आत्मविश्वास आणि स्वावलंबन देणारी 'दादाची शाळा'

रस्त्यावरच्या मुलांसाठी शिक्षणातून सक्षमीकरण

‘दादाची शाळा’ नावाची एक संस्था पुण्यातल्या रस्त्यांवर आणि हंगामी वस्त्यांवर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून, ती शिकत राहतील याची काळजी घेत आणि शाळेबाहेरही त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमधून, अनुभवांमधून दर्जेदार शिक्षण देत प्रभावी काम करत आहे. आजवरच्या त्यांच्या कामाची ओळख लोकांना व्हावी, आणि लोकांचा सक्रिय सहभाग वाढावा या हेतूने संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने रस्त्यावरच्या शाळेचे छायाचित्र प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व कलादालन येथे 21 ते 23 मार्च 2025 या काळात भरवण्यात येत आहे. त्या निमित्ताने घेतलेली संस्थापक अभिजीत पोखरणीकर यांची मुलाखत.

‘दादाची शाळा’ कशी सुरू झाली? 
या कामासाठी मला पद्मश्री सिंधुताई सपकाळ (माई) यांच्याकडून प्रेरणा मिळाली. मी विद्यार्थीदशेत असल्यापासून माईंसोबत काम करत होतो. सहा वर्षं त्यांचा प्रेमळ आणि प्रेरक सहवास मला लाभला. आपण आयुष्यात काहीही केलं तरी समाजाला देणं लागतो ते विसरायचं नाही, आपला वाटा उचलत राहायचा हे मी माईंकडून शिकलो.

कॉलेजला असताना आम्ही मित्र भेटायचो त्या चहाच्या टपरीजवळच्या सिग्नलवर बरीच मुलं फिरताना, भीक मागताना, लहानमोठ्या वस्तू विकताना दिसायची. त्या मुलांशी बोलून कळलं की ती कोणीच मुलं शाळेला जात नाहीत. काहीजण कधीच शाळेत गेलेले नव्हते आणि काही जणांना शाळा सोडावी लागली होती. त्या मुलांना पाहून फार अस्वस्थ वाटायचं पण केवळ हळहळ व्यक्त करून काही उपयोग नव्हता, म्हणून मग मी कृतीची वाट निवडली. संध्याकाळच्या वेळी तिथल्याच आजूबाजूच्या मोकळ्या जागेत या मुलांना थोडं थोडं शिकवायला सुरुवात केली. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात मी एक शिक्षक आणि 17 विद्यार्थी असलेली रस्त्यावरची आमची शाळा. ती मुलं मला मला दादा म्हणायची म्हणून ‘दादाची शाळा’. 

या कामाविषयी कळत गेलं तशी माझी काही मित्रमंडळी शिक्षक म्हणून या कामात सामील झाली. शुभम माने, शुभम वेल्हेकर, आणि आणखी काही जण असे आम्ही सात-आठ मित्र शिक्षक म्हणून काम करायला लागलो, विद्यार्थीसंख्याही 60 पर्यंत वाढली. पहिली अडीच वर्षं आम्हा स्वयंसेवकांच्या गटात अनौपचारिकपणेच हे काम चालू होतं. संस्था अशी नव्हती.

आमच्यासोबत असलेले स्वयंसेवक-शिक्षक पुण्याच्या वेगवेगळ्या भागांत राहणारे होते. त्यातल्या काही जणांना मार्केट यार्ड फार लांब पडायचं. मग एकेका विशिष्ट परिसरातल्या स्वयंसेवक मित्रांनी एकत्र येऊन त्यांच्या जवळपासच्या भागात हा उपक्रम सुरू केला. कात्रज, झेड ब्रिज, सारसबाग, टिळेकरनगर, बिजलीनगर, पिरंगुट, आकुर्डी, हडपसर, पाषाण, विश्रांतवाडी अशा ठिकाणी सिग्नलच्या आसपास किंवा एखाद्या वस्तीवर ‘दादाच्या शाळा’ सुरू झाल्या. आमच्या सगळ्या शाळांमध्ये मुलांची संख्याही वाढत वाढत 250 च्या घरात गेली.

हे काम सातत्याने करायचं असेल, त्यात मुलांना फी-माफी हवी असेल तर संस्था रजिस्टर करावी लागेल हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही संस्थानोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आणि एज्युकेअर (दादाची शाळा) एज्युकेशनल ट्रस्ट ही संस्था उभी राहिली. आता संस्था स्थापन होऊन पाच वर्षं पूर्ण होत आहेत.

