2020 या वर्षाचे सहाच महिने होताहेत आणि जगात नुसती उलथापालथ होतेय असे वाटतेय. COVID-19 नंतर आपण सर्वजण एका स्थित्यंतराच्या टप्प्यात आहोत. आपल्याला हवे किंवा नको असले तरी खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. काही गोष्टी आधीपासूनच आपली जागा बनवण्याच्या प्रयत्नात होत्या आणि लॉकडाऊनमुळे ती संधी मिळाली. आता सर्वजण या गोष्टींकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहू लागले आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 'ऑनलाइन शिक्षण' !
आता नवीन सत्र सुरु होत असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा अजूनच जास्त गाजावाजा होऊ लागला आहे. मात्र याबाबत शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्येही प्रचंड संभ्रम आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि शासन यांपैकी कुणालाच नक्की काय भूमिका घ्यायची हे समजत नाहीये. तर दुसरीकडे, केंद्र शासन नवीन ‘शिक्षा नीती’ आणायची तयारी सुरु झाली आहे. यंदा संसदेची अधिवेशनेही व्हर्चुअल होतील अशी स्थिती आहे. या परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन वर्ग घेण्याचा दबाव वाढतोय.
माझे स्वतःचे याबद्दलचे मत बरेच नकारात्मक आहे. मी मायक्रोबायोलॉजी शिकवते आणि मला मुलांसमोर शिकवणे चांगले वाटते. मुले समोर असतील तर त्यांच्या चेहऱ्यांवरून मला अंदाज येतो. त्यांना समजते आहे की नाही, कंटाळा आलाय का, थांबायचे किंवा पुन्हा सांगायचे आहे का, कधी वेगळ्या शब्दांत पुन्हा सांगायचे का, कधी उदाहरणे देऊन सांगायचे का या साऱ्यांचा अंदाज घेता येतो.
कॅमेऱ्यासमोर शिकवायचे झाले तर वर्गाशी जो संवाद व्हायला हवा तो होणार नाही आणि 'कन्टेन्ट डिलिव्हरी' तेवढी परिणामकारक होईल की नाही याबद्दलही शंका आहे. थोडक्यात, दोन्ही बाजूंनी हा एक कंटाळवाणा प्रयोग होईल. पण वर्गात शिकवताना सुद्धा सगळ्या मुलांना सगळे समजते असे नाहीच. उलट लेक्चर विडिओच्या स्वरुपात असेल तर मुले पाहिजे त्या वेळी, कितीही वेळा बघू शकतात, जे वर्गात शक्य नाही.
ऑनलाइन शिक्षण देणारे बरेच प्लॅटफॉर्म्स आधीपासून उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत तुम्ही देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांची प्रमाणपत्रे मिळवू शकता. या तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून तुम्ही जगातल्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळवू शकता. सोबत परीक्षा देऊन तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळते. काहीवेळा ही सर्टिफिकेट्स कामाला येऊ शकतात, पण बऱ्याचदा ती फक्त आपल्या फाईलची जाडी वाढवण्याच्या कामाचीच असतात.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या swayam.gov.in या पोर्टलवर भारतातील नामांकित संस्थांच्या शिक्षकांनी तयार केलेले कोर्सेस येथे अगदी विनामूल्य उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयात अद्ययावत माहिती मिळवू पाहणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. परीक्षेचे तेवढे पैसे भरावे लागतात. यातील प्रत्येक कोर्ससाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शेवटच्या निकालात क्रेडिट्स मिळतील असे भारतातील बऱ्याच विद्यापीठांनी जाहीर केले आहे. तरीही गेल्या दोन वर्षात माझ्या महाविद्यालयातून एकाही विद्यार्थ्याला एकही कोर्स पूर्ण करता आलेला नाहीये. (माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थीसंख्या जवळपास 1000 इतकी आहे.)
मी स्वतः जेव्हा यातील काही कोर्सेस करायचा प्रयत्न केला तेव्हा मला रजिस्टर करून मधूनच सोडून द्यावे लागले. ऑनलाईन शिक्षणाचे इतके फायदे असूनही मला ते विडिओ बघणे जमले नाही, कारण त्यासाठी वेगळा वेळ माझ्या वेळापत्रकात मध्ये बसवणे मला जमले नाही. नंतर बघू, पुन्हा बघू असे म्हणत कोर्स संपून गेला.
