माझ्या बायांच्या पहिल्या मीटिंगमध्ये भेटलेली आम्रपालीताई. जर त्या दिवशी बायांनी मला मारलं असतं, तर माझ्या अंगावर येणारा सर्वांत पहिला हात आम्रपाली ताईंचा असता. 27-28 वर्षांची सडपातळ, बोलक्या डोळ्यांची, प्रचंड चंचलता असलेली बाई. शरीरकाठी बारीक असली तरी आवाज असा दणकट की चार घरी ऐकू जाईल. सतत कपाळावर आठ्या अन् बोलण्यात दुनियेची घाई, त्यामुळे अनेकदा शब्द अडखळे. तिच्या बोलण्यात तीव्रता होती, ती नेहमी हातवारे करून बोले. बऱ्याचदा रागात तर ती इतकं बोलून जाई की, तिच्या पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीही संबंध नसे. रागात ती बेभान होई. म्हणून बऱ्याचदा भांडायचं असलं की, बाया आम्रपालीताईला पुढं करत. मलाही सुरुवातीला तिची भीती वाटे. ही बाई म्हणजे डेंजर आहे, कधीही काहीही बिना फिल्टर बोलून देते, आपण नको बाबा तोंडी लागायला, म्हणून मीही जरा जपूनच बोलायचे. तसाही पहिल्या मीटिंगच्या अनुभवावरून मला जरा तिचा धाकच होता.
कालांतराने, आमची मैत्री झाली तेव्हा मला 'आम्रपाली' समजू लागली. एकदा मीटिंगला सर्व बाया जमल्या होत्या. काम सुरू होण्याआधी एकमेकांशी गप्पा मारत होत्या. प्रिया, संध्या, साधनाताई व आम्रपाली एकमेकींशी काहीतरी कुजबुजत होत्या. त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. सर्व जणी आम्रपाली ताईच्या गळ्यातलं नवीन मंगळसूत्र निरखून बघत होत्या. "कित्ती छान आहे! कितीला घेतलंस? मस्तय, परवडलं गं" असं सगळ्या जणी आम्रपाली ताईशी बोलत होत्या.
नंतर आमची मीटिंग सुरू झाली.
पुन्हा तीन-चार महिन्यांनी ताईच्या गळ्यात नवीन माळ दिसली, पुन्हा काही जणी तिची तारीफ करत होत्या, आणि आम्रपाली ताईच्या चेहऱ्यावर हसू होतं, ती कौतुकाने सगळ्यांना दाखवत होती. यावरून मला हे तर कळलं होतं की, तिला नटायला आवडतं, दागिन्यांची आवड आहे. मी कौतुकाने तिच्याकडे बघत होते. मी तिच्याकडे बघतेय हे लक्षात आल्यावर तीही माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसली. आम्रपाली ताईचा मूड चांगला होता. म्हटलं ह्याच संधीचा फायदा घ्यावा आणि आज बोलून बघावं. म्हणून मीटिंग झाल्यावर मी मुद्दाम तिला बहाण्याने थांबवून घेतलं. एव्हाना तिचाही माझ्याप्रतिचा राग कमी झाला होता.
मी म्हटलं, "ताई घरी सगळे कसे आहेत?"
"चांगले हाय ताई", आम्रपालीताई बोलल्या.
मी म्हटलं, "घरी कोण कोण आहे?"
"हे, दोन पोरं अन् सासू-सासरे", ताई बोलल्या.
"पोरं कोणत्या वर्गात आहेत?"
तर म्हणाल्या, "येक तिसरीत हाये, अन् येक पाचवीत."
"अरे वा! लहानच आहेत म्हणजे." मी मुद्दाम त्यांच्या गळ्यातल्या हाराला हात लावून म्हटलं, "छान आहे हं गळ्यातलं."
हे ऐकल्यावर ताईच्या चेहऱ्यावर हसू आलं, गळ्यातल्याशी खेळत त्या म्हणाल्या, "चंद्रपूरले गेल्ती ना, तिथून घेतले."
मी मुद्दाम उचकवायला म्हटलं, "मज्जा आहे बा, नवीन नवीन गळ्यातले घेते लोकं दर महिन्याला."
त्यावर आम्रपालीताई भाबडी हसली आणि म्हणाली, "असली थोडी होये, नकली होय म्हणून परवडते."