2021 मध्ये आम्ही पुण्यामध्ये एक सर्व्हे केला होता. त्यानुसार तेव्हा पुणे शहरात सिग्नलवर राहणारी 14,427 मुलं होती. या सर्वांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देणं, आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व आकाराला आणणं हे आमच्या संस्थेचं ध्येय आहे. त्यातल्या 1700 हून अधिक मुलांपर्यंत पोहोचण्यात दादाच्या शाळेला यश आलं आहे. अजून बरंच काम बाकी आहे.

आता मुंबईत बोरिवलीला ‘दादाची शाळा’ सुरू झाली आहे, आणि लवकरच ठाण्यातही सुरू होत आहे.

या शाळा तुम्ही कुठे चालवता?
त्या त्या परिसरातली सहज उपलब्ध होऊ शकेल अशी कोणतीही मोकळी जागा आम्हाला चालते. फूटपाथ, एखादं मैदान, एखाद्या मोठ्या झाडाखालची सावली, एखाद्या वस्तीतला मोकळा भाग, एखादी पत्र्याची शेड, एखादी भाड्याची खोली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागेत आमच्या शाळा चालतात. मुलांना एकत्र येऊन काम करता येण्याची प्राथमिक सोय होईल अशी आणि फार खर्चिक नसलेली जागा पाहिजे, ती आम्ही स्वच्छ करून घेतो, आणि कामाला सुरुवात करतो.

मुलांना संध्याकाळी शिकवण्यापुरतं काम मर्यादित न ठेवता तुम्ही मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न करता आहात, त्याविषयी थोडं सांगा. 
काम करता करता आमच्या लक्षात आलं की रस्त्यावरच्या शाळेत मुलांना थोडंसं शिकवणं पुरेसं नाही, त्यांना शाळेत प्रवेश घेऊन दिला पाहिजे. मग आम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेऊन द्यायला सुरुवात केली. मुलांचे गणवेश, वह्या पुस्तकं, शालेय साहित्य यासाठीचा सगळा खर्च करता यावा या दृष्टीने आम्ही स्वतःच वर्गणी काढून निधी उभा करायला सुरुवात केली. 250 लोकांची टीम आहे आमची हा त्यातले किमान 120 लोक उत्तम कमावते आहेत, ते पैसे उभे करण्यात सहभाग घेतात.

आता ही मुलं शाळेत गेली, आपलं काम संपलं असं आम्हाला वाटलं होतं. पण काही दिवसानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांतल्या बऱ्याचशा मुलांचं शाळेला जाणं परत बंद झालं होतं आणि काही मुलं, जी शाळेत जात होती, ती फक्त हजेरी लावण्यासाठीपुरतीच जात होती. त्यांचं म्हणावं असं शिक्षण तिथं होत नव्हतं. व्हॅल्यू ॲड होत नव्हती. ते पाहून आम्ही पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणमंडळासोबत आणि समाजकल्याणविभागासोबत बोलणं केलं. आता आमच्याकडून शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची प्रगती ते शाळेमध्ये सर्टिफाय करतात. 

मुलं शाळेत शिकत राहतील यासाठी नियमित पाठपुरावा करावा लागतो. ती पटावरून गळणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागते. आणि शाळेव्यतिरिक्त बाहेरही त्यांना शिकवावं लागतं, उजळणी घ्यावी लागते. अभ्यासात रस वाटावा, शिक्षणाचं महत्त्व पटावं म्हणून काही रंजक, कृतीप्रधान उपक्रम राबवावे लागतात, ह्या गोष्टी लक्षात घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी काम करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रत्यक्ष अनुभवांतून मुलांना समृद्ध आणि समावेशक शिक्षण देणं हे आम्ही शाळेच्या चौकटीच्या बाहेर राहून करायला लागलो.

