माई : माझी आई

साधना प्रकाशनाच्या '१५५ सदाशिव पेठ, सातारा' या आगामी पुस्तकातील एक प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली या गावचे अच्युत दाभोलकर हे वकिली करण्यासाठी साताऱ्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी चौथीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या तारा या मुलीशी त्यांचा विवाह झाला. या दाम्पत्याला दहा अपत्ये झाली. सात मुले व तीन मुली. सर्वांत मोठे देवदत्त तर सर्वांत लहान नरेंद्र. हे सर्वजण साताऱ्यातील 155 सदाशिव पेठ, या घरात लहानाचे मोठे झाले. या दहा भावंडांच्या सोबतच अच्युतरावांच्या भावाच्या दोन मुलीही त्याच घरात वाढल्या. ही सर्वच भावंडे वृत्तीने स्वतंत्र आणि आपापल्या क्षेत्रात कर्तबगार ठरली. त्यांच्या पुढच्या पिढीनेही तोच कित्ता गिरवला. आता तिसरी पिढीही यशस्वी होते आहे. त्यातील काहींनी वेळप्रसंगी स्वतःविषयी, भावंडांविषयी व कुटुंबाविषयी लेख लिहिले. काही आप्तस्वकीयांनीही त्यांच्याविषयी लेख लिहिले. त्यातील निवडक 28 लेखांचे पुस्तक '१५५ सदाशिव पेठ, सातारा' या नावाने साधना प्रकाशनाकडून येत आहे. भानू काळे आणि डॉ. अनिल जोशी यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. त्याचे प्रकाशन 20 मे 2026 रोजी सातारा येथे होणार आहे. या पुस्तकातील एक लेख इथे प्रसिद्ध करत आहोत. अच्युतरावांच्या पत्नी आणि या बारा कर्तृत्ववान भावंडांच्या आई ताराबाई उर्फ माई यांच्याविषयी त्यांच्या मुलीने म्हणजे कुंदा दाभोलकर यांनी हा लेख लिहिला आहे.

आमची माई म्हणजे मला एक कधीच न सुटलेले कोडे आहे. तिचा जीवनपट ज्या ज्या वेळी माझ्या मनःचक्षूसमोरून सरकतो त्या त्या वेळी माझ्या मनासमोर तिच्या व्यक्तित्वाचा एक वेगळाच पैलू दिसून येतो आणि त्यातूनच मला तिचे बहुविध अनुभवांतून संपन्न झालेले जीवन जाणवते. भित्री माई, करारी माई, त्यागी माई, ज्ञानसंपन्न माई, बुद्धिसंपन्न माई, खूप खूप शिकावयास न मिळाल्याने हिरमुसलेली माई, लग्न म्हणजे काय याची किंचितही जाण नसतानाच लग्न झालेली भाई व त्यामुळेच आपण लग्न उगीचच केले असे सतत वाटणारी भाई, विचाराच्या धारेने त्या काळातही 'सहशिक्षण' सारख्या विषयावर 'ऐक्य'सारख्या सातारच्या साप्ताहिकातून लेख लिहून (१९३२ सप्टेंबरच्या सुमारास) सर्वांच्या कौतुकाची विषय झालेली माई, संकटसमयी सगळ्यांना धीर देणारी माई व दुसऱ्याच्या संकटाचे वेळी स्वतःच्या कोणत्याही अडचणी दूर सारून मदतीला धावणारी माई, फार शिकलेली नसताना मुलांना चांगल्या त-हेने शिकवणारी माई, मुलांना कोणता आहार द्यावा, त्यांचे आरोग्य कशा तन्हेने राखावे यावर वाचन व विचार करून विविध तन्हेने मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून मुलांची जोपासना करणारी माई, आम्हां कुणा मुलांना न मारणारी, न रागावणारी, कधी आज्ञा न करता प्रेमानेच कधीतरी 'करतेस का एवढे काम' म्हणून विचारणारी माई आणि आज वृद्ध झाली तरी तशीच करारी, तशीच भित्री, तितकीच हळवी, तशीच ज्ञानपिपासू व जिज्ञासू माई माझ्या नजरेसमोरून सरकते, आणि माझ्या मनात अनेक भावना दाटून येतात.