पुढे स्वतःच सांगू लागली, "मोठ्या पोराची तब्बेत लय बिघडली होती, त मी माये गळ्यातले मणी मोडले व्हते, मंग आता हेस घालतो."
तिचं हे बोलणं ऐकलं. आपण एखाद्याबद्दल काहीतरी विचार करून त्याची प्रतिमा आपल्या मनात तयार करतो आणि कशाचा तरी धक्का लागून त्या प्रतिमेचा चुराडा होतो, असं काहीतरी माझ्यासोबत झालं. मी ताईच्या चेहऱ्याकडे बघत राहिले, त्या आनंदी होत्या. कुठेच दुःख नव्हतं, परिस्थितीची जाणीव होती, पण स्वाभिमान जास्त गडद होता. मला स्वतःची शरम वाटू लागली. माझ्या पगारात मी स्वतःसाठी सोन्याचे कानांतले घेतले होते आणि ते कौतुकाने कितीदातरी आईला दाखवले होते, बोलताना बोलून गेले, 'मी माझ्या पैशाने घेतले.' ह्या वाक्यामागे मी स्वतंत्र झाल्याची भावना मला गिरवायची होती. पण कितीही महागडा दागिना घेतला तरी आईनं घालून दिलेल्या करदोड्याची सर कशाला येणार आहे! हे त्या दिवशी लक्षात आलं. त्या दिवशीच्या प्रसंगामुळे 'आई' आणि आम्रपाली ताई मूळ 'बाई' जरा जास्त लक्षात आली अन् मी मिरवण्यासाठी घातलेले कानांतले पुन्हा डबीत गेले.
आम्रपाली ताई, चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावची. आई-वडील शेतकरी, जेमतेम तीन एकर जमीन आणि ह्या सहा बहिणी. गावात चौथीपुढं शाळा नव्हती, म्हणून त्या हॉस्टेलमध्ये शिकल्या. सहा लेकींचं ओझं म्हणून आई-बापानं मुलींची पटापट लग्नं केली. ताई बहिणींमध्ये शेवटून दुसऱ्या. अठराव्या वर्षी आत्याच्या ओळखीतून एक स्थळ आलं आणि ताईंची इच्छा नसताना त्यांचं लग्न जुळवून दिलं. मुलगा शेतकरीच होता, पण एकुलता एक, चार एकर शेत, म्हणून आई-वडिलांनी लग्न लावून दिलं.
नवरा अतिशय लाडात वाढलेला, त्याला शेतातली कामं कधी जमलीच नाहीत, सासू-सासरेही सोबतच राहायचे. आम्रपाली ताईना स्वयंपाकातलं काहीच येत नसे. लग्न झाल्यापासूनच घरातल्या लोकांचं टोकणं सुरू झालं होतं. स्वयंपाक चांगला येत नाही, काम करता येत नाही, असले काहीही विषय घेऊन तिला जाच सुरू झाला. आधीच इतक्या कमी वयात लग्न झाल्याने तिची आई-वडिलांवर नाराजी होती आणि सासरीही तिरस्कार झेलल्याने ती हतबल झाली होती. तिला कोणीही बोलायला नव्हतं, कुणी मैत्रीण नव्हती, त्यामुळे तिचा स्वभाव आणखीन चिडचिडा होत गेला. नवराही काही काम करेना. याउलट तो सासू-सासरे ह्यांच्यासोबत मिळून आम्रपालीताईला जास्त त्रास देई.
घरची परिस्थिती एवढी बिकट झाली की, ताईला तिच्या सात महिन्यांच्या बाळाला सोडून शेतात जावं लागे. ती दिवसभर शेतात राबत असे आणि संध्याकाळी घरी येऊन घरातली कामं करी, सोबत बोलणेही खावे लागे. कालांतराने, ताईच्या घरची परिस्थिती आणखी ढासळत गेली. दोन लहान मुलं होती, त्यांच्या शिक्षणालाही खर्च येणार होता. नवऱ्याजवळही ठोस असं काही काम नव्हतं आणि कुणाच्यातरी सांगण्याहून ती कंपनीच्या कामापर्यंत पोहोचली. मला नोकरी लागण्याआधीच ह्या सर्व बाया एकत्र काम करत होत्या. आता आम्रपालीताई शेतातीलही काम करीत व कंपनीच्या CSR च्या प्रकल्पातही काम करीत. एकंदरीत, ह्या सर्व प्रकरणामुळे ताई एकदम चिडचिड्या झाल्या होत्या, घरी कुणी काही म्हटलं की, लगेच भांडणावर उतरत. गावातही तिचा आधी फार कुणाशी संवाद नव्हता, पण एकंदरीत 'आम्रपाली ताई भांडणाला तयार असते', त्यांच्याविषयी असं मत तयार होऊ लागलं होतं.
