तरुण तजेलदार आवाजाची आशा! 

आशा भोसले यांना आदरांजली... 

ज्या आवाजानं 'देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला', हे गीत गायलं, त्याच आवाजानं 'बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला' आणि 'झुमका गीरा रे, बरेलीके बाजारमें' हे देखील गायलं यावर चटकन विश्वास बसत नाही, पण ते खरंच आहे. साक्षात लता मंगेशकरनं तिच्याकडून 'रेशमाच्या रेघांनी', हे गाणं गौण घेतलं. त्यातला 'हात नका लावू माझ्या साडीला' मधला खोटा खोटा फणकाराही त्यांनी किती खुबीने दाखवला. तसंच 'ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी की गं काढली, बाई माझी करंगळी मोडली' हे ऐकताना भुलला नाही, असा श्रोता विरळाच.


या लेखात जिथे जिथे एखाद्या गाण्याचे शब्द येतात, त्यावर क्लिक केल्यास ते गाणे ऐकता  येईल.


पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा…” आशा भोसले यांच्या सुरातली ही रचना प्रथम ऐकली होती, तेव्हा एकदम काहीतरी विलक्षण वाटलं होतं. कारण हाच तो आवाज होता, ज्यानं ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' हे गीत म्हटलं होतं. तसंच 'मिस्टर जॉन या बाबा खान या लाला रोशनलाल जो कोइ देखे मेरा जलवा हो जाए कुरबान', आणि 'इना मिना डिका' म्हणणाऱ्या या गायिकेनं 'मोरा मन बडा पापी' हे ही गायलं होतं. 'अभी न जाओ छोडकर' हे देखील. तशी तिनं साधारण बारा हजार गाणी म्हटली. याची बरोबरी तिच्या लतादीदीलाही करता आली नाही. अनेक प्रकारची गाणी तिनं अनेकांबरोबर म्हटली. लता मंगेशकर, महमद रफी, मुकेश, किशोर कुमार, सुधीर फडके, गीता दत्त व इतर अनेकांबरोबर. एक सांगायचं तर लतादीदीपेक्षा मराठीमध्ये तिचा प्रभाव अधिक दिसतो. कदाचित दीदीहून जास्त गाणी तिनं मराठीत गायली म्हणूनही असेल.

आचार्य अत्रेंच्या ‘श्यामची आई’ मधलं, 'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी' हे गाणं डोळ्यांतून अश्रू काढणारं, तसंच जागृती मधलं, 'चलो चले माँ' हे गाणंसुद्धा सुन्न करून टाकणारं. कोणी लहान मूलच गातंय असं वाटावं. आणि 'बैल तुझे हरणावाणी गाडिवान दादा, तरुण माणसाच्या मनिचा जाण तू इरादा', हे थेट ग्रामीण ढंगातलं गाणं तो प्रसंग सहजच डोळ्यापुढं आणतं. 'जय शारदे वागीश्वरी' ऐकताना आपण नकळत त्याला दाद देत तेच गाणं गुणगुणू लागतो. आणि अगदी वेगळ्या धाटणीनं गायलेल्या ‘उमराव जान’ मधील गझला भान विसरायला लावतात. अनेकदा आश्चर्य वाटतं की, खरोखरच एकाच गायिकेनं ही गाणी म्हटली आहेत का? पण आपण लगेच विचार करतो की खरंच काय हे, कसं जमतं तिला. वेगळी गाणी, संगीतकारांनी दिलेल्या निरनिराळ्या, वेगवेगळ्या धाटणीच्या चाली आणि त्यांना दिलेला संपूर्ण न्याय. खरोखरच संगीतकाराला जे हवं असायचं त्यापेक्षा अधिक काहीतरी ती गायची. संगीतकार खूश होत आणि श्रोते भरभरून दाद देत. त्यांच्या कार्यक्रमांत अनेकजण वेगवेगळी गाणी सुचवत आणि त्या शक्यतो सर्वांना समाधान देण्याचा प्रयत्न करायच्या.

