरसकट शिकवलं जात नाही असं नव्हे, पण जी मुलं मराठी माध्यमाकडे येतात त्यांच्या बाबतीत 'अपेक्षाभंग' हेच मुख्य कारण आहे.

प्रश्न- सर, तुम्ही कायमच प्रयोगशील शिक्षकांविषयी लिहित-बोलत आला आहात. शिक्षकदिनाच्या निमित्ताने- शिक्षकांमधील प्रयोगशीलता वाढावी म्हणून - तुम्ही शिक्षकांना काय सांगाल?

नामदेव माळी- जशा शिक्षक संघटना आहेत तसं उपक्रमशील शिक्षकांचंही संघटन व्हायला हवं. सध्या असे काही शिक्षक आहेत, जे वर्षातून एकदा एकत्र येतात, नव्या उपक्रमांविषयी चर्चा करतात. पण अशा शिक्षकांची संख्या वाढायला हवी. शिक्षकांनी एकत्र यावं, चर्चा करावी, कल्पनांची देवाणघेवाण करावी, चांगल्या शाळांना भेटी द्याव्यात, चांगल्या पुस्तकांवर चर्चा करावी आणि त्यातून सुचणाऱ्या गोष्टी आपल्या शाळेच्या गरजेनुरूप राबवण्याचे प्रयत्न करावेत.

प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता या संदर्भात साधना प्रकाशनाच्या सहा महत्वपूर्ण पुस्तकांचा संच 500 रुपयांत, संपर्क - 020-24459635

ही पुस्तके Amazon वरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा :
 

शाळाभेट – नामदेव माळी

आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं – संपादक: नामदेव माळी

न पेटलेले दिवे – राजा शिरगुप्पे

माझे विद्यार्थी – रघुराज मेटकरी

कवाडे उघडताच – प्रतिभा भराडे

माझी काटेमुंढरीची शाळा गो. ना. मुनघाटे

Tags: शिक्षकदिन Namdev Mali Teachers' Day मुलाखत Load More Tags

Comments:

हिंदूराव पवार

ही.पुस्तके जास्तीजास्त शिक्षकाःपर्यत जावीत .

विनोद वाघ

प्रयोगशील शिक्षकही खूप आहेत. असे शिक्षक व त्यांचे प्रयत्न समाजासमोर साततायाने यायला हवे.

Add Comment