मला पहिल्यांदा भेटल्या तेव्हा, अनेक महिन्यांपासून पगार न मिळाल्याने बाया कंपनीसोबत भांडायला उतरल्या होत्या. त्यात सर्वांत जास्त आक्रमक आम्रपाली ताई होत्या, त्या वेळेस मला त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली नव्हती, पण आज त्यांची परिस्थिती कळते. कोविडच्या काळात सगळी कामं बंद पडली. मजुरी थांबली, पैसा संपला, अशात स्वतःच्या पगाराचे हक्काचे पैसेसुद्धा भांडून मागावे लागतात, हे केवढं वैफल्यग्रस्त करणारं आहे.
एवढ्या कमी वयात जिथे शहरात त्यांच्या वयाच्या मुली आपल्या करिअरकडे लक्ष देतात, तिथे आम्रपालीताई काबाडकष्ट करून मुलांना जगवत होत्या. दहावी पास करणाऱ्या नंदाताई व आम्रपाली ताई एकाच गावाच्या. पण ह्यांच्या वयात जेवढं अंतर तेवढंच त्यांच्या स्वातंत्र्यातही. नंदाताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर माहेरी आल्या होत्या, त्यामुळे कुटुंबाचं झेंगट त्यांच्या मागं नव्हतं. ह्याउलट, आम्रपाली ताई फार कमी वयातच जबाबदारीच्या ओझ्याखाली दबल्या होत्या. सासू-सासऱ्यांसोबत एका झोपड्यासारख्या घरात राहत होत्या. माझ्या बायांनी पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वच बाया ह्यासाठी तयार नव्हत्या, आणि त्यामध्ये आम्रपाली ताईही होत्या. त्यांचीही शिकण्याची तयारी नव्हती. पण मी त्यांना कधी ह्याबद्दल आग्रह केला नाही. कारण शिक्षणापलीकडे माझ्या बायांच्या आयुष्यात होणारे भावनिक-नैतिक-बौद्धिक बदल मला दिसत होते.
मीटिंगला येताना नंदाताई व आम्रपाली ताईंना एकत्र नदी ओलांडून यावं लागे. दहावीचा निकाल लागल्यावर मीटिंगच्या दिवशी आम्ही नंदाताईंचा सत्कार केला, त्या 26 वर्षांनंतर 63 टक्क्यांनी दहावी पास झाल्या होत्या. ताईंचं खूप कौतुक झालं. त्या वेळी मनोगत व्यक्त करताना नंदाताई म्हणाल्या की, त्यांना आता बारावी करायचीय, मग त्यांना राज्यशास्त्र शिकायचंय. त्या फार उत्साहाने व महत्त्वाकांक्षेने बोलत होत्या आणि आम्रपाली ताई हे सर्व एका कोपऱ्यात उभं राहून बघत होत्या. त्या दिवशी नंदाताईंसोबत परत गावी जाताना, नदी ओलांडताना नावेत बसून, आम्रपाली ताईंनी निश्चय केला की, आता त्या शिकणार.
घरी परत जाताच त्यांच्या भावनांचा बांध फुटला, त्यांनी त्वेषातच नवऱ्याला हट्ट केला, "नंदाताई 52 वर्षांची होऊन शिकू शकते त मी काऊन नई? मी बिन शिकेन, म्या बारावी केलीच कुटं? लगीनस होऊन गेलं. मले शिकायचं हाये, बाबाच्या गावाहून माई टीशी काढून आना."
ताईंच्या बोलण्यात एवढा आवेश होता की, त्यांच्या नवऱ्याला होकार द्यावा लागला. कंपनीत नोकरीला लागल्यापासून ताईंना स्वतःचा पगार सुरू झाला होता, थोडी का होईना पण ताई जमा रक्कम बाजूला काढून ठेवीत.
