पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांचा ‘रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट (नदी पुनरुज्जीवन प्रकल्प - नदी किनारी विकास)’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चर्चेत आला आहे. नदीला आलेले सांडपाण्याचे स्वरूप न बदलता केले जाणारे सुशोभीकरण म्हणजे केवळ पैशांचा अपव्ययच नव्हे, तर पुणेकरांसाठी पूर, रोगराई, आणि आज शिल्लक असलेल्या जैवविविधतेचा ऱ्हास करणारे ठरणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नद्यांची अवस्था आणखी केविलवाणी करणाऱ्या ह्या प्रकल्पाला अनेक सुजाण नागरिकांचा विरोध आहे. प्रकल्पाविरोधात निदर्शन करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2025 रोजी 60 हून अधिक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन 'पुणे रिव्हर रिव्हायव्हल' या बॅनरखाली पदयात्रा आयोजित केली होती. या पदयात्रेत हजारो पुणेकर सहभागी झाले होते. पुणेकरांच्या शाश्वत विकासासाठी आग्रही असणाऱ्या ह्या चळवळीत पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आणि विवेकी, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून सामान्य नागरिकांनी सहभागी व्हायला हवे, या हेतूने पुणेकरांना लिहिलेले हे अनावृत पत्र आहे.
नमस्कार पुणेकरहो.
मी तुमच्यासारखाच पुण्यातील एक सामान्य नागरिक. मला कदाचित अस्सल पुणेकर म्हणता येणार नाही, पण गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ मी पुण्यात राहतोय. तुम्ही पुणेकरांनी मला आपल्यात सामावून घेतले आहे, मला जे प्रेम दिले आहे, त्याच्या आधारावर तुमच्यापर्यंत एका घटनेचा वृत्तान्त पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. घटना छोटीशी आहे, पण त्या निमित्ताने तुमच्याशी जरा मोकळेपणाने बोलायचे आहे.
9 फेब्रुवारीला भर दुपारी तीन-साडेतीन वाजता तुमच्यापैकी साधारण पाच हजार जण बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलपासून राम-मुळा संगमापर्यंत एकत्र चालत गेले. आई-वडिलांच्या कडेवर असलेल्या लहानग्यांपासून, शाळकरी पोरांपासून, काठी टेकत पण निर्धाराने आलेल्या वृद्धांपर्यंत, गरीब वस्तीतल्या लोकांपासून सुजाण पर्यावरण तज्ज्ञांपर्यंत, नदी सुधार, निसर्ग संवर्धन यांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यांपासून, केवळ कुतूहल म्हणून आलेल्या सामान्य नागरिकांपासून सेलेब्रिटीपर्यंत अनेक अनेक जण त्यात एकत्र चालत होते. चालताना ते काही घोषणा देत होते, गाणी म्हणत होते, फलक दाखवून बाकीच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तिथून ते नदीपात्रापर्यंत गेले. त्यांनी तिथल्या नदीपात्राच्या आजूबाजूच्या देवराईचे वृक्षवैभव डोळे भरून बघितले.
ज्युपिटर हॉस्पिटल आणि ही देवराई यांच्या तापमानातला फरक अनुभवला. मोठमोठी खोडं असलेले भव्य, पुराणे वृक्ष, त्यावर चढलेल्या तितक्याच जुन्या वेली पाहून तिथे प्रथमच आलेल्या नागरिकांना आपण पुण्यात आहेत याचाच क्षणभर विसर पडला. खेडेगावात नदीकिनारी गेलं की एका सघन, समृद्ध ठिकाणी आल्याचा उल्हास, आतून काही गवसल्याची जाणीव होत असते. अगदी तसाच अनुभव आपल्या प्रचंड गर्दीच्या शहरातही येऊ शकतो या जाणिवेने अनेक जण प्रफुल्लित झाले होते.
