अनेक देशांत, अगदी भारतामध्येही विविध कार्यक्रमांत आणि वाढदिवस वा अन्य समारंभांत वापरण्यात येणारे फुगे आता दिसण्याची शक्यता कमी झाली आहे. कारण या फुग्यांसाठी हेलियम वायू आवश्यक असतो आणि जगातील एक तृतियांश हेलियम वायू तर कतारमध्ये बनवण्यात येतो. हेलियम हे नैसर्गिक वायूचे उप उत्पादन (बाय प्रॉटक्ट) आहे. तो मिळणे थांबले म्हणजे कतारमधून त्याची निर्यात थांबली तर पुरवठादारांना असे फुगे गिऱ्हाइकांना देणे अवघड किंबहुना अशक्यच होईल. त्यामुळे असे कार्यक्रम फुग्यांचा वापर न करता, वेगळ्या प्रकारे साजरे करावे लागतील.
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध महिना होऊन गेला तरी अजूनही संपलेले नाही. कधी संपेल ते कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे एक अनिश्चिततेचे वातावरण जगभर निर्माण झाले आहे. कारण त्याच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. अनेकांना उद्योग बंद करावे लागत आहेत तर कुणी खटपटी लटपटी करून ते, काही प्रमाणात का असेना, सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतात तर द्रवीभूत पेट्रोलियम वायू म्हणजे, एलपीजीसाठी मोठ्या रांगा लागताहेत आणि पेट्रोल पंपावरही लोक गर्दी करत आहेत. सरकार सांगत आहे की, गडबड करण्याचे काहीच कारण नाही, आपल्याकडे पुरेसा साठा आहे. तरी गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल, डीझेल घेणाऱ्यांच्या मनातही शंका आहेत. कारण अनेक उपाहारगृहे बंद करण्यात आली आहेत तर काही मोजकेच पदार्थ चुलीवर बनवून देत आहेत. एकीकडे गॅसबाबत काळजी करू नका म्हणणारे सरकार दुसरीकडे पुन्हा रॉकेलचे वाटप करत आहे. त्यामुळे नक्की काय परिस्थिती आहे याबाबत गोंधळ आहे.
पण आपण एकटेच नाही, तर जगभरही गडबड गोंधळ माजला आहे. अनेक देश यावर आपापल्या परीने उपाय योजना करत आहेत. त्याकडेही आपण पाहायला पाहिजे. म्हणजे आपली अवस्था त्यातल्या त्यात बरी आहे, असे वाटायला लागेल. या युद्धाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामांमुळे जगात काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत.
ऑस्ट्रेलियातील शेतकरी गव्हाची लागवड कमी प्रमाणात करत आहेत. कारण खतांच्या किमती वाढत चालल्या आहेत आणि त्या वाढण्याचे कारण म्हणजे खतनिर्मितीसाठी नैसर्गिक वायूमोठ्या प्रमाणात आवश्यक असतो, आणि त्यामुळे आखाती देशांच्याजवळ खत निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. जगभरातील एकूण खत पुरवठ्यातील एक तृतीयांश खात पुरवठा हा आखाती देशांतून होर्मुझ सामुद्रधुनीवाटे करण्यात येतो. आणि तो मार्ग इराणने अनेक देशांकरता बंद केला आहे. त्यामुळे अनेक देशांत खतांची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दक्षिण कोरियामध्ये लोकांनी आंघोळीसाठी शॉवरचा वापर कमीत कमी वेळ करावा असे सांगण्यात आले आहे. कारण शॉवरचे पाणी गरम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा आखाती देशांतून आयात केलेल्या घटकांद्वारेच तयार करण्यात येते.
इंधन वाचवण्यासाठी श्रीलंकेमध्ये आठवड्यातील कामाचे दिवस कमी करण्यात आले आहेत. तेथे बुधवार हा सुट्टीचा दिवस जाहीर करण्यात आला आहे. लाओसमध्ये शाळा फक्त तीन दिवस सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
सर्वत्र ट्रॅक सूट (जे खेळाडू, जॉगिंग करणारे वा सकाळी पायी फिरणारे उपयोगात आणतात ते) महाग होण्याची शक्यता आहे. कारण ट्रॅक सूट बनवताना त्यांत पॉलिएस्टरचा वापर करण्यात येतो आणि पॉलिएस्टर हे पेट्रोकेमिकल्स पासूनच तयार केले जाते. आता युद्धामुळे पेट्रोकेमिकल्सही मिळण्याची अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक देशांत, अगदी भारतामध्येही विविध कार्यक्रमांत आणि वाढदिवस वा अन्य समारंभांत वापरण्यात येणारे फुगे आता दिसण्याची शक्यता कमी झाली आहे. कारण या फुग्यांसाठी हेलियम वायू आवश्यक असतो आणि जगातील एक तृतियांश हेलियम वायू तर कतारमध्ये बनवण्यात येतो. हेलियम हे नैसर्गिक वायूचे उप उत्पादन (बाय प्रॉटक्ट) आहे. तो मिळणे थांबले म्हणजे कतारमधून त्याची निर्यात थांबली तर पुरवठादारांना असे फुगे गिऱ्हाइकांना देणे अवघड किंबहुना अशक्यच होईल. त्यामुळे असे कार्यक्रम फुग्यांचा वापर न करता, वेगळ्या प्रकारे साजरे करावे लागतील.