गावातही कामामुळे त्यांची सगळीकडे ओळख झाली होती आणि पर्यायाने नवरा आता ताईंप्रति जरा सौम्य झाला होता. म्हणून आता ताईंच्या बारावीच्या निर्णयावर नवऱ्यानेच सासू-सासऱ्यांशी बोलण्याची जबाबदारी घेतली. "शिकू द्या तिले शिकाचं हाये त, नोकरी करीन राहिली ना, तेथी कमी पडते" असं म्हणून शेवटी ताईंचं शिक्षण सुरू झालं. लगेच जाऊन माहेरच्या शाळेतून टीसी आणली आणि 17 नंबरचा फॉर्म भरून, बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरला. ह्या वेळी गळ्यातली माळ आणायला नाही, तर बारावीचं पुस्तक घ्यायला ती नवऱ्याला तालुक्याला घेऊन गेली. एखाद्या बापानं शाळेत जाणाऱ्या मुलीला स्टेशनरीतून पुस्तकं-वह्या घेऊन द्याव्या, अगदी तसंच दृश्य त्या दुकानात तयार झालं, त्या दिवशी घरी परत जाताना, आम्रपाली ताईंच्या हातातल्या पिशवीपेक्षा त्यांच्या डोळ्यांतली स्वप्नं जास्त मोठी होती.
ताईंनी जोमाने अभ्यास सुरू केला, सकाळी चारला उठून त्या एक तास अभ्यास करत, मग मुलांच्या शाळेची तयारी, स्वयंपाक, शेणाचं सारवण, नदीवरून पाणी आणणे, अशी सर्व घरची कामं त्या आवरत. नंतर गावातली कंपनीने आखून दिलेली कामं करत, तर कधी त्यांना शेतात कामाला जावं लागे. मग मुलं शाळेतून येण्याच्या वेळी ताई घरी परत येत, त्यांचं जेवण झालं की, मुलं बाहेर खेळायला जात आणि ताई पुन्हा अभ्यासाला बसत. संध्याकाळ झाली की, पुन्हा चूल पेटवावी लागे. सासू-सासरे, मुलं नवरा, पाहुणेरावळे सर्वांचे जेवण उरकले की, ताईंना पुन्हा एखादा तास मिळे, असं करत ताईंनी बारावीचा अभ्यास केला. त्यांची मुलं त्यांच्या आईची धडपड बघत होते, त्यांनाही आईचे कष्ट कळू लागले होते.
आम्रपालीताई आता आवर्जून सांगतात 'पेपरच्या पहिल्या दिवशी कुठलंतरी दूरचं सेंटर मिळालं होतं. गावातून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी थेट गाडी नव्हती, नदी ओलांडून, काळीपिवळी पकडून तीन किलोमीटर पायदळ जाऊन बहिणीच्या लेकाला बोलवावं लागे, पुढे तो पाच किलोमीटर नेऊन परीक्षा केंद्रावर सोडत असे. परीक्षेच्या दिवशी ताईंना घरून सकाळी सहाला निघावं लागे. उजेड पडण्याच्या आत सगळ्यांचा स्वयंपाक करून, आपलं हॉल तिकीट, बोर्ड आणि पेन पिशवीत भरून ताई नदीच्या दिशेनं निघायच्या, खरं तर आयुष्याच्या प्रकाशाच्या दिशेनं निघायच्या. पहिल्या दिवशी ताईंना परीक्षा केंद्रावर पोहोचायला जरा उशीर झाला, जेव्हा त्या वर्गात शिरल्या तेव्हा सगळी 17-18 वर्षांची मुलं ताईंकडे कुतूहलाने बघत होती. साडी नेसून आलेली ही बाई बारावीत कशी, आत्ता का परीक्षा देतेय, असे नाना प्रश्न त्यांना पडत होते. मुलं-मुली आपापसांत काहीतरी कुजबुजत होती, मध्येच खुदकन हसत होती. ह्यानं ताईंना फार खचल्यासारखं झालं. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. सगळं सोडून पळून जावं, असं वाटत होतं. पण त्या दिवशी धाडसाने त्यांनी पेपर दिला. दुसऱ्या पेपरच्या वेळी, काही मुली स्वतःहून ताईजवळ आल्या, त्यांनी कुतूहलाने आत्ता का पेपर देताय, अशी विचारपूस केली, तेव्हा ताईंनी त्यांना सांगितलं, 'मला आत्ता शिक्षणाचं महत्त्व पटलं, तवाच जिद्द केली असती तर लग्न न करता बारावीचे पेपर दिले असते, पुढं शिकली असती तर आता आयुष्य काहीतरी अलग असतं, आता दोन पोरं झाले, पण शिकाले काई वय लागत नाही, म्हणून घेतली अॅडमिशन, आता पुढंबी शिकीन.'