त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ज्या झाडांना आनंदाने घट्ट मिठी मारावी असं त्यांना वाटत होतं, त्यांच्यावर नोंदणी केल्यासारखे आकडे लिहिलेले दिसले. थोड्याच काळात ह्या झाडांची कत्तल होणार आहे, हा अधिवास नष्ट होणार आहे असं त्यांना कळलं आणि ते सुन्न झाले. थोड्याशा काळजीने, अतीव आवेगाने त्यांनी त्या झाडांना मिठ्या मारल्या. त्यातील अनेकांनी ‘नदी की बात’ ह्या उपक्रमांतर्गत पंतप्रधानांना ह्या प्रकल्पाचा फेरविचार करण्यासाठी विनंतीपत्रंही लिहिली. पुढे नदीपात्राकडे चालल्यावर पलीकडच्या बाजूला राडारोडा टाकणारे डंपर, मोठमोठी झाडं जमीनदोस्त करण्याची क्षमता असलेले बुलडोझर दिसले. आपण उभे आहोत त्या नदीकाठाचं थोड्याच दिवसांत काय होणार हे पलीकडल्या बाजूला बघून कळत होतं. इतकी वर्षं ज्या पाण्याकडे त्यांनी सांडपाणी समजून दुर्लक्ष केलं होतं, ज्या पाण्याला वेगवेगळ्या पुलांवरून नाक मुठीत धरून त्यांनी घाईघाईने ओलांडलं होतं, तेच पाणी इथेही होतं. इथे आल्यावर त्यांच्यापैकी अनेकांना समजलं, हे सांडपाणी नाहीये! ही आपली नदी आहे! आपली नदी!
आपल्या पुण्याला मुळा, मुठा समवेत रामनदी आणि देवनदीचा सहवास लाभला आहे. खरं तर ह्या नद्यांच्या काठाकाठानेच हे गाव वसत गेलं असणार आहे. एके काळी ह्या छोट्या गावाच्या जीवनाचा वेग जेव्हा ह्या नद्यांच्या प्रवाहापेक्षा कमी होता, तेव्हा त्यांनीच आपली तहान-भूक भागवली होती, शरीरं पुष्ट केली होती, मनं समृद्ध केली होती. मग शहराचा जगण्याचा वेग वाढला. काळाच्या ओघात नद्यांचं पाणी अपुरं पडू लागलं, मग डॅम्स आले आणि आपल्याला नदीच्या पाण्याची गरजच राहिली नाही. गरज नसलेल्या गोष्टीचे आपण जे काही करतो ते तिच्याही बाबतीत आपण केलं. पण तरीही, निसर्गात आपल्या स्वतःला पुनरुज्जीवित करण्याची मोठी ताकद असते. तो इतका चिवट, इतका जिवट असतो की तो कुठे ना कुठेतरी टिकून राहतोच. आजही ह्या संगमावर टिकून असलेली ही देवराई म्हणजे निसर्गाच्या अशाच विजीगिषु प्रवृत्तीचे प्रतीक आहे.
आणि आज रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत आपलं सरकार अशा अद्भुत ठिकाणांचे सिमेंट-कॉँक्रिट टाकून, झाडं तोडून, झाडं, वेली, पशु, पाखरं यांचा अधिवास नष्ट करून, वेगळेच सुशोभीकरण करू पाहतंय. नागरिकांना चालण्या-फिरण्यासाठी जागा तयार करणे हा ह्या सुशोभीकरणामागचा सरकारचा उद्देश असेलही, पण नदीला आलेलं सांडपाण्याचं स्वरूप न बदलता केलं जाणारं हे सुशोभीकरण माझ्यासारख्या सामान्यांच्या आकलनापलीकडलं आहे.
आज पुण्यातलं बरंचसं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडलं जातं. त्या पाण्याला येणारी दुर्गंधी आपल्याला लांबवरूनही सहन होत नाही. खरंच, अशा परिस्थितीत सांडपाण्याच्या बाजूला हजारो कोटी रुपये खर्च करून बांधले जाणारे बगीचे आपल्याला कोणता आनंद देणार आहेत? याशिवाय ह्या प्रकल्पामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होणार आहे, नदीच्या पूरपातळीत बांधकाम करून अडथळे निर्माण केल्यामुळे पुराचा धोका वाढणार आहे, आजूबाजूच्या वस्त्यांना त्याची झळ पोहोचणार आहे, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नदी म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहत जाणारं पाणी नसतं. नदी म्हणजे एक मोठ्ठा परिवार असतो. ‘हम दो हमारे दो’ सारखं छोटं कुटुंब नाही, तर गावाकडचं चांगलं पाचपन्नास जणांचं कुटुंब. त्यात नदीकिनारी वाढणारं गवत असतं, छोटी-मोठी झाडं असतात, त्यांना धरून असणारे पक्षी, प्राणी, कीटक, जलचर, भूचर, उभयचर असे सगळे जीव असतात. या कुटुंबात सुपीक गाळ, दगडगोटे, भोवरे, खाचखळगे, घाट, वळणं, किनारे असे अजैविक घटकही असतात. या सगळ्यांसोबत नदी म्हणजे तिचा जलप्रवाहही असतो. त्यामुळे नदीचा विचार करताना तिच्या संपूर्ण कुटुंबाचा, तिच्या परिपूर्ण अधिवासाचा विचार करायला हवा असे तज्ज्ञ सांगतात.