त्या काळच्या सामाजिक प्रवृत्तीमुळे एका कर्तृत्ववान स्त्रीचा जीवनपट पूर्ण बदलला. तिच्या व्यक्तित्वविकासाला अनेक बंधने पडत गेली. त्याची तिला खंत वाटे पण त्याकरिता ती झुरत बसली नाही. त्या काळच्या समाजात तिला दिलेली भूमिका तिने अत्यंत डोळसपणे पार पाडली. घर हीच तिने आपली कार्यभूमी केली. सदा कार्यरत राहाणे हाच तिने धर्म मानला व केलेले कार्य उत्कृष्ट झाले पाहिजे याकरिता विचारपूर्वक ज्ञानार्जन करणे हे तिने साधन मानले. 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' अशा प्रसन्न वातावरणात तिने घराचा स्वर्ग बनविला व सदा कार्यरत राहून आपल्या घराची फुलबाग बनविली.

माईचा विचार करता करताच माझ्या मनात विचार येतो की माईनंतर केवळ एकोणीस वर्षांनी मी जन्मले पण तिच्याहून कितीतरी मोकळ्या वातावरणात वाढू शकले; हवे तेवढे शिकू शकले; ते समाजाच्या प्रवृत्तींच्या विरुद्ध पोहण्याचे माईच्यांत धैर्य होते म्हणून. हीच संधी जर तिला स्वतःला मिळाली असती तर ती आज जगात कितीतरी वरच्या दर्जाला गेली असती.

माईचा जीवनपट जर रेखाटला तर विसाव्या शतकाच्या अगदी सुरवातीपासूनची सामाजिक परिस्थिती काही प्रमाणात समजू शकते, विवाहसंस्थेचेही दर्शन होते व चांगल्या घरातूनही मुलींना त्या कितीही हुशार असल्या तरी शिक्षणाला कशा त-हेने वंचित व्हावे लागते हेही दिसून येते. मुलींचे क्षेत्र चूल-मूल इतकेच अशीच भावना दिसून येते. मुलींना मुलांच्या शाळेत घालण्यास पालक धजावत नसत व त्यांच्या लग्नाची वयोमर्यादाही वाढवावयास ते कचरत असत. आमची माई जर त्या काळाची प्रातिनिधिक म्हणून समजले तर त्या काळातच लिहिली गेलेली 'तेथे कर माझे जुळती' ही कविता जास्त प्रकर्षाने पटते.

ज्या स्त्रियांनी संसारालाच जीवन वाहून घेतले व राष्ट्राला उत्कृष्ट मुले तयार करून देण्यातच जीवनाची सार्थकता मानली त्या स्त्रियांची माहिती व महती आपण आज मिळवली पाहिजे व त्यांच्या समाधानी व कर्तृत्वपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली कोणती होती, दहा-दहा किंवा अधिक मुलांना चांगली मूल्ये, चांगली आरोग्यसंपदा त्या कशा त-हेने देऊ शकत होत्या याचा आपण शोध घेतला पाहिजे. याच विचाराने प्रेरित होऊन माईचा जीवनपट शब्दांकित करण्याचे येथे ठरविले आहे.

राज्याभिषेकाची बातमी ऐकून जो राम हर्षभरित झाला नाही व वनवासाचे दुःख पुढे उभे राहिले तरी जो राम गलितगात्र झाला नाही त्या रामाची मुखकांती कशी दिसत असेल ते मला माझ्या आईच्या मुखकांतीकडे पाहताना कळू शकते. गीतेमध्ये दिसून येणारे स्थितप्रज्ञदर्शन मला माझ्या आईत सतत दिसून येत असल्यामुळे इतरांपेक्षा आगळे असणारे तिचे व्यक्तित्व सतत जाणवत आले. 

आनंदाच्या वेळी ती जितकी शांत, सात्विक वाटते तितकीच खिन्न करणाऱ्या प्रसंगीही वाटते. सगळ्या वस्तूंचा हव्यास असलेल्या मला ती फार विरक्त आहे असे वाटे. दागदागिने, उंची कपडे घरात असतानाही ते तिने वापरलेले मी कधी पाहिले नाही. अत्यंत प्रसन्नपणे व साधेपणाने घरात ती सदैव वावरत असल्यामुळे आपले घर म्हणजे एक अमोल ठेवाच आहे असे मला सतत वाटत आले. आणि अशा या घरात अशा आईच्या सहवासात आम्ही भावंडे प्रेमरज्जूनी निगडित होत होतो. अनेक गोष्टी कळत नकळत शिकत होतो, निरागस वृत्तीने वाढत होतो.