काही सेल्फ-पेस्ड (स्वतःच्या सोयीने बघता आणि करता येतील असे) कोर्सेसही असतात, पण त्यांच्याकडे बघणे तर अतिशय रेंगाळले. हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट म्हणजे मला विडिओ लेक्चर्स अतिशय कंटाळवाणे वाटले. मोबाईलवर विडिओ बघण्याचा 'अटेन्शन स्पॅन' लक्षात घेतला तर हे विडिओ खूप लांबलचक आणि कंटाळवाणे होते. त्याचवेळी मोबाइलवर मनोरंजन करणारे बरेच पर्याय मला सहजासहजी मिळत होते. अर्थात लक्ष भरकटवणाऱ्या गोष्टी खूप असतात.
एक प्राध्यापक असून मला या लक्ष भरकटवणाऱ्या गोष्टींपासून पासून लांब राहता आले नाही तर माझ्यापेक्षा लहान, अप्रगल्भ मुले ते करू शकतील अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही. शिवाय एखादा माणूस किती काळ स्क्रीन कडे बघू शकतो? सलग पाच सहा तास वगैरे??
हे दिव्य पार करूनही बरेच लोक कोर्सेस पूर्ण करतात. अशी मंडळी अतिशय निष्ठावान विद्यार्थी असतात. त्यांना शिक्षणाबद्दल खरोखर आत्मीयता वाटते, किंवा शिक्षणाचे महत्त्व किंवा किंमत समजलेली असते. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अजूनही शिक्षणाचे महत्त्व लोकांना समजलेले नाही, समजलेले असेल तर उमजलेले नाही किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत वेळ निघून गेलेली आहे.
पण खरोखर ज्ञान मिळवायचे असेल तर अशा पूर्व बांधणी केलेल्या कोर्सेसची गरजच काय आहे? आपण माहितीच्या महापुरात जगतोय. जगातल्या कोणत्याही विषयावरची अद्ययावत आणि सखोल माहिती आपल्या बोटांवर येऊ शकते काही सेकंदात आणि मग या ऑनलाईन मिळणाऱ्या सर्टिफिकेट्स गरजच काय?
माझ्या संपर्कातील जवळपास 500 वेगवेगळ्या मुलामुलींशी मी जेव्हा बोलायचा प्रयत्न केला तेव्हा वास्तव लक्षात आले. swayam.gov.in पोर्टल बद्दल माहिती असूनही कुणीही एकही ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेला नाही. कारण मुलांना नवीन तंत्रज्ञानाची भीती वाटते, काहींना संभ्रम आहे की आपल्याला ते जमेल की नाही. आणि बहुतांश मुले भवितव्याबाबत फार उदासीन आहेत. मी विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर मते मागवली तर केवळ चार-पाच जण बोलते झाले. बाकीच्यांना काही सोयर सुतक नव्हते, किंवा लोकांनी संदेश तपासण्याचे कष्ट घेतले नाहीत, किंवा काही लोकांपर्यंत पोहोचलेही नसतील.
आता वेगवेगळ्या संस्थानी शिक्षकांसाठी 'फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्स' सुरु केले आहेत. ऑनलाइन शिक्षण कसे देता येईल, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची कोणती साधने, कोणकोणते ऍप्लिकेशन्स आहेत याविषयीची माहिती दिली जाते. अद्ययावत व्हायचा प्रयत्न शिक्षक करताहेत, पण हातात वेळ नाहीये. ‘काय करू नि काय नको’ इतके ते गोंधळलेले आहेत.
कॅम्पसच्याबाबतीत बोलायचे झाले तर कॅम्पस एक वातावरण देते. कॅम्पसमधून तुम्हाला मित्र-मैत्रिणी मिळतात. आठवून बघा की, आपल्या आयुष्यातले खूप चांगले म्हणावे असे मित्र-मैत्रिणी आपल्याला शाळा आणि महाविद्यालयांत मिळाले होते. ऑनलाईन शिक्षणात ही शक्यता किती? आणि महाविद्यालयात मुले/मुली फक्त शिकायलाच येतात असे नाही. विद्यार्थी संघटना, विद्यार्थी आंदोलने किंवा विद्यार्थ्यांचे राजकारण या गोष्टी सुद्धा होतात कॅम्पसमध्ये. मुलांची सामाजिक कौशल्ये, नेतृत्व गुण वाढीस लागतात. मुलांच्या बौद्धिक व वैचारिक वाढीसाठी कॅम्पस एक 'इनक्यूबेशन सेंटर' म्हणून काम करते. ऑनलाईनचा पाढा म्हणताना विद्यार्थ्यांना या गोष्टींना मुकावे लागेल.
महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळची एक गंमत सांगते. मुलीने विज्ञान शाखेकडे जावे म्हणून एक पालक अडून बसले होते. मुलीला मात्र तिच्या मैत्रिणीबरोबर कलाशाखेकडे जायचे होते. मी पालकांना विचारले, ‘असे का?’ तर म्हणाले, ‘विज्ञान शाखेला चांगल्या मुली येतात, हुशार असतात, राहणीमान चांगले असते, त्यांच्यात राहून आमची मुलगी जरा स्मार्ट होईल, चांगली राहील, मेक-अप वगैरे शिकेल. शिवाय बी. एससी. म्हटले की स्थळे चांगली मिळतात.’ म्हणजे शिकून तुमचे जीवनमान बदलत असेल तर हेही शिक्षणाचे यशच म्हणायला हवे. नाही का?
महाविद्यालय मुलींसाठी आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे आहे. अजूनही बऱ्याच पालकांची मुलींना शिकवण्याची अनिच्छा असते. कधी एकदा तिचे लग्न लावून रिकामे होतो या विचारात पालक असतात. तर मुलगी जास्त घरी बसायला लागली तर शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडल्यामुळे त्यांना एक आत्मविश्वास मिळतो.
सार्वजनिक ठिकाणी महिलांची संख्या आधीच कमी असते. त्यामुळे बायकांना एकट्याने बाहेर पडणे आधीच नकोसे वाटते. अगदी आता लॉकडाऊन काळातसुद्धा घरगुती हिंसाचाराच्या घटनांची संख्या वाढली. अर्थात असे घर हे महिलांसाठी तुरुंग असू शकते. त्यांना बाहेर पडायचे जास्तीत जास्त पर्याय आपल्या व्यवस्थेने तयार करायला हवेत. तरच स्त्रिया 'आत्मनिर्भर' होण्याची संख्या वाढणार आहे.
शासन मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या या नव्या ट्रेंडला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले दिसत आहे. शिक्षणासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या खर्चात यामुळे बरीच बचत होणार असेच दिसते. म्हणजे नवीन इमारती बांधणे नको की नवीन शिक्षक नको. लोक घराबाहेर पडणार नाहीत, म्हणजे कमी ट्रॅफिक, कमी इंधन, कमी अपघात. असे कितीतरी फायदे आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा एक फायदा असा आहे की शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षकांचे दर्जेदार शिक्षण आपल्या ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा उपलब्ध होऊ शकते. पण तरीही या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण आणि शहरी भागातली दरी अजून वाढणार की कमी होणार हा प्रश्नही आहेच.
माझ्या परदेशातील मित्र-मैत्रिणींशी बोलले तेव्हा लक्षात आले की तिकडे ऑनलाईन शिक्षण आधीपासूनच मुख्य प्रवाह म्हणावे एवढ्या प्रमाणात चालू आहे. शिवाय प्रत्येकाकडे लॅपटॉप वगैरे असतो त्यामुळे COVID-19 मुळे शिक्षणात खंड पडला, वगैरे असे काही झाले नाही. आपल्याकडे मात्र अशा पायाभूत सुविधांचा वानवा आहे. आपण सर्वांना स्क्रीन/अखंडित इंटरनेट आणि वीज देऊ शकतो का? नाही! ही शिक्षणातली नवी असमानता आहे!
आणखी एका प्रश्नाकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे, ते म्हणजे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांचे शंकानिरसन कसे करता येईल? आता जे उपलब्ध पोर्टल्स आहेत त्यावर तुम्ही प्रश्न विचारला तर एक-दोन दिवसात तुम्हाला त्याचे इतर मिळते. पण त्यामुळे शिकणे-शिकवणे ही प्रक्रिया प्रलंबित होते असे मला वाटते. अर्थात ही पद्धत काही लोकांसाठी जास्त सोयीस्कर असू शकते.