असे कोणकोणते विशेष अनुभव तुम्ही मुलांना देता?
शाळा आणि वस्ती यांच्या बाहेरच्या जगाची ओळख आम्ही त्यांना करून देतो. आणि हेही जग त्यांचंच आहे हे त्यांना जाणवून देतो. आम्ही त्यांना व्यायाम करायला शिकवतो, चित्रकला, मातीच्या मूर्ती बनवणं, गाणं किंवा वाद्य वाजवणं याचं शिक्षण आवडीप्रमाणे त्यांना घेत यावं म्हणून दादाच्या शाळेत कला शिक्षणाचे वर्ग चालवतो, नाच, गाणी, नाटक सादर करता यावं म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन भरवतो, डिजिटल साधनांचा वापर करायला शिकवतो, ती हाताळायला देतो, नाट्यगृहात नाटक दाखवतो, मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा दाखवतो, मेट्रोमधून फिरवून आणतो.

वेगवेगळ्या व्यवसायांच्या ठिकाणांना, आयटी कंपन्यांना भेटी देतो, त्यांचं काम कसं चालतं ते दाखवतो. तिथले अधिकारी मुलांना बोलतं करतात, करिअरच्या दृष्टीने काही दिशा दाखवतात. दादाच्या शाळेत आम्ही अशा काही व्यक्तींना बोलवतो, ज्यांनी स्वतः गरिबी आणि घरातल्या अडचणींवर मत करून नेटाने शिक्षण घेतलं, कोणी परदेशात किंवा कोणी भारतात उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या हुद्यांवर उत्तम काम करत आहेत, चांगला पैसा कमवत आहेत, आणि समाजासाठी काहीतरी चांगलं काम करत आहेत. त्यांच्याकडे पाहून मुलांना प्रेरणा मिळते. आपण शिक्षण का घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेतलं तर काय बदल होऊ शकतो याची झलक त्यांना दिसते. स्वतःचं ध्येय ठरवण्याचा विचार मुलं करायला लागतात.

आम्ही भारती विद्यापीठाच्या फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी विभागाच्या मदतीने मुलांना फोटो आणि व्हिडिओचे कॅमेरे हाताळायला शिकवतो, व्ही आय टी कॉलेजच्या मदतीने मुलांना तंत्रज्ञानाची ओळख करून देतो. पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक प्रदर्शन गेली दोन वर्षं झालं, तिथे आम्ही मुलांना घेऊन गेलो. पुस्तकं खरेदी केली. लष्कराच्या प्रदर्शनाला आम्ही मुलांना नेलं होतं, लष्करी अधिकाऱ्यांनी युद्ध, शस्त्रास्त्रं, सैन्यातली करिअर्स याविषयी मुलांना छान माहिती दिली.

नुकतेच आम्ही दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलनाला काही मोठ्या वयाच्या मुलामुलींना घेऊन गेलो, तिथे त्यांनी संमेलनातल्या काही चर्चा ऐकल्या, पुस्तकं पहिली, साहित्यिकांची भाषणं ऐकली. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, कवयित्री आणि बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, कवी बबन धुमाळ, गणेश कारळे यांना मुलं भेटली. नंतर दिल्लीत आम्ही संसद भवन पाहिलं, तमिळनाडूचे राज्यसभा खासदार तिरुचि शिवा यांना आमची मुलं भेटली. तो अनुभव मुलांसाठी आणि आम्हा कार्यकर्त्यांसाठीही खूप मोठा होता. साहित्य संमेलनात, संसद भवनात, खासदारांसामोर मुलं ज्या आत्मविश्वासाने वावरली, ते बघून आपलं काम योग्य दिशेने होत आहे याची खात्री पटली. 

पुण्यात 21 ते 23 मार्च या तीन दिवसांत जे छायाचित्र प्रदर्शन भरवलं आहे, त्यातही आमच्या शाळा, आमचे वगवेगळे उपक्रम, आमचे यशस्वी विद्यार्थी, त्यांच्या संघर्ष आणि यशाच्या गोष्टी याविषयी आमची मुलंच फोटोंच्या आधारे प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसतील.