नदी एखाद्या व्यक्तीसारखी युनिक, आगळीवेगळी, वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या व्यक्तित्वाची असते. कुठून आली आहे, कुठे चालली आहे, काय घेऊन चालली आहे, तिचं वय काय आहे यांसारख्या अनेक गोष्टींनी तिचा स्वभाव बनतो. एका नदीशी जसं वागलो तसं दुसरीशी वागून चालत नाही. नदीला नाती जोडायला आवडतात, बोलायला खूप आवडतं, ती सतत संवाद करत असते आपल्या परिवाराशी. सिमेंट-कॉँक्रिट घालून, चॅनलाइज करून तुम्ही तिला एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला भाग पाडलंत, तर ती जास्त काळ जुमानणार नाही. भिंती तोडून ती पुन्हा आपल्या मर्जीप्रमाणे गतिमान होईल. नदीच्या काठाला सिमेंट ओतून जॉगिंग ट्रॅक, रस्ते, तटबंदी केली तर हा किनारा पूर नियंत्रणाची जी मोफत सेवा आपल्याला देत असतो, ती सेवा आपल्याला मिळणार नाही. पुराचा धोका वाढत जाईल.
आज पुण्यातील नद्यांची अवस्था काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण त्यांच्या एके काळच्या वैभवाच्या खुणा आपल्याला आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. राम-मुळा संगमाच्या ह्या परिसरात आजही टिकून असलेल्या झाडीच्या ठिकाणी एके काळी घनदाट जंगल होतं. ह्या जंगलात एके काळी आपले पूर्वज शांतता अनुभवायला आले असतील, लेकी-सुना नागोबाला पुजायला, वडाभोवती सूत गुंडाळायला आल्या असतील, मुलींनी झाडांना झोके बांधून गाणी म्हटली असतील. मुला-मुलींनी झाडावरून नदीच्या पात्रात धबाधबा उड्या मारल्या असतील... ही ठिकाणं आजही आपल्याला आनंद देण्याची क्षमता राखून आहेत. फक्त त्यांना त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात जपलं पाहिजे.
नऊ तारखेला जमलेल्या नागरिकांनी नदीची अवस्था जवळून बघितली आहे. आपल्या नदीला कॅन्सर झाला आहे. तिला ब्युटीपार्लरची नाही, डॉक्टरची गरज आहे. पुणेकरांनी एके काळी राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं आहे. त्यांची सजगता, शहाणीव देशभरात वाखाणली जाते. ह्या शहाणपणावर भिस्त ठेवून नदीची आर्त हाक ह्या पत्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
आपण सगळे मिळून नदीची ही हाक प्रशासनापर्यंत पोहचवू या.
अर्थात हे काम सोपं असणार नाही. यात प्रशासनाला लाखो नागरिकांच्या सह्यांसहित निवेदन देणं, जनजागृती, पदयात्रा, बैठका, चर्चासत्रे, सादरीकरणं करणं, प्रसिद्धीपत्रकं, चित्रफिती लोकांपर्यंत पोहोचवणं, समाजमाध्यमांवर कामाला प्रसिद्धी देत राहणं, दस्तऐवजीकरण करणं अशा अनेक गोष्टी होत आहेत. आपापल्या आवडीप्रमाणे लोक या कामात सहभागी होत आहेत. कुणी नदीवर सकाळी फेरफटका मारत आहे. कुणी पक्षी निरीक्षण करून नदीच्या किनाऱ्यावरच्या पक्षी-प्राण्यांच्या नोंदी ठेवत आहेत, कलाकार तिथे आपली कला सादर करत आहेत, कुणी चित्रं काढत आहेत, कुणी नुसतंच आपल्या मुलाबाळांना इकडे आणून त्यांची निसर्गाशी पुन्हा गाठ घालून देत आहेत. ह्या सगळ्यांच्या मनात ठाम विश्वास आहे की प्रशासन आपलंच आहे. ते नक्कीच नदीची ही हाक ऐकतील आणि आपल्या योजनेत फेरबदल करतील.
या, पुणेकरांनी पुणेकरांसाठी चालवलेल्या या चळवळीत सामील व्हा.
धन्यवाद,
जयदीप कर्णिक, पुणे,
9552599629
Tags: पर्यावरण नदीपात्र नदी वाचवा देवराई नागरी चळवळ रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नदी सुशोभीकरण Load More Tags
Add Comment