समाजात ज्या काही रुढी अज्ञानातून व परंपरेतून आलेल्या होत्या त्यांना तिने आपल्या आयुष्यात कधीच थारा दिला नाही. स्त्रीशिक्षण, सहशिक्षण, हुंड्याची चाल, पुनर्विवाह, विवाहात होणारे मानपान व रुसवे-फुगवे यांसारख्या प्रश्नांवर तिची स्वतःची अशी ठाम मते तिने बनवलेली होती व तिने ती कुणाचाही विरोध दूर सारून आचारातही आणली. पण तरीही समाजात तिला एकही शत्रू नव्हता. "माई, तुझे बाई सगळे मुलुखावेगळेच ! लोक हसतील म्हणून तुला भीती कशी नाही वाटत?" असे तिचे जवळचे व दूरचे नातेवाईक व मैत्रिणी म्हणत असत. तर, "माई तुम्हाला म्हणून जमते हो हे सर्व काही. आम्हाला नाही जमणार" असे तिला जाणणारे लोक म्हणत असत. पण तिला योग्य वाटणारी मते तिच्या पूर्ण विचारांतून पारखून घेतलेली असल्यामुळे तिची वाटचाल तिला योग्य वाटणाऱ्या दिशेनेच होत असे व आज तिच्याच दिशेकडे वळावयास हवे याची जाण आपल्या समाजाला होत आहे.

पण आजही त्या दिशेने हे लोक बिचकतच पाऊल टाकत आहेत. काहीना अद्यापही या त-हेचे विचार पटत नाहीत व "मोठा जावई म्हणजे विष्णूचा अवतार ! दुसऱ्या मुलीच्या लग्नात त्याची पूजा करून त्याचे पाय सासूसासऱ्यांनी धुतलेच पाहिजेत !" असे म्हणताना "हे म्हणणे न पटणाऱ्यांना आपली संस्कृती माहिती नाही आलेत मोठे सुधारक!" असे म्हणून हिणवताना ते दिसतात व हे किंवा असे उद्गार तथाकथित उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांचेच नव्हे तर पुरुषांच्याकडूनही ऐकू येतात. असे लोक खरोखर डोळस असणाऱ्या माणसांनाच अंध ठरवितात व त्यांची अवहेलना करतात.

अशा या समाजाच्या विरुद्ध जाण्याचे माईचे धाडस व आपल्या मुलांनाही विचारस्वातंत्र्य देण्याची तिची वृत्ती यातच तिचे आगळे व्यक्तिमत्त्व दिसून येते. पण केव्हाही, "अमुकच कर, ते केलेच पाहिजे" अशी तिने आम्हां कुणावरही सक्ती केली नाही.

एकदा मला माझ्या काही सहकाऱ्यांनी विचारले. "अहो दाभोलकर, स्त्रीमुक्ती म्हणजे काय हो? एक तरी स्त्री, मुक्त स्त्री म्हणून तुम्ही आम्हाला दाखवाल का?" मी सहजच हसत हसत बोलून गेले, "तुमच्या समोरच मी उभी असताना हा प्रश्न तुम्हाला पडलाच कसा? मीच नव्हे तर आज माझी ८ वर्षांची वृद्ध असणारी आईही एक मुक्त स्त्रीच आहे."

मुक्त स्त्री ही 'आम्हाला मुक्ती द्या' म्हणून भीक मागत नाही. ती आपल्या धारदार विचारप्रणालीतून व योग्य अशा आपल्या आचरणातून आपली मुक्ती मिळवत असते. जनप्रवाह तिला काय म्हणेल याची तिला पर्वा नसते. अशी मुक्ती आमच्या माईनी केव्हाच मिळवली आहे व म्हणून मी तिच्या व्यक्तित्वाला एक आगळे व्यक्तित्व म्हणून संबोधिले आहे.

या पुढील प्रकरणांतून तिचा जीवनपट अलगडताना आपल्याला या मुक्त स्त्रीचे आगळेपण दिसून येणार आहे!

(२.७. १९८३) (कुंदा दाभोलकर यांच्या हातून अर्धवट लिहून झालेल्या माईंच्या चरित्रातील सुरुवातीचा भाग.)


Tags: नरेंद्र दाभोलकर डॉ. नरेंद्र दाभोलकर डॉ. दाभोलकर श्री. अ . दाभोलकर दत्तप्रसाद दाभोलकर कुंदा दाभोलकर अतिश दाभोलकर हमीद दाभोलकर मुक्ता दाभोलकर भानू काळे डॉ. अनिल जोशी सातारा प्रयोग परिवार अंधश्रद्धा निर्मूलन समिती विनय हर्डीकर Load More Tags

Add Comment