तुमच्याकडे सातत्याने येत राहणारी मुलं साधारण किती आहेत?
मुख्य म्हणजे दादा-दीदीमुळे आपली मुलं शिकून आपल्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने जगू शकतात असा पालकांचा विश्वास आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे साधारण 750 मुलं आमच्याकडे गेली किमान चार वर्षं सातत्याने येत आहेत. इतर मुलं हंगामी वस्त्यांवरची असल्यामुळे ती त्या त्या काळापुरती आमच्याबरोबर असतात, पण तेवढ्या काळातही त्यांना शिकण्याची गोडी मात्र लागलेली असते, असा आमचा अनुभव आहे. एकच उदाहरण सांगतो, मध्य प्रदेशातून पुण्यात कामासाठी आलेल्या एका कुटुंबातला मुलगा विराज पुनिया आमच्या शाळेत यायचा. त्याच्या आईवर वस्तीत लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिची मानसिक अवस्था ठीक नसायची, वडिलांचा पाय मधुमेहाच्या दुखण्यामुळे कापावा लागला होता, विराजने भीक न मागता सिग्नलवर पुस्तकं विकायला सुरुवात केली. आम्ही त्याला मानसिक आणि आर्थिक मदत करत होतोच, पण त्याने हिमतीने पैसे कमवून 80,000 रुपयांचं कर्ज फेडलं, आणि आईवडिलांना घेऊन परत गावाला गेला, गावातही तो शाळेत जातो आहे.

तुमच्याकडची मुलं सध्या कुठपर्यंत शिकलेली आहेत?
2024 मध्ये आमच्या शाळेतल्या तीन मुली दहावी पास झाल्यात आणि दोन मुली बारावी पास झाल्यात. त्या त्यांच्या कुटुंबातल्या फर्स्ट जनरेशन लर्नर आहेत म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या कोणीच आतापर्यंत शाळा पाहिलेली नाहीये, पण त्या दहावी-बारावी पास झाल्यात. या वर्षी अजून चार मुली 10 वीला आहेत. दहावी-बारावीपर्यंत तर बहुतेक सर्व मुलं शिकत राहतील असं दिसतं आहे.

दहावी किंवा बारावीपर्यंत शिकल्यानंतर ही मुलं पुढे शिकतात की झालेल्या शिक्षणाच्या आधारावर नोकऱ्या करायला लागतात? 
आमच्या ज्या दहावी झालेल्या मुली आहेत त्यातली एक मुलगी अकरावी सायन्सला आहे, दोन मुली अकरावी कॉमर्सला आहेत. आणि बारावी झालेल्या मुली बी.कॉम. करतायत. एकीला CMA करायचं आहे, तर दुसरीला बँकिंगमध्ये रस आहे. आमच्याकडची बाकीची मुलं अजून तेवढ्या वयाची झालेली नाहीत, पण इतर संस्थांचा अनुभव पाहता असं दिसतं की दहावी किंवा बारावीनंतर काही जण आयटीआय सारख्या व्यवसायशिक्षणाचा मार्ग निवडतात, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहता यावं; काही जण आहे तेवढ्या शिक्षणाच्या बळावरच लहानमोठी नोकरी पत्करतात, आणि काही मोजकी मुलं उच्चशिक्षणाकडे वळतात. त्यांना जर थोडसं मार्गदर्शन आणि मदत मिळाली तर पूर्ण पिढी बदलू शकेल.

त्याच हेतूने या मुलांना केवळ पैसे, जेवण किंवा कपड्यांची सोय करून न देता तुम्ही त्यांना सक्षम करता आहात... 
आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की आपण कधी पैसे, जेवण, कपडे वाटायचे नाहीत. ज्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढायचं आहे ती परत त्यांच्या दारात न्यायची नाही. आपली मदत त्यांना स्वावलंबी करणारी ठरली पाहिजे, परावलंबी करणारी नव्हे. आणि आमच्या त्या प्रयत्नाला यश मिळतं आहे. आमच्या शाळेत आधी ज्या संस्था जेवण द्यायला येत होत्या त्या संस्थांना आमच्या लोकांनीच नकार दिलाय, आम्हाला फुकट जेवण नको आहे, असं सांगून. हा सगळ्यात सकारात्मक बदल आम्ही घडवू शकलो आहोत.

अशा उपक्रमात केवळ संवेदनशीलता आणि पैसे असून पुरत नाही, वेगवेगळी सामाजिक शास्त्रं, मानसशास्त्र, संस्थात्मक प्रशासन यांचा अभ्यास आणि अनुभवही आवश्यक असतो... 
हो नक्कीच. आणि याची जाणीव ठेवूनच आम्ही सतत नव्याने पुढे येणारे अभ्यास, रिसर्च याची माहिती घेऊन स्वतःला अपग्रेड करत असतो, आणि आम्ही स्वतःदेखील अभ्यास करत असतो. 