फॉर्म्युला वन या प्रसिद्ध मोटार शर्यतींवरही परिणाम झाला आहे. बहारीन आणि सौदी अरेबिया येथील शर्यती रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले गेले आहे. कारण त्या दोन्ही देशांवर इराण क्षेपणास्त्रांद्वारे मारा करत आहे. त्यामुळे स्पर्धक आणि प्रेक्षकांनाही धोका नको म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.
याप्रमाणेच शकीरा, क्रिस्तीना अग्युइलेस आणि त्यांच्यासारख्या कलाकारांचे आखाती देशांमधील मोठ्या मैफिलींचे कार्यक्रम एकतर रद्द केले आहेत किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. कारण या कलाकारांना त्या देशांत सुरक्षिततेची काळजी वाटत आहे.
अनेक देशांमध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील औषधे रुग्णांपर्यंत वेळेवर पोहोचणार नाहीत अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. कारण दुबई आणि दोहा यांच्यासारख्या बंदरांमध्ये शटडाउन करण्यात आले आहे.
अमेरिकेत क्रूड ऑईल आणि नैसर्गिक वायू यांचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु तरीही काही प्रमाणात त्यांची आयात आखाती देशांतून करावी लागते. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाचे भाव $75 वरून $103 प्रति बॅरल पर्यंत वाढले. त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढली. आणि महागाई वाढत राहिली तर डॉलरचे मूल्य कमी होऊ शकते, या भीतीने बँका कर्जाचे दर वाढवतात. अमेरिकेतील गृहकर्जाचे दर हे मुख्यत्वे '10 वर्षांच्या ट्रेझरी यील्ड'वर अवलंबून असतात. युद्धामुळे महागाई वाढणार म्हणून गुंतवणूकदारांनी बॉण्ड्स विकायला सुरुवात केली. यामुळे या बॉण्ड्सचे दर (Yield) 3.9 टक्क्यावरून 4.4 टक्क्यापर्यंत वाढले. जेव्हा हे दर वाढतात, तेव्हा बँका गृहकर्जाचे दरही वाढवतात. 2026 च्या सुरुवातीला सर्वांना वाटले होते की अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजाचे दर कमी करेल. पण युद्ध सुरू झाल्यामुळे महागाई वाढली, आणि आता ही बँक व्याजाचे दर कमी करायला तयार नाही. बँकांना वाटते की आता 'स्वस्त कर्जाचे दिवस' लांबणीवर पडले आहेत, त्यामुळे त्यांनी मॉर्टगेज रेट्स 6 टक्क्याच्या वर नेले आहेत. त्यामुळे खुद्द अमेरिकेमध्येही आता घर विकत घेणे अवघड झाले आहे.
तेथील टेक्सास या प्रांतातही आता इंधनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. भाववाढीच्या भीतीने सॅन अँटोनिओमधील वाहन चालकांना पंपावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
आता साखरेचे दर वाढण्याचीही शक्यता आहे कारण साखरनिर्मितीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमधील साखर कारखाने आता साखरेऐवजी इथेनॉलसारख्या जैव इंधनाची निर्मितीकडे वळण्याची शक्यता आहे कारण वाढत्या इंधन दरांचा त्यांना जास्तीत जास्त फायदा उठवायचा असेल.
विमानांच्या तिकिट दरातही मोठी वाढ होईल, काही ठिकाणी तर ती याआधीच झाली आहे. भारतही याला अपवाद नाही, येथेही हवाई तिकिटांचे दर वाढवण्यात आले आहेत. तरीही हजारो उड्डाणे रद्द केली गेली आहेत.
