सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे... 

चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त...

चिं. त्र्यं.खानोलकरांनी मराठी साहित्यविश्वात 1960 नंतरच्या कालखंडात आपली पृथगात्म मुद्रा उमटविली. कादंबरी, कविता, कथा, नाटक, ललित निबंध या सर्वच वाङ्‌मयप्रकारात त्यांच्या प्रतिभेने अनिरुद्ध संचार केला. ‘शून्य शृंगारतें’ ही त्यांची कविता ‘आरती प्रभू’ या नावाने सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झाली. 1959 मध्ये त्यांचा 'जोगवा' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे दिवेलागण आणि नक्षत्रांचे देणें हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. 26 एप्रिल 1976 रोजी त्यांचे निधन झाले. अवघे सेहेचाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. पण आपल्या अल्पायुष्यात ते नक्षत्रांचे देणे देऊन गेले. या संग्रहातील 'सप्रेम द्या निरोप' या शेवटच्या कवितेत कवीने उद्‌गार काढले होतेः
वाजून मेघ जातो घननीळसा विरून 
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे,
बोले अखेरचें तो : आलों इथे रिकामा, 
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे... 

लौकिक जीवनात तापत्रय सोसलेल्या या कवीने 'नक्षत्रांचे देणे' देऊन मराठी कवितेचा गाभारा बहरून टाकला. कवितेवरील अनन्यनिष्ठा हा या कवीचा स्थायी भाव. ‘कविता’ या पहिल्याच कवितेत कवी उद्‌गारतोः
या माझ्या अजाण कवितेचा 
अपमान कां करता बाबांनो - कां? 
प्रेम हवंय का या कवितेचं? 
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा 
तुमच्याच तळहातावर 
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल, 
पण त्यासाठी तुमचे हात
तुम्हाला चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील,
कराल?

आरती प्रभूंच्या काव्यप्रवासातील पाऊलखुणा न्याहाळताना परिस्थितिजन्य कारणांमुळे पदरी आलेली निराशा, त्यातून निर्माण झालेली दुःखसंवेदना आणि अंतर्मनात निर्माण झालेवा भावनात्मक प्रक्षोभ यांची चित्रे आढळतात. “नियती ही सर्वसाक्षी आणि सर्वभक्षी आपण तिच्या खेळातले केवळ एक पात्र.” या आत्मजाणिवेतून त्यांनी काव्यलेखन केले. प्रगल्भतेने ती ठायी ठायी प्रकट होताना दिसतेः
दोन पोक्त पानं: 
एक पिवळंगार, दुसरं हिरवंधम्मक, 
बाजूबाजूला. दोघांचे देठ एकत्र थेट. 
एकावरल्या रेघा दुसरं वाचतंय, स्वतःच्या रेघांतून पसरतंय 
पहिल्याच्या अंगांत. 
दोनच तीं. इतरांतहि अशीं एकत्र दोन कित्येक
वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा.
पिवळ्या उन्हांत पोपटी पानं... पोक्त झाड उभंच्या उभं

एरव्ही आपण पिवळंधम्मक आणि हिरवंगार म्हणतो पण कवीची सुखदुःखसंमिश्र संवेद‌नेतून अवतरलेली अनुभूती निराळी-पिवळ्या उन्हात पोपटी पाने असलेले हे पोक्त झाड निराळे.
जीवनामध्ये कितीही निराशा असली तरी भावात्मक अनुभूतीने ते जगायला हवे या आत्मभानातून आलेले ‘आधार’ या कवितेतील उद्‌गार लक्षणीय वाटतातः
जोवर फुलांच्या बागा फुलताहेत, 
पहाडामागे वारा अडत नाही, 
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे, 
फळे नित्यनेमाने पिकत आहेत, 
माणसाला उपकार आणि त्याची निर्व्याज फेड करता येत आहे, 
एखाद्याची महायात्रा पाडून एखादा 
सहजच नमस्कार करतो आहे,
तोवर आम्हांला एकमेकां बरोबर 
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच 
सर्वाथांनी एकमेकांचे आहोत.
कालाचा प्रत्येक क्षण उष्टावतों
तरी काल ताजा टवटवीत आहे.

