माध्यमांनी दुर्लक्षिलेल्या दोन संस्था

कर्तव्य साधना

शिक्षण क्षेत्रात संशोधन आणि प्रचार-प्रसारासाठी काम करणाऱ्या ‘प्रथम’ या संस्थेची मागील महिन्यात रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती झाली. पर्यावरण क्षेत्रात संशोधन आणि संवर्धन यांसाठी काम करणाऱ्या ‘कल्पवृक्ष’ संस्थेलाही वर्षभरापूर्वी चाळीस वर्षे पूर्ण झाली. या दोन्ही वर्धापनदिनांची दखल माध्यमांनी घेतली नाही. मग ती मुख्य प्रवाहातील माध्यमे असोत, समांतर माध्यमे असोत, की डिजिटल वा मुद्रित माध्यमे असोत. ‘प्रथम’ आणि ‘कल्पवृक्ष’ या संस्थांचे कार्य उल्लेखनीय तर आहेच, पण ज्या शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात या दोन संस्था काम करत आहेत ते भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष दुर्दैवीच म्हणावे लागेल. या दोन्ही संस्थांना मी अनेक वर्षांपासून ओळखत असल्यामुळे माध्यमांचे मौन भेदून राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या या संस्थांना मानवंदना देण्याचा मी विचार केला. 

दिल्लीमधील उच्च माध्यमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 1979 मध्ये ‘कल्पवृक्ष’ संस्थेची स्थापना केली. खरे तर मी त्यातील काही जणांची नावेही सांगू शकेन. पण वैयक्तिक स्तरावर ओळखले जाणे कल्पवृक्षच्या संस्थापकांना मान्य नसल्यामुळे ते मला तसे करू देणार नाहीत. त्यामुळे त्यांची नावे सांगण्याऐवजी त्यांच्या कार्याविषयी सांगेन. राजधानी दिल्लीच्या परिसरातील पर्यावरणामध्ये रस असल्यामुळे, अरवली पर्वतरांगांतील वृक्ष आणि पक्षी यांच्या अभ्यासासोबतच शहरी अतिक्रमणापासून आणि अनियमित खाणकामापासून या परिसराचा बचाव करण्याच्या प्रेरणेतून केव्ही- KV- ची (त्यांनीच स्वतःसाठी निवडलेले नाव) सुरुवात झाली.

1980 च्या सुरुवातीला कल्पवृक्षच्या सदस्यांनी दिल्लीच्या बाहेरही आपल्या कार्याचा विस्तार केला. चिपको आंदोलनातील आंदोलकांसोबत त्यांनी हिमालयात प्रवास केला. या पर्वतरांगातील पर्यावरणाचा विध्वंस होत आहे आणि व्यावसायिक वनीकरणामुळे तेथील गाव-खेड्यांची आर्थिक घडी विस्कटून जात असल्याचा इशारा चिपकोच्या आंदोलकांनी त्यांना दिला होता. पुढे त्यांनी स्वतः नर्मदा खोऱ्यामधून प्रवास केला. नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणांच्या विशाल साखळीमुळे तेथील आदिवासी जमातींच्या जीवनमानावर काय परिणाम होत आहे  याचा त्यांनी अभ्यास केला. ‘इकनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’ या नियतकालिकाच्या जून 1984 च्या अंकात त्या अभ्यासाचा अहवाल प्रकाशित केला. या अहवालाने समाजसेविका मेधा पाटकरांचे लक्ष वेधून घेतले. लवकरच मेधाताई नर्मदा खोऱ्यात पोहोचल्या आणि धरणांमुळे बेघर व स्थलांतरित व्हावे लागणाऱ्या बाधितांसाठी त्या काम करू लागल्या.   

