मानवी मेंदू म्हणजे ‘स्टोरेज’ नव्हे, 'रिसोर्स' आहे!

AI च्या युगात शिक्षणव्यवस्थेने विद्यार्थ्यांना माहिती नव्हे विवेक दिला पाहिजे

Google Gemini Generated

विचार करण्याची सवय नसेल, तर नवीन साधनांवर अति अवलंबित्व निर्माण होते. आज अनेक विद्यार्थी ChatGPT किंवा इतर AI साधनांकडे पाठ्यपुस्तकासारखे पाहतात. मिळालेले उत्तर स्वीकारले जाते, पण पडताळणी कमी होते. छापील पुस्तकातील उत्तर अंतिम मानण्याची जुनी सवय आता मशीनच्या उत्तरावर विश्वास ठेवण्यामध्ये रूपांतरित झालेली दिसते. "मशीनने सांगितले म्हणून ते बरोबर आहे" असे गृहीत धरण्याच्या या प्रवृत्तीला मानसशास्त्रात 'ऑटोमेशन बायस' असे म्हटले जाते. हा धोका केवळ AI शक्तिशाली आहे म्हणून निर्माण होत नाही; तर AI वापरणाऱ्याला विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची सवय नसल्यामुळे निर्माण होतो.

नोकरीसाठी उमेदवारांची निवड करणे, तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने विकसित करणे आणि विविध पार्श्वभूमीच्या लोकांसोबत काम करणे या प्रक्रियेत एक गोष्ट वारंवार लक्षात येते – आपल्याकडे मात्र पात्र उमेदवारांची कमतरता नाही; परंतु प्रत्यक्ष कामासाठी तयार असलेल्या उमेदवारांची कमतरता नक्कीच आहे. अनेकांकडे पदवी आहे, प्रमाणपत्रे आहेत, मेहनत करण्याची तयारीही आहे, पण स्पष्ट, तर्कसुसंगत विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याचा आत्मविश्वास अनेकदा कमी दिसतो. समाजामध्ये दिसणारे हे चित्र केवळ एखाद्या व्यक्तीपुरते किंवा नोकरीसाठी उमेदवार निवडणे यापुरते मर्यादित नाही; ते संपूर्ण शिक्षणव्यवस्थेच्या रचनेविषयी काही धोक्याचे संकेत देणारे आहे. ही व्यवस्था मुख्यतः माहिती गोळा करणे आणि ती लक्षात ठेवणे याच गोष्टींना प्रोत्साहन देते, प्रश्न विचारण्यावर आक्षेप घेते, चौकटीबाहेरचा विचार करण्यावर मर्यादा घालते आणि शांत बसण्याला शिस्त समजते.

समस्या विद्यार्थ्यांच्या / उमेदवारांच्या बुद्धिमत्तेची नाही, तर आपल्याकडच्या व्यवस्थेची आहे. आपल्या शिक्षणसंस्कृतीवर अजूनही मोठ्या प्रमाणावर पाठांतरकेंद्री शिक्षणाचा प्रभाव दिसतो. परीक्षेत योग्य उत्तर पटकन लिहिणारा विद्यार्थी पुढे जातो; पण ते उत्तर योग्य कसे, त्यामागचा तर्क काय, हे समजावून सांगण्याची अपेक्षा आपली व्यवस्थाच विद्यार्थ्यांकडून करत नाही. निदान जेवढी सातत्याने केली पाहिजे तेवढी तरी नक्कीच ही अपेक्षा केली जात नाही. शिकवणी वर्गांमध्ये सूत्रांचा सराव करून घेतला जातो, शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केला जातो, आणि एकूण सर्वत्र विद्यार्थ्यांना ‘लक्षात ठेवण्याची’ सवय लावली जाते; विचार करण्याची नव्हे!

याचा परिणाम असा दिसतो की अनेक विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात, पण प्रश्न मांडू शकत नाहीत; त्यांना साधने वापरता येतात, पण निर्णय घेण्याच्या क्षणी ते अडखळतात; त्यांच्याकडे खूप माहिती असते, पण विवेक कमी पडतो; शिक्षणाने साक्षर होता येते, पण निर्णय घेण्याची क्षमता आपोआप निर्माण होतेच असे नाही. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदललेल्या जगात ही कमतरता आणखी स्पष्ट दिसू लागली आहे. 