2020 हा या दृष्टीने आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) दिल्ली येथे "सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स" (SDGs) या विषयावर एक शिखर परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्रातर्फे या परिषदेसाठी प्रतिनिधी निवडले जात असताना, सिंधुताई सपकाळ यांनी स्वतः माझं नाव सुचवलं. आम्ही एक टीम म्हणून या संधीचा स्वीकार केला आणि जागतिक स्तरावर शिक्षणाविषयी चर्चेत योगदान देण्याची मोठी संधी म्हणून पाहिले.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून माझे सहकारी शुभम, वैभव, अबोली, स्नेहल आणि मी आम्ही मिळून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर सखोल संशोधन केलं. महाराष्ट्रभरातली शिक्षणाविषयीची आव्हानं समजून घेण्यासाठी 15 दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेतून तयार झालेला 270 पानी विस्तृत अहवाल अंगणवाड्यांपासून महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि त्यापुढील स्तरांपर्यंतच्या शिक्षणातील अडथळ्यांवर प्रकाश टाकणारा ठरला.

या संशोधनातील एक महत्त्वाचा भाग, ज्यावर मी स्वतः लक्ष केंद्रित केले, तो म्हणजे रस्त्यावरच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास. या अभ्यासात खालील महत्त्वाच्या समस्या समोर आल्या:

सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांमुळे मुलांना शाळेत जाण्यास येणाऱ्या अडचणी

त्यांच्या पार्श्वभूमीशी संबंधित असलेला सामाजिक कलंक

भाषा आणि संस्कृतीतील अडथळे, जे त्यांच्या शैक्षणिक संधींवर मर्यादा आणतात

हे संशोधन नंतर आम्ही युनिसेफकडे सादर केलं आणि आजही युनिसेफच्या शैक्षणिक धोरणं व उपक्रमांसाठी तो एक महत्त्वाचा संदर्भ आहे.

या अनुभवातून मिळालेल्या प्रेरणेमुळे रस्त्यावरच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न आम्ही अधिक व्यापक आणि मजबूत केले. आमच्या उपक्रमांचा विस्तार झाला. आमची ही दादाची शाळा म्हणजे संशोधन, सहकार्य आणि समर्पित कृतिशीलतेच्या सामर्थ्याचा एक उत्तम नमुना आहे.

या उपक्रमात सातत्य राखताना तुम्हाला अनेक अडचणीही आल्या असतील...
हो अर्थात. पण अडचणींशी सामना करायचा आणि त्यांच्यावर मात करायची हे अडचण येण्याआधीच ठरलेलं असतं, त्यामुळे अडचणींतून मार्ग आम्ही नक्की काढतो. 

आर्थिक अडचणी सर्वात मोठ्या. महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण मोफत उपलब्ध होतं. पण मुलांना प्रवेश घेऊन देणं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य घेऊन देणं, शाळेबाहेरच्या उपक्रमांची व्यवस्था करणं, यासाठी पैसा लागणारच होता. तो सुरुवातीला तरी स्वतःच वर्गणी करून उभा करावा लागत होता. त्यामुळे संसाधनांची कमतरता जाणवत असे. आता जसजसं आमचं काम लोकांना माहीत होतं आहे, तसतसे आर्थिक मदतीसाठी काही हात पुढे यायला लागले आहेत, आम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रातून आणि संस्थांकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठीची CSR पात्रताही लवकरच मिळेल अशी आशा आहे, मग आर्थिक प्रश्न थोडे अधिक सोपे होतील.

एकदा असं घडलं की जिथे मुलांना आम्ही शिकवत होतो, त्या वस्तीचं एक रात्रीत स्थलांतर झालं. त्या वस्तीत राहणारे लोक एका मोठ्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे होते, त्यांचं काम संपलं आणि त्यांना तिथून उठून पुढच्या कामाच्या ठिकाणी जावं लागलं. आम्हाला एखादा दिवससुद्धा आधी ते कळू शकलं नव्हतं. नंतर जेव्हा काही मुलांच्या पालकांकडे फोन करून चौकशी केली, तेव्हा ही गोष्ट आम्हाला समजली. वस्तीच्या स्थलांतराच्या कारणामुळे सारसबाग, मार्केट यार्ड, टिळेकरनगर या शाळा बंद झाल्या.