कल्पवृक्षच्या संस्थापक सदस्यांपैकी काहींनी आपली बांधिलकी इतर क्षेत्रांकडे वळवली. काहींनी पत्रकारितेमध्ये प्राविण्य मिळवले, काहींनी मानवाधिकारांसाठी चळवळ उभी केली, तर  काही जण विद्यापीठांमध्ये प्राध्यापक झाले. त्यातले काहीजण आपल्या मूळ ध्येयाशी प्रामाणिक राहून शाश्वत पर्यावरणीय भविष्याचा आलेख रेखाटत राहिले. स्थानिक समुदायांसोबत काम करत त्यांनी नाश पावत चाललेल्या परीसंस्थांचे पुनर्वसन करण्यासाठी ईशान्य भारत, पश्चिमी घाट, अंदमान-निकोबार बेटे यांसारख्या दुर्गम आणि संवेदनशील भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला. कल्पवृक्षचे मुख्यालय आता पुण्यात आहे. चाळीस वर्षांपूर्वी ज्या ध्येयवादाने ही संस्था उभी राहिली ती आज हि त्याच उत्साहाने आणि उर्जेने काम करत आहे. 

‘प्रथम’ची स्थापना जानेवारी 1995 मध्ये मुंबई येथे झाली. त्याचे मुख्य संस्थापक माधव चव्हाण आणि फरीदा लांबे या दोघांना संशोधनाची आणि शिक्षकी पेशाची पार्श्वभूमी आहे.  दोघांमध्येही प्रबळ सामाजिक विवेक जिवंत आहे. आपल्या कामाची सुरुवात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्ट्यांतील मुलांपासून केली. कौटुंबिक खर्चाला हातभार लावण्यासाठी ही मुले शाळा सोडून काम करत असत. स्वतःच्या शहरामध्ये भरपूर काम करून विश्वासार्हता मिळवल्यानंतर ‘कल्पवृक्ष’प्रमाणेच ‘प्रथम’नेही आपले पंख आणखी दूरपर्यंत पसरवायला सुरुवात केली. ‘प्रत्येक मूल शाळेत जावे आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे’ हे ध्येय समोर ठेऊन काम करताना या घडीला ‘प्रथम’चे एकूण 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत काम सुरु आहे. 

शिक्षक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमांतील बदल व विकास यांमध्ये ‘प्रथम’ने नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. दहा हजारांहून अधिक शाळांमधून ‘प्रथम’ काम करते. त्यांच्या  प्रशिक्षकांचे जाळे भारतभर पसरलेले आहे. ते लहान मुलांच्या मुलभूत कौशल्य विकासावर भर देतात; विशेषतः वाचन आणि अंकगणित. ‘प्रथम’चा संशोधनाचाही एक सक्षम विभाग आहे. अनेक वर्षांपासून प्रथम वार्षिक शैक्षणिक अहवाल प्रकाशित करते. त्यातून  प्रथमच्या कामाचा आवाका  ठळकपणे दिसून येतो. या अहवालांमुळे भारताच्या विविध राज्यांतून वयानुरूप आणि विषयानुरूप झालेल्या शिक्षणाच्या फलनिष्पत्तीचे दस्तऐवजीकरण होत आहे. ‘असर’चे हे अहवाल (ASER-Annual Status of Education Report) शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांसाठी सोन्याची खाणच ठरली आहे. परिणामकारक सार्वजनिक धोरणे आखतानाही या अहवालांचा उपयोग होतो.  ‘प्रथम’ प्रकाशनाने (Pratham Books) विद्यार्थांसाठी आकर्षक आणि सचित्र अशी शंभराहून जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. विविध विषयांवरील ही पुस्तके अनेक भाषांमधून प्रकाशित झाली आहेत. 

मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात पर्यावरणाचा अभ्यासक म्हणून केली असल्याने कामानिमित्ताने माझा ‘कल्पवृक्ष’शी जवळून संबंध आलेला आहे. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक नसल्यामुळे ‘प्रथम’च्या कार्याविषयी मी त्याच अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. मात्र प्रथमच्या संस्थापकांशी आणि सहकाऱ्यांशी  वेळोवेळी भेटीगाठी झालेल्या आहेत. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची वचनबद्धता, टीका सहन करण्याची आणि त्यातून शिकण्याची त्यांची तयारी या गुणांमुळे मी प्रभावित झालो आहे. ‘प्रथम’च्या प्रशंसकांमध्ये नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी आणि इस्थेर डूफ्लो यांचा समावेश होतो. या जोडीने आपले बरेचसे संशोधन कार्य प्रथमच्या सहयोगानेच केलेले आहे. 