कोणतीही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. इतिहासात काही काळ पाठांतरावर आधारित शिक्षणाची गरज होती. त्या काळी पुस्तके कमी होती, माहिती मर्यादित होती आणि ज्ञान जपणे महत्त्वाचे होते. शिवाय भारतीय समाजामध्ये सर्वच बाबतींत परंपरा टिकवण्याला, संस्कृतीचे जतन करण्याला, जुने तेच सोने मानण्याला प्राधान्य दिले जात असे, अजूनही बव्हंशी दिले जातेच. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. त्यामुळे स्वतंत्र विचाराला नेहमीच प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना संकोच वाटतो. प्रश्न विचारणे म्हणजे शिक्षकांना विरोध किंवा शिक्षकांचा अपमान अशी आदरयुक्त भीतीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासून निर्माण केली जाते. समूहात प्रश्न विचारला आणि त्यात काही चुकले तर त्याला आपले अपयश / आपली नाचक्की समजण्याची मानसिकता घडवली जाते. मग बहुतांश विद्यार्थी सुरक्षित उत्तर शोधतात, ठरलेली पद्धत स्वीकारतात आणि त्यांची स्वतः विचार करण्याची सवय कमी होत जाते.

परीक्षा पद्धतीही याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरते. अनेक वर्षांच्या शिक्षणाचे मूल्यमापन आपल्याकडे केवळ काही तासांच्या, केवळ स्मरणशक्तीवर आधारित असलेल्या परीक्षेद्वारे केले जाते. वेगळा विचार मांडणाऱ्याला प्रोत्साहन मिळतेच असे नाही. आणि म्हणूनच “शाळा केवळ चाकोरीबद्ध सावधपणा शिकवतात”, अशी टीका अनेक शिक्षणतज्ज्ञ करतात. 

आज जग वेगाने बदलत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता त्या बदलाचा वेग आणखी वाढवत आहे. त्या तुलनेत शिक्षणपद्धतीतील बदलाचा वेग मात्र नगण्य आहे. आज कोणतीच माहिती दुर्मिळ राहिलेली नाही. इंटरनेट, डिजिटल साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून काही सेकंदात उत्तर मिळते. अशा परिस्थितीत पाठांतराचे महत्त्व कमी होते. ‘लक्षात ठेवणे’ ही गोष्ट मानवी मेंदूने केलीच पाहिजे अशी गरज आता उरलेली नाही.

उपलब्ध झालेली माहिती योग्य आहे का, पूर्ण आहे का, दिशाभूल करणारी आहे का, हे ठरवण्यासाठी विचार, तर्क, आणि विवेक यांची शक्ती लागते. आणि नेमका हाच भाग शिक्षणात पुरेशा प्रमाणात विकसित होत नाही. ज्या शिक्षणपद्धतीत प्रश्न विचारण्याला पुरेशी जागा नसते, तिथे तंत्रज्ञानाचा वापर वाढला तरी समज वाढेलच असे नाही. अनेक विद्यार्थ्यांना माहिती शोधता येते, पण त्या माहितीचा अर्थ लावणे, तिची पडताळणी करणे आणि योग्य निर्णय घेणे यत त्यांना खूप अडचणी येतात. हा फरक प्रोफेशनल जगात अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

विचार करण्याची सवय नसेल, तर नवीन साधनांवर अति अवलंबित्व निर्माण होते. आज अनेक विद्यार्थी ChatGPT किंवा इतर AI साधनांकडे पाठ्यपुस्तकासारखे पाहतात. मिळालेले उत्तर स्वीकारले जाते, पण पडताळणी कमी होते. छापील पुस्तकातील उत्तर अंतिम मानण्याची जुनी सवय आता मशीनच्या उत्तरावर विश्वास ठेवण्यामध्ये रूपांतरित झालेली दिसते. "मशीनने सांगितले म्हणून ते बरोबर आहे" असे गृहीत धरण्याच्या या प्रवृत्तीला मानसशास्त्रात 'ऑटोमेशन बायस' असे म्हटले जाते. हा धोका केवळ AI शक्तिशाली आहे म्हणून निर्माण होत नाही; तर AI वापरणाऱ्याला विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची सवय नसल्यामुळे निर्माण होतो. उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्यांना असा अनुभव वारंवार येतो. काही उमेदवार AI चा वापर करून उत्तरे तयार करतात, परंतु त्याची सत्यता त्यांनी पडताळलेली नसते किंवा त्रुटी त्यांना लक्षात येत नाहीत. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण ‘स्वतंत्रपणे विचार करण्याचा सराव नसणे’ हेच आहे. AI च्या युगात सर्वात मोठा प्रश्न ‘मशीन काय करू शकते?’ हा नाही; ‘माणूस विचार करू शकतो का?’ हा आहे. 

जगातील अनेक देशांनी माहितीच्या युगात शिक्षणपद्धतीत बदल करण्याची गरज वेळेवर ओळखली. माहिती सहज उपलब्ध असताना केवळ पाठांतरावर आधारित शिक्षण टिकू शकत नाही हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे त्यांनी केवळ अभ्यासक्रम बदलला नाही, तर मूल्यमापन, वर्गातील शिक्षण, शिक्षकाचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा या सगळ्यांमध्ये संरचनात्मक बदल केले.