कुठल्या तरी अनाम प्रेरणेने जीवनाचा हा गाडा निरंतर चाललेला असतो. कवीच्या चिंतनगर्भ शैलीतून ही अनुभूती प्रकट झालेली आहे. ती इतरांनाही चिंतन-प्रवृत्त करणारी आहे.
वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर, 
चक्रे फिरती फिरती, करकरे चराचर, 
कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात, 
फुले घळतात येथे, तरी पाने वाजतात, 
पाने झडतात येथे, तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात. 
कुणासाठी भरू पाहे, डोळां ऐसे उष्ण पाणी? 
कुणासाठी झरताहे, आयुष्य हे क्षणोक्षणी? 
कुणासाठी रस भरे, सालोसाल फळांतुनी?
या चिंतन प्रक्रियेतून कवीची जीवनधारणा निश्चित झालेली आहे:

प्रश्न नव्हे पतंग अन् खेचू नये त्याची दोरी 
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?
कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर?
ऐसे घोकीत घोकीत, व्हावयाचे दिगंबर

अल्पाक्षररमणीयत्व हादेखील या कवीचा स्थायी भाव आहे. उदा० 
वळणावर रस्ता येतो, 
रस्त्यापाशी वळण येते,
वळणावरून कोण येते? 
रस्त्यावर काळीशार आडवी तिढी सावली येते. 
पसरते लांबच लांब (वळण)

निसर्गानुभूतीतून स्फुरलेली 'झाड' ही कविता या संदर्भात लक्षणीय वाटते. 
झाडाला आले फूल, 
झाडालाच पडली भूल,
फुलाला आलें फळ, 
फुलाला पडली भुरळ, 
फळावर आले रंग, 
ते त्यांच्यांतच दंग, 
फळ पडलें तुटून, 
झाड गेलें वठून


हेही वाचा : चतुरस्र शांताबाई (वंदना बोकील-कुलकर्णी)


'मुंग्यांची रांग’, ’असो आच इंद्रियांत', 'पुनश्च’, ‘कुणाच्या खांद्यावर', 'आजची तारीख, सांगेल राख माझी’, ‘दिवे’, ‘सर्वत्र काय’, ‘कुठल्या कवितेसाठी?’, ‘दुःख ना आनंद‌ही’ आणि 'मृत्यूंत कोणि हासे' या कवितांमधील समग्र जीवनजाणिवेचे कवीचे चिंतन तलस्पर्शी स्वरूपाचे आहे.

प्रेमानुभूतीचे प्रकटीकरण करणाऱ्या अनेक कविता ‘नक्षत्रांचे देणे' या संग्रहात समाविष्ट आहेत. ‘प्रीत फिरुनी मागते’, ‘कां उदासी’, ‘रंग’, ‘काय म्यां द्यावें', ‘सांजतारा', 'सूर्यास्त', 'विष', 'रत्न', 'तूं', 'नको', ‘थोडे चोर थोडे साव’, ‘एकत्र गाठूं तळ', 'राजाराणी’, ‘ब्रह्मार्पण’, ‘भविष्य’, ‘दूर दिवा’, ‘कहाणी’, 'क्षमा केली म्हण न ऽऽ‘, 'उदासी', 'अर्पण करता येतंय तुला', ‘टप्पोर गजरा' आणि ‘विरंगुळा’ इत्यादी कवितांमधील आशय अनेक विभ्रम प्रकट करणारा आहे. भावकोमलतेचा अंतःसूर त्यांत आढळतो. या प्रेमानुभूतीतील प्रियकर-प्रेयसी-मधील संवादी शैलीची लय अधोरेखित करावीशी वाटते