कल्पवृक्ष आणि प्रथम या दोन्ही संस्थांच्या कार्याविषयी माहिती असल्यामुळे या दोन्ही संस्थातील अनेक समांतर गोष्टी माझे लक्ष वेधून घेतात. आपल्या कामाची सुरुवात एका शहरापासून करत-‘कल्पवृक्ष’ने दिल्लीमध्ये तर ‘प्रथम’ने मुंबईमध्ये-आपली मुळे तिथे घट्ट रोवली. त्यानंतर त्यांनी देशभर आपल्या कामाचा विस्तार केला. दोघांनाही उत्पादनक्षम आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळाले मात्र त्यांचे खोलवर रुजलेले भारतीय संदर्भ अबाधित राहिले. दोघांनाही नाविण्यता, मुलभूतता आणि संशोधन यांचे महत्व पटलेले आहे. दोघांनीही महत्त्वाची पुस्तके आणि आपल्या संशोधनातून आलेल्या निष्कर्षांवर आधारित पुस्तकांच्या मालिका अणि अहवाल प्रकाशित केले आहे. लोकांचे विचार आणि सरकारी योजना या दोन्हींवर आपल्या कामाचा परिणाम व्हावा अशी दोघांचीही इच्छा आणि आकांक्षा आहे. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘कल्पवृक्ष’ आणि ‘प्रथम’ या दोन्ही संस्थांच्या नेतृत्वाने स्वतःपेक्षा संस्थेला कायम वर ठेवले आहे. भारतातील अनेक सेवाभावी संस्थांमध्ये याच्या नेमके उलटे चित्र पाहायला मिळते. त्या सेवाभावी संस्थांची कथा बऱ्याचदा संस्थापकाच्या करिष्मा व व्यक्तिमत्वापाशी सुरु होते आणि तेथेच संपते.

भारतातील या दोन महान संस्थांच्या वर्धापनदिनांची दखल माध्यमांनी घेतली नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. भारतीय माध्यमे एकतर येऊ घातलेल्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेली असतात नाहीतर होऊन गेलेल्या निवडणुकांविषयी चर्वितचर्वण करत असतात. अमका मंत्री काय म्हणाला किंवा विरोधी पक्षाच्या तमक्या नेत्याने काय ट्वीट केले याचेच विश्लेषण ते करत राहतात. एकूणच माध्यमे राजकारणाच्या आहारी गेलेली आहेत. निवडणुका आणि राजकीय पक्ष यांनी पछाडलेल्या माध्यमांमध्ये शिक्षण आणि पर्यावरण यांसारख्या विषयांना जागा मिळणार तरी किती! आपल्या देशातील शाळा आणि महाविद्यालयांची स्थिती, आपल्या देशातील हवा, पाणी, माती आणि जंगलांची स्थिती या महत्त्वाच्या घटकांवर आपल्या देशाचे भविष्य अवलंबून आहे हे मात्र खरे. त्यामुळे ‘कल्पवृक्ष’ आणि ‘प्रथम’सारख्या संस्थांच्या कार्याकडे आणि प्रतिपादनाकडे अधिक चाणाक्षपणे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. या दोन्ही संस्थांच्या संकेतस्थळांना भेट देऊन आपण याची सुरुवात करू शकता. 

(अनुवाद- मृदगंधा दीक्षित)

- रामचंद्र गुहा

Tags: अनुवाद पर्यावरण संस्था प्रथम असर कल्पवृक्ष Ramchandra Guha Environment Ecology Institutions Pratham Kalpvriksha Load More Tags

Comments:

Vipul chaudhari

Thank you for acknowledged to both organizations. I also part of Pratham org and i proud for it.

Urmila Raghvendra Chakurkar

Very important article. I will share it with my friends. Such people need to be acknowledged to strengthen them.

l. s. khamkar

खूप छान लेख आहे.

Ratnakar Pawar

अप्रतिम लेख , अप्रतिम संस्था आणि तितकेच अप्रतिम त्यांचे काम.

Add Comment