सगळेजण तिच्या हिंदी गाण्यांच्या आठवणी काढतात तशा मराठी गाण्यांच्याही. चित्रपट गीते, भावगीते, गझला, लावण्या, भक्तिगीते, कोळीगीते, भजने, रॉक अ‍ॅन्ड रोल आणि डिस्को पद्धतीची गाणीही त्यांना वर्ज्य नव्हती. त्यांच्या कार्यक्रमात काय सुचवावं असा प्रश्न चाहत्यांना पडत असे. कारण तसंच. हे सुचवावं का ते, यात एकावर अन्याय तर होणार नाही ना, अशी शंका यायची.

पण केवळ गाणी हाच त्यांचा छंद नव्हता. त्यांना विविध पदार्थ करण्याची आवड होती आणि काही पदार्थांवर तर खास त्यांचा असा ठसा असायचा. याच आवडीपोटी त्यांनी अनेक देशांत रेस्टॉरंट्स सुरू केली, त्यांच्याच नावानं. ती त्यांच्या गाण्यांएवढीच लोकप्रिय झाली. त्या अनेकदा तेथे देखरेख करत आणि सूचनाही देत. याबरोबरच त्यांना उत्तम नकला करता येत आणि जाहीर कार्यक्रमांतही त्या करत असत. त्यातही लतादीदींची नक्कल त्या करत, ती अविस्मरणीय होती.

पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीसाठी केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की 'मन क्यूं बहका रे बहका आधी रात को, बेला महका रे महका आधी रात को', हे गाणं दीदी आणि मी म्हटलंय. त्यात लताची ओळ म्हणून दाखवताना 'दीदी असं म्हणते' असं सांगून त्या लताच्याच पद्धतीनं खांद्यावर पदर घेऊन म्हणू लागल्या आणि नंतर स्वतःच्या ओळी स्वतःच्याच धाटणीनं त्यांनी म्हटल्या. (या गाण्याची एक गमतीशीर हकीकत अशी की त्यांना लतानंही दाद दिली होती. रेकॉर्डिंगच्या वेळी लतानं तिची ओळ 'मन क्यूं बहका रे बहका', प्रथम म्हटली आणि ती थांबली. क्षणभर काय करावं हेच आशाला कळेना, पण नंतरच्या क्षणीच तिनं तिची ओळ म्हटली, 'बेला महका रे महका आधि रातको' आणि दीदीनं प्रसन्न नजरेनं तिच्याकडं प्रसन्नपणं पाहिलं होतं).

पुण्याच्या त्याच कार्यक्रमात किशोरकुमार गाताना काय काय करायचा आणि कधी कधी सरळ लोळायचाही, पण हे करताना गाणं मात्र संगीतकाराला हवं असे, त्या पद्धतीनं गायचा. त्यामुळं आपल्याला हसू आवरत आपल्या ओळी कशा प्रयासानं म्हणाव्या लागत हेही सांगितलं होतं. आणि मग, 'जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी' या गाण्याला त्यांनी सुरुवात करून दिली आणि नंतर राहुल देव बर्मननं त्याच्या सहकाऱ्यांबरोबर जो काही धुडगूस घातला त्यानं सर्वांबरोबरच त्यांनाही हसू आवरेना. त्या बाजूला जाऊन थांबल्या आणि स्टेजचा ताबा त्यांनी राहुल देव बर्मनकडे दिला. तो कार्यक्रम बऱ्याच उशिरा संपला हे सांगायला नको. आजही तेथे असणाऱ्यांना तो आठवत असेल.

अशा या महान गायिकेला समक्ष भेटण्याचा योग येईल असं कधी वाटलं नव्हतं. तो आला, त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं. महाराष्ट्र टाइम्ससाठी ती मुलाखत होती, त्यांच्याच घरी. निघताना तिथं काय होईल अशी धडधड होती. पण त्याआधी अमिताभ बच्चन, माणिक वर्मा, सुधीर फडके इत्यादींच्या मुलाखती घेतलेल्या आठवल्या आणि धीर आला. प्रत्यक्ष अनुभव वेगळाच होता. अगदी सहज सुरुवात झाली आणि काही वेळातच त्या म्हणाल्या 'इथं नको, आत एअर कंडिशनमध्ये बसूया'. तिथं त्या पलंगावर बसल्या आणि मी खुर्चीवर, त्यांच्या जवळच. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. सहज विचारलं की 'काहीजण छोटासा बालमा या गाण्याची चाल, सुकतातचि जगी या, या नाट्यगीतावरूनच बेतलेली आहे हे खरं आहे का', त्यावर म्हणाल्या 'मला नाही तसं वाटत'. दीड दोन तास चाललेली ही मुलाखत संपली तेव्हा त्या म्हणाल्या, 'तुम्ही लिहिलेलं आधी मला दाखवा बरं का'. म्हटलं 'ठीक आहे'.