ते ऐकून मुलींमध्ये ताईंचा आदर वाढला, त्या आता ताईंशी रोज बोलू लागल्या, त्यांनाही ताईंचं कौतुक वाटत होतं. पहिल्या पेपरला घाबरलेल्या आम्रपाली ताई, शेवटच्या दिवशी मुलींसोबत सेल्फी घेऊन परत आल्या.
ताईंचा निकाल लागला, त्या दिवशी त्या कंपनीच्या कामानिमित्त अंगणवाडीत गेल्या होत्या. ताईंनी मला फोन केला आणि म्हणाल्या, "ताई, बारावीचा निकाल लागला, पासष्ट टक्के पल्ले पा." त्या दिवशी इतका आनंद झाला की, मला कुणाला सांगताच येईना. त्या दिवशी ताईनं मला अशा रत्नांनी मढवलं होतं की, प्रत्येक दागिना आमच्या आनंदापुढं फिका होता. आम्ही कंपनीकडून आम्रपाली ताईंचा सत्कार केला. आता ताईंचं निरागस हसू परत आलं होतं.
मागच्या पाच-सहा वर्षांत आम्रपालीच्या बदललेल्या रूपावर तिचा स्वतःचा विश्वास बसत नाही. तिने नोकरीतून पै-पै जमवून सासू-सासऱ्यांच्या शेजारी तीन खोल्यांचं घर बांधलंय. पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलाय. मुलांना जाणीवपूर्वकरीत्या घरातली सर्व कामे शिकवली आहेत, मुलेही अभ्यासात हुशार आहेत, त्यांना आईचं फार कौतुक आहे. आमच्या आईला इंग्रजी येते, हे ते आवर्जून सांगतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या आम्रपाली ताईंना शेवटचं चिडलेलं केव्हा बघितलं, हे आत्ता मलाही निश्चित आठवत नाही. घरातही सासू-सासऱ्यांच्या वागण्याने आता टोकाची भांडणं होत नाहीत, परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे आता ताईंना चांगलं जमतं. आता काही दुखलं-खुपलं तर त्यांना हक्काच्या मैत्रिणी आहेत, त्या सतत एकमेकींशी संपर्कात असतात.
नुकत्याच झालेल्या संपर्कात आम्रपाली ताईंनी सांगितलंय की, गावातील लोकांना झेरॉक्स-प्रिंट काढण्यासाठी बाहेरगावी जावं लागतं, म्हणून त्या जोडधंदा म्हणून झेरॉक्स मशीन व कॉम्प्युटर प्रिंटरचा सेट घेणार आहेत, त्यासाठी बचत गटाला अर्ज केलाय. तेव्हा, ताईंच्या पुढच्या निकालाची-मार्कशीटची प्रिंटही घरीच निघणार आहे, त्यांनी स्वतःचं भविष्य स्वतः छापल्यासारखी, नाही का?
- वनश्री वनकर
vanshree.vankar111@gmail.com
लेखिका समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यात एका कंपनीतर्फे सीएसआर च्या माध्यमातून काम करत असतानाचे अनुभव साधना साप्ताहिकात 'झरी-जामणी तालुक्यात' या लेखमालेतून प्रसिद्ध झाले, त्यात काही भर घालून त्यांचे पुस्तक 'बाभळीच्या बाया : झरी-जामणी तालुक्यात' यनावणे साधना प्रकाशनाकडून येत आहे. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजता, निवारा वृद्धाश्रम परिसर, नवी (सदाशिव) पेठ, पुणे येथे होणार आहे. हे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच या लिंकवर विकत घेता येईल,
.jpeg)
Tags: आम्रपाली भविष्य शिक्षण महिला सक्षमीकरण महिला शिक्षण झरी-जामणी तालुक्यात बाभळीच्या बाया वनश्री वनकर यवतमाळ सीएसआर महिला सबलीकरण Load More Tags
Add Comment