हेही वाचा : Working towards a new way of learning (Ujjwala Deshpande) (तीन भागांची लेखमालिका)


फिनलंडसारख्या देशांनी परीक्षेची रचना बदलून समज आणि वापर यांना प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांनी केवळ उत्तर देणे पुरेसे नसते; त्यांना विचार मांडावा लागतो, तर्क स्पष्ट करावा लागतो आणि अनेकदा प्रकल्प सादर करून त्याचे विवेचन करावे लागते. सहाध्यायांसोबत काम करणे, चर्चा करणे आणि समस्येचे वेगवेगळे उपाय शोधणे या प्रक्रियेला तिथे महत्त्व दिले जाते.

सिंगापूरमध्ये विषयांचा भार कमी करून आंतरशाखीय अभ्यासावर भर देण्यात आला. एकाच प्रश्नाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली जाते. केवळ माहिती लक्षात ठेवणे पुरेसे नाही; त्या माहितीचा उपयोग कसा करायचा हे शिकवले जाते.

एस्टोनियामध्ये डिजिटल शिक्षणाबरोबर तंत्रज्ञानविषयक नैतिकता शिकविली जाते. कोडिंग शिकवले जाते, पण त्याचबरोबर माहितीची छाननी कशी करायची, पक्षपात कसा ओळखायचा आणि डिजिटल साधनांवर किती विश्वास ठेवायचा हेही शिकवले जाते. युनायटेड किंगडममध्ये AI सहाय्यक साक्षरतेचा समावेश केवळ विज्ञान विषयात नाही, तर मानवशास्त्रातही केला जात आहे.

आपल्याकडेही सुधारणा आवश्यक असल्याची जाणीव आहे. नवीन शिक्षण धोरणात सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि कौशल्याधारित शिक्षण यांचा उल्लेख आहे. परंतु केवळ नवीन विषय जोडून किंवा एक धडा वाढवून बदल घडत नाही. बदल हवा असेल, तर व्यवस्थेची मूळ संरचना बदलावी लागते. शिक्षकांना केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर विचार घडवण्यासाठी प्रशिक्षण द्यावे लागेल. परीक्षापद्धती अशी असावी की विद्यार्थ्यांना तर्क मांडावा लागेल, उत्तराचे समर्थन करावे लागेल आणि स्वतःचे मत स्पष्ट करावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल शिक्षण देताना फक्त साधन कसे वापरायचे हे शिकवून उपयोग नाही; निर्णय कसा घ्यायचा, पडताळणी कशी करायची आणि कुठे थांबायचे हे शिकवावे लागेल.

शिक्षणधोरणांच्या पातळीवर बदलांची मांडणी स्पष्टपणे केली गेली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येतात. अभ्यासक्रम बदलतो, पण पद्धत बदलत नाही. प्रशिक्षण होते, पण सवय बदलत नाही. परीक्षा बदलते, पण मूल्यांकन बदलत नाही. संरचनात्मक बदल नेहमीच कठीण असतात. ते घडवण्यासाठी  पूर्ण कमिटमेंट आणि अधिक मेहनत तर लागतेच, परंतु त्याचबरोबर जुन्या सोयी-सवयी सोडण्याची तयारी लागते, म्हणून बदलाची प्रक्रिया धीमी होते.

हा प्रश्न केवळ शिक्षणाचाही नाही; आपण समाज कसा घडवणार आहोत याचा आहे. माहिती प्राप्त करणारे लोक अनेक असतील, पण निर्णय घेणारे, प्रश्न विचारणारे आणि बदल घडवणारे लोक वेगळे असतात. भारताकडे प्रतिभा आहे, मेहनत आहे, संधी आहे; परंतु विचाराला जागा नसेल, तर ही क्षमता पूर्ण वापरली जाणार नाही. AI च्या जगात डेटा स्वस्त आहे, विचार महाग आहे. भविष्यात पुढे जाणारे तेच असतील जे माहितीपेक्षा समजाला, उत्तरांपेक्षा प्रश्नांना आणि साधनांपेक्षा निर्णयक्षमतेला महत्त्व देतील. आज बदल सुरू केला नाही तर उद्या उशीर होईल, आणि आता यापुढे उशीर होणे आपल्याला परवडणारे नाही.

- राकेश घुमटकर
rakesh@perfectpeoplesearch.com 
(लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक तसेच तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक आहेत.)

Tags: education rational thinking interpretation critical thinking मशीन लर्निंग क्षमता विकास एआय विचार विवेक तर्क स्टोरेज रिसोर्स Load More Tags

Comments:

Shraddha Joshi

You have written actual fact. New generation is mostly depends on the technology. They have stop thinking on the actual facts.

Add Comment