त्यांना विचारलं 'एक किस्सा सांगू का?' त्या सरसावून बसल्या आणि म्हणाल्या 'सांगा की'. मग त्यांना सांगितलं की, एकदा घरात नेहमीप्रमाणं लता आणि आशा यांच्यात 'चांगलं कोण गातं' यावर वाद चालला होता. दोन्ही बाजू भक्कमपणं आपली मतं सांगत होत्या. शेवटी कल लताच्या बाजूनं जाणार असं दिसू लागलं आणि तसंच झालं. धाकट्या पुतण्याला एकानं डिवचलं 'बघ, आशापेक्षा लताच श्रेष्ठ'. त्यावर तो चटकन म्हणाला, 'असू दे. पण बहीण कोणाची आहे, आशाचीच ना!' हे ऐकून त्या म्हणाल्या 'छान आहे. पुन्हा सांगा'. दीदीलाही ऐकवीन. तो सांगितलाही. मग निरोप द्यायला त्या दारापर्यंत आल्या.

मी मुलाखत लिहिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणं त्यांच्याकडं गेलो, त्यांना ती दाखवली आणि कागद त्यांच्याकडं दिले. त्यांनी जेमतेम एक पान वाचलं आणि म्हणाल्या 'हे तर मी बोललेलंच आहे'. त्यावर म्हटलं की, 'माझ्या पदरचं त्यात काहीच नाहीय'. त्या हसल्या आणि म्हणाल्या की 'अहो, काही जणं भलभलतंच लिहितात, म्हणून अशी खबरदारी घ्यायला लागते'. बऱ्याच जणांना ती मुलाखत आवडली. बरोबर त्यांना आवडणाऱ्या त्यांच्या दहा गाण्यांची यादीही दिली होती. आता आठवत नाही, पण त्यात 'चांदण्यात फिरताना, माझा धरलास हात', हे गाणं होतं हे लक्षात आहे.

ज्या आवाजानं 'देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला', हे गीत गायलं, त्याच आवाजानं 'बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला' आणि 'झुमका गीरा रे, बरेलीके बाजारमें' हे देखील गायलं यावर चटकन विश्वास बसत नाही, पण ते खरंच आहे. साक्षात लता मंगेशकरनं तिच्याकडून 'रेशमाच्या रेघांनी', हे गाणं गाऊन घेतलं. त्यातला 'हात नका लावू माझ्या साडीला' मधला खोटा खोटा फणकाराही त्यांनी किती खुबीने दाखवला. तसंच 'ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी की गं काढली, बाई माजी करंगळी मोडली' हे ऐकताना भुलला नाही, असा श्रोता विरळाच.

त्यांनी सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन, सज्जाद, सचिन देव बर्मन, मदन मोहन, रवी, जयदेव, आर. डी. बर्मन इत्यादी संगीतकारांच्या रचना गायल्या त्याचप्रमाणे भप्पी लाहिरी, ते ए. आर रेहमानपर्यंतच्या नव्या पिढीच्या लोकांसाठीही ती गायली. लगानमधलं, 'राधा कैसे न जले' हे उदित नारायण आणि वैशाली सामंत यांच्याबरोबरचं गाणं प्रचंड गाजलं. ते त्यांनी चांगलं खुलवलं होतं. आता त्यात रेहमानचा भाग किती आणि त्यांची स्वतःची भर किती हे शोधायलाच लागेल. ते ऐकताना ज्यानं ठेका धरला नाही, त्याला औरंगजेबाच्या माळेतलाच संगीतद्वेष्टा म्हणायला हवं. नव्या गायक गायिकांच्या साथीनंही ती तितक्याच परिणामकारपणे गायली. साधारण वीस भाषांमधील गाणी म्हटली. अगदी ब्रेट ली सारख्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूबरोबरही !

मधुबाला, मीना कुमारी, नूतन, नलिनी जयवंत, कल्पना कार्तिक यांच्यापासून ते सआशा पारेख, हेमा मालिनी, रेखा आणि नंतर काजोल, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, ग्रेसी सिंग अशा अनेक नायिकांना तिनं आवाज दिला. तसा हेलन, बिंदू यांनाही. मराठीतही सुलोचना, सीमा आणि अनेकींना तिनं आवाज दिला. पण पडद्यावर ती गाणी पाहताना असं वाटत नाही की, ती त्या नायिकांखेरीज अन्य कुणी म्हटली आहेत. हेच लता आणि आशा यांचं वैशिष्ट्य होतं. 

सुधीर फडके यांचा उच्चारावर किती कटाक्ष होता, याबाबत त्या मुद्दाम सांगत. आणि मग नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला या गाण्याचा उल्लेख करत. मोजक्या वाद्यांच्या साथीतलं ते गाणं अविस्मरणीय बनलं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, हे देवबाप्पातलं गाणं आणि त्याच सिनेमातलं करू देत शृंगार, सख्यानो करू देत शृंगार ही गाणी अगदी दोन वेगळ्या धाटणीतली, पण तीही समर्थपणं गायली. पु. ल. देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर यांची दाद मिळवली. बैल तुझे हरणावाणी, गाडीवान दादा, तरुण माणसाच्या मनिचा जाण तू इरादा, हे प्रपंच मधलं गाणंही त्यातल्या लकेरींसाठी ऐकावं. ‘आई आणिक बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला, सांग मला रे सांग मला’, हे बोलकी बाहुली या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या साथीनं म्हटलेलं गाणं ऐकताना हे खरंच या मध्यमवयीन गायिकांनी म्हटलंय हे खरंच वाटत नसे. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, या गाण्याला अमाप लोकप्रियता मिळाली. अनेकांच्या आठवणी आजही त्यामुळं जाग्या होतील. ऋतु हिरवा, ऋतु बरवा हे गीतही अविस्मरणीयच.

मात्र या साऱ्यात त्यांनी गायलेल्या कव्वाल्या विसरता येणार नाहीत. ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ ही तर निव्वळ अप्रतिम! या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी थोड्या संथ आणि गंभीर आहेत. आणि नंतर निगाहे मिलाने को जी चाहता है या उडत्या चालीच्या ओळी आणि त्यासोबत नूतनची अदाकारी. याहून अधिक चांगलं काय असणार, असंच वाटतं. मेरा नाम जोकर मध्ये मुकेशच्या साथीनं गायलेलं कही दाग न लग जाये, प्यार किया तो करके निभाना कही दाग न लग जाये हेही त्यातलंच.

आयुष्यात आशा भोसले यांना अनेक दुःखद प्रसंगांना तोड द्यावं लागलं. पण त्याचा परिणाम त्यांनी गाण्यावर होऊ दिला नाही, हे महत्त्वाचं. उलट त्यामुळं त्यांचं गाणं अधिक समृद्धच बनलं असावं. झालं ते झालं. ते विसरून माणसानं पुढं जावं हे त्यांनी स्वतःच्या आचरणानंच दाखवून दिलं. खरं तर त्यांच्याबाबत आणि त्यांच्या गाण्यांबाबत कितीही लिहिलं तरी कमीच पडेल. पण हर तऱ्हेची गाणी म्हणण्याची त्यांची खासियत होती आणि प्रत्येक गाण्याला त्या पूर्ण न्याय देत.

त्यांनी गायलेली हजारो गाणी आपल्याला साथ देतच राहणार आहेत. वयाच्या नव्वदीपर्यंत त्या गात होत्या. कार्यक्रम करत होत्या आणि रसिकांना त्यांच्या सुरांनी भुलवून टाकत होत्या. अगदी जगभरच्या रसिकांना आजही त्या आठवणी असतील. त्यांचं स्टेजवर येणं, हलकेच गायला सुरुवात करणं, त्याला हावभावांची आणि जराशा पदलालित्याची जोड देणं आणि आतल्या सुरांनी रसिकांना न्हाऊ घालणं, हे कधीच विसरता येणार नाही!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

 

Tags: indian music song songs singing आशा भोसले संगीत सिने संगीत गायन गायिका Load More Tags

Add Comment