आणखी एक गोष्ट म्हणजे, हे ऑनलाईन शिक्षण देताना विद्यार्थी उपस्थित आहे आणि लक्ष देतो / देते आहे याचीची खात्री कशी करता येईल? म्हणजे झूमसारख्या प्लॅटफॉर्मवर एखादा माणूस लॉगिन झाला की कळते हे खरे आहे. पण तो विद्यार्थी पूर्ण वेळ बसला आहे आणि लक्ष देतोय / देतेय हे कसं निश्चित करणार? एकीकडे लेक्चर चालू करून तो इतर कामे करू शकेल किंवा बाहेर फिरून येऊ शकेल. किंबहुना लाईव्ह लेक्चरमध्ये असे होण्याचीच शक्यता जास्त आहे.
वरील दोन्ही समस्यांवर ‘सतत परीक्षा घेणे’ हा एकच उपाय दिसतो. पण त्यातही कॉपी करणे किंवा उत्तरे फक्त विचारून लिहिणे होऊ शकतेच. याला आपण/ किंवा तंत्रज्ञान कसे आळा घालू शकतो हे पाहणे येत्या काळात रोचक ठरणार आहे. छोट्या मोठ्या सर्व कन्टेन्ट डेव्हलपर कंपन्या मात्र यासाठी फार सरसावून बसल्या आहेत. त्यांना आता नवीन क्षेत्र मिळाले आहे हातपाय पसरायला.
माझ्या मते शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शासन अशा सगळ्यांनाच आता आपल्या मानसिकतेत बदल करावा लागणार आहे. शिक्षकांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. काळाबरोबर राहावे लागेल. ऑनलाइन शिक्षणाच्या व्यवसायाला भांडवल जास्त लागत नाही त्यामुळे अनेक बेरोजगार हुशार तरुण याकडे संधी म्हणून पाहतील यात आश्चर्य नाही.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विद्यार्थी ज्या प्रमाणात स्क्रीनवरील प्रलोभनांना बळी पडतात ते लक्षात घेता शिक्षण जास्तीत जास्त मनोरंजनात्मक करावे लागेल. आपण जाहिराती आणि मनोरंजनाच्या जगात जगत आहोत, जगणार आहोत. मुलांना शिक्षणाचा विषय रोचक कसा वाटेल याकडे लक्ष द्यायला हवे.
विद्यार्थ्यांनी प्रलोभनांना बळी न पडता हुशारीने नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत. कारण पुस्तकी शिक्षण खरोखरच कालबाह्य होते आहे. आपली परीक्षा पद्धतीसुद्धा आपण किती ज्ञान 'लक्षात ठेवू' शकतो यावर आधारित आहे. आता आपल्याला हवी ती माहिती फक्त एका क्लिकवर मिळत असेल तर ही पद्धत फार काळ चालेल असे वाटत नाही.
पालकांनी आता मुलांच्या स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे सोडून तो कसा जास्तीत जास्त उत्पादक आणि सुरक्षित राहील याकडे लक्ष द्यावे लागेल. ज्याप्रमाणे सगळे शिक्षण पुस्तकांतून / शाळेतून मिळत नाही, तसेच ऑनलाइन शिक्षणातूनच त्याला सगळे मिळेल असेही नाही. त्यामुळे आपला पाल्य आसपासचे जग अनुभवून भरभरून जगायला शिकेल याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याच्या संवेदना जागृत राहून तो येणाऱ्या नवीन जगात कसा बळकटपणे उभा राहील हे पाहावे लागेल.
तात्पर्य काय तर COVID-19 नंतर जग बदलणार आहे. आणि आपण या बदलांसाठी तयार होऊयाकुसुमाग्रजांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!’
- स्नेहलता जाधव
snehalatajj@gmail.com
वाचा याच लेखिकेचा साधना अर्काईव्हवरील रिपोर्ताज: (महिला) बस कंडक्टर्स
Tags: ऑनलाईन शिक्षण कोरोना तंत्रज्ञान स्नेहल जाधव Snehal Jadhav Education Online Education Technology Swayam COVID-19 Corona Load More Tags
Add Comment