त्यांनंतर आम्ही त्या त्या परिसरातल्या नव्या मुलांशी किंवा त्यांच्या पालकांशी बोलताना अधिक काटेकोरपणे माहिती घ्यायला लागलो, काही रिसर्च करायला लागलो. पालक काय काम करतात, कुठे काम करतात, कुटुंब मूळचं कुठलं आहे, या ठिकाणी काय कारणाने राहतं आहे, साधारण किती दिवस राहणार आहे, वगैरे गोष्टींची माहिती विचारायला लागलो. आमच्या संध्याकाळच्या शाळेत सर्वच मुलं असतात, पण शाळेच्या प्रवेशाची प्रक्रिया करताना या गोष्टींचा उपयोग होतो.

कधी कधी ज्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो त्यांच्याच विरोधाचाही अनुभव आला. काही पालकांनी खर्च करणं शक्य नाही म्हणून विरोध केला, काही मुलांनी काम करून घरात पैसा आणणं फारच निकडीचं होतं, त्यामुळे विरोध झाला. कोणी शाळेत खायला मिळत नव्हतं म्हणून शाळेला जात नव्हते किंवा ‘मी शाळेला गेल्यानंतर वडील आईला फार मारतात म्हणून तिला वाचवायला मी घरात थांबणार आहे’ अशी काहींची परिस्थिती होती. याहीपेक्षा अधिक अस्वस्थ करणारी भयावह कारणं आम्ही मुलांकडून किंवा पालकांकडून ऐकत होतो. 

पण आम्ही न हरता मुलांचं आणि पालकांचं काउन्सेलिंग केलं. शिक्षणाने मुलांचं आणि कुटुंबाचं भलंच  होईल हे त्यांना पटवून दिलं. त्यांना जाचक ठरत असलेल्या परिस्थितीतून वर यायचं असेल तर शिक्षण हाच उपाय आहे हे समजावून सांगितलं. आणि मुलं शिक्षणात रस घेतील, त्यांना पैसे कमावण्याचे मजुरी किंवा वेठबिगारीपेक्षा अधिक चांगले पर्याय उपलब्ध होतील यासाठीची आमची धडपड आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली, आमच्या कमिटमेंटची त्यांना खात्री दिली आणि मग मुलं दादाच्या शाळेत आणि मुख्य प्रवाहातल्या शाळेत येणं सोपं होत गेलं. थकव्याचे क्षण आले, स्वतःवर शंका येण्याच्या वेळा आल्या, पण जेव्हा एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद पाहिला, तेव्हा प्रत्येक वेळी पुढे जाण्याची प्रेरणाच मिळाली.


हेही वाचा - पुढची पावले (लेखक मिलिंद बोकील) (लेखमालिका मेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 31)


तुमच्या कामाला त्या त्या भागातल्या शासकीय / प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काही मदत मिळते का?
खरं तर नाही. उलट, जेव्हा नगरसेवक, बिल्डर किंवा राजकीय धनदांडग्यांचे हितसंबंध पलीकडच्या बाजूला गुंतलेले असतात, तेव्हा झाला तर विरोधच होतो. आमच्या विश्रांतवाडीच्या शाळेच्या एका बाजूला मटक्याचा अड्डा आणि दुसऱ्या बाजूला दारूची हातभट्टी आहे. ते दोन्ही तिथल्या स्थानिक राजकारण्यांच्या मालकीचे आहेत. असासुद्धा अनुभव आलेला आहे की ज्या मुलांना शाळेत आम्ही शिकवतो त्यांची आई एका बाजूला मटका खेळत असते आणि वडील दुसऱ्या बाजूला दारू पीत असतात. तो मटक्याचा अड्डा जेव्हा आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अगदी जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या, कोयता घेऊन आमच्या मागं माणसं फिरण्यापर्यंत प्रकार घडले. अशा वेळी आईवडील घाबरतात मुलांना शाळेत पाठवायला, पण आम्ही हटलो नाही. आमची एक मैत्रीण स्नेहल तिथली जागा साफ करून स्वतः शाळेत येऊन बसायची, हळूहळू तिला पाहून मुलांना आणि पालकांना विश्वास वाटायला लागला, आणि मुलं यायला लागली.

पोलीस मदत करतात. पण त्यांची विचार करण्याची पद्धत नेहमीच आमच्यापेक्षा वेगळी पडते. कधीकधी तेही भ्रष्ट किंवा राजकारण्यांच्या पुढे हतबल असतात. त्यामुळे पोलिसांची मदत एक मर्यादेपलीकडे गृहीत धरता येत नाही.

तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते यांचे व्यावसायिकदृष्ट्या इतरत्र करिअर आहे, त्याचा उपयोग तुम्हाला या कामातही होतो का? 
हो नक्कीच होतो, मी पेशाने वकील आहे, सध्या फर्ग्युसन कॉलेजला मास्टर्स करतोय आणि पुणे जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस पण करतो. सकाळी कॉलेज, दुपारी कोर्ट आणि संध्याकाळी शाळा असं माझं रूटीन असतं. माझ्या कायद्याच्या अभ्यासाचा या कामात खूपच उपयोग होतो.

आमच्या कार्यकर्त्यांमध्ये डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, ग्राफिक डिझायनर, इंटीरियर डिझायनर्स, आयआयटीयन्स, एमपीएससी यूपीएससी करणारे असे अनेक पेशांचे लोक आहेत. ते संध्याकाळच्या शाळेला शक्य तितका जास्तीत जास्त वेळ देतात. मुलांना वेगवेगळ्या करिअरविषयी मार्गदर्शन करतात, आपापल्या क्षेत्रातली माहिती मुलांना देतात.

आमची काहीही कमिटी किंवा मॅनेजमेंट अशी नाही, आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत, आणि सगळे बरोबरीच्या नात्याने काम करतो, आमच्यात कोणतीही हायरार्की नाही. या बाबतीत मी असं म्हणतो की आम्ही बरेचसे लोक 'जेन झी'चे आहोत, पण आमची मानसिकता मिलेनियल्सची आहे.

या मुलांचे काही वैयक्तिक / कौटुंबिक प्रश्न पण शाळेच्या माध्यमातून सोडवता येतात का?
काही मुलांना मारझोड होणं किंवा लैंगिक शोषणाला सामोर जावं लागणं असे पण काही प्रॉब्लेम्स होते. आम्ही त्यांना न्याय मिळावा यासाठी झगडण्याचा खूप प्रयत्न करतो. पण लैंगिक शोषणाच्या बाबतीत मुलींचं नाव खराब होऊ नये म्हणून गप्प बसण्याची प्रवृत्ती इथेही आहेच. शिवाय अशा बाबतींत अत्याचार करणारा माणूस पैसेवाला, गुंड किंवा राजकीय हितसंबंध असलेला असेल, तर लोक जिवाच्या भीतीने गप्प बसतात.

पण आम्हाला काही बालविवाह थांबवण्यात मात्र यश आलेलं आहे. आमच्या आकुर्डीच्या शाळेत मुलांच्यात झालेले बदल पाहून काही आयांनी 'आम्हाला पण शिकायचं आहे' असं सांगितलं, आता त्या शाळेत प्रौढांसाठीही आम्ही वर्ग चालवतो आहोत. मुलांकडे पाहून आईला शिकावंसं वाटणं ही खूप मोठी पावती वाटते आम्हाला आमच्या कामाची. आणि एका घरात आईला शिक्षणाचं महत्त्व कळलं तर काय चमत्कार घडू शकतात हे वेगळं सांगायची गरज नाही.

आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे दादाच्या शाळेतून शिकत असलेली मोठी मुलं आता लहान मुलांची शाळा घेतात, ती आम्हाला स्वयंसेवक म्हणून मदत करतात. त्यांना नुसती शिक्षणाची गोडी लागली आहे एवढंच नाही, तर आपल्याला जे मिळालं ते इतरांना देण्याचीही संवेदनशीलता आणि जाणीव त्यांच्यात निर्माण होते आहे, याचं खूप समाधान वाटतं.

गरीब आहेत म्हणून केवळ फ्रीबीज न वाटता खऱ्या अर्थाने एका वंचित पिढीच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि आर्थिक सक्षमीकरणाचा प्रयत्न करत आहात, त्यात तुम्हाला सुयश लाभो आणि सहकार्य करणारे अधिकाधिक हात तुमचं बळ वाढवोत, ही सदिच्छा!

- अ‍ॅडव्होकेट अभिजीत पोखरणीकर
+91 70203 96723
संवाद आणि शब्दांकन ऋचा मुळे


Tags: विधायक वाटा शिक्षण Load More Tags

Add Comment

संबंधित लेख