'नक्षत्रांचे देणे या कवितासंग्रहातील प्रतिमाविश्व निसर्गानुभूतीने संपन्न आहे. त्यातील अशा प्रकारच्या निवडक प्रतिमांचा निर्देशही येथे करायला हवा. 'रानचिमणे विभ्रम’, ‘कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी ओवून केलेली जपमाळ’, ‘इंद्रियांची वेल पसरत पसरत झोपेचा गारेगार फुलणारा मोगरा’, 'सुइणीच्या मुखावरील कष्टासारखी रसरसून लखाखणारी कोयतीची धार’, ‘म्हाताच्या घोड्याच्या मनाचा कारकून’, ‘गवतांतून उमटून येणारे गवतलीन पिवळे खाजगी प्रतिबिंब’, ‘एखाद्या रमणीय गोष्टीतल्या कारंजासारखे स्वप्न’, ‘मावळत्या ताऱ्यांचा संधिप्रकाश शोधणारे काचेच्या करवतीसारखे उंच निमुळते सूर', 'संगमर्मरी पाषाणांतील स्पंद', ‘नव्या जन्मल्या मातीसम जड नेत्रांची पाती’, 'संध्याकाळच्या किरमिजी कवडशांसारखा फुलोरपणे घुसमळून जाणारा ताटवा', 'खोडकर रानकोवळी निर्झरी', 'अर्थविषण्ण सायंकालीन गाणें’, ‘पायांवर सांडलेला गिटारीच्या स्वरासारखा थरारता कवडसा', ‘नुक्तीच पसवून पोक्त झालेली केळ’, ‘होत्या-नव्हत्याच्या लाटांवरील संधिप्रकाश’, 'दुःखाचा डोंगर रचणाऱ्या पापण्या', 'गालावरचं मीठपाणी', 'काजळभरले अशांत डोळे’, 'डोळ्यांतल्या डोळ्यांत रडणं', 'स्वराघातांनी ठसवलेली मध्यरात्र’, ‘लिंबकान्त प्रतिबिंब', 'अनाम पाखरांचा मंजूळपणे तरंगत जाणारा थवा’, ‘बहरांचे बाहू’, ‘पायवाटेची अडाणी नागमोडी वक्रता', 'काचसा काळोख’, ‘हुन्नरी नेत्रपाती', 'सांध्यछायांच्या किनारी', ‘टपोऱ्या अक्षरांच्या पत्रांतली पोर', 'उष्ण श्वासांची नव्हाळी', 'दाट ओली असोशी’, 'वादिसंवादी सुरांचे किनारे’, 'येरझाऱ्यांची कटीला बांधलेली मेखला', 'विस्तीर्ण पोकळीचा गंधार', 'घुमटांत टाहो देणारे प्रतिध्वनी' आणि 'पिकून गेलेला वृद्ध माळी' या प्रतिमांमधून भावसमृद्धीची आणि आशयघनतेची जाणीव मनाला होते. 

शारीर-मानस आंदोलनांची अलवार चित्रे कवीने तन्मयतेने येथे रेखाटली आहेत. मानवी सुखदुःखाचे उन्हाळे-पावसाळे अनुभवल्यामुळे या कवीचा मनःपिंड किती प्रगल्भ झालेला आहे याची कल्पना या प्रतिमाविश्वामधून येते. 'जोगवा' पासून 'नक्षत्रांचे देणें' पर्यंतचा काव्यप्रवास अंगप्रत्यंगांमधून किती समूद्ध होत गेला होता याच्या खाणाखुणा क्षणोक्षणी प्रत्ययास येतात. नक्षत्रांचे देणे हा आरती प्रभूंच्या काव्यप्रतिभेचा मानबिंदू आहे.

- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

 

Tags: चिं. त्र्यं. खानोलकर नक्षत्रांचे देणे कविता arti prabhu Load More Tags

Comments:

LARPYPgIVvqbExGnszZ

oSRIbOKGrnReibVOdmMOvmuD

CrfDLFMHplJQBeyZo

FzmRIumNyYNJfpxKhhzPRc

Nandkishor Lele

सर नमस्कार.आताच आपला प्रतिभावंत ज्येष्ठ कवी आरती प्रभू वरील काव्यांची वैशिष्ट्ये, सौंदर्य स्थळे , उलगडून दाखवणारा आणि काव्या मागील काव्य समोर आणणारा आपला लेख खूप भावला. आपले लेख नेहमी खूप विस्तृत असतात परंतु हा लेख छोटा असला तरी एखाद्या शोभा दर्शकामध्ये जसे विविध मनभावन मोहक अविष्कार पहायला मिळतात तसे आरती प्रभूंच्या काव्यातले भाषेतले अविष्कार या लेखात प्रतीत झाले आहेत. खूप खूप धन्यवाद.

Add Comment