सोन्याचे भावही कमी होताना दिसत आहेत. एरवी सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते कारण त्याचे दर वाढत असतात. पण सध्या असंख्य कारणांमुळे ते कमी होत आहेत. त्यामुळे भाव वाढतील म्हणून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी सोन्याची खरेदी कमी केली आहे.
व्हेनेझुएला खते निर्यात करू लागला आहे. कारण त्याच्यावरील निर्बंध ट्रंप प्रशासनाने उठवले आहेत. अर्थात हे अमेरिकतील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हे धोरण बदलण्यात आले.
सायप्रसमध्ये सुरू झालेल्या जागतिक बुद्विबळाच्या कँडिडेट स्पर्धेतून भारताच्या कोनेरु हंपीने नाव काढून घेतले आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत सायप्रसमध्ये सुरक्षिततेच खातरी वाटत नाही, असे कारण तिने दिले आहे. त्यासाठी मोठा दंड (सुमारे दहा लाख रुपये) सोसण्याची आपली तयारी आहे, असे तिने म्हटले आहे.
तिकडे रशिया थोडा श्रीमंत होत आहे, कारण इंधनाचे भाव वाढले आहेत आणि तो एक मोठा इंधन निर्यातदार देश आहे. या कारणामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत आहे. (तरीही तूर्त काही काळ इंधनाची निर्यात त्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित इंधनाचे भाव आणखी वाढण्याची तो वाट पाहात असेल.)
चार वर्षे रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धात युक्रेनला आता पेट्रिऑटिक क्षेपणास्त्रांचा तुटवडा भासत आहे. रशियाची क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडण्यासाठी या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा वापर युक्रेन प्रामुख्याने करतो आहे व त्यामुळेच रशियन आक्रमणाला तो आजवर तोंड देऊ शकला आहे.
थायलँडच्या पंतप्रधानांनी तर अर्ध्या बाह्यांचा शर्ट वापरण्यास सुरुवात केली आहे. कामावर जाताना ते त्याचा वापर करतात. असे केल्याने वातानुकूलन यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि मोठी बचत होईल असे त्यांनी सरकारी नोकरांनाही सांगितले आहे, तसेच सर्व लोकांनाही त्यांनी वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवून ऊर्जा बचत करण्याचे आवाहन केले आहे.
फिलिपाइन्समध्ये लोकांना लिफ्ट वापरू नका, जिन्यांवरून जा, तसेच मॉलमध्ये जाऊ नका असे सांगण्यात आले आहे. सरकारी नोकरांनाही लिफ्ट वापरू नका असा आदेश देण्यात आला आहे.
बांगलादेशामध्ये झारा ब्रँडच्या कपड्यांचे ढीगच्या ढीग पडून आहेत. त्याबरोबरच इतर तयार कपड्यांच्या निर्यातीमध्येही अडथळा निर्माण झाला आहे. बांगलादेशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे तेथे एकूणच चिंतेचे वातावरण आहे.
भारतामध्ये सिरॅमिक कंपन्यांनी आपल्या भट्टया बंद केल्या आहेत. कारण त्या भट्टयांसाठी नैसर्गिक वायू किंवा प्रोपेनची आवश्यकता असते. अनेक उपाहारगृहांनी आणि मोठ्या हॉटेलांनीही आपल्या पदार्थांच्या यादीतून (मेनूतून) बटर चिकन, डोसा असे संथपणे तयार होणारे आणि गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे पदार्थ काढून टाकले आहेत. अनेक खाद्यपदार्थांच्या सगळीकडे दिसणाऱ्या गाड्यांची संख्याही खूपच रोडावली आहे. ते काय किंवा टपरीवाले काय कसे तरी कोळसा वा लाकडांच्या चुली वापरून कसेबसे दिवस काढत आहेत. अनेक घरांमधूनही हाच प्रकार दिसून येत आहे. खेडेगावांमध्ये तर याहूनही वाईट परिस्थिती आहे.
युद्ध केवळ पश्चिम आशियात सुरू असले, तरी अशा प्रकारे केवळ आपल्यालाच नाही, तर साऱ्या जगाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, हे आपल्याला उमगेल आणि आपले दुःख थोडेतरी कमी होण्यासाठी मदत होईल, असे वाटते. तरीही आपण आपापल्या परीने, निदान काही काळपर्यंत तरी, इंधनबचत करायलाच हवी, ही काळाची गरज आहे.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Tags: US-IRAN war US-ISRAEL-IRAN war war gulf war oil war strait of hormuz होरमुझची सामुद्रधुनी तेल युद्ध अमेरिका-इराण युद्ध अमेरिका-इजराईल-इराण युद्ध Load